रोज किती पाणी प्यावे ?

Submitted by कुमार१ on 10 October, 2021 - 23:33

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.

प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.

(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).

सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.

वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.

रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.

आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.

जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की उघड्यावर
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.

पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.

आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.

giphy.gif

आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.

समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.

समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.

'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.

आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.

पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.

पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………………….

मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.maayboli.com/node/64830

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर, लेख छानच आहे. पण गृहिणी म्हणून विचार करता वाट्ते की पाणी कधी/किती प्यावं इ डॉक्टरने सांगायची वेळ यावी म्हणजे किती व्यक्तीचा आपला आपल्याशीच डिस्कनेक्ट... तहान लागली की पाणी प्यावे हे इतकं साधं असताना ते कॉप्लिकेट कधी नि का झालं....
https://www.hydrationforhealth.com/en/hydration-tools/hydration-calculator/ (हा माझ्या डोक्यात जातो Happy पण अ‍ॅथलिट्सला उपयोग असावा.)

एक शंका, माझ्याच बाबतीत आहे हे, कितीही पाणी प्यायले, लाघवीचा कलर योग्य असला तरी मला तहानेची भावना जात नाही. सतत पाणी पीत राहावे वाटते. असं का होत? मानसिक आहे का काही?

<< तहान लागली की पाणी प्यावे हे इतकं साधं असताना ते कॉप्लिकेट कधी नि का झालं.. >>
माझा स्वतःचा अनुभव लिहितो ३-४ दिवसांपूर्वीचा. सकाळी उठलो आणि उभा राहिलो तर डोके एकदम गरगरायला लागले आणि चक्कर येत होती. आदल्या रात्री पार्टी झाली होती त्यामुळे तसे झाले असे सुरुवातीला वाटले. ( नेहमीप्रमाणे २ पेग्ज घेतले होते तरी). थोडा वेळ थांबलो आणि दात घासून कॉफी प्यायलो तेव्हा बरे वाटले, त्यामुळे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी पण तसाच प्रकार, तेव्हा वाटले की मी खूप पटकन उठतोय का, त्यामुळे कदाचित ब्लडप्रेशर कमीजास्त झाले की काय? (मला ब्लडप्रेशरचा कधीच त्रास नाही). पण दिवसभर अस्वस्थ वाटतच होते. कदाचित डिहायड्रेशन झाले असेल असे वाटल्याने जरा जास्तच पाणी प्यायलो, तर दुसऱ्या दिवशी त्रास कमी झाला म्हणून नेहमीपेक्षा जरा जास्त पाणी पिणे चालू ठेवले तर २ दिवसात तब्बेत ठीक झाली. २-३ दिवस पाऊस पडत होता आणि ढगाळ वातावरण होते, त्यामुळे पाणी पिणे कमी झाले असावे असा अंदाज आहे. मला वाटतंय की तहानच लागत नाही आणि त्यामुळे पुरेसे पाणी प्यायले जात नाही, अशी १ शक्यता नाकारता येत नाही.

https://www.hydrationforhealth.com/en/hydration-tools/hydration-calculator/
वापरून बघितला, त्यानुसार माझे पाणी पिणे खूप कमी आहे, ते दररोज 2.2 लिटर हवे. आता जास्त प्रमाणात पाणी पिणार आहे. लिंकबद्दल धन्यवाद.

लेख माहितीपूर्ण.
पाणी कधी/किती प्यावं इ डॉक्टरने सांगायची वेळ यावी म्हणजे किती व्यक्तीचा आपला आपल्याशीच डिस्कनेक्ट >> +१. पण याबाबत अमुक वेळी पाणी पिणे चांगले/वाईट एवढे पाणी पिणे/न पिणे चांगले वाईट अशा पोस्ट्स फिरत असल्याने लोक कन्फ्युज होतानाही दिसतात.

अजून एक म्हणजे "मेंदूत तहान आणि भूक लागली हे सांगण्याची केंद्रे जवळजवळ आहेत, तेव्हा तहान लागली असताना आपल्याला भूक लागली असे वाटू शकते" अशी विधाने वाचण्यात आली आहेत. खास करून वजन कमी करणे या लेखांमध्ये. यात किती तथ्य आहे?
कारण मला स्वतःला आणि घरी कोणाला असा अनुभव आलेला नाही.

एक शंका, माझ्याच बाबतीत आहे हे, कितीही पाणी प्यायले, लाघवीचा कलर योग्य असला तरी मला तहानेची भावना जात नाही. सतत पाणी पीत राहावे वाटते. असं का होत? मानसिक आहे का काही? + मी पण त्यातलीच.

