स्कुबा डायविंग चा जामानिमा

Submitted by सोनू. on 23 October, 2021 - 14:37

मी स्कुबा डायविंग करत होते आणि ते कानाच्या इन्फेक्शन मुळे बारगळलं हे माझ्या बकेटलिस्टमधे लिहीलय

https://www.maayboli.com/node/80116

आता पर्यटन परत सुरू झाल्याने बऱ्याच लोकांनी स्कुबाबद्दल विचारायला सुरुवात केली, म्हणून ही नुसती तोंडओळख.

तुम्हाला स्कुबा डायविंगचा नुसता अनुभव घ्यायचा असेल तर कोणताही आजार नसला पाहिजे आणि मनाची तयारी असली पाहिजे. पोहायला यायची गरज नाही. किंबहुना पोहता येणारे लोक पाण्यात हातपाय मारतात आणि त्यांना पकडून नेणाऱ्या व्यक्तीची दमछाक करतात Happy

मला यात करीयर करायचं होतं म्हणून २०० मीटर पोहण्याची परीक्षा देऊन PADI Open Water Diving course केला. ही सर्वात पहिली पायरी असते.

माझे प्रशिक्षणाचे अनुभव मी जमेल तसे लिहून ठेवले होते. त्यातूनच घेतलेला काही भाग :

चार दिवसांच्या कोर्स चा पहिला दिवस. स्कुबा डायविंग म्हणजे काय याबद्दल फक्त माहिती घेण्याचा दिवस.

सकाळी ८ ला बोलावल्याप्रमाणे मी वेळेत हजर झाले तर माझा इन्स्ट्रक्टर माझी वाटच पाहत होता. त्याला भेटून ओळख वगैरे करून घेऊन आम्ही एका छोट्याशा वर्गात आलो. तीन लांबलचक बाकडी असलेल्या या वर्गात एका वेळी १५ विद्यार्थी शिकू शकतात. सध्या फक्त व्हिडीओ बघ आणि समजून घे आणि काही हवं तर मला सांग असे म्हणून त्याने लगेच प्रश्नपत्रिकाही माझ्यासमोर ठेवली. प्रत्येक व्हिडिओसाठी एक अशा ३ प्रश्नपत्रिका होत्या. व्हिडिओ लावून तो मुलगा निघून गेला. मी पण दिल्या-बर-हुकूम काम पूर्ण केलं.

व्हिडीओत जे पाहिलं त्याची जेवणानंतर छोट्याशा स्विमिंग पूल मधे, खरंतर मोठ्या टाकीत प्रात्यक्षिके होती. त्याआधी विविध उपकरणे दाखवली.

मास्क पहिला. हॅरी पॉटरच्या जादूच्या छडीसारखं असतं मास्कचं. मास्क स्वतःच त्याचा मालक निवडतो Happy पण एक मास्क एकालाच चालतो असं नाही. डोळे आणि नाक झाकायला हा मास्क असतो. मास्कचे बंधं मधे येणार नाहीत अशा प्रकारे काचांच्या पुढे ठेऊन त्या मास्कच्या नाकात आपलं नाक घालून आपल्या नाकाने श्वास घ्यायचा. मग तो निर्वात झालेला मास्क आपल्या डोळ्यांभोवती घट्ट चिकटतो. डोकं हलवून पाहायचं मास्क पडतो का ते. जर न पडता तसाच चिकटून राहिला तर हा मास्क तुम्ही वापरू शकता. मग त्याचे बंधं डोक्याच्या मागे सरकवून दोन्ही बाजूंचे पट्टे ओढून घ्यायचे आणि मास्क चेहऱ्यावर घट्ट बांधायचा. आता यापुढे मात्र नाकाने श्वास घेणे विसरायचे. आता फक्त तोंड वापरायचे श्वास घ्यायला आणि सोडायला पण! नाकाने श्वास घेऊच शकत नाही पण जर सोडला तर ती हवा डोळ्यांवरच्या काचेवर आतून धुकं जमवते आणि काही दिसेनासं होतं.

