व्हेरी व्हेरी स्पेशल!!!

Submitted by फारएण्ड on 6 October, 2010 - 01:39

गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्‍या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते. शॉट्स ही असे की फिल्डर्स नी बॉल अडवायचे सोडून बघत राहावे, आणि बोलर ने "हा बॉल तिकडे कसा काय गेला" विचार करत रन अप कडे परत जावे...

वॉर्न च्या लेग स्पिनला विरूद्ध दिशेने मिडविकेट ला (ऑन साईड) सतत मारल्याने कंटाळून शेवटी स्टीव्ह वॉ तेथे एक फिल्डर लावतो. वॉर्न पुन्हा तसाच बॉल टाकतो. "आता काय करशील" असा विचार त्याच्या डोक्यात यायच्या आतच लक्ष्मण स्वत: लेग साईड ला मागे जाउन आता मोकळ्या झालेल्या ऑफ साईडला फोर मारतो. स्क्रीन वर वॉर्न चा हताश चेहरा आणि मागे "इडन गार्डन" वर ओरडणारे एक लाख लोक! परदेशी संघांच्या सगळ्या अभ्यासाला, कॉम्प्युटर, व्हिडीओ टेप्स अ‍ॅनेलिसिस ना एका अस्सल भारतीय कलाकाराने केवळ आपल्या कौशल्याच्या जोरावर हरवल्याचे अविस्मरणीय दृश्य!

व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ने मार्क टेलर पासून ते आता पाँटिंग च्या संघांची अवस्था अशी केलेली आहे. एरव्ही लक्ष्मण संघात असून सुद्धा दिसत नाही. कधीकधी नसतो ही.

"Everytime he plays against us he comes up with something special and the next thing we read after the series is he is dropped! It leaves me completely bewildered."

अ‍ॅडम गिलख्रिस्टचे हे लक्ष्मणबद्दलचे वाक्य. स्थळ सिडने, जानेवारी २००४. सिरीज मधे आधी एकदा द्रविड बरोबर ३००+ रन्स ची भागीदारी करून झालेली. आता सचिन बरोबर आणखी ३५१. त्यात याच्या १७८ आणि क्वचित दिसणारे उदाहरण म्हणजे सचिन च्या २४१* पेक्षाही प्रेक्षणीय.

त्याआधी कलकत्त्याची द्रविड आणि त्याची ३७६ ची भागीदारी तर सर्वांना माहीतच आहे. ऑस्ट्रेलियाने १६ टेस्ट्स सलग जिंकलेल्या. "इडन" वर भारताला फॉलोऑन दिल्यावर तिसर्‍या दिवसअखेर शँपेन वगैरे मागवलेल्या. पण चौथ्या दिवशी भारताचे कोणीच आउट होणार नाही आणि पाचव्या दिवशी आपण सगळेच आउट होउ हे १६ मॅचेस मधे पराभव ठाउक नसलेल्या कांगारूंच्या स्वप्नात देखील आले नसेल.

लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाला हाणलेला मी पहिल्यांदा बघितला तो कलकत्त्याच्या मॅचमधे १९९८ ला, त्या "सचिन वि. वॉर्न" सिरीज मधे. आमच्या कंपनीला गुरूवारी सुट्टी असायची. आदल्या दिवशी चालू झालेल्या या मॅचमधे खास आमच्यासाठी ऑस्ट्रेलिया पहिल्याच दिवशी सर्वबाद झाले. पूर्ण दिवस भारताची बॅटिंग बघायला मिळणार, त्यात फॉर्मात असलेला सचिन, कलकत्त्याला नेहमीच चांगला खेळणारा (आणि तोपर्यंत आवडत असलेला) अझर यांच्या बद्दलची उत्सुकता जास्त. पण सिद्धू बरोबर सलामीला लक्ष्मण आला आणि तेथून ऑस्ट्रेलियाके बुरे दिन शुरू हो गये Happy तेव्हा त्याने मारलेल्या ९५ रन्स ही पुढच्या गोष्टींची चुणूक होती याची कल्पना तेव्हा नव्हती.

