ट्रान्सजेंडरइंडियाडॉटकॉम

Submitted by स्वेन on 27 June, 2021 - 06:20

सोशल मीडिया हा आजच्या जगात एक प्रभावशाली माध्यम असून समाजातील कुठल्याही घटकासंदर्भात बदल घडवून आणण्याचं साधन म्हणूनही याकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत लैंगिक अल्पसंख्याक समुदायासाठी सोशल मीडिया म्हणून अशा प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो आहे आणि अशा समुदायातील लोक वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त व्हायला लागले आहेत. समाजाकडून त्यांची दखल घेतली जाऊ लागली आहे. त्यांच्या अशा व्यक्त होण्यामुळे आपल्यालाही काही गोष्टी समजायला लागल्या आहेत.

पण इतर माध्यमांचा विचार केला तर किती वर्तमानपत्रे, न्यूज चॅनल्स, वेबसाइट्समध्ये या समुदायासंदर्भातील प्रश्नांना महत्व दिलं जातं? बरीच माध्यमे या विषयाला हात घालत नाहीत. काहीतरी वेगळे घडलं, नवीन समोर आलं तरच त्यांच्यासंबंधित माहिती समोर येते. या सगळ्यांचा विचार करून माध्यमांमध्ये आपली एखादी स्पेस तयार करण्याच्या विचारातून एक वेबसाइट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला, जी ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांचे प्रतिनिधित्व करेल आणि या प्रयत्नातून तयार झाली ट्रान्सजेंडर इंडिया डॉट कॉम. नावातूनच याचं वेगळेपण लक्षात येतं, किंवा विषय काय असेल याचा अंदाज येतो. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू आहे.

प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून किंवा शिकवून घडवला जात नाही. पण तरीही ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे पाहताना समाजाची नजर वेगळी असते. त्यात एक शंका असते. त्यामुळे ट्रान्सजेंडर व्यक्ती समाजात वावरताना त्यांना काही मर्यादा येतात. समाजाच्या दबावामुळे बहुतेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आपला लिंगभाव लपून ठेवायचा प्रयत्न करतात. या भीतीमुळे ट्रान्स समुदायातील लोक स्वतःला उघडपणे व्यक्त करत नाहीत. तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. या व्यक्तींना बऱ्याचदा कुटुंबाची साथ नसते आणि समाजाची तर नसतेच. मग आपल्यात होणारे बदल काय आहेत? हे काही चुकीचे आहे का? काय करावं? असे अनेक प्रश्न त्यांनाही असतात. अशा वेळी त्यांना गरज असते मार्गदर्शनाची...मार्गदर्शकाची.
अशा परिस्थितीत त्यांच्याकडे एक माध्यम असणं आवश्यक आहे, जे सामाजिक मान्यता आणि रूढीवादी सिद्धांतांपलीकडे जाऊन त्यांना मदत करू शकेल. अशांच्याच मदतीसाठी 'ट्रान्सजेंडर इंडिया' या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली. 'ट्रान्सजेंडर इंडिया ही भारताची पहिली ट्रान्स वेबसाइट आहे. ट्रान्सजेंडर समुदाय हा या वेबसाइटचा केंद्रबिंदू . ट्रान्स महिला "नेसारा राय" यांनी ती तयार केली आहे. नेसारा ॲमस्टरडॅम येथे राहतात आणि ट्रान्सॲमस्टरडॅमच्या त्या आजीवन प्रतिनिधी आहेत.

मार्च २०२o मध्ये वॉशिंग्टन इथल्या जॉन एफ केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या हॉल ऑफ नेशन्स मध्ये नेसारा यांचा भारताची पहिली ट्रान्स महिला म्हणून सहभाग होता. तिथल्या प्रदर्शनात नेसाराने चितारलेली पेंटिंग्ज ठेवलेली होती. या कार्यक्रमाची थीम होती : Vital Voices-100 Women using their Power to Empower. या कार्यक्रमात, इतर अनेक प्रतिष्ठित महिलांसमवेत, सेरेना विल्यम्स, ग्रेटा थनबर्ग, मलाला युसुफजाई यांचा ही सहभाग होता.

