भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच चांगला लेख लिहिलायत तुम्ही. अगदी मन लावून वाचला मी.
मी ही एका मोठ्या कंपनीत नोकरी करते आणि आमच्या ऑफिसच्या बाहेर अनेक टपरी पैकी एका टपरीत मी जेवायला गेले होते. तिथे ताटं उचलणारा कामगार एक पन्नाशी ओलांडलेला माणूस करत होता आणि त्याचबरोबर ताटात उरलेलं सगळं (आधी जेवून गेलेल्या माणसाने टाकलेलं) खात होता... मला अगदी गलबलून आलं. मी त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला म्हटलं हे ३० रुपये घ्या, जेवण ऑर्डर करा आणि जेवा मनसोक्त स्वच्छ पण तो माणूस माझं बोलणं ऐकलं न ऐकल्यासारखं करून निघून गेला. बिल देताना टपरीचा मालक मला म्हणाला आम्ही त्याला जेवू घालतो, पण त्याला अशी ताटात उरलेलं खायची सवयच आहे. Sad
ही एक मी पाहिलेली न शमणारी भूक.

पण काय आहे ना.. अन्नाची भूक असणारे गरजू कितीतरी परवडले, पण पैशाची भूक भागवायला आपलं आयुष्य पणाला लावणारे भिकारी? त्यांचं काय?

अन्न (खाऊन माजा) टाकून माजू नका असे म्हणतात ते खरं आहे.
अन्नाची नासाडी होऊ न देणं आपल्या हातातच आहे. हे वळण सगळ्यांनाच लागले पाहिजे.

दक्षिणा, धन्स. तुम्ही वर्णन केलेली त्या कामगाराची भूक खरेच विचित्र आहे.
पण पैशाची भूक भागवायला आपलं आयुष्य पणाला लावणारे भिकारी? त्यांचं काय? >>> अगदी लाखमोलाचा प्रश्न !

हर्पेन, सहमत.

लेख आवडला! मला तर आजकाल रिसेप्शन मध्ये जेवायची इच्छाच मेलीये.... असं वाटतं बुफे चार अर्थ लोकांना कधी कळणार?

मंजूताई, धन्स.
मला तर आजकाल रिसेप्शन मध्ये जेवायची इच्छाच मेलीये... >>> सहमत. तिथे येणारे जेवढे उच्चशिक्षित तेवढी जास्त अन्नाची नासाडी, असे दिसून येत आहे. ते बघून खूप त्रास होतो.

कळकळीने लिहिलय, अन ते वास्तव आहे.
फक्त किमान "मी" तरी या वास्तवात बसतो तर कसा, याचा विचार वाचकाने केला तर लेखाचे सार्थक झाले.

आमच्याकडे अन्न पानात न टाकण्याविषयी कडक शिस्त होती, इतकी की भान्ड्यात प्यायचे पाणी देखिल अर्धवट सोडुन दिलेले चालायचे नाही. व आमचे वडिलधार्‍यांनी ही शिस्त आम्हाला "मुस्काटात भडकावुन/ भडकावण्याची धमकी" देऊनच आमचे अंगी बाणवली होती.

अजुन एक प्रकार बघायला मिळतो तो म्हणजे खाताना भरमसाठ अन्न खाली सांडविण्याचा. अगदी किळस येते. कॅन्टिनमध्ये असे नग बरेच बघायला मिळतात. तर याबाबतही अन्नाचा एक कणही खाली न सांडवता खाण्याची शिस्त कठोरपणे अंमलात आणली जायची.

छान लिहिलयं.. ते तात्पर्य अस प्रत्येक प्रसंगाखाली लिहिलेल आवडल नाही.. प्रसंगातून ते व्यवस्थित पोहचतय..
बाकी असे सारे प्रसंग कधी ना कधी पाहिलेले.. पैसे देण्यापेक्षा अन्न दिलेले कधीही चांगले..

आणखी एक.. बुफे पद्दत मलासुद्धा आवडत नाही.. खुप नासाडी होते अन्नाची... महत्वाच म्हणजे ताटात अन्न टाकायच नाही हे आपल्याला आपल्या आई वडीलांनी व्यवस्थित शिकवलेलं, पण आजकालचे पालक मात्र त्याबाबतीत उदासिन दिसतात... इथे आपण लहानपणी रट्टे खाल्ले तर काही वाटायचं नाही पण आजकाल लेकरांना पालकांची ना सुद्धा मंजुर नसते..त्या छटाक वयाच्या पोरांची अस्मिता वगैरे दुखावते.. या गोष्टीसाठी मलातरी पूर्णतः मोठे लोक जबाबदार वाटतात...फुकटात मिळालं कि ओरबाडून खायची सवय बाकी काही नाही..
माझ्याकडे अजुनही हॉटेमधे गेल्यावरही उष्ट टाकू देत नाही.. ओरडा बसतोच..

