शहरं/ठिकाणं यांच्या अधिकृत नावांऐवजी जुनी नावे वापरणे कितपत योग्य्/अयोग्य ?

Submitted by DJ....... on 18 November, 2021 - 10:33

प्रत्येकाचं आयुष्य धावत असतं. धावणार्‍या आयुष्यात सतत काहीतरी बदलत असतं. आपली चेहरेपट्टी, रंग-रूप काय अगदी आपले शेजारी-पाजारी-नातेवाईक-मित्र-मैत्रिणीही सतत बदलत असतात. जुने जात असतात अन नवे येत असतात. बरीच माणसं घरही बदलतात एवढंच काय गावं, शहरं, देशही बदलतात. स्वभावाला औषध नसतं असं नुसतंच म्हणतात परंतु वेळ-काळ-स्थळ पाहून मनाला मुरड घालत स्वभावही बदलावा लागतो. भारतात तर रस्त्यांच्या नावां पासून ते सरकारी संस्थांची, इमारतींची, पुरस्कारांची नावंच काय अगदी योजनांची नावं बदलण्याचाही उपद्व्याप केला जातो. ठिकाणांची अन शहरांची नावं बदलण्याची तर रीतच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारी पातळीवर बर्‍याच इंग्रजी नावांच्या ठिकाणांचं नाव बदलून त्या त्या राज्यातल्या थोर व्यक्तिमत्वांची नावं देण्यात आली हे एकवेळ आपण स्वीकारू शकू. परंतू राजकीय फायदे घेण्यासाठी इतिहासकालीन शहरांची नावं बदलणे तितके सहजपणे स्वीकारलं जात नाही हेही आपण पहातो.

इंग्रजांनी बर्‍याच शहरांची नावं त्यांच्या उच्चाराच्या सोयीची केलेली होती जी नंतर त्या त्या राज्यसरकारांनी बदलली ज्यात मुंबई (बॉम्बे), चेन्नई (मद्रास), कोलकाता (कलकत्ता), थीरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) ई. नावांचा समावेश होतो. ही नावे इंग्रजांना नीट उच्चारता आली नाहीत म्हणुन तयार झाली होती तर काही ठिकाणी इंग्रजांनी आपल्या इंग्रजी व्यक्तींची नावे त्या शहरांना दिली होती.

राजकीय लाभ व्हावा म्हणुनही भारतातील काही शहरांची नावे बदलण्यात आली ज्यात मुक्ताईनगर (एदलाबाद), प्रयागराज (अलाहाबाद) वगैरे शहरं येतात.

इंग्रजांनी बांधलेल्या वास्तुंना अन बागांनाही इंग्रजी माणसांची/राजांची/राण्यांची नावे दिलेली असत. पारतंत्र्याची आठवण राहू नये या हेतूने ती नावे बदलली गेली ज्यात व्हिक्टोरिया टर्मिनसचं (व्हीटी) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सी.एस.एम.टी) झालं, इंग्रजांची राणीची बाग नंतर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान झाली. पारतंत्र्याच्या खुणा अशा नामकरणांनी हळू हळू पुसल्या गेल्या. परंतु हे तिथं रहाणार्‍या लोकांना अंगवळणी पडतंच असं नाही. आजही बरीच माणसं सी.एस्,एम.टी. ला व्हीटी म्हणतात (काहीजण तर व्हीटीच्या आधीचं नाव - बोरीबंदरही म्हणतात म्हणे..! Wink ) तर बरेचजण वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानाला राणीचा बाग म्हणतात. वास्तविक जीवनात होतं काय की तिथल्या प्रस्थापीत लोकांनी जुनीच नावे व्यवहारात बोलल्यामुळे विथापित किंवा काही काळासाठी त्या शहरात पाहुणे म्हणुन येणार्‍यांना नव्या अन जुन्या नावांचा संबंध कळत नाही अन त्यांना मानसिक, शारिरीक अन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

