रोज किती पाणी प्यावे ?

Submitted by कुमार१ on 10 October, 2021 - 23:33

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.

प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.

(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).

सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.

वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.

रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.

आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.

जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की उघड्यावर
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.

पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.

आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.

giphy.gif

आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.

समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.

समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.

'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.

आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.

पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.

पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………………….

मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.maayboli.com/node/64830

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर, खरंच उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.
आमच्याकडे व्हॉट्सॲप ज्ञानी भरपुर आहेत Lol
फ्रीजमधील पाणी पचायला सहा तास घेते तर साधे पाणी एक तास आणि कोमट/गरम पाणी पाच ते दहा मिनिटे असा एक फॉरवर्ड आलेला. अजून एक, उभ्याने पाणी प्यायलो तर गुडघे लवकर झिजतात वैगरे.
या उभ्याने पाणी पिण्याच्या फॉरवर्ड मुळे मला खूप ओरडा बसतो नेहमी.i

अजून एक प्रश्न आहे.
जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा अपघातग्रस्त माणूस प्यायला पाणी मागतो त्याचे कारण काय?

प्रत्येक वेदनेच्या वेळी तहान लागेलच असे नाही. त्या वेदनेमुळे एखादा माणूस किती घाबरला आहे यावर ते अवलंबून असेल.

जेव्हा माणूस खूप घाबरतो तेव्हा शरीरातील विशिष्ट चेतासंस्था उद्दीपित होते. तिच्या प्रभावामुळे तोंडाला कोरड पडू शकते. ती खऱ्या अर्थाने शरीराकडून पाणी कमी झाल्याने मागणी झालेली तहान नसते.

म्हणजेच, या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. ते व्यक्तिसापेक्ष राहील

Submitted by कुमार१ on 11 October, 2021 - 16:10 >>>
धन्यवाद कुमार सर. मोकळा वेळ मिळेल तसे वाचून लिहा. घाई नाही उत्तराची अजिबात.

ब्लॅडर स्नायूंची लवचिकता, Uriary incontinence बाबत इथेच लिहीले तरी चालेल. माहिती म्हणून सगळ्यांना उपलब्ध राहील. सद्ध्या पाणी खूप कमी पिऊनही (दिवसाला दीड लिटर जेमतेम) आईला त्रास होतो हा अधूनमधून, म्हणून सुपात असतानाच विचार केला जातोय.

तहान लागूनही पाणी न पिल्याने लघवीच्या संसर्गदाहाची शक्यता हा दीर्घकालीन सवयीचा परिणाम झाला. मला असे विचारायचे होते की तहानेकडे दुर्लक्ष करून पाण्याशिवाय कितीकाळ रहाणे वैद्यकीय दृष्ट्या सुरक्षित असेल? काय लक्षणे दिसली की पाण्यासाठी शरीराने SOS दिला समजावे?

कारवी
विपू आधीच पाठवली आहे
पहिला मुद्दा हा सामान्य व्यासपीठावर नको असे मला वाटते
एका मर्यादेपलीकडे वैद्यकीय परिभाषा जड असते.

*"तहानेकडे दुर्लक्ष करून पाण्याशिवाय कितीकाळ रहाणे वैद्यकीय दृष्ट्या सुरक्षित असेल >>>

किती काळ याचे सरसकट उत्तर असणार नाही. त्यामध्ये वय, शारीरिक क्षमता, वातावरणीय तापमान इत्यादी मुद्द्यांचा विचार करावा लागेल. तसेच पूर्ण निरोगी आहे की अन्य आजार अथवा मूत्रविकार आहेत का वगैरे वगैरे...

थोडक्यात असे म्हणू :
की कुठल्याही वेळेला लघवीला गडद पिवळी (कडक) झाली आणि अगदी मोजकीच होते आहे असे वाटता क्षणीच पाणी पिणे वाढवले पाहिजे.

धन्यवाद सर.... म्हणजे स्वतःच्या शरीराने दिलेल्या सूचना सावधपणे बघत रहाणे आणि त्याबाबत निष्काळजीपणा न करणे.

