जीने नही दूंगा

Submitted by पायस on 20 May, 2021 - 02:15

'द अदर कोहली' उर्फ राज कोहलीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान मोजमापापलीकडचे आहे. त्याच्या शिखर वर्षातील राज तिलकचा रसास्वाद घेतल्यानंतर साहजिकच त्या वर्षातील दुसर्‍या कोहलीपटाचा, जीने नही दूंगाचाही आढावा घेणे भाग आहे. योडाने हा चित्रपट बघितल्यानंतर घोषणा केली की 'द फोर्स इज स्ट्राँग विथ धिस वन'. समीक्षकांनी नावाजलेले अळणी, नीरस, कंटाळवाणे चित्रपट बघून झालेल्या अजीर्णावर हा चित्रपट उतारा आहे. या चित्रपटाची थोडक्यात पूर्वपीठिका सांगायची तर १९७९ च्या सुप्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट मौला जटचा हा रिमेक आहे. मौला जटची भूमिका सुलतान राहीने केली होती. त्याचा एक जरी सीन पाहिला तरी त्याच्याजागी धरमपाजींखेरीज दुसरा पर्याय नाही या निर्णयाप्रत पोहोचता येते. अस्मादिकांच्यामते धरमपाजींनी ओरिजिनलला मागे टाकले आहे. दुर्दैवाने त्याचे पडसाद पाजींच्या अभिनयकौशल्यावर खोलवर उमटले आणि पाजींच्या शब्दकोशातून "संयत" हा शब्द पुसला गेला. पण ते काय चालायचंच. कारण चित्रपटातील इतर दिव्य गोष्टींच्या तुलनेत पाजींचा अभिनय नॅशनल अवार्ड विनिंग म्हणावा लागेल.

आणि अगदी हे सर्व जरी बाजूला ठेवले तरी या चित्रपटाचे सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे भारतीय जनतेची 'रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग' सोबत करून दिलेली ओळख! अशा चित्रपटांत दिव्य अभिनय होणे ही काही नवीन गोष्ट नाही. दिव्य अभिनय करण्याची अहमहमिका होणे यातही काही नावीन्य नाही. पण या सर्व दिव्य तार्‍यांनी एकत्र येऊन 'दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती' असे म्हणायला लावणारी एकमेव तारका म्हणजे रोशनी. मुख्य भूमिका साकारण्याची ही तिची पहिली वेळ. काही नाही तर रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगची मुहूर्तमेढ रोवणारा चित्रपट म्हणून बॉलिवूड याची कायम आठवण ठेवेल. तरी भूतमात्रांना प्रसन्न करण्यासाठी चार थेंब उडवल्यानंतर रसग्रहणास सुरुवात करूया.

१) रोशन, तुझे जीने नही दूंगा

१.१) जंग (अ‍ॅक्शन) वि. दिल (रोमान्स)

निवेदक कादर खान सुरुवातीला काहीतरी क्रिएशनिस्ट बडबड करतो. मुख्य मुद्दा असा की मनुष्यांमध्ये सुष्ट व दुष्ट दोन्ही प्रवृत्ती आहेत. त्यानुसार या सिनेमातही दोन कबिले आहेत - जंगावर आणि दिलावर. जंगावर = जंग, फाईट इ. दिलावर = दिल, प्रेम, मोहोब्बत इ. या सिनेमातील कबिला सिस्टिम, नॉमेनक्लेचर विचित्र वाटू शकते पण दिग्दर्शकाचा नाईलाज आहे. कारण मौला जटच्या स्टाईलचा या सिनेमावर प्रचंड प्रभाव आहे. असो, दिलावर कबिल्यातून आपल्या कथेस सुरुवात होते.

दिलावर कबिल्यात कोणा रोशनवर खटला चालू आहे. इथे कबिला शब्दप्रयोग केला असला तरी ती एक छोटीशी गढी आहे. गढीच्या पहिल्या मजल्यावरून तिथला सरदार विचारतो की रोशनचा गुन्हा काय आहे? रोशन म्हणजे आपले धरमपाजी. धरमपाजींनी पहिल्याच सीनमध्ये स्पष्ट केले आहे की या सिनेमाची 'फॅशनेबल' कपड्यांची स्वतंत्र व्याख्या आहे. काळा फुल बाह्यांचा टी-शर्ट, त्यावर चेक्सचा शर्ट, त्यावर काळा कोट, खाली मळकट खाकी विजार, लेदरचा बेल्ट, हंटिंग बूट आणि कपाळाला एक चिंधी बांधलेली अशा वेषात पाजी एंट्री घेतात. हा सर्व वेष टळटळीत उन्हात!

पाजींचा गुन्हा हा की त्यांचे जंगावर कबिल्यातील एका मुलीवर प्रेम आहे. त्यांच्यामते जर हे लग्न झाले तर शतका-शतकांपासून चालत आलेले वैर संपेल. शेरवानी घातलेला सरदार म्हणतो की दिलावर कबिल्यात प्रेम करणे गुन्हा नाही. च्यामारी मग खटला कशाला भरला? एक अंगरखा घातलेला कबिलेवाला येऊन म्हणतो की हाच खटला जर जंगावर कबिल्यात भरला असता तर असा फालतूपणा झाला नसता. दोन मुद्दे - १) मग तू जंगावर कबिल्यात जा ना! इकडे कशाला आगीत तेल ओततो आहेस? २) पाजींच्या आयटमची काही धडगत नाही.

१.२) प्रेमळ गुन्हा

जंगावर कबिल्यात पाजींच्या आयटमवर असाच खटला चालू आहे. पण इकडे तिला सरळ फरफटत आणले गेले आहे. हिचे नाव चांदनी. चांदनीची भूमिका केली आहे नीता मेहताने (पोंगा पंडितची हिरोईन). चांदनीला गुलाबी कलर स्कीमचा स्लीव्हलेस ड्रेस दिला आहे. ८०च्या दशकातील बंजारा स्त्री श्ट्यांडर्डनुसार रबरबँड लावून एका बाजूने पोंगा सोडला आहे. चांदनी म्हणते की प्रेम करणे काही गुन्हा नाही. कबिल्याचा सरदार (आणि बहुधा तिचा बाप) म्हणतो - व्हेरी गुड, इसी खुशी में सजा-ए-मौत हो जाए.

