Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
farend
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती

Hitguj » Rangiberangi » Members A-N » farend « Previous Next »


श्री गणेशाय नम:


कोणत्याही विहीत नमुन्याच्या अर्जाची मूळ प्रत न लावता, शैक्षणिक पात्रता,अर्हता वगैरे शब्द न वापरता इथे मेंबर तर झालो. आता पुढे काय करायचे? हा त्या 'फ़ाईंडींग नीमो' चित्रपटांत शेवटी पिशव्यात बसून ते मासे रस्ता क्रॉस करून समुद्रात येतात त्यानंतर त्यांना पडतो तसा काहीसा प्रश्न मला पडला आहे.
बघू! काहीतरी नक्कीच सुचेल.

इथे इतक्या दिग्गजांनी प्रत्येक विषयावर इतके सुंदर लिहून ठेवले आहे की आता त्यात आणखी काय भर घालणार असा प्रश्न पडलाय. मला पूर्वी पाहिलेले एक बालनाट्य आठवले... त्यात एका मुलाला शास्त्रज्ञ व्हायचे असते, पण 'सगळ्या लबाड शास्त्रज्ञांनी आधीच सगळे शोध लावून ठेवले आहेत' असे तो नाराजीने म्हणतो...
माझंही तसंच काहीसे झाले आहे.

पण खुद्द पु लं नीच राजहंसाच्या चालण्याची उपमा 'असा मी असामीत' देऊन आमच्यासारख्यांना 'परमीट' दिले आहे, तेव्हा थोडी लुडबूड करतो आहे, ती वाचकांनी गोड मानून घ्यावी आणि चूक असेल तिथे दुरूस्त करावी ही विनंती.


"ये दोस्ती हम नही छोडेंगे" हे गाणे अमिताभ आणि धर्मेन्द्र नी गायलेलं नाहीये, ते महमंद रफ़ी ने गायलेय" असे माझा मित्र म्हणाला आणि मी
उडालोच.
आता याच्या तपशीलात चूक असली तरी 'तेव्हा' ते माहीत नव्हते.
ही गोष्ट आम्ही ८-१० वर्षाचे होतो तेव्हाची आहे. त्यावेळी अमिताभ त्याची गाणी स्वत: गात नाही हे आमच्या दृष्टीने नवीन होते. नशीब! तेव्हा तो मारामारीही स्वत: करत नाही हे आम्हाला अजून कळले नव्हते. अभिनय वगैरे तेव्हा फारसे कळतही नव्हते. पण अमिताभ ची जादूच अशी होती की आम्ही तरीपण त्याचे चित्रपट बघायला गेलोच असतो.
आणि तो गात नाही हे आम्हाला कळेपर्यंत तो खरोखरच गायला(ही) लागला होता.

खरंतर सुरुवातीला जेव्हा अमिताभ गाजू लागला तेव्हा त्याला फारशी गाणी नसायची. हे म्हणजे त्याचे जेव्हा खास 'अमिताभ' स्टाईल चे चित्रपट गाजू लागले तेव्हा एखादे तुरळक 'कभी कभी' मधले गाणे सोडले तर 'ज़ंजीर', 'दीवार', 'शोले', 'नमक हराम', वगैरे चित्रपटांत त्याला अगदी अपवादानेच गाणी असत.
त्यामुळे अमिताभसाठी कोणत्या पार्श्वगायकाचा आवाज आहे? असा प्रश्नच नव्हता.
त्याआधीच्या काही चित्रपटांत त्याला गाणी होती, पण ते जुन्या वळणाचे चित्रपट होते: 'एक नज़र', 'अभिमान' इत्यादी.
यश चोप्राच्या 'त्रिशूल', 'काला पत्थर' मधे सुद्धा त्याच्या वाट्याला एखादेच एखादेच कडवे आले.

पण नंतर किशोरची गाणी 'अमर अकबर अंॅथनी', 'परवरीश', 'डॉन' पासून येऊ लागली आणि मग अमिताभ-किशोर हे एक पक्के समीकरण झाले. किशोरचा आवाज अमिताभच्या व्यक्तिमत्वाला अगदी फिट्ट बसायचा (आणि मला वाटते यात किशोरचे कौशल्य जास्त आहे. याचे आणखी चांगले वर्णन 'योग' च्या बीबीवर ऑगस्ट ४, २००५ च्या लेखात आहे.) आणि त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची अमिताभची गाणी फेमस झाली. कोणतीही हीरॉईन बरोबर नसताना, कसलाही रोमंॅटिक पणाचा लवलेश नसताना ही अमिताभची एकट्याची किंवा दुसर्‍या एखाद्या हीरोबरोबरची गाणी जितकी गाजली तितकी त्याआधी किंवा नंतर कोणाचीही गाजली नसतील. 'अरे दीवानो मुझे पहचानो','खैके पान बनारसवाला','रोते हुए आते है सब','हम प्रेमी प्रेम करना जाने','बने चाहे दुश्मन जमाना हमारा','अपनी तो जैसे तैसे','तेर जैसा यार कहॉ','पग घुंगरू' ही अशी काही गाणी.

तेव्हा किशोरची ही दुसरी इनिंग्ज चालू होती आणि अमिताभच्या बहूतेक चित्रपटांतल्या 'मैत्री' वगैरेच्या गाण्यात किशोरचा आवाज अमिताभला असायचा आणि बिचारे विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रूघ्न वगैरेंना थोडा दुय्यम रोल त्या गाण्यात मिळायचा. याला अपवाद म्हणजे 'ये दोस्ती' आणि 'मोहब्बत बडे काम की चीज है'. 'कस्मे वादे' मधे सुद्धा 'मिले जो कडी कडी' मधे असेच होते, पण तो 'दुसरा' अमिताभ असल्याने आर्डीने मुद्दाम तसे केले असेल (रणधीर ला किशोर).
यात रफ़ी वगैरेंना दुय्यम लेखायचा उद्देश नाही, पण ती गाणी जरा 'action' टाईपची असल्याने किशोरचा जोर स्वाभाविकच जास्त असायचा.

