रोज किती पाणी प्यावे ?

Submitted by कुमार१ on 10 October, 2021 - 23:33

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.

प्रारंभी पाणी पिणे या संदर्भात आपल्या शरीरातील कोणत्या यंत्रणा कार्यरत असतात, तसेच मूत्रपिंडाचे त्या संदर्भातील कार्य या गोष्टी समजून घेऊ. इथे लिहीलेले सर्व मुद्दे हे प्रौढ निरोगी व्यक्तीचा संदर्भ घेऊनच लिहिलेले आहेत. निरोगी याचा अर्थ ज्याच्या मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित (नॉर्मल) चालू आहे असा माणूस.

(मूत्रपिंडाच्या विविध आजारांमध्ये किती पाणी प्यावे हा स्वतंत्र विषय असून तो पूर्णपणे संबंधित तज्ञांच्या देखरेखीखाली हाताळला जातो. हा भाग पूर्णपणे या लेखाच्या कक्षेबाहेर आहे याची नोंद घ्यावी).

सुरुवातीस तहान लागण्याच्या संदर्भातील शरीरधर्म पाहू. आपल्या रक्ताचा जो द्रव भाग असतो त्यामध्ये मुख्यतः पाणीच असते. या पाण्यात काही पदार्थ विरघळवलेल्या अवस्थेत असतात. त्यामुळे रक्ताला एक विशिष्ट घनता (osmolality) असते. शरीरातून जसे पाणी उत्सर्जित होते तसा या घनतेत फरक पडतो. त्यानुसार मेंदूला विशिष्ट संदेश जातात. आता मेंदूमध्ये दोन घटना घडतात :
१. तिथल्या एका ग्रंथीतून ADH या नावाचे हार्मोन स्त्रवते.
२. तहान नियंत्रण केंद्राला चालना मिळते. त्यामुळे आपण समाधान होईल इतके पाणी पितो.

वरील दोन्ही घटना घडल्यानंतर आपल्या रक्ताची घनता पूर्ववत होते. त्यामुळे ते हार्मोन स्त्रवणे थांबते आणि तहानेची भावनाही बंद होते.

रक्ताची घनता स्थिर राखण्यामध्ये त्यातील सोडियमचे प्रमाणही स्थिर ठेवावे लागते. ते काम मूत्रपिंडांच्यावर असलेल्या ऍडरिनल ग्रंथींमधून स्त्रवणाऱ्या Aldosterone या हार्मोनमुळे केले जाते.

आपण शरीरातून लघवी, घाम आणि श्वसन याद्वारे पाणी उत्सर्जित करतो. ते उत्सर्जन किती होते यानुसार आपली तहान नियंत्रित केली जाते.
आपल्या मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि एकंदरीत तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज (24 तासात) किती पाणी प्यावे हा बहुचर्चित विषय आहे. त्यावर वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्र संबंधीच्या विविध तज्ञांची अनेक मते आहेत. त्यावर वारंवार काथ्याकुट होत असतो. आतापर्यंत झालेले विविध अभ्यास आणि पुरावे पाहता एक स्पष्ट होते ते म्हणजे - अमुक इतके पाणी रोज पिल्याने तब्येत उत्तम राहते असे सप्रमाण सिद्ध झालेले नाही. त्यामुळे निरोगी व्यक्तीने अमुक इतकेच पाणी प्यावे किंवा अमुक इतक्या प्रमाणाबाहेर पिऊच नये अशी काही वैज्ञानिक शिफारस नाही.

जगाच्या पाठीवर विविध हवामान प्रदेशांमध्ये आपण वस्ती करतो. त्यानुसार पाण्याची दैनंदिन गरज बदलती राहते. ही गरज नियंत्रित करण्यामध्ये खालील घटकांचे योगदान असते :
१. हवामान
२. शरीरश्रमांचा प्रकार व पातळी
३. श्रम बंद जागेत की उघड्यावर
४. दीर्घकाळ मैदानी खेळ खेळणे आणि
५. मूत्रपिंडांचे कार्य.

