माझ्या आठवणीतली मायबोली- कुमार१

Submitted by कुमार१ on 10 September, 2021 - 22:00

सन २००५. माझे परदेशात अकुटुंब वास्तव्य. परदेशी जाण्यापूर्वी घाईघाईत मुलांकडूनच संगणक शिकलो होतो. तिकडच्या रुग्णालयात स्वतंत्र खोली व डेस्कटॉप मिळाला होता. त्याच्या जोडीला 24तास अनिर्बंध जालसेवा (ही त्यावेळी भारतात हेवा वाटण्यासारखी गोष्ट होती). सुरुवातीस कामातील संगणकीकृत गोष्टी शिकण्यात छान वेळ गेला. पण काही दिवसात त्यातले नाविन्य संपले. आठवड्यातील दोन दिवस सुट्टीचे. घरी एकटाच. मग तेव्हाही काही तास रुग्णालयातच पडीक राहायचो, अर्थात त्या जालसेवेसाठी. एकटेपणा खात होताच. त्यातून मराठीतून संवाद साधण्यासाठी तडफडत होतो. चिंतन करताना शालेय जीवनातल्या कविता आठवू लागलो. जालशोध घेताना त्या पूर्ण स्वरूपात मिळाल्या.

असेच एकदा जालविहार करत असताना अचानक देवनागरीत लिहिलेले मराठी संवाद नजरेस पडले. त्याचे खूप अप्रूप वाटले. नंतर लक्षात आले, की अरे हेच ते मायबोली डॉटकॉम संस्थळ ! आता त्याला जुनी मायबोली म्हणतात. तेव्हाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आपले सदस्यनाव तिथे रोमन लिपीतच लिहावे लागे. मग मी Hkumar या नावाने तिथे दाखल झालो. सुरुवातीच्या उत्साहात आपल्या सदस्यखात्यात मनमोकळी खरी माहिती लिहिली. पण काही दिवसातच एक गोष्ट लक्षात आली. काही सदस्य आपल्या ओळखीच्यांना उघड सांगू लागले की सदस्यखात्यातील तुमची खरी माहिती काढून टाका - विशेषतः आडनाव. त्याचा मथितार्थ मला समजला. मग मीही तसेच केले. सुरुवातीस तिथे स्त्री/पुरुष लिहीणे सक्तीचे होते. पण आता तिथे तुम्ही .... असे लिहू शकता असे दिसते.

अशा या जुन्या मायबोलीवर मी प्रतिसाद देऊ लागलो. आवडलेली वाक्ये, विनोद, माबो लघुरूपे यात छान मनोरंजन होई. मग ‘रेडिओच्या आठवणी’ हा धागा काढला. एकंदरीत मी हितगुजवर फिदा होतो. गुलमोहर फक्त लांबूनच पाहत होतो. संवादात मजा येत होती. आपली मराठी सदस्यनावे रोमन लिपीत लिहील्यावर त्याचा उच्चार काही वेळेस मजेदार होत असे. anaghavn असे एक नाव आठवते. त्याचा ‘आणा घावन’ असा विनोद तेव्हा छान रंगला होता व संबंधित सदस्यही त्यात सहभागी होत्या. सुरुवातीची दोन वर्षे या मायबोलीत अक्षरशः डुंबत होतो. मग यथावकाश जुन्याचे नव्या संस्थलात रुपांतर झाले. तेव्हा प्रशासकांनी सर्वांना आवाहन केले की आता आपले सदस्यनाव देवनागरीत करून घ्या. मग मी त्याचे पालन केले. आता मला निव्वळ ‘कुमार’ हवे होते पण ते न मिळाल्याने त्यापुढे १ आकडा घेतला. परंतु कुमार नाव घेतलेला जो कोण असेल, तो अद्याप तरी मला इथे दिसलेला नाही !

अशा त्या नवीन रुपडे घेतलेल्या मायबोलीत विहार चालूच राहिला. यथावकाश भारतात परतलो. अजूनही मी हितगुज आणि आवडलेले नाटक, चित्रपट या पुरताच सीमित होतो. त्याकाळी मी छापील मासिकांत स्वतंत्र लेखन करीत होतो. ते स्वहस्ताक्षरात पेनाने लिहून त्याचा फोटो ई-मेल ने मासिकांना पाठवी. संपूर्ण लेख जर मायबोलीवर लिहायचा ठरला तर, ‘एवढे टंकनकष्ट आपल्याला नाही जमणार’, अशी मनोवस्था होती. त्यात छापील मासिकात जे लिही त्याला मानधन मिळे. त्यामुळे स्वतंत्र लेखन हे छापील माध्यमासाठी राखीव ठेवले होते. मायबोलीवर प्रतिसादांमधून काही मजकूर लिही. फारतर ‘गावांच्या नावाचा इतिहास’ (https://www.maayboli.com/node/41636) सारखे धागे काढले. अशा धाग्यांमध्ये मला जेमतेम दोन ओळी लिहून तो धागा सुरु करता येई. 2015 च्या सुमारास साहित्यविश्वात हळूहळू छापील मासिके बंद पडू लागली. माझा मुख्य लेखनाचा आधार ‘अंतर्नाद’ मासिक होता. त्यालाही घरघर लागणार हे दिसू लागले होते. मग मलाही बदलणे भाग होते. स्वतःला बजावले की आता भविष्यातील लेखन इ-माध्यमात(च) करावे लागेल. त्यासाठी टंकनश्रमाची तयारी करावी लागेल. तेव्हा मी डेस्कस्टॉप वापरी. जेव्हा स्वतंत्र लेखाचे टंकन सुरू केले तेव्हा हाताचे कोपर व बोटे दुखून येत. त्यात मी पडलो कळफलकाकडे बघून दोन बोटांनी टंकन करणाऱ्यातला ! एक लेख लिहायचा तर तो सात ते दहा दिवसांचा कार्यक्रम असे.