UW OK.jpg

पाण्यात कानात दडे बसतात कारण कानात जी हवा असते त्यावर बाहेरून पाण्याचा दाब येतो. नाक दाबून नाकातूनच श्वास सोडल्यासारखे केले की कानातली हवा मोकळी होते. या प्रकाराला equalization म्हणतात. विमानातून जातानाही हवेचा दाब कमी होतो तेव्हा असे करावे लागते. इथे दर दहा मीटर खाली दाब १ बार ने वाढतो. जमिनीवर दाब १ बार असतो, समुद्रात दहा मीटर खाली २, वीस मीटर खाली ३, तीस मीटर खाली ४ तर ४० मीटर खाली ५ बार. आपल्याला ४० मीटरच्या खाली जाण्याची परवानगी नाही त्यामुळे खोल डाईव ही ३४-३५ मीटर पर्यंत असते थोडे मार्जिन ठेऊन. कमर्शियल डायवर जातात त्याहून खोल.

जसजसे खाली जाऊ तशी हवा दाबाने आकुंचन पाऊ लागते. आपल्या फुप्फुसात, नाकात, कानात, असलेली हवा अशी आकुंचन पावून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. पाण्याखाली अजिबात श्वास रोखून ठेवायचा नसतो नाहीतर फुफ्फुसे फाटू शकतात. संथ, आरामात श्वास घ्यायचा. खाली जाताना दर दोन सेकंदाला किंवा दर एका मीटरला नाक दाबून कान मोकळे करायचे नाहीतर कान खूप दुखायला लागतात आणि रक्त येऊन निकामी होण्याची शक्यता असते. जर खाली जाताना कान दुखू लागले तर थोडं वर येऊन परत कान नीट करायचे आणि खाली जायचं.
आजकाल सगळ्याच किनाऱ्यांवर स्कुबा डायविंगची दुकानं झालीत. बरेच लोक हे शिकवत, समजावत नाहीत. लोकांना पाण्याखाली घेऊन जाणारे तज्ञ लोकही खरे तज्ञ नसतात. त्यांची उपकरणेही चांगली असतील असे नाही. मग हे लोक पाण्यात न्यायची कमी किंमत ठेवतात कारण त्यांना ते परवडतं आणि लोकांच्या जीवाशी खेळतात. जर तुम्ही कधी स्कुबा डायविंग केलेय आणि त्यांनी तुम्हाला हे सांगितले नसेल तर नशिबाने वाचलात असे समजा. असे लोक खोल घेऊन जात नाहीत म्हणा! १२ मीटर म्हणजे ४० फूट नेता येतं पण हे ७-८ मीटर नेतात. अर्थात छान मासे व कोरल्स दिसत असतील तर खोली महत्वाची नाही.

हां, तर आपण कुठे होतो? आपला मास्क ठरवला की मग पुढचे उपकरण.

बूट आणि फीन्स. हे वेगवेगळे किंवा एकच असू शकतात. हे पोहताना आपल्या शरीराचाच एक भाग होणार असतात त्यामुळे त्यांकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. शिकताना जर स्कुबा सेंटरची उपकरणे वापरणार असाल तर जे आहे त्यात तुम्हाला तुमच्या साईझनुसार बसणारे घेण्याशिवाय गत्यंतर नाही. पण तुम्ही यापुढे नेहमी डायविंग करणार असाल तर मात्र व्यवस्थित विचार करून घ्यावे लागतात. लवचिक असलेले मोठे फिन्स तुम्हाला पाण्यात पायांच्या थोड्या हालचालीने लांबवर नेऊ शकतात त्यामुळे पोहण्याचे कष्ट खूप कमी होतात. पाण्याला वेग असेल तर फिन्स वरदान असतात पोहायला तसेच आपला बॅलन्स ठेवायला. काही फिन्समधे बूट घालावे लागतात तर काहींत नाही. मला वेगळे बूट जास्त बरे वाटतात कारण ते बूट घालून तुम्ही किनाऱ्यावरून डाईव करायच्या जागेपर्यंत जाऊ शकता. ते बोटीवर वा किनाऱ्यावर काढून ठेवावे लागत नाहीत.