पाणी किती प्यावे याचे स्वनियंत्रण आपण एका सोप्या निरीक्षणाद्वारे करू शकतो ते म्हणजे आपल्या लघवीचा रंग. निरोगी अवस्थेत तो फिकट पिवळसर असतो. आपल्या दिवसभरातील प्रत्येक लघवीचा रंग तसाच स्थिर राहात असेल तर ते शरीरातील पाणी नियंत्रण उत्तम असल्याची खूण असते.

आता संदर्भासाठी भारतीय हवामान घेऊ. साधारणपणे आपण चोवीस तासात एक ते दोन लिटर या दरम्यान (सरासरी दीड लि.) लघवी करतो. मग ते पाणी भरून काढण्यासाठी साधारण दोन ते अडीच लिटर पाणी पिले जावे असे एक सामान्य तत्व आहे ( पाणी या शब्दात पाण्यासह इतर खाद्यपेय पदार्थही येतात). उन्हाळ्यात अर्थातच हे प्रमाण गरजेनुसार तीन ते साडेतीन लिटर इतके वाढू शकते तर थंडीत ते कमी होते.

giphy.gif

आता पाहू एक वादग्रस्त प्रश्न.
सामान्य माणसांनी सामान्य हवामानात 24 तासात तीन लिटर पेक्षा जास्त पाणी पिऊ नये, तसे केल्यास मूत्रपिंडांवर ताण येतो आणि वेळप्रसंगी मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो, अशा प्रकारची माहिती काही लोक पसरवत असतात. या मुद्द्यात व्यावहारिक तथ्य नाही. कसे नाही ते समजावतो.

समजा आपण गरजेपेक्षा बरेच जास्त पाणी पिऊ लागलो तर काय होईल ? याचे साधे उत्तर आहे की आपण नेहमीपेक्षा जास्त वेळेला लघवीस जात राहू. पाणी उत्सर्जन करणे हे आपल्या मूत्रपिंडांचे कामच आहे. आपण खूप जास्त पाणी प्यालो तर त्यांना अधिक उत्सर्जन करण्याची राखीव क्षमता दिलेली आहे. अधिक जलपान तर अधिक उत्सर्जन, असा हा साधा तर्क आहे.

समजा एखादा माणूस ठरवून दिवसात १० लिटर पाणी प्यायला (केवळ कल्पना करू) तरीही मूत्रपिंडे ते ज्यादा पाणी लघवीवाटे व्यवस्थित उत्सर्जित करतील. हे जे उदाहरण दिले ते निव्वळ ताणलेली कल्पना आहे. जेव्हा शरीरातील पाण्याची स्थिती उत्तम असते तेव्हा मुळात आपल्याला अतिरिक्त तहान लागतच नाही. तरीही जर पाणी ढोसायचेच म्हटले, तर एक क्षण असा येईल की आपल्याला पाणी पाहूनच प्रचंड मळमळ होईल आणि ताबडतोब उलटी सुद्धा होईल. अशाप्रकारे आपल्या तोंड या प्रवेशद्वाराशीच हे नैसर्गिक पाणी नियंत्रण काम करते. त्यातून एखादा माणूस भरमसाट पाणी किती पिऊ शकेल त्याला नैसर्गिक मर्यादा आपसूकच येते.

'जास्ती पाणी पिऊ नका' च्या सल्लागारांचा दुसरा मुद्दा असतो तो रक्तातील सोडीयमच्या संदर्भात. निरोगी अवस्थेत रक्तात सोडियमचे प्रमाण 135 ते 145 युनिट्स या टप्प्यात असते. हे प्रमाण म्हणजे किती पाण्यात किती सोडियम विरघळला आहे याची तुलना असते. समजा पाण्याचे प्रमाण अचानक खूप वाढले, तर मग त्या स्थितीत सोडियमचे तुलनात्मक प्रमाण बरेच कमी होते. त्यातून मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ही झाली थिअरी. मुळात आपण वर पाहिल्याप्रमाणे, जसे एखादा माणूस जास्त पाणी पिऊ लागतो तसे मूत्रपिंडे अधिक लघवी लघवी उत्सर्जित करीत राहतातच. तसेच संबंधित दोन हार्मोन्सही योग्य ते नियंत्रण करतात. त्यामुळे खूप मोठ्या पाण्यात तेवढाच सोडीयम ही स्थिती वास्तवात उद्भवत नाही. तसे होऊ शकेल ही एक अतिरंजित कल्पना राहते. गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम होत नाहीत हे यावरून स्पष्ट होईल.

