जीने नही दूंगा

Submitted by पायस on 20 May, 2021 - 02:15

'द अदर कोहली' उर्फ राज कोहलीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान मोजमापापलीकडचे आहे. त्याच्या शिखर वर्षातील राज तिलकचा रसास्वाद घेतल्यानंतर साहजिकच त्या वर्षातील दुसर्‍या कोहलीपटाचा, जीने नही दूंगाचाही आढावा घेणे भाग आहे. योडाने हा चित्रपट बघितल्यानंतर घोषणा केली की 'द फोर्स इज स्ट्राँग विथ धिस वन'. समीक्षकांनी नावाजलेले अळणी, नीरस, कंटाळवाणे चित्रपट बघून झालेल्या अजीर्णावर हा चित्रपट उतारा आहे. या चित्रपटाची थोडक्यात पूर्वपीठिका सांगायची तर १९७९ च्या सुप्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट मौला जटचा हा रिमेक आहे. मौला जटची भूमिका सुलतान राहीने केली होती. त्याचा एक जरी सीन पाहिला तरी त्याच्याजागी धरमपाजींखेरीज दुसरा पर्याय नाही या निर्णयाप्रत पोहोचता येते. अस्मादिकांच्यामते धरमपाजींनी ओरिजिनलला मागे टाकले आहे. दुर्दैवाने त्याचे पडसाद पाजींच्या अभिनयकौशल्यावर खोलवर उमटले आणि पाजींच्या शब्दकोशातून "संयत" हा शब्द पुसला गेला. पण ते काय चालायचंच. कारण चित्रपटातील इतर दिव्य गोष्टींच्या तुलनेत पाजींचा अभिनय नॅशनल अवार्ड विनिंग म्हणावा लागेल.

आणि अगदी हे सर्व जरी बाजूला ठेवले तरी या चित्रपटाचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे भारतीय जनतेची 'रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग' सोबत करून दिलेली ओळख! अशा चित्रपटांत दिव्य अभिनय होणे ही काही नवीन गोष्ट नाही. दिव्य अभिनय करण्याची अहमहमिका होणे यातही काही नावीन्य नाही. पण या सर्व दिव्य तार्‍यांनी एकत्र येऊन 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असे म्हणायला लावणारी एकमेव तारका म्हणजे रोशनी. मुख्य भूमिका साकारण्याची ही तिची पहिली वेळ. काही नाही तर रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगची मुहूर्तमेढ रोवणारा चित्रपट म्हणून बॉलिवूड याची कायम आठवण ठेवेल. तरी भूतमात्रांना प्रसन्न करण्यासाठी चार थेंब उडवल्यानंतर रसग्रहणास सुरुवात करूया.

१) रोशन, तुझे जीने नही दूंगा

१.१) जंग (अ‍ॅक्शन) वि. दिल (रोमान्स)

निवेदक कादर खान सुरुवातीला काहीतरी क्रिएशनिस्ट बडबड करतो. मुख्य मुद्दा असा की मनुष्यांमध्ये सुष्ट व दुष्ट दोन्ही प्रवृत्ती आहेत. त्यानुसार या सिनेमातही दोन कबिले आहेत - जंगावर आणि दिलावर. जंगावर = जंग, फाईट इ. दिलावर = दिल, प्रेम, मोहोब्बत इ. या सिनेमातील कबिला सिस्टिम, नॉमेनक्लेचर विचित्र वाटू शकते पण दिग्दर्शकाचा नाईलाज आहे. कारण मौला जटच्या स्टाईलचा या सिनेमावर प्रचंड प्रभाव आहे. असो, दिलावर कबिल्यातून आपल्या कथेस सुरुवात होते.

दिलावर कबिल्यात कोणा रोशनवर खटला चालू आहे. इथे कबिला शब्दप्रयोग केला असला तरी ती एक छोटीशी गढी आहे. गढीच्या पहिल्या मजल्यावरून तिथला सरदार विचारतो की रोशनचा गुन्हा काय आहे? रोशन म्हणजे आपले धरमपाजी. धरमपाजींनी पहिल्याच सीनमध्ये स्पष्ट केले आहे की या सिनेमाची 'फॅशनेबल' कपड्यांची स्वतंत्र व्याख्या आहे. काळा फुल बाह्यांचा टी-शर्ट, त्यावर चेक्सचा शर्ट, त्यावर काळा कोट, खाली मळकट खाकी विजार, लेदरचा बेल्ट, हंटिंग बूट आणि कपाळाला एक चिंधी बांधलेली अशा वेषात पाजी एंट्री घेतात. हा सर्व वेष टळटळीत उन्हात!

पाजींचा गुन्हा हा की त्यांचे जंगावर कबिल्यातील एका मुलीवर प्रेम आहे. त्यांच्यामते जर हे लग्न झाले तर शतका-शतकांपासून चालत आलेले वैर संपेल. शेरवानी घातलेला सरदार म्हणतो की दिलावर कबिल्यात प्रेम करणे गुन्हा नाही. च्यामारी मग खटला कशाला भरला? एक अंगरखा घातलेला कबिलेवाला येऊन म्हणतो की हाच खटला जर जंगावर कबिल्यात भरला असता तर असा फालतूपणा झाला नसता. दोन मुद्दे - १) मग तू जंगावर कबिल्यात जा ना! इकडे कशाला आगीत तेल ओततो आहेस? २) पाजींच्या आयटमची काही धडगत नाही.

१.२) प्रेमळ गुन्हा

जंगावर कबिल्यात पाजींच्या आयटमवर असाच खटला चालू आहे. पण इकडे तिला सरळ फरफटत आणले गेले आहे. हिचे नाव चांदनी. चांदनीची भूमिका केली आहे नीता मेहताने (पोंगा पंडितची हिरोईन). चांदनीला गुलाबी कलर स्कीमचा स्लीव्हलेस ड्रेस दिला आहे. ८०च्या दशकातील बंजारा स्त्री श्ट्यांडर्डनुसार रबरबँड लावून एका बाजूने पोंगा सोडला आहे. चांदनी म्हणते की प्रेम करणे काही गुन्हा नाही. कबिल्याचा सरदार (आणि बहुधा तिचा बाप) म्हणतो - व्हेरी गुड, इसी खुशी में सजा-ए-मौत हो जाए.

इथे हसत हसत, काळी कफनी परिधान केलेला परीक्षित साहनी एंट्री घेतो. हा फकीरबाबा झाला आहे. याच्या कपाळावर शैवपंथी गंध आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा आहेत, हातात सर्पाकृती काठी आहे. इथे उच्चप्रतीचा चुना लावला आहे. कथानक क्लिअरली राजस्थान-पंजाब बॉर्डरवर, सूफी/वैष्णव/शीख प्रदेशात घडत असताना शैव साधू कुठून आला? त्यापेक्षा याला सूफी संताची वेशभूषा दिली असती. तसेही नाव फकीरबाबा आहेच. मुस्लिम पात्राचा कोरमही भरला असता आणि बिकानेरशी भूगोलही मॅच केला असता. असो. हा मोहोब्बत रिलेटेड काहीतरी जनरिक बडबड करतो. अशावेळी एक्स्ट्रांवर लक्ष केंद्रित केल्यास अधिक मनोरंजन होते. जसे की फकीरच्या डाव्या बाजूला एक एक्स्ट्रा आहे ज्याच्या डोळ्यांवर थेट ऊन येते आहे. त्यामुळे बाकी सर्व एक्स्ट्रा फकीराकडे बघत असताना हा एकटाच जमिनीकडे बघून चुळबूळ करतो आहे. या सिनेमातील बहुतांश सर्व एक्स्ट्रा प्रचंड मनोरंजक आहेत. तसेच साधारण निम्मे एक्स्ट्रा दोन्ही कबिल्यात आढळतात. कंटाळा आलाच तर ते एक्स्ट्रा कोणते हे ओळखण्याचा खेळ खेळता येतो. तात्पर्य: जसा विराट कोहली सहसा डॉट बॉल खेळत नाही, तसा राज कोहली फ्रेममधली इंचभर जागाही वाया घालवत नाही. असो, फकीराच्या विनवणीचा काही परिणाम होत नाही आणि चांदनीला मरेस्तोवर चाबकाने बडवण्याचा निर्णय घेतला जातो.

१.३) रेड हेरिंग दाखवण्यासाठी अ‍ॅगाथा ख्रिस्ती असणे बंधनकारक नाही.

