लेखन उपक्रम : माझ्या आठवणींतली मायबोली

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 22:12

हा हा म्हणता मायबोलीला २५ वर्षे पूर्ण झाली !
ते नक्की कोण "हा हा" म्हणत होतं बुवा? आम्ही नाही ऐकलं. हा काही आयडींनी "हाय" खाल्ली ते ऐकिवात आहे.

आमच्या वेळेस असं नव्हतं !
ते माहिती आहे हो. काय नव्हतं तेच कितिदा सांगता. एकदा तरी काय होतं ते सांगा की ! आणि हे एकदाच बरं . नंतर परत ५० वर्षे झाली कि पुन्हा विचारू. तुम्ही असाल ना तेंव्हा ? अहो त्यात काय ! हा हा म्हणता आणखी २५ वर्षे निघून जातील बघा.

काय ?मायबोलीला २५ वर्षे पूर्ण झाली?
मग होता कुठे इतके दिवस ? आर्कुटवर का मायस्पेस वर? पण आला आहात ना आता, जरा थोडं टेकून जा, जुन्या मित्रांना भेटून जा !

तर आपल्या मायबोलीला या गणेशोत्सवात २५ वर्षे पूर्ण झाली.
- तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
- इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
- कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
- गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
यावर थोडं लिहा की.

गेली २५ वर्षे ही पहिली मराठी साईट, (आणि पहिली देवनागरी साईट) अजून चालू आहे ती तुमच्यामुळेच. थोडं स्मरणरंजनात रमूया ! लिहायला वेळ नसेल तर विडीयोही चालेल. मायबोलीवरच्या कुणा जुन्या मित्रमैत्रीणींच्या संपर्कात असाल तर त्यानाही या उपक्रमाची लिंक पाठवून भाग घ्यायचा आग्रह करा.
धाग्याचे शीर्षक माझ्या आठवणीतली मायबोली- मायबोली आयडीचे नाव असे असावे. हा उपक्रम आहे , स्पर्धा नाही.
प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी

( आणि त्या निमित्ताने तुमच्या या लेखात , मायबोलीवरच्या तुमच्याच जुन्या लेखनाचे दुवे देऊन थोडी स्वतःची रिक्षा फिरवलीत, जुने धागे वर आणलेत, तरी चालेल. तेवढीच नवीन सभासदांना तुमची ओळख होईल आणि तुम्हाला नवीन चाहते मिळतील )

किती आठवू गा तू ते
अब्द अब्द मनी येते !

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येक खेळाची ओळख काय कल्पक आहे. संयोजकांनी उदाहरणांतुन हाय स्टयान डर्ड सेट केले आहे. अभिनंदन! >>> सामो +१

फार आवडला हा विषय.

मस्त उपक्रम... ह्या उपक्रमातील प्रवेशिका वाचायला खूप छान वाटेल ..!. Happy

हा उत्तम आहे विषय. लोकहो सहसा स्मरणरंजन फार सिलेक्टिव्ह असतं. तेवढं बॅलन्स्ड करता आलं तर बघा Wink म्हणजे नव-मायबोलीकरांना तितकीशी गुन्हेगारीची भावना येणार नाही Wink

सामो Lol हो ना, ते आईनेअकबरी पान म्हणजे तर जीझस असावा. बिफोर ख्राईस्ट नि आफ्टर ख्राईस्ट कालगणना होते तसं.... आफ्टर ख्राईस्ट लोकं बिचारे उघड बोलत नाहीत पण उगा काय .... असो... उपक्रमाला शुभेच्छा!!

मी २५ वर्षांपूर्वी मायबोली साईट बघून प्रचंड आनंदलो, फारच आनंदलो.
मला मायबोलीतले बदल सांगता येणार नाहीत - कारण मीच खूप बदललो आहे.
जरी ज्याचे मोजमाप करायचे ते तसेच राहिले तरी ज्या साधनाने ते मोजमाप करायचे तेच बदलले ते उत्तर वेगळे येणारच, नाही का? जे
अंतर फूटपट्टीने एक फूट आहे म्हणतात ते मेट्रिक पद्धतीने मोजले तर वेगळे उत्तर येईल, पण अंतर तेच. तसे.

