"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"

Submitted by अ'निरु'द्ध on 18 September, 2021 - 01:49

"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास- निरु"

बकेट लिस्ट म्हटल्यानंतर बहुतेक लोकांच्या मनातल्या इच्छा या कळत्या वयामधल्या असतात.
कुठेतरी बकेट लिस्ट हा शब्द ऐकलेला असतो, बर्‍यापैकी वाढलेल्या वाचनात आलेला असतो…
कुठेतरी, कोणाच्यातरी बकेट लिस्टबद्दल माहिती आलेली असते, तर कधी चित्रपट आलेले, पाहिलेले असतात.

पण नकळत्या वयामधल्या, लहान वयामधल्या तीव्र इच्छा यांना बकेट लिस्ट म्हटल्याचं मी तरी कुठे ऐकलेलं, वाचलेलं, पाहिलेलं नाहीये.
पण अशा ना कळत्या वयातल्या वेगळ्या Uncommon तीव्र इच्छा...
ज्यांची निदान त्या काळात प्रचंड आस असेल, त्या काळातल्या प्रत्येक दिवसामधला बराचसा वेळ या इच्छेभोवतीच फिरत असेल.. तर त्याला बकेट लिस्ट म्हणता येणार नाही का ?

तर अशा, अगदी लहान वयातली एक आणि नंतर थोडसंच मोठं झाल्यानंतरची एक, अशा माझ्या दोन इच्छा.. खरंतर बकेटलिस्ट मधल्या म्हणू शकतो अशा, मला आठवतायत. त्यातली पहिली मी आज इथे देतोय.

माझ्या पहिल्या बकेट लिस्ट मधल्या माझ्या पहिल्या इच्छेचा जन्म 'हाथी मेरे साथी' हा चित्रपट बघून आल्यावर झाला आणि तो म्हणजे स्पेशली माझ्यासाठी असलेला एक हत्ती घरी पाळणे.

त्या काळात या इच्छेचं माझ्या मनावर प्रचंड गारुड होतं. दिवसेंदिवस मी माझ्या आईवडिलांकडे हत्ती आणा, हत्ती आणा म्हणून धोशा लावला होता.

त्यावेळेला आम्ही तळ अधिक एक मजली असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहायचो. पहिल्या मजल्यावरती एकच घर होतं, ते म्हणजे आमचं.
घराला पुढे जवळजवळ पाच-साडेपाच फूट रुंदीची आणि लांबलचक बाल्कनी होती. थोडीशी जुन्या दादर माटुंग्यामधल्या जुन्या इमारतींच्या पॅसेजची किंवा स्वतंत्र व्हरांड्याची आठवण करून देणारी

हत्ती पाळण्याबाबत त्यांनी विचारलेल्या कुठल्याही प्रॅक्टीकल प्रश्नाला माझं तेवढंच सो काॅल्ड प्रॅक्टिकल उत्तर तयार असायचं, आणि मुळात त्यात कुठलाही बनेलपणाही नसायचा.
खरं तर एखादी कल्पक व्यक्ती, एखाद्या अडचणीवर उपाय शोधण्याचा मनापासून प्रयत्न करते तसं ते काहीसं असायचं.

तर बाबांनी विचारलं अरे त्या तुझ्या हत्तीला ठेवायचं कुठे ? राहणार कुठे तो ?
तर मी म्हणायचो की खालीच राहील की तो इमारतीच्या आवारात.. आणि आपल्याला वाटलं तर त्याला बोलवायचं.. त्याची सोंड येईलच आपल्या बाल्कनीमध्ये..
म्हणजे त्याला फळं, केळी सगळं भरवता येईल.

अरे पण त्याला खायला किती लागेल ? ते सगळं कसं आणणार आपण ?
छे छे.. आपण कशाला काही आणायचं ?
त्याचा तोच आजूबाजूच्या झाडांची पानं, गवत असं काहीतरी खाऊन राहिल. जंगलात कुठे कोणी त्याला खायला देतं..?
एवढा मोठा असतो तो तर इथे तिथे, आजूबाजूला जाऊनही खाऊन येईल. आपण आपलं त्याला थोडीशी केळी, सफरचंद, ऊस असं काहीतरी खाऊ म्हणून देत जाऊ..