हे सगळे 'शराबी' पर्यंत चालले. पण मधेच मनमोहन देसाईने 'रफ़ीसारखा गातो' म्हणून शब्बीर कुमारचा आवाज अमिताभसाठी 'कूली' मधे वापरला आणि मग मनमोहन देसाईच्या पुढच्या चित्रपटांतील अमिताभची गाणी क्वचितच किशोरची होती. ते चित्रपटही पुढे पांचट झाले आणि गाण्यांतलीही मजा गेली.
माझ्या दृष्टीने किशोरचा प्लेबॅक बंद झाल्यावर अमिताभची गाणी पूर्वीसारखी राहिली नाहीत. या दोघांचे शेवटचे लोकप्रिय गाणे म्हणजे 'अंधेरी रातोंमे'. अमिताभची ती खास इमेज जाण्याचे कारण त्याच्या चित्रपटांचा दर्जा घसरला हे खरे होते, पण किशोरच्या आवाजातली गाणी नसणे हे ही असावे.

अमिताभच्या पार्श्वगायकांपैकी किशोर सर्वांत मुख्य. बाकी एकूण १९ इतर गायक आत्तापर्यंत अमिताभसाठी गायले आहेत
त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात...
कोणाच्याही गाण्यांचे वर्णन रफ़ीशिवाय पूर्ण होणे अशक्य आहे. रफ़ीची अमिताभसाठी गायिलेली गाणी चांगली होती, पण मला ती कधीच 'अमिताभ' स्टाईलची वाटली नाहीत. पण तशी अपेक्षा न करता ऐकली तर श्रवणीय आहेत. 'सुहाग', 'नसीब' मधे मनमोहन देसाईंनी रफ़ीचा आवाज अमिताभला देण्यास लक्ष्मीकांत प्यारेलालना भाग पाडले असावे असे वाटते, कारण रफ़ी त्यांचा आवडता गायक होता. वास्तविक त्याआधी 'अमर अकबर...' आणि 'परवरिश' मधे किशोरची गाणी गाजून सुद्धा हा बदल का केला ते आता माहीत नाही. तरीपण 'जॉन जॉनी जनार्दन','हे नाम रे सबसे बडा तेरा नाम', 'तेरी रबने बना दी जोडी' वगैरे गाणी छान होती. या व्यतिरिक्त 'मेरे देश प्रेमीयों (देश प्रेमी)', 'तेरी बिंदिया रे (अभिमान)', 'पत्ता पत्ता बूटा बूटा (एक नज़र)', 'सबसे अच्छी सबसे सुंदर बोली प्रेम की बोली (प्यार की कहानी)', 'ओ तुमसे दूर रहके (अदालत)' ही रफ़ीची गाणी सुंदर होती. पण अमिताभ, रेखा, कोठीवरचा नाच, दारूची बाटली सगळे तेच असून सुद्धा 'अठरा बरस की तू' ला 'सलाम्-ए-इश्क़' ची नशा कधी चढलीच नाही.

अमिताभला मुकेशचा आवाज कधी असू शकेल हे खरे वाटत नाही इतकी दोघांच्या गाण्याची प्रकृती वेगळी होती. मुकेशने पूर्वी प्रेम नाथला वगैरे आवाज देताना 'दुश्मन झूठे यारोंका, सच्चा यार वफ़ादारोंका (मै दीवाना मस्ताना)' अशी अमिताभच्या पिक्चर मधली वाटणारी वाक्ये म्हंटली असली तरी अमिताभच्या जमान्यातली गाणी मुकेशच्या आवाजात 'सूट' झाली नसती. खय्याम ने 'कभी कभी'त कवी अमिताभला 'मै पल
दो पल का शायर' केले तेव्हा मुकेश वापरला व पुढे तरूण पिढी दाखवताना ऋषी कपूर ला किशोर वापरला. त्याव्यतिरिक्त कल्याणजी आनंदजींनी 'अदालत' मधे पहिल्या अमिताभला 'बहना ओ बहना तेरी डोली' साठी मुकेश घेतला. आणखी कोणती मुकेशची गाणी मला आठवत नाहीत, कोणाला माहीत असल्यास कळवावीत.

हे झाले किशोर, रफ़ी आणि मुकेश या तेव्हाच्या तीन प्रमुख गायकांबद्दल. त्यावेळच्या तलत महमूद, महेंद्र कपूर, हेमंत कुमार यांचा आवाज अमिताभला कोणत्याही गाण्यांत नाही. तसेच शैलेंद्र सिंग चा आणि उदीत नारायणचाही आठवत नाही. कोणाला माहिती असल्यास दुरूस्त करीन.

बाकी गायक आता पुढच्या लेखांत...
किशोरची गाणी गाजत असताना अमिताभला इतरही काही गायकांची तुरळक गाणी होती. एस डी बर्मनने 'अभिमान' मधे किशोर, रफ़ी बरोबरच मनहर उधासचा आवाज 'लूटे कोई मनका नगर' साठी वापरला.

येसूदासचा आवाज खय्यामने 'त्रिशूल' मधे 'किताबोंमे छपते है' साठी आणि जयदेव ने 'आलाप' मधल्या गाण्यांत दिला.

आर्डीने शोले मधे धर्मेन्द्रला किशोर वापरल्याने असेल, पण अमिताभला 'ये दोस्ती' मधे मन्ना डे चा आवाज दिला. तेव्हढे एकच गाणे मन्ना डेचे आहे त्याला.

'यम्मा यम्मा' साठी आर्डी स्वत्:च गायला. तेव्हा माझ्याआधी हे सिनेमे पाहून मला डीटेल कथा सांगणार्‍या मित्राने 'तो शाकाल कडे जावून आवाज बदलून गातो' असे सांगितले होते. पुढे 'पुकार' मधेही त्याची गाणी आहेत.

किशोर असताना अमीत कुमार चा आवाज अमिताभला वापरायची गरजच नव्हती, तरीही 'देशप्रेमी' मधे 'जा जल्दी भाग जा' या किशोर्-अमीत च्या गाण्यात अमिताभचा आवाज अमीत कुमार चा आहे. मात्र या जोडीचे सर्वात धमाल गाणे म्हणजे 'मखणां'.

'नसीब' मधे बरेच नायक आणि बरेच गायक आहेत, 'ज़िन्दगी इम्तिहान लेती है' मधे अमिताभसाठी अन्वर गायलाय.