आता याविरुद्धची बाजूही बघू. 'भरपूर पाणी प्या आणि मूत्रपिंडांना तंदुरुस्त ठेवा' या विधानालाही शास्त्रीय पाया नाही. मूत्रपिंडांची तंदुरुस्ती ही पाण्याव्यतिरिक्त शरीरातील इतर अनेक घटकांवरही अवलंबून आहे. म्हणून निव्वळ भरपूर पाणी पिल्याने मूत्रपिंडाचा आजार होत नाही हेही एक मिथक आहे. जसे की, रोज एक सफरचंद खाल्ल्याने रोगमुक्तता मिळते असे थोडेच आहे ? तद्वत निव्वळ पाण्याच्या मुबलकतेने उत्तम आरोग्य राहील यालाही अर्थ नाही.

पाण्याची गरज कोणते घटक ठरवतात ते आपण लेखात पाहिले. जोपर्यंत मूत्रपिंडे तंदुरुस्त आहेत, मेंदूतील तहान नियंत्रण व्यवस्थित काम करतंय आणि संबंधित हॉर्मोन्सही व्यवस्थित स्त्रवत आहेत, तोपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्याने दुष्परिणाम व्हायचे काही कारण नाही. प्रत्येकाची तहानेची भावना आणि लघवीच्या रंगाचे निरीक्षण यानुसार पाणी पिण्याचे स्वयंनियंत्रण होत असते. त्यासाठी पाण्याच्या ठराविक प्रमाणाची मुद्दामून शिफारस नको. अभ्यासांती आणि सहकारी डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर हे माझे मत बनले आहे. समाजात आरोग्य शास्त्रासंबंधित सर्व तज्ञांचे यावर एकमत नाही असे दिसते. मी माझे मत विचारांती येथे लिहिले आहे. विषय चर्चेस खुला आहे.

पुन्हा एकदा महत्त्वाचे :
ही चर्चा करताना आपण फक्त तहान नियंत्रण व मूत्रपिंडे निरोगी असलेल्या प्रौढ व्यक्तीचाच विचार करीत आहोत.
……………………….

मूत्रविकारांवरील चर्चेसाठी हा जुना धागा उपलब्ध आहे:
https://www.maayboli.com/node/64830

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सौर ऊर्जेच्या मदतीने हवेपासून पाणी तयार करण्यासंबंधी इथ एक लेख आहे:

https://interestingengineering.com/drinking-water-from-air-and-sunlight

आपल्यातील कोणी या विषयातील अभ्यासू असल्यास जरूर त्यावर स्वतंत्र लिहा असे आवाहन करतो.

शास्त्रीय संदर्भ नसलेली जोरदार थापेबाजी:

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी प्यावे की पिऊ नये ?
https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/l...

केकू
मी इथला वैद्यकीय संदर्भ वाचला
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9664576/

त्यानुसार ब्रूस लीच्या मृत्यूच्या एकूण सहा उपपत्ती आहेत. त्यामध्ये marijuana, cocaine
या अमली पदार्थांचे सेवन हाही एक भाग आहे. शेवटी ते असे म्हणतात:

"the presence of multiple risk factors may explain the sequence of events that led to Lee’s demise".

गुंतागुंत आहे खरी ....

किडनी रक्तातील अतिरिक्त पाणी काढू शकत नाही अशी वेळ येण्या आधी किडनीच्या आजाराची इतर लक्षणे दिसायला हवीत का? की त्या शिवाय अशी वेळ येऊ शकते?

मरण्याच्या दोन महिने आधी सुद्धा त्याला असाच त्रास झाला आणि तेव्हा सुद्धा मरणाच्या वेळी केलेले cerebral edema हे निदान केले होते असे विकिपीडियावर वाचले. त्यावेळेस चाचण्या करताना किडनी आजार निदर्शनास आला नसेल? १९७3 ची गोष्ट आहे तेव्हा काय चाचण्या करत (तरुण वय हा सुद्धा एक फॅक्टर, कदाचित त्या काळी या वयात किडनी आजार दुर्मिळही असेल?) हे सुद्धा बघायला हवे.