Fins.jpg

त्यानंतर येतात स्कुबा साठीचे कपडे. भारतातील किनाऱ्यांवर चाळीस मीटरच्या आत डाईव करायला आपल्याला खूप गरम ठेवणारे कपडे घालायची तितकीशी गरज पडत नाही. थंड पाण्याच्या ठिकाणी हे गरम ठेवणारे ड्राय सूट आतले कपडे व त्वचा सुकी ठेवतात आणि खोल पाण्यात आपल्याला थंडी वाजत नाही. पण मग अशा प्रकारचा ड्रेस वापरायचे वेगळे प्रशिक्षण घ्यावे लागते कारण आत असलेली हवा पाण्याच्या दाबाने आकुंचन प्रसरण पावत असताना कसे सांभाळायचे याचा अभ्यास केल्याशिवाय तो वापरता येत नाही.
वेट सूट आपल्याकडच्या डाईवसाठी वापरला जातो. याच्या आत वेगळे कपडे घालायची गरज नसते. खालपासून वरपर्यंत एकच ड्रेस असतो पाठीमागे मोठ्या चेन वाला. ती चेन खेचून घेण्यासाठी तिला मोठा पट्टा असतो जो नंतर तसाच लोंबकळत ठेवतात. हा वेट सूट शरीराला अगदी घट्ट चिकटून बसतो. शरीर आणि सूट यातल्या जागेत थोडे पाणी राहते आणि ते शरीराच्या उष्णतेने गरम राहते त्यामुळे पाण्यात आपल्याला जास्त थंडी वाजत नाही. जसजसे खोल जावे तसतसा त्यावरही दाब वाढत जातो पण त्याचे कापड आपल्याला सुरक्षित ठेवते. पूर्ण हात आणि पूर्ण पाय झाकणारे सूट खूप महाग असतात त्यामुळे गुढग्याच्या जरा वर संपणारे नी हात कोपराच्या वर पर्यंतच झाकणारे ड्रेस जास्त वापरले जातात. हे मानेजवळ सुरुवातीला फार घट्ट वाटतात पण नंतर व्यवस्थित होतात. मी सुरुवातीला घातला तो ड्रेस पण मग माझा स्विमिंगचा UV protection वाला नेहमीचाच घालणे सुरू केले.

यानंतर येतो नंबर बीसीडी चा. BCD म्हणजे Buoyancy Control Device. हे एक हवेने फुगणारे जॅकेट असते. यालाच आपण आपल्या हवेचा सिलेंडर अडकवणार असतो. या सिलेंडर मधून आपण यात हवा भरतो ज्यामुळे पाण्यावर आपण तरंगू शकतो ( Positive Buoyancy). पाण्याखाली जाताना ही हवा हळूहळू सोडत खाली जायचे असते ( Negative Buoyancy). यात थोडी हवा ठेऊन आपण किती आणि किती वेगाने खाली जायचे ते ठरवता येते.

Water Fly.JPG

हे तरंगणे साधायला अजून एक उपाय करावा लागतो तो म्हणजे वजने घेऊन जावे लागते. हे जॅकेट वर खेचते नी ती वजने खाली आणि मग आपण नीट तरंगतो. आपल्या वजनाच्या साधारण पाच टक्के वजन बरोबर असते. नंतर नंतर वजनाशिवाय सगळं जमू लागतं. पाण्याच्या घनतेनुसार, मला खाऱ्या समुद्रात 3 किलो नी गोड्या तलावात 2 किलो वजने न्यावी लागतात.