लेख चर्चा छानच

एकच खटकतय. बरेच जण पाणी पिले लिहिताहेत. कृपया पाणी प्यायले लिहा हो Wink
खड्यासारखं टोचतय ते वाचताना Proud

अवल धन्यवाद
नोंद घेतली आहे.!
लिहिताना कळत होते पण दुर्लक्ष करणे चालले होते
Happy

सॉरी डॉक्टर __/|\__ जरा आगाऊपणाच झाला माझा. तुम्ही राग मानला नाही याबद्दल धन्यवाद!
पण काय होतं न चांगले लेख आवर्जून वाचले जातात. त्यात तुमचे लेख असतात.

विड्याचे पान व तहान
>>

विड्याचे पानात जे विशिष्ट अल्कलॉइड असते त्यामुळे तोंडाला कोरड पडते.
याबाबतीत माझा दुहेरी अनुभव सांगतो:

* सणाच्या दिवशी आपण घरी जे कामचलाऊ पान बनवतो त्याने कोरड जास्त पडते.
* मात्र चांगल्या टपरीवरील शिस्तीत बनवलेले मसाला पान खाल्ल्यास तुलनेने कोरड कमी राहते. याचे कारण कदाचित, ते लोक कात, चुना व इतर जे काही घटक मुबलकपणे वापरतात त्यामध्ये असावे. मात्र या घटकांचा माझा पुरेसा अभ्यास नाही.

मी पाणी कमी पिते, कारण फार तहान लागत नाही. वर्कआऊट करताना, एकेक सिप पिते तेवढं पुरतं. उठल्यावर ACV मुळे एक ग्लास प्यायलं जातं. तिन्ही मिल्स नन्तर एकेक ग्लास. बस्स.

दिवसात एकदाच खरी तहान लागते ती आंघोळीनंतर. तेव्हा 1-2 ग्लास पाणी प्यायलं जातंच. काय कारण असेल माहित नाही. Irrespective to सिझन, गार / गरम पाण्याची अंघोळ, कावळ्याची आंघोळ किंवा वेळेची चैन असताना केलेलं अभ्यंगस्नान असो, पण बाहेर आल्यावर तहान जाणवते.
प्रतिसादात प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न वाचुन मजा वाटली.

मी पाणी कमी पिते, कारण फार तहान लागत नाही. वर्कआऊट करताना, एकेक सिप पिते तेवढं पुरतं. उठल्यावर ACV मुळे एक ग्लास प्यायलं जातं. तिन्ही मिल्स नन्तर एकेक ग्लास. बस्स.

दिवसात एकदाच खरी तहान लागते ती आंघोळीनंतर. तेव्हा 1-2 ग्लास पाणी प्यायलं जातंच. काय कारण असेल माहित नाही. Irrespective to सिझन, गार / गरम पाण्याची अंघोळ, कावळ्याची आंघोळ किंवा वेळेची चैन असताना केलेलं अभ्यंगस्नान असो, पण बाहेर आल्यावर तहान जाणवते.
प्रतिसादात प्रत्येकाचे वेगवेगळे पॅटर्न वाचुन मजा वाटली.

पान क्वचित म्हणजे आता पर्यंत मोजून पन्नास एक वेळा च खाल्ले असेल. सुपारी हा घटक आरोग्य ला चांगला नसावा असा माझा आपला अंदाज आहे.
सुपारी चावल्या नंतर तिची जे पेस्ट बनते ती घशाला. चिकटते असा माझा अनुभव आहे.त्या मुळे गिळण्यास त्रास होतो.

हेमंत
बरोबर. सुपारीच्या बाबतीत तुमचे व माझे सारखेच आहे.
त्या प्रकाराला 'सुपारी लागणे' असे म्हणतात. मी नेहमी मसाला पान सांगताना बिगर सुपारी असेच सांगतो. अन्यथा, सुपारी घशाला लागली तर मग पानाची सगळी मजाच निघून जाते.

दीर्घकाळ अतिरिक्त सुपारी खाणे हे मौखिक आरोग्याला चांगले नाही. त्यातून तिथे फायब्रोसिस नावाचा विकार होतो. यातून पुढे कर्करोग होण्याची शक्यता बळावते.

