पुणे ते लोणावळा

Submitted by पराग१२२६३ on 21 August, 2021 - 00:36

15 ऑगस्टपासून ही नवी सुविधा ‘दख्खनच्या राणी’त उपलब्ध होत होती. त्यामुळे मीही या गाडीचं आरक्षण केलं होतं. मीही या निमित्ताने ‘दख्खनच्या राणी’नं छोटासा प्रवास करून येऊ, असा विचार करून पुणे ते लोणावळा आणि परत असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण मी व्हिस्टा डोमचं आरक्षण मुद्दामच केलं नाही.

त्या दिवशी सकाळी लवकरच पुणे जंक्शनवर पोहचलो होतो. तेव्हा तिथे यूट्यूबर तथाकथित रेल्वेप्रेमींची गर्दी जमू लागली होतीच. मीही गाडीत बसण्याआधी त्या डब्याजवळ गेलो. ‘दख्खनच्या राणी’बरोबर व्हिस्टा डोम पहिल्यांदाच धावणार होता, म्हणून त्याला आतून-बाहेरून फुग्यांनी सजवण्यात आलं होतं. ‘15 ऑगस्ट’ असल्यामुळे सजावटीसाठी तिरंगी फुग्यांचा वापर करण्यात आलेला होता.
व्हिस्टा डोमच्या दोनच डबे पुढे माझा डबा होता. गाडी सुटायला अजून 15 मिनिटं होती. त्यामुळं माझा डबा बऱ्यापैकी मोकळा होता. पण तो पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये एकदम भरून गेला. मी बाकीच्या गाडीचं निरीक्षण करून माझ्या आरक्षित जागेवर जाऊन बसलो होतोच. गाडीत ‘चाय-चाय-चाय’ करत रेल्वेच्या केटरिंग सेवेच्या कर्मचाऱ्यांची तुरळक येजा सुरू होती.

गाडी सुरू करण्याचे इंजिनापासून कंट्रोल रूमपर्यंत आणि स्टेशन मास्टरपासून गार्डपर्यंतचे सर्व ठिकाणचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ठीक सव्वासातला चॉकलेटी रंगातल्या कल्याणच्या डब्ल्यूसीएएम-2 कार्यअश्वासह फलाट क्रमांक 5 वरून ‘दख्खनच्या राणी’ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघाली. एव्हाना आपापल्या आसनांवर स्थानापन्न झालेल्यांमध्ये जे एकेकटे प्रवास करत होते, त्या तरुणाईने कान कधीच हेड बंद करून घेऊन हातातल्या भ्रमणध्वनीमध्ये डोळे खुपसले होते. जे आपल्या ओळखींच्यांबरोबर प्रवास करत होते त्यांच्या गप्पांना आता कुठे सुरुवात झाली होती. त्यात अजून रंग यायला वेळ होता.

शिवाजीनगर, खडकी, दापोडी अशी स्थानकं ओलांडत असतानाच ‘दख्खनच्या राणी’चा विशेष मेन्यू प्रवाशांच्या सेवेत येऊ लागला. पहिल्यांदा आले गरमागरम साबुदाणा वडे. पण मी घेतले नाहीत, कारण मी ‘दख्खनची राणी’ची स्पेशल कटलेटची वाट बघत होतो.

घड्याळात 7.34 झाले होते. ‘दख्खनची राणी’ आता चिंचवड ओलांडत होती आणि तिने वेगही चांगला घेतला होता. आता गरमागरम कटलेटही आणले गेलेच. मी त्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात करणार तितक्यात शेजारच्या डाऊन मेन लाईनवरून वेरावळहून आलेली 01087 वेरावळ-पुणे जं. विशेष एक्सप्रेस डब्ल्यूएपी-4 कार्यअश्वासह पुण्याच्या दिशेने निघून गेली. देहू रोडला पुणे जं.-लखनौ जं. एक्सप्रेसचा मोकळा रेक डाऊन लूप लाईनवर उभा करून ठेवलेला होता. सध्या ती गाडी बंद असल्यामुळे ती निमूटपणे तिथे उभी होती.

देहू रोडच्या बाहेरच 02940 जयपूर जं.-पुणे जं. विशेष एक्सप्रेस आपल्या पांढऱ्याशुभ्र कार्यअश्वाच्या साथीने (डब्ल्यूएपी-7) आपल्या अंतिम लक्ष्याच्या दिशेने धडाडत गेली. आता रुळांच्या आसपास दाटीवाटीनं असलेली घरं विरळ होऊ लागली होती. त्यामुळे पावसाने झालेला हिरवागार परिसर स्पष्टपणे, अगदी जवळ दिसू लागला होता. बाहेर बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी पाहत माझा गरमागरम कटलेटचा आस्वादही घेऊन झाला होता.