शिल्पा ताई, माझ्या पत्नीला देखील असाच त्रास आहे, पण तिला हायपो थायरॉईड असल्यामुळे सतत तहान लागते, बहुधा थायरॉक्सिन गोळ्यांचा हा साईड इफेक्ट असावा. कुमार सर याबाबतीत सांगू शकतील.

व्यक्तिगत अनुभव आणि पूरक माहिती दिल्याबद्दल वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !

दमाने एकेक मुद्दे घेतो.

* तहानेची भावना जात नाही. सतत पाणी पीत राहावे वाटते. असं का होत? मानसिक आहे का काही?
>>
हे मानसिक मध्येच येते पण हा विकार नाही. सवयीचा भाग ( conditioning) असतो.

** तहान लागली असताना आपल्याला भूक लागली असे वाटू शकते" अशी विधाने वाचण्यात आली आहेत >>>

मेंदूमध्ये भूक व तहान यांची नियंत्रण केंद्रे हायपोथॅलॅमस नावाच्या भागात असतात. परंतु या भागामध्ये दोन वेगळ्या प्रकारची विशिष्ट उपकेंद्रे पण असतात. या दोन संवेदनासाठी वेगवेगळे receptorsआहेत.

भुकेचे नियंत्रण ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि ती खालील घटकांवर अवलंबून असते :
१. मानसिक अवस्था
२. अनुवंशिकता आणि
३. सुमारे डझनभर हॉर्मोनस

भूक व तहान यांची चेतातंतूंची नेटवर्क वेगवेगळी असल्यामुळे त्यांच्या समजण्यात गल्लत होत नाही.

वर अज्ञान बालक यांनी म्हणटल्या प्रमाणे असाव. thyroxine चा साईड इफेक्ट असावा. माझी ५० mcg ची गोळी चालु आहे.

पाण्याचे अतिसेवन केल्यामुळे दगावल्याच्या फार तुरळक घटना घडल्याचे गुगल सांगतो (लष्करात विशेषत: सुरवातीच्या प्रशिक्षण काळात) . Hyponatremia मधे खूप पाणी पिल्यामुळे sodium concentration चे प्रमाण कमी होते असे मेयोचे संकेत स्थळ सांगतो.
https://www.mayoclinic.org/diseases-conditions/hyponatremia/symptoms-cau...

https://www.scientificamerican.com/article/strange-but-true-drinking-too...

तहान लागल्यावर पाणी पिण्याचा नियम पाळतो. फ्रिज मधल्या पाण्यापेक्षा माठातल्या (नव्या / कोर्‍या ) गारेगार पाण्याची चव आठवल्यावर आजही तोंडाला पाणी सुटते. Happy

सर,
माहितीपुरक संग्रहणीय लेख !!!

**बहुधा थायरॉक्सिन गोळ्यांचा हा साईड इफेक्ट असावा.>>>

थायरोक्सिन या औषधाचा हा काही थेट दुष्परिणाम नाही परंतु या औषधाने अस्वस्थता वाटणे किंवा चिंता निर्माण होणे असे होऊ शकते. त्यातून पाणी पिण्यासंबंधी सवयींचे बदल होऊ शकतात. यात व्यक्तीसापेक्षता राहील.
सरसकट म्हणता येणार नाही.

तसेच या औषधाबरोबर अन्य काही औषधे संबंधित रुग्णास दिली आहेत का हेही बघावे लागेल.

इथे तर फक्त coke पेप्सी or दारू पितात लोक,, पाणि अगदीच कधीतरी... 3/4 दिवसातून ...कसे जगतात कोणास ठाऊक...

जालावर पाण्याचे अतिसेवन केल्यामुळे दगावल्याच्या फार तुरळक घटना घडल्याचे जे संदर्भ असतात ते दुर्मिळ असतात आणि काही टोकाच्या परिस्थितीत उद्भवतात. सामान्य माणसांनी त्याचा बाऊ करू नये. त्यात किती वेळात भरमसाठ पाणी पिले गेले हेही पाहावे लागेल.

मॅरेथॉन सारख्या शर्यतपटुंनी किती आणि कशा पद्धतीने पाणी प्यायचे याचे शास्त्रशुद्ध अभ्यास आहेत. अशा शर्यतपटुंनी शर्यतीपूर्वी, शर्यतीदरम्यान आणि शर्यतीनंतर कसे पाणी प्यायचे याच्या सूचना तज्ञांकडून दिल्या जातात.

