माझ्या आठवणीतली मायबोली- फारएण्ड

Submitted by फारएण्ड on 17 September, 2021 - 01:54

गणपती बाप्पा मोरया!

यावेळच्या उपक्रमातील इतरांनी लिहीलेल्या आठवणी वाचून मलाही माझी माबोवरची गेली १६ वर्षे बरीचशी आठवली.

मी मायबोलीवर आलो ते २००५ साली. इथे अमेरिकेत येउन ४-५ वर्षे झालेली होती. मराठी वाचायला मिळणे खूप अवघड होते. सकाळ, केसरी वगैरेंच्या साइट्स सुरू झाल्या होत्या पण त्यातही खूप वाचनीय फारसे नसे. इथले मित्रमंडळ बरेचसे अमराठी होते आणि जे मराठी होते त्यांच्याशीही गप्पांचे विषय सहसा वेगळे असत. मराठी वाचणे, मराठीतून आवडीच्या विषयांवर गप्पा, चर्चा या बाबतीत काहीतरी मिसिंग आहे असे सतत वाटायचे.

वास्तविक त्यावेळेस मायबोली जोरात होती असे नंतर समजले. पण मला माहीत नव्हती. मग एकदा अर्निका ने लिहीलेल्या एक चित्रकवितेची लिंक नातेवाईकांकडून आली आणि ती उघडल्यावर एकदम खजिना सापडल्यासारखे झाले. हे २००५ साली कधीतरी. सगळे वाचून काढले, आणि मग जे व्यसन लागले ते अजूनही उतरलेले नाही.

तेव्हा "जुनी मायबोली" होती. एकाच पानावर ट्री नॅव्हिगेशनने सर्व धाग्यांची नावे उलगडून दिसत. मग पाहिजे ते उघडायचे. मी नक्की कोठे पहिल्यांदा लिहीले ते लक्षात नाही. पण जुन्या मायबोलीत अशी सोय होती की तुम्हाला अक्षरे कशी उमटवायची कळाले की आख्खी पोस्ट टेक्स्ट फाइल मधे तयार करून मग पोस्ट केली तरी चालत असे. त्या वेळच्या काही फाइल्स मी शोधल्या आणि ही एक सापडली. ही बहुधा माझी पहिली पोस्ट असावी, कोणत्यातरी "ड्युएट्स" धाग्यावर Happy
namaskaar!
mee pahilyaa.ndaach liheet aahe. paN seemaachee ramesh dev shivaay gaaNee shodhaayachee mhaNaje traasach aahe.

अशी विचित्र रीतीने स्मॉलकेस व कॅपिटल मधे लिहीलेली वाक्ये असलेल्या अनेक टेक्स्ट फाइल्स अजूनही आहेत माझ्याकडे. ही तेव्हाच्या माबोवर कॉपी केली की बरोब्बर मराठीत उमटायची.

सुरूवातील काही चित्रपट विषयक धाग्यांवर मी थोडेफार लिहीले. पण वाचायचो जास्त ते "v&c" व "मला असे वाटले, तुमचे काय" वगैरे सारखे भाग. तेथे रोज भरपूर नवीन धागे उघडले जात. भरपूर चर्चा व वाद होत असत. सगळे आयडी रोमनमधे असल्याने त्यांच्या उच्चारांचे गोंधळ होत. टण्या ("टवणे सर") चा तेव्हाचा आयडी हा "तान्या बेडेकर" आहे असे समजून त्याला काही "मल मैत्रि करायला आव्देल" टाइप विनंत्या आल्या असतील नक्की. माझाही आयडी मला "फ्रेण्ड" घ्यायचा होता पण टायपो झाला असाही एक दोघांचा समज होता. ITGirl हा आयडी एकदम सुपरहिट होता. सर्वात जास्त विपु तिलाच आल्या होत्या बहुधा. सुरूवातीला काही दिवस तो विपु चार्ट दिसे. नंतर तो गायब झाला.

सचिन तेंडुलकरने कसोटीत ४९ वे शतक मारले तेव्हा काही दिवस मी माझा आयडी फोर्टीनाइनर असा बदलला होता. त्यावेळेस बे एरियात असल्याने सॅन फ्रान्सिस्कोच्या फोर्टीनाइनर या फुटबॉल टीम चा मी फॅन आहे असा अ‍ॅडमिनचा काही लोकांचा समज झाला होता.

एखाद्या पार्टीत किंवा मिटिंग मधे जाउन एकदम ताड ताड बोलण्याची आपली पर्सनॅलिटी नसल्याने सुरूवातीला एखाद्या विषयावर अगदी माहीत असले तरच लिहीत होतो. माबोवर लिहायला त्या विषयाबद्दल माहिती असावी लागते असा माझा तेव्हा समज होता. नया था मय. तेथे असलेल्या आयडींपैकी कोणाशी थेट बोलणेही झाले नव्हते. मग जवळजवळ एक वर्षानंतर मी माझे रंगिबेरंगी पान उघडले. एक दिवस अमिताभच्या गाण्यांचा विषय निघाला आणि माबो आयडी रार शी त्याबद्दल बर्‍याच गप्पा झाल्या. मग तिनेच ते लिहायला मदत केली व सुरूवातीच्या अनेक लेखांचे मुशो तिनेच केले. मग सुरूवातील इण्ट्रो, अमिताभची गाणी व रेल्वेगाड्या यावर लिहीले. तरी अधूनमधूनच लिहीत होतो.