त्यानुसार कबिल्याबाहेरील माळरानावर, एका चौथर्‍यावर चांदनीला बांधले जाते. तिला ड्रेसही बदलू दिला जात नाही. एक चिल्लर गुंड चाबकाचे दोन फटकारे ओढतो तोच पाजी घोड्यावर बसून एंट्री घेतात. त्यांनी सुद्धा अजून ड्रेस बदललेला नाही. हिंदी चित्रपटात शॉटगन चालवणे हे सायकल चालवण्याइतके सोपे असल्याने डबल बॅरल शॉटगनच्या मदतीने पाजी सर्व गुंडाना घायाळ करून चांदनीची सुटका करतात. आता जंगावर कबिल्याचा सरदार उखडतो. त्याच्या लक्षात येते की शॉटगनधारी पाजींना रोखण्यासाठी शॉटगनच हवा. मग शाका अर्थात शत्रुघ्न सिन्हाला पाचारण केले जाते. याच्या एंट्रीचा अँगल खालून वर असा लावला आहे. हिरविणीसाठी लावायचा अँगल शॉटगनसाठी लावून काय उपयोग? असो शाका म्हणतो की पाजींच्या उद्दामपणाबद्दल तो संपूर्ण दिलावर कबिला नष्ट करणार आहे.

शॉटगनला बघताच भयातिरेकाने दिलावर कबिलावासी घराची दारे बंद करत आहेत. यापासून अनभिज्ञ पाजी चांदनीसोबत भरदुपारी मधुचंद्र साजरा करत आहेत. कुठल्या वेळी कोणते दरवाजे तोडावेत याची जाण नसलेला शॉटगन "मौत की शकल" बनून थेट बेडरुममध्ये घुसतो. घुसल्या घुसल्या पाजींवर गोळीबार! तीन गोळ्या आणि खेळ खल्लास, दुसरी बातच नको!! अर्थातच चाणाक्ष प्रेक्षकाला ठाऊक आहे की हिरो धरमपाजी मरणे शक्य नाही. सुहागरातच्या क्लोजअपमध्ये पाजींचा कुरळा विग प्रकर्षाने जाणवतो. हिरो धरमपाजींचे केस कधी कुरळे असतात होय? याचाच अर्थ पाजींचा डबल रोल असणार आणि दुसर्‍या धर्मेंद्राची लवकरच एंट्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ! हे सर्व ठाऊक असल्याने तो असल्या थर्ड क्लास रेड हेरिंगकडे तु.क. टाकून पुढे बघू लागतो. बेडरुमबाहेरच पोलिस 'कधी शॉटगन पाजींवर गोळीबार करतो' याची वाट बघत उभे होते. ते लगेच येऊन शॉटगनला हातकड्या घालतात. इथे शाकाच्या हावभावांवरून याचे स्क्रू ढिले आहेत ही शंका येते. उर्वरित सिनेमात त्यावर शिक्कामोर्तब होईल. तूर्तास कबिल्याचा बदला घेतल्याच्या सुखपरत्वे सुटलेली ढेरी दाखवत शॉटगन पोलिसांसोबत निघून जातो.

२) दो कबिलों के बीच के अमन, तुझे जीने नही दूंगा

२.१) सिनेमात मंदिरा बेदी नसू दे, आपण मात्र शांती ठेवायची

(१.३) मधला कयास तात्काळ खरा ठरतो. दुसरे धरमपाजी घोड्यावरून एंट्री घेतात. यांचे नाव राका - हिरो असल्याचा आणखी एक पुरावा. राका-शाका, गेट इट? (टू सेट काँटेक्स्ट ओरिजिनल आहे मौला जट-नूरी नट. यापेक्षा राका-शाकाच बरं) शाकाप्रमाणेच राकालाही थेट बेडरुममध्ये घुसण्याची सवय आहे. इथे दोन धर्मेंद्रांचा रडारडीचा अल्टिमेट सीन आहे. पाजींचे अभिनयकौशल्य बघताक्षणी ऑल नेगेटिव्ह थॉट्स विल इन्स्टंटली व्हेपराईज. राका विचारतो की हे कोणी केलं? मधुचंद्र अर्धवट राहिल्याने भडकलेली चांदनी लगेच सांगते हे शाकाने केलं. अपेक्षेप्रमाणे राका जंगावर कबिल्याचा विध्वंस करायला निघतो. पण रोशनची २०००-०१ च्या सुनील शेट्टीशी भेट झालेली नसल्यामुळे त्याचा 'दो दिलों की धडकन; प्यार, इश्क और मोहोब्बत' वर अधिक विश्वास आहे. तो म्हणतो की अशी मारामारी नाही करायची, तुला माझी शपथ! या आणाभाका चालू असताना रोशन आपल्या पोटावरचा रक्ताचा डाग लपवण्याची पराकाष्ठा करतो आहे. चांदनी 'हा आहे तोवर घ्या चान्स मारून' असा विचार करून रोशनला नॉन-स्टॉप कुरवाळते आहे. हे सर्व असह्य होऊन राका 'मी दोन कबिल्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करेन असे वचन देतो' तेव्हा कुठे रोशन इहलोकाचा निरोप घेतो. एकतर त्या शपथेला काही अर्थ नाही, पाजींनी डायलॉग चुकीचा बोलला आहे - 'तुम ऐसा कोई कदम नही उठाओगे जिससे तुम्हारी भाई की आत्मा को शांती पहुंचे'. तर्कशास्त्राच्या कसोट्यांनुसार याचा अर्थ 'तू नॉनस्टॉप हाणामारी कर' असा निघतो. दुसरे म्हणजे या लोकांना हाणामारीशिवाय दुसरी कसलीही कोअर कंपिटन्सी नसल्यामुळे राका इतर काहीही करू शकत नाही. तिसरे म्हणजे शपथ घेतल्यानंतरही रोशन मरतोच. पण रोशन मेल्याशिवाय कथा पुढे जाऊ शकत नसल्यामुळे - ये भी ठीक हैं.

२.२) सात साल बीत गए

तिकडे तुरुंगात "शाका आया, शाका आया" चा जयघोष सुरु आहे. जंगावर-दिलावर कबिल्यांचे प्रभावक्षेत्र फारच मर्यादित असावे किंवा पोलिसांना लाच देणे त्यांच्या उसूलांत बसत नसावे. जे काही असेल, शॉटगनची कुठल्याशा तुरुंगात रवानगी झाली आहे. तिथला जेलर आहे जगदीश राज (अनिता राजचे वडील). याच्या कानांपर्यंत जंगावर कबिल्याची कीर्ति पोहोचलेली नसल्यामुळे काही संवादमौक्तिके आपल्या कानांवर आदळतात. सारांश असा की शाकाचा नाद करायचा नाही. जेलर हे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देतो.

आता आपल्याला गचाळ एडिटिंग आणि महागचाळ पटकथा लेखन बघावयास मिळते. त्यांना असे दाखवायचे आहे की सात वर्षांचा कालावधी निघून गेला आहे आणि शाका या तुरुंगातून त्या तुरुंगात फिरतो आहे. पण त्यासाठी एडिटरने कसलेही ट्रान्झिशन टाकलेले नाही. पटकथा लेखकानेही "शो, डोन्ट टेल" हा नियम भ्याड लोकांसाठी आहे असे ठरवून आपल्याला टाईम स्किपविषयी रझा मुरादच्या तोंडून कळवले आहे. बॉटम लाईन, मध्ये सात वर्षे निघून गेली आहेत. शॉटगनची नव्या तुरुंगात बदली झाली आहे. तो किती डेंजरस आहे हे दाखवण्यासाठी एक इन्स्पेक्टर, तीन हवालदार पूर्णवेळ त्याच्यावर बंदुका रोखून आहेत. याच तुरुंगात कैक दिवस रझा मुराद कैद होता. आज त्याची सुटका झाली आहे. सिनेमाच्या फॅशनला साजेसे लेदरचे लाल-काळे रंगाचे पॅचवर्क रझा मुरादने घातले आहे. पुन्हा हे सर्व रखरखीत उन्हात. त्यालाही कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा व्हिलन आहे हे त्याच्या महाजाड भुवयांनी अधोरेखित केले आहे. गळ्यात कसलेसे आभूषण आहे. हा शाकाचा भाऊ आहे. दोघांमध्ये हवापाण्याच्या गोष्टी होतात. रझा मुराद विसरतो की आपण नुकतेच तुरुंगातून सुटलो आहोत आणि शाकाप्रमाणेच सगळीकडे "मौत और खून की लकीरे" काढण्याचे वचन देतो. इथे शाका क्लिनिकली इन्सेन असल्याचा संशय बळावणारे एक्सप्रेशन्स!