पण तो खरा सलामीचा बॅट्समन नाही. आपल्याकडे सगळी मधली फळीच असल्याने बहुधा चिठ्ठ्या टाकून सलामीवीर निवडत असावेत. पण जेव्हा लक्ष्मण ला मधल्या फळीत खेळता आले तेव्हा त्याचा खरा खेळ दिसू लागला. मग २००१ मधे कलकत्ता, २००३ मधे विंडीज, २००३ मधे पुन्हा ऑस्ट्रेलिया, २००४ मधे पाक अशा बर्‍याच वेळेस तो चांगला खेळला, पण ऑस्ट्रेलिया वगळता तो फारसा उठून दिसला नाही. बर्‍याच वेळा संघ अडचणीत असताना शेपटाबरोबर तो ६०-७० रन्स काढायचा पण इतरांच्या चमकदार शतकांपुढे त्या लक्षात यायच्या नाहीत.

२००१ च्या त्या प्रसिद्ध सिरीज मधे ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याचे रन्सः २०, १२ ५९, २८१, ६५ आणि ६६.

नंतर लगेच झिम्बाब्वेविरूद्धच्या सिरीज मधे: २८, ३८, १५ आणि २०!

अशी बरीच उदाहरणे सापडतील. असा चाचपडत खेळत संघाच्या आत बाहेर चालू राहते. पाटा विकेट्स, ट्वेंटी २० वगैरेच्या अ‍ॅक्शन मूव्हीज मधे कलाकारांची गरज नसते, फक्त फाईटिंग करणारे लागतात. मग पुन्हा ऑस्ट्रेलिया सिरीज येते, चेंडू पिचवरून डोक्यापर्यंत उडू शकतो हे नव्याने कळते. कॉमेंटेटर्सच्या भाषेत सांगायचे तर "बॉईज" आणि "मेन" मधला फरक दिसू लागतो. आणि पुन्हा लक्ष्मण मॅच जिंकून देतो. नवीन ऑस्ट्रेलियन बोलर्स ना "मॅग्राथ किंवा वॉर्न म्हणत होते ते बरोबर होते" असे जाणवेपर्यंत मॅच हातातून गेलेली असते. लक्ष्मण बहुधा त्याची आर्टिस्ट्री दाखवायची वेळ निवडतो. त्या वेळेआधी मॅच धोक्यात असते आणि त्यानंतर जिंकलेली असते हे केवळ साईड ईफेक्ट्स!

त्याच्या २००३ मधल्या अशाच एका सुंदर शतकाचे वर्णन एका ऑस्ट्रेलियन पत्रकारा च्या शब्दातः

"Waving boundaries off both feet through cover, he transfixed the SCG crowd during the second session that revived India and the series. Mitchell Johnson was taken for 18 from five balls as Laxman split a crowded offside field and when he grew bored of hitting to cover, he worked towards square leg and mid-on with shots few Australians would have considered - or known how to play"

बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएंडा, मोजक्या शब्दात व सुरेख वर्णनाने कालच्या लक्ष्मणाच्या विजयी खेळीला अप्रतिम मुजरा केला आहेस. Happy

फारेण्डा, अत्यंत मोजक्या शब्दात उत्तम लिहीलं आहेस.

>>पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा

सोन्यासारखे शब्द Happy

अवांतरः
ह्यासारख्या टेस्ट बघितल्या की २०-२० ची नशा (ज्या कुणा बापड्यांना चढली असेल त्यांची) खाडकन् उतरते.
म्हणून मी आधीपासून कसोटी सामन्यांचे पंखा Happy

बीसीसीआयला केलेल्या विनंतीला प्रचंड मोठ्ठा पाठिंबा...

(रच्याकने...
लक्ष्मणच्या २००० मधल्या शेवटच्या इनिंग च्या १४८ चा उल्लेख करायला हवा होतास...
हेल्मेटवर बॉल लागून इंज्युअर्ड अवस्थेत भल्या भल्या बॉलर्सना अक्षरशः धरून मारलं होतं...
याच इनिंगमुळे तो नंतर होणार्‍या वन्-डे सीरीजसाठीच्या टीम मधे इनक्लूड केला गेला होता... तिथेही त्यानी ऑसीजना बदडून काढलं होतं...