आता आला मुख्य स्कुबाचा नंबर. स्कुबा म्हणजे Self Contained Underwater Breathing Apparatus. दोनशे पीएसआय दाबाने हवा भरलेली नळकांडी घेऊन जायची असते. 21% ऑक्सिजन आणि जवळपास 79% नायट्रोजन अशी हवा असल्याने दाबाखाली हा नायट्रोजन फार त्रास देतो. पण त्यासाठी ऑक्सिजन थोडासा जास्त घालून हवा बनवून घेतली तर परत त्याचे वेगळे घातक परिणाम. त्याबद्दल सविस्तर नंतर.

आता या नळकांड्यातून श्वास घेण्यासाठी रेग्युलेटर. दोन रेग्युलेटर असतात, एक आपण वापरायला आणि दुसरा दुसऱ्या व्यक्तीला द्यायला. या दुसऱ्याची नळी खिशात थोडी घुसवायची म्हणजे मधेमधे येणार नाही आणि आणीबाणीच्या वेळी सहज ओढून काढता येईल. हे दोन रेग्युलेटर उजव्या बाजूला तर डाव्या बाजूला एक किती हवा आहे हे सांगणारा प्रेशर गेज आणि दुसरी नळी त्या बीसीडीला जोडायला म्हणजे तिच्यात हवा भरता येईल. 200 मधील 50 प्रेशर हे आणीबाणीसाठी असते. तिथवर जाऊच नये कधीही. वर जायला अजून किमान 20 म्हणजे 70 ला पोचलात तर पाण्यावर यायला लगेच सुरुवात करायची.

UW Ready.jpg
असा सगळा जामानिमा झाला, सगळ्या वस्तू नीट चालतात, फुगतात, हवा काढून टाकतात वगैरे बद्दल स्वतः खात्री केली की मगच हे धूड पाठीवर दप्तरासारखं लादायचं.
आधी त्या टाकीत आणि मग मोठ्या स्विमिंगपूल मधे व्यवस्थित शिकायचं आणि मग जायचं मस्तपैकी पाण्यात फिरायला, खोल खोल..

With Fish.jpg

असं खेळायला यायला मात्र पुढचा Advanced Open Water course करावा लागतो बरं!

UW Solo.gif

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे आजार नसल्यास कुठल्याही वयोगटास जमू शकते का? >> हो, १० वर्षे वयाच्या वरच्या कोणालाही करता येते ज्यांना १६ किलोचे नालकांडे घेऊन चालता येईल.
अंदमानात आमच्या डाईव सेंटरवर एक कुटुंब आलं होतं. बच्चे कंपनी, आईबाबा लोक आणि आजी आजोबा अशा तीन पिढ्या. त्यातल्या मधल्या पिढीतले काही मधुमेह आणि रक्तदाब यामुळे बाद झाले पण ७२ वर्षांच्या आजी ठणठणीत होत्या आणि त्यांनी एकदम मस्त डायविंग केलं. त्यामुळे ताठ चालणाऱ्या वहिदा ८१ व्या वयात नक्कीच करू शकतात.

छान ओळख. मराठीत असे माहीतीपूर्ण व रसाळ लिखाण होते आहे हे चांगले आहे.

नेहमीप्रमाणेच छान माहितीपूर्ण लेख सोनू
आपल्या मालवणात स्कुबा डायव्हिंग केलेलं. तिथे अशी माहिती अजिबातच दिली नव्हती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माणसं उरकण्याकडे कल होता. पण जेमतेम 25-30 फूट खोल पाण्यातही कानावर आलेला जोरदार दाब अजूनही आठवतो.
जेव्हा केव्हा अंदमानची फेरी घडेल तेव्हा नक्की स्कुबा डायव्हिंग करू तिथे

SCUBA ची अद्याक्षर ओळख प्रथमच समजली. मराठीत ईतकी छान सविस्तर माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.