२.३) शुद्ध बावळट

बोलून चालून तो पडला रझा मुराद. "मौत और खून की लकीरे" त्याच्या कुवतीच्या बाहेरचे काम आहे. तो घोड्यावर बसून एका तरुणीचा पाठलाग करू लागतो. ही तरुणी आहे दलजीत कौर नामक पंजाबी अभिनेत्री. हिचे कपडे आश्चर्यजनकरित्या सामान्य आहेत. ती एका वैद्याच्या घरात घुसते. वैद्य म्हणतो की तुला हार्ट ट्रबल आहे, उगाच धावपळ करू नकोस. ती म्हणते, अरे म्हातार्‍या माझ्या मागे लागलेल्या ट्रबलपासून आधी वाचव मग हार्ट ट्रबलविषयी बोलू. इथे आपल्याला रझा मुरादचे नाव जाबरसिंग आहे ही बिनकामाची माहिती मिळते. रझा मुराद मरतुकड्या वैद्याला ढकलून देतो. पण तरुणी अधिक चपळ असल्याने ती निसटते. मग तिला विविध वयोगटातील चार-पाचजण भेटतात. ती त्यांच्याकडे मदत मागते. इथे बॅकग्राऊंडला "भरोसा" ही अक्षरे रंगवलेली भिंत टाकण्याचा दिग्दर्शकीय टच. त्यानुसार आधी ते एक्स्ट्रा शौर्याचा आव आणतात पण रझा मुराद येताक्षणी गळपटतात. त्यांची निर्भत्सना करून ती तिथूनही पळते.

रझा मुरादला एवढा वेळ वाया घालवायची सवय नाही. तो म्हणतो की कशाला धावपळ करतेस, तसेही तुला हार्ट ट्रबल आहे. पण तिचा मर्दप्रजातीवर अवास्तव विश्वास आहे. ती म्हणते की सूर्यास्ताच्या आधी जर कोणा मर्दाने तुला तुडवले नाही तर तुला काय करायचे ते कर. तसे बघावे तर हा शुद्ध बावळटपणा आहे. व्हिलनला अशा ऑफर द्यायच्या नसतात. पण तिच्या सुदैवाने ती पळत पळत दिलावर कबिल्यात आली आहे. चांदनी भाभी तिथे प्रकटतात आणि तरुणीला अभय देतात. विधवा स्टेटस दर्शवणारी पांढरी साडी त्यांनी परिधान केली आहे. रझा मुरादला झालेले मॅटर ठाऊक आहे. त्याला वाटते की आज हिलाही मारता येईल. पण राज बब्बर आडवा येतो. हा धरमपाजींचा सर्वात धाकटा भाऊ. याचे कपडे तुलनेने साधे आहेत. कपाळाला कसलीशी चिंधी बांधली आहे. तो रझा मुरादला म्हणतो की बंदुकीच्या बळावर गमजा मारणे बंद कर. रझा मुरादही महामूर्ख! तो लगेच बंदुक फेकून देऊन हाणामारीस उतरतो.

३) जाबर, तुझे जीने नही दूंगा

३.१) भाभी, तरुणी, आणि फर्स्ट-एड

बाज रब्बर वि. रझा मुराद हा सामना रंगतो. दोघे एकमेकांना पाळीपाळीने बुकलतात. फायटिंग खरीखुरी वाटावी म्हणून मध्ये मध्ये भाभी-तरुणीचे चिंताक्रांत क्लोजअप्स आणि दोघांना आपटायला मुबलक प्रमाणात रचून ठेवलेल्या विटा, मडकी इ. अखेर पारडे रझा मुरादच्या बाजूला झुकते. खोडरब्बर रक्तबंबाळ होऊन कोसळतो. धाकल्या दीराची अवस्था बघून चांदनी भाभी बेंबीच्या देठापासून किंचाळतात (हा भयाण शॉट आहे) - राका! सात वर्षांमध्ये राका अजूनच जाड झाला आहे. तो रझा मुरादला कॉम्प्लेक्स येईल असे विचित्र फॅशनचे कपडे घालून अवतरतो. इथे आपल्याला दिसते की दिलावर कबिल्यात "भरोसा लीडर अगरबत्तीयां" वापरतात. तसेच राकाच्या बॅकग्राऊंडला पुन्हा "भरोसा" व "लीडर" चा दिग्दर्शकीय टच. धरमपाजी रझा मुरादला म्हणतात की बिल खूप होतंय, चड्डीत राहा. पण रझा मुरादला अंथरूण न पाहताच पाय पसरायची सवय आहे. तो म्हणतो की विसरू नकोस रोशनला आमच्या कबिल्यातील बंदुकीची एक गोळीसुद्धा पचली नव्हती. हे धादांत खोटे विधान आहे. रोशनला मारायला तीन गोळ्या लागल्या होत्या. अशा खोटारड्याला पाजींकडून मार पडणे रास्तच आहे.

परत हाणामारी सुरू. रझा मुरादला पहिल्या फटक्यातच आपण जीवघेणे प्रकरण अंगावर घेतल्याची कल्पना येते. तिकडे तरुणी जाऊन रबराला कवटाळते. ते बघून चांदनी भाभी त्याच्या दुप्पट आवेशात फ्रेममध्ये घुसून रबराला कवेत घेतात. हा कुठला फर्स्ट-एड आहे? पाजी रझा मुरादला बुकल-बुकल-बुकलतात. ही संधी साधून तरुणीही त्याला दोन कानाखाली वाजवते. मग ती जाऊन पाजींच्या हाताचे चुंबन घेते. मग रडायला लागते. मग अचानक हसायला लागते. हे बघून पाजी प्रचंड गोंधळतात. राज कोहलीला देखील आपण काय करावे हे सुचत नाही. जेव्हा बॉलिवूड दिग्दर्शकाला काय करावे हे सुचत नाही तेव्हा तो गाणे सुरु करतो. त्यानुसार ती तरुणी वेडीपिशी होऊन नाचू लागते.

३.२) गुरूर, तुझे जीने नही दूंगा

गाणे आहे तेरा गुरूर टुकडे टुकडे हुआ. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, आणि गायिका आशा भोसले. ब्रिटिश कॉमेडिअन रिचर्ड अयोआदी एकदा म्हणाला होता की "ऑफ्टन देअर इज अ टेंडन्सी टू रीच फॉर एक्सलन्स. लाईफ ऑफ एक्सलन्स इज अ बोरिंग लाईफ. आय थिंक वी ऑल्सो नीड कंफर्टिंग मीडिऑक्रिटी". या सिनेमाच्या म्युझिक डिपार्टमेंटचा यावर पूर्णतया विश्वास आहे. त्यामुळे या सिनेमातील गाण्यांमध्ये कंफर्टिंग मीडिऑक्रिटी ठासून भरली आहे. पण जसे विराट कोहली डॉट बॉल खेळत नाही तसे राज कोहली इंचभरही फ्रेम वाया घालवत नाही. त्यामुळे या मीडिऑकर समुद्रातही काही मोती आहेत.

तरुणी आधी "टुकडे उठा और जा जा जा" "अपना मूंह छुपा और जा जा जा" असे म्हणत रझा मुरादला लाथा घालते. मग ती पाजींचा बेल्ट काढून घेते. हे बघून चांदनी भाभी दचकतात. बेल्टचा वापर रझा मुरादला बडवण्यासाठी होतो. चांदनी भाभीचा जीव भांड्यात पडण्याचा क्लोजअप - तात्पर्य पाजींची पँट खाली घसरली नाही. रझा मुरादवर अत्याचार करायचे असल्यामुळे त्याला भर उन्हात हिचा डॅन्सही बघावा लागतो आहे आणि त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहेत. भारतीय जनता अतिशय सॅडिस्ट असल्यामुळे त्याची ससेहोलपट बघायला लगेच गर्दी जमते. या गर्दीसमोर त्याचा अजून थोडा पाणउतारा केला जातो. मग अचानक तरुणीला आठवते की आपल्याला हार्ट ट्रबल आहे. आता एवढ्या उन्हातान्हाचं नाचल्यावर अजून काय होणार? तिला हार्ट अ‍ॅटॅक येतो.