काल ओझावर चिडलेला लक्ष्मण पाहून एकदम शारजामधल्या 'त्या' वादळी सामन्यात अशीच चुकीची रन घेताना लक्ष्मणवर चिडलेला सचिन आठवला...)

आत्ताच आलेला एक मेसेज...
गांधीजींचे अखेरचे शब्द होते: 'हे राम'
रिकी पाँटिंगचे कदाचित असतील: 'हे लक्ष्मण'

अरे हे वाचलच नव्हतं..
झकास रे फारेंडा. एकदम अचूक! लक्षमणाच्या खेळात कधीच कुठलाही मुद्दाम केलेला दिखावा नसतो (पहा मी हा चेंडू असाही मारू शकतो वगैरे वगैरे..) आपल्याच मर्जीने एका ओघात वाहणार्‍या एखाद्या नागमोड्या डोहासारखा त्याचा खेळ अन फटके वहात असतात- मग दुसर्‍या बाजूने भगदाडे पडोत वा आग लागो.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लक्ष्मणचे असेच अहमदाबाद्ला दिसले होते. त्याच्या देब्युला लो स्कोअरींग मॅच मधे सगळे आउट झाले असताना त्याने ५१ काढल्या होत्या. आपल्या ५ विकेटस गेलेल्या आणि फक्त सत्तरचे लीड. सचिन , द्रविड, अझर, मांजरेकर बॅक टू द पॅविलियन. सुनिल जोशी आणि अनिल कुंबळे च्या साथीत स्कोअर १९० पर्यंत गेला आणि हरत असलेली मॅच आपण ६४ रन्स नी जिंकलो.
http://www.cricinfo.com/india/engine/match/63724.html

फारेंडा, मस्त लेख.

>> काल ओझावर चिडलेला लक्ष्मण पाहून एकदम शारजामधल्या 'त्या' वादळी सामन्यात अशीच चुकीची रन घेताना लक्ष्मणवर चिडलेला सचिन आठवला...)

सहमत. अँक्या तो मेसेज Lol

मस्त लेख फारेंडा! बाकी लक्ष्मण अफाट अतिमुलायम रट्टेबाज आहे! त्याच्याकडे अफलातून टायमिंग आहे.. चेंडू बॅटने नुसता तटवल्यासारखा वाटतो आणि थोड्याच वेळात सीमारेषेपलीकडे असतो.

२००५ च्या पहिल्या तिमाहीत ऑस्ट्रेलिया भारतात आले होते. पहिला मद्रासचा सामना जिंकण्याची भारताला जबरदस्त संधी होती. ४ थ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताला जिंकण्यासाठी २५० च्या आसपास धावा करायच्या होत्या. भारताचा डाव अजून सुरू व्हायचा होता. ५ व्या दिवशी पूर्ण दिवस पाऊस पडल्याने खेळच झाला नाही व भारताचा संभाव्य विजय पावसाने हिरावून घेतला.

२ रा व तिसरा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने भारतात भारताविरूध्द मालिका जिंकली. शेवटच्या ४ थ्या कसोटीत खतरनाक खेळपट्टी होती. भारताच्या दुसर्‍या डावात जेमतेम १५० धावा झाल्या. त्यात सचिन ५५ व लक्ष्मण ६९. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी १२५ च्या आसपास धावा करायच्या होत्या. पण त्यांचा डाव १०० च्या आतच आटोपला. मुरली कार्तिकने ४ बळी घेतले होते. तो सामना जिंकण्यात लक्ष्मणचा मोठा हातभार होताच. ह्या ५५ धावांची खेळी सोडली तर उर्वरीत मालिकेत सचिन पूर्ण फ्लॉप होता (सचिन लागोपाठ ५-६ डाव अपयशी ठरल्याचे हे एकमेव उदाहरण).