हे पहा माध्यमांची कशी फेकाफेकी चालू असते:

"पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात"

https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/l...

काहीही....

>>>हे पहा माध्यमांची कशी फेकाफेकी चालू असते:>+९९

असेच एक खूळ कायप्पावर बराच काळ फिरत होते - सकाळी उठल्यावर चूळ न भरता पाणी प्यायले की फायदा होतो म्हणे.

मीडिया आणि समाज मध्यम अनेक अफवा पसरवत असतात.
वजन कमी करणे हा ह्यांचा लाडका विषय.चुकीची माहिती पसरवतात त्या नुसार लोक डाएट ठरवतात.
त्या लोकांकडे बघवसे वाटत नाही वजन कमी होत असेल पण चेहरा एकदम निस्तेज.कसला तरी रोग लागल्या सारखा.
कोण सांगणार १६ तास उपवास करा,कोण सांगणार इतकेच पाणी प्या.
नको नको ते सल्ले दिलेले असतात.

साद चूळ न भरता पाणी पिणे फार जुने आहे.
याचे जुने कारण सांगतात ते म्हणजे रात्रभरात तोंडातील जर्म्स आणि बॅक्टेरिया काही पटींनी वाढतात, हे शरीराला हवे असलेले असतात, ते पाण्यासोबत पोटात जातात.

आणि नविन सांगण्यात येणारे कारण म्हणजे तुम्ही जर दात घासून मग पाणी प्याले तर टूथपेस्ट मधील घटक जे दातांना आवश्यक असतात ते वाहून पोटात जातात आणि त्यांचा दातांना फायदा मिळत नाही. म्हणुन दात घासल्यानंतर अर्धा तास काही खाऊ पिऊ नये. एवढा वेळ थांबण्यापेक्षा आधीच पाणी प्या आणि डबल बेनिफिट मिळवा.

यात दोन्हीत तथ्य आहे को नाही माहीत नाही.

साद, मानव
हा बराच वादग्रस्त विषय आहे. त्यातले एक गृहीतक असे मांडले गेले होते :

“आपल्या तोंडात उपयुक्त व घातक अशा दोन्ही सूक्ष्मजंतूंचा सहवास (सिम्बायोसिस) असतो. सकाळी अशा प्रकारे पाणी पिल्याने तोंडातील उपयुक्त सूक्ष्मजीव शरीरातच राहतात”.

या विषयावर मी काही वाचन केले. त्याने गोंधळ वाढावा अशीच माहिती मिळत गेली. मग मी एका दंतवैद्याशी यावर चर्चा केली. त्यांच्या मते सकाळी प्रथम चूळ भरणे आणि ते पाणी बाहेर टाकणे हेच फायदेशीर आहे. त्यांनी सांगितलेले स्पष्टीकरण थोडक्यात लिहितो.

आपले तोंड, घसा, अन्ननलिका, जठर आणि आतडी अशा प्रत्येक विभागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू वास्तव्य करून असतात. किंबहुना एकमेकांशी फारसे देणेघेणे नसलेल्या त्यांच्या या स्वतंत्र वसाहती असतात. आणि ज्या त्या वसाहतीतील सूक्ष्मजीवांचे काम तेवढ्या स्थानिक मर्यादेपुरते असते.

समाजातील बरेच लोक रात्री झोपताना दात घासत नाहीत. रात्रभरात तोंडात जे काही जीवजंतू जमा होतात, त्यामध्ये काही घातक सुद्धा असतात. सकाळी उठल्यानंतर थेट पाणी पिऊन हे घातक जंतू पुढे जठरात ढकलण्यात काहीच मतलब नाही. त्यामुळे चूळ न भरता पाणी पिण्याचा फायदा तर काहीच नाही, उलट तोटा होऊ शकेल, असे त्यांचे मत आहे.

विचार केल्यावर ते मलाही पटले.

हा लेख उलटी गंगा वाटते. म्हणजे एखाद्या मराठी लेखावरुन भाषांतर प्रणालीने भाषांतरीत केलेला.

Pages