ट्रान्स जेंडर व्यक्तींचे होणारे शोषण थांबविणे आणि त्यांच्या हक्कांची माहिती करून देणे या साठी ही वेबसाईट बनवली असल्याचे नेसारा यांनी म्हंटले आहे. लैंगिक अल्पसंख्यांक समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था यांना सविस्तर माहिती मिळावी, जेंडर आयडेंटिटी काय असते, ट्रान्सजेंडर कायदा २०२० काय आहे, लिंगबदल शस्त्रक्रिया कशी करतात, त्याबद्दल न्यायालयीन प्रक्रिया काय असते, ट्रान्स जेंडर पर्सन प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे, एखादा फॉर्म भरताना मेल फिमेल असे दोनच पर्याय असतील तर काय करावे, ट्रान्स जेंडर व्यक्तींने पासपोर्ट कसा मिळवावा, समाजात वावरताना काय काळजी घ्यावी, या समाजातील उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्ती, अनेक शहरात त्यांची असणारी मंडळे, अशी सर्व उपयुक्त माहिती या वेब साईटवर मिळते.

सामान्य व्यक्तींना प्रश्न पडतो की या समुदायात कोण असतील अशा प्रतिष्ठित व्यक्ती? अशा प्रतिष्ठित किंवा शिकलेल्या व्यक्तींशी आपले रोजचे संबंध येत नसतात त्यामुळे हे कुठे आहेत आणि काय करतात याची माहिती सहज उपलब्ध होत नाही. तृतीयपंथीयांसाठी होत असलेल्या सामाजिक चळवळी, त्यांचें आणि सामान्य जनाचे प्रबोधन यामुळे बदल घडत आहेत. तृतीयपंथीयांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन आता बराच बदलला आहे. अशाच प्रबोधनातून पोलीस उपनिरीक्षक बनल्या के. प्रीतिका यशिनी. या पदासाठी गरजेचा असलेला पोलीस अकादमीचा अभ्यासक्रम प्रीतीकाने पूर्ण केला. नंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत यात त्या सफल झाल्या आणि तमिळनाडू मधील धर्मपुरी जिल्ह्यात त्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नेमणूक झाली.

सत्यश्री शर्मिला या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील आहेत. त्यांनी तमिळनाडू आणि पॉंडेचेरी बार कॉन्सिलमध्ये नोंदणी करत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी वकील होण्याचा मान मिळवला आहे.

प. बंगाल‌मध्ये उत्तर दिनाजपुर जिल्ह्यात‌ जोईता मंडल या तृतीयपंथी न्यायाधिश आहेत. यांचा प्रवास भीक मागण्यापासून ते थेट न्यायाधीश असा झालेला आहे. एकेकाळी ज्या भागात भीक मागितली होती त्याच भागातल्या कोर्टात आज त्या ‘ जज् ’ आहेत.

नताशा विश्वास हिने भारतातील पहिली ट्रान्स ब्युटी क्वीन स्पर्धा जिंकली आहे.

मुंबईच्या आयआयपीएम मधून व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी घेतलेल्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी या नावाजलेल्या भरत नाट्यम नृत्यांगना आहेत. २०१६ सालच्या उज्जैन इथे झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचे पहिले महा मंडलेश्वर म्हणून मान्यता देण्यात आली.

प. बंगाल मधल्या एका कॉलेज मध्ये डॉ. मानबी बंदोपाध्याय या पहिल्या ट्रान्स प्रिन्सिपॉल आहेत. पद्मिनी प्रकाश ह्या तमिळनाडू मधील लोटस चॅनेल वर वृत्त निवेदिका आहेत. बारा भाषेंवर प्रभुत्व असलेल्या शबनम बानो या मध्य प्रदेश विधानसभेत १९९८ ते २००३ या काळात आमदार होत्या.

नेसारा यांच्या म्हणण्यानुसार, ट्रान्सजेंडर इंडिया ही वेबसाइट ट्रान्स व्यक्तींसाठी एक कुटुंब आहे. त्यामुळे समाजातील ट्रान्स समुदायाबद्दल बोलण्याचा आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलता वाढवण्यासाठी या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या जात आहेत. वेगवेगळ्या मोहिमांच्या माध्यमातून सरकार आणि धोरण- निर्मात्यांचे लक्ष या समुदायाच्या वास्तविक समस्यांकडे आणले जात आहे. नेसारा यांच्या या प्रयत्नांमुळे ट्रान्स लोकांसाठी निश्चितच नवीन आशा निर्माण झाली आहे असं म्हणता येईल.