या खेळाडूंनी एकदम गटागटा पाणी पिऊन चालत नाही. त्याऐवजी शर्यतीदरम्यान दर वीस मिनिटांनी कपभर पाणी पिणे यासारख्या सूचना त्यांना दिल्या जातात.
अर्थात हा प्रांत क्रीडावैद्यक तज्ञांचा आहे.

नेहमीप्रमाणे उत्तम माहिती!
तहान लागली की पाणी प्यावे हे इतकं साधं असताना ते कॉप्लिकेट कधी नि का झालं.. >>>>मी अजूनही हेच तत्व बाळगते.
एका पेशंटची केमोथेरपी चालू असताना डॉ नी भरपूर पाणी प्यायला सांगितले होते.
काही जण सकाळी उठल्या उठल्या दोनेक लि पाणी पितात water therapy ते योग्य आहे का?
झोपायच्या आधी जास्त पाणी पिऊ नये म्हणतात त्यात काही तथ्य आहे का ... त्याला एक कारण असे असावे की झोपेत उठायला लागू नये ... दोन ग्लास पाणी तरी पिऊनच झोपते (माझ्या शरीराची गरज) रात्री उठावं लागत नाही.

>> चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.<<
हे लिहिलेत ते बरे केलेत.
नाहितर काही अतिशहाणे असे दावे करतात की, मायबोलीवर लिहलेले सर्वच अंमलात आणतात...

तहान लागल्यावरच पाणी प्यावे कारण मुखापासून ते पाणी घोटायची प्रक्रिया सुरु होते आपोआप. उगाच घटाघटा पाणी पिवून काही फायदाच नाही.

** कोणत्या तापमानाचे पाणी प्यावे- साधे, कोमट गरम की थंड ?
हा प्रश्न रोचक आहे खरा आणि त्याचे साधे सोपे उत्तर म्हणजे भौगोलिक हवामान आणि व्यक्तिगत आवड यांची सांगड घालून प्रत्येकाने आपापले ठरवावे !!

शरीरातील विविध कार्यांसाठी जे पाणी लागते त्याचा अर्थ फक्त H 2O इतकाच आहे. त्यामुळे, तोंडातून पाणी पिताना त्याचे जे काय तापमान असेल त्याचा शरीरकार्याशी अर्थाअर्थी संबंध नाही.

ज्या लोकांना दीर्घकालीन ऍलर्जिक सर्दी, तोंडाचा चिकटपणा इत्यादी समस्या आहेत त्यांनी कोमट पाणी पिल्याने तोंड व घशामध्ये स्वच्छता राहील.

कोमट पाणी पिल्याने आरोग्याचे काही विशेष फायदे मिळतात का, हा प्रश्न आधुनिक वैद्यकाच्या अखत्यारीत येत नाही. त्यानुसार काही फरक पडत नाही.
मात्र पारंपरिक आरोग्यशास्त्रांनुसार काही वेगळी माहिती असू शकेल. ती संबंधित तज्ञानेच दिल्यास उत्तम होईल.
मला देखील जाणून घ्यायला आवडेल.

मला तहानच लागत नाही. व्यायाम केला तरीही तहान नाही लागत. मी अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो.
नवीन Submitted by बोकलत on 11 October, 2021 - 13:36

कुमार सर, एक डिस्क्लेमर राहिला : अमानवियाना गैरलागू

छान आहे लेख कुमार सर.
मला स्वतःला खूप लागते पाणी. लहानपणापासूनच, कुठे वाचून वाढवले वगैरे नाही. उंट म्हणतात घरी.
एकावेळी १/२ लिटर सहज प्यायले जाते. घोटभर वगैरे नाही. दिवसभरात ४+ लिटर. + ४०० मिली चहा (२ मग)
बाटलीने मोजून कमी करायचा (अडीच-तीन वर आणायचा) प्रयत्न केला तर नाही भागले.

प्रश्न २ आहेत ---
१. खूप / प्रमाणाबाहेर पाणी पिल्याने मूत्रपिंडे नाही पण ब्लॅडरवर काही परिणाम होईल? ब्लॅडरच्या स्नायूंची लवचिकता कमी होऊन लहान वयात Urinary incontinence किंवा अन्य काही त्रास वगैरेची शक्यता?