नँक्स, लिंबू, महेंद्र व विनिता : आभार !
टीना : तुमच्या सूचनेची दखल घेतो. आभार.

आमच्याकडे अन्न पानात न टाकण्याविषयी कडक शिस्त होती, इतकी की भान्ड्यात प्यायचे पाणी देखिल अर्धवट सोडुन दिलेले चालायचे नाही. व आमचे वडिलधार्‍यांनी ही शिस्त आम्हाला "मुस्काटात भडकावुन/ भडकावण्याची धमकी" देऊनच आमचे अंगी बाणवली होती. >>>
अगदी योग्य मुद्दा. सहमत. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीबचतीसाठी अनेक सूचना केल्या जातात. 'हॉटेलमध्ये ग्राहकांसमोर पाण्याने भरलेले ग्लास ठेउ नका', 'घरी पाहुण्यांसमोरही तांब्याभांडे ठेवा, म्हणजे लागेल तेवढेच पाणी घेता येते' ...इ.

पण, तरीही बरेच लोक पाण्याची नासधूस करीत राहतात.

खूप सुंदर लेख! माझ्या मनाला नेहमी छळणारे असे हे प्रसंग आहेत.
हॉटेल, समारंभ ह्या ठिकाणी तर अन्नाची नासाडी करतातच. पण धार्मिक ठिकाणी मिळणारा "महाप्रसाद" सुद्धा भरपूर घेऊन टाकणारे महाभाग बघीतलेत मी. वाढताना प्रमाणात वाढलं, आणि "अजून हवं असेल तर हे संपवून परत या" असं सांगितल तर राग येतो. वाद घालतात. जास्त प्रमाणात घेऊन, नंतर अर्ध्यापेक्षा जास्त ताट टाकून दिलं जातं, वाढताना, नको असेल तर नको, किंवा कमी वाढा हे सांगणं नाहीच. घ्यायचं आणि टाकून द्यायचं. वाढलेल ताक सुद्धा टाकून दिलेलं मी पाहिलेय. संताप संताप होतो. काही बोलून उपयोग होत नाही. ऐकून न ऐकल्यासारखं करून निघून जातात.
अशा लोकांना काहीतरी कडक शिक्षा केली पाहिजे. ज्यामुळे ह्या गोष्टींना जरा तरी आळा बसेल.

ज्यांना मिळत नाही ते अन्न अन्न करून मरतात. आणि ज्यांना मिळतय ते टाकून देतात. Angry Angry

छान लेख.
अन्न वाया घालवणे खरेच वाईट. मग ते गरजे पेक्षा जास्त वाढून घेऊन टाकुन देणे असो की उरतय म्हणुन जबरदस्तीने पोटात ढकलणे असो.
जास्त वाढून घेतल्याची / वाढल्या गेल्याची चूक लक्षात आल्यास, जास्तीचे अन्न ताटात अथवा पोटात टाकून देण्यापेक्षा पार्सल करुन नेणे आणि ते पुढल्या खाण्याची वेळी खाणे अथवा ते शक्य नसेल तर गरजुंपर्यंत पोचवणे योग्य. अशी सवय मुलांनाही लावावी ( लेखातील दुसरा प्रसंग.)

मुलांवर लहापणीच हे संस्कार केले तर, पुढे ती नीट वागू शकतील. पण पालकांनाच ती चूक वाटत नसेल तर? तेच जर अन्न टाकत असतील तर मुल तेच करणार.

कधीकाळी असलेल्या सुबत्तेतून हे सर्व आलेय. एका राज्यात ताटात काही न टाकणे हा ताटाचा अपमान समजला जातो.
काही घरात, जेवणार्‍याने मागण्या आधीच त्याच्या ताटात तो पदार्थ पडला पाहिजे, या कडे कटाक्ष असतो.

लिंबू म्हणतोय ते संस्कार आमच्या घरातही आहेत. पदार्थाची भांडी मधे ठेवली जातात व आपल्या हाताने वाढून घ्यायचे
अशी पद्धत आहे. भांड्यातील पदार्थ संपत आला असेल तर आणखी कुणाला हवा आहे का, ही विचारपूस करायची
सवयही, लहानपणापासूनच आहे.