त्यानंतर कधीतरी "जननी" हा चित्रपट बघितला व इतका वैतागलो की याबद्दल काहीतरी लिहावेच असे ठरवून त्यावर एक लेख लिहीला. त्याच वेळेस श्रद्धा, नंदिनी, दक्षिणानेही इतर चित्रपटांबद्दल लिहीले, आणि तेथून "चित्रपट: अचाट व अतर्क्य" असा एक विभागच वेमांनी उघडून दिला. तेथे श्रद्धा, मी व इतर अनेकांनी भरपूर लिहीले. स्पेसिफिक चित्रपटांव्यतिरिक्त एक जनरल धागाही होता. तेथे एकदम धमाल आली. मग ते नंतर नवीन माबोवरही चालू राहिले. त्याकाळात हमखास सुपरलोल कॉमेण्ट्स व लेख या भागात आले. ते अजूनही सुरू आहेच, आता पायसही धमाल भर घालतोय त्यात.

त्याच्या थोडे आधी बे एरियामधले लोक गटग करता भेटत आहेत असे समजले. तेथे महागुरू, सशल, कराडकर (मिनोती) आणि दीपांजली या चौघांना भेटलो ते बहुधा पहिल्यांदा भेटलेले माबोकर. तेथे सुरूवातीला आम्हीच ४-५ जण असायचो गटगांना. मग पुढे नवीन मेम्बर्स आले आणि मोठा ग्रूप तयार झाला. मग ते मीपुणेकर ने लिहीलेले गणपती उत्सवातील स्टॉल्स, एकत्र केलेल्या ट्रिप्स आणि असंख्य गटग बे एरियात झाली. २००९ साली मी पुण्यात गेलो असताना "वैशाली" मधे एक मोठे गटग झाले. तेच ते बहुचर्चित झक्की-रॉबिनहूड गटग. त्यानंतर २०११-१२ च्या सुमारास सुमारे वर्षभर पुण्यात असल्याने तेथेही असंख्य गटगला गेलो. बहुधा वेमा आले होते तेव्हा एक महाप्रचंड गटग झाले होते - तीन वेगवेगळ्या रेस्टॉ मधे शिफ्ट होत होत. मल्टिस्पाइस, विष्णूजी की रसोई, गंधर्व ई ठिकाणी बरीचशी झाली. त्यापैकी काहींचे वृत्तांतही लिहीले. तेथे असताना वर्षाविहारला जायचे मात्र राहिले. एकदा अटलांटाला गेलो असताना तेथील माबोकरांनी आवर्जून जमवलेले गटग मस्त झाले. आता बे एरियात नसलो तरी दरवर्षी किमान एक महागटग होतेच. एक दोन वर्षांपूर्वी ओसीआय च्या रिन्युअल बद्दल चर्चा जोरात होती तेव्हा सशल व अमित यांच्याकरता "Proud OCI holder" असे लिहीलेला केक एका गटग मधे कापला होता. तसेच मागच्या २-३ वर्षांत न्यू जर्सी मधली गटग धमाल झाली. गेल्या वर्षात २-३ व्हर्च्युअलही झाली.

सर्वात लांबलचक गटग म्हणजे मध्यंतरी रार काही दिवस आमच्या घरीच राहायला आली होती ते! मायबोली व इतर कॉमन विषयांवर असंख्य गप्पा तेव्हा झाल्या. माझ्या मायबोली वावराच्या आधीच्याही अनेक गोष्टी मला तेव्हा समजल्या Happy तेव्हा इथेही एक माबोगटग झाले होते, अंजली, मी व रार.

एकदातर भर पावसाळ्यात डोंबिवलीहून दादर व तेथून वेस्टर्न ने पार्ले असे करत पार्ल्यातील एका गटगला गेलो होतो. एकूण ज्या गावांमधे मी गटगला गेलो आहे ती लिस्ट केली तर: बे एरियातील बरीच , पुण्यातील विविध रेस्टॉरंट्स, अटलांटा, पार्ले, डोंबिवली, न्यू जर्सी, नॉर्थ कॅरोलीना मधे कॅरी व विविध माबोकरांच्या घरी झालेली इतकी आठवतात. आश्चिगला तर मी अ‍ॅनाहाइम (प्री-माबो ओळख), कुपर्टिनो, पॉलो ऑल्टो, एमरीव्हिल, एपेक्स नॉर्थ कॅरोलीना व पुणे इतक्या ठिकाणी भेटलो आहे (त्यात एक आश्चिग-पेशवे गटग आले पॉलो ऑल्टो मधले. तेथे माबोवरच्या गटगचा सरासरी आयक्यू अबाधित राहावा म्हणून मला पाठवण्यात आले होते Wink ) या डीटेल्स मधे सर्वांना इन्टरेस्ट असेल असे नाही हे माहीत आहे पण आठवणीतील माबोमधे हे सुद्धा आठवले.

मध्यंतरी मायबोलीने माध्यम प्रायोजन सुरू केले चित्रपटांचे तेव्हा मी पुण्यात असल्याने देऊळ, हा भारत माझा व इतर एक दोन चित्रपटांच्या प्रीमियरला जायला मिळाले. तेथे आधी न भेटलेले अनेक माबोकर भेटले. तेही अनुभव मस्त होते.