पुढच्या चार मिनिटांत तळेगावही गेले. आता जरा पावसाचा जोर वाढलेला होता. बाहेर पावसाळी वातावरण, त्यामुळे झालेला हिरवागार परिसर, त्यातून पळणारी ‘दख्खनची राणी’ आणि हातात गरमागरम चहा!

आज ‘दख्खनची राणी’ लोणावळ्यात नियोजित वेळेच्या आधी पोहचत होती. पावसाळ्यामुळे लोणावळ्याच्या जवळपासच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांमागे लपलेल्या होत्या.

सविस्तर लेखासाठीची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/08/blog-post_21.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<काही खास कारण होते का ?>>
Lockdown मुळं लोणावळा-मुंबईच्या बाजूला गेली दोन वर्षे जाणं झालं नव्हतं. त्यामुळं बंदिस्त डब्याऐवजी मोकळेपणानं जावं असं वाटलं. व्हिस्टा फोनमधून नंतर प्रवास करू असं वाटलं.

ही नवी सुविधा म्हणजे कुठली सुविधा?
व्हिस्टा डोम म्हणजे काय असते?

बाकी ट्रेनच्या प्रवासाची मजाच और... आम्ही कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून तिनेच प्रवास करतो

मस्त लेख.
व्हिस्टा डोम म्हणजे काय असते? >> मला वाटत परदेशातील ट्रेन ना असते तशी गाडीच्या टपाला काच असते आणि खिडक्या ही मोठ्या मोठ्या असतात जेणे करून बाहेरच्या सृष्टी सौंदर्याचा छान आस्वाद घेता येतो. डेक्कन क्वीन ला हल्लीच असे दोन डबे जोडलेत अस वाटतय

<< मला वाटत परदेशातील ट्रेन ना असते तशी गाडीच्या टपाला काच असते आणि खिडक्या ही मोठ्या मोठ्या असतात जेणे करून बाहेरच्या सृष्टी सौंदर्याचा छान आस्वाद घेता येतो. >>

हो अगदी बरोबर.

मस्त नेहमीप्रमाणेच!
डब्ल्यूसीएएम-2 >>> हे क्वचितच वापरतात ना डेक्कन ला? मधली अनेक वर्षे WCAM ३ किंवा ४ वापरत. आता नवे WAP वापरतात असे गेल्या काही महिन्यांत पाहिलेल्य क्लिप्स वरून दिसते. अर्थात खरी डेक्कन म्हणजे WCM लोको वाली - मिले सूर मेरा तुम्हारा मधे दिसते तशी!

विस्टा डोम मधे बसून पावसाळ्यात पुणे-मुंबई प्रवास करायचा आहे आता.
हा एक नुकताच आलेला व्हिडीओ. हे बघूनच लक्षात येइल पावसाळ्यात काय जबरी वाटत असेल ते. यात मागून दिसतो तसा १८० डिग्री व्ह्यू आपल्याला रेल्वेतून एरव्ही मिळत नाही. त्यामुळे एकदम वेगळे वाटत असेल.
https://www.youtube.com/watch?v=xp8vf_tbcQ0

<<डब्ल्यूसीएएम-2 >>> हे क्वचितच वापरतात ना डेक्कन ला?>>

हो. सध्या अधूनमधून डब्ल्यूसीएएम-2 'राणी'ला जोडत आहेत. सध्या गाड्या कमी सुरू आहेत आणि त्या तुलनेत लोको जास्त उपलब्ध होत आहेत.

बऱ्याच दिवसांनी तुमचा रेल्वे स्पेशल लेख आला. तोही दख्खनच्या राणीचा. फार मस्त. ब्लॉग वर डिटेल्स वाचले. भारी वाटलं.
दख्खनच्या राणीला एल.एच.बी. कोच सहित विस्टा डोम हवा.नुसता विस्टा डोम देऊन पुणे - मुंबई प्रवाशांना वाटण्याच्या अक्षता लावल्या अशी भावना झाली.

धन्यवाद DJ. दख्खनच्या राणीला एल.एच.बी. कोच जोडले जाणार आहेत असं गेली दोन वर्षं सतत सांगितलं जात आहे. आता हे डबे तयार झाले आहेत. पण दख्खनच्या राणीसाठीची विशेष रंगसंगती निश्चित झालेली नसल्यामुळे ते डबे अजून वापरात आलेले नाहीत.