आंम्ही पण सगळे असेच जेवायला बसतो मध्ये सगळी भांडी घेवुन.. वाढणे नाहि.. ज्याला जितके हवे तितकेच वाढुन घ्यायचे.. त्यामुळे कुणाला कमी अधिक होत नाहि.. शिवाय संवाद साधणे होतंच..

खरंच सुन्दर लेख अन्न हे पुर्णब्रम्ह या वचनावर माझा पुर्ण विश्वास आहे त्यामुळे मि ताट इतके स्वच्छ पुसुन खातो कि माझ्या बाजुचे म्हणतात कि आता तुझे ताट धुण्याचिहि गरज नाहि त्यामुळे हा लेख वाचुन आधि मि स्वतःलाच शाबासकि दिलि
पण या विषयावर खरोखरच प्रबोधनाचि गरज आहे.

>>> कधीकाळी असलेल्या सुबत्तेतून हे सर्व आलेय. एका राज्यात ताटात काही न टाकणे हा ताटाचा अपमान समजला जातो.
काही घरात, जेवणार्‍याने मागण्या आधीच त्याच्या ताटात तो पदार्थ पडला पाहिजे, या कडे कटाक्ष असतो. <<<<

अहो दिनेशभाऊ, याशिवाय, पुरुषाने ताटात काहीतरी सोडूनच दिले पाहिजे म्हणजे त्याच्या बायकोला ते मिळते अशा अर्थाची अत्यंत घाणेरड्या सासुरवासाची कल्पनाही मी अनेक "आचरट स्त्रीपुरुषांमधे" पाहिली आहे.

अगदी चहाच्या कपातही थोडा चहा तसाच सोडून देणारे नग आहेत.

लिंबू, दिनेश आणि मिस्टर पंडीत तुमच्या पोस्ट्स आवडल्या.
आमच्यावर बाबांनी कधीच हे करा ते करा असं सांगून संस्कार केले नाहीत. त्यांचं ताट आज ही ( सत्तरी ओलांडल्यावर) पहावे तर उत्तम आणि स्वच्छ जेवतात. जितकं हवं तितकंच घेतात, एखाद घास कमीच खातात आजकाल पण मी माझ्या उभ्या आयुष्यात त्यांच्या बरोबर जी काही २०-२२ वर्ष जेवली असेन त्यात एकदाही अन्नाचा एक कण टाकताना ही पाहिलेलं नाहिये उलट कधी आम्हाला एखाद दोन घास जास्त झाले तर ते स्वतःच्या ताटात घेऊन आम्हाला संपवायला मदत करत. पण जात नसेल तर "दे टाकून" असं आम्हाला कधीच बोलले नाहीत. शिवाय आवड निवड सुद्धा नाही त्यांना जे असेल ते सोन्याचा घास मानून खातात. मी आणि माझी बहिण हे पहातच लहानाच्या मोठ्या झालो. त्यामुळे वीज, पाणी वाचवणे, आणि अन्नाची नासाडी टाळणे हे आम्ही त्यांच्या कृतीतून शिकलोय. अक्षरशः अभिमान वाटतो मला. काही लोकांना काटकसर वाटते पण रस्त्यावर भुकेले आणि पाणी टंचाईच्या काळात डोक्यावर घागरी घेऊन मैलोनमैल चालणारे गावकरी पाहिले की हळहळ होते.

मि ताट इतके स्वच्छ पुसुन खातो कि माझ्या बाजुचे म्हणतात कि आता तुझे ताट धुण्याचिहि गरज नाहि >> पंडित जी, मला पण असेच म्हणतात लोक, तर काही लोकांना तो आशाळभूतपणा वाटतो आणि म्हणतात इतकं चाटू नको ताट आणखी हवं असेल तर घे. पण त्यांना कळत नाही आपलं ताट स्वच्छ होते तोच क्षण असतो आपलं पोट भरण्याचा, जो आणखी ताटात घेऊन पुरा होत नाही. Happy
बरोबर ना?

शोभा, भावना, मानव, अमा व पंडित : आभार !
मी ताट इतके स्वच्छ पुसुन खातो कि माझ्या बाजुचे म्हणतात कि आता तुझे ताट धुण्याचिहि गरज नाहि >>>
खूपच छान. मी सुद्धा कधीकधी आपल्या बरोबर बसलेल्या मुलांवर संस्कार व्हावे म्हणून ताटातील उरलेली लिंबाची फोड देखील चावून खातो !