माहितीपूर्ण लेख.
अंदमानला केले होते स्कुबा डायव्हिंग. मला नक्की आठवत नाही किती खोल ते बहुतेक १५-२०? मीटर असावे.
नाक दाबून कानातली हवा काढायची, इमर्जन्सी वाटल्यास काय खूण करायची आणि चांगलं वाटत असेल तरी दर मिनिटाला ऑल ओके साठी काय खूण करत राहायची तेही सांगितले होते. ती नाही केली तरी संमथिंग रॉंग समजून वर घेऊन जाऊन म्हणुन सांगितले होते.
आमच्या स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओ शूट करून त्याच्या CDs सुद्धा दिल्या होत्या. कुठे ठेवल्यात शोधाव्या लागतील.

पण या लेखामुळे विस्तृत माहिती कळली. परत कधी करताना खूप उपयोगी पडेल. अर्थात तेव्हा लेख परत वाचावा लागेल.

धन्यवाद धन्यवाद.

व्यत्यय,
अंदमान उघडलय पर्यटनासाठी, जाऊन या. मला माझ्या मैत्रिणीकडे जायचय, बहुदा जानेवारीत चक्कर टाकेन तिकडे.

तारकर्ली ला जे MTDC चं Indian institute of scuba diving आहे त्यात नीट शिकवतात, बाकीच्यांबद्दल तितकसं चांगलं ऐकलं नाहीय. गोव्यात काही आहेत गाडीने तारकर्लीला स्कुबासाठी डे ट्रीप नेणारे, पण ते ही डुबुक डुबुक करून आणतात असं ऐकलय.

भरत,
वर परत येताना सावकाश यायचं असतं. फासात आलो की तो डाईव कॉम्पुटर बोंबलतो. आणि 3 मीटर उरले असताना तिथे 3 मिनिटे थांबायचं असतं. अंगात भिनलेला नायट्रोजन बाहेर काढायला. आडवे राहिले तर नायट्रोजनाला वर जायला जास्त पृष्ठभाग मिळतो. मला नुसतेच आडवे राहून कंटाळा आला होता म्हणून मी गिरक्या घेत बसले होते आणि माझ्या इन्स्ट्रक्टर ने शूटिंग केलं.

मानव,
12 मीटर हून खोल नाही जाता येत. ओपन वॉटर सर्टिफिकेट करायला 18 मीटर जाता येतं. तसा थोडा बदल केलाय लेखात. आमच्या हॅवलॉक ला बहुतेक सगळे डाईव सेंटरवाले सगळी नीट माहिती देतात. नील मधले पण चांगले आहेत असं ऐकलय पण तिथला अनुभव घेतला नाहीय.

देव भलं करो त्या बर्‍याच लोकांचे ज्यांनी विचारणा केल्यामुळे हे लिखाण हातून उतरलं.
मनापासून धन्यवाद ह्या लेखाबद्दल.
अजून पुरवण्या जोडल्या तरी चालतील.

12 मीटर हून खोल नाही जाता येत. >> अच्छा, मग तेवढेच असेल ते. मला कुठल्या बेटावर केलं ते आठवत नाहीय. पण ज्या बेटावर राधा नावावरचा बीच आहे त्या बेटावर केलं. रस्त्याच्या एका बाजूला रिसॉर्ट होता लांब रो हाउसेस सारखा आणि दुसऱ्या बाजूला बरेच आत तिकडे होतं स्कुबा डायव्हिंग.

छान माहितीपूर्ण लेख....!

अंदमानला गेलो होतो तेव्हा.. हॅवलॉक बेटावर sea walk केलं होतं समुद्रात, पण कानात इतके ठणके मारले होते की, परत त्या वाटेला जायचं नाही असं ठरवलं. पण समुद्राच्या तळाशी चालण्याचा अनुभव खरंच विलक्षण होता..!!

तुमचा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.

तुमच्या हिंमतीचे खूप कौतुक...!