उदाहरण म्हणुन एक घटना सांगतो. आमचे एक (मुंबई बाहेरील) स्नेही त्यांच्या मुलां-पुतण्यांसोबत मुंबईत एक दिवस फिरण्यासाठी गेले. रात्रभर रेल्वेने प्रवास करून पहाटे सी.एस.एम.टी. स्थानकात उतरले. एका बर्‍या हॉटेलात जाऊन फ्रेश होऊन नाष्ता वगैरे करून गेटवे ऑफ ईंडिया कडे जाणारी बेस्ट बस पकडली. तिथून भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी ठरवली तर टॅक्सीवाल्याला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कळेना. शेवटी त्या स्नेह्यांनी गुगल मॅप वर ते उद्यान दाखवल्यावर तो टॅक्सीवाला "अरे भाय राणीचा बाग बोलो ना..!" म्हणुन डोक्यावर हात मारता झाला. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बघितल्यावर तिथुन सी.एस.एम.टी. ला कसं जायचं हे विचारलं तर तिथल्या लोकांनी व्ही.टी. ची बस पकडावी असं सांगितलं. बराच वेळ झालं तरी व्ही.टी. बोर्ड असलेली एकही बस दिसेना. शेवटी येणार्‍या प्रत्येक बस मधे "व्ही.टी.ला जाते का..?" असं त्यांनी कंडक्टरलाच विचारलं तेव्हा एका बस कंडक्टरने "चला..या लवकर" म्हणत आत घेतलं अन तिकिट हातात टेकवलं ज्यावर "सी.एस.एम.टी." असा स्थान उल्लेख होता.

उदाहरणादाखल खालील ठिकाणांची इंग्रजांच्या काळातील नावे डावीकडे तर उजवीकडे बदललेली नवीन नावे -

१. बेंगलोर स्टेशन - केंपेगौडा बेंगलुरू स्टेशन
२. पालम एअरपोर्ट - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
३. सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
४. डमडम एअरपोर्ट - नेताजी सुभाषचंद्र आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा
५. हबीबगंज रेल्वे स्टेशन - रानी कमलापती रेल्वे स्टेशन (हे आत्ताच १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बदलण्यात आलं जे केवळ धार्मिक हेतुने बदललं गेलं हे सहज लक्षात येतं)

नवं ते सगळं स्वीकारलं जातं परंतु जुन्याचा सोस अजुनही काही ठिकाणी दिसतोच. वांद्र्याला बँड्रा म्हणणं असो, की शीवला सायन म्हणणं असो, वरळीला वरली म्हणणं असो, हिंजवडीला हिंजेवाडी म्हणणं असो, वानवडीला वानौरी म्हणणं असो, लोहगांवला लोहेगाव म्हणणं असो या उल्लेखांमुळे आपण अजुनही पारतंत्र्यात रमत आहोत हे तर दिसतंच परंतु त्या शहरात बाहेरून आलेल्या माणसांना अशाप्रकारे बुचकळ्यात पडण्याचे प्रसंग येऊन मनस्ताप होऊ शकतो. प्रादेशिक किंवा धार्मिक अस्मिता ठेऊन ठिकाणांची/शहरांची नावं बदलल्यावर ती नवी नावं आपसूक सर्वांच्या तोंडी रुळतात परंतू पारतंत्र्यातल्या नावांचा आग्रह धरून अजुनही आपण पारतंत्र्यातच आहोत अन आमच्यासोबत तुम्हीही पारतंत्र्यात रहा अशी मानसिकता असावी का हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

कदाचित या पारतंत्र्यात रममाण होण्याच्या मानसिकतेमुळेच शहराबाहेरून/ राज्याबाहेरून/ देशाबाहेरून आलेल्या काही ठराविक विचारसरणीच्या लोकांचा गैरसमज होऊन त्यांच्या कडून खर्‍या स्वातंत्र्याला भीक समजलं जात असावं..!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हीही कितीही नावे बदलू पण लोक आपल्या सोयीची रूपेच वापरणार. गुरुग्राम उरणार पाट्यांवर. लोकांच्या तोंडी गुडगावच (ड खाली नुक्ता) रहाणार. उदकमंडल भले असेल ऑफिशियल, पण ती आमची लाडकी उटीच रहाणार.