३.३) लॉजिक, तुझे जीने नही दूंगा

धरमपाजी इथे अप्रतिम संवाद फेकतात - अरे गिरना तो जबर को चाहिए था, ये सबर कैसे गिर गया? तरुणी मरायला टेकल्यानंतर तिला आपल्यात अजून बराच वाह्यातपणा शिल्लक असल्याची जाणीव होते. ती पाजींना सांगते की या रझा मुरादचा पाणउतारा काही पुरेशी शिक्षा नाही. जंगावर कबिल्याची लोकांना धडा शिकवण्यासाठी काहीतरी फार भारी करावं लागेल. पाजी विचारतात काय करू? ती म्हणते की जाबर आणि शाकाला एक बहीण आहे. ती खूप मग्रूर आहे. तिला जर दिलावर कबिल्यात लग्न करून आणलं तर हिशोब चुकता होईल. हे सर्व ती कॅमेर्‍यात बघत बोलते. पाजी वचन देतात की खोडरब्बराचं आणि जाबरच्या बहिणीचे लग्न होईल आणि ती दिलावर कबिल्यात सून म्हणून येईल. हे ऐकून तरुणी समाधानाने प्राण सोडते.

एकतर हे काय लॉजिक आहे? ती कोण कुठली बहीण, काळी का गोरी कोणी पाहिलेली नाही. त्यात हिच्या म्हणण्यानुसार मग्रूर. तिला सून करून घ्यायचं म्हणजे धोंडा गळ्यात बांधायचा. कोणी सांगितलेत असले नस्ते धंदे? दुसरे, समजा लग्न झालंच तर रेम्याडोक्याचे जंगावर कबिलेवाले चांदनी भाभीप्रमाणे तिलाही मारण्याचा प्रयत्न करणार नाहीत हे कशावरून? तिसरे म्हणजे खोडरब्बर तिच्या गळ्यात मारण्याएवढी ती बंडल आहे का? (उत्तर - हो) असो, यात खूप काही मुद्दे काढता येतील तरी कथानक पुढे नेऊयात. धरमपाजी जाऊन रझा मुरादचे बखोट धरून सुनावतात की आपला नाद करायचा नाही. रँडम तरुणीने आपल्याला भाऊ संबोधून अंतिम इच्छा सांगितली आहे. जा, तुझ्या बहिणीची डोली सजव, मी वरात घेऊन आलोच.

३.४) अ‍ॅक्टिंग, तुझे जीने नही दूंगा

रझा मुराद तसाच जखमी अवस्थेत जंगावर कबिल्यात परततो. शरमेने त्याने मान खाली घातली आहे. पाजींच्या मुष्टिप्रहारामुळे त्याचे नाक फुटून ते कापल्यासारखे दिसत आहे. जंगावरवाल्यांना "लेका नाक कापलंस" म्हणण्याची संधी मिळावी म्हणून हा सेटअप. तरीही रझा मुराद जरा टेरर असल्यामुळे कोणाची काही बोलायची हिंमत होत नाही आहे. आणि मग......

बिहोल्ड, रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग - https://youtu.be/rhPHcV8lSx4?t=1793 (इथून पुढची साधारण दोन मिनिटे बघणे)

प्रॉब्लेम हा नाही आहे की तिचा 'अभिनय' दिव्य कोटीतला आहे. ओरिजिनल सीनमध्येही प्रचंड ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे पण ती अतिशय स्टायलिस्टिक ओव्हर अ‍ॅक्टिंग आहे. त्या विचित्रपटाच्या काँटेक्स्टमध्ये इट समहाऊ वर्क्स. (ओरिजिनल सीन - दारो नटनी किल्स माख्या) इथे रेफरन्स असूनही तिला ओव्हरअ‍ॅक्टिंगही नीट करता आलेली नाही हा प्रॉब्लेम आहे. रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग हे बिरुद अनाठायी नाही, तिचे इतर चित्रपटातही असे अनेक सीन्स आहेत (आमच्या अभ्यासानुसार डाकू बिजली नामक चित्रपट या अ‍ॅक्टिंग स्कूलचे शिखर आहे. वैधानिक इशारा: नवख्या प्रेक्षकांनी डाकू बिजलीपासून दूर राहावे.). अर्थात रझा मुरादचा मरण्याचा अभिनयही काही कमी दिव्य नाही.

असो, तर रोशनीचे चित्रपटातील नाव आहे रेश्मा. कबिल्याची इभ्रत धुळीस मिळवल्याबद्दल रेश्मा आपल्याच भावाला, जाबरला दोन गोळ्या घालून ठार करते. स्वतःवर नको तितका विश्वास असल्यामुळे ताई राका की लाश आणण्याची प्रतिज्ञा करतात आणि तडक घोड्यावर मांड टाकून लाश आणायला निघतात.

इथे माझा अल्पविराम! या पॉईंटला चित्रपटाचा मुख्य सेटअप पूर्ण झाला आहे. याशिवाय अनिता राज, विनोद मेहरा, आणि शक्ती कपूरही नंतर आपल्याला दर्शन देतात. धरमपाजी रोशनी-खोडरब्बर जोडी कशी जुळवतात, शॉटगनचे योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न, आणि उर्वरित रोमहर्षक प्रसंग प्रतिसादांत कव्हर करूयात.

____________________________________________________________________

पुढील विश्लेषण येथे

(४) - https://www.maayboli.com/node/78997#comment-4671598

(५) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672214

(६) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672799

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

८) व्हिलनकडे शॉटगन नसली तरी चालते, शक्ती असली पाहिजे

८.१) अभ्यासू शक्ती

बादल चांदनी भाभींसाठी कुबड्या घेऊन आला आहे. चांदनी भाभी म्हणतात अरे तू आणि राका असताना मला कुबड्यांची काय रे गरज? राज बब्बरही अगदी गहिवरून म्हणतो की सॉरी मी तुला फक्त दोन लाकडी कुबड्याच देऊ शकतो. दोघेही आपण नको ते प्रश्न उपस्थित करत असल्याचे उमगून एकमेकांना घट्ट मिठी मारतात. कारण "नको ते प्रश्न" कधीच पुरेसे नसतात.

भाभींचे फॉल्स अलार्म्स, रोशनी तै आणि तीच ती वादावादी याने सिनेमा दुष्टचक्रात अडकत चालल्याने काहीतरी उपाययोजना करणे भाग आहे. त्यानुसार शक्ती कपूरची एंट्री होते. त्याला सिनेमा बॅक ऑन ट्रॅक आणायला एक मिनिटही लागत नाही. तो सांगतो की त्याने खूप चोर्‍या केल्या पण कुठे पाऊलखुणा सोडल्या नाहीत. खूप खून केले पण त्याच्या हातावर एकही रक्ताचा डाग नाही - तो हे खूपच शब्दशः घेतो आणि शाकाला आपला पंजा दाखवतो. बघ कसा सॅनिटायझरने धुतल्यासारखा स्वच्छ आहे. शक्ती कपूर काही कारणाने पंजाबीमिश्रित हिंदी बोलतो आहे. याने एकट्याने ओरिजिनल पाहिला आहे. त्यामुळे हा सेटवर अभ्यास करून आला आहे. बाकी सगळे आपल्या मनाला येईल तशी कॉपी करत असलेले पाहून याच्या अभ्यासू मनास अतीव दु:ख झाले असणार.

शाका शक्तीचे स्वागत करून म्हणतो की मी तू लहान असतानाच सांगितलं होतं की तू मोठ्ठा बदमाश होणार आहेस. शक्ती गुरुदक्षिणास्वरुप खूप सारे पैसे, भेटवस्तू घेऊन आला आहे. तो एक थैलीभरून पैसे शॉटगनच्या पायावर ओततो. शक्तीची अपेक्षा आहे की शाकाने त्याचे लग्न रेश्मासोबत लावून द्यावे. आधी जरा शक्तीची वेशभूषा बघू. गरुडाचे चित्र पाठीवर आणि खिशापाशी असलेला शर्ट, मॅचिंग रंगाची पँट, जरासा विरलेला बेल्ट, अस्ताव्यस्त केस आणि छातीवरचे जंगल दिसेल अशा बेताने न लावलेली बटणे. याचा एकंदरीत बावळट अवतार बघता कुठलेही प्रश्न न विचारता याचे रोशनीतैंशी लग्न लावले पाहिजे, दोघे मेड फॉर इच अदर आहेत. पण एवढ्या भेटवस्तु बघून शाकाला याची थोडी दया येते. तो म्हणतो की मला काही तुझ्या पैशांचा मोह नाही. आता तू देतोच आहेस तर मी या भेटी स्वीकारतो पण मला काही त्याचा मोह नाही. पण लग्न तेव्हाच होईल जेव्हा माझ्या दुश्मनांचा बीमोड होईल. शक्ती म्हणतो की ठीक आहे, मला नाव सांग मी त्या दुश्मनाचा खात्मा करतो. शाका म्हणतो की माझ्या शत्रूवर मी भाडोत्री गुंड सोडत नसतो.