नेहेमीचाच कीबोर्ड वापरून मराठी लिहीता येते ही सोय मला फार आवडली.
अजून बर्‍याच सोयी असाव्यात, मला माहित नाही.
मी मायबोलीला काय दिले? गेल्या २५ वर्षात इथे आलेल्या प्रत्येकाला/प्रत्येकीला मी कधी ना कधी शब्दांनी छळले आहे.
मायबोलीने मला प्रचंड प्रसिद्धी दिली - माझे मायबोलीवरील मित्र कॅलिफोर्निया ते ऑस्ट्रेलिया नि चीन मधे आहेत.
माझे लेखन पूर्वी गाजत असे, म्हणजे बरेच लोक चिडून त्यावर प्रतिक्रिया देत यावरून अंदाज बांधतो आहे.
मी जे जे काय लिहीले त्याने कुणि ना कुणि गांजला आहेच.

मी प्रत्यक्षात जसा आहे तसा मायबोलीवरील मी नाही, म्हणजे मला माझी दुसरी बाजू कळू लागली. जसे काही लोक माझ्यावर कायमचे रागावले असावेत, तसे माझे कित्येक सच्चे मित्र/मैत्रिणी मायबोलीने मला दिले.

संयोजकांना विनंती.
माझ्या आठवणीतील मायबोली या विभागाखाली आलेले सर्व लेख एकत्रित ठेवता येतील का ?
म्हणजे कोणी कोणी लिहिले आहे ते लगेच समजून येईल

नेकी और पुछ पुछ !
आताच काही मिनिटांपूर्वी ते लेख एकत्रित मांडले आहेत. इथे पाहता येतील. बाकी उपक्रमांचीही यादी करण्याचे काम सुरु आहे.
https://www.maayboli.com/ganeshotsav/2021

संयोजक - माझाही लेख तेथे लिस्ट मधे टाकू शकाल काय? मला वाटले टॅग दिल्यावर आपोआप तेथे येत असेल पण तसे दिसत नाही.

- तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
- तुमचं कुठलं लेखन गाजलं,
- कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं

या तीन प्रश्नांमुळे लिखाण गंडतेय असे वाटतेय. माझ्या स्मरणातील मायबोली ऐवजी मायबोलीकरांनी स्मरणात ठेवावा असा मी असे वळण नकळत लागतेय. प्रश्न अनिवार्य नाहीत असे लिहीले असते तर बरे झाले असते. कारण अर्जाच्या नमुन्यात अर्ज यावेत लिहावे तसे लेख आले आहेत. अपवाद नक्कीच आहेत. शिवाय बरीच माहिती मिळतेय. उपक्रम चांगलाच आहे.

प्रश्न असणे आवश्यक
नाहीतर लिखाण भरकटत जातं.
यात 'मायबोली मुळे कोणते जन्मजात विचार पूर्ण बदलले' हाही प्रश्न हवा(बऱ्याच जणांना याचे खरे उत्तर जाहीर द्यायला आवडणार नाही हेही खरे.)

मायबोली मुळे कोणते जन्मजात विचार पूर्ण बदलले >> चांगला प्रश्न. वेळ घेऊन उत्तर द्यायला आवडले असते. काही बदल लगेच होत नाहीत. काही वेळा वादात भूमिका सोडल्या जात नाहीत. पण त्याचा प्रभाव राहतो.

काही वेळा वादात भूमिका सोडल्या जात नाहीत. पण त्याचा प्रभाव राहतो. > +१ अनेकदा मुद्द्यात दम असेल तर नंतर लोक विचार करतात, अनेकदा मुद्दा पटतो. प्रत्येक वेळेस लोक आवर्जून येउन सांगतील असे नाही. पण प्रभाव राहतो हे खरे. मात्र मुद्दे लिहीताना आक्रस्ताळी किंवा एखाद्या कमी लेखत लिहीले तर लोक जाम कधीही मान्य करत नाहीत.