मुलांवर लहापणीच हे संस्कार केले तर, पुढे ती नीट वागू शकतील. पण पालकांनाच ती चूक वाटत नसेल तर? तेच जर अन्न टाकत असतील तर मुल तेच करणार. >>> सहमत. भरपूर पालक आहेत असे.

मी तर घरी मुलीना त्यान्ना समजेल अश्या भाषेत सान्गते, जगात काही मुलाना अन्न मिळत नाही, दूध मिळत नाही..मग आपण अन्न असे वाया घालणे योग्य नाही...आशा आहे की ह्याचा काही उपयोग होईल Happy

एवढ्यातच माझ्या मुलाला अन्नपदार्थाची हेळसांड केल्याबद्दल दिवसभर उपाशीच ठेवले होते. वेळच्या वेळी, मागेल तेव्हा जेवण, पाहिजे ते खाणे, नको ते नाकारणे असल्या सवयी लगेच मोडाव्यात असे माझे मत आहे.

बरेचदा त्याला सांगून, समजावून पाहिले. पण परत पाढे पंचावन्न व्हायचे. मग काय ठेवला दिवसभर उपाशी. रात्री विचारलं त्याला, भूक कशाला म्हणतात कळलं काय? मग समजावलं की उपाशी राहिलं, खायला मिळाले नाही की कसे वाटते, मग सांगितले असे लाखो-करोडो लोक दिवस-दिवस उपाशी राहतात, त्यांना खायला मिळत नाहीत, तुझ्यासारखी लहान मुले फक्त रडतात पण त्यांना कोणी खाऊ घालत नाही. मग त्याला फार रडायला आले. तसा तो खूप समजूतदार, हळवा आहे, पण अन्नपदार्थाबद्दल आदर असला पाहिजे हे भोगल्याशिवाय त्याला कळले नाही. आता ताटात आलेले काहीही खातो, कधी चुकून नाकारले तर त्याला फक्त त्यादिवसाच्या भूकेची आठवण करुन द्यावी लागते.

हे तर अन्नाचे झाले. आमच्या घरी वर्षाचा गहू घेऊन, उन्ह देऊन डेगेत साठवतो. ते भरताना बाबा माझे कण न कण सांभाळून भरायचे. कधी आमच्याकडून सांडले भरताना तर कटाक्षाने उचलायला लावायचे. त्याला कंटाळा केला तेव्हा एकदा त्यांनी खडसावले होते, म्हणले की हे गहू पिकवायला आणि आपल्या पर्यंत आणायला ज्यांनी घाम गाळलाय त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि ते विकत घ्यायला आपण केलेल्या कष्टांचीही.
त्यानंतर कधीच आयुष्यात माज केला नाही.
अन्न वाया घालवणे हे पाप हेच कायम मनावर ठसले

पंडित आणि दक्षिणा, उत्तम.
माझ्यामते हे ताट चाटून पुसून स्वच्छ करणे ते करु शकातात जे व्यवस्थित भूक लागली की जेवतात आणि जास्त खाणे होण्याच्या आत जेवण थांबतात.

आपलं ताट स्वच्छ होते तोच क्षण असतो आपलं पोट भरण्याचा>>>> अेकदम सहमत!

छान लेख, सहमत आहे.

अश्या लेखावर अन्नाची नासाडी न करणार्‍यांकडूनच जास्त प्रतिसाद येतात. म्हणून मला ईथे लिहिणे गरजेचे वाटले. कारण माझ्याकडून बरेचदा अन्नाची नासाडी होते. अर्थात मी काही फार मोठा पैसावाला आहे म्हणून मला माज आहे आणि त्या कारणाने अन्नाची नासाडी करतो अश्यातला भाग नाही. तसेच माझी आई टिपिकल काटकसरी स्वभावाची गृहीणी आहे. पाच पैश्यांचा अनावश्यक खर्च झाला तर त्या चिंतेत रात्रभर तिला झोप येत नाही. त्यामुळे अन्नाचीच काय कुठलीही नासाडी तिच्याकडून होत नाही. म्हणून माझ्यावर घरचेच संस्कार चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. तरी नासाडी ही माझ्याकडून होतेच म्हणून स्वत:शीच कारणे शोधायचा प्रयत्न करतो.