पुण्यात असताना सतत माबोकरांना भेटणे व्हायचेच. त्यावेळेस सर, मास्तर, साजिरा व मी आमच्या वेळा जमून आल्याने अनेक चित्रपट एकत्र पाहिले. आधी मास्तर कोणत्यातरी हेवी चित्रपटाला जाउ म्हणत होते. पण जनमत देल्ही बेली ला होते आणि तसेही मास्तर सर्वचित्रपटफॅन असल्याने त्यांचीही आडकाठी नव्हतीच. त्यावेळच्या चित्रपटांपैकी देल्ही बेली सर्वात आठवतो कारण हसून लोळलो होतो तो पाहताना. त्यानंतर साजिराची "डुलकळा" वही व त्यातील "लोग इश्क करते है शोक के साथ" हे शब्दश: असे लिहीलेला शेर वाचून पार्किंग मधे पुन्हा फुटलो होतो ते वेगळेच. माबोकरांबरोबर कॉमेन्ट्स मारत बघितलेले 'विश्वात्मा" व "गंगा जमुना सरस्वती" हे ही आठवतात. माझा फरिश्ते वरचा लेख काहवा का असे काहीतरी नाव असलेल्या रेस्टॉ मधल्या गट्ग मधे श्रद्धाने माबोकरांसमोर वाचला होता व त्यामुळे एरव्ही फक्त माबोच्या पानांवर दिसणारी लोकांची रिअ‍ॅक्शन तेव्हा मला थेट बघता आली. तेथे सुरूवातीच्या वाक्यापासून जो हशा पिकला होता तो अजूनही आठवतो.

त्याखेरीज कधीतरी बालगंधर्वच्या आवारात तिकिटे का काहीतरी माबोकरांना द्यायला जाणे वगैरे आठवते. तेथेही धमाल चाले. काही ऑल नाइट गटग वगैरेही. एकदा इतर काही न मिळाल्याने गटगला द्राक्षे घेउन गेलो होतो ते आठवते. लोक सहसा द्राक्षांपासून बनणारे पदार्थ नेतात.

हे सगळे मायबोली साइटवरचे नाही पण मायबोलीवरच्या ओळखींमुळेच हे सगळे जमून गेले! या सगळ्या भन्नाट आठवणींचे मूळ मायबोली ही साइट आहे!

गप्पांच्या वाहत्या पानांवर पूर्वी मी अनेक धाग्यांवर फिरत असे. २००८-०९ ची सात्विक बेकरी ते २०१४-१५ ची "९८" बेकरी हा "विजय ते विजयानंद" प्रवास Wink , पार्ले बाफ व त्यातून निघालेला टीपापा, पुण्यातले पुणेकर ("पुपु") या तीन धाग्यांवर सर्वात जास्त. त्याखेरीज अड्ड्यावरच्या भाजप/हिंदुत्त्ववाद विरोधी व कट्ट्यावरच्या दुसर्‍या बाजूने असलेल्या राजकीय चर्चा, जुन्नर सारखे अधूनमधून जागे होणारे धागे, कुवेत चा धागा धावत असे तो काळ, अधूनमधून कोथरूड वर कोणी उगवत असे. या धाग्यांवर काही विशिष्ठ शब्द प्रचलित होते. पुपु चा "वाडा" सकाळी उघडत असे कोणीतरी "दिंडी दरवाजा उघडला आहे" अशी वर्दी देत, बे एरियाची बेकरी झाली, कुवेत ची अथकगुरूजींची शाळा असे व तेथे लोक संध्याकाळी "शब्बा खैर", "आता खैर्‍यांच्या शब्बेला भेटतो/ते" वगैरे म्हणत. बेकरीवर सशल भल्या पहाटे एखादे गाणे लिहीत असे, ते किंवा काही वर्षांनी प्रचलित झालेला "९८चा साप" व एकूणच ९८ आकड्याचा संदर्भ, पुपुवरची अरूण ची ८० पानी वही, साजिर्‍याचा डुल़कळा, "सर, मास्तर, गुरूजी" हे त्रिकूट, स्लर्टीच्या कविता, टीपापावरची "बस", किंवा उपस्थितांना बरोबर समजणारे "ते आपले हे" चे संबोधन आणि सर्वात भारी म्हणजे मैत्रेयीने तेथील चर्चांवर वेळोवेळी काढलेली मैचित्रे हे सगळे त्या त्या वेळेस तेथे असलेल्या लोकांना आठवेल.

यातील बर्‍याच धाग्यांवर नवोदितांचे स्वागत होत असे. पण पुपु व पार्ले/टीपापा त्याबाबतीत एकदम वेगळे. एखाद्या कंपनीत्/ठिकाणी बरीच वर्षे असलले मुरलेले लोक जसे इन्साइड जोक्स मारत गप्पा मारतात तसे तेथे चाले/चालते. तुम्ही एकदम त्या वेव्हलेंथवर लिहीलेत तर त्याला प्रतिसाद मिळे. काहीतरी इण्ट्रो टाइप खडा टाकल्यासारख्या पोस्टी टाकल्यात तर कोणी विचारत नसे. ते इतर लोकांना आवडायचे नाही हे क्लिअर होते. आपल्याला त्या धाग्यांची फिकीर नाही हे लोक आवर्जून लिहीतात ही त्या धाग्यांबद्दल एक पोचपावतीच आहे.

त्यातून मग या धाग्यांच्या विरोधात किंवा विद्रोहात इतर काही वाहत्या पानांचे धागे निघाले. पण काही महिन्यांनी तेथेही लोक मुरले व तेथे नव्याने येउ पाहणार्‍या लोकांच्या उडवल्या गेलेल्या खिल्लीबद्दल केलेल्या तक्रारी मी वाचल्या आहेत. हे एक अ‍ॅनिमल फार्म पुस्तकातल्यासारखेच आहे.

