लग्न / नाती याकडे स्त्री जास्त गांभिर्याने पाहते की पुरूष ?

Submitted by शांत माणूस on 18 September, 2021 - 00:18

(माबो गणेशोत्सव चालू असताना या प्रश्नाची वेळ चुकलेली आहे याची कल्पना आहे. पण नंतर लक्षात राहणार नाही आणि लिखाणाचा उत्साह बारगळण्याची शक्यता म्हणून विचारून टाकतो).

काही वर्षांपूर्वी भारतीय (कि मराठी) पुरूष कमी रोमँटिक असतात अशा आशयाचे लेख वाचले होते. बहुतेक लेख स्त्रियांकडून आले होते. त्या वेळी स्त्री चळवळ वाल्यांचे रिकामटेकडे धंदे असे समजून दुर्लक्ष केले होते. पण कुठेतरी ते बॅक अप मेमरीत जाऊन बसले आणि नकळत अनेकदा स्वतःची, मित्रांची आजूबाजूच्या पुरूषांची आणि स्त्रियांचीही उजळणी व्हायला सुरूवात झाली. लक्षात हे आले की आपल्या गोतावळ्यात अनेक पुरूष सतत ताण घेऊन वावरतात. काहींना हसण्या खेळण्याचे कोडे वाटते. रोमँटिक व्हायलाही काही जण आढेवेढे घेतात. बायकोशी समान पातळीवर वागणूक ब-याच जणांकडे नसते. बायकोवर आपण कशी सत्ता गाजवतो हे कौतुकाने दाखवणारे खूप जण असतात. त्याबद्दल कौतुक करणा-या बायकाही असतात.

बहुतेकांच्या बाबत लग्न करून मोकळे व्हायचे. बाहेरचे धंदे पुरूषाने पहावेत. पोरं बाळं बायकांनी सांभाळावीत असे धोरण असते.
सण, रूढी परंपरा हे सर्व बायका करतात. नाते टिकवणे हे बहुतेक वेळा स्त्री वर सोपवलेले असते. लग्न टिकवणे हे सुद्धा स्त्री वरच ढकललेले असते. त्यामुळे नाती तुटेपर्यंत पुरूषाला त्याचे गांभीर्य जाणवत नाही.

बरेचदा पुरूष पैशाच्या मागे असतो. करीअरच्या मागे असतो. क्वालिटी लाईफ काय असते हे अनेकांना ठाऊक नाही. नवरा बायकोने आनंदाचे क्षण जगण्यासाठी केलेला खर्च अनेकांच्या बजेटमधे नसतो. त्याला अनावश्यक खर्च समजले जाते. नवरा बायकोने फिरायला जाणे हे हनीमून नंतर फक्त धार्मिक पर्यटन किंवा कौटुंबिक उत्सव यापुरतेच असते.

पुरूषांच्या गप्पात नातेसंबंध वगैरे विषय खूप कमी वेळा येतात. याउलट दोन बायका जेव्हां जमतात तेव्हां गप्पांच्या विषयात नात्याचा टक्का जास्त असतो.
माझ्या चिमुकल्या जगाच्या निरीक्षणातून तरी स्त्रिया नात्याचा जास्त विचार करतात. पुरूष बेफिकीर असतो असा निष्कर्ष निघाला.

प्रत्येकाचे जग अ/अ अनुभव वेगळे असणार.
तुमचे काय मत आहे ? काय निरीक्षण आहे ? काय निष्कर्ष आहेत ? त्याची तुम्हाला समजलेली / वाटलेली कारणे काय असावीत ?
गंभीर / खुसखुशीत / ललित लेख किंवा तक्रारी सर्व काही येऊ द्यात.

( हा प्रश्न कुठे विचारावा हे न समजल्याने संस्कृती विभागात विचारला आहे. या पेक्षा योग्य ग्रुप असेल तर तिकडे हा धागा हलवावा).

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरीक्षण बरोबर आहे. आपल्या समाजाची रचना अशीच आहे.
यात जसे कर्तबगार महिलांवर अन्याय होतो तसे भावनिक पुरुषांचीही फार कुचंबना होते.
त्यात तो पुरुष कर्क राशीचा असला तर आणखी अवघड होते Sad

असो, दुनिया गोल आहे. विषय खोल आहे. तर हेच बोल गणेशोत्सवानंतर पुन्हा मांडा. तेव्हा धागा वर काढा. काही लिहीता येईल ईथे निवांत...