८.२) प्रॉब्लेम सॉल्व्हिंग

तिकडे रोशनीतै सीएसआय सायबरसोबत कंफर्टिंगली मीडिऑकर गाण्यावर नृत्य करण्यात मग्न आहेत. आधी दोन वेळा "बादल, रेश्मा, बादल, रेश्मा" असा हाकामारीचा खेळ होतो. मग शब्बीर कुमार गाऊ लागतो - तुम याद न आया करो, याद आने से पहले आ जाया करो. हा प्रकार चालू आहे दोन गावांमधील झुलत्या पूलावर. मधल्या काळात हा पूल रिपेअर होऊन सस्पेन्शन ब्रिज झाला आहे. जसा हा पूल लटकला आहे तसेच रोशनीच्या डोक्यावर कुठून तरी आणलेले गंगावन लटकले आहे. तिला आवाज आहे आशा भोसल्यांचा. आता या पंकज उदास गाण्यावर या दोघांना डान्स करायचा आहे. दोघांनाही नाचता येत नाही. जर तुम्हाला हा प्रश्न सोडवता आला तर तुम्ही लिंक्डइन प्रोफाईलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल अ‍ॅड करू शकता.

इथे दिलेले सोल्युशन असे की राज बब्बरला तिला मिठीत घेण्याखेरीज स्टेप्स नाहीत. कसं आहे की बिस्मार्क म्हणून गेला होता की एकावेळी दोन शत्रू अंगावर घ्यायचे नसतात. आता उरला प्रश्न रोशनीच्या स्टेप्सचा. रोशनीकडे फूटवर्क नाही. मग स्पिनिंग विकेटवर तिला बॅटिंग कशाला द्यायची? त्यामुळे तिच्याकडे असलेल्या गोष्टी तिला हलवण्यास सांगितले आहे. कॅमेराही अगदी सुयोग्य अ‍ॅंगलने लावला आहे. तरी मध्ये मध्ये क्रिएटिव्हिटी उफाळून येते. जसे पहिल्या कडव्यानंतर राज तिला उचलून घेतो आणि ती गुडघ्याने हलकेच राजच्या नको त्या ठिकाणी आघात करते. तिचे गंगावन लूज आहे, कधीही निघून येऊ शकते. मग तिला दोन्ही हातांनी गंगावन धरायला लावावे. डोक्यामागे हात घेऊन डोलण्याची स्टेप देऊन तो फ्लॉ लपवला आहे. गाण्यात एकही हाय एनर्जी स्टेप नाही. अशावेळी पूलाच्या कडेवर, नदीकाठी अशा सीनिक लोकेशन्स दिल्या आहेत. त्यात हे दोन ठोकळे केमोफ्लाज केले आहेत. टेंपो वाढल्यावर त्यांना पळायला लावून गाणे उगाच थोडे फास्ट असल्याचे भासवले आहे. कोरिओग्राफर्सनी अशा केस स्टडीजचा अभ्यास केला तर आजकालची "नृत्यकुशल" मंडळी थोडीतरी नृत्यकुशल वाटतील.

८.३) बॅकग्राऊंड चेक आणि हैया हैया

जवळपास पावणेदोन तास आणि प्रत्यक्ष सिनेमातील कैक आठवडे रोमान्स केल्यानंतर रोशनीला आपल्या क्रशची बॅकग्राऊंड चेक करण्याचे सुचते. जनहितार्थ - आधी चेक नंतर मेट. खोडरबर पण पोचलेला प्राणी आहे - "मैं रहने वाला तो प्रेमनगर का हूं". रोशनीतै भोळसट असल्याने त्या खोदून खोदून चौकशी करत नाही. त्यांचे हे भाबडे प्रेम बघून परीक्षित साहनी अचानक फ्रेममध्ये येऊन यांना आशीर्वाद देतो (नॉट गॉना लाय, त्या फकीराला बघून मी "हायला हा अजून जिवंत आहे होय" उद्गारलो).

घरी रोशनीची वाट बघतो आहे शक्ती कपूर. तो तिला उगाच मस्का लावण्याचा प्रयत्न करतो. इथे सर्वसामान्य बॉलिवूडपटात हिरोईन अशा वॉनाबीजना उडवून लावेल किंवा "ड्यूड यू आर क्रिपी" लूक्स देईल. पण रोशनी म्हणते की तू जर राकाचे मुंडके मला आणून दिलेस तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पहिला मुद्दा - मग खोडरबराचे काय? दुसरा मुद्दा - जर शक्तीचा फक्त राकाला मारण्यासाठी वापर होणार असेल तर त्या बिचार्‍यावर हा अन्याय नाही का? तिसरा मुद्दा - हीच अट राज बब्बरला घालता आली नसती का? प्रेमनगरवाले फालतू बॅकग्राऊंड चेक करण्यापेक्षा थेट विषयाला हात घालता आला असता. असो, शक्ती बिईंग द सिंप ही इज राकाला मारण्यासाठी निघतो.

तिकडे अनिता चक्कू मारत आहे. जगदीपच्या डोक्यावर सफरचंद ठेवून ते सुर्‍याने फोडण्याचा खेळ चालू आहे. तिकडे शक्ती येतो. रस्त्यात बाई उभी आहे तर आपद्धर्माचे स्मरण होऊन तो तिला छेडतो. ती म्हणते हे बघ माझ्या हातावर राकाचे नाव गोंदवले आहे. शक्ती म्हणतो बरं झालं गावलीस. आता तुझ्यामार्फत मी राकापर्यंत पोहोचेन. इथे एक फार भारी डायलॉग आहे - अनिता त्याला "कुत्ते" म्हणते. यावर शक्ती पंजाबीत म्हणतो की हो हो मी कुत्ता, माझा बापही कुत्ता, आता एकदम चूप! अनिताला अशा तर्‍हेने गप्प केल्यानंतर तो गावकर्‍यांना म्हणतो की राकाला सांगा, त्याची आयटम माझ्या ताब्यात खूनी पहाडीवर आहे. जर तो आला नाही तर मी तिच्यासोबत हैया हैया करेन.

९) प्रेमात पडताना विचार करू नये, पण प्रेम करताना दहावेळा विचार करावा.

९.१) अभ्यासू व्हिलनचे बॉलिवूडला वावडे आहे

राकाने कितीही टिंगल केली तरी त्याचे बिजलीवर प्रेम आहे. त्यामुळे तो हैया हैया टाळण्यासाठी खूनी पहाडीवर जातो. शक्ती त्याला प्रामाणिकपणे सांगतो की होणार्‍या बायकोची लग्नाची अट आहे, तुला मारावे लागेल. पाजी अर्थातच शक्तीच्या धमक्या सीरिअसली घेत नाहीत. अगदी खरे सांगावे तर शक्ती या सिनेमातील सर्वात हुशार लढवय्या आहे. तो लढायला चाकू घेऊन आला आहे. पाजींसारख्या पहिलवान गड्यासमोर रॉ पॉवर नव्हे तर चपळाई अधिक कामी येईल हे त्याने ताडले आहे. त्यानुसार तो वजनाला हलके असे शस्त्र घेऊन आला आहे. नव्वद टक्के वेळा त्याची फायटिंग स्टाईल पाजींना हरवेल. पण पाजी हिरो असल्याने ते जिंकतात. शक्ती कपूरचा गळा आवळून ते त्याला मारून टाकतात. त्याचे प्रेत शाकाकडे पोहोचवण्याची जबाबदारी जगदीपवर येते.