२. शरीरातील पाणी कमी झाल्याची सूचना तहानेद्वारा मिळते. तरीही काही कारणाने पाणी पिणे टाळले ( प्रवासात स्वच्छतागृहाच्या गैरसोयीमुळे उदा..) तर, तहान लागल्यावरही किती वेळापर्यंत पाणी न पिणे हे वैद्यकीयदृष्ट्या चालू शकेल? ढोबळ मानाने लक्षणांच्या स्वरूपात? व्यक्तीनुसार, वातावरण, आणि शारीरिक श्रम यानुसार फरक पडेलच.

** सकाळी उठल्यावर एक- दोन लिटर पाणी प्यावे का, हा असाच एक माध्यमांमधून बहुचर्चित केला गेलेला प्रश्न.

माझ्या मते पाण्याचा दैनंदिन( चोवीस तासांचा ) समतोल साधला गेला म्हणजे झाले.

सकाळी उठल्यानंतर लगेच एक लिटर किंवा जास्त पाणी पिणे अनावश्यक आहे ( इतके भरपूर पाणी न पिल्याने काही तोटा व्हायचे कारण नाही). नंतर बऱ्यापैकी लोक व्यायामही करतात. अशा वेळेस पोट पाण्याने तुडुंब भरलेले असणे त्रासदायक ठरेल. मी दीड भांडे पितो.
माझे मत हे आधुनिक वैद्यकानुसार आहे.

रात्रीच्या वेळेस तसेही पाण्याची गरज कमी राहते. त्यामुळे झोपण्यापूर्वी थोडे कमी पाणी पिणे ठीक, जेणेकरून रात्री झोपमोड होऊन लघवीस उठावे लागत नाही.

तहान लागली की पाणी प्यावे हे इतकं साधं असताना ते कॉप्लिकेट कधी नि का झालं.. >>>>मी अजूनही हेच तत्व बाळगते.>>> +१.
काही वर्षांपूर्वी,वेटलॉसवाल्याने अगदी आग्रहाने बोलावून वजन ,फॅट वगैरे किती ते सांगून दिवसभरात ३-५ ते ४ लिटर पाणी प्या म्हणून सल्ला दिला होता.अर्थात एवढे पाणी मी पिऊच शकत नसल्याने तो सल्ला बाद झाला.ऑफीसमधे असताना पाणी बरेच प्यायले जायचे, तितके घरी असताना नाही प्यायले जात.मात्र घोट घोट पाणी प्यायले जातेच.

प्रश्न येण्याचा वेग बऱ्यापैकी आहे. त्यातील योग्य मुद्दे क्रमाने घेत आहे.

आतापर्यंत सहभागी झालेल्या आणि इथून पुढेही सहभागी होत राहणाऱ्या सर्वांचेच या एका प्रतिसादात आभार मानून ठेवतो

काही विशिष्ट प्रश्नांबाबत जरा अधिक वाचल्यावरच त्यांची उत्तरे देईन. तेव्हा धीर धरावा.
Happy

"मी पाणी फारसे पितच नाही, किंवा कोकच पितो, किंवा बियर पितो, इत्यादी विधाने वरील प्रश्नांमध्ये आणि इतरत्रही ऐकू येतात".
यात अमानवीय असे काही नाही. Happy
मात्र याच्या मुळाशी एक गैरसमज दडलेला असतो तो दूर करतो.

बरेचदा आपल्याला 'पाणी पिणे' याचा अर्थ शुद्ध स्वरूपातील पाणी पिणे इतकाच मर्यादित समजतो. वास्तविक शरीरात जाणाऱ्या पाणी या शब्दाचा अर्थ कुठलाही द्रवपदार्थ इतका व्यापक आहे.
यानिमित्ताने शरीराचा चोवीस तासांचा पाण्याचा जमाखर्च ताळेबंद पाहू :
(सर्व आकडे मिलिलिटर मध्ये)

1. जमेची बाजू:
१. खाद्यपदार्थांमधले पाणी १२५०
२. प्रत्यक्ष पिलेले शुद्ध पाणी/द्रव १२००
३.शरीरातील पेशीनिर्मित पाणी ३००
….
एकूण जमा 2750

2. उत्सर्जनाची बाजू:
१. लघवी १५००
२. घाम ५००
३. श्वसनातून ७००
४. शौच ५०
….
एकूण 2750
(वरील तक्ता भारतीय पाठ्यपुस्तकानुसार)

हा समतोल आपल्याला दर 24 तासांसाठी जमल्याशी मतलब. त्यामुळे, दिवसातील काही तास पाणी पिलेले नसणे किंवा काही वेळेस एकदम जास्त पिलेले असणे या सगळ्यांचा पेशींच्या पातळीवरील समतोल शेवटी साधला जातो.

Pages