पुरुष हंटर म्हणाजे शिकारी होते तर स्त्रिया या गॅदरर व नर्चरर होत्या - असे वाचल्याचे स्मरते
हंटर म्हणजे भावनिक ओलावा कमीच हवा ना नाहीत समोर ससा हरीण याय्चे, आणि आपल्याला दया यायची मग ते पळून गेल्यावरती खाणार काय? गवत?
स्त्रिया नर्चरर असल्याने, अन्य स्त्रियांबरोबर संबंध ठेवणे त्यांच्या दॄष्टीने पूरक असणार. कुठे काय धोका आहे, कुठे अन्नाची सुबत्ता आहे वगैरे बित्तंबातमी ठेवता येत असणार. त्यातून मग स्त्रियांचा ओढा आहे ते राखणे, संबंध वाढविणे वगैरे झाला असावा.
त्यात मूल स्त्रीच्या पोटात वाढते व नंतरही बरीच वर्षे तिच्यावरती फार अवलंबुन असते तय काळात पुरुषांची मदत लागतेच ना. या सर्वामधुन नातेसंबंध जोपासण्याची कला स्त्रीमध्ये अधिक असावी.

असो, दुनिया गोल आहे. विषय खोल आहे. तर हेच बोल गणेशोत्सवानंतर पुन्हा मांडा. तेव्हा धागा वर काढा. काही लिहीता येईल ईथे निवांत... >>> ओके सर.

हंटर म्हणजे भावनिक ओलावा कमीच हवा ना नाहीत समोर ससा हरीण याय्चे, आणि आपल्याला दया यायची मग ते पळून गेल्यावरती खाणार काय? गवत? >>> नैसर्गिक रित्या पुरूष कोरडाठक्क असेल की आजूबाजूच्या वातावरणातून, त्याच्याबद्दलच्या अपेक्षातून त्याची जडणघडण होत असेल ?

पुरुष हंटर म्हणाजे शिकारी होते तर स्त्रिया या गॅदरर व नर्चरर होत्या >>> पण हे गृहीतक चूक असल्याचे निदर्शनास आले आहे. हे वाचा

लेखाचे शीर्षक वाचकाला मत बनवण्यास व व्यक्त होण्यास उद्युक्त करणारे आहे, पण लेखातील मुद्दे माझ्यामते किंचित सरमिसळ झाल्यासारखे आहेत. कदाचित तसे नसेलही, माझ्या आकलन मर्यादा!

मात्र निव्वळ शीर्षकावरून प्रतिसाद द्यावा असे वाटले तर मी असे म्हणेन की स्त्री नात्याकडे अविरत गांभीर्याने पाहते व पुरुष 'ते असलेले नाते टिकणारच की, ते कशाला तुटेल' अशा काहीश्या भूमिकेत असतो. सरसकटपणे असे म्हणता येत नसले तरी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अशी उदाहरणे दिसतात.

हे मत जर खरोखरच योग्य असले तर याचे कारण पिढ्यानपिढ्या झालेले वेगवेगळे संस्कार हे म्हणावे लागेल. पुरुषाने कमावले की त्याचे काम झाले, इतर सर्व जबाबदाऱ्या स्त्रीच्या, असे काहीसे ते संस्कार!

दुर्दैवाने, आजही स्त्रीला एकटे जगायची (आर्थिक परिस्थिती व्यवस्थित असूनही) इच्छाच उरत नाही कारण तिला असुरक्षित वाटते, टोमणे नको होतात, चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे वाटते आणि किमान एक मायेचा स्पर्श / आधार / कुंकू नावाचे कवच हवेसे वाटतात. (हे पुरुषांचेही होत असेल हे तितकेसे मान्य केले जात नाही व पुरुषाकडे इतर अनेक मार्ग असतातच असे गृहीत धरले जाते).

या असमान सांस्कृतिक परिस्थितीमुळे किंवा भेदभावामुळे स्त्रिया नात्यांकडे कदाचित अधिक गांभीर्याने बघतात / बघत असाव्यात.

माझ्या मते , लग्न / नाती याकडे स्त्री आणि पुरुष दोघेही गांभीर्याने पाहतात किंवा दोघेही गांभिर्याने पाहणारे नसू शकतात.
स्त्री असो किंवा पुरुष त्याची लहाणपणापासूनची जडणघडण, संस्कार मैटर करतात कि ती व्यक्ती गांभीर्याने नातेसंबंधात कडे पाहते किंवा नाही. मला नाही वाटत कि हे जेन्डरवर अवलंबून असावे.