डिजे, मुंबईला मुद्दाम बॉम्बे म्हणणारे आणि सायनला मुद्दाम शीव म्हणणारे या दोहोंत तरी मला काहीही फरक वाटत नाही.

हिरा, उच्चार उद कमंडल की उदक मंडल?

क्या बात है डीजे.. तिकडच्या चर्चेवर लगेच धागा विणला.
हो, आमच्याकडे राणीबागच बोलतात. टॅक्सीवाल्याला तेच समजते. मग तो मराठी असो वा युपीबिहारचा.
सीएसटीला काही जण व्हिटी बोलतात तर माझ्यासारखे दर्दी लोकं आजही बोरीबंदरच बोलतात. तसेच समोरून जर कोणी बोरीबंदर असा उल्लेख केला तर फार छान वाटते.

माझी शाळा अगदी पहिल्या शिशूवर्गापासून दादरची ईंडियन एज्युकेशन सोसायटीची राजा शिवाजी विद्यालय. जुने नाव किंग जॉर्ज. मी वा आमच्या घरात आजही त्या शाळेला किंग जॉर्जच म्हणतात. आमचा ऋन्मेष किंगजॉर्ज शाळेत जायचा असेच अभिमानाने सांगतात.
नुकतेच शाळेच्या ग्रूपवर हा विषय निघालेला, सारे वर्गमित्र आपण कसे राजा शिवाजी विद्यालय बोलतो आणि आपल्याला कसे आपल्या मातीचा, आपल्या भाषेचा, आपल्या महाराजांचा अभिमान आहे असे सांगत होते. आता ते खरे खोटे जे काही असेल त्यांच्या मताचा, त्यांच्या भावनांचा आदर आहे. पण मी मात्र प्रामाणिकपणे म्हटले की मी तर बाबा आजही किंग जॉर्जच बोलतो. तर जणू मी महाराष्ट्रद्रोही असल्यासारखेच सर्व जण माझ्यावर तुटून पडले.

मी तरी नावगावाशी माझ्या अस्मिता जोडत नाही. एकदा त्या जोडल्या की मग त्या भडकावून त्याचे जे राजकारण केले जाते त्यालाही मी कधीही सहज बळी पडू शकतो असे वाटते. जर माझ्या तोंडात माझ्या शाळेचे नाव राजा शिवाजी विद्यालय न येता किंग जॉर्ज येत असेल, जर मी वीरमाता जिजाबाई उद्यानाला राणीचा बाग म्हणत असेल, वा सीएसटीला बोरीबंदर म्हणत असेल यावरून कोणी असा निष्कर्श काढत असेल की मला महाराजांचा किंवा जिजाऊमातेचा आदर नाही तर एखाद्याने तसा अर्थ खुशाल काढावा. मी त्यांच्या भावनांचा आदर करून पुढे जाणे ऊचित समजतो.

बॉम्बेला मुंबई हे माझ्या तोंडी रुळले आहे. किंबहुना कोणी बॉम्बे म्हटले तर मीच मुद्दाम मुंबई असे जोर देऊन बोलतो Happy
पण मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकाला मी आजही बॉम्बे सेंट्रलच बोलतो.
माझ्या फार आठवणी जोडल्या गेल्या आहेत त्या स्थानकाशी. कधी सुट्ट्यांमध्ये काकांकडे जायचो तेव्हा परत येताना बॉम्बे सेंट्रलला उतरायचो. आणि ब्रिज क्रॉस करून बाहेर येताना जिथे बाहेरगावी जाणार्‍या गाड्या दिसायच्या त्या पूलवर अर्धा पाऊण तास त्या बघत उभा राहायचो. गाड्या सुटल्या की माझ्या डोळ्यात पाणीही यायचे. कमाल म्हणजे माझे आईवडीलही माझा हा हट्ट पुरवत तिथे थांबून राहायचे Happy