'देश प्रेमी' मधे 'हम गोरे नही हम काले सही' साठी खुद्द लक्ष्मीकांतच गायलाय. म्हणजे या चित्रपटांत दोन अमिताभला एकूण चार गायक आहेत. 'मेरे देश प्रेमीयों (रफ़ी)','जा जल्दी भाग जा (अमीत कुमार)','ताने दिन तन्दाना (किशोर)'.

साधारण १९८२-८३ पर्यंत हे सर्व गायक अमिताभसाठी गायले. त्यानंतरचा साधारण २००० पर्यंत अमिताभचा काळ हा हिट कमी आणि फ्लॉप जास्त असा होता. तो त्याचा अपघात आणि खासदारकीचा प्रयत्न वगैरे मुळे म्हाताराही दिसू लागला. 'मर्द' आणि 'गिरफ़्तार' पासून मला त्याची त्यानंतरची गाणी फारशी आवडलीच नाहीत.

'कूली','मर्द' मधे शब्बीर कुमार ची गाणी होती. तशीच महमंद अज़ीज़ची पण होती. मला तर सुरुवातीला फरकच कळत नसे. पण महमंद अज़ीज़ हा जास्त चांगला गायक आहे असे वाटते. राजेश रोशन ने त्याच्याकडून एक सुंदर गज़ल 'एक अंधेरा लाख सितारे' ही गाऊन घेतली असली तरी अमिताभसाठीची त्याची गाणी काही खास नव्हती. तशी काही गाजली 'गोरी का साजन, साजन की गोरी' ई., पण मला आवडत नाहीत. शब्बीर चे ही फ़क्त 'सारी दुनिया क बोझ हम उठाते है' आवडते. त्याचे चित्रिकरणही छान आहे.

'मर्द' मधे 'सुन रुबिया तुमसे प्यार हो गया' साठी अन्नू मलीक स्वत्: गायला.

त्यानंतर 'गिरफ़्तार' मधे बप्पी लाहिरीने 'आना जाना लगा रहेगा' साठी स्वत्:चा आवाज वापरला. पण 'धूप मे निकला ना करो' वगैरे साठी किशोर.

'तूफ़ान' मधे चक्क सुरेश वाडकर त्या एका जादू करतानाच्या गाण्यात आला, नक्की गाणे आठवत नाही.

'जादूगर' मधे कुमार शानू आला, आणि आश्चर्य म्हणजे नंतर सुदेश भोसले च्या वेडामुळे फारसे कोणी त्याला अमिताभ साठी वापरले नाही. मला त्या टूकार 'इन्सानियत' मधले 'साथी तेरा प्यार पूजा है' बरे वाटते. 'सूर्यवंशम' मधेही कुमार शानू आहे.

मग आला सुदेश भोसले. हा अमिताभच्या आवाजाची नक्कल करू शकतो म्हणून लक्ष्मीकांत प्यारेलाल ने 'हम' मधे त्याला 'जुम्मा चुम्मा' म्हणायला लावले आणि मग अजून आत्तापर्यंत बर्‍याच गाण्यांना त्याचाच आवाज आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असेल, पण मला अजुनही असे वाटते की जर कोणाच्यातरी आवाजाची नक्कल करायची होती तर त्याने किशोरची करायची, म्हणजे अमिताभला किशोरचा आवाज असायचा तसे वाटले असते, आणि सुदेश भोसले किशोरसारखा आवाज सुद्धा चांगला काढतो. गाणीही कदाचित जास्त श्रवणीय झाली असती. या सगळ्या लोकांनी एक गैरसमज करून घेतला की अमिताभची गाणी त्याच्याच आवाजात ऐकायला लोकांना आवडतात. जर पूर्वी सुदेश भोसले असता तर काय 'डॉन' वगैरेची गाणी त्याच्या आवाजात एव्हढी लोकप्रिय झाली असती? फक्त आर्डीने 'इन्द्रजीत' साठी सुदेश भोसलेचा जो आवाज वापरलाय 'जब तक जां मे है जां तब तक रहे जवॉ' या गाण्यात, तो जरा किशोर सारखा वाटतो. पण आर्डीची शब्बीर कुमार ची गाणी सुद्धा कानाला गोड लागतात ('बेताब') तर बाकीच्यांची काय कथा! केवळ अमिताभ सारखा हूबेहूब आवाज काढू शकतो म्हणून अमिताभची गाणीही त्याच आवाजात गावीत हे कशाला?

नजीकच्या काळात अदनान सामी ('वक़्त'), जावेद अली ('कजरारे') आणि गुरुदास मान ('लो आ गयी लोडी वीर झारा') यांची पण गाणी आहेत.

असे हे एकूण १९ पार्श्वगायक अमिताभ साठी गायले, आणि खुद्द अमिताभ स्वत्: सुद्धा गायला. 'मेरे अंगने मे' वगैरे जास्त लोकप्रिय झाले असले तरी मला 'रंग बरसे' आणि त्याहीपेक्षा 'मेरे पास आओ मेरे दोस्तो' हेच जास्त आवडते.

हुश्श! बराच मोठा लेख झाला. वाचक अजून जागे असतील तर जरूर प्रतिक्रिया कळवा.
ही अशी गाणी शोधण्यात 'रार' चीही खूप मदत झाली आहे, त्याबद्दल धन्यवाद.

Roger and Me
हा मायकेल मूर चा चित्रपट पाहिला. फ्लिंट या मिशिगन मधल्या गावी GM चे सुरुवातीचे काही प्लांट होते. हे डेट्रॉईट जवळचे गाव म्हणजे साधारण आपल्या जमशेदपूर सारखे एका कंपनीच्या प्लांट्सच्या आजूबाजूला वसलेले असावे. GM ने ते प्लांट बंद केल्यावर त्या गावावर जी अवकळा आली त्याचे चित्रण केलेले आहे. बरेचसे लोक ते गाव सोडून निघून गेले, स्थानिक महापालिकेने काही रोजगार निर्मितीचे असफल प्रयत्न केले वगैरे.

