किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची

Submitted by वैनिल on 27 November, 2017 - 21:56

किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्‍यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. Happy किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.

'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.

लेखमाला

कथा / लेख

लघु लेख

  • माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
  • अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अ‍ॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
  • मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
  • बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८

नाट्यछटा

  • अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१

कविता

नाटुकली / एकांकिका

चित्रकथा

तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ठमाकाकूंच्या मोहन ची गोष्ट होती ना.
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी. >> मलापण आठवतेय ही गोष्ट. मला आठवतेय म्हणजे १९८७ ते १९८९ मधे आली असेल कधीतरी Lol

ती रुप्या बुरूज आणि धाडसी चमू गोष्ट वाचली. एनिड ब्लिटनच्या Famous Five series मधील Five Fall Into Adventure चे रुपांतर आहे. मूळ गोष्ट माझ्या खूप आवडीची आणि हे रुपांतरही मस्त जमले आहे! चित्रेही झकास आहेत Happy

को आईचा बूट नावाची एक चटका लावणारी चिनी कथा होती.

तसंच ' सारा प्रकार असा घडला' नावाची एक कविता कम गोष्ट होती. त्यात त्या राजाच्या राणीचं नाव प्रोक्न असं असतं.
प्रोक्न राणीला तिची बहीण भेटायला येते आणि राजाला ती आवडायला लागते म्हणून तो राणीला मारायचं ठरवतो. शेवटी दोन्ही बहिणी आणि राजा पक्षी होतात. राजा ससाणा पक्षी बनतो. अशी ती गोष्ट आहे.
त्यातलं एक वाक्य मला व्यवस्थित आठवतंय ..
" कोण बरं ही प्रोक्नहून छान? नितळ कांती गोरी गोरी पान"

तसंच ' सारा प्रकार असा घडला' नावाची एक कविता कम गोष्ट होती. त्यात त्या राजाच्या राणीचं नाव प्रोक्न असं असतं.
प्रोक्न राणीला तिची बहीण भेटायला येते आणि राजाला ती आवडायला लागते म्हणून तो राणीला मारायचं ठरवतो. शेवटी दोन्ही बहिणी आणि राजा पक्षी होतात. राजा ससाणा पक्षी बनतो. अशी ती गोष्ट आहे.>>>
मूळ कथा ग्रीक आहे आणि बीभत्स शोकांतिका म्हणून प्रसिद्ध आहे. टेरियस राजाची राणी प्रोक्न असते आणि तिची धाकटी बहीण फिलोमेला. प्रोक्न लग्न करून सासरी येते पण तिला बहिणीची खूप आठवण येत असते म्हणून ती टेरियसला फिलोमेलाला आणायला पाठवते. टेरियस फिलोमेलाच्या प्रेमात पडतो पण ती त्याला धुडकावून लावते. टेरियस तिच्यावर बळजबरी करतो आणि प्रोक्नला काही कळू नये म्हणून फिलोमेलाची जीभ छाटून तिला बंदिवासात ठेवतो. प्रोक्नला तुझी बहीण प्रवासात वारली असं सांगतो. इकडे फिलोमेला बंदिवासातून निसटते आणि एका गालिच्यावर आपली कथा विणून तो गालिचा प्रोक्नपर्यंत पोचता करते. प्रोक्न तिला शोधून काढते आणि दोघी मिळून टेरियसवर सूड उगवायचं ठरवतात. प्रोक्न टेरियससाठी खास मेजवानी आयोजित करते. टेरियस मुख्य पदार्थ खातो तेव्हा ती सांगते की त्यात तिने त्यांच्या मुलाला मारून त्याच मांस टाकलं होतं. स्वयंपाक्याच्या वेषातली फिलोमेला पुढे येऊन सारा प्रकार उघड करते. टेरियस दोघीच्या मागे त्यांना मारायाच्या हेतूने पाठलाग करतो. त्याच्यापासून वाचवण्यासाठी दोघी देवाची प्रार्थना करतात आणि त्याम्चे कोकिळा आणि स्वालो पक्ष्यांमधे रुपांतर होतं. टेरियसचा ससाणा होतो.
अशी मूळ कथा आहे. किशोरमधे बहुतेक बरीच toned down असणार. लिंक मिळाली तर जरूर द्या.

>को आईचा बूट नावाची एक चटका लावणारी चिनी कथा होती.
हो खूप छान कथा होती ही. त्यातल्या या ओळी मला अजून आठवतात.
धगधगणारे तप्त धातुरस
वैर तयांचे असे भयंकर
हवे शिंपण्या पवित्र ऐसे
कुमारिकेचे रक्तच त्यावर.
या ओळी वाचल्यावर एक कळ यायची छातीत.
>" कोण बरं ही प्रोक्नहून छान? नितळ कांती गोरी गोरी पान"
किशोर मधली अशी अनेक वाक्ये , कविता इतक्या डोक्यात घट्ट बसल्या आहेत. तुमचा शब्दसंग्रह वाढवा मधली ही ओळ जाम डोक्यात बसलीये
आम्रवृक्ष बघ कसा बहरला, वसंत , माधव, मधुऋतू आला.