वांद्र्याला बँड्रा म्हणणं असो, की शीवला सायन म्हणणं असो, वरळीला वरली म्हणणं असो, हिंजवडीला हिंजेवाडी म्हणणं असो, वानवडीला वानौरी म्हणणं असो, लोहगांवला लोहेगाव >>>>> ह्यात बावधनला 'बावदान' हे ही अ‍ॅड करा.
पण ह्यात जुन्याचा सोस कुठे आहे ? ही नाव बदललेली नाहीयेत तर ती अमराठी भाषिकांनी त्यांच्या सोईनुसार बदलून घेतलेली आहेत. बँड्रा हे अधिकृत नाव होतं का कधी ? ते अँक्स्टेंट मारण्याच्या नादात झालेलं आहे ना ? तसच मराठेतर लोकांना 'ळ' म्हणता येत नाही म्हणून ते वरली म्हणतात.

मुंबईला 'बॉम्बे' किंवा पुण्याला 'पूना' हे जे कोणी म्हणतात तेव्हा मी आता ते बदललेलं आहे हे आवर्जून सांगतो. आत्तापर्यंत दोन वेळा एअर इंडीयाच्या भारतीया कॅप्टनना आणि एकदा एमिरेट्सच्या भारतीय गेट एजंटला मी अधिकृत तक्नार करेन असं सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या अधिकृत अनाऊंसमेंटमध्ये बॉम्बे म्हंटल्याबद्दल माफी मागितली होती.

सांताक्रुझ आंतरराष्ट्रीय विमानतळ >>>> रच्याकने, आंतरराष्ट्रीय विमानतळा सांताक्रुज नाही तर सहारला होता.

रोजची पिरपिर पिपाणी बाजूला ठेवून एक पूर्ण पोस्ट केलीत त्याबद्दल अभिनंदन.

पारतंत्र्य स्वातंत्र्य याबद्दल आम्ही 'सामना'चं मत ग्राह्य धरतो. कंगना पण सामनाच वाचत असणार.
257428383_284191070388748_7386597858015273163_n.jpg

भावधान बद्दल अगदी अगदी....यात हिंजेवाडी पण टाका.
एका टीममेटला मी काही तरी सांगताना म्हणलं हिंजवडी तर तो म्हणे ये कहा पे है, म्हणलं आपण जिथे उभे आहोत तेच आहे हिंजवडी तर म्हणे ठीक से हिंजेवाडी बोलो ना. म्हणलं का रे बाबा तर मलाच म्हणाला यही नाम है ये जगह का. म्हणलं बरं!!!!

बाकी मला तरी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पटकन झेपत (समजत किंवा कळत) नाही. मला पुणे विद्यापीठच कळतं. हा सवयीचा भाग आहे कारण मला सावित्रीबाईंबद्दल नितांत आदर , प्रेम आणि अभिमान वाटतो.

The institution's name was changed from the University of Pune to Savitribai Phule Pune University on 9 August 2014 in honor of Savitribai Phule
मला आता वरची पोस्ट वाचून हे समजले. आमच्यावेळी पुणे युनिवर्सिटीच होते.

मुंबईचे काही बदलले असेल तर ते देखील सांगा.

शिवाजी युनिवर्सिटी, कोल्हापूर ही मात्र फेमस होती. मी जेव्हा तिथे होतो तेव्हा प्रत्येकाला हेच नाव उच्चारताना पाहिले होते.

तसेच बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटी, याला शॉर्टमध्ये बामु असे म्हटले जायचे.

मी मुंबईत माझगावला राहतो. हिंदीमध्ये मझगाव आणि ईंग्लिशमध्ये मॅझगॉन बोलायची सवय लागलेली.
नंतर लग्न झाले. मुलगी झाली. तिला घेऊन राणीबागेत फिरायला जायचो तेव्हा परत येताना टॅक्सीवाल्याला विचारायचो, मझगाव चलोगे.
एकदा पोरगी म्हणाली, पप्पा तू मझगाव का बोलतोस? आणि मी विचारात पडलो....
पोरगी नुकतीच बोलायला शिकलेली. त्यामुळे प्रत्येक शब्द चूक की बरोबर हे तपासूनच आपल्या मेंदूच्या डिक्शनरीमध्ये जमा करायची. पण त्या दिवशी ती मला शिकवून गेली. माझी डिक्शनरी रिफ्रेश मारून गेली.
तेव्हापासून मी मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही भाषेत का बोलत असेना माझगावच बोलतो Happy

जसे कानावर पडत गेले तसे ते शब्द रुळले...