मी बहुतांश क्रिकेट व सिनेमा यावर लिहीले आहे. मला सर्वात मजा येते ते अचाट चित्रपटांबद्दल लिहीताना व वाचताना, आणि वाहत्या बाफवर काही मजेदार चर्चा सुरू असेल तर त्यात भर घालताना. सकाळी उठल्यावर अजूनही माबो पहिल्यांदा उघडतो व असे काही आहे का ते शोधतो. त्याखेरीज राजकीय/सामाजिक चर्चा असल्या तर तेथे, आणि मग काही नवीन लेख वगैरे असतील तर. कोणत्या प्रकारच्या बाफवर किती प्रतिक्रिया असणे नॉर्मल आहे याचा एक अंदाज तयार झालेला आहे. त्यापेक्षा वेगळे काही दिसले तर हमखास तेथे खमंग काहीतरी असते हे ही माहीत झालेले आहे. म्हणजे एखाद्या बाळबोध कवितेच्या शीर्षकाच्या धाग्याला एकदम १०० प्रतिसाद दिसणे वगैरे. खरे म्हणजे आजकाल १००+ प्रतिसाद कोठेही दिसले तरी आत काय असेल याचा अंदाज येतो.

गेल्या काही वर्षांत काय बदलले याचा विचार केला तर मला नेहमी जाणवते की साधारण २०१० च्या सुमारास माबोवर अनेक दिग्गज लिहीत. गप्पांचे धागेही जोसात वाहात असत. मग काहीतरी कारणांनी लोक एकमेकांपासून दुरावले. क्वचित काहींची थेट भांडणेच झाली पण बहुतांश लोकांचे अगदी किरकोळ गैरसमज, एखाद्या बाफवरचा वाद असल्या फुटकळ कारणांवरून लोक एकत्र लिहीनासे झाले, काही एखाद्या स्पेसिफिक बाफवर जायचे थांबले, काही मायबोलीवरूनच बाहेर पडले. यातल्या अनेकांशी अजूनही माझे संबंध आहेत. पूर्वी कधी त्यांच्याकडूनच ऐकलेल्या माहितीवरून हा अंदाज लावला आहे, की प्रत्यक्षात असे होण्याइतके काहीही झालेले नाही. अ ने लिहीलेल्या पोस्टीचा अर्थ ब काढतो/काढते, किंवा अ ही व्यक्ती ब ला क बद्दल काहीतरी सांगते, आणि क ला थेट न विचारता अ त्याबद्दल काहीतरी समज करून घेतो/घेत असले प्रकार इतके ऐकलेले आहेत! २०१० च्या आसपासच्या चर्चांचे बाफ उघडले तर जे असंख्य लोक एकमेकांशी बोलताना दिसतील त्यावरून हे लक्षात येइल.

याउलट माबोवर वचावचा भांडणारे लोक प्रत्यक्षात एकत्र भेटले की त्यांना नक्की कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे समजत नसावे. त्यामुळे तेथे एकमेकांशी प्रेमळपणे/नॉर्मल बोलतात व अनेकदा नंतर त्यांचे संबंध सुधारतातही, असेही दिसले आहे.

याव्यतिरिक्त काही मजेदार पॅटर्न्स गेल्या काही वर्षांत दिसले आहेत. नेहमी संयत प्रतिक्रिया देणारा आयडी एखाद्या लेखावर अचानक खवचट लिहीतो. मग त्याबद्दल समजते की या दोघांचा इतरत्र कोठेतरी वाद झाला होता त्याचे हे पडसाद आहेत. काही आयडी कोणत्याही लेखावर कसलीही सकारात्मक तर सोडा पण किमान रिलेव्हंट प्रतिक्रिया न देता काहीतरी तिसरेच लिहीतात. काही विषयाशी संबंधित पण लेखाशी संबंधित नसलेले काहीतरी लिहीतात, तर काही जिकडे तिकडे स्वतःची टिमकी गाजवत फिरतात. काही माबोवर रुसून इतर साइटसवर जातात पण तेथे ती मजा नाही असे दिसल्यावर परत माबोवर येतात. राजकीय वाल्यांचे आणखी मजेदार - काहीतरी असांसदीय लिहीतात, मग आयडी उडाले की म्हणतात मायबोली वर आपल्या मतांना स्थान दिले जात नाही. एकदा तर हिंदुत्त्ववादी व हिंदुत्त्ववाद-विरोधी अशा दोन आयड्यांनी एकाच वेळी ही तक्रार केलेली वाचली आहे. यातून सुचलेल्या मौलिक गाइडलाइन्स इथे लिहीलेल्या आहेतच Happy

आणखी एक दोन मजेदार पॅटर्न्स गेल्या काही वर्षांत दिसलेत- स्वतःच्या ब्लॉगवर प्रामुख्याने लिहीणार्‍या एखाद्या व्यक्तीला मायबोली ही साइट सापडते. मग एक दिवस धुमकेतू सारखे येउन दहा बारा लेख, कविता वगैरे ते टाकतात. सकाळी माबो बघावे तर जिकडे तिकडे यांचेच नाव. अनेकदा हे लेख चांगलेही असतात पण एकदम अजीर्ण झाल्यासारखे होते. यातले अनेक लोक इतरांच्या धाग्यावर काहीतरी भरीव प्रतिक्रिया वगैरे देताना दिसत नाहीत. उगाच "छान आहे सर" टाइप काहीतरी लिहून जातात, आणि मग गायबच होतात.

