माझ्या आठवणींतली मायबोली - स्वाती आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 September, 2021 - 12:20

बाप रे! पंचवीस?! मायबोली पंचवीस वर्षांची झाली?!
(मनात : 'गद्धेपंचविशी आली की!' वगैरे सणासुदीला म्हणू नये! प्रेमानेसुद्धा!!)

माझा स्वतःचा दुसरा पंचविसावा वाढदिवस जवळ येतो आहे तसतसं आयुष्यातलं सातत्याचं महत्त्व मला अधिकाधिक जाणवायला/पटायला लागलं आहे. एखादी छोटीशीसुद्धा कृती ठाम संकल्पाने अडीअडचणींना न जुमानता सातत्याने करत राहिलं की काही काळाने ती आपल्या अस्मिते(आयडेन्टिटी)चा भाग होऊन जाते. त्या छोट्याश्या कृतीचं सातत्य जपायलाही खूप मानसिक बळ लागतं खरं, पण मग तीच कृती बर्‍यावाईट काळात तुमचं मन स्थिर ठेवायला मदत करणारा एक टेकू / अँकर होऊ शकते.
'कोऽहम्' हा तसा अनादिअनंत प्रश्न. या आयुष्यात त्याचं एक उत्तर मग 'कुठल्याही परिस्थितीत अमुक एक कृती करणारी व्यक्ती ती मी' असं स्वतःलाच देता येतं.

ही 'मी कोण'ची जाणीव आणि स्मृती किती महत्त्वाची आहे याबद्दलचा 'वैधानिक इशारा' श्रीकृष्णाने गीतेत देऊन ठेवला आहे.
क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः। स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति||

'क्रोध सेहत के लिये हानिकारक' का आहे? कारण तो ही स्मृती विस्कटून टाकतो (डिस्टॉर्शन). आणि ती एकदा डिस्टॉर्ट झाली, की विनाश अटळच!

असो, तर हे (प्रथेनुसार! हो! आपण प्रथाबिथा एकदम सीरियसली घेतो!) नमनालाच घडाभर तेल झालं.

तर सांगायचा मुद्दा काय, की मायबोली हे संकेतस्थळ, हा उपक्रम गेली पंचवीस वर्षं कुठल्याही अडिअडचणींना न जुमानता आपली एक ओळख टिकवून टिकून आहे, नव्हे बहरतोच आहे ही बाब नक्कीच अभिनंदनीय आणि अभिमानास्पद आहे. अभिमानास्पद कारण आपण सगळेच या प्रवाहाचा आणि प्रवासाचा अविभाज्य भाग आहोत.
पहिलं मराठी संकेतस्थळ, पहिला ऑनलाइन गणेशोत्सव, पहिला ऑनलाइन दिवाळी अंक, पहिला दृक्श्राव्य दिवाळी अंक... मायबोली हे अनेक आधुनिक सांस्कृतिक उपक्रमांचं उगमस्थान आहे.
(मनात : अशी ही मायबोली मला फार फार आवडते. जयहिंद!)

मला स्वतःला मायबोलीची ओळख झाल्याला पंधराएक वर्षं सहज होऊन गेली. अनेकांप्रमाणेच अमेरिकेत स्थायिक झाल्यावर 'माझिया जातीचा मज भेटो कोणी' ही तहान लागली तेव्हा सुदैवाने मायबोलीचा शोध लागला. आधी वाचनमात्र, मग काही काळ लेखनमात्र (गुलमोहोर एके गुलमोहोर!), मग संयोजन/संपादनमात्र, मग वाद/चर्चामात्र असं करत करत 'आयडी म्हणे आता | उरलो वात्रटपणापुरता||' असा हा प्रवास होत आलेला आहे.

थांबा थांबा, झालेलं नाही!
आता प्रश्नोत्तरांचा तास.
प्रश्न आणि त्यांचा क्रम सोयीनुसार बदलू.

- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
तांत्रिक बाजू वगळता का ही ही नाहीत!
'आमच्यावेळी असं नव्हतं!' असं म्हणणारे, 'जुने नव्यांना त्रास देतात' अशी खात्री असणारे, 'मायबोली ब्राह्मणधार्जिणी आहे' इथपासून ते 'इथे ब्राह्मणद्वेषाला फार खतपाणी घालतात' अशा प्रकारचे जात्याधारित(च) विचार करू शकणारे, राजकारणावर चिडणारे, क्रीडाविभागांत रडणारे, गुलमोहोरावर पडलेले, 'सग्गळं जग मलाच त्रास द्यायला टपलेलं आहे, तेव्हा मी इथून जातो/जातेच्च कसा/शी' या भावनेने पछाडलेले, मिंगलिशमध्येच रखडणारे आणि 'देवनागरीत लिहा' म्हणून ओरडणारे इ. इ. या आगगाडीचे निरनिराळे डबे आहेत. यात निरनिराळे आयडीज चढत-उतरत असतात. थोडक्यात नवनवीन संचांत तेच नाटक सुरू राहातं.

याच्या उलटा प्रश्न - मायबोलीवर काय बदलेलं नाही.
"गुलमोहोरातल्या लेखनाला आम्ही दर्जाची कात्री लावणार नाही. कोणीतरी मराठीत काहीतरी लिखाण करतं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे." हे फारा वर्षांपूर्वी एका वादात वेबमास्तरांनी ठणकावलं होतं. त्या वादात ते माझ्या विरुद्ध पक्षात होते, पण नंतर विचारांती आणि अनुभवांती मला हे धोरण अत्यंत पटलं आणि ते मायबोलीने बदलेलं नाही याचा मला व्यक्तिशः खूप आनंद वाटतो.

- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली
'माझ्यासाठी नवीन', 'ग्रूपमध्ये नवीन' यांसारख्या वर्गवार्‍या. कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन वात्रटपणा करायची हुक्की आली की कुठे टिचकी मारायची हे पटकन समजतं.

- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती
आपल्याला अप्रत्यक्षपणेसुद्धा कोणी काही बोललं तर त्याला प्रतिसाद नाही दिला तरी चालतो हे मला अनेक वर्षं माहीतच नव्हतं, अजूनही कधीकधी विसरायला होतं.

- तुम्ही मायबोलीला काय दिलं
लेखन, उपक्रमांच्या संयोजन / संपादनात सहभाग, काही वाहाती पाने वाहावत नेणे.

- तुमचं कुठलं लेखन गाजलं
सहसा सगळ्याच लेखनाला मला अत्यंत सहृदय आणि मननीय प्रतिसाद मिळालेले आहेत आणि मंडळ त्यासाठी अत्यंत आभारी आहे आणि राहील!
तरीही नवीन मायबोली नवीन असताना लिहिलेली उत्तर ही कथा लक्षात आहे.
जुन्या मायबोलीच्या एका दिवाळी अंकातल्या या कहाणीचीही परवाच कशावरूनतरी आठवण निघाली होती. एका 'मराठी भाषा दिवसा'च्या 'केल्याने भाषांतर' या उपक्रमाच्या घोषणेतील आणि प्रवेशिकांतील भाषांतरं अनेकांनी आवडल्याचं कळवलं होतं.
बाकी क्रॅनबेरी सॉस/चटणी आणि नारळीभात अजूनही ऋतुमानानुसार वर येतात.

- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
बहुतांश गांजागांज (!!) ही वाद/चर्चांत केली. अगदी लेखनाचा धागा काढून केलेली एखाददुसरीच असेल. हवं तर लिंका देते, पण आता कशाला ते!

- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
मायबोलीने मला काय दिलं? खूप काही दिलं. अनंतहस्ते दिलं!
आपल्या भाषेत आपल्या आवडीच्या विषयांवर (आपला विनोद (आणि उपरोधही) कळणार्‍या) लोकांशी आपल्या वेळेत गप्पा मारता येणं यात सांगण्यासारखं काही नाहीही आणि आहेही! नवीन आले तेव्हा माझी समजूत 'हे यन्नारायनी यन्नारायांसाठी' चालवलेलं संकेतस्थळ अशी होती. उगाचच, पण होती खरी. किंबहुना यन्नारायांना वाटेल तितकं याचं अप्रूप महाराष्ट्रात राहाणार्‍यांना का वाटत असेल याचं कुतुहलही वाटायचं. पण बदलत्या जीवनशैलीत जगभरातल्या त्या टिचक्या क्यूबिकल्समध्ये दिवस घालवणार्‍यांना ही एक केवढी मोठी खिडकी मायबोलीने उघडून दिली होती!