पहिले आणि मुख्य कारण म्हणजे न टाळता येणारे नावडीचे पदार्थ. शाकाहारात मला फारच कमी पदार्थ आवडतात. ज्या दिवशी जेवणात मांसाहार असतो तेव्हा माझे ताट घासून पुसून लखलखीत असते. ऑफिसमध्ये कोणा मित्राच्या डब्यात नॉनवेज असले तरी मग तो डब्बा चाटून पुसून साफ करायची जबाबदारी मी माझीच समजतो. पण तेच जेव्हा शाकाहाराशी बत्तीस दात करायचे असतील तेव्हा मात्र मला माझ्याच डब्यातली भाजी संपत नाही. ईतरांनी शेअर करून संपवली तर ठिक अन्यथा रोजची ठराविक नासाडी ठरलेलीच. पण तरीही रोज डब्यात ठराविक भाजी मिळतेच. कारण जर एखाद्या दिवशी कामामुळे मला सर्वांसोबत जेवायला जाता आले नाही आणि एकटेच जेवावे लागले तर नाईलाजाने स्वत:चीच भाजी खावी लागते. तेव्हा ती पुरली पाहिजे ईतकी डब्यात असतेच. अर्थात सरासरी ५ पैकी ३ दिवस डब्यात मांसाहार असल्याने असे नासाडीचे शाकाहारी वार आठवड्याला सरासरी दोनच असतात. त्यातही ईतरांनी माझी भाजी संपवली तर प्रश्न मिटतो. मी स्वत: लोकांच्या डब्यातील माझ्या आवडत्या भाज्या अधिक माझ्या स्वत:च्या डब्यातील भाजी थोड्या थोड्या खातो. एकच एक भाजी मला जास्त खाता येत नाही. पण त्याबदल्यात ईतरांनी माझी भाजी फारशी घेतली नाही तर ऊरलेल्याची नासाडी होते.

आणखी एक कारण म्हणजे बुफे जेवणपद्धती. त्यात हवे तेवढे घेता येते, पण प्रॉब्लेम असा असतो की मला माझ्या पोटाचा अंदाज कधी येत नाही. घरी आमच्याकडे अशी पद्धत आहे की सगळे टोप पुढे ठेवतात आणि डाव्या हाताने हवे तेवढे आपले आपण घ्या. मी थोडे थोडे दहा वेळा घेतो. एक दाणा फुकट जात नाही. पण हेच बुफेमध्ये करता येत नाही. कारण आपली बसायची जागा एकीकडे आणि काऊंटर एकीकडे, त्यात तिथे लांबलचक रांगा लागलेल्या असतात. जेवणाच्यामध्ये चार वेळा उठून जात थोडे थोडे आणने फार त्रासदायक असते. त्यामुळे थोडे कमी जेवण घेत उपाशी आणि असमाधानी राहण्यापेक्षा मी थोडे जास्त घेत नासाडी करण्याला प्राधान्य देतो. त्यात लग्नाचे जेवण शाकाहारीच असते. कुठली भाजी आवडेल आणि कुठली नाही हे त्या रांगेत चव घेत घेत ठरवणे अवघड असते. त्यामुळे सगळे माफक प्रमाणात घेतले जाते आणि अगदीच नावडीचे टाकले जाते.

हॉटेलमध्ये मात्र मी सरळ पार्सल घेतो. डिशच्या क्वांटिटीचा अंदाज नसतो आणि असला तरी हाल्फ घ्या किंवा हवे तेवढेच घ्या असा प्रकार नसतो. तसेच दोघांमध्ये वरायटी खायची असेल तर बरेच प्रकार मागवा आणि थोडे थोडे खात उरलेले पार्सल घ्या हे बरे पडते.
एकदा या पार्सलवरून माझे छोटेसे भांडणही झालेले. फारच कमी अन्न शिल्लक राहिलेले आणि तिकडचा वेटर याचे पार्सल मिळणार नाही बोललेला तेव्हा त्यांच्या मॅनेजरला बोलावून भांडलेलो. पैसे घे हवे तर पॅकिंगचे, पण पार्सल करच. पहिले हट्टीपणाने तो मॅनेजर सुद्धा नाही बोलला, मग मी सुद्धा ऐकत नाही आणि वाद वाढतोय म्हटल्यावर आपल्या हॉटेलचे रेप्युटेशनचा विचार करता त्याने माघार घेतली. पॅकिंग चार्जेस न घेता ते चिमूटभर अन्न पार्सल करून दिले.

अजूनही किस्से लिहिता येतील विषयाला अनुसरून, पण आता झोप आल्याने शुभरात्री Happy

Pages