आता मी निव्वळ हितगुजवासी न राहता गुलमोहरात प्रवेश केला होता. आधी मी एक युक्ती केली. ‘अंतर्नाद’ मधील माझे सर्व लेख इथे पुनर्प्रकाशित करण्यासाठी संबंधित संपादकांची परवानगी घेतली. मग त्यात काही सुधारणा करून ते इथे प्रकाशित करू लागलो. दमादमाने त्या लेखनाला वाचकांचे प्रतिसाद देऊ लागले. सुरुवातीस ते मोजके होते. पण ‘भुकेले आणि माजलेले’ (https://www.maayboli.com/node/62370) या लेखाने प्रतिसादसंख्येचा कळस गाठला. ज्या मूळ छापील लेखाला पूर्वी जेमतेम 15 प्रतिसाद मिळाले होते त्याच्या पंधरा पट प्रतिसाद इथे मिळाल्याने झालेला आनंद काय वर्णावा ? अशा तऱ्हेने माझे पूर्वीच्या छापील लेखनाचे इथे पुनर्प्रकाशन चालू झाले. ललितगद्य या प्रकारात मी खूष होतो. छान रमलो होतो. आरोग्यलेखनाची कल्पना मात्र मी मनात अनेक वर्षे झटकून टाकत होतो. विरंगुळा म्हणून आपण लिखाण करायचे असेल तर मग पुन्हा त्याच त्या मधुमेह व हृदयविकारात का अडकून पडा, असे वाटे. दरम्यान आमच्या वैद्यक संघटनेच्या मासिकाचा एक अंक ‘इन्सुलीन विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यातील या औषधाचा इतिहास मी वाचला मात्र आणि अक्षरशः झपाटलो. मग मला राहवेना. हा मनोरंजक भाग मराठी वाचकांसाठी लिहिलाच पाहिजे असे तीव्रतेने वाटले.

अशा तऱ्हेने ‘इन्सुलिनचा शोध : वैद्यकातील नवलकथा’ (https://www.maayboli.com/node/64203) हा लेख लिहिता झालो. या लेखाने मी मायबोलीवरील आरोग्य लेखनाचा श्रीगणेशा केला. त्यावर वाचकांशी छान संवाद झाल्यानंतर मला ‘कोलेस्टेरॉल’ खुणावू लागला. मग त्यावरही लेखन केले. आता माझ्या लक्षात आले, “अरे, जे लेखन स्वतःला कंटाळवाणे वाटेल या शंकेपोटी मी टाळत होतो, तेही इथे तेवढाच आनंद देत आहे”. मग मोठ्या उत्साहात तेही लेखन चालू झाले. त्यातून झालेला वाचकसंवाद ही माझी आनंदयात्रा होती, आजही आहे.
पुढे आरोग्य आणि ललितगद्य हे दोन्ही प्रकार मी इथे हिरीरीने लिहू लागलो. ते दोन्ही प्रकार एकमेकांशी कधी स्पर्धा करू लागले ते माझे मलाच कळले नाही. दरम्यान मला इथले मराठी भाषा, व्याकरण इत्यादी संबंधीचे धागेही आवडू लागले होते. त्यावर कितीतरी भाषाप्रेमी मोलाची माहिती देतात. मग तिथे रमू लागलो.

गेल्यावर्षी कोविडने जगभर हाहाकार माजवला. त्या विषयावर मी इथे लेखमाला चालू केली. त्यातील वाचकांच्या प्रश्नोत्तरांमध्ये कमालीचा व्यग्र राहिलो. मात्र त्यातून जबरदस्त शीण जाणवे. मग त्यावर उतारा म्हणून मी इथे शब्दखेळ (https://www.maayboli.com/node/74491) धागा सुरु केला. तिथे आम्ही सुमारे पंधरा जण जमून धमाल उडवू लागलो. पुढे त्या धाग्यांचे बरेच भाग निघाले. तेव्हापासून तिथे जमणारे आम्ही डझनभर सदस्य अक्षरशः शब्दव्यसनी झालेलो आहोत. गेल्यावर्षी संगणकावरील बोल्-लेखन सुविधा शिकलो. त्या कामात प्रकाश घाटपांडे आणि डॉ. सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यामुळे आता टंकनश्रम कमी झालेत आणि लेखनाचाही वेग वाढला आहे. मागच्याच आठवड्यात मायबोलीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘माबो गंमतगूढ’ (https://www.maayboli.com/node/79911) या प्रकारचा शब्दखेळ चालू केलेला आहे. तिथे सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद लुटत आहेत.