राणीसाठीची विशेष रंगसंगती फार पूर्वी होती ती त्यांना परवडेना. एक जुनाट धबडका रंगाचा डबा/ पिंप आणायचे आणि त्यात सर्व इतर रेल्वेंचेही डबे बुडवायचे.
जुना चमकदार निळा रंग गेलाच. डब्यांच्या वरती वेंटिलेटर भोकांवर प्लास्टिक फडकीसुद्धा गुंडाळतात पाणी गळू नये म्हणून. यावर रेल्वेचं म्हणणं हे डबे भंडारातच जाणारेत डिप्रिसिएशनमुळे आणि नवेच येणार तर खर्च का करायचा.

<<एक जुनाट धबडका रंगाचा डबा/ पिंप आणायचे आणि त्यात सर्व इतर रेल्वेंचेही डबे बुडवायचे.>>
सध्या डब्यांच्या सुशोकरणासाठी वापरलेली उत्कृष्ट योजनेची रंगसंगती तर कोणालाच आवडलेली नाही.

हो ती पिवळा रंग वाली रंगसंगती अजिबात आवडली नाही. मूळची पांढरी निळीच मस्त आहे.

तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे गाडी या क्लिप मधे दिसते आहे. बहुधा WCAM-2 इंजिन सुद्धा.
https://www.youtube.com/watch?v=zlEjq2bQ2eE

<<तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे गाडी या क्लिप मधे दिसते आहे. बहुधा WCAM-2 इंजिन सुद्धा.>>
फारएण्ड, हा त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. लोकोही बरोबर लिहिलं आहे तुम्ही.

कालच कोणत्यातरी युट्युबरचा डेक्कन एक्सप्रेसचा मुंबई पुणे प्रवास बघितला. ह्या ट्रेनला वर काच आणि मोठ्या खिडक्या. खिडकीकडे तोंड करुन फिरवता येणार्‍या सीट्स वगैरे होत्या. तुम्ही म्हणताय ती ट्रेन आणि डेक्कन एक्सप्रेस एकच का?

सायो, डेक्कन आणि डेक्कन क्वीन या दोन वेगळ्या गाड्या आहेत. दोन्ही मुंबई-पुण्यादरम्यानच धावतात. डेक्कन सकाळी ७ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघते, तर डेक्कन क्वीन सकाळी सव्वासातला पुण्याहून निघते.

खिडकीकडे तोंड करुन फिरवता येणार्‍या सीट्स वगैरे होत्या

टेक्निकली एक आड एक सीट्सच फिरवता येतात हे एका विडिओत दागखवलं आहे.

माझा प्रवासाचा अनुभव असा आहे की धबधबे सुरू आहेत आणि गाडीतले लहानथोर अगदी दृष्य आनंदाने पाहात आहेत हे क्वचितच होते. अगदी नवखे पाहतात. माळशेजचे धबधबे तर अप्रतिम. पण गावी जाणाऱ्यांना त्यात "पाणी पडलंय रात्री खूप" एवढंच.

पुर्ण लेख ईथे द्या की ... अशा सजलेल्या गाडीत्न प्रवास करायला आवडेल..

कोकणात येणार्या जनशताब्दीलाही विस्टा डोम आहे..

पराग - इथे जरा अवांतर होईल पण गेल्या काही वर्षांत भारतीय रेल्वेने बर्‍याच नवीन योजना सुरू केल्या आहेत व आधी सुरू असलेल्या काही योजना कोव्हिडच्या काळात वेगाने पुढे नेल्या आहेत. त्याबद्दल तुम्ही माहिती काढली असेलच. त्याबद्दलही लिहा जमले तर
- डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर - ज्या क्लिप्स पाहिल्या त्यावरून हा एक महाकाय प्रोजेक्ट आहे व एकूण मालवाहतुकीत खूप फरक पडेल असे दिसते
- विद्युतीकरण - आता पुणे सोलापूर व बहुधा इव्हन कोल्हापूर मार्गाचेही सुरू आहे असे दिसते. कोकण रेल्वे च्या रूट्स वरही तारा वगैरे बांधत आहेत
- दुहेरीकरण
- नवीन मार्गांचा सर्व्हे - पुणे-नाशिक बद्दल वाचले. तसेच मुंबई-अहमदनगर व इतर अनेक मार्ग. दौंडजवळचा बायपास कधी सुरू झाला कल्पना नाही पण त्याने गाड्या उलटसुलट जाणे थांबले असावे
- गाड्यांचे वेग वाढवणे - मुंबई राजधानी आता "तेजस" झाली आहे व वेळही कमी झाला आहे.

गाड्यांचे वेग वाढवणे -
आणि निसर्ग पाहाणे विरोधी गोष्टी आहेत.
दिवसाउजेडी वीस किमी वेगाने जाणारी गाडी बरी.