पण पन्नास वर्षानंतर मरणाचे कारण हे असू शकते असे सांगणे म्हणजे फारच लांबचा तीर नाही वाटत?

(ती बातमी २२ नोव्हेंबरची आहे आणि त्यात "डिसेंम्बर २०२२ च्या अंकातले संशोधन" असे म्हटले आहे. मुद्रणातील चूक की अंक १० दिवस आधी प्रकाशीत होऊ शकतात?)

मानव
*फारच लांबचा तीर नाही वाटत?>>. +१

नियतकालिक प्रसिद्धीचा ऑनलाईन आणि प्रत्यक्ष छापील महिना यात बरच अंतर आहे:
Article information
Clin Kidney J. 2022 Dec; 15(12): 2169–2176.
Published online 2022 Mar 10. doi: 10.1093/ckj/sfac071

सौर ऊर्जेच्या मदतीने हवेपासून पाणी तयार करण्यासंबंधी इथ एक लेख आहे:

नको ते फालतू प्रयोग संशोधक लोकांनी करू नयेत..
पूर्ण परिणाम,दुष्परिणाम माहीत करूनच असले प्रयोग करावेत नाही तर भयंकर संकट पृथ्वी वर येवू शकते .

हो ना. जलविद्युत प्रकल्पांमुळे पाण्याचे गुणधर्म बिघडून शेतीचे
खूप नुकसान झाले आहे
( अवांतराबद्दल क्षमस्व. अगदीच राहावलं नाही)

भरत तुम्ही विनोद तर करत नाही न?
विनोद काय आहे तो मी तुम्हाला सांगतो.
मी कधी काळी कोयना प्रकल्पावर नोकरी करत होतो. धरणातून पाणी येऊन जनित्र फिरवली जातात, वीज निर्मिती होते आणि शेवटी पाणी वासिष्ठी नदीच्या पात्रात सोडले जाते. जवळपास वर्षभर नदी दुथडी भरून वाहत असते आणि शेवटी चिपळूणपाशी पाणी समुद्राला जाऊन मिळते.
मी मुर्खासारखे साहेबाला विचारले. "' लोक ह्या पाण्यावर शेती का नाही करत?"
साहेबाने मला काय सांगावे? "शेतकऱ्यांचे म्हणणे आहे कि ह्या पाण्यातली वीज काढून घेतली आहे. अशा पाण्याने शेती नाय होत".
( मला पण अवांतराबद्दल क्षमस्व. अगदीच राहावलं नाही)

वातावरणात असलेले पाणी काढून घेतले तर हवेची आद्रता कमी होईल आणि त्याचे नक्कीच दुष्परिणाम होतील..
हा माझ्या पोस्ट चा अर्थ होता..
भरत असे का react झाले काही समजले नाही.
विद्युत प्रकल्प मध्ये फक्त जनित्र फिरवण्यासाठी पाणी वापरतात त्या मुळे त्या पाण्याच्या गुणधर्मात काही फरक पडत असेल असे वाटत नाही

पण समजा पाण्यात विजेची लाईव्ह वायर सोडली तर ते पाणी परत वीजसंपृक्त होऊन त्यावर शेती करता येणार नाही का?
(मला पण क्षमस्व)

<< वातावरणात असलेले पाणी काढून घेतले तर हवेची आद्रता कमी होईल आणि त्याचे नक्कीच दुष्परिणाम होतील.. >>
Lol
हेमंत सर, air conditioner चे दुष्परिणाम याच्यावर लिहा आता.

आरोग्यज्ञान की फेकाफेकी ?

चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान! https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/l...

खालील मुद्दे पटण्यासारखे नाहीत. अतिशयोक्त लिहून ठेवलेले आहे:

*चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी होऊ शकते.
*चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने काही जणांच्या नाकातून रक्त येऊ लागते.
*चहावर पाणी प्यायल्यास दात किडण्याची समस्या उद्भवू शकते.

......
ज्यांच्या दातांची झीज झालेली आहे त्यांनी गरमवर एकदम गार पिऊ नये इतपत ठीक आहे.

Pages