दुसरा पॅटर्न म्हणजे लेख किंवा कविता टाकून त्यावर दिवसभर दबा धरून बसलेले लोक. पहिली प्रतिक्रिया आली, की लगेच "धन्यवाद तुमचे", पुढची आली की तेच पुन्हा. अरे जरा विश्रांती घ्या, १५-२० लोकांना तुमचा लेख वाचू दे असे सांगावेसे वाटते अशा लोकांना. यातही प्रकार आहेत. प्रत्येक प्रतिक्रियेला लगेच अ‍ॅकनॉलेजमेण्ट देणारे ही एक लेव्हल. त्यानंतर त्या अ‍ॅकनॉलेजमेण्ट बरोबर ती प्रतिक्रिया माझ्या दृष्टीने कशी महत्त्वाची आहे याचे विवेचन करणारे. म्हणजे तुम्ही नुसती "छान" प्रतिक्रिया दिलीत, तरी "धन्यवाद सर, आवर्जून दिलेल्या प्रोत्साहनातून तुमच्या रसिक गुणग्राहकतेची खात्रीच पटली" इथपर्यंत पोहोचणारे

आता संयोजकांनी दिलेले प्रश्नः

तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
- हे वरती बहुतांश आलेले आहे. जुन्या मायबोलीची नवी मायबोली झाली. त्यालाही १३ वर्षे झाली. जाहिराती आल्या. मोबाईल सपोर्ट आला (आणि ब्राउजर वरचे लेखन जरा गंडले Wink ). सुरूवातीला कदाचित अमेरिकेत असलेले सेण्टर ऑफ मास बहुधा भारतात हलले - आता माझ्या अंदाजाने भारतातून जास्त लोक येतात माबोवर.

इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
- मायबोलीवर गावांप्रमाणे जी गप्पांची वाहती पाने आहेत त्याची मजा इतर साइटसवर नाही. ही सोय मला सर्वात आवडते.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
- आठवत नाही. म्हणजे कदाचित अजूनही माहीत नसेल Happy

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
- असंख्य मित्रमंडळी, गेट टुगेदर्स. आणखी महत्त्वाचे म्हणजे परदेशात आल्यावरही मराठीशी घट्ट राहिलेले संबंध. इतकेच नव्हे तर मराठी भाषेबद्दल, महाराष्ट्रातील व भारतातील संस्कृती, परंपरा वगैरेंबद्दल आधीसुद्धा नव्हती इतकी माहिती झाली. राजकीय व सामाजिक चर्चा व वादांमधून अनेक गोष्टींची दुसरी बाजू समजली व आधीच्या तुलनेत बरीच प्रगल्भता आली. मायबोलीवर यायच्या आधी घरातील वावर व बोलणे सोडले तर दैनंदिन जीवनात मराठी विश्वाशी फार संबंध राहिलेला नव्हता, तो मायबोलीमुळे पुन्हा जुळून आला. माझ्यासारख्यांकरता मायबोली हे "दोन घटका विरंगुळा" वगैरे नाही. ती आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहे. अजूनही माझ्या कॉम्प्युटरवर पहिली उघडली जाणारी साइट मायबोलीच असते.

तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
- इथे संयोजकांनीच परमिट दिले आहे स्वतःची टिमकी गाजवायला Happy तेव्हा विनय वगैरे न बाळगता लिहीतो - "निखळ विनोद". तो आधी नव्हता असे नक्कीच नाही पण मी त्यात भरपूर भर घातली आहे. चित्रपटांवरचे लेख, वाहत्या पानावरच्या गप्पा यातून अनेक लोकांना अनेक वेळा हसवण्याचे श्रेय मी नक्कीच घेउ शकतो. आणि ते करताना Humor should be about what people choose to do, not about what people are हे तत्त्व हे कटाक्षाने पाळले आहे. अचाट चित्रपटांबद्दलच्या लेखांबद्दलही मी हा क्लेम करू शकतो, कारण वेळोवेळी लेखातून मी कोणते विनोद वगळले आहेत ते मला लक्षात आहे.

तुमचं कुठलं लेखन गाजलं,
सिनेमा, क्रिकेट, रेल्वे हे माझे सर्वात आवडते विषय. त्यामुळे त्यावरच मी जास्त लिहीले आहे.

माबोवर एखादा लेख किती लोकांनी वाचला ते आपल्याला कळत नाही. पण मिपावरची संख्या मोजली, तर तिरंगा, परदेस, फरिश्ते आणि मोहब्बते हे चारच लेख धरले तरी त्यां चार लेखांची मिळून सुमारे ५० हजार वाचने झाली आहेत. माबोवर किमान तेवढी तरी नक्कीच असतील. यातील किमान अर्ध्या लोकांच्या चेहर्‍यावर हास्य उमटण्याचे श्रेय मी घेउ शकतो. त्याखेरीज इतर लेख आहेतच. अनेकदा मला इमेल व इतर माध्यमांतून लोकांनी हे लेख आवडल्याचे आवर्जून कळवले आहे.

सिनेमाव्यतिरिक्त क्रिकेटवरचे लेखही लोकांना खूप आवडले. बरेचसे लेख मी ड्राफ्ट मधे लिहून काही दिवस मुरवून मग पोस्ट केले आहेत. पण व्ही व्ही एस लक्ष्मणवरचा "व्हेरी व्हेरी स्पेशल" हा लेख त्याने जेव्हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध एक मॅच जिंकून दिली तेव्हा लगेच एकाच बैठकीत लिहून पोस्टही केला होता. तो ही लोकांना खूप आवडला.

आश्चिगशी गप्पा मारताना एकदा विषय निघाला होता की असे लेख हे डोक्यात योग्य उपमा येण्यावर अवलंबून असतात त्यामुळे त्या सुचतील तेव्हाच ते लेख लिहीता येतात. पण तो म्हंटला होता की अशा पद्धतीचे लेखही ठरवून लिहीता येतात. तसा प्रयत्न करून क्रांती चित्रपटावरचा लेख लिहीलेला आहे.