Hats Off to Laxman ! ! ! कालच्या खेळीत लक्ष्मणने केवळ मनगटे वळवून मिडविकेटमधून एक अप्रतिम चौकार मारल्याचे पहायला मिळाले आणि डोळे धन्य झाले.

फारेंड, प्रभावी लिहीलंस! कालची मॅच न बघताही त्याचा थरार अनुभवला तुझ्यामुळे. धन्यवाद.
शेवटची विनंती ग्रेट आणि अत्यावश्यक. Happy

मस्त रे फारेंडा! क्रिकेट वर तुझ्या लेखणीतून आलेले वाचायला झक्कास वाटतं, पॅशन जाणवत राहते तुझी! Happy

मग पुन्हा ऑस्ट्रेलिया सिरीज येते, चेंडू पिचवरून डोक्यापर्यंत उडू शकतो हे नव्याने कळते.>>>>>> Lol नव्याने (परत) कळते.

कॉमेंटेटर्सच्या भाषेत सांगायचे तर "बॉईज" आणि "मेन" मधला फरक दिसू लागतो>>>>>> हे मार्मिक आहे एकचदम . Happy

त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या>>>> खरय रे! नाहीतर २० एक वर्षांनी क्रिकेट मध्ये बॅटिंग म्हणजे आडवे तिडवे फटके येवढच उरेल. लक्षमण, तेंडल्या सारखे कलाकार जन्माला येऊन सुद्धा त्यांच्या नशिबाला पुढे कारकुनीच येइल!

Happy

VVS म्हणजे very very stubborn असे हर्श भोगले का म्हणतो ते अशा innings नंतर कळते. लक्ष्मण्चे दुर्दैव हेच कि तो अतिशय तोलमोलाच्या middle order batsmen बरोबर खेळू लागला. त्याच्या नेहमीचा No 3 वर खेळू शकला असता तर ......

very very stubborn लक्ष्मण. कालच क्रिकइन्फोवर परत एकदा मस्त लिहले होते.

अमोल मस्त.

मस्तच रे फारेंडा.. ह्या लक्ष्मणचे आणि ऑस्ट्रेलियाचे लफडे त्याचे कसोटी पदार्पण व्हायच्या आधीपासून आहे. ९३-९४ मध्ये जेव्हा भारताचा under-19 संघ ऑस्ट्रेलियात गेला होता तेव्हासुद्धा लक्ष्मणनेच सर्वात अधिक धावा ठोकल्या होत्या. बहुतेक द्रविड पण त्या संघात होता. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात ब्रेट ली व गिलेस्पी असे खंदे गोलंदाज होते.