तर असा हा माझा १६ वर्षांचा मायबोली प्रवास. त्यातून भरपूर आनंद मिळाला. अनेकांशी व्यक्तिगत संपर्क होऊन मैत्री झाली. काही सदस्यांनी तर आपल्या नाजूक आरोग्य समस्यांविषयीही मोकळेपणाने चर्चा केली. इथे नाममात्र दुःखही मिळाले. वास्तव जग काय किंवा संस्थळ काय, शेवटी आपण माणसेच तिथे वावरतो. त्या मानवी गुणदोषांचे परिणाम एक समूह म्हणून आपल्यावर होणे अटळ असते. या लेखाचा विषय भावनिक असल्याने मोठ्या कष्टाने त्याच्या व्याप्तीवर ताबा ठेवत आहे.

भविष्यातील माझा मायबोली प्रवास कसा असेल ? कालांतराने लेखन थांबवणे, मग फक्त प्रतिसादलेखन आणि त्याही पुढे जाऊन निव्वळ वाचनमात्र ? माहित नाही. आज काय वाटतंय त्याचा हा एक अंदाज. ते जे काही होईल ते होवो. पण एक गोष्ट नक्की असेल. ते म्हणजे, मला लागलेलं मायबोलीचे व्यसन हे जन्मभर सुटणार नाही.

माबोचे निर्माते अजय यांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्व वाचक मित्रांचे मनापासून आभार.
मायबोली चिरायू होवो !
धन्यवाद.
…………………………………………………………………………………..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलंय!

शब्दखेळ धाग्यावर खरंच खूप मजा केली आहे.>>>> +१.

काय सुंदर लिहीले आहे. _/\_
>>>>परंतु कुमार नाव घेतलेला जो कोण असेल, तो अद्याप तरी मला इथे दिसलेला नाही !
हाहाहा!!! उगाच अडवुन ठेवलं नाव बेण्यानं.

फार सुंदर आणि प्रांजळ लेख.

छान लिहिलंय कुमार1
तुमचे बरेच लेख संयत आणि नवी माहिती देणारे असतात.

आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचा मी मनापासून आभारी आहे !

आपणा सर्वांची विविध धाग्यांवर भेट होत असतेच.
पण या निमित्ताने दत्तात्रय यांची मात्र खूप दिवसांनी भेट झाली आणि आनंद वाटला !

कुमार सर
मी मधे या.बो. वर नव्हतो.
मलाही आनंद झाला...तुमचं अभ्यासपूर्ण लिखाण मला सतत भुरळ घालतं.

द सा
लवकर इथे लिहिते व्हा !
तुमच्या सुंदर कवितांची प्रतीक्षा आहे...

छान लिहिलंय!

तुमची कोडी (शब्दखेळ) छान असतात. सोडवायला मजा येते. दरवेळी उत्तर बरोबर येतच अस नाही माझं, पण सोडवण्याची प्रोसेस आवडते मला

Chaan

आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचा मी मनापासून आभारी आहे !

कविन
तुम्ही शब्द खेळांमध्ये भाग घेऊन प्रयत्न करता हेच खूप महत्त्वाचे आहे.
त्या खेळांमध्ये ते सोडवत असताना वाचकांशी जो सुखसंवाद होतो तो आनंददायी असतो.
म्हणूनच मी त्या प्रकाराला कोडी न म्हणता खेळ/ रंजन म्हणणे पसंत करतो.

अतिशय सुंदर नॊस्टॆल्जिया...मेी देखेील सोळा वर्षांचा युवक आहे मायबोलीवर .. त्या रेडियोची लिंक आहे का? त्यावर मी प्रतिसादपर लिहिले होते सर!

आपुलकीने प्रतिसाद दिलेल्या वरील सर्वांचा मी मनापासून आभारी आहे !
................
रेव्यु,
दुवा शोधावा लागेल. धन्यवाद.
तुम्ही पूर्वी वेगळ्या नावाने असावेत
..........
साधना,
धन्यवाद. मी देखील तुमचे लेखन आवडीने वाचतो.

छान लेख...
तुमचे बाकीचे लेखन हि माहितीपूर्ण आणि वाचनीय असते..

रुपाली,
आभार !
....
रेव्यु,
हा तो रेडिओ दुवा : (२००८)

https://www.maayboli.com/hitguj/messages/644/137904.html?1204780369
आणि
वरील घटनेची आठवण करून मी पुन्हा २०२० मध्ये 'दिवस तुझे ते ऐकायचे..' हा धागा इथे काढला:
https://www.maayboli.com/node/73316

Pages