राजकीय विषयांवर मी धागे फारसे उघडलेले नाहीत पण भारताच्या फाळणीबद्दल एक पुस्तक वाचून त्याबद्दल लिहीलेल्या लेखाला बराच प्रतिसाद मिळाला.

कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
- हा उद्योगही मी केलेला आहे याची मला कल्पना आहे Happy पूर्वी वाद घालताना कधीकधी अजिबात मागे न हटता मी मुद्दे रेटत राहात असे. नंतर असे लक्षात आले की जेव्हा बाकीचे लोक गप्प होत जातात आणि एक दोन जणच मैदानात लढत राहतात तेव्हा ते पकाऊ होत जाते व इतरांना त्यातील न्युआन्सेस मधे इंटरेस्ट राहात नाही. काही वाद बाहेरून बघितल्याने ते लक्षात आले व मी तसे करणे बंद केले. पण पूर्वी अनेकदा केलेले आहे Happy

आशा करतो की हा लेख या वरच्या कॅटेगरीत येणार नाही. संयोजकांचे या वेळेस खूप कल्पक उपक्रमांबद्दल अभिनंदन व आभार. मायबोलीलाही पुढच्या २५+ वर्षांकरता शुभेच्छा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फारएण्ड
तिरंगा, परदेश, मोहब्बते सारख्या लेखांचे असंख्य उपकार आहेत माझ्यावर.
तिरंगा ची सवय मुलीला पण लावलीय.
तेथे आणि एका आयडीने(यानेच खुर्चीवर पाय वर ठेवून बसून तन डोले मेरा मन डोले फ्ल्यूटवर वाजवणार्या दादाची गोष्ट पण लिहिली होती) गवताचा धूर करून मिसाईल बनवायची कृती लिहिली होती ती अजून आठवतेय Happy
हे लेख, श्रद्धा चा नागिन वाला लेख हे सर्व जमेल तेव्हा परत परत वाचत असते.
(अवांतर: क्रिकेट मधले फार कळत नसल्याने तुमचे क्रिकेट वाले लेख वाचत नाही, पण क्रिकेट ची आवड तुम्हाला असावी इतके कळते.)

मस्त!
तुमचे अ आणि अ चित्रपटांवरचे लेख, ठोकळेबाजपणाविरुद्ध चळवळ, मुद्देवंचितांसाठी खूषखबर , चित्रपटीय व्याख्या असे किती तरी लेख क्लासिक विनोदी आहेत. अचाट आणि अतर्क्य चित्रपटांवर लिहिणे ही बहुतेक मायबोलीचीच खासियत असेल. इतर कधी कुठे असं लेखन वाचायला मिळत नाही.
सचिननामा ही मालिकाही मला खूप आवडली होती. इतरांच्या लेखांवरही तुम्ही आवर्जून प्रतिसाद देता तेही आवडतं.

मस्त लिहीलयस फा!

चित्रपटांवरचे लेख, वाहत्या पानावरच्या गप्पा यातून अनेक लोकांना अनेक वेळा हसवण्याचे श्रेय मी नक्कीच घेउ शकतो. आणि ते करताना Humor should be about what people choose to do, not about what people are हे तत्त्व हे कटाक्षाने पाळले आहे. >>> याबद्दल तर तुला १०० मार्क्स नक्कीच Happy

याची काही उदाहरणे तर या लेखात पण सापडतील. उदा. "विजय ते विजयानंद" प्रवास Lol

स्मरणरंजनात्मक लिखाण आवडले.
एका गटगाला तू आणलेली वेगवेगळ्या फ्लेवर्सची चॉकलेट्स खूप आवडली होती परत कधी येणारेस Happy

होय ते "विजय ते विजयानंद" खूपच आवडलेय

मस्त लिहीले आहेस.

तुझ्या लेखांनी खरच बरेचदा मुड बना दिया टाईप घडून, इतर कुठल्या कारणाने आलेला वैतागमोड गायब करुन हसायला मस्त निमित्त पुरवले आहे

Friend चं फारएंड झालं वगैरे मजेशीर किस्से. आत्ताही तसे होते कधी ऑटो करेक्ट फिचर मुळे...
खूप सुंदर अनुभव शेअर केले त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद.
तुमचं लिखाण मला वाचायला हवं... कदाचित सिनेमा, क्रिकेट आदी कमी आवडतं म्हणून फार‌एंडलाच राहिलं...आता मलाच पर्वताकडं जाणं भाग आहे.
खूप धन्यवाद ... अगदी मनापासून लिहिलंय हे क्षणाक्षणाला जाणवलं.
तुमचं रसवंतीगृह गोड आहे... रसपान करायला हवं.

Friend चं फारएंड झालं वगैरे मजेशीर किस्से. आत्ताही तसे होते कधी ऑटो करेक्ट फिचर मुळे...
खूप सुंदर अनुभव शेअर केले त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद.
तुमचं लिखाण मला वाचायला हवं... कदाचित सिनेमा, क्रिकेट आदी कमी आवडतं म्हणून फार‌एंडलाच राहिलं...आता मलाच पर्वताकडं जाणं भाग आहे.
खूप धन्यवाद ... अगदी मनापासून लिहिलंय हे क्षणाक्षणाला जाणवलं.
तुमचं रसवंतीगृह गोड आहे... रसपान करायला हवं.