तर मायकेल मूर चा यात प्रयत्न असा की GM चा त्यावेळचा अध्यक्ष रॉजर स्मिथ त्याला या गावात आणून तेथील अवस्था दाखवायची. त्याला त्यात यश येत नाही. आधी तो बरेच प्रयत्न करूनही भेटत नाही आणि शेवटी भेटतो पण फ्लिंट मधे यायला तयार होत नाही.

हे दाखवताना कम्पनीचा वरिष्ठ अधिकारीवर्ग व त्यांचे कुटुम्बिय यांची सुखवस्तू राहणी व गावातील कामगारांवर आलेली अवस्था यातील विरोधाभास छान घेतलेला आहे. गोल्फ खेळणारे, कंट्री क्लब मधे जाणारे अधिकारी व भाडे न भरता आल्याने घर सोडावे लागणारी कुटुम्बे. सगळ्यात सुंदर घेतलेला शॉट म्हणजे त्या रॉजर चे ख्रिसमस चे भाषण आणि त्याच काही दिवसांत सगळे सामान रस्त्यावर टाकून ते हलवायला ट्रक मिळण्याची वाट बघत बसलेली कुटुम्बे. लोकांना ब्रेड मिळत नाही तर केक खा म्हणणारी ती युरोप मधली राणी आठवते.

फक्त यात एक मला जाणवले ते म्हणजे पूर्वीच्या हिंदी चित्रपटांप्रमाणे यात 'मेहनतवाले आणि दौलतवाले' हा टोन दिसतो. तिथे ज्याप्रमाणे सर्व पैसेवाले चोर आहेत असा समज असतो तसेच काहीसे आहे. त्या रॉजर ला त्या बाबतीत पूर्ण जबाबदार धरलेले दिसते. वास्तविक आता या विषयावर (एकूणच पब्लिक कम्पन्या कशा चालतात) जरा जास्त माहिती झाल्यावर हे वाटते तितके सोपे नाही हे जाणवते. कम्पनीचा अध्यक्ष ( CEO ला चपखल मराठी शब्द सापडत नाही) हा म्हणजे कोणीतरी कम्पनी च्या बाबतीत सर्व अधिकार असणारा व कोणालाच बांधील (उत्तरदायी) नसणारा असतो असे चित्र यातून उभे राहते. वास्तविक CEO ला कम्पनीच्या बोर्ड च्या सदस्यांना काही गोष्टी करूनच दाखवाव्या लागतात. तर बोर्ड मेम्बर हे कम्पनीच्या प्रमूख भागधारकांना बांधील असतात व ते भागधारक म्हणजे financial institutes हे त्यांच्या सभासदांना. आणि यात ते कामगार ही आले कारण बर्‍याच जणांचे 401K किंवा पेन्शन वगैरे त्यावरच अवलंबून असते.

आता इथे त्या अधिकार्‍यांची तरफदारी करण्याचा उद्देश नाही, आणि कदाचित जे खर्च कमी करण्याचे टार्गेट होते ते इतर मार्गांनीही करता आले असते, पण भागधारक बोर्ड वर प्रेशर आणणार, बोर्ड CEO ला खर्च कमी किंवा फायदा वाढवायला लावणार आणि तो मिळेल त्या मार्गाने ते करणार या सर्व साखळीत सामान्य कामगार भरडून निघतो हे खरे असले तरी हा केवळ एका अध्यक्षाला त्यात दोषी धरून सुटणारा प्रश्न नाही असे वाटते.

पण या एकदम वेगळ्या विषयावर हा चित्रपट घेतलेला आहे. अवश्य बघण्यासारखा आहे.

टीप्: यावर अधिक माहिती वाचली तेव्हा असे कळले की काही गोष्टी ज्याप्रमाणे घडल्या त्या क्रमाने दाखवलेल्या नाहीत, पण तसे असले तरी त्याने चित्रपट चुकीचा ठरत नाही जरी ही Documentary असली तरी.
गाडी बुला रही है...
पुलंच्या शंकर्‍याला जसा पाण्यात आख्खा बुचकळून काढला तरी समोर हॉटेल दिसल्यावर त्याला तहान लागते तसे रेल्वेगाड्यांच्या बाबतीत माझे होते.

पूर्वीच्या चित्रपटांत सुद्धा आगगाडी असली की मला जरा जास्त आकर्षण वाटायचे. शोले, शक्ती वगैरे मधे सुरुवातीला आणि शेवटी गाडीचे दृश्य आहे. किशोरचे 'गाडी बुला रही है' हे माझे एकदम आवडते. कूली जेव्हा लागला तेव्हा अमिताभ चा चित्रपट याबरोबरच रेल्वेचे वातावरण हे ही त्यात विशेष होते. तसेच 'द बर्निंग ट्रेन' चे.

माझे एक नातेवाईक शिवाजीनगर स्टेशन जवळ राहतात, लहानपणी त्यांच्याकडे जाऊन मी संध्याकाळी प्लॅटफ़ॉर्म वर जाऊन बसत असे. मुम्बईहून पुण्याकडे संध्याकाळी बर्‍याच गाड्या येतात, केवळ त्या बघण्यासाठी. तिथे बसून मुंबईच्या दिशेने M अक्षराच्या मधल्या भागासारखा आकार दिसू लागला की गाडी आली हे कळायचे, कारण तेव्हा ती इन्जिने त्या एकाच प्रकारची होती. त्यांचे ४-५ वेगवेगळे प्रकार होते हे पुढे कळले. मग एक हैदराबाद का मद्रास ला जाणारी गाडी, त्यानंतर जनता एक्सप्रेस जी पुढे डबल डेकर सिंहगड झाली ती आणि आणखी एक कोणतीतरी लांबची गाडी जायची. पण सगळ्यात उत्सुकता मात्र दख्खन च्या राणीची. तेव्हा फक्त तिच्या डब्यांतच ट्यूब लाईट असल्याने आणि त्या ठराविक निळ्यापिवळ्या रंगामुळे लगेच ओळखता येत असे. पण तिचा खरा दिमाख ती शिवाजीनगरला सकाळी न थांबता मधल्या रूळावरून वेगात धडधडत जाताना बघायचा. संध्याकाळी ती तिथे थांबते व जवळजवळ अर्धी रिकामी होते.