इथे हसत हसत, काळी कफनी परिधान केलेला परीक्षित साहनी एंट्री घेतो. हा फकीरबाबा झाला आहे. याच्या कपाळावर शैवपंथी गंध आहे, गळ्यात रुद्राक्षमाळा आहेत, हातात सर्पाकृती काठी आहे. इथे उच्चप्रतीचा चुना लावला आहे. कथानक क्लिअरली राजस्थान-पंजाब बॉर्डरवर, सूफी/वैष्णव/शीख प्रदेशात घडत असताना शैव साधू कुठून आला? त्यापेक्षा याला सूफी संताची वेशभूषा दिली असती. तसेही नाव फकीरबाबा आहेच. मुस्लिम पात्राचा कोरमही भरला असता आणि बिकानेरशी भूगोलही मॅच केला असता. असो. हा मोहोब्बत रिलेटेड काहीतरी जनरिक बडबड करतो. अशावेळी एक्स्ट्रांवर लक्ष केंद्रित केल्यास अधिक मनोरंजन होते. जसे की फकीरच्या डाव्या बाजूला एक एक्स्ट्रा आहे ज्याच्या डोळ्यांवर थेट ऊन येते आहे. त्यामुळे बाकी सर्व एक्स्ट्रा फकीराकडे बघत असताना हा एकटाच जमिनीकडे बघून चुळबूळ करतो आहे. या सिनेमातील बहुतांश सर्व एक्स्ट्रा प्रचंड मनोरंजक आहेत. तसेच साधारण निम्मे एक्स्ट्रा दोन्ही कबिल्यात आढळतात. कंटाळा आलाच तर ते एक्स्ट्रा कोणते हे ओळखण्याचा खेळ खेळता येतो. तात्पर्य: जसा विराट कोहली सहसा डॉट बॉल खेळत नाही, तसा राज कोहली फ्रेममधली इंचभर जागाही वाया घालवत नाही. असो, फकीराच्या विनवणीचा काही परिणाम होत नाही आणि चांदनीला मरेस्तोवर चाबकाने बडवण्याचा निर्णय घेतला जातो.

१.३) रेड हेरिंग दाखवण्यासाठी अ‍ॅगाथा ख्रिस्ती असणे बंधनकारक नाही.

त्यानुसार कबिल्याबाहेरील माळरानावर, एका चौथर्‍यावर चांदनीला बांधले जाते. तिला ड्रेसही बदलू दिला जात नाही. एक चिल्लर गुंड चाबकाचे दोन फटकारे ओढतो तोच पाजी घोड्यावर बसून एंट्री घेतात. त्यांनी सुद्धा अजून ड्रेस बदललेला नाही. हिंदी चित्रपटात शॉटगन चालवणे हे सायकल चालवण्याइतके सोपे असल्याने डबल बॅरल शॉटगनच्या मदतीने पाजी सर्व गुंडाना घायाळ करून चांदनीची सुटका करतात. आता जंगावर कबिल्याचा सरदार उखडतो. त्याच्या लक्षात येते की शॉटगनधारी पाजींना रोखण्यासाठी शॉटगनच हवा. मग शाका अर्थात शत्रुघ्न सिन्हाला पाचारण केले जाते. याच्या एंट्रीचा अँगल खालून वर असा लावला आहे. हिरविणीसाठी लावायचा अँगल शॉटगनसाठी लावून काय उपयोग? असो शाका म्हणतो की पाजींच्या उद्दामपणाबद्दल तो संपूर्ण दिलावर कबिला नष्ट करणार आहे.

शॉटगनला बघताच भयातिरेकाने दिलावर कबिलावासी घराची दारे बंद करत आहेत. यापासून अनभिज्ञ पाजी चांदनीसोबत भरदुपारी मधुचंद्र साजरा करत आहेत. कुठल्या वेळी कोणते दरवाजे तोडावेत याची जाण नसलेला शॉटगन "मौत की शकल" बनून थेट बेडरुममध्ये घुसतो. घुसल्या घुसल्या पाजींवर गोळीबार! तीन गोळ्या आणि खेळ खल्लास, दुसरी बातच नको!! अर्थातच चाणाक्ष प्रेक्षकाला ठाऊक आहे की हिरो धरमपाजी मरणे शक्य नाही. सुहागरातच्या क्लोजअपमध्ये पाजींचा कुरळा विग प्रकर्षाने जाणवतो. हिरो धरमपाजींचे केस कधी कुरळे असतात होय? याचाच अर्थ पाजींचा डबल रोल असणार आणि दुसर्‍या धर्मेंद्राची लवकरच एंट्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ! हे सर्व ठाऊक असल्याने तो असल्या थर्ड क्लास रेड हेरिंगकडे तु.क. टाकून पुढे बघू लागतो. बेडरुमबाहेरच पोलिस 'कधी शॉटगन पाजींवर गोळीबार करतो' याची वाट बघत उभे होते. ते लगेच येऊन शॉटगनला हातकड्या घालतात. इथे शाकाच्या हावभावांवरून याचे स्क्रू ढिले आहेत ही शंका येते. उर्वरित सिनेमात त्यावर शिक्कामोर्तब होईल. तूर्तास कबिल्याचा बदला घेतल्याच्या सुखपरत्वे सुटलेली ढेरी दाखवत शॉटगन पोलिसांसोबत निघून जातो.

२) दो कबिलों के बीच के अमन, तुझे जीने नही दूंगा

२.१) सिनेमात मंदिरा बेदी नसू दे, आपण मात्र शांती ठेवायची

(१.३) मधला कयास तात्काळ खरा ठरतो. दुसरे धरमपाजी घोड्यावरून एंट्री घेतात. यांचे नाव राका - हिरो असल्याचा आणखी एक पुरावा. राका-शाका, गेट इट? (टू सेट काँटेक्स्ट ओरिजिनल आहे मौला जट-नूरी नट. यापेक्षा राका-शाकाच बरं) शाकाप्रमाणेच राकालाही थेट बेडरुममध्ये घुसण्याची सवय आहे. इथे दोन धर्मेंद्रांचा रडारडीचा अल्टिमेट सीन आहे. पाजींचे अभिनयकौशल्य बघताक्षणी ऑल नेगेटिव्ह थॉट्स विल इन्स्टंटली व्हेपराईज. राका विचारतो की हे कोणी केलं? मधुचंद्र अर्धवट राहिल्याने भडकलेली चांदनी लगेच सांगते हे शाकाने केलं. अपेक्षेप्रमाणे राका जंगावर कबिल्याचा विध्वंस करायला निघतो. पण रोशनची २०००-०१ च्या सुनील शेट्टीशी भेट झालेली नसल्यामुळे त्याचा 'दो दिलों की धडकन; प्यार, इश्क और मोहोब्बत' वर अधिक विश्वास आहे. तो म्हणतो की अशी मारामारी नाही करायची, तुला माझी शपथ! या आणाभाका चालू असताना रोशन आपल्या पोटावरचा रक्ताचा डाग लपवण्याची पराकाष्ठा करतो आहे. चांदनी 'हा आहे तोवर घ्या चान्स मारून' असा विचार करून रोशनला नॉन-स्टॉप कुरवाळते आहे. हे सर्व असह्य होऊन राका 'मी दोन कबिल्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करेन असे वचन देतो' तेव्हा कुठे रोशन इहलोकाचा निरोप घेतो. एकतर त्या शपथेला काही अर्थ नाही, पाजींनी डायलॉग चुकीचा बोलला आहे - 'तुम ऐसा कोई कदम नही उठाओगे जिससे तुम्हारी भाई की आत्मा को शांती पहुंचे'. तर्कशास्त्राच्या कसोट्यांनुसार याचा अर्थ 'तू नॉनस्टॉप हाणामारी कर' असा निघतो. दुसरे म्हणजे या लोकांना हाणामारीशिवाय दुसरी कसलीही कोअर कंपिटन्सी नसल्यामुळे राका इतर काहीही करू शकत नाही. तिसरे म्हणजे शपथ घेतल्यानंतरही रोशन मरतोच. पण रोशन मेल्याशिवाय कथा पुढे जाऊ शकत नसल्यामुळे - ये भी ठीक हैं.