3 मीटर उरले असताना तिथे 3 मिनिटे थांबायचं असतं. अंगात भिनलेला नायट्रोजन बाहेर काढायला. >> अन्यथा?

छानच माहिती व लेख.

मला पोहायला येते पण हे काही जमायचे नाही.

लेक व तिच्या मैत्रीणी स्पेन ला ग्रॅड ट्रिप ला गेल्या होत्या तेव्हा जिं ना मिदो मध्ये लोकांनी जिथे स्कुबा डायविन्ग केले तिथेच करून आल्या. फारच वेगळा व मस्त अनुभव असे म्हटल्या. समुद्राचे पाणी फारच गार असते .

क्लाइव्ह कसलर नावाचा लेखक आहे त्याचा एक डर्क पिट नावाचा हिरव्या डोळ्यांचा नेव्ही ऑफिसर हिरो आहे. ह्याच्या प्रत्येक पुस्तकात हा हिरो डीप डाइव्ह करतो. ह्यात कथेच्या बरोबरच डायव्हिन्ग ची माहिती खूप येते. ह्यात ते वाचले होते अगदी हळू हळू वर यायचे. व डी प्रेशराइज व्हायचे. ते नायट्रोजन वगैरे.

दुसरे म्हणजे थांग व काही दूर पर्यंत आणी मुक्काम ह्या गौरी देशपांडे ह्यांच्या पुस्तकात जो ग्रीक हिरो आहे दिमित्री तो पण डायव्हर असतो. व कथेच्या क्लायमॅक्ष मध्ये त्याला ते पाठी वरचे ऑक्सिजन शिलींडर फुटून अपघात होतो. पाठीचा कणा व इतर ठिकाणी मेजर दुखापत होते.
ह्या बद्दल वाचले होते संस्कार क्षम वयात. त्यामुळे चुकूनही हे करून बघावे असे वाटले नाही. धागाकर्ती तुमचा उत्साह घालवायला नाही लिहीत. पण ह्या मुळे हिरो हिरवीण प्रेमात पडतात व पुढे ग्रीस मध्ये एक मस्त हॉलिडे चे वर्ण न आहे. त्यामुळे ग्रीसला निदान जाउन समुद्र बघायचे मनात आहे. ( खरी खुरी बकेट लिस्ट आयटम आहे माझा)

तुम्हाला शुभेच्छा मस्त डायव्हिन्ग करा व फोटो टाका.

मारीआना ट्रेंच चे व्हिडीओच बघते मी घरबसल्या.

देव भलं करो त्या बर्‍याच लोकांचे ज्यांनी विचारणा केल्यामुळे हे लिखाण हातून उतरलं. >> Happy धन्यवाद

ज्या बेटावर राधा नावावरचा बीच आहे >> आमच्या हॅवलॉकलाच. हो, सगळे नीट माहिती देतात. ४-५ मीटर वर छान कोरल्स बघायला मिळतात निमो रीफ वर. पुढे खोल वर जास्त मासे दिसतात.

हॅवलॉक बेटावर sea walk केलं होतं समुद्रात, पण कानात इतके ठणके मारले होते की, परत त्या वाटेला जायचं नाही असं ठरवलं. >> Sea walk पूर्ण बंद केलं होतं मागे, आता परत सुरू केलं असेल तर माहीत नाही. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. स्कुबा डायवर ना गव्हर्न करणाऱ्या बऱ्याच संस्था आहेत तसं sea walk चं आहे का माहीत नाही. पण बऱ्याच कम्प्लेन ऐकल्या होत्या त्यांच्या.

बापरे! अवघड आहे हे. मी नाही या वाट्याला जाणार. >>
अरे रे, खूप कठीण करून सांगितलं का? सोपं असतं हो. मी सर्टिफिकेट करत होते कारण पुढे जाऊन मला हे लोकांना शिकवायचं होतं. पण नुसता अनुभव घ्यायचा असेल तर डाईव सेंटर वाले तुमची साईझ, वजन बघून लागणारे सामान देतात. कमरेपर्यंतच्या पाण्यात नेऊन तोंडाने श्वास घेणे, ओके / नॉट ओके म्हणणे वगैरे शिकवतात. नीट जमलं की मग नेतात पाण्यात. करून बघा.