माझा काका पूर्वी कर्जत ला आणि तेही स्टेशन च्या अगदी जवळ राहात असल्याने पुण्याकडे जाणार्‍या गाड्यांना मागे १ किंवा २ इन्जिने लावतात ते अगदी जवळून बघायला मिळायचे. त्यासाठी पुण्याकडे व पुढे जाणार्‍या सर्व गाड्यांना कर्जत ला थांबावेच लागते. मधे शताब्दी वगैरे असताना तिला बहुधा खोटा स्टॉप होता: म्हणजे गाडी थांबायची पण मधल्या रूळावर. म्हणजे वेळ जाणारच पण लोकांना प्लट्फ़ॉर्म वर उतरता येणार नाही अशी रेल्वे ची अफलातून पद्धत. मी शताब्दीने कधी गेलो नाही आणि आता तिची इंटर सिटी झालेली आहे, तिनेही. पण पुणेकरांना 'मुंबईत' आल्याची पहिली खूण म्हणजे कर्जत ला दिसणारी लोकल. आता तर ती खोपोली पर्यंत झाल्याने कधीकधी घाटातूनच दिसते.

पुणे स्टेशनला ही सर्वच गाड्या थांबतात. एकतर मोठे शहर आहे म्हणून, दक्षिणेकडे दोन मार्ग फुटणारे (एक मिरज कोल्हापूर कडे व दुसरा दौंड सोलापूर कडे) जंक्शन म्हणून, पण बहुधा त्याहीपेक्षा तिथे विजेची इन्जिने बदलून डिझेल व पूर्वी कोळशाची इन्जिने लावत यासाठी. आता कोळशाची दिसत नाहीत पण पूर्वी नुसते त्या फलाटांवर उभे राहिले तरी उगाचच मुंम्बईचा भाग जास्त शहरी व विरुद्ध बाजूचा भाग जरा वेगळा वाटायचा. मुंम्बईच्या बाजूला 'विद्युत इन्जन शेड' आहे व 'डेक्कन' व नंतर आलेली पण तितकीच लाडकी बनलेली 'इंद्रायणी' सारख्या निळ्यापांढर्‍या गाड्या तिकडे दिसायच्या. नंतर मुंबई सारखी लोकल आल्यावर तीही दिसे. याउलट दौंड च्या बाजूला डिझेल शेड व डिझेल आणि कोळशाची इन्जिने दिसायची. आणि गाड्याही सर्व एकाच तपकिरी रंगाच्या असत.

अपूर्ण...
आता कोळशाची इन्जिने त्या भागातून नाहीशी होऊन जमाना झाला, पण त्याची एक वेगळीच मजा होती. एकतर लहानपणापासून गाडीची पाहिलेली चित्रे सगळी त्या इन्जिनांच्या गाड्यांची होती. त्यामुळे आठवणीत पहिल्यांदा रेल्वेने जायला निघालो तेव्हा ते मोटारी सारखे दिसणारे व थोडे रागीट चेहर्‍याचे (विजेचे) इन्जीन कुठून आले असा प्रश्न पडला होता. मग एकदा कोल्हापूरला जाताना कोळशाच्या इन्जिनाच्या गाडीतून जायला मिळाले. त्याची ती भरदार शिट्टी, बाजूने पाणी सोडणे, ती लहान मोठी चाके आणि त्या पिस्टन मुळे होणारा तो आवाज हे अंधूक आठवते (आणि शोलेतील त्या सीन मुळे पुन्हा अनुभवायला मिळते). आता पुलंच्या 'काही अप काही डाऊन' मधे आणि इतर लोकांनीही याचे सुरेख वर्णन केलेले आहे, आणि आधीच्या पिढीतील लोक तशाच गाड्यांतून फिरल्यामुळे त्यांचे अनुभव नक्कीच आणखी वाचनीय असतील, पण मलाही ते कोळशाचे इन्जीन आवडायचे. त्यात कोल्हापूरला लाईन संपते आणि त्यामुळे त्या स्टेशन जवळच एक टर्न टेबल होते (त्याच्या ही बरोबरच समोर एक कुटुंब ओळखीचे निघाले. इच्छा तेथे (लोह)मार्ग! :-) ), कारण कोळशाचे इन्जीन उलट्या बाजूने एवढे लांब चालवता येत नसावे. ते पहिल्यांदा पाहताना कोणालाही आश्चर्यच वाटेल, कारण फक्त २-४ माणसे त्यावर ते एव्हढे धूड सहज फिरवतात. आता ती टर्न टेबल्स भारतात आहेत की नाही माहीत नाही, पण इथे एका लहान मुलांच्या पार्क मधे एक छोटी गाडी आहे तिच्या इन्जिनासाठी जवळच तसे टर्न टेबल आहे ते बघितले. पूर्वी खडकी वगैरे भागात ज्या फॅक्टरीज आहेत त्यात माल वाहून नेणार्‍या गाड्यांनाही कोळशाची इन्जिने असत. तिथे मी ते इन्जीन थांम्बले की आजूबाजूच्या लोकांना त्यातून गरम पाणी भरून घेताना बघितले आहे. आणखी एक आठवण म्हणजे ते इन्जीन असले की पहिल्या काही डब्यांच्या खिडकीतून धूर व त्याबरोबर कोळशाचे कण हे आत येत व चेहर्‍यावर जमा होत. अजूनही बहुधा उत्तर भारतात कोठेतरी अशी इन्जिने व्यवस्थित ठेवलेली आहेत व वर्षातून एकदा ती सर्वांना दाखवायला काढतात असे ऐकले.

डिझेल च्या इन्जिनाला स्वत:चे काही व्यक्तिमत्त्व वाटत नाही व त्यातून लांब अंतरावरच्या गाड्यांतून बंगलोर, मद्रास वगैरे ठिकाणी जाण्याव्यतिरिक्त फारशी काही माहिती नाही. हे इन्जीनही मुंबई च्या बाजूला फारसे दिसत नसे, त्यामुळे ते पहिल्यांदा बघितल्याचे आठवते ते 'द बर्निंग ट्रेन' च्या पोस्टर वर. पण हे सर्वात लहान असले तरी असते एकदम दणकट आणि १८-२० डब्यांची गाडी दूरवर सहज नेते. याचाच एक लहान भाऊबंद आहे, 'शंटिंग' करणारा. गाड्या प्लॅट्फ़ॉर्म वर लावणे, मालाचे डबे एकडून तिकडून आणून जोडणे वगैरे हलकी कामे त्याच्या कडून करून घेतात. याला खरी गाडी कधी ओढताना पाहिले नाही, त्यामुळे चित्रपटांत कधे हे इन्जीन दिसले की तो शॉट कोठेतरी सायडिंग च्या लाईन वर ४-५ डबे जोडून घेतलेला आहे असे वाटते.