२.२) सात साल बीत गए

तिकडे तुरुंगात "शाका आया, शाका आया" चा जयघोष सुरु आहे. जंगावर-दिलावर कबिल्यांचे प्रभावक्षेत्र फारच मर्यादित असावे किंवा पोलिसांना लाच देणे त्यांच्या उसूलांत बसत नसावे. जे काही असेल, शॉटगनची कुठल्याशा तुरुंगात रवानगी झाली आहे. तिथला जेलर आहे जगदीश राज (अनिता राजचे वडील). याच्या कानांपर्यंत जंगावर कबिल्याची कीर्ति पोहोचलेली नसल्यामुळे काही संवादमौक्तिके आपल्या कानांवर आदळतात. सारांश असा की शाकाचा नाद करायचा नाही. जेलर हे एका कानाने ऐकून दुसर्‍या कानाने सोडून देतो.

आता आपल्याला गचाळ एडिटिंग आणि महागचाळ पटकथा लेखन बघावयास मिळते. त्यांना असे दाखवायचे आहे की सात वर्षांचा कालावधी निघून गेला आहे आणि शाका या तुरुंगातून त्या तुरुंगात फिरतो आहे. पण त्यासाठी एडिटरने कसलेही ट्रान्झिशन टाकलेले नाही. पटकथा लेखकानेही "शो, डोन्ट टेल" हा नियम भ्याड लोकांसाठी आहे असे ठरवून आपल्याला टाईम स्किपविषयी रझा मुरादच्या तोंडून कळवले आहे. बॉटम लाईन, मध्ये सात वर्षे निघून गेली आहेत. शॉटगनची नव्या तुरुंगात बदली झाली आहे. तो किती डेंजरस आहे हे दाखवण्यासाठी एक इन्स्पेक्टर, तीन हवालदार पूर्णवेळ त्याच्यावर बंदुका रोखून आहेत. याच तुरुंगात कैक दिवस रझा मुराद कैद होता. आज त्याची सुटका झाली आहे. सिनेमाच्या फॅशनला साजेसे लेदरचे लाल-काळे रंगाचे पॅचवर्क रझा मुरादने घातले आहे. पुन्हा हे सर्व रखरखीत उन्हात. त्यालाही कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा व्हिलन आहे हे त्याच्या महाजाड भुवयांनी अधोरेखित केले आहे. गळ्यात कसलेसे आभूषण आहे. हा शाकाचा भाऊ आहे. दोघांमध्ये हवापाण्याच्या गोष्टी होतात. रझा मुराद विसरतो की आपण नुकतेच तुरुंगातून सुटलो आहोत आणि शाकाप्रमाणेच सगळीकडे "मौत और खून की लकीरे" काढण्याचे वचन देतो. इथे शाका क्लिनिकली इन्सेन असल्याचा संशय बळावणारे एक्सप्रेशन्स!

२.३) शुद्ध बावळट

बोलून चालून तो पडला रझा मुराद. "मौत और खून की लकीरे" त्याच्या कुवतीच्या बाहेरचे काम आहे. तो घोड्यावर बसून एका तरुणीचा पाठलाग करू लागतो. ही तरुणी आहे दलजीत कौर नामक पंजाबी अभिनेत्री. हिचे कपडे आश्चर्यजनकरित्या सामान्य आहेत. ती एका वैद्याच्या घरात घुसते. वैद्य म्हणतो की तुला हार्ट ट्रबल आहे, उगाच धावपळ करू नकोस. ती म्हणते, अरे म्हातार्‍या माझ्या मागे लागलेल्या ट्रबलपासून आधी वाचव मग हार्ट ट्रबलविषयी बोलू. इथे आपल्याला रझा मुरादचे नाव जाबरसिंग आहे ही बिनकामाची माहिती मिळते. रझा मुराद मरतुकड्या वैद्याला ढकलून देतो. पण तरुणी अधिक चपळ असल्याने ती निसटते. मग तिला विविध वयोगटातील चार-पाचजण भेटतात. ती त्यांच्याकडे मदत मागते. इथे बॅकग्राऊंडला "भरोसा" ही अक्षरे रंगवलेली भिंत टाकण्याचा दिग्दर्शकीय टच. त्यानुसार आधी ते एक्स्ट्रा शौर्याचा आव आणतात पण रझा मुराद येताक्षणी गळपटतात. त्यांची निर्भत्सना करून ती तिथूनही पळते.

रझा मुरादला एवढा वेळ वाया घालवायची सवय नाही. तो म्हणतो की कशाला धावपळ करतेस, तसेही तुला हार्ट ट्रबल आहे. पण तिचा मर्दप्रजातीवर अवास्तव विश्वास आहे. ती म्हणते की सूर्यास्ताच्या आधी जर कोणा मर्दाने तुला तुडवले नाही तर तुला काय करायचे ते कर. तसे बघावे तर हा शुद्ध बावळटपणा आहे. व्हिलनला अशा ऑफर द्यायच्या नसतात. पण तिच्या सुदैवाने ती पळत पळत दिलावर कबिल्यात आली आहे. चांदनी भाभी तिथे प्रकटतात आणि तरुणीला अभय देतात. विधवा स्टेटस दर्शवणारी पांढरी साडी त्यांनी परिधान केली आहे. रझा मुरादला झालेले मॅटर ठाऊक आहे. त्याला वाटते की आज हिलाही मारता येईल. पण राज बब्बर आडवा येतो. हा धरमपाजींचा सर्वात धाकटा भाऊ. याचे कपडे तुलनेने साधे आहेत. कपाळाला कसलीशी चिंधी बांधली आहे. तो रझा मुरादला म्हणतो की बंदुकीच्या बळावर गमजा मारणे बंद कर. रझा मुरादही महामूर्ख! तो लगेच बंदुक फेकून देऊन हाणामारीस उतरतो.