Group content visibility: 
Use group defaults

काय हेतू आहे ही माहिती देण्यामागे ?
ट्रान्सजेण्डर्स बद्दल सहानुभूती आहे. पण समाजात त्यांच्याबद्दल भीती आहे. एकंदर त्यांच्या राहणीमुळे किळस पण वाटते. माफ करा असे लिहीले याबद्दल. पण खोटं बोलण्यापेक्षा खरं सांगितलेलं चांगलं.
थोराड अंगाचे पुरूष स्त्रीवेषात हे एरव्हीही बघवत नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमावर त्यामुळेच टीका होते. ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी.

काय हेतू आहे ही माहिती देण्यामागे ?>> जून हा प्राइड मंथ आहे. सर्वांना आपली लैंगि कता व्यक्त करता यावी म्हणून प्रयत्न असतात त्याचा भाग असावा.

काय हेतू आहे ही माहिती देण्यामागे
>>माहिती देत आहेत ते इंडियन ट्रान्स वेब साईट बद्धल... मायबोलीवर असणाऱ्या किंवा मायबोलीकरांच्या माहितीतल्या ट्रान्सजेंडर्स पर्यंत ही माहिती पोहचली तर फायदाच आहे की..
छान आहे लेख...

धन्यवाद.
वेबसाईट बघितली. इतर बरीच उपयुक्त माहिती असली तरी नव्या ट्रान्सजेंडर कायद्यातल्या अन्याय्य तरतुदींविषयी काही लिहिलेलं दिसलं नाही. उलट त्या तरतुदींच्या आधारी आयडी कसा मिळवायचा याची माहिती दिलेली आहे. ही माहिती उपयोगी असली, तरी मुळात हा कायदा २०१४ सालच्या भारतीय सुप्रीम कोर्टाच्या लिंगभाव निवडीच्या स्वातंत्र्याचा अनादर करतो. आणि त्याची चर्चा या वेबसाईटवर नाही, याचं वाईट वाटलं.

https://transgenderindia.com/publication-of-the-transgender-persons-prot...

इथे त्रोटक माहिती आहे. या कायद्यातल्या कोणत्या तरतुदींमुळे ट्रान्स समाजाला त्रास होणार आहे, कोणत्या तरतुदींमुळे त्यांच्या हक्कांवर गदा येते, याची चर्चा झाली असती तर बरं वाटलं असतं.
असो.
या संकेतस्थळामुळे निदान काहींना मदत होईल, याचा आनंद आहे.

कायद्यातल्या कोणत्या तरतुदींमुळे ट्रान्स समाजाला त्रास होणार आहे, कोणत्या तरतुदींमुळे त्यांच्या हक्कांवर गदा येते,>> हे कुठे वाचता येइल?
मला हे असे सिस्टिमच्या थ्रू सॉफिस्टिकेटेड पद्धती ने एखाद्या वर्गाचे जगणेच अवघड व पुढे अशक्य करून टाकायचे ह्याचा सात्विक संताप येतो.

ट्रान्स बरोबरीने सिस जेंडर्ड व्यक्ती पण असतात. थोडी माहिती आली आहे पेपरात. अभ्यास चालू आहे.

<ट्रान्स बरोबरीने सिस जेंडर्ड व्यक्ती पण असतात. थोडी माहिती आली आहे पेपरात. अभ्यास चालू आ>

जे ट्रान्स नाहीत ते सिस.

छान लेख. छान माहिती. ओळखीतल्या संबंधित व्यक्तींशी शेअर करता येईल. कदाचित त्यांना माहीत असेल नसेल.

एका ट्रान्स जेंडर रनरला ऑलिंपिक मध्ये भाग घेण्यास मनाई केली गेली आहे.
>>>>>>>>>

न्यूज शोधली तर हे मिळाले
नक्की काय कारणाने मनाई केलीय हे कोणी खालचे वाचून सांगेल का?

Telfer is ineligible in that same event at the trials due to her testosterone levels.

A requirement under the guidelines need to compete in the female category is that an athlete's testosterone levels must be less than five nanomoles per liter for a period of at least 12 months. USATF said Telfer did not meet those requirements.