विजेच्या इन्जिनाचे बरेच प्रकार आहेत. त्यातही DC , AC आणि दोन्ही वर चालणारी अशा भानगडी आहेत. त्यातली मुंबई पुणे भागात (व पूर्वी कसारा भागात सुद्धा) वापरली जाणारी ती मोटारी सारखा तोंडवळा असलेली पिवळ्या रंगाची इन्जिने पहिल्यापासून जास्त लक्षात राहिली. आता सगळीकडे AC traction वापरात येत असल्याने ती हळुहळू कालबाह्य होत आहेत. तशीच एकदम लांब चौकोनी डब्यासारखी दिसणारी बहुधा BHEL ने बनवलेली इन्जिनेही असत. आता तर आणखी नवीन प्रकारची आली आहेत. त्यात ती इतरत्र सगळीकडे दिसणारी व १६० किमी पेक्षा वेगाने जाऊ शकणारी ती झाशी वगैरे शेडमधली इन्जिने DC मुळे अजून मुंबई जवळ दिसत नाहीत. आता सद्ध्या या मार्गावर ती दोन्ही traction वर चालणारी इन्जिने दिसतात.

अजून काही डबे येतायत...
पुण्याहून निघणार्‍या गाड्यांपैकी, कर्जत व कल्याणला जायचे असल्याने आम्हाला सिंहगड सर्वात सोयीची, पण आकर्षण मात्र कायमच डेक्कन क्वीन चे राहिले. त्यात कल्याणला दोन्ही वेळेस व एकेकदा कर्जत आणि दादर ला न थांबणारी गाडी म्हणजे काहीतरी वेगळाच दिमाख होता ("व्हीटी वरून सुटली की एकदम कर्जत" हे म्हणजे काहीतरी मोठा पराक्रम असल्यासारखे लोक सांगतात!). आम्ही तेव्हा कल्याणला गेलो की संध्याकाळी स्टेशन वर वेगाने जाणारी डेक्कन बघायला जायचो. तसेच ही गाडी बहुधा सर्वात वेगात शीव आणि मळवली तून जात असावी. आजकाल कल्याणच्या पुढे मुंबई कडे स्टेशनमधून जात असताना सर्वच गाड्या अतिशय हळू जातात, पण पूर्वी एकदम वेगात जाताना मी बघितले आहे. आणि अशी जाणारी गाडी जेव्हा स्टेशन च्या जवळ येत तेव्हा जो हॉर्न वाजवत आत शिरते ते नुसत्या त्या हॉर्नच्या आवाजावरूनच कळायचे. इतर कोणत्याही गाडीपेक्षा डेक्कन मधली आणखी मजा म्हणजे तिची डायनिंग कार. इतर गाड्यांना पॅंट्री कार असतात, पण डेक्कन ला त्या डब्यात बसून खाता येते. खंडाळ्याच्या घाटातून जाताना तिथे बसून खात किंवा चहा पीत आजूबाजूची दृश्ये बघण्याची मजा अगदी एसी फर्स्ट क्लास मधेही कधी येणार नाही. या गाडीला पूर्वी २X२ अशी सीट्स असलेले पहिल्या वर्गाचे सुंदर डबे होते. आणि बहुधा त्यातील काम करणारे रेल्वेचे लोकही वर्षानुवर्षे त्याच गाडीत असतात असे ऐकले आहे. आम्ही अधुनमधुनच जात असल्याने जास्त माहिती नाही.

आता गेली बरीच वर्षे पुणे मुंबई अप डाऊन करणारे लोक या गाडीने जात असल्याने तिला मुंबईच्या त्या लोकलच्या जंजाळातही सर्वात प्राधान्य दिले जाते. सकाळचे किंवा संध्याकाळचे वेळापत्रक बघितले तर कोणत्याही स्टेशनवर डेक्कन जाण्याच्या वेळेच्या आसपास २० मिनिटे फास्ट लाईन वरून लोकल्स नसतात. संध्याकाळी ५ नंतर पहिली डेक्कन जाते आणि मग 'डबल फास्ट' वगैरे लोकल चालू होतात (ही '९९ ची आठवण आहे, पण अजूनही तसेच आहे बहुतेक). मुंबईचा आणखी एक किस्सा म्हणजे पूर्वी कल्याण व कर्जत जवळ काम करणारे पण पुण्याला राहणारे अशा लोकांना डेक्कन पकडता यावी म्हणून एक 'इन्जीन लोकल' सुटत असे, ती मधली स्टेशने घेत घेत कर्जत ला डेक्कन च्या आधी पोहोचत असे. मी स्वत: हे अनुभवलेले नाही, पण ऐकलेले आहे. नंतर तिथे आत्तासारखी लोकल आल्यावर सुद्धा तिला म्हणे इन्जीन लोकलच म्हणत आणि अजुनही एक कर्जत लोकल बरोबर डेक्कन च्या १५ ते २० मिनिटे आधी कर्जत ला पोहोचेल अशी आहे. या गाडीचा आणखी एक ऐकलेला किस्सा म्हणजे निवृत्त होणार्‍या इन्जीन चालकाला कामाच्या शेवटच्या दिवशी डेक्कन वर पाठवतात व प्रत्येक क्रॉस होणार्‍या गाडीचे चालक हॉर्न वाजवून त्याला निरोप देतात. खरे खोटे माहीत नाही.