सहज म्हणून गप्पा मारतामारता जगभरातले किती सुहृद जोडले गेले! किती वेगवेगळे मतप्रवाह दिसले (काही कळलेही!).
जिवश्च मैत्रं झाली तशी कडाक्याच्या वादावाद्या आणि वितुष्टंही आली. नेटिझनशिपचं नागरिकशास्त्र इथे शिकायला मिळालं.
मध्यंतरी एका चर्चेत लिहिलं तसं जाणिवेत आणि नेणिवेतही बरंच शिक्षण झालं. (कॉन्शस आणि सबकॉन्शस लर्निंग).
लिहिण्यात रस होता तो छंद मायबोलीसारखं व्यासपीठ विनाशुल्क आणि सहज उपलब्ध झाल्यामुळे फुलला, बहरला. आपल्याच भाषेचे निरनिराळे कंगोरे, पैलू (आणि टोकं)ही कळले, आस्वादकांमुळे कला आणि कलाकारही कसे श्रीमंत होत जातात याचा प्रत्यक्ष अनुभव आला.
इथे भाजलेल्या लष्करच्या भाकर्‍या आजन्म लक्षात राहाण्याइतक्या एकाच वेळी दमवणार्‍या आणि अपूर्व आनंददायी होत्या!
'अमेरिकेतले मायबोलीकर' हे तर आता विस्तारित कुटुंबच झाले आहेत. मलाच नव्हे तर माझ्या मुलांसाठीसुद्धा काकामावश्यांचं जाळं मायबोलीमुळेच विणलं गेलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या आपदाविपदांत या सर्वांचा मला फार मोठा आधार झालेला आहे!

'इथे नुसतं आलं ना, तरी बरं वाटतं; घरी आल्यासारखं वाटतं' असं वाटणार्‍या काही थोड्या जागा असतात - माझ्यासाठी मायबोली अशी जागा आहे.
(आय नो, आय नो, टडोपा वाक्य आहे. म्हटलं ना, आपण प्रथाबिथा एकदम सीरियसली घेतो!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहीले आहे स्वाती. मनापासून. कोणती सोय माहीत नव्हती चे टंग इन चीक उत्तर फार फारच आवडले.
>>>>>मलाच नव्हे तर माझ्या मुलांसाठीसुद्धा काकामावश्यांचं जाळं मायबोलीमुळेच विणलं गेलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या आपदाविपदांत या सर्वांचा मला फार मोठा आधार झालेला आहे!
वाह!!! लोकसंग्रह फार मोठी कला आहे.

मस्त लिहिलंयस स्वाती! एकदम तुझ्याच आवाजात ऐकू आलं. Happy
>>अप्रत्यक्षपणेसुद्धा कोणी काही बोललं तर त्याला प्रतिसाद नाही दिला तरी चालतो >> Proud

छान लिहिलंय स्वाती. (असंच काहीसं अपेक्षित होतं. Proud )

अप्रत्यक्षपणेसुद्धा कोणी काही बोललं तर त्याला प्रतिसाद नाही दिला तरी चालतो >>> आपण मला काही बोलता आहात का?? Proud

मस्त Happy मीही आत्ता या विषयावर टायपतच होते. किती तरी ठिकाणी अगदी ग्रेमा! झालं! ( आता छापू की नको? असंही !)
प्रश्नांची उत्तरं बेश्ट!

जुन्या मायबोलीच्या एका दिवाळी अंकातल्या या कहाणीचीही परवाच "कशावरूनतरी" आठवण निघाली होती. >> उप्स.... प्रतिसाद नाही दिला तरी चालतो नाही का Wink जाऊ द्या साँग सिच्यूएशन टाकून द्या - तुम आए तो आया मुझे याद ...... Happy Light 1

"गुलमोहोरातल्या लेखनाला आम्ही दर्जाची कात्री लावणार नाही. कोणीतरी मराठीत काहीतरी लिखाण करतं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे."
अहो हे मला आधी का कळले नाही? माझे केव्हढे तरी लिखाण मनात आले नि तिथेच विरले.
अजूनहि लिहीले तर चालेल का? बघा - म्हणतात ना माकडाच्या हाती टाईप्रायटर दिला तर तो शेक्स्पिअर सारखे वाङ्मय तयार करील का काहीतरी?
माकडापेक्षा कमी वेळात मी काही अविस्मरणिय वाक्ये लिहून टाकीन.