छान लिहीलंयत. मायबोलीच्या युजरनेमचे शॉर्ट फॉर्मस पण बऱ्याच जणांचा फेमस आहेत त्यापैकी तुम्ही एक आहात. तुमचं नाव फा म्हणून च जास्त लक्षात आहे. तसाच उल्लेख बऱ्याच धाग्यावर असतो.

छान लिहिलं आहेस.

कोणत्याही धाग्यावर तुझा प्रतिसाद असेल तर आवर्जून वाचला जातो. तुझ्या सूक्ष्म विनोदबुद्धीची मी जबरदस्त फॅन आहे. पु.लं.ची वाक्यं तू अगदी नेमक्या जागी टाकतोस ते पण मला फार आवडतं.

पूर्वी तुझा रोमन आयडी farend पाहिला तेव्हा क्रिकेटमधलं pavilion end आणि far end हेच आधी आठवलं. तू क्रिकेटप्रेमी असल्याने असा आयडी घेतला असशील असं तेव्हा वाटलं. अजूनही माझी तीच समजूत कायम आहे.
या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे Proud तुला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

मस्त लेख.

मी तुमचे सर्व लेखन परत परत वाचले आहे. काही काही वेळा तुमच्या प्रोफाईल मधे जाउन तुमचे सर्व लेख लागोपाठ वाचले आहेत.
तुमचे अ आणि अ चित्रपटांवरचे लेख, ठोकळेबाजपणाविरुद्ध चळवळ, मुद्देवंचितांसाठी खूषखबर , चित्रपटीय व्याख्या, सचिननामा सर्व भयंकर आवडलेले आहे.

तुमच्या बर्‍याच लेखांमधे एखाद्या स्टँड अप कॉमेडीचा पूर्ण सेट होऊ शकेल ईतके मटेरिअल आहे. तुम्ही तुमच्या एखाद्या लेखाचा किंवा दोन तीन लेखांचा मिळून एक स्टँड अप सेट रचून तो माबोच्या युट्यूब चॅनल वर टाकला तर जाम मजा येईल.

वरच्या सगळ्या पोस्टिना...करोडो अनुमोदन.
अफाट लिहिता तुम्ही....खूप खूप हसवलं आहे तुमच्या चित्रपटाच्या धाग्यांनी...

सुरेख लेख!
तुमचं नाव फा म्हणून च जास्त लक्षात आहे. तसाच उल्लेख बऱ्याच धाग्यावर असतो.>>>>+१.

वरच्या सगळ्या पोस्टिना...करोडो अनुमोदन.
अफाट लिहिता तुम्ही....खूप खूप हसवलं आहे तुमच्या चित्रपटाच्या धाग्यांनी... >>>> +१ आणि हो रेल्वेबद्दलची माहिती व आपुलकी फार आवडते.

फारच मस्त! माबोवरचे पॅटर्न्स - एकदम फा स्टाइल.
तुझ्या निखळ विनोदाच्या कॉन्ट्रिब्यूशन बद्दल +१११११. चित्रपट , क्रिकेटवरचे लेख हे तर निर्विवाद धमाल आहेतच पण ते ठोकळेबाज उपमा आणि मुद्देवंचितांचा लेख, हेही पुन्हा पुन्हा रेफर केले जातात Happy वाहत्या बाफावर फ्रेन्ड्स मधल्या अ‍ॅप्ट लिन्का आणि पुलं च्या लिखाणातले दृष्टान्त फार मजा आणतात.
तुझी कोणतीही कमेन्ट कधी पातळी सोडलेली किंवा पर्सनल लेवल ला गेलेली दिसली नाही. माबोवर सगळिकडे वावरून पण कोणत्याच कंपूने ज्याला कधीच ब्लॅक लिस्टीत टाकलेले नाही असे दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणजे फा Happy

मस्त लिहिलं आहेस फा.
माझ्या डोक्यात फा टेस्ट पक्की झालेली आहे. वाहत्या बाफंवर जोक केला आणि फा उपस्थित असुनही हसला नाही म्हणजे जोकची पातळी बहुतेक घसरली आहे समजावं. त्याच्याकडून जोक साधारण मिस होत नाही, आणि झाला असेल तर ताबडतोब दाखवुन दिली की एक हशा मिळतोच. फा प्रत्येक जोकला वेगळा हसतो. म्हणजे हसत सारखाच (म्हणजे सतत वालं सारखा नाही Wink )असेल पण तरी वेगळी अ‍ॅक देऊन हसतो. नॅक सहसा मिळत नाही, पण फा ने इग्नोरावे इतके वाईट जोक करू नये ही एक पातळी पाळायची. Proud
>>तेथे माबोवरच्या गटगचा सरासरी आयक्यू अबाधित राहावा म्हणून मला पाठवण्यात आले होते >> हे पण टोटल फा टच वाक्य आहे. Proud
आणखी एक म्हणजे फा प्रत्येक गटगला काहीतरी घेऊन येतो. मग बफेलो सॉस पासून केक पर्यंत जे काही स्पेशल असेल ते आवर्जुन सगळ्यांसाठी आणतो.
छान आढावा घेतला आहेस. वरच्या मैच्या पोस्टला +१ मजा आली वाचुन.

>>>>>>>दुसरा पॅटर्न म्हणजे लेख किंवा कविता टाकून त्यावर दिवसभर दबा धरून बसलेले लोक.

आई ग्ग!!! काय नीरीक्षण आहे हो फारेन्ड. कशी ही विसंगती टिपून ठेवता? म्हणजे हे आम्हीही वाचतो पण असे मजेशीर मांडता येतच नाही. नॅक आहे ही. कला आहे.