मी पूर्वी पिंपरीत कामाला असताना सकाळी आम्हाला दापोडीच्या पुलावर 'प्रगती' भेटत असे व संध्याकाळी बर्‍याच वेळा 'इन्द्रायणी'. गुरूवारी (आम्हाला गुरूवारी सुट्टी असे) जर कधी जावे लागले तर अर्धा तास आधी कम्पनीची बस निघत असे, त्यामुळे गुरूवारी डेक्कन क्रॉस व्ह्यायची. ते पाण्यात बुचकळून काढण्याचे उदाहरण यासाठी की २-३ दिवस रेल्वेने भरपूर फिरून आल्यावर जेव्हा ऑफिस ला जाताना दापोडीच्या पुलाजवळ आलो की तरीही अर्धे लक्ष गाडी दिसते का याचकडे असायचे.

अजून काही गाड्या येत आहेत...
मुंबई पुणे प्रवासात प्रत्येक गाडीची वेगळी मजा आहे. पावसाळ्याच्या दिवसात मुंबईतून परतताना सिंहगड पकडायची आणि बदलापूर नंतर दाराशी उभे राहायचे. मग बाजूला शेतांत ते इरले डोक्यावर घेऊन काम करणारे लोक दिसतात, जवळच्या डोंगरांवर ढग व जोरदार पाऊस साठलेला दिसतो. सगळीकडे हिरवेगार असते, गाडीसुद्धा पूर्ण भिजलेली असते. आणि मग कर्जत सोडले की खंडाळा घाट त्याच्या सर्वात देखण्या रूपात दिसू लागतो. आणि गाडी त्या दृश्यांत भर घालते. दारातून बघितले की इन्जीन पुढल्या बोगद्यात आणि मागचे काही डबे आधीच्या बोगद्यात व मधले डबे बाहेर, कड्यांवरून पडणारे पाणी आणि दुसर्‍या बाजूला दिसणारे असंख्य धबधबे. मधेच लोणावळ्यापर्यंत एखादी गाडी ढकलून आलेली नुसतीच १-२ इन्जिने कर्जत च्या बाजूला जातात आणि मग तो शेवटचा लांब बोगदा येतो. बराच वेळ अंधारात गाडी जात असते. अशा वेळेस खिडकीतून किंवा दारातून खाली बघितले की ते रूळांच्या जवळ बोगद्यात घुमून येणारे आवाज एकदा टेप करून आणले पाहिजेत. मी पुण्याला रस्त्याने व रेल्वेने गेलो आहे, पण गाडीतून घाटाची जी मजा येते, ती रस्त्यावरून येत नाही. मुळात रस्ता जरा बाजूने काढल्यासारखा वाटतो, रेल्वेमार्ग एकदम त्या डोंगर दर्‍यांच्या मधूनच जातो. सिंहगड ची तेथून जाण्याची वेळ अगदी सोयीची आहे, कारण डेक्कन तिथे पोहोचेपर्यंत तेवढा उजेड राहात नाही. आणि ते घाटातले 'रिव्हर्सिंग' म्हणजे नक्की काय असायचे ते लक्षात नाही. फक्त १-२ ठिकाणी एकदम उंचावर नेलेले रूळ दिसतात ते त्यासंबंधी असावेत.

या सगळ्या भागात ती 'समुद्र सतहसे उंचाई' किती आहे हे त्या स्टेशनच्या नावाच्या पिवळ्या फलकांवर अवढे आवर्जून का लिहिले आहे ते माहीत नाही. मात्र घाट पार करून आल्यानंतर ती बरीच वाढलेली दिसते. ही सिंहगड पूर्वी 'जनता एक्सप्रेस' होती. मग तिची डबल डेकर 'सिंहगड' झाली. तिच्या डब्यांत तानाजीच्या इतिहासातील काही चित्रे ही होती (आता माहीत नाही). अशी डबल डेकर होणार हे जेव्हा पेपरमधे वाचले तेव्हा बर्‍याच जणांना प्रश्न पडला की अशी दुमजली गाडी बोगद्यातून कशी जाणार, पण त्याची काळजी घेऊनच डब्यांची उंची फार वाढवली नाही रेल्वेने. मग मध्यंतरी या डब्यांचे पेव फुटले. यात वरती बसून जायला छान वाटायचे. त्या काळात डेक्कनला सुद्धा पासधारकांसाठी एक असा 'डबल' डबा लावत असत. महालक्ष्मी एक्सप्रेस, गुजरात कडे जाणारी 'फ्लाईंग राणी' अशा इतर गाड्यांनाही काही डबे तसे होते. मग मधे काय झाले कोणास ठाऊक, सिंहगड पुन्हा एक मजली झाली आणि ते इतर गाड्यांचे डबेही गेले. सिंहगडचा तो जुना 'रेक' पुण्याहून दौंड कडे जाणार्‍या शटलला लावला गेला.
डेक्कन क्वीन कितीही आवडती असली तरी दादरला उतरून चालणार असेल तरच उपयोगाची. त्यामुळे दादर, गिरगाव किंवा पश्चिम उपनगरांत राहणारे यांनाच सोयीची आहे. नाहीतर मग खुद्द मुंबईतच काम असेल तर. या गाडीच्या आणखी काही गोष्टी म्हणजे ही भारतातील पहिली 'डीलक्स' गाडी, तसेच एवढ्या लांबचे अंतर धावणारी पहिली इलेक्ट्रिक गाडी आणि पहिली व्हेस्टिब्यूल (म्हणजे ज्यात एका डब्यातून दुसर्‍या डब्यात आतल्या आत जाता येते) गाडी आहे. फार पूर्वी पहिल्या व दुसर्‍या वर्गाचे ८-१० डबे घेऊन साधारण पावणेतीन तासात जाणारी ही गाडी आता १७-१८ डबे घेऊन तीन तास वीस मिनिटे घेते. हिच्या बद्दल आणखी छान माहिती या साईटवर आहे. आमच्या ऑफिस मधे एकाचा आयडी २१२३ आहे त्याचा बॅज दिसला की मला नेहमी डेक्कन आठवते, कारण तिचा डाऊन नंबर तो आहे (२१२३ डाऊन, २१२४ अप) (इथे बे एरिया मधे U टर्नला बंदी असताना मारला तर २८१ डॉलर दंड होतो ते पाहून तसाच व्ही व्ही एस लक्षमण आठवतो)!