जे ट्रान्स नाहीत ते सिस.>> हो हो मला आपले केमिकल मधले ट्रान्स टू हेक्षेनॉल सिस टू हेक्षेनोल माहीत आहे. सध्याची मानसिकता प्रत्येक व्यक्तीला - तिची स्वतःची लैंगिकता/ रेस/ धर्म/ वय/ सोशल व आर्थिक क्लास हे फरक बाजूला ठेवून - एक माणूस म्हणून पाहणे, त्यांचा आत्मसन्मान जपणे स्वतःचेच पूर्वग्रह तपासणे व सुधारणे अशी आहे. ह्याचा काही कोणाला उप योग होईल का नाही माहीत नाही. एक आपली पर्सनल ग्रोथ. ह्या मार्गावर तरुणाई जास्त पुढे आहे असे निरीक्षण आहे.

चिनूक्स तेच कारण समजले नाहीये
testosterone levels काय असते?
काही नियमानुसार मनाई केलीय की ट्रान्स जेंडर असल्याने मनाई केलीय?

ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी. >>>>
त्यांच्यावर ही अशी जबरदस्ती का ? कोणी कसे राहावे हे दुसर्यांनी का सांगावे? आणि तसे राहिले तरी लोक स्वीकारतील का ?

हॅपी प्राईड मंथ !

काय हरकत आहे ही शंका विचारणे म्हणजे जबरदस्ती ? मला वाटते मराठी सुलभ व्याकरणाचे वर्ग मायबोलीवर सुरू करावेत.
एका थोराड पुरूषाला घरात सून म्हणून आणले आहे. किती ओंगळ अवतार आहे त्याचा. उलट ट्रानस्जेण्डरनी साडीच नेसली पाहीजे ही जबरदस्ती कशाला ? मुली सुद्धा साडी नेसत नाहीत आजकाल. प्रेझेंटेबल असण्याचे महत्व नको का पटायला ?

Transgender बद्द्ल समाज माध्यमावर आत्मीयता दाखवणे ही एक फॅशन आहे.
किती लोकांचे मित्र transgender आहेत आणि अशा मित्रांची ते आपल्या ग्रुप मध्ये ओळख करून देतात?
आणि लैंगिकता गुप्त राखण्याची काय गरज आहे.
पुरुष आणि स्त्रिया लैंगिकता गुप्त राखत नाहीत मग transgender का लैंगिकता गुप्त राखतात.

ट्रानस्जेण्डरनी साडीच नेसली पाहीजे ही जबरदस्ती कशाला >> Rofl
नियमाप्रमाणे बंदी केली आहे. सेक्ष्यालिटी म्हणून नाही. त्यात सुधारणा होण्यास वाव असू शकेल पण ते फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणून सोडून द्यावे. त्या समस्या समस्या नाहीत असं नाही पण जमिनीवरची परिस्थिती काय आणि आपण एनर्जी कशावर लावणार हा समस्या क्रम प्रत्येकाने ठरवावा.

चांगला लेख. लेखातली मराठी अत्यंत सहज सुलभ आहे. आवश्यक तिथेच इ़ंग्रजी शब्द वापरले आहेत. वेबसाइटचा पत्ताही लेखात देता येईल.

हेमंत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर लेखातील तिसऱ्या परिच्छेदात आहे.
आई-बाप , भावंडं संबंध जोडतात. बेघर व्हावं लागतं.
https://m.timesofindia.com/india/left-alone-just-2-of-trans-people-stay-...

रूनमेश

टेस्टस्ट्रॉन हे पुरषत्वाचे हार्मोन आहे
पुरुषांची शारीरिक , मानसिक व लैगिक जडणघडण ह्यावरच असते , म्हणजे पुरुषाकडे मसल मास जास्त असतो , हाडे जास्त मोठी असतात , हृदय मोठे असते , रक्त व हिमोग्लोबिन जास्त असते , नरडे मोठे असते , आवाज दणकट असतो इ इ इ इ , थोडक्यात शारीरिक ताकद जास्त असते

ट्रान्स जेंडर व्यक्ती म्हणजे मधल्या रेषेवरच्या मानल्या तरी सगळेच अगदी मध्ये नसतात , काही थोडे इकडे झुकतात , काही तिकडे

आता , समजा एखादी टीजी व्यक्ती चेहर्याने स्त्रीसारखी जास्त दिसते म्हणून स्त्री गटात स्पर्धेत गेली , प्रत्यक्षात तिच्यात पुरुषतवी हार्मोन पण जास्त असतील तर ती त्या बायकांच्या गटात स्पर्धा सहज जिंकेल ना ? मग अशा वेळी तिला नक्की कोणत्या गटात ढकळणार ? त्यासाठी हार्मोन टेस्ट करतात, त्यात हिची हार्मोन लेव्हल पुरुषाकडे झुकणारी होती , म्हणून ......