अरे पण एवढं खाऊन तो रोज हा एवढा मोठा शी करून ठेवेल त्याचं काय करायचं ? कोण साफ करणार ते ?
हॅ… आपण कशाला साफ करायचं ?
आपल्या खालच्या घरातल्या अम्मा कुठे कुठे गोठ्यामध्ये जाऊन शेण मागून आणतात आणि त्यांचं अंगण सारवतात. आपल्या हत्तीने शी केला तर त्यांची आयतीच सोय होईल. त्या आपल्यावर खुश होतील आणि हत्तीवरही. थोडसं खायलाही देतील त्याला.. जसं मला नेहमी देतात तसं

अरे पण त्याला दिवसभर सांभाळणार कोण ? तू तर दिवसभर शाळेत जातोस..
म्हणजे काय, तो गॅलरीत येऊन सोंड वरती करेल..
मी सोंडेवरून त्याच्या पाठीवरती जाईन.. तो मला शाळेत सोडेल, माझं दप्तरही सोंडेत धरेल. माझी शाळा सुटेपर्यंत तिकडेच राहिल शाळेच्या ग्राउंडवर.. शाळा सुटल्यावर परत मला घरी घेऊन येईल.. मला न्यायचा आणायचा आईचा त्रास पण वाचेल आणि कधीकधी ते आजोबा मला आणि चार-पाच मुलांना शाळेत सोडतात त्यांना पैसे द्यायला नकोत.. सगळं काम फुकटात..

शिवाय मला शाळेत, रस्त्यात कोणी त्रासही देणार नाहीत.
संध्याकाळी तो मला तलावपाळीवर फिरवूनही आणेल.
आईलाही नारळ फोडून देईल.. किती अडतं तीचं त्यावाचून तुम्ही फॅक्टरीत जाता तेव्हां.
रात्री तो आपल्या घराची कुत्र्यापेक्षा पण भारी राखण करेल, आपलं रक्षण करेल ते वेगळंच.
कुठल्या चोराची छाती होणार नाही आपल्या घरी यायची..

मग आणायचा ना हत्ती…?

त्या निरागस बालवयात हत्ती पाळणं म्हणजे काय, त्याचा खर्च, जंगलखात्याच्या अशा बाबतीत परवानग्या, कायदेकानून हे काहीच माहिती नव्हतं.
त्यामुळे जवळजवळ सहा आठ महिने हा नाद मला पुरला.

बरं बाबांच्या फॅक्टरी पासून येऊरचं जंगल जवळच होतं. त्यामुळे रोज संध्याकाळी वाटायचं की बाबा कामावरून येताना फटफटीच्या मागे हत्तीला दोरखंड बांधून त्याला घेऊन येतील.
या गोष्टीची त्या काळात मी किती वाट पाहिली असेल त्याची गणतीच नाही..
कधी बाबांना उशीर झाला तर माझी आशा जास्तच प्रज्वलित व्हायची की ते बहुतेक माझ्यासाठी हत्ती आणत असणार म्हणून..
फक्त एक गोष्ट मात्र होती, की माझ्या आई-बाबांनी हत्ती आणून देऊ, बघू नंतर कधीतरी, अशी कुठलीही खोटी आशा मला लावली नव्हती.
तसं जर असतं तर या इच्छे मधून मधून बाहेर पडायला मला प्रचंड त्रास झाला असता.

विचित्र असल्यामुळे ही माझी प्रचंड आस लागलेली इच्छा खरं तर कधीच पूर्ण होणार नव्हती, त्यामुळे म्हटलं तर त्या इच्छेला काही अर्थ नव्हता.
अर्थात मुदुमलाईच्या किंवा तत्सम जंगलात जाणं, तिथे हत्तींसमवेत रहाणं, त्यांच्यावर काम करणं असे म्हटलं तर पर्याय होते. पण माझ्या लहानपणीच्या काळात किंवा किमान मोठं होत असताना ते पर्याय माझ्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं.

पुढे मायबोलीवर जेव्हा अर्निकाचे हत्तींवरचे लेख वाचले तेव्हा त्या लेखांशी पार मनाच्या काहीतरी तारा जुळल्या सारखं वाटलं.

एक मात्र झालं... या इच्छेमुळे माझा प्राणी प्रेमाचा पाया, वाइल्ड लाईफची आवड अशा अनेक गोष्टी रुजल्या असाव्यात, ज्याचा एक छंद म्हणून मला खूप फायदा झाला.

त्यामुळे अशी एखादी बकेट लिस्ट मधली इच्छा जरी पूर्णांशाने पुरी झाली नाही तरी त्या इच्छेमधली तळमळ तुम्हांला नक्कीच काहीतरी त्याच्या आजूबाजूचं किंवा त्याच्या वरचंही काहीतरी देऊन जाते असं मला वाटतं.
ती इच्छा पूर्ण नाही झाली तरी आपला कल असतो, आपली आंतरिक आवड असते, त्या वाटेवरती कुठेतरी लोटण्याचं, ढकलण्याचं काम या तीव्र इच्छा आपसूकच करत असतात आणि जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाला, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे ते विशेष कंगोरे, घटक प्रदान करत असतात. आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणी मध्ये पूर्ण झालेल्या इच्छांच्या बरोबरीने या अपूर्ण इच्छांचा ही मोठा सहभाग, मोठा वाटा असतो असं मला वाटतं.

या हत्ती पाळायच्या इच्छेने कदाचित मला लागलेली वाइल्डलाइफची आवड, त्यांना टिपण्यासाठी, पुन्हा पुन्हा बघण्यासाठी लागलेला फोटोग्राफीचा छंद, त्यासाठी विविध ठिकाणी हिंडणं फिरणं या गोष्टींनी मला आयुष्यात अपरंपार आनंद दिलेला आहे, सुकून दिलेला आहे..

आणि म्हणूनच बकेट लिस्ट मधल्या अजूनही अपूर्ण राहिलेल्या त्या इच्छेचंही यात फार फार योगदान आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिले आहे.
अरे पण त्याला दिवसभर सांभाळणार कोण ? तू तर दिवसभर शाळेत जातोस..>>> अगदी हेच कारण देऊन आईने प्राणी पाळायचे बरेच वेळा पुढे ढकलले होते. Happy

लेख खूपच आवडला, अगदी निरागस उतरला आहे. तुमचे मसाईमारा आणि श्रीलंका सफरीचे लेख आणि सर्वच फोटोज् खूप आवडतात. तुमच्या इतरही बकेट इच्छा पूर्ण होओ या सदिच्छा. Happy

लंपन, मंजूताई, अश्विनी११, चंद्रा, स्वस्ति, मृणाली, सामो, ऋन्मेऽऽष, अवल, बिपिन सांगळे, देवकी, एस, मैत्रेयी, sonalisl, अस्मिता
लेख आवडल्याचं आवर्जून कळविल्याबद्दल आभार..

@ सीमंतिनी आणि हर्पेन... <<हत्ती पाळायचा.... फटफटीला बांधून आणायचा... नि पहिली प्रतिक्रिया - तुम्ही ठाण्यात राहता का?! काय बाई म्हणावं ह्या मायबोलीकरांना.... Wink Light 1>>
सीमंतिनी, माझी जी लहानपणीची बकेट लिस्ट होती ती इच्छा आता हर्पेनना आवडलेली दिसतेय. मी अजूनही ठाण्यात रहात असेन तर कदाचित येऊर मधून हत्ती आणून देऊ शकतो का.. असं बहुतेक त्यांना विचारायचं असेल.. तेव्हा प्रतिक्रिया बरोबरच आहे..

@ किशोर मुंढे : सर्कशी तर ठाण्याला खूप बघितल्या. पण ह्या बकेट लिस्टचा उगम म्हणजे 'हाथी मेरे साथी' आणि रामू हत्ती..

@ माऊमैया : लेकीला घोड्यांची आवड असेल तर नेटफ्लिक्स वरची Heartland सिरीज आवडेल तीला बघायला.. पहिल्या दोन, तीन सिझनमध्ये घोड्यांवर छान फोकस आहे.

@ गोल्डफिश : ते चाळीसगावचे डाॅ. पूर्णपात्रे..

सर्वांचे अभिप्रायाबद्दल मनापासून आभार..

गोड लिहिले आहे. किती निरागस हट्ट. मला वाटले हत्ती पासून सुरूवात केली की कुत्रं तरी मिळेल असा काही डाव असेल आजकालच्या मुलांसारखा.

<<किती निरागस हट्ट. मला वाटले हत्ती पासून सुरूवात केली की कुत्रं तरी मिळेल असा काही डाव असेल आजकालच्या मुलांसारखा.>>
@ वंदना, नाही. नाही. असा काही डाव नव्हता. एकदम जेन्युइन इच्छा होती.

@ बोकलत.. माझ्या एका ठाणेकर मित्राला घोड्यांची खूप आवड होती. आणि त्याच्या मुलालाही घोडे खूप आवडतात लहानपणापासून.
मित्राला त्याच्या लहानपणी कोणी घोडा पाळू दिला नाही पण आर्थिक परिस्थिती बरी झाल्यावर मुलाला तो नेहमी माथेरानला घेऊन जायचा सुट्टीमधे घोडे चालवायला.
नेहमी नेहेमी जाऊन तिथल्या एका घोडेवाल्याशी चांगली ओळख झाल्यावर त्या घोडेवाल्याला त्याने एक घोडाच विकत घेऊन दिला..
हा आमचा घोडा म्हणून..
गरजेनुसार थोडाफार खाण्याचाही खर्च करायचा तो. (म्हणजे ऑफ सिझनला)
अट एकच.. ज्यावेळी मित्र आणि त्याचा मुलगा माथेरानला जाईल (वर्षातून दोन तीन वेळेला सलग चार पाच दिवस) तेव्हा ह्यांचा घोडा आणि घोडेवाल्याचा एक घोडा, असे दोन घोडे यांना मनमुराद फिरवता आले पाहिजेत.. बाकी वेळी ह्यांच्या घोड्याचं उत्पन्न घोडेवाल्याचं..
थोडक्यात काय... इच्छा तेथे मार्ग काढला त्याने.

Pages