लक्ष्मणला कारकिर्दीच्या सुरुवातीला सलामीचा फलंदाज बनवून आयुष्यातून उठवण्याची सोय करुन ठेवण्यात आली होते. पण तेव्हा सलामीचा फलंदाज ही एक अतिदुर्मीळ गोष्ट होती भारतात. नयन मोंगिया ते संजय बांगर - किती आले, किती गेले. लक्ष्मणच्या सुदैवाने त्याला पुन्हा संधी मिळाली. ९९-०० च्या डाउन-अंडर मालिकेत (सचिनच्या नेतृत्वाखाली बहुतेक) आपण चारीमुंड्या चीत झालो होतो. त्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात आपण एका डावाने हारलो पण बाकी कुणी ५० पण धावा केल्या नसताना लक्ष्मणने १६८ हाणल्या. आणि हीच खेळी त्याचे संघातले स्थान टिकवायला कारणीभूत ठरली.
२००१ च्या ऑस्ट्रेलियन 'जगन्नाथात' आपण मुंबईत हारलो. कलकत्त्यात फॉलो-ऑन. आमच्या हॉस्टेलमध्ये अगदी हार्ड-कोअर क्रिकेटप्रेमीसुद्धा चौथ्या दिवशी सकाळी टीव्ही रूम सोडून क्लासरूममध्ये आले होते. मला अजूनही ती सकाळ आठवते जेव्हा एक्का-दुक्का पोरगा टीव्हीसमोर बसून आता हारणारच ह्या भावनेने सामना बघत होता. त्या दिवशी दुपारी कँटीनला जाताना हॉस्टेलकडून जोरजोरात आवाज आले. अजून मॅच कशी काय चालू असेल असा विचार करत मी हॉस्टेलवर पोचलो. टीव्हीरूम तिसर्‍या मजल्यावर होती. दुसर्‍या मजल्याच्या जिन्यापासून पब्लिक तुडुंब भरलं होतं. चौथ्या दिवशीचे तिसरे सेशन सुरू होते. कॅस्प्रोविचला वगैरे हात आडवे करुन पळत येउन बोलिंग करताना व वैतागलेले बघताना मजा येत होती. मला वाटते त्या डावात गिलख्रिस्ट सोडून प्रत्येकाने गोलंदाजी केली होती. पाचव्या दिवशी हरभजनने मॅग्राला पायचीत केल्यावर हॉस्टेलवर पब्लिक अक्षरशः नाचलं होतं. अजूनही त्या सामन्याची क्षणचित्रे पाहताना शहारून येतं.
त्यानंतरच्या स्टीव्हच्या शेवटच्या मालिकेतला सिडनी सामना असो (पुन्हा द्रविड-लक्ष्मण) की पाकीस्तानविरुद्धचे त्याचे शतक असो की अगदी मागल्या मालिकेत श्रीलंकेविरुद्ध त्याने सामना जिंकून दिलेले शतक असो, लक्ष्मणला बघणे हा एक जबरदस्त अनुभव असतो.
चौथ्या डावात लक्ष्मण एव्हडा यशस्वी फलंदाज भारतात नाही. तसेच लक्ष्मणचा ६ वा नंबर म्हणजे बरेचसे करीअर शेपटाबरोबर गेले.

एकदिवसीय सामन्यात लक्ष्मणने ६ शतके ठोकली आहेत. त्यातली ४, पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध (त्यातली पुन्हा ३ ऑस्ट्रेलियात). Happy

परवाच्या डावाचं वैशिष्ठ्य म्हणजे ७९ चेंडूत ७१ धावा.. रडत खडत नाहीत तर जवळपास 'रन अ बॉल' वेगात आणि १०/११ नंबर बरोबर असून सुध्दा.. त्रिवार सलाम...

>>"Everytime he plays against us he comes up with something special and the next thing we >>read after the series is he is dropped! It leaves me completely bewildered."
दुर्दैव वी वी एस चं.. Sad

>>वॉर्न च्या लेग स्पिनला विरूद्ध दिशेने मिडविकेट ला (ऑन साईड) सतत मारल्याने कंटाळून शेवटी स्टीव्ह वॉ तेथे एक फिल्डर लावतो. वॉर्न पुन्हा तसाच बॉल टाकतो. "आता काय करशील" असा विचार त्याच्या डोक्यात यायच्या आतच लक्ष्मण स्वत: लेग साईड ला मागे जाउन आता मोकळ्या झालेल्या ऑफ साईडला फोर मारतो. स्क्रीन वर वॉर्न चा हताश चेहरा आणि मागे "इडन गार्डन" वर ओरडणारे एक लाख लोक!>>
वाह!

>>कॉमेंटेटर्सच्या भाषेत सांगायचे तर "बॉईज" आणि "मेन" मधला फरक दिसू लागतो.
Happy बरोब्बर! Happy

एकदम रोमांचकारी वर्णन फारएण्ड Happy प्रतिसादही तितकेच भारी!

मस्तच रे अमोल!! Happy
फार फार नजाकती खेळाडू आहे लक्ष्मण! रंगात आलेला लक्ष्मण लाईव बघणे म्हणजे पर्वणीच!

बॉईज आणि मेन>> अगदी अगदी! Wink

हे लक्ष्मण Lol

" What country is this that can afford to keep even a batsman of VVS Laxman's class out of its World Cup squad !" हे द.आफ्रिकेतील तज्ञाचे बोल मी कधीही विसरणार नाही !
फारएन्ड, या सुंदर कौतुक लेखाबद्दल धन्यवाद.

Pages