छान लिहीलं आहेस स्वाती!
मायबोलीने काय दिलं याचं उत्तर खूप आवडलं.
रच्याकने, तुझी जुन्या मायबोलीवरची निनावी आठवत आहे Happy

एखादी छोटीशीसुद्धा कृती ठाम संकल्पाने अडीअडचणींना न जुमानता सातत्याने करत राहिलं की काही काळाने ती आपल्या अस्मिते(आयडेन्टिटी)चा भाग होऊन जाते. त्या छोट्याश्या कृतीचं सातत्य जपायलाही खूप मानसिक बळ लागतं खरं, पण मग तीच कृती बर्‍यावाईट काळात तुमचं मन स्थिर ठेवायला मदत करणारा एक टेकू / अँकर होऊ शकते.

अगदी खरं...

आपल्या भाषेत आपल्या आवडीच्या विषयांवर (आपला विनोद (आणि उपरोधही) कळणार्‍या) लोकांशी आपल्या वेळेत गप्पा मारता येणं यात सांगण्यासारखं काही नाहीही आणि आहेही! >>> १००+

माबोचे अ‍ॅडिक्शन होण्याचे कारण या एका वाक्यात चपखलपणे लिहीता येइल.

कोणते वाक्य गंभीरपणे लिहीले आहे, कोणते उपरोधिक आहे हे त्यात स्माइली न घालता किमान काही लोकांपर्यंत अचूक पोहोचते तेव्हा त्याची मजा वेगळीच असते.

मस्त लिहीले आहे. तू गजल कार्यशाळा चालवत होतीस ना? ते व मधे दर महिन्यातील सर्वोत्तम कविता निवडत होतीस - हे माबोला काय दिले मधे नक्की आहे. आत्ता इतकेच आठवत आहे. कदाचित अजून बरेच असेल. (गजल प्रकार मला अजिबात कळत नसला, तरी ते व्हॉल्टेअरचे वचन लागू करून हे लिहीत आहे Happy )

मात्र काहीही बदलले नाही याला कॅव्हिअ‍ॅट - वाद आहेतच, रणधुमाळ्या भरपूर आहेत. डच्चू, राजीनामे, फेरविचार करून परतलेले - ते सगळे अजूनही सुरू आहे. पण वादांमधला न्युआन्स आजकाल बराचसा गायब आहे. उदाहरणे शोधता येतील पण ८-१० वर्षांपूर्वी काही वाद एकदम सखोल झाले होते. आता सखोल बिखोल क्वचितच असते. पार्टी लाइन पेक्षा काही वेगळे मुद्दे काढणारे, आयडीवर न जाता मुद्द्यांवर बोलणारे वगैरे एकदम कमी झाले आहेत.

>>>>पार्टी लाइन पेक्षा काही वेगळे मुद्दे काढणारे,
मान्य मिलार्ड!! हे एकदम मान्य. माझेही हेच नीरीक्षण आहे तसेच अपराधही आहे. आणि हे बदलायला पाहीजे असे वाटते खरे.

इथे नुसतं आलं ना, तरी बरं वाटतं; घरी आल्यासारखं वाटतं' असं वाटणार्‍या काही थोड्या जागा असतात - माझ्यासाठी मायबोली अशी जागा आहे

ज्जे बात !

सगळ्या प्रतिसाददात्यांचे मनःपूर्वक आभार!

कार्यशाळा आणि सर्वोत्तम कविता हे मी ‘उपक्रम संयोजना’च्याच रकान्यात (मनोमन Proud ) टाकलं होतं. त्यांची आठवण निघालेली पाहून मला अगदी भरून आलं! Happy
या उपक्रमांच्या कार्यवाहीत माझा सहभाग असला तरी दोन्हींची मूळ कल्पना वैभव जोशीची होती हे नमूद करायला हवं.

च्रप्स Proud

मीपु, हो नवीन होते तेव्हा निनावी होते.
(आता एव्हाना बरीच नावं ठेवून घेतलीत! Proud )

Pages