माझ्या स्मरणातील मायबोली ऐवजी मायबोलीकरांनी स्मरणात ठेवावा असा मी असे वळण नकळत लागतेय >> हे ही खरे आहे. पण नवीन माबोकरांना त्या त्या आयडींची ओळख व्हावी म्हणून त्याचा उपयोग आहे. तोच उद्देश होता नाही माहीत नाही. आता टिमकी कदाचित जास्त गाजवली गेली असेल Happy पण निदान माझ्या बाबतीत मला ते ही कधीतरी सांगायचे होते.

छे, तीनच प्रश्नाचं काय घेऊन बसायचं... मी तर मायबोलीने "मला काय दिलं" इ सगळ्या प्रश्नामध्ये माझीच टिमकी वाजली Wink राईट-अप मध्ये क्लायंटचे 'सटल मार्केटींग' करायची सवय लागली तर आता टिमकीची सवय जात नाही..... जाऊ द्या हो, दुसर्‍याची काय नि आपली काय.. जरा टिमकी वाजली पाहिजे Happy त्या शिवाय उत्सवाला शोभा नाही. इतर गुणी मायबोलीकरांचे उल्लेख केले नाही, दुसर्‍या कुणाचे राहिले तर नि रागावले तर भयाने... काही आवडते मायबोलीकर आहेत पण त्यांच्याशी फार कधी इंटरअ‍ॅक्शन झाली नाही म्हणून नामोल्लेख टाळला. मग स्वतःची टिमकी काय, लेख थेट 'ढोली, तारो ढोल बाजे' च झालं. पण गणपती संपले तर एडिट करून टाकते आता. इतर गुणी मंडळी आहेत इथे, क्रेडीट द्यायला पाहिजे.

उपक्रम छान आहे. त्यानिमित्ताने इथल्या काळाचा आढावा घेता आला. संयोजक व अ‍ॅडमिनचेही मनोगत वाचायला आवडेल. विशेषत: पुढील ५ वर्षासाठी काय ठरवलंत?

छे, तीनच प्रश्नाचं काय घेऊन बसायचं... मी तर मायबोलीने "मला काय दिलं" इ सगळ्या प्रश्नामध्ये माझीच टिमकी वाजली
>>>>>>>>

हा हा .. मी सुद्धा Proud
किंबहुना हा स्कोप होता म्हणूनच मी लिहिले अन्यथा मला ईतरांबद्दल लिहायला जरा भितीच वाटते Happy

पण येस्स, मलाही ॲक्चुअली गंमत वाटली या प्रश्नांची. त्यामुळे बहुतांश लेखातील बहुतांश भाग आत्मकेंद्रीत झालाय. यात गैर काही नाही. फक्त ते आठवणीतील मायबोली या शीर्षकातील विसंगती दाखवते. पण तरीही काही ठिकाणी जुन्या लोकांनी छान आठवणी दिल्यात, आणि तिथे प्रतिसादात मी आवर्जून त्या आवडल्या वा हेच अपेक्षित होते असा उल्लेखही केला.

आताच काही मिनिटांपूर्वी ते लेख एकत्रित मांडले आहेत. इथे पाहता येतील. बाकी उपक्रमांचीही यादी करण्याचे काम सुरु आहे.
https://www.maayboli.com/ganeshotsav/2021. >>>> हितं आम्हालाबी येक खुर्ची द्या की संयोजक.

माझ्या स्मरणातील मायबोली ऐवजी मायबोलीकरांनी स्मरणात ठेवावा असा मी असे वळण नकळत लागतेय.
>>> विचारात पाडले. हा मुद्दा तसा बरोबरच आहे पण उलट माझ्यामते ह्यामुळे जुनी लोक लिहायला उद्द्युक्त झाली असावी. 'माझ्या' आठवणीतली मायबोली म्हटले की हे थोडेफार होणारच. वेगळे करणे जरा अवघड आहे.

ह्य हे वाचल्यावर लक्षात आले की माझ्याकडून तर मायबोलीने मला काय दिलं च्या जोडीला माहीतच नाही अशी सोय ह्यामधेही स्वतःची टिमकी वाजवली गेल्ये. Proud

Pages