मी कायम व्हिटी ऐकले आहे, बोरीबन्दर हे मुळ नाव होते माहीत नव्हते, त्यामुळे आताही व्हीटीच म्हटले जाते.. माझ्या घरातील पुढची पिढी सिएस्टी म्हणते, त्यानी बोरीबन्दर कधिच ऐकले नाही आणि व्हीटी तोन्डी रुळायच्या आत ते सिएस्टी झाले. बोम्बे,मद्रास ही नावेही त्यान्च्या तोन्डी येत नाहीत कारण त्यानी मुम्बै चैनै हेच ऐकले..

आमची राणीची बाग मात्र आताही राणीचीच बाग आहे. क्विन विक्टोरिया गार्डन नाव असताना ती राणीची बाग होती आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान झाल्यावरही ती राणीचीच बाग राहिली. तेव्हाच्या टॅक्सिवाल्यालाही विक्टोरिया गार्डन कळले नसते.

(रच्याकने वरळीला जिजामाता म्हणुन एक बसस्टोप आहे. मी वरळीला प्रवास करताना खुप वेळा ऐकायचे हे नाव आणि मलादरवेळी राणीची बाग आठवायची. नन्तर कळले की हा तिथलाच जवळचा स्टॉप आहे)

भारतात आय आय टी सर्वांना माहीत आहे. परंतु भारतातील सर्वोच्च (पहा: जागतिक विद्यापीठ क्रमवारी) शिक्षण आणि संशोधन संस्था आय आय एस सी फारशी कुणाला माहीत नाही. बाकी शहरांचं जाऊ द्या, पण ज्या शहरात ती संस्था आहे, तिथे बंगलोर (नवीन नाव - बेंगळूरु)मध्ये रिक्षावाल्याला विचारा 'आय आय एस सी' - अजिबात कळणार नाही. पण 'टाटा इन्स्टिट्युट' (जुने नाव) विचारा, कुणी पण सांगेल.

<< आमच्यावेळी पुणे युनिवर्सिटीच होते. >>
आमच्यावेळी University of Poona होते.

2021-11-18.png

प्रश्न सवयीचा आणि सवय करून घेण्याचा आहे. पंडित पलुस्कर चौक या नावाऐवजी ऑपेरा हाऊस हेच जास्त ओळखले जाते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

नाव देण्याचा, असलेले नाव बदलण्याचा आणि त्यात धार्मिक-जात राजकारण आणायचा उद्योग सर्व पक्षांनी केलेला आहे. प्राधान्य कशाला द्यायचे हे जनतेने ठरवायचे, योग्य रितीने पाठपुरावा केला तर संदेश राजकाराण्यांना जरुर मिळतो.

१. बेंगलोर स्टेशन - केंपेगौडा बेंगलुरू स्टेशन
>>>
बंगलोर रेल्वे स्टेशन : क्रांतिवीर संगोली रायण्णा स्टेशन - (बोली भाषेत) रेल्वे स्टेशन (बंगलोर कँटॉन्मेंट स्टेशनला कँटॉन्मेंटच म्हणतात)
बंगलोर बस स्टेशन : केंपेगौडा बस स्टेशन - (बोली भाषेत) मॅजेस्टिक (हे नाव तिथे जवळ असलेल्या मॅजेस्टिक होटेल मुळे पडलं)
बंगलोर इंटरनॅशनल एअर्पोर्ट : केंपेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट - (बोली भाषेत) एअरपोर्ट (एच.ए.एल. एअरपोर्ट बंद झाल्यानी दुसरा एअरपोर्टच नाही, त्यामुळे कन्फ्यूजन व्हायचा प्रश्णच नाही)

पारतंत्र्याच्या खुणा उस्फूर्ततेने पुसल्या गेल्या पाहीजेत. जसं सँडहर्स्ट रोडचं नाव स्थानिकांनी बदललं होतं.