जिम बॉडीवाले अनाबोलीक स्टिरॉईड म्हणून औषध वापरतात , ते ह्या टेस्टस्ट्रॉनचेच मावस भावंड आहे .

म्हणून सगळ्या खेळात पुरुष व स्त्री ह्यांची वजन, उंची , पळण्याचे अंतर , उंच उडीची उंची, वजन उचलण्याचे कसब इ इ इ आकडे भिन्न असतात , मुळात कोणत्याही स्पर्धा पुरुषांची व बायकांची अशा भिन्न भिन्न भरवतात , नैतर एकच स्पर्धा ठेवून या सगळे असे केले असते ना ?

हार्मोन्स च जर जबाबदार आहेत तर transgender मानसिकता तय्यार होवू नये म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राचा वापर करून तो प्रश्न च मुळापासून मिटवता येईल.
तसे प्रयत्न का केले जात नाहीत?

फार छान लेख.
>>>>ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी.
>>>>मुली सुद्धा साडी नेसत नाहीत आजकाल. प्रेझेंटेबल असण्याचे महत्व नको का पटायला ?

समाज स्वीकारत नसल्याने, या व्यक्तींची इच्छा अधिक तीव्र आणि अपूर्ण असेल त्यामुळे या व्यक्ती अधिक प्रखरतेने त्या त्या जेंडरचे गुणविशेष, पेहेराव प्रकट करत असावेत. आपण कोण ठरवणारे इन फॅक्ट आपण कोण टिक्कोजीराव विश्लेषण करुन न्याय (जजमेन्ट) देणारे, सोसायटी फार भयंकर जजमेन्टल तर आहेच वर आपली मते लादते.

ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी.

मी ह्यांच्याशी संबंधित डॉकटर असूनही माझे मत हेच आहे, sexuality हा रात्री नऊ नंतर घरी जाऊन विचार करायचा विषय आहे,
दिवसभर इतर वेळी शिक्षण , नोकरी , आर्थिक सुरक्षितता हे महत्वाचे विषय आहे, प्रत्येकवेळी तिसरे जेंडर , मग त्यातही पुन्हा अडीच की साडेतीन ह्यातच हे वेळ घालवतात.

मेट्रो मध्ये हे लोक एकत्र राहत असतील तर तिथे वेगळे टॉयलेट द्या, एखादी वेगळी क्लिनिक ठेवा , ह्या मागण्या समजता येतील , पण खेड्यात 100 किमी मध्ये 30 हजार लोक विखुरले असतील , तर ह्यांची लोकसंख्या किती , मग त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था , तिसरी लाईन कोण अन कसे करणार

आमचे रोजचे 10 % पेशन्ट लोक ह्यापैकी असतात , काही मिक्स अप होतात , काहीना गडबड करून नंबर पुढे हवा असतो , काही लोक येताना आम्हालाही भाकरी भाजी घेऊन येतात, विविध अनुभव येतात.

इथे transgender लोकांना लिहून पाठिंबा देणाऱ्या पैकी एकाच पण मित्र,मैत्रीण transgender नसेल.
आणि एक सुद्धा मोठ्या अभिमानाने त्यांच्या शी मैत्री चे,सेक्शुअल संबंध ठेवून असेल.
ती बघ तुझी वहिनी
असे मित्राला एक पण सांगणारा नसेल.
फक्त फुकटच ज्ञान वाटण्याचे काम चालू आहे.
पर पुरुष शी संबंध कायदेशीर आहेत तरी एकाची पण हिम्मत असे संबंध उघड मान्य करायची होत नाही.
इतके वर्ष झाले तरी.
तसे transgender लोकांना काही कायदेशीर हक्क मिळतील पण त्यांना समाज स्वीकारणे पुढील काही शे वर्ष तरी अशक्य आहे.