खरं तर कोणी स्तुती केली की कॉन्शस व्हायला होतं. आणि त्यातून भर्र्कन ' थँक यु - थँक यु- धन्यवाद' जातं. मला तरी फार कॉन्शस व्हायला होतं. जालावर आल्याआल्या तोंडावर जबरदस्त आपटलेले असल्यामुळे, अशी लाडाची सवय नाही - हेही कारण आहे त्यापाठी.

>>> seemaachee ramesh dev shivaay gaaNee shodhaayachee mhaNaje traasach aahe.
>>> माबोवर वचावचा भांडणारे लोक प्रत्यक्षात एकत्र भेटले की त्यांना नक्की कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे समजत नसावे. त्यामुळे तेथे एकमेकांशी प्रेमळपणे/नॉर्मल बोलतात
>>> माबोवरच्या गटगचा सरासरी आयक्यू अबाधित राहावा म्हणून मला पाठवण्यात आले होते
Lol

तुझा विनोद निखळ/निर्विष असतोच, पण त्यासाठी सुस्पष्ट विचार आणि मांडणीचा बळी दिलेला नसतो हे कौतुकास्पद आहे!! स्पष्टवक्तेपणा म्हणजेच फटकळपणा आणि विनोदी म्हणजे गुळमुळीत - या स्टीरिओटाइप्सना सातत्याने छेद देण्याबद्दल अभिनंदन! Happy

वर कुठल्याश्या जीटीजीला चॉकलेट्स नेल्याचं वाचलं. आम्हाला मात्र टेक्सस पीटचा हॉट सॉस मिळाला होता - यावरून प्रेक्षकांची नस ओळखायचं कसब दिसून येतं असं म्हणून मी मनाचं समाधान करून घेत आहे. Proud

रामराम फारएण्ड. जुन्नरचा आवर्जून उल्लेख केल्याबद्दल अनेक धन्यवाद. आपली पहिली ओळख तिकडेच झाली. प्रत्यक्ष भेटीचा कधी योग आला नाही परंतु तुमच्या अफाट वाचनीय लिखाणामुळे तुम्ही फारच जवळचे आहात. मायबोली आढावा आवडला. तुमच्या मायबोलीवरील एकूण लेखांचे शतक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

कुठल्याश्या जीटीजीला चॉकलेट्स नेल्याचं वाचलं. आम्हाला मात्र टेक्सस पीटचा हॉट सॉस मिळाला होता >>> Lol
आम्ही तो खूप दिवस पुरवून वापरला. त्यात त्या दिवशी कुणीसं न आल्यामुळे त्यांची बाटलीही मला मिळाली असंही अंधुक आठवतंय Happy

मस्त!
अफाट लिहिता तुम्ही....खूप खूप हसवलं आहे तुमच्या चित्रपटाच्या धाग्यांनी...>>+१

जुन्या माबोवरच्या लिंक्स दिल्याबद्दल धन्यवाद! अमिताभची गाणी, जननी हे दोन वाचले. Lol ( स्माईली जननीसाठी आहे. )

चित्रपटविषयक लिखाणासाठी मी चाहता आहेच. श्रद्धा आधीपासून लिहीत होत्या हे नवीन समजले. मला असे वाटत होते कि अचाट चित्रपटांचे श्राद्ध घालण्याची सुरूवात फारएण्डने केली असेल. अजून बहुतेक स्वप्ना त्या काळी लिहीत असाव्यात. अजून दोघे तिघे छान लिहीत असत. नावे शोधून काढण्याइतका उत्साह नाही. अलिकडे या विषयावर फारएण्ड पद्धतीने लिहीणारे आढळत नाहीत. काहींच्या लिखाणात वैताग किंवा चीड जाणवते मग त्यातला रस निघून जातो.

फारएण्ड पद्धती ही बुद्धासारखी निर्विकार पण पिसं काढणारी आहे. चार पाच लेखांचे पुस्तक काढले तर नक्कीच चांगले होईल . पुस्तक काढा असे म्हणत नाहीये. फेसबुकवर तुमच्या पोस्टींचे पुस्तक काढू म्हणणारी एक जमात असते. (काढू म्हणजे तुमचे तुम्हीच काढा, पण मी तुमचा नंबर वन फॅन आहे हे लक्षात ठेवा असा गर्मितार्थ त्यात असतो). कणेकरी , माझी फिल्लमबाजी सारखे शो ज सुद्धा होतील त्यावर.
माबोचा आढावा आवडला. काही गोष्टी माहिती नव्हत्या.

मस्त आणि अस्सल ऐतिहासिक आढावा.
तुमचे चित्रपटांवरचे लेख तुमच्यासारखा अस्सल आणि अट्टल चित्रपटवेडाच लिहू जाणे..
क्रिकेट वरचे लेख, टिका टिप्पण्या आवडतात.
लिखाणाचं सार्थ श्रेय हक्काने घेतलेलं आहे, हे ही आवडलं.

फा, भारी आढावा! वाचायला मजा आली.
तुझ्या लेखांनी आणि प्रतिसादांनी खरोखरच माबोवरच्या निखळ विनोदाची योग्य ती (पक्षी:उत्तम) पातळी राखण्यात मोठी भुमिका बजावली आहे! याबाबत तुझे विचार वाचून खूप छान वाटलं.

खूप छान आढावा. तुमचा कुठलाही बाफ उघडला की कधीच निराशा होणार नाही काहीतरी छान मग ते विनोदी असो अथवा गंभीर वाचायला मिळेल याची खात्रीच असते.

Pages