कसले पारतंत्र्य ?

नुसत्या वेगळ्या धर्माचा राजा/ राणी होते म्हणून तेवढी 600 वर्षेच गुलामगिरी का ? आणि त्याच्या पूर्वी काय आबादी आबाद होते का ?

आपण 10000 वर्षे गुलामच होतो, 1857 ते 1947 मध्ये सगळ्या मालकांना हाकलून आपण स्वतंत्र झालो , त्यामुळे 1857 च्या आधीच्या कोणत्याच राजा महाराजाचेही नाव देऊ नये

1857 नंतरच्यांची नावे जतन करावीत , त्यांचे आजचे वारस गरीब असतील तर त्यांना सरकारी नोकर्या द्याव्यात

बंगलोर कँटॉन्मेंट स्टेशनला कँटॉन्मेंटच म्हणतात >> काही जण नुसतेच कॅण्ट म्हणतात. रिक्षावाल्याला कळतं कॅण्ट. बाकी तुम्ही दिलेली माहिती अगदी चपखल.

(मी पूर्वी मजेत म्हणायचो की बंगळूरात केजीबी चं हापिस आहे - केम्पे-गौडा बस स्टँड ऊर्फ केजीबी स्टँड)

भावधान बद्दल अगदी अगदी....यात हिंजेवाडी पण टाका.
आमच्या व्यवसायतला एक पुरवठेदार उत्तर भारतीय आहे. त्याचे कार्यालय पुण्यात आहे. त्याचा आणि माझा संवाद पुढील प्रमाणे,
मी : ऑफीस कहा है?
तो : हमारा जी ऑफिस ओंध मे है
मी : कहा पे?
तो : ओंध ओंध.. ओंध नही पता?
पुण्यातल्या बहुतांशी भागांची ओळख असलेला मी हे नवीन नाव ऐकून जरा गोंधळलो.
मी : फॅक्टरी कहा है?
तो : वो पोड के पास है.
मी : पोड?
तो : हा पोड. पिरंगुट के आगेवाला पोड
मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला.

औन्धला ओंध आणि पौडला पोड म्हणणारे हे लोक पाहिले की असे वाटते की मोहालीचे खरे नाव माऊली असेल

भाईंदर स्टेशनला रेल्वेवाले भायन्दर का म्हणतात त्यांनाच माहित. नशिब अजुन नालासोपाराचं नलीयासुपारा केलं नाही.

कसले पारतंत्र्य ? >>> माझ्या प्रतिसादानंतर हा प्रतिसाद येणे हा योगायोग असावा. नाहीतर मुख्य धाग्यातच वापरलाय की हा शब्द.

सहार एअरपोर्ट ला अलीकडे सहारा एअरपोर्ट म्हणू लागले आहेत. सहार ( सहाड) गावाला सहारा विलेज, सहार रोडला सहारा रोड वगैरे.
माझ्या तोंडी सहार एअरपोर्ट, सांताक्रूझ एअरपोर्ट असेच येते. पण अलीकडे रिक्षा टॅक्सी ओला उबरमुळे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे स्पष्टीकरण द्यावे लागते.

उत्तर भारतीय त्या मध्ये बिहारी .नायगाव चा उच्चार नया गाव असाच करतात.
आणि घाटकोपर चा उच्चार घाट के उपर असा करतात .
कधी वाटतं जाणूनबुजून ही लोक असा उच्चार करतात का.
महाराष्ट्राचे हिंदिकरण करण्यासाठी.
पुण्यातील अनेक उदाहरणं बाकी लोकांनी वर दिलीच आहेत
हिंदी भाषिक कसे स्वतःच्या मर्जी नी अनधिकृत पण शहरांची नाव बदलतात त्या विषयी.
कफ परेड च उच्चार कफ रेड असे करणारे पण महाभाग आहेत..त्या मुळे मी ठरवून मराठी खरी नाव च उच्चारत असतो.

Pages