3 मीटर उरले असताना तिथे 3 मिनिटे थांबायचं असतं. अंगात भिनलेला नायट्रोजन बाहेर काढायला. >> अन्यथा? >>
१८ मीटर च्या खाली गेलं तर सेफ्टी स्टॉप करणे बंधनकारक आहे. अनुभव घेताना ७-८ मीटर जाणं होतं ते ही कमी वेळासाठी. त्यामुळे सेफ्टी स्टॉप ची गरज पडत नाही.

जे सर्टिफिकेशन करतात त्याच्यासाठी, थोडे किचकट वाटू शकेल -
१० मीटर ला जमिनीपेक्षा दुप्पट प्रेशर असते. श्वासावाटे घेतलेला नायट्रोजन नेहमी त्वचेतून बाहेर पडतो तसा पडू शकत नाही. सेफ्टी स्टॉप नाही घेतला तर हा नायट्रोजन पेशींममधून जोरात उसळी घेऊन बाहेर यायचा प्रयत्न करतो आणि वाट मिळेल तिथे जातो. त्वचेवर चट्टे येणे, सांधेदुखी, चक्कर, अगदी पक्षाघात पर्यंत काही होऊ शकतं हा डीकॉम्प्रेशन सिकनेस झाला तर. जास्त वेळ जास्त खोल राहणे, 9 मीटर पर मिनिट पेक्षा जास्त वेगाने वर येणे, जास्त खोल जाणे, दोन डाईव मधे कमी वेळ असणे, वगैरे बऱ्याच गोष्टींमुळे डीकॉम्प्रेशन सिकनेस होऊ शकतो. डाईव कॉम्प्युटर सांगतो किती खोल किती वेळ थांबायचे ते. १००% ऑक्सिजन असलेल्या सिलेंडर ने श्वास घेणे, हायपरबारीक चेंबर मधे राहणे असे उपाय असतात डीकॉम्प्रेशन सिकनेस झाल्यास.

वेळ मिळेल तसा एकएक उत्तरे देण्याचा प्रयत्न करतेय.

पॅराग्लायडिंग आणि स्कुबा डायव्हिंग झाली आता पुढे काय? परत कायतरी थरारक स्पोर्ट घेऊन या. >> Lol
बकेटलिस्ट मधे आहे बरेच कायकाय. बघू!

क्लाइव्ह कसलर नावाचा लेखक आहे त्याचा एक डर्क पिट नावाचा हिरव्या डोळ्यांचा नेव्ही ऑफिसर हिरो आहे. ह्याच्या प्रत्येक पुस्तकात हा हिरो डीप डाइव्ह करतो. >> अमा, वाचायला पाहिजे हे.
ग्रीस ला जाऊन या. माझी फ्रान्स बरोबर आजूबाजूच्या युरोपियन देशात पण ट्रीप प्लॅन होतेय. बघू कितपत फिरून होते ते ३ महिन्यांत. छोटा अनुभव घेणे अजिबात कठीण नसते. १५ मिनिटे किंवा गरज वाटली तर जास्त वेळही ट्रेनिंग देतात उथळ पाण्यात. आमच्याकडे आठवड्याला एखादी व्यक्तीच ड्रॉपाउट व्हायची, बाकी सगळे डायविंग करूनच यायचे. अंदमानात एक व्हिडिओ दाखवतात आधी काय कसे करायचे त्याचा आणि मग उथळ पाण्यात. त्यात आमच्यासारखे शिकाऊ किंवा फोटोग्राफर लोक असतात तिथे एनकरेज करायला. मजा येते.