३) जाबर, तुझे जीने नही दूंगा

३.१) भाभी, तरुणी, आणि फर्स्ट-एड

बाज रब्बर वि. रझा मुराद हा सामना रंगतो. दोघे एकमेकांना पाळीपाळीने बुकलतात. फायटिंग खरीखुरी वाटावी म्हणून मध्ये मध्ये भाभी-तरुणीचे चिंताक्रांत क्लोजअप्स आणि दोघांना आपटायला मुबलक प्रमाणात रचून ठेवलेल्या विटा, मडकी इ. अखेर पारडे रझा मुरादच्या बाजूला झुकते. खोडरब्बर रक्तबंबाळ होऊन कोसळतो. धाकल्या दीराची अवस्था बघून चांदनी भाभी बेंबीच्या देठापासून किंचाळतात (हा भयाण शॉट आहे) - राका! सात वर्षांमध्ये राका अजूनच जाड झाला आहे. तो रझा मुरादला कॉम्प्लेक्स येईल असे विचित्र फॅशनचे कपडे घालून अवतरतो. इथे आपल्याला दिसते की दिलावर कबिल्यात "भरोसा लीडर अगरबत्तीयां" वापरतात. तसेच राकाच्या बॅकग्राऊंडला पुन्हा "भरोसा" व "लीडर" चा दिग्दर्शकीय टच. धरमपाजी रझा मुरादला म्हणतात की बिल खूप होतंय, चड्डीत राहा. पण रझा मुरादला अंथरूण न पाहताच पाय पसरायची सवय आहे. तो म्हणतो की विसरू नकोस रोशनला आमच्या कबिल्यातील बंदुकीची एक गोळीसुद्धा पचली नव्हती. हे धादांत खोटे विधान आहे. रोशनला मारायला तीन गोळ्या लागल्या होत्या. अशा खोटारड्याला पाजींकडून मार पडणे रास्तच आहे.

परत हाणामारी सुरू. रझा मुरादला पहिल्या फटक्यातच आपण जीवघेणे प्रकरण अंगावर घेतल्याची कल्पना येते. तिकडे तरुणी जाऊन रबराला कवटाळते. ते बघून चांदनी भाभी त्याच्या दुप्पट आवेशात फ्रेममध्ये घुसून रबराला कवेत घेतात. हा कुठला फर्स्ट-एड आहे? पाजी रझा मुरादला बुकल-बुकल-बुकलतात. ही संधी साधून तरुणीही त्याला दोन कानाखाली वाजवते. मग ती जाऊन पाजींच्या हाताचे चुंबन घेते. मग रडायला लागते. मग अचानक हसायला लागते. हे बघून पाजी प्रचंड गोंधळतात. राज कोहलीला देखील आपण काय करावे हे सुचत नाही. जेव्हा बॉलिवूड दिग्दर्शकाला काय करावे हे सुचत नाही तेव्हा तो गाणे सुरु करतो. त्यानुसार ती तरुणी वेडीपिशी होऊन नाचू लागते.

३.२) गुरूर, तुझे जीने नही दूंगा

गाणे आहे तेरा गुरूर टुकडे टुकडे हुआ. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार आनंद बक्षी, आणि गायिका आशा भोसले. ब्रिटिश कॉमेडिअन रिचर्ड अयोआदी एकदा म्हणाला होता की "ऑफ्टन देअर इज अ टेंडन्सी टू रीच फॉर एक्सलन्स. लाईफ ऑफ एक्सलन्स इज अ बोरिंग लाईफ. आय थिंक वी ऑल्सो नीड कंफर्टिंग मीडिऑक्रिटी". या सिनेमाच्या म्युझिक डिपार्टमेंटचा यावर पूर्णतया विश्वास आहे. त्यामुळे या सिनेमातील गाण्यांमध्ये कंफर्टिंग मीडिऑक्रिटी ठासून भरली आहे. पण जसे विराट कोहली डॉट बॉल खेळत नाही तसे राज कोहली इंचभरही फ्रेम वाया घालवत नाही. त्यामुळे या मीडिऑकर समुद्रातही काही मोती आहेत.

तरुणी आधी "टुकडे उठा और जा जा जा" "अपना मूंह छुपा और जा जा जा" असे म्हणत रझा मुरादला लाथा घालते. मग ती पाजींचा बेल्ट काढून घेते. हे बघून चांदनी भाभी दचकतात. बेल्टचा वापर रझा मुरादला बडवण्यासाठी होतो. चांदनी भाभीचा जीव भांड्यात पडण्याचा क्लोजअप - तात्पर्य पाजींची पँट खाली घसरली नाही. रझा मुरादवर अत्याचार करायचे असल्यामुळे त्याला भर उन्हात हिचा डॅन्सही बघावा लागतो आहे आणि त्याला पाणीसुद्धा पिऊ देत नाही आहेत. भारतीय जनता अतिशय सॅडिस्ट असल्यामुळे त्याची ससेहोलपट बघायला लगेच गर्दी जमते. या गर्दीसमोर त्याचा अजून थोडा पाणउतारा केला जातो. मग अचानक तरुणीला आठवते की आपल्याला हार्ट ट्रबल आहे. आता एवढ्या उन्हातान्हाचं नाचल्यावर अजून काय होणार? तिला हार्ट अ‍ॅटॅक येतो.

३.३) लॉजिक, तुझे जीने नही दूंगा

धरमपाजी इथे अप्रतिम संवाद फेकतात - अरे गिरना तो जबर को चाहिए था, ये सबर कैसे गिर गया? तरुणी मरायला टेकल्यानंतर तिला आपल्यात अजून बराच वाह्यातपणा शिल्लक असल्याची जाणीव होते. ती पाजींना सांगते की या रझा मुरादचा पाणउतारा काही पुरेशी शिक्षा नाही. जंगावर कबिल्याची लोकांना धडा शिकवण्यासाठी काहीतरी फार भारी करावं लागेल. पाजी विचारतात काय करू? ती म्हणते की जाबर आणि शाकाला एक बहीण आहे. ती खूप मग्रूर आहे. तिला जर दिलावर कबिल्यात लग्न करून आणलं तर हिशोब चुकता होईल. हे सर्व ती कॅमेर्‍यात बघत बोलते. पाजी वचन देतात की खोडरब्बराचं आणि जाबरच्या बहिणीचे लग्न होईल आणि ती दिलावर कबिल्यात सून म्हणून येईल. हे ऐकून तरुणी समाधानाने प्राण सोडते.