जगदीपही बिचारा शकुनाच्या भेटवस्तु आणि शक्ती कपूरचे प्रेत घेऊन जातो. शाकाला तो निरोप देतो की बैसाखीच्या दिवशी वरात येईल. शक्ती मारला गेलेला पाहून शाकाला थोडा धक्का बसतो. रोशनी मात्र बरी ब्याद गेली म्हणून खुश होते. आता शाका चिडतो. तो म्हणतो की भेटवस्तु आम्ही स्वीकारतो. अजूनही आमचा विरोधच आहे पण तरी भेटवस्तुंना नाही कसं म्हणायचं? पण शक्ती कपूरला मारलं म्हणजे फार बिल झालं. त्याने एकट्यानेच स्क्रिप्टचा अभ्यास केलेला, तो मरून कसं चालेल? ते काही नाही आता कत्लेआम.

९.२) फकीर लोकांनी कोड्यात बोलणे सोडून दिले पाहिजे

फकीर तिथे अवतरतो. तो शाकाला समजवायचा प्रयत्न करतो की एवढी हिंसा करून काय साध्य होईल? त्यापेक्षा शांतिसंधी करण्यात दोन्ही पार्टींचे हित आहे. शाकाला प्रथमच बिल खरंच खूप झाल्याची जाणीव होते. पण आता उशीर झाला आहे, तो फकीराला उडवून लावतो. इथे चूक फकीराची सुद्धा आहे. त्याला जर हे माहित आहे की बादल राकाचाच भाऊ आहे तर किमान रेश्माला सत्य सांगणे इष्ट नाही का? किमान "तू राकाला ठार केलेस तर मी तुझ्याशी लग्न करेन" या ऑफरअंतर्गत शक्ती कपूरसारखे भोळे लोक मरणार नाहीत. एनीवे, जंगावर कबिल्यातील कोणीतरी एकदाचं फायबर-रोशनीला रोमान्स करताना बघतं. शाकाला फायनली लक्षात येतं की आपली बहीण ऑलरेडी प्रेमात पडली आहे.

तो तडक त्यांच्या रोमान्सच्या ठिकाणी जातो. रोशनीतैंचा थरकाप उडतो. त्या म्हणतात की रोमान्स नंतर, आधी तू पळ. तो विचार करून म्हणतो की ठीक आहे, पण तू संध्याकाळी परत ये. ती म्हणते बरं. शाकाला जरी फायबर सापडत नाही तरी नेहमी शर्ट पँटमध्ये फिरणारी आपली बहीण आज घागरा चोळीत असल्याचे त्याच्या नजरेतून सुटत नाही. तो तिला कैद करतो. इथून पुढची तीन मिनिटे स्किप केलीत तरी चालेल. पुन्हा एकदा "तुम याद न आया करो" वाजते आणि बादल-रेश्मा येरझार्‍या घालतात.

९.३) प्रेमपरीक्षा

रात्र झाली तरी रेश्मा न आलेली बघून बादल जंगावर कबिल्यात जातो. तो विचारतो की का गं नाही आलीस? रोशनी म्हणते की मी इथे कैदी आहे, इथून निसटणे मला अशक्य आहे. हे धादांत खोटे आहे. सिनेमाच्या सुरुवातीला ज्या स्टाईलमध्ये रझा मुरादला मारून ताई राका की लाश आणायला निघाल्या होत्या ते बघता इथून पळून जाणे त्यांच्यासाठी अशक्य नाही. जर हिचे खरंच बादलवर प्रेम असेल तर ही केव्हाच पळून गेली असती. खोडरबराने वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहे. पण प्रेक्षकांचे सल्ले बॉलिवूडने कधी ऐकली आहेत? रबरावर लवकरच पश्चात्तापाची वेळ येणार आहे.

तो म्हणतो की असं नको बोलूस, मी आता तुझ्यावाचून जगू शकत नाही. ती म्हणते अरे वेड्या, माझीही तीच अवस्था आहे. तो विचारतो की काही तरी मार्ग असेल ना? मासा गळाला लागला, तिचा चेहरा लगेच खुलतो. ती म्हणते की राकाचे मुंडके आणून दे (प्रेक्षक: बोललो होतो, आता पश्चात्ताप करून काय फायदा?) राज-ज्याला-बसला-धक्का-जब्बर मुळापासून हादरतो. पण तिच्याकडे सुद्धा व्हॅलिड मुद्दा आहे. ती म्हणते की मी आजवर काही काही मागितलं नाही, अगदी हॉटेलची बिलं सुद्धा मीच भरली. प्रेमापोटी लोकं भिकेला लागतात, आपला जीव पणाला लावतात, तुला एक खून करायला काय धाड भरली? तिचं इमोशनल ब्लॅकमेलिंग बरंच इफेक्टिव्ह आहे. खोडरबर म्हणतो की उद्या पुलावर ये. हा सगळा प्रकार शाका लपून बघतो आहे. रबर गेल्यानंतर रोशनी त्याला सांगते की हा माझा डावच होता. उद्या जाऊन बघूतरी पुलावर की फायबरची बँडविड्थ किती आहे.

१०) प्रेम आणि युद्धात लॉजिक नसते

१०.१) रहस्योद्घाटन

आपल्याला दिसते की बादल भावनावेगात पाजींच्या बेडरुमकडे निघाला आहे. रोशनीचा आवाज त्याच्या कानांत निनादतो आहे. तरातरा चालत तो आत शिरतो, पाजींच्या पोटात चाकू खुपसून त्यांना मारतो आणि स्वप्नातून जागा होतो. असे फालतू सीन्स टाकणे दिग्दर्शकांनी बंद केले पाहिजे. बादल राकाचा खून करणे कुठल्याही युनिव्हर्समध्ये शक्य नाही. मग प्रेक्षकांचा वेळ वाया घालवण्यात काय हशील? त्याची किंकाळी ऐकून चांदनी भाभी लंगडत लंगडत येतात. इतक्या तात्काळ प्रकट होण्यासाठी त्या पूर्णवेळ बादलच्या बेडरुमबाहेर उभ्या असल्या पाहिजेत. ही गोष्ट शक्य कोटीतील असली तर पुन्हा एकदा भाभी नको तिकडे गेलेल्या आहेत. बादल सांगतो की मला दु:स्वप्न पडले. मी खून कोणाचातरी केला पण मारलो मी गेलो. चांदनी भाभी म्हणतात आणि वेडी मी झाले आहे. गपचूप काय ते मॅटर क्लिअरली सांग, आता सिनेमा आटोपता घ्यायचा आहे. हा अजूनही कोड्यातच बोलतो आहे - माझ्या आयटमने प्रेमाची अशी किंमत मागितली आहे जी मी अ‍ॅफोर्ड करू शकत नाही. तिने राकाचे मुंडके मागितले आहे. तो म्हणतो की "मालिक जितना था सब लाया हूं" न्यायाने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसर्‍या दिवशी रोशनी शर्ट पँट घालून बादलची पुलावर वाट बघते आहे. पण बादलच्या जागी अवतरतात पाजी. (बहुधा तरी हा सीन काटला असणार, पण बेसिकली बादल-चांदनी भाभीचे बोलणे पाजींनी ऐकले असावे). ते म्हणतात की आमच्या कबिल्याचे मिशन मोहोब्बत पसरवणे आहे. पण असे दिसते की तू काढलेल्या उपायाची अंमलबजावणी केल्याशिवाय ते शक्य नाही. ती गोंधळते. पाजी खुलासा करतात की ऑप्टिकल फायबर त्यांचा भाऊ आहे. रोशनी भूत पाहिल्यागत दचकते. म्हणून बॅकग्राऊंड चेक फार फार महत्त्वाचा!

१०.२) डील

राका स्पष्ट करतो की मला मरायला काय प्रॉब्लेम नाही (तसेही जगून तरी काय मिळणार, अनिता राजच). पण मी मेल्यानंतर हा मासळीबाजार बंद पडला पाहिजे. रोशनी दोलायमान अवस्थेत - तिने हे घडण्याची खासच अपेक्षा केली नव्हती. मग तिथे येतो शाका. तो आत्तापर्यंतचा सर्वात लॉजिकल मुद्दा मांडतो. तू बिनदिक्कत आपल्या भावाला, रझा मुरादला, गोळी घातलीस. मग राका तर आपला शत्रू आहे. आता तुला फेफरं भरण्याचे कारण ते काय? राका म्हणतो की ब्रदर, यू आर राईट. पटकन मला मारून टाक आणि हे शत्रुत्व संपू देत. शाका म्हणतो ब्रदर, यू आर राँग. तू मेलास तरी मी सुधरणार नाही, मासळीबाजार चालूच राहिल.