ट्रान्सजेण्डर पुरूषांनी पुरूषांसारखे रहायला काय हरकत आहे ? ट्रान्स स्त्रियांनी स्त्रियांसारखे रहावे. म्हणजे लोक किमान त्यांना स्विकारतील तरी. >>> सहजरावांशी सहमत व्हायला लागतंय. आधी खोडसाळ प्रतिसाद देण्याचा विचार होता. पण ऐनवेळी काय म्हणायचे आहे हे समजले. यात कंपल्शनचा भाग नसून त्यांच्याच हितासाठी केलेली सुचवणी दिसते. दिसणे हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे.
कसे रहायचे, काय नेसायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण आपला पेहराव जर विचित्र दिसत असेल तर लोकांच्या नावाने खडे फोडण्यात अर्थ नाही. आपल्या डोळ्यांना काही गोष्टी सवयीच्या असतात. त्या पेक्षा वेगळे काही दिसले तर नजरेला खटकतेच. उदा. मुलाने काजळ किंवा लिपस्टीक लावणे. मुली मुलांचा पेहराव करतात ते आता विशेष राहीलेले नाही. त्यामुळे ते खटकत नाही.

टेस्टस्ट्रॉन हे पुरषत्वाचे हार्मोन आहे
>>>>

ओके. म्हणजे मग ऑलिंपिक समितीने जो निर्णय घेतला तो योग्यच होता. निव्वळ ट्रान्सजेंडर आहे म्हणून भेदभाव नव्हता. सविस्तर पोस्टबद्दल धन्यवाद ब्लॅककॅट Happy

अवांतर - मागे मी स्त्री-पुरुष समानतेच्या एका टिपिकल धाग्यावर म्हटलेले की निसर्गाने पुरुषांना शारीरीक क्षमता स्त्रियांपेक्षा जास्त बहाल केली आहे तर काही लोकं उगाच याचा ईन्कार करत विरोधाला विरोध करत होते. तेव्हा हे टेस्टस्ट्रॉन प्रकरण माहीत असते तर त्यांना समजावता आले असते. असो. ज्ञान उशीरा का मिळेना मिळाले हे चांगले Happy

काही लोकांचे मत हे त्यांना नंतर मिळालेल्या ज्ञानाने सिद्ध होते. अशांना सिद्धपुरूष म्हणतात. सिद्धी विज्ञानाने नंतर सिद्ध होऊ शकते..
किंवा नाहीही होत.

इथे transgender लोकांना लिहून पाठिंबा देणाऱ्या पैकी एकाच पण मित्र,मैत्रीण transgender नसेल...
>>>>

हो, यांना प्रथमदर्शनी लोकं घाबरतात. किंवा दुसरया तिसरया चौथ्या दर्शनीसुद्धा लोकं घाबरतात. एक किळसयुक्त भितीही वाटते. वगैरे वगैरे. पण याला पूर्वग्रहदूषित मन देखील बरेचसे कारणीभूत असते. जर तुम्ही थोडा वेळ दिलात. सहवास वाढवलात. आणि या कालावधीत जर आपली पुर्वग्रहदूषित नजर तुम्हाला बाजूला ठेवणे शक्य झाले. तर तुम्ही यांना निव्वळ एक माणूस म्हणून ट्रीट करू शकता.

हे मी नुसते आदर्शवादी फंडे लिहीत नाहीये तर माझ्याकडे दोन अनुभव आहेत. एक एका तृतीयपंथी अनोळखी व्यक्तीचा. तर एक होमोसेक्शुअल असलेल्या मित्राचा. दुसरा अनुभव लिहिणे उचित वाटत नाही. कारण नाव लपवले तरी काही संदर्भ द्यावे लागतील. ज्यात त्या मित्राची ओळख अप्रत्यक्षपणे उघड केल्यासारखे होईल. किंवा ते टाळायला मग कथास्वरुपात संदर्भही बदलून लिहावे लागतील. त्यामुळे ते कधी लिहेल याची खात्री नाही. पण तो पहिला अनुभव, त्या तृतीयपंथी अनोळखी माणसाचा अनुभव मात्र थोडीशी सवड मिळताच शब्दांची योग्य जुळवाजुळव करत नक्की शेअर करतो.

Emancipation / सबलीकरण (?) हे कुणासाठी इतरांनीच का करावं? ज्याने त्याने स्वत:च का करू नये? ( बघा इथे क्रियापदं, सर्वनामंही लादली आहेत.)

Pages