तुटक तुटक..

Submitted by पाचपाटील on 15 August, 2021 - 05:38

१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या
उचंबळून येण्याचा प्रवाह मुक्त असतो.. पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ फक्त त्यांच्या मालकांच्या दिशेनेच..

२. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत..
समोर स्तब्ध पाण्याचा पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा..
थरथरतो.. वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे..
झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी मान डोलावली...

३. बेलच्या आवाजामुळे झोपमोड होण्याच्या दु:खाची,
आणि फूटपाथवर किंवा उड्डाणपुलाखाली झोपलेलो
असताना कुणीतरी काठीनं ढोसून उठवल्यामुळे होणाऱ्या दु:खाची तुलना होऊ शकते का?

४. रिक्षा स्टँडवर जर रिक्षा उभी असेल तर तिच्या शेजारून जपून गेलेलं बरं... कधी आरेमडीची किलोभर पिचकारी
बाहेर येईल सांगता येत नाही..

५. घार आहे ती..! आपल्या पारिजातकावर येऊन गप्पा
रंगवत थोडीच बसणार... मानवी गोंगाट नसलेली ठिकाणंच बरी वाटत असणार तिला..

६. बॉस म्हणतो, "तुम्ही शनिवारी रविवारी सुद्धा काम
करताय हे खूप चांगलं आहे पण तुम्ही नंतर बदली सुट्टी
मागितली नसती तर मला आणखी प्राऊड फील झालं असतं..!"
आम्ही म्हणतो, "आम्हाला मोटीव्हेट करण्याचा तुमचा प्रयत्न वाया गेला सर.. आम्हाला तर बदली सुट्टी
घेण्यातच प्रचंड प्राऊड फील होतं..!"

७. हिंदू असण्यात एक बरं आहे.. कुठल्याही प्रकारच्या
धार्मिक कर्मकांडांचा, सनातनी पुजाऱ्यांचा किंवा कट्टर
धर्मांधांचा जबरदस्ती करणारा गलिच्छ हात माझ्यापर्यंत
सहजासहजी पोचत नाही..!
तसेच 'हे करच' किंवा 'अमुक केलं तर तुझं काही खरं नाही' अशा प्रकारच्या जबरदस्तीला ह्यामध्ये फारसा स्कोप नाही..

८. न पिणाऱ्यांनी पिलेल्यांच्या बैठकीत फार वेळ बसू नये..
पिल्यावर आत दबलेली सगळी दुःखं, ठसठस बाहेर यायला लागते.. ऐकवत नाही.

९. शब्दांचा द्वेष/टिंगल करू नये.. ते शब्द शतकांचा प्रवास करत कुठून कुठून आले असतील इथपर्यंत.. कितीतरी
लोकांनी स्वतःला व्यक्त करायला ते शब्द वापरले असतील..!

१०. मला आत्ता रिलॅक्स वाटत नाही, मला तुझ्याशी
बोलल्यानंतर रिलॅक्स वाटेल..मला आत्ता या क्षणी रिलॅक्स वाटत नाही, मला शॉपिंग करून आल्यावर रिलॅक्स वाटेल.. मला आत्ता या क्षणी रिलॅक्स वाटत नाही,वायफायच्या
रेंजमध्ये गेल्यावर सगळे नोटिफिकेशन्स मोबाईलच्या
स्क्रीनवर बदाबदा कोसळल्यानंतर मला रिलॅक्स
वाटेल..
मला आत्ता या क्षणी रिलॅक्स वाटत नाही, मला नंतर
कधीतरी
रिलॅक्स वाटेल..!

११.सार्वजनिक टॉयलेटमध्ये गुप्तरोगावर किंवा मर्दाना
कमजोरीवर वगैरे गॅरंटेड इलाज कुठं मिळेल यासंबंधी
मार्गदर्शन म्हणा किंवा आशेचा किरण म्हणा गरजूंना
दाखवलेला असतो.. अशा जाहिराती चिकटवणाऱ्या गुप्त मनुष्याचं जॉब प्रोफाइल तुला आवडेल का?..
करिअर म्हणूनही विचार करायला हरकत नाही..
या धंद्याला मरण नाही..!

१२. तुमच्या डोक्याला इतर काही व्याप नाहीत... त्यामुळे हे असं एखादं चिल्लर कारण घेऊन त्यावर विचार करत
बसायची चैन परवडते.. खूप सारे व्याप लावून घ्यायची गरज आहे तातडीने..

१३. "ऐक नाss आपण जाता जाता भाजी घेऊया का कोपऱ्यावरून"
'जाता जाता नको.. येता येता घेऊ..!'

१४. आमच्या दहावी-बारावीच्या वयात 'मास्ट्रुबेट करावे की नाही' हा एक महत्त्वाचा नैतिक प्रश्न असायचा... आता तसलं काही राहिलं नसेल ना..? बरंय..!