हे ऐकल्यावर रोशनीचा होतो कॉग्निटिव्ह डिसोनन्स! ती घेते नदीत उडी. खोडरबरही पाठोपाठ उडी मारतो. ती नदी काय फारशी खोल नाही, दोघे तात्काळ गतप्राण व्हायला हवेत. तसे होत नाही हा भाग अलाहिदा. हे बघितल्यावर कोणीही नॉर्मल माणूस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करेल. त्यानुसार पाजी किमान दोघे ठीक आहेत ना हे बघण्यासाठी कठड्यावरून वाकतात. शॉटगन मात्र जागच्या जागी ढिम्म! (शाका क्लिनिकली इन्सेन असल्याचा पुरावा) आता हे दोघे हाणामारी करणार तेवढ्यात यांच्यावर चोवीस तास लक्ष ठेवून असलेले पोलिस अवतरतात आणि यांना ताब्यात घेतात. पुढची साडेपाच मिनिटे जगदीप-जयश्री टी ट्रॅकची इतिश्री आहे, स्किप!

पोलिसांनी फार काही अ‍ॅक्शन घेतलेली दिसत नाही. शाका कबिल्यात परतला आहे आणि प्रेमी जोडप्याच्या शोधात आहे. तिकडे येतो राका. शाका घरी आलेल्या शत्रुला मारत नसल्याने तो मोठ्या आदराने राका कशासाठी आला आहे याची विचारपूस करतो. राका म्हणतो ए राजा, माझं म्हणणं ऐक, कशाला वाद वाढवतोस? बघ आमच्या घरी सासू नाही, आमची हुंड्याची अपेक्षा नाही आणि तसेही तुझ्या बहिणीसोबत लग्न करण्याचे वेडे साहस करणारा दुसरा कोण मिळणार आहे तुला? शाका म्हणतो मला मुळात लॉजिक हा विषयच मान्य नाही. राका म्हणतो ठीक आहे. तुला सूर्यास्तापर्यंत वेळ देतो. जर तू त्या दोघांना मारण्यात यशस्वी झालास तर तू जिंकलास. नाहीतर मी जिंकलो. शाका म्हणतो ओके. प्रेक्षक रिअ‍ॅक्शन - https://youtu.be/xRaWi15qJks?t=212 ही डील फकीर ऐकतो. अर्थात तो जाऊन जोडप्याला सावध करणार हे ओघानेच आले. नवीन मुद्दे उपस्थित होणे थांबले आहे. याचा अर्थ क्लायमॅक्सची वेळ झालेली आहे.

११) क्लायमॅक्स

११.१) शुद्ध बावळट

रेश्मा-बादल जोडीचे काय झाले ते बघितले पाहिजे. दोघांनी नदीत उडी मारली होती. ओलेती हिरोईन आणि गाणे झाले नाही असे होऊच शकत नाही. एफिशिअंट दिग्दर्शन ओळखण्याची ती खूण आहे. दुर्दैवाने संगीत दिग्दर्शकानी आणखी गाणीच बनवलेली नसल्याने पुन्हा एकदा "तुम याद न आया करो" चे रडगाणे वाजते. इथे नोंद घेण्याची बाब अशी की नदीत पडल्याने दोघांचे फक्त शर्ट, तेही उजव्या खांद्यापाशी फाटले आहेत. बाकी त्यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. त्यांचे कपडे, केस वगैरे वाळल्यानंतर फकीर येऊन परिस्थिती विशद करतो. फायनली दोघे पळून जाण्याचा निर्णय घेतात. फकीराला दूरवर शाका येताना दिसतो. तो त्याला आडवा जातो. शाकाला लग्गेच लक्षात येते की ते दोघे जवळपासच आहेत. हा शुद्ध बावळटपणा नाही काय? गपचूप रस्त्याने चालत राहावे. शाकाने अडवले की नेहमीसारखे काहीतरी कोड्यात बोलावे. मग हे दोघे पळाले त्याच्या विरुद्ध दिशेला बोट दाखवावे किंवा गप्प बसावे. याला खरंच यांचा जीव वाचवायचा आहे की नाही?

हे दोघे मध्यप्रदेश बॉर्डरकडे सरकले असावेत कारण जंगल चांगलेच माजले आहे. पाजी देखील तिथेच आलेले आहेत. शाकाच्या एका माणसाला रबर गोळी घालून ठार करतो. गोळीच्या आवाजाने त्या दोघांचे ठिकाण जगजाहीर होते. मग नारळाच्या झावळ्यांमधून डूबता सूरज शॉट. हे आपले टेन्शन वाढवायला. कारण हे दोघे भरदुपारी धावपळ करत आहेत. हे दोघे इतके बावळट आहेत की आपल्या डावीकडे रस्त्याच्या मधोमध उभा असलेला शाकाही त्यांना दिसत नाही. त्याच्या समोरून ते धावत जातात आणि केवळ एक चिल्लर एक्स्ट्रा मध्ये आल्याने शाकाची गोळी त्यांना लागत नाही.

११.२) फकीराचे बलिदान (जे सायन्सच्या साईडच्या लोकांनी सहज टाळले असते)

पुन्हा एकदा झावळी-सूरज शॉट पण आता मध्ये एक अ‍ॅडिशनल झाड. एकदाचा एक चिल्लर एक्स्ट्रा त्यांना गाठतो. सुदैवाने पाजीदेखील त्यांना शोधत शोधत तिथे येतात आणि चि.ए.ला ठार करतात. पाजींना बघून रोशनीचे हरखण्याचे एक्सप्रेशन पाहिण्यासारखे. दुर्दैवाने शाकाही तिकडेच आला आहे. पाजी म्हणतात की लपा पटकन. तेही झुडपामागे लपतात. शाका शब्दशः तुमच्या समोर उभा आहे. तो पाजींना इग्नोर मारून थेट झुडपामागे बघतो. सुदैवाने रेश्मा-बादलने पाजींचे म्हणणे शब्दशः घेतलेले नाही. त्यांनी तिथून पळ काढला आहे. त्याचा फारसा उपयोग होत नाही. शाका लवकरच त्यांना गाठतो आणि म्हणतो "जीने नही दूंगा" (रोल क्रेडिट्स)

शाका रेश्माला म्हणतो की या जगात पोएटिक जस्टिस नामक चीज आहे. तू सुरुवातीला तुझ्या भावाला, रझा मुरादला मारलेस. आता तुझा भाऊ तुला मारणार आहे. राजजींचा प्रेक्षकाच्या बुद्धिमत्तेवर विश्वास नसावा. अन्यथा शाकाला हे इस्कटून सांगण्याचे काही कारण नाही. आता मरण्यालायक एकच पात्र शिल्लक आहे - फकीर. लगेच फकीर मध्ये तडमडतो आणि शाकाची गोळी इमानेइतबारे खातो. गोळी खाल्ल्यानंतरही त्याच्या अंगात भाषण ठोकण्याइतपत जीव शिल्लक आहे. आणि का नसावा? त्याला गोळी लागल्याची जखम कुठे आहे? हा मरताना एवढी ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो की शाकाही गहिवरतो. फकीर म्हणतो की माझ्यासाठी तर शस्त्र खाली टाक. खरं तर त्या फकीराच्या मरण्याचे कोणाला काय सोयरेसुतक असण्याचे कारण नाही. तरीही शाका भलताच इमोशनल होतो आणि फकीराच्या मृत्युचे बिलही या दोघांच्या नावे फाडतो. इथे पाजी किंवा फकीराने भौतिकशास्त्राचा अभ्यास केला असता तर हे टाळता आले असते. वातावरणामुळे होणार्‍या अपवर्तनामुळे सूर्य प्रत्यक्ष अस्ताच्या दोन मिनिटे नंतर बुडताना दिसतो. म्हणजे खरा सूर्यास्त दोन मिनिटे आधीच झाला होता. या टेक्निकॅलिटीचा फायदा घेता आला असता पण फकीराला जिवंत ठेवूनही काय फायदा?