एकतर हे काय लॉजिक आहे? ती कोण कुठली बहीण, काळी का गोरी कोणी पाहिलेली नाही. त्यात हिच्या म्हणण्यानुसार मग्रूर. तिला सून करून घ्यायचं म्हणजे धोंडा गळ्यात बांधायचा. कोणी सांगितलेत असले नस्ते धंदे? दुसरे, समजा लग्न झालंच तर रेम्याडोक्याचे जंगावर कबिलेवाले चांदनी भाभीप्रमाणे तिलाही मारण्याचा प्रयत्न करणार नाहीत हे कशावरून? तिसरे म्हणजे खोडरब्बर तिच्या गळ्यात मारण्याएवढी ती बंडल आहे का? (उत्तर - हो) असो, यात खूप काही मुद्दे काढता येतील तरी कथानक पुढे नेऊयात. धरमपाजी जाऊन रझा मुरादचे बखोट धरून सुनावतात की आपला नाद करायचा नाही. रँडम तरुणीने आपल्याला भाऊ संबोधून अंतिम इच्छा सांगितली आहे. जा, तुझ्या बहिणीची डोली सजव, मी वरात घेऊन आलोच.

३.४) अ‍ॅक्टिंग, तुझे जीने नही दूंगा

रझा मुराद तसाच जखमी अवस्थेत जंगावर कबिल्यात परततो. शरमेने त्याने मान खाली घातली आहे. पाजींच्या मुष्टिप्रहारामुळे त्याचे नाक फुटून ते कापल्यासारखे दिसत आहे. जंगावरवाल्यांना "लेका नाक कापलंस" म्हणण्याची संधी मिळावी म्हणून हा सेटअप. तरीही रझा मुराद जरा टेरर असल्यामुळे कोणाची काही बोलायची हिंमत होत नाही आहे. आणि मग......

बिहोल्ड, रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग - https://youtu.be/rhPHcV8lSx4?t=1793 (इथून पुढची साधारण दोन मिनिटे बघणे)

प्रॉब्लेम हा नाही आहे की तिचा 'अभिनय' दिव्य कोटीतला आहे. ओरिजिनल सीनमध्येही प्रचंड ओव्हरअ‍ॅक्टिंग आहे पण ती अतिशय स्टायलिस्टिक ओव्हर अ‍ॅक्टिंग आहे. त्या विचित्रपटाच्या काँटेक्स्टमध्ये इट समहाऊ वर्क्स. (ओरिजिनल सीन - दारो नटनी किल्स माख्या) इथे रेफरन्स असूनही तिला ओव्हरअ‍ॅक्टिंगही नीट करता आलेली नाही हा प्रॉब्लेम आहे. रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंग हे बिरुद अनाठायी नाही, तिचे इतर चित्रपटातही असे अनेक सीन्स आहेत (आमच्या अभ्यासानुसार डाकू बिजली नामक चित्रपट या अ‍ॅक्टिंग स्कूलचे शिखर आहे. वैधानिक इशारा: नवख्या प्रेक्षकांनी डाकू बिजलीपासून दूर राहावे.). अर्थात रझा मुरादचा मरण्याचा अभिनयही काही कमी दिव्य नाही.

असो, तर रोशनीचे चित्रपटातील नाव आहे रेश्मा. कबिल्याची इभ्रत धुळीस मिळवल्याबद्दल रेश्मा आपल्याच भावाला, जाबरला दोन गोळ्या घालून ठार करते. स्वतःवर नको तितका विश्वास असल्यामुळे ताई राका की लाश आणण्याची प्रतिज्ञा करतात आणि तडक घोड्यावर मांड टाकून लाश आणायला निघतात.

इथे माझा अल्पविराम! या पॉईंटला चित्रपटाचा मुख्य सेटअप पूर्ण झाला आहे. याशिवाय अनिता राज, विनोद मेहरा, आणि शक्ती कपूरही नंतर आपल्याला दर्शन देतात. धरमपाजी रोशनी-खोडरब्बर जोडी कशी जुळवतात, शॉटगनचे योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न, आणि उर्वरित रोमहर्षक प्रसंग प्रतिसादांत कव्हर करूयात.

____________________________________________________________________

पुढील विश्लेषण येथे

(४) - https://www.maayboli.com/node/78997#comment-4671598

(५) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672214

(६) - https://www.maayboli.com/node/78997?page=1#comment-4672799

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

फकीरच्या डाव्या बाजूला एक एक्स्ट्रा आहे ज्याच्या डोळ्यांवर थेट ऊन येते आहे. त्यामुळे बाकी सर्व एक्स्ट्रा फकीराकडे बघत असताना हा एकटाच जमिनीकडे बघून चुळबूळ करतो आहे. >> Lol जबरदस्त

निर्माता दिग्दर्शकाने प्रेक्षकांना एव्हढी धमकी दिली असताना देखील तो पाहण्याचे धाडस करणारे हेच खरे चित्रपटप्रेमी होत. येथे कर माझे जुळती!
शिवाय त्यावर एव्हढे बारकाईने लिखाण काम करून हसवणे हे तर आमरसपुरीच्या जेवणानंतर कुल्फी चा बोनस की!!
भारीये!

ती रेश्मा विलेक्शन च्या टायमाला सॉलिड पॉप्युलर असणार
तोच आवाज, तीच पट्टी तेच किंचाळणे
अस वाटलं व्हीडिओ बघताना की रझा मुराद म्हणेल तुझ बरोबर आहे पण जरा हळू बोलतेस का, कान वाजलेत माझे

खतरनाक जेम आहे हा चित्रपट
समोर पायस चे परीक्षण ठेऊन लवकरच पूर्ण बघण्यात येईल

ती रोशनी गतजन्मी खेकडी होती का ?? तिरकी का चालते म्हणजे रझा ला गोळ्या मारल्यावर (नेम न धरता तिरपेच बघून ) ते एक्सट्रा कबिलेवाले त्याच्याकडे जातात आणि हि बया एकटीच मनाचे श्लोक म्हणत तिरकी चालत घोड्यावर उडी मारते मागे आपला एक प्रामाणिक कबिलेवाला थांबतो बघायला हि व्यवस्थित चढतेय ना?

पायस... Lol
खोडरब्बर, किती चपखल. हसून हसून मेले मी.....+++
फारच मस्त!

पायस Lol धासू सुरूवात. पुढची स्टोरी लौकर येऊदे.

कोई बात नही, हम एलेवेटर से जायेंगे. >>>
मामी Proud अगदी ग्रेमा!

झकास रे पायस!! अब आयेगा मजा!!! Happy

'तुम्ही चहा टाका, मी कोपर्यावरच्य दुकानातून बिस्किटं घेऊन येतो' ह्या टोनमधे म्हट्लं गेलेलं ' तुम लोग और एक गड्ढा तय्यार करो, मैं अभी राका की लाश लेके आती हूं' हे कु. रोशनी चं वाक्य ऐकून धन्य झालो. Happy

एक नम्र अ‍ॅडिशन. रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टींग ला जन्म देण्याचं क्रेडिट राजजींकडे जाऊ नये, तर फक्त rejuvenate करण्याचं जावं. 'आज की आवाज' नामक तितक्याच तद्दन भिकार सिनेमातून रश्मी चौहान ह्या नावानं ह्या ताईंचा डेब्यू झाला होता.

Lol जबरी इण्ट्रो आहे नेहमीप्रमाणेच.

एकतर हे काय लॉजिक आहे? ती कोण कुठली बहीण, काळी का गोरी कोणी पाहिलेली नाही. त्यात हिच्या म्हणण्यानुसार मग्रूर. >> लोल हे सर्वात कहर आहे.

रोशनीला हुकूमत नावाच्या एका ऐंशीपटात पाहिल्याचे लक्षात आहे. तेथेही पाजी होतेच. द अदर कोहली प्रमाणे द अदर शर्मा - अनिल शर्मा - त्याचा पिक्चर बहुधा तो.

तिकडे तरुणी जाऊन रबराला कवटाळते. ते बघून चांदनी भाभी त्याच्या दुप्पट आवेशात फ्रेममध्ये घुसून रबराला कवेत घेतात. हा कुठला फर्स्ट-एड आहे? .....
हे खूप लोल!

सोललेले संत्रे....
जीने म्हणजे पायऱ्या, (जीने नहीं दुंगा) पायऱ्यांवरून जाऊ देणार नाही तर मी एलेव्हेटरने जाईन. Happy
शीर्षक बघून हेच माझ्या व्रात्य डोक्यातही आले होते मामी. Lol
राहू दे तुझे जीने तुझ्याकडे , कारण 'जीने हे लाजिरवाणे' हे ही. Happy

धमाल लिहिले आहे. Lol
तुम्ही अश्या रत्नांवर लिहायचे आणि माबोकरांनी हसायचे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या या विचित्रपटांनी मनोरंजन केलेच.

उत्तम आढावा नेहमीप्रमाणे, पण पुढच्या चिरफाडीसाठी नवीन धागा काढावा ही विनंती. प्रतिसादात वाचणं विस्कळीत वाटतं.

खोडरब्बर तिच्या गळ्यात मारण्याएवढी ती बंडल आहे का? (उत्तर - हो) >>> Lol
धमाल लिहिलं आहेस पायस..

मज्जाच मज्जा!
वाचते आहे. आता हा पिच्चर बघावा लागणार.

ब्रिटिश कॉमेडिअन रिचर्ड अयोआदी एकदा म्हणाला होता की "ऑफ्टन देअर इज अ टेंडन्सी टू रीच फॉर एक्सलन्स. लाईफ ऑफ एक्सलन्स इज अ बोरिंग लाईफ. आय थिंक वी ऑल्सो नीड कंफर्टिंग मीडिऑक्रिटी". या सिनेमाच्या म्युझिक डिपार्टमेंटचा यावर पूर्णतया विश्वास आहे.
>>

जबरा पायस!
____________________

८०च्या दशकातील बंजारा स्त्री श्ट्यांडर्डनुसार रबरबँड लावून एका बाजूने पोंगा सोडला आहे.
>> टु द पॉइंट! जाने कहा गये वो दिन, जब इन्डिया मे कबिले हुआ करते थे!

राज कोहलीने देखिल प्रेक्षकांना "जीने नही दूंगा" असे ठरवुन चित्रपट काढलेत एकामागोमाग एक!

_________________________________________________________________________________

जंगावर आणि दिलावर. जंगावर = जंग, फाईट इ. दिलावर , प्रेम, मोहोब्बत इ.
>> अरे कादरखानला कोण तरी आवर!

सर्व वाचकांचे आभार.
Ajnabi, सुहृद, मामी, वीर, रानभुली, Sharadg, रूपाली विशे - पाटील, आशुचँप, पाचपाटील, आसा., आंबट गोड, rmd, फेरफटका, फारएण्ड, अस्मिता., नविना, MPA, चिन्मय_१, sonalisl, निलिमा - प्रतिसादाकरिता धन्यवाद Happy

कोई बात नही, हम एलेवेटर से जायेंगे. >> Lol भारीच मामी. संत्रे सोलण्यासाठी धन्यवाद अस्मिता.

ती रेश्मा विलेक्शन च्या टायमाला सॉलिड पॉप्युलर असणार >> अगदीच Happy

एक नम्र अ‍ॅडिशन. रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टींग ला जन्म देण्याचं क्रेडिट राजजींकडे जाऊ नये, तर फक्त rejuvenate करण्याचं जावं. >> Happy चलो ये भी ठीक है. राजजींना तिच्या अंगातील कलागुणांची (?) प्रसिद्धी करण्याचे श्रेय द्यायला मात्र हरकत नसावी.

रोशनीला हुकूमत नावाच्या एका ऐंशीपटात पाहिल्याचे लक्षात आहे. >> हुकुमतमध्ये होती का ही? मला हुकुमतमध्ये फक्त रति अग्निहोत्री आणि स्वप्ना आठवत आहेत. रच्याकने, हुकुमतवर कोणीतरी भाष्य करायला हवंय. मग मायबोलीवर 'द अदर शर्मा' अनिल शर्माचे धरमपाजी-सदाशिव अमरापुरकर कॉम्बोवाले सगळे चित्रपट येतील. बघ, घेतोस का मनावर?

प्रतिसादात वाचणं विस्कळीत वाटतं. >> हम्म. मी प्रत्येक प्रतिसादाच्या लिंका हेडरमध्ये अ‍ॅड करतो. सगळी टिपणे एका जागी राहणे मला व्यक्तिशः अधिक सोयीचे वाटते पण तो फॉरमॅट गैरसोयीचा असू शकतो हे मान्य.

अरे कादरखानला कोण तरी आवर! >> Lol

रच्याकने विनोदाचा भाग सोडा पण रिचर्ड अयोआदी (लेखात उल्लेख केलेला कॉमेडिअन) रेकमेंडेड व्ह्यूइंग. त्याचा बाज मानवेलच असे नाही पण डेफिनिटली वर्थ चेकिंग आऊट!

४) "सारासार विचार करण्याची क्षमता" - तुझे जीने नही दूंगा

४.१) हिरो-हिरवीण भेट - १

दिग्दर्शकाला अचानक आठवते की परीक्षित साहनीचा फकीरही या सिनेमात आहे. रोशनीला वाटेत तो भेटतो. तिला बघताक्षणी त्याच्या लक्षात येते की ताईंचे डोके फिरले आहे. तो स्वतःला साने गुरुजी समजत असल्यामुळे तिला म्हणतो की "जगाला प्रेम अर्पावे". उत्तरादाखल ती त्याला फरफटत माळरानातून फिरवते. फकीरही लई चिवट! तो तिला घोड्यासकट खाली पाडतो. पण ती पुन्हा स्वार होऊन निघून जाते आणि फकीर हार मानून नाद सोडतो. त्याने तरी किती मार खायचा?

कुठल्यातरी रॅंडम ठिकाणी जाऊन ती वाळक्या लाकडांच्या ढिगांना आग लावते. मग एकटीच दिलावर कबिल्यात घुसते पण करत काहीच नाही. तिथे तिला भेटतो खोडरब्बर. खोडरब्बर तिचा वाळवंटापर्यंत पाठलाग करतो. मग तो गोफणीसारखे काहीतरी फेकून तिला घोड्यावरून खाली पाडतो. इथे स्लो मोशनमध्ये रोशनीच्या स्टंट डबलला मिशा आहेत हे दिसू शकते. भर वाळवंटात ती रबराच्या समोर पुन्हा घोड्यावर स्वार होऊन निघून जाऊ लागते. पण रबराला शीळ घालून घोड्यांना नियंत्रणात आणता येते. घोडा तसाच मागे फिरतो. अखेर दोघे एकमेकांसमोर येतात. रोशनी विचारते की राकाचा पत्ता ठाऊक आहे का? खोडरब्बरला ती कोण आहे याची कल्पना आल्याने तो उडवाउडवीची उत्तरे देतो. याने रोशनी भडकून थेट सुरा उगारते. इतका वेळ पोलिस वाळवंटात ती कधी सुरा उगारते याची वाटच बघत असल्याने ते फ्रेममध्ये अवतरतात. तिला जाळपोळ केल्याबद्दल अटक होते. बाष्कळ वल्गना करत ती पोलिसांसोबत निघून जाते. एवढे बघितल्यावर कोणीही हिला रिजेक्ट करेल. पण खोडरब्बर उगाचच "रेशम में लिपटा हुआ अंगारा" म्हणून स्वप्नरंजनात रमतो.

४.२) शाकाचा स्थिरांक

रोशनी स्वतःच्या पायाने चालत पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश करते. तिला बेड्या घालण्याचे कष्ट घेण्यात आलेले नाहीत. यावरून पोलिस खाते तिला किती भाव देते हे स्पष्ट आहे. तरीही शाकाच्या जीवावर पोकळ बाता मारणे चालू आहे. स्टेशन इंचार्ज आहे विनोद मेहरा. विनोद मेहरा एका नजरेत ओळखतो की गरजने वाले बादल बरसते नही. तो शर्मा नामक सबइन्स्पेक्टरला म्हणतो की हिला जास्त भाव द्यायची गरज नाही, सरळ कोठडीत रवानगी होऊ द्यात. ताईंना मात्र शाका आपली सुटका करेल याची तिळमात्र शंका नाही. शाका आहे कुठल्याशा तुरुंगात जेरबंद. ताई आहेत स्थानिक कोठडीत. शाकापर्यंत आधी बातमी पोहोचणार, तो तुरुंगात पळून जाण्यात यशस्वी होणार, मग यांना सोडवणार, आणि पोलिसांचा ससेमिरा चुकवून जंगावर कबिल्यात पोहोचणार. तसेच त्यानंतर होणार्‍या पोलिस कारवायांना तोंडही देणार. एवढा उपद्व्याप करण्यापेक्षा कबिल्याच्या पैशांनी जामीनावर सुटका करणे सहज सोपे नाही का?

पण शाका (आणि काही प्रमाणात रेश्मा) ठार वेडा असल्याने तो उपरोक्त योजनेची अंमलबजावणी करू पाहतो. इथे आपल्याला दिसते की शाकाने अनेकदा तुरुंग बदलूनही त्याचा कैदी क्रमांक १०८ च राहिला आहे. भौतिकशास्त्रात जसे स्थिरांक असतात तसा १०८ हा शाकाचा स्थिरांक आहे. आत्ता तो विस्तीर्ण भूभागात पसरलेल्या तुरुंगातून पळण्याचा प्रयत्न करतो आहे. मुख्य इमारतीतून पळाल्यानंतर त्याच्या सभोवतालच्या माळरानातून त्याचा पाठलाग मोजून दोन जीप (प्रत्येकी दोन हवालदार) करतात. याचा फायदा मात्र काहीच होत नाही. त्याच्यासाठी मेन डोअरला एक 'लॉट का माल सस्ते में' दर्जाचे जाळे पसरून ठेवले आहे. तो बरोबर त्या जाळ्यात अडकतो. म्हणा दुसरे काय होणार होते? सिनेमाच्या व्हिलनला साजेसे प्लॅनिंग न करता तुरुंग फोडण्याचे असे फडतूस प्रयत्न सफल झाले असते तर लोकांनी राज कोहलीचे सिनेमे बघणे बंद केले असते. व्हिलन लोकांचे पण काही स्टँडर्ड असतात. राज तिलकमधल्या राज किरण आणि अजितकडे धडे गिरवण्याची शाकाला नितांत आवश्यकता आहे.

४.३) हिरो-हिरवीण भेट - २

रोशनी का होईना, खोडरब्बरला हिरोईन मिळाली आहे. असे असता धरमपाजींना हिरोईन नाही हे कदापि संभव नाही. त्यानुसार आता अनिता राजची एंट्री होते. धरमपाजी वनविहार करत असताना पिवळ्या कलरस्कीमचे जिप्सी स्त्रीचे कपडे घालून ताई अवतरतात. आल्या आल्या त्या दोन चाकू फेकून मारतात. ते पाजींच्या दोन्ही बाजूंच्या झाडांच्या खोडात घुसतात. ती म्हणते की तुला चाकू मारून काही फायदा नाही. जखम तुला होईल पण रक्त माझे वाहेल. पाजी इज नॉन-प्लस्ड. ते म्हणतात की मी इतक्या छोट्या स्टंटने इंप्रेस होत नाही. माझ्यासमोर तलवारी रचून ठेवल्या तर मी त्यावरून चालत जाणारा माणूस, असल्या बारक्या चाकूंनी मी कसा इंप्रेस होईन? पुन्हा एकदा - अशा बिनडोक ऑफर द्यायच्या नसतात. समजा अनिताने उद्या खरंच तलवारी रस्त्यावर रचून ठेवल्या आणि म्हणाली की मी आता चालून दाखवते या तलवारींवरून तर? भाव खाण्याला सुद्धा लिमिट असते. आपल्या पार्टनरच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून भाव खायचा असतो.

अनिता विचारते की कुठे निघालास? पाजी म्हणतात नवरी बघायला. ती उखडते. उखडल्यावर काहीच न सुचल्यामुळे ती गाणे सुरु करते. गाणे आहे - याद रखना, साजना वे याद रखना. मौका दिया तो प्यार दूंगी, धोका दिया तो चक्कू मार दूंगी. पुन्हा आवाज आशा भोसल्यांचा. रिचर्डने सांगितलेली कंफर्टिंग मीडिऑक्रिटी परत डोके वर काढते. अनिता राजला मधूनच "चक्कू मार दूंगी" म्हणण्याची सवय आहे. लगेच आनंद बक्षी हॅड अ प्रोफाऊंड रिअलायझेशन - अरे, आपण याचा गाण्यात वापर करू शकतो. म्हणून ते चक्कू मार दूंगी. कोरिओग्राफरच्या कल्पनेचे स्फुल्लिंग चेतते. अरे, आपण अनिताला एक चाकू देऊन वेडीवाकडी कंबर हलवायला लावू. तसेही अनिताच 'चक्कू मारणार आहे' मग पाजींनी नाचायची गरजच काय? त्यांच्या स्टेप्सही वाचतील. आपले काम सोपे झाले.

पण, पण, पण! जसा विराट कोहली डॉट बॉल खेळत नाही, तसेच राज कोहली फ्रेममधली इंचभरही जागा वाया घालवत नाही. त्याला ही मीडिऑक्रिटी सहन होत नाही. म्हणून तो अनिता आणि पाजींना निवडुंगाच्या बागेत नाचायला लावतो! अनुभवी प्रेक्षकही क्षणभर निवडुंगाच्या बागेत अनिता राजला फ्लर्टिंग करताना पाहून दचकतो. प्रतीक म्हणूनही त्या निवडुंगाला अर्थ नाही कारण यांच्या प्रेमाच्या वाटेत कसलेच काटे नाहीत. कलेसाठी कलेचे इतके टोकाचे उदाहरण फार क्वचित बघावयास मिळते. हा तापदायक प्रकार चालतो जवळपास साडेचार मिनिटे!

४.४) अ‍ॅक्टिंग आणि अ‍ॅटिट्यूड

आता आपल्याला अप्रत्यक्षरित्या पाजी अनिताचे सिनेमातले नाव सांगतात. ते तिला 'कडक बिजली' असे संबोधतात आणि तिचे सिनेमातले नाव आहे बिजली. ते म्हणतात मी नवरी बघायला गेलो नाही तर सिंगळू बादल सिंगळूच राहील. पाऊण तास गेल्यानंतर खोडरब्बरचे सिनेमातले नाव बादल असल्याचा अप्रत्यक्षपणे उलगडा होतो. पाजी बादलसाठी नवरी बघायला जात आहेत हे कळल्यावर अनिताचा जीव भांड्यात पडतो. पाजी जाता जाता तिची थोडी खेचतात. तीही फणकार्‍याने "चक्कू मार दूंगी" म्हणते.

आता बादलची नवरी आहे विनोद मेहराच्या कोठडीत. शाकापेक्षा राका निश्चितच समंजस असल्याने तो रेश्माची जामीनावर सुटका करतो. त्यानुसार विनोद मेहरा रेश्माला सोडतो. जाता जाता देखील कु. रोशनी आपल्या स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगचा डेमो देऊन जातात. जामीन मिळत असेल तर गप तिथून काढता पाय घ्यायचा राहिला बाजूलाच, उलट ती विनोद मेहरालाच डिवचते. विनोद मेहरा या सिनेमाला न साजेसा समंजस दाखवला आहे. त्याला असल्या बाष्कळ बातांना भाव द्यायचा नसतो हे पक्के ठाऊक आहे. तो म्हणतो तुझा जामीन झाला आहे, जामीन देणारा बाहेर तुझी वाट बघतो आहे. आता निघ इथून माझ्याकडे फालतूगिरीला वेळ नाही.

या पॉईंटला रोशनी स्कूल ऑफ अ‍ॅक्टिंगचा डेमो आहे. ती म्हणते की जामीन देणारा जर शत्रूपक्षाचा माणूस असेल तर त्याला मारून मी लगेच परत येईन. एवढे बोलून तरातरा ती दरवाज्यापर्यंत जाते. अचानक तिला आठवते आपण एक ओळ बोलायचे विसरलो. ती तशीच मागे फिरते आणि म्हणते - मेरी कोठडी को अभी ताला नही लगाना इन्स्पेक्टर. सगळे डायलॉग बोलल्याच्या आनंदात ती स्टेशनमधून निघून जाते. हा डेमो बघून विनोद मेहरा मनापासून हसला आहे. ती स्टेशनमधून बाहेर येते तर आपल्याला दिसते की स्टेशनचा मुख्य दरवाजा एखाद्या चिरेबंदी वाड्याचा दरवाजा आहे. यातर त्यांची पोलिस स्टेशन मोठाल्या वाड्यांमध्ये आहेत किंवा सेट डिझाईनरला पोलिस कोठडी आणि तुरुंग यातला फरक कळत नाही. रोशनीला बाहेर पडताच पाजी दिसतात.

तिचा विश्वासच बसत नाही की आपली सुटका शाकाने नाही तर कुणा अनोळखी व्यक्तीने केली आहे. इथे पाजी तिच्या अ‍ॅक्टिंगची नक्कल करून आपले मनोरंजन करून घेतात. तिच्या अ‍ॅक्टिंग आणि अ‍ॅटिट्यूडमध्ये मात्र तसूभरही फरक पडत नाही. ती म्हणते की जर जामीन देऊन तू काही गेम खेळत असशील तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. पाजी उत्तरादाखल फक्त खो खो हसतात. तिची रेकॉर्ड अजूनही त्याच सुरात वाजत राहते. आता शाकाचे गुणगान सुरु होते. पाजी म्हणतात की बरं असू दे, मी तुला घरी सोडतो. ती म्हणते की आधी मी राकाला मारेन, मगच घरी परत जाईन. पाजींच्या लक्षात येते की कॅसेटमध्ये नाही तर टेपरेकॉर्डरमध्येच बिघाड आहे. ते तात्पुरता नाद सोडतात आणि म्हणतात की ठीक आहे. गरज पडेल तेव्हा दादा म्हणून हाक मार, मी हजर होईन. ती सीन संपता संपता काहीतरी छाप पडावी म्हणून "हूं" करून निघून जाते आणि पाजींना आपण रँडम तरुणीच्या नादाने काय पात्र पदरात पाडून घेतलंय याची प्रथमच जाणीव होते.

ऊप्स अरे हो. ती हुकूमत वाली स्वप्ना. रोशनी नव्हे.

ती मित्रांबरोबर बाहेर खेळण्यासंबंधी व्हॉअ‍ॅ पोस्ट थोडी बदलून असे लिहीतो की ८०ज मधे कोणीतरी कधीतरी "कबिला" वगैरे गोष्टी चित्रपटात "शेवटच्या" दाखवल्या, आणि तेव्हा कोणालाही ते लक्षात आले नाही Happy

'कडक बिजली' >>> बिजली चे हे विशेषण वाचून अ फ्यू गुड मेन मधला जॅक निकोल्सन आठवला. "Is there any other kind"?

आजचा बाकी लेख वाचतो आता.

खतरनाक ! पायस तुम्हाला साष्टांग नमस्कार.
रात्री 9 वाजता कॉल होता, मधल्या काळात या परीक्षणावर नजर पडली आणि किती तरी वेळ आठवून हसत होते, आता चित्रपट पहाणे भाग आहे

Pages