आणखी एक 'डेक्कन' आहे, ती म्हणजे डेक्कन एक्सप्रेस. ही दुपारी पुण्याहून सुटते व सकाळी मुंबईहून. इंद्रायणी वगैरेच्या मानाने जरा जास्त स्टेशने घेणारी, पण अगदीच कोयना किंवा पॅसेंजर नाही. बर्‍याच लोकांना सोयीची असावी कारण माझ्या आठवणीत तरी कायम खच्चून भरलेली असायची. मध्यंतरी ती 'प्रगती' सुरू झाली. ही सकाळी डेक्कन च्या मागोमाग निघते आणि संध्याकाळी थोडी आधी. मुळात उशीर झालेला माणूस जसा मग रेंगाळत कामाला जावा तशी ही सकाळी जरा रमतगमतच जाते. पण संध्याकाळी बहुधा तिला लाईन मोकळी करायची घाई असते. डेक्कन चे तिकीट असेल पण मुंबईतले काम जरा लौकर झाले की टीसी ला पटवून यातून मी आलेलो आहे. या गाडीचे बाकी सगळे डेक्कन क्वीन सारखेच आहे, फक्त तो ७०-७५ वर्षाचा इतिहास व त्याबरोबर येणार्‍या कहाण्या, ते प्रवासी संघ, पार्ट्या वगैरे नाहीत.

पुण्यात लग्नासाठी किंवा एकाच दिवसाच्या कामासाठी येणारे आणि मुंबईतून येऊन त्याच दिवशी ऑफिस पकडणारे यांची 'इंद्रायणी' आवडती आहे. एकतर ती सकाळची फास्ट लोकल ची धांदल सुरू व्हायच्या आत कल्याण सुद्धा सोडते त्यामुळे पुण्याला हमखास वेळेवर पोहोचते. संध्याकाळी निघणारी सुद्धा शक्यतो वेळेवर जाते आणि पुण्यातून निघणार्‍याला जवळजवळ संपूर्ण दिवस मिळतो. तशी बरीच नंतर सुरू झालेली असूनही ही खूप लोकप्रिय आहे. आणि कामशेट च्या जवळ जे पाणी दिसते ती इंद्रायणी नदी आहे हे मला बर्‍याच दिवसांनी कळले.

शताब्दी व नंतर ती बंद करून चालू केलेल्या इंटर सिटीने मी कधीच गेलो नाही त्यामुळे काहीच माहिती नाही.

याव्यतिरिक्त फक्त मग 'कोयना' आहे, पुणे मुंबई प्रवासासाठी चालणारी. ही पूर्वी मिरज पर्यंत होती आता कोल्हापूर पर्यंत जाते. ती पुण्यापर्यंत जशी जाते त्यावरून ती कोल्हापूरला पोहोचून दुसर्‍या दिवशी साधारण वेळेवर कशी येते हेच आश्चर्य आहे. बाकी कोणत्याही गाडीचे रिझर्वेशन नाही मिळाले तर आम्ही या गाडीने जायचो. पण ती असंख्य स्टेशनांवर थांबते आणि त्यामुळे कंटाळा येतो.

बाकी मग कोल्हापूरला जायला 'सह्याद्री' व 'महालक्ष्मी', सोलापूरला 'सिद्धेश्वर' व आता एक 'इंटर सिटी' या रात्रीच्या गाड्या आहेत. आणि इतर अनेक लांब अंतराच्या ही आहेत 'उद्यान' वगैरे. पण पुणे मुंबई मधले लोक इतर काही पर्याय नसेल तरच या गाड्यांने जातात. या लांबच्या गाड्या किमान २ रेक वाल्या आहेत. म्हणजे एक 'कोयना' मुंबईहून कोल्हापूरला जात असते तेव्हा आणखी एक उलट्या दिशेला जात असते. लांब अंतराच्या गाड्यांना किमान किती रेक लागतील हे शोधून काढाणे हा आता अस्सल 'गीकी' वाटणारा उद्योग तेव्हा आम्हाला होता.

आता गेल्या ६-७ वर्षात खूप रेल्वेप्रवास झाला नाही, पण मी ऐकले आहे की एवढा हायवे होऊन सुद्धा गाड्यांच्या गर्दीत काही फरक नाही.
परवाच साडेपाच च्या सुमारास स्पायडर मॅन ३ ची जाहिरात लागली आणि पूर्वी ती रविवारच्या हिंदी चित्रपटा च्या आधी एक १५ मिनिटांची सिरीज लागायची ती आठवली.

त्यावेळच्या इतर अनेक इंग्रजी (आणि उर्दूमिश्रित हिंदीही) गाण्यांप्रमाणे त्या " Friendly neighborhood spiderman चे टायटल सॉन्ग नीट कळायचे नाही, त्यामुळे बरेच खरे शब्द आणि उरलेल्यांऐवजी नजिकचे परिचित शब्द जोडून आम्ही काहीसे असे म्हणायचो:

(हे जरा त्या चालीत म्हणून पाहा)
spiderman, spiderman
andy de dee dew spiderman
james boSSSSSSSSSSSSSSSnd,
is gone to spiderman

मग तो एका बिल्डिंग वरून दुसर्‍या बिल्डिंग वर ते धागे सोडत उडत सुटतो ते बघायचो. कधीतरी आपलेच मनगट मूठ जरा मागे घेऊन पुढे ढकलत एखादा धागा निघतो का ते बघायचो. आणि Physics दृष्ट्या त्याने सोडलेला धागा कोठेतरी जाऊन चिकटायच्या आधीच तो कसा उडू शकतो असा प्रश्नही पडायचा. हे म्हणजे घोरपड वरती पोहोचायच्या आतच तानाजी वगैरे अर्धा कडा चढल्यासारखे वाटायचे.

आजच कळले की स्पायडर मॅन ३ हा २००७ मधला भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट आहे. मला आश्चर्य वाटले, कारण एवढे कोण तो बघायला गेले कळत नाही. TV वर ठीक आहे. पहिले दोन विशेष चालले नव्हते बहुतेक. मला एकूणच हे सगळे "मॅन" भारतात कोणी हौसेने बघतील असे कधी वाटले नाही.

tumacaI dad Aaplaa saMvaad
Owner farend Type HTG0001 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators