नरकातल्या गोष्टी - भाग १ - लेखिका!

Submitted by अज्ञातवासी on 15 October, 2021 - 00:11

"तोच तोच तोच तोच तोचपणा!!!!! दुसरं काही सुचत नाही का तुला?"
"लोकांना हे असलंच आवडतं.'
'तुला लोकांच्या आवडी निवडीशी काय घेणं देणं? स्वतःच्या मनाचं कर कधीतरी. लोकप्रिय व्हायची तुला काहीही गरज नाही."
"लोकप्रिय? मला कुणी ओळखतही नाही..." ती निराशेने म्हणाली.
तोही जरा वरमला.
"पण तेच तेच काय? एकच कथा नेहमी, वर्षानुवर्ष तेच. आणि प्रत्येक कथेत तोच सरधोपटपणा. एक बाळ आलं, मोठं झालं, नोकरीला लागलं, लग्न झालं, त्याला मुले झालीत, त्यांची लग्ने, हा मेला. दॅट्स इट?"
"नाही ना, मी कधीकधी त्यात फारकत टाकते, दुर्धर आजार टाकते, नाहीतर मग विवाहबाह्य संबंध तरी...? किंवा मग मुलांचा अपघात वगैरे? ड्रामा क्रिएट होण्यासाठी? पराकोटीच अपयश, क्वचित आत्महत्या..."
"तू या साच्याच्या पलीकडे कधी गेली आहेस? कधीही या चौकटीच्या बाहेर? मला हिशेब ठेवताना किती दमछाक होते माहितीये?"
"सॉरी ना चीत्रू..."
"सॉरी म्हणे. जा, आता अशी काही कथा लिही ना, की एका झटक्यात कळलं पाहिजे, चांगलं की वाईट ते."
"ओके." ती नाराजीने निघून गेली.
'तो जन्माला आला, मुळातच लहानणापासूनच तो उनाड होता. अभ्यासात त्याची कधीही प्रगती झाली नाही. मग तो वाईट संगतीत राहायला लागला. अशाच संगतीमुळे तो ड्रग विकायला लागला. हळूहळू तो मोठा ड्रग माफिया झाला, आणि त्यानंतर एके दिवशी तो पोलिसांच्या चकमकीत मारला गेला...'
ती हसली...
'आता चीत्रूला हिशेब एका झटक्यात कळेल...'
...आणि इकडे आपल्या भाळी काय लिहिलं जातंय, हे न कळालेलं ते बाळ निवांत झोपलं होतं....

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीत्रू Happy Happy

आणि इकडे आपल्या भाळी काय लिहिलं जातंय, हे न कळालेलं ते बाळ निवांत झोपलं होतं.... इथे च्च् झालं

छान, आवडली
आणि रिलेटही झाली.
आपण उगाच बकेट लिस्ट काढत बसतो. पत्रिकेत जे लिहिलेय तेच मिळणार Happy

चित्रू नाही "चीत्रू" "चीत्रू".... लै च लडिवाळ चाललं होतं... ते कुणी कुणी मुलं गोड बोलून मुलींना असाईंनमेंट करायला लावतात आणि परीक्षेनंतर तोंड बघत नाहीत त्या मुलीचं... तसं झालयं बिचार्‍या सटवाईचं... चित्रगुप्ताला शेवटी हिशेब नको करायला म्हणून हिच्याशी लघट चालू आहे Lol

भारी जमली आहे ही कथा..!!
बरं... राहिलेल्या अपूर्ण कथा कधी पूर्ण करणार..??

Mast

बदललेलं शीर्षक नाही आवडलं.
चित्रगुप्त इ. मंडळी स्वर्ग नरक दोन्हींच्या कॉमन रिसेप्शन एरियात बसत असतील.

Pages