११.३) हुंडा

माझा सरळसाधा प्रश्न इतकाच आहे, आता पोलिस कुठे गेले? इतका वेळ डोळ्यांत तेल घालून ते लक्ष ठेवत होते, पण क्लायमॅक्ससाठी त्यांना सुट्टी दिली गेली की काय? असो, पाजी शॉटगनला सूर्यास्त होईपर्यंत थांबवण्यात यशस्वी होतात. ठरल्याप्रमाणे शाकाने या दोघांचे लग्न लावून देणे भाग आहे. पाजी म्हणतात की उद्या आम्ही वरात घेऊन येऊ, तू सगळी तयारी कर. शॉटगन म्हणतो ओके. अर्थातच त्याच्या डोक्यात पाजींना वाटेतच मारण्याचे आहे. असे दिल्या वचनाला न जागणारे लोक हिंदी सिनेमात कधीच यशस्वी होत नाहीत. तरीही एवढा वेळ घालवला आहेच तर शेवटची पंधरा मिनिटेही बघूयात.

अनिता राजच्या काँट्रॅक्टमध्ये दोन गाणी असल्याने वरातीपुढे तिला नाचायला लावले आहे. तिच्या नृत्यक्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने सोबत जयश्री टी आहे. आशा भोसले आणि उषा मंगेशकर गायला. गाणे आहे गली गली में बात चली, इतने जोरसे, इतने शोरसे किसकी ये बारात चली. या गाण्यात काही पॉईंट नाही. शाका वरात इंटरसेप्ट करेपर्यंत मध्ये फिलर. शाका आपली सगळी सेनाच घेऊन आला आहे. यांच्या वरातीत मुख्यत्वे बाजारबुणगेच दिसत आहेत. पाजी चिडून म्हणतात की याला काय अर्थ आहे? शाका म्हणतो टेक्निकली वरात अजून घरापर्यंत आलेली नाही. वरात घरी आली तर मी लग्न लावून देईन. म्हणून टेक्निकॅलिटीज्चा फायदा घ्यायचा असतो. आता धरमपाजी आहेत म्हणून, नाहीत गेलं असतं ना सगळं मुसळ केरात.

फायनल फायटिंग सुरु. दोन्ही कबिल्यातील लोक सारखेच दिसत असल्याने कोण कोणाशी लढते आहे हे कळायला काही मार्ग नाही. रोशनीला अ‍ॅक्चुअली थोडीफार फायटिंग येते (संदर्भ: डाकू बिजली). पण काही कारणास्तव ती गायब आहे. पाजी शॉटगन एकमेकांशी लढतात. खोडरबराचे पूर्ण लक्ष चांदनी भाभींना वाचवण्यावर केंद्रित आहे. हे बघता दिलावर साईडकडून फक्त अनिता राजच काय ती लढताना दिसते. हे लोक जिंकतात हे लक्षात घेता अनिता राज या सिनेमातील सर्वश्रेष्ठ फायटर म्हणावी लागेल. फायनल फाईटमध्ये कॉमेडी एलिमेंट टाकण्याचा काळाच्या पुढचा एक्सपेरिमेंट जगदीपला लढायला लावून केला आहे. पण सर्वात एंटरटेनिंग चांदनी भाभीच. एके ठिकाणी लपायचे सोडून त्या संपूर्ण रणांगणावर लंगडतात. एका पॉईंटला राज बब्बर त्यांना चक्क ढकलून देतो जे दिसताना भयंकर विनोदी दिसते. हा प्रकार चालतो पाच मिनिटे.

अखेर अनिता राजच्या पराक्रमाच्या जीवावर चांदनी भाभी जिवंत राहतात आणि शाकाचे बहुतांश लोक मारले जातात. पाजीसुद्धा एकदाचे शाकाला हरवण्यात यशस्वी होतात. शाकाला ते मारणार तेवढ्यात इतका वेळ गायब असलेली रोशनी मध्ये पडते. ती म्हणते की प्लीज याला सोडून दे, मी लग्नाला तयार आहे. पाजी उदार मनाने आपली प्रतिज्ञा, शाकाला ठार करण्याची, मोडतात आणि रेश्मा-बादल विवाहाची घोषणा करतात. आता सिनेमात एकच मुद्दा बाकी आहे. (७.३) मधील फोरशॅडोईंगनुसार हुंडा म्हणून शाकाचा पाय ठरला होता. याने चांदनी भाभींच्या लंगडेपणाची सुद्धा भरपाई होते. शाका क्लिनिकली इन्सेन असल्यामुळे तो सामान्य व्हिलनप्रमाणे तलवार फेकून अखेरचा प्रयत्न करण्याऐवजी स्वत:च स्वत:चा पाय गुडघ्यातून कापतो. हे बघून पाजींसकट सगळ्यांची दातखीळ बसते. हा "हुंडा" देतानाचा शॉटगनचा अभिनय कॅमेर्‍यामागून पाहिल्यानंतर राज कोहलीला कळून चुकते की यापुढे काहीही दाखवणे शक्य नाही. शाका एकदाचा आपला पराभव मान्य करतो. पाजी शांतिसंदेश देताना म्हणतात की परत कोणीही म्हणता कामा नये की "मैं तुझे जीने नही दूंगा" आणि पडदा पडतो.

चित्रपटाचा वास्तवातील उपसंहार असा - राज कोहलीने या चित्रपटानंतर तीन वर्षे कोणताच सिनेमा बनवला नाही आणि याच्या ओरिजनल मौला जटच्या सावलीतून अजूनही पाकिस्तानी चित्रपटसृष्टी बाहेर पडू शकलेली नाही.

तो शेवटचा शांतीसंदेश फारच ओढून ताणून आणलेला आहे. कुठेतरी सिनेमा संपवायला हवा, तर मग हे तात्पर्य म्हणून (की यापुढे असं कुणी म्हणू नये की मैं तुझे जीने नहीं दूँगा) संपवा एकदाचा - असं ठरवल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा सचिन, कोठारे यांचे पिक्चर जरा बऱ्या तात्पर्यावर संपतात, 'बनवाबनवी यशस्वी झाली' टाईप.

पायस ..खूपच धमाल आली वाचायला... Lol
मला सगळ्यात आवडलेलं वाक्य म्हणजे
तो विचारतो की का गं नाही आलीस?....
किती निरागस तो प्रश्न!!
आणि राज बबर ची नावं तरी किती निरनिराळी...दर वेळेस!
जिओ!!!!
थँक्यू...माझा मूड आनंदी केल्याबद्दल!!

राका स्पष्ट करतो की मला मरायला काय प्रॉब्लेम नाही (तसेही जगून तरी काय मिळणार, अनिता राजच).
>>>> हे एपिक आहे Rofl Rofl Rofl

क्लिनिकली इन्सेन Lol

पुर्वी मी लेख अर्धाच वाचला होता तेव्हा प्रतिसाद दिला होता का ते आठवत नाही. पण आता लेख पूर्ण आणि प्रतिसादातील दोन भाग वाचले. रझा मुरादला मारण्याचा सीन ही पाहिला.

महान लिहिले आहे! Lol

राका स्पष्ट करतो की मला मरायला काय प्रॉब्लेम नाही (तसेही जगून तरी काय मिळणार, अनिता राजच).>>
एकतर हे काय लॉजिक आहे? ती कोण कुठली बहीण, काळी का गोरी कोणी पाहिलेली नाही. त्यात हिच्या म्हणण्यानुसार मग्रूर.>>
बेल्टचा वापर रझा मुरादला बडवण्यासाठी होतो. चांदनी भाभीचा जीव भांड्यात पडण्याचा क्लोजअप - तात्पर्य पाजींची पँट खाली घसरली नाही.>>
जसे पहिल्या कडव्यानंतर राज तिला उचलून घेतो आणि ती गुडघ्याने हलकेच राजच्या नको त्या ठिकाणी आघात करते. तिचे गंगावन लूज आहे, कधीही निघून येऊ शकते. मग तिला दोन्ही हातांनी गंगावन धरायला लावावे. डोक्यामागे हात घेऊन डोलण्याची स्टेप देऊन तो फ्लॉ लपवला आहे. >>

व्हॉट अ जेम ...खूप हसले अजुन ही हसतेय. भारी परीक्षण..

दिलावर साईडकडून फक्त अनिता राजच काय ती लढताना दिसते. हे लोक जिंकतात हे लक्षात घेता अनिता राज या सिनेमातील सर्वश्रेष्ठ फायटर म्हणावी लागेल. >>
Happy

Pages