१५. वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं तेव्हा मी आठवीत होतो. पुढचे काही दिवस मी एकटाच गुप्तपणे तणावाखाली होतो की सरकार 'पडलं' म्हणजे देशावर कायतरी मोठं संकट- बिंकट आलं की काय..! मग नंतर हळूहळू कळत गेलं की ह्या बदमाश लोकांचे नेहमीच कुठेना कुठे तरी असले
पाडापाडीचे धंदे चाललेलेच असतात आणि त्यात आपण
टेन्शन घेण्याचं काहीच कारण नसतं..!

१६. 'माझा मुलगा काही चुकीचं वागूच शकत नाही', अशा
प्रकारचा ठाम आत्मविश्वास आयांना कुठून येतो, ह्यासंबंधी एक सर्व्हे करायला पाहिजे..

१७. सायकीयाट्रिस्टला पैशे देऊन आपलं म्हणणं ऐकायला बसवावं... आपली दु:खं आळवून आळवून भरघोस बोअर करावं त्याला.. मग तो अक्राळविक्राळ जांभया द्यायला
लागला की आपण लाजून थांबावं.. मग जगाबद्दल चांगलं
वाटायला लावणाऱ्या
गोळ्या देईल तो...!

१८.यादी करता येईल. काहीच अडचण नाही. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या भन्नाट पुस्तकांच्या प्रभावाखाली एखादा आलाच तर त्याचं आयुष्यात काही भलं होण्याऐवजी, तो उलटा 'डाव घोषित करून' हरी हरी करत बसणंच योग्य आहे, अशा मूडपर्यंत पोहचला तर चांगल्या अर्थाने बरबादच व्हायचा..!

संपादन :

१९."भांडारकर संस्थेनं काढलेली महाभारताची चिकित्सक आवृत्तीसुद्धा नवव्या शतकाच्या फार मागे जात नाही,
ह्या कुरुंदकरांच्या मताबद्दल तुम्हाला काय वाटतं?
'', असा प्रश्न समजा राणेंना किंवा दादांना विचारला आणि तेही समजा लगेचच ' मी सांगतो ना काय हाय ते '
किंवा 'लोकशाईमदे वेगवेगळी मतं आसू शकतात आनी
शेवटी कुनाला काय वाटावं हा ज्येचा त्येचा वैयक्तिक प्रश्न है
', अशी प्रस्तावना करत उत्तर बित्तर द्यायला लागले, आणि मग समोरच्या सर्व पत्रकारांना ज्ञानाच्या अथांग डोहात
बुचकळून काढायला लागले तर त्याची जबाबदारी कोण घेणार..!!

२०. सलूनमध्ये कटिंग करताना रडणाऱ्या पोराला "उगी उगी.. झालंच हं आताss" असलं कायतरी बोलूनच समजूत
काढावी लागते..
पण समजा त्याला जर म्हणालो की "ही एक साधी आणि नॉर्मल प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये रडण्यासारखं काहीही
नाहीये.. ह्या जगातली तमाम माणसं सभ्य सामाजिक
दिसण्यासाठी दर महिन्याला ही गोष्ट मोठ्या आवडीने करून घेत असतात..
पुढे आयुष्यभर तुला यापेक्षाही जास्त घाबरवून, गुदमरवून
टाकणारी दु:खं भोगावी लागणार आहेत, त्यावेळी तू रड..! आत्ताच कशाला किरकिर करतोयस??"
तर हे ऐकून त्या पोरामध्ये काही रॅडीकल चेंजेस होऊन तो तात्काळ बुद्धपुरुष होण्याचे काही चान्सेस आहेत काय??

२१. झोपताना डोळे मिटून घेतल्यावर डोळ्यांसमोर येणाऱ्या सर्वव्यापी अंधाराच्या सीमारेषा नेमक्या कुठपर्यंत पसरलेल्या असतात माहितीय का? शोध घे मग त्यांचा... आणि एकदा का त्या सरहद्दीवरच्या एखाद्या बिंदूला तुझा स्पर्श झाला की मग तिथून पुढं तुझ्या आयुष्याचं झगझगीत सोनंच है भौ..!

२२. डोक्यात फालतू बडबड मावेनाशी झाली की एखाद्या
बागेतल्या गवतावर पाठीवर पडून रहावं, वरती कोऱ्या
आकाशाच्या घुमटाकडे बघत...
अधूनमधून लक्ष डोक्यातल्या बडबडीकडे आणि अधूनमधून समोरच्या आकाशाच्या सनान् उत्तुंग विस्तारात..
मग निवळते बडबड आपोआप कारण एका पॉइंटवर तिच्या स्वतःच्याच लक्षात येतं की आपल्या कांगाव्यामुळे ह्या
आकाशाला काहीही फरक पडत नाहीये.. ते कायम जसं होतं तसंच आहे आणि राहिल.. तूर्तास आपण गप्प बसावं हेच बरं..!

२३. कायमस्वरूपी मौन राहू शकत नाही आपण..
त्या लेव्हलला पोचण्यासाठी अजून टाईम है..
पण म्हणून लगेच लाऊडस्पीकरवरून सभा टाकायची काही गरज नाही..
मंद वाऱ्याची झुळूक झाडाच्या पानांची कशी हलक्या
आवाजात विचारपूस करते..! तसं जमलं पाहिजे..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy _/\_