कालिदास (किंवा कदाचित भास कवि असेल) यांच्या गोष्टीतल्या या ओळी लक्षात रहायचं काही कारण नाही. पण लक्षात आहेत.
अनंत सैतुकाचा धनी
त्यासी कशास केले भांडण
उंबरफळ गळाले पिकून
घेऊन येता नारी हरण

(संपादित : ती गोनू झा कविची गोष्ट आहे. धन्यवाद अगो. )
या ओळी कुठल्यातरी कथेत / नाटकुलीत होत्या. पण किशोरमधे होती का आणखी कुठे ते आठवत नाही.
एक दिवस विता विता
मला झाली एक कविता
Happy

दोघी देवाची प्रार्थना करतात आणि त्याम्चे कोकिळा आणि स्वालो पक्ष्यांमधे रुपांतर होतं. टेरियसचा ससाणा होतो. >>>> अरेच्या देवाला नक्की त्यांना मदत करायची होती की शिक्षा?? त्यंना पक्षी केलं ते ठीक, त्या राजाला कशाला ससाणा बनवलं ?!! Happy

अरेच्या देवाला नक्की त्यांना मदत करायची होती की शिक्षा?? त्यंना पक्षी केलं ते ठीक, त्या राजाला कशाला ससाणा बनवलं ?!! Happy>>>

हो ना, मदतीपेक्षा शिक्षाच वाटली होती ती मला, तो ससाणा त्यांना पकडून खाऊन टाकू शकतो की! पण मग नंतर कुठेतरी वाचलं की राणीने आपल्या मुलाला मारले म्हणून तिलाही शिक्षा मिळाली अशा प्रकारे.

अनंत सैतुकाचा धनी
त्यासी कशास केले भांडण
उंबरफळ गळाले पिकून
घेऊन येता नारी हरण >>>> मी अजूनही ही गोष्ट सांगते कुठेकुठे. ही गोष्ट वाचली त्याचवेळी संस्कृतमध्ये समस्यापूर्तीचे श्लोक शिकत होतो आम्ही वर्गात. ही एक समस्यापूर्तीच आहे. 'अर्थ की निरर्थ' ह्या शीर्षकाने ही गोष्ट जानेवारी ७९ च्या अंकात सापडली तेव्हा खूप आनंद झाला.

अनु, शोभा बेंद्रे ह्यांची तू म्हणत असलेली गोष्ट तर सापडली नाही पण फेब्रुवारी ७८ च्या अंकात 'किटलीचा काटा काढला' अशी त्यांनी लिहिलेली एक गोड गोष्ट आहे. अगदी लहान मुलं भयंकर एंजॉय करतात ही गोष्ट.

रच्याकने, श्री. दा. पानवलकरांची 'श्रीखंडाचं बोट' वाचली आणि यक्क झालं Proud

किशोर मधली चित्रं बघणं, हासुद्धा एक आनंदोत्सव आहे. कित्येक कथांसोबत त्यातली चित्रे सुद्धा लक्षात आहेत इतक्या वर्षांनीही.
प्रभाशंकर कवडी, राम वाईरकर ह्यांची चित्रे तर इतकी बोलकी आहेत की नुसते चित्र पाहूनच त्याच्या आधी काही काळ काय घडलंय किंवा नंतर काही काळ काय घडणार आहे, हेही डोळ्यांसमोर येऊन जातं !

एक ठमाकाकूंच्या मोहन ची गोष्ट होती ना.
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी.
>>>

ही 'बक्षीस' कथा तर नाही? जुलै १९८१ च्या अंकात आहे, पण ह्या कथेत एक मुलगा सोडवतो एका बाईला.

एक (बहुतेक शोभा बोंद्रे लिखीत) मस्त गोष्ट होती. लहान मुली आपल्या साध्या बाहुल्यांशी खेळत असतात आणि मैत्रिण चकाचक बार्बी घेऊन येते, मग यांच्या बाहुल्या फिक्या वाटू लागतात, मग या खूप मेहनत करुन एक बाहुला लग्नासाठी सजवतात तितक्यात ती मैत्रिण बार्बीचा मित्र केन विकत घेऊन येऊन त्यांचा पोपट करते अशी काहीतरी(मी नीट सांगत नाहीय पण छान होती ती गोष्ट.)
>>>
'बेबीचा बालमित्र' - शोभा बोंद्रे - फेब्रुआरी १९८९

धन्यवाद,
गोष्ट आणि चित्र दोन्ही गोंडस आहेत.वाचून मजा आली.

मज्जा आली जुना अंक वाचून.. तेव्हाचा फाँट, चित्रे सगळेच मस्त... सर्वात शेवटच्या पानावर पेप्पीची जाहिरात मजेशीर आहे Happy

सूची update करणं आता शक्य नाही (कालमर्यादा) , त्यामुळे आता पुढचे लेख / कथा आता अशा संदेशांमार्फतच ...

अजून एक हवी असलेली कथा सापडली:
'बुद्धिबळाचा डाव' - श्री.के.देवधर - फेब्रुआरी १९८१

किशोर मध्ये दोन कथा होत्या टाईम मशिन वर. त्यातला मुलगा एका कथेत भूतकाळात जातो - शिवाजी महाराजांना बघतो आणि एकदा भविष्यकाळात जातो... कोणाला आठवतायत का? कुठल्या अंकात असतील?

अप्रतिम !! धागाकर्त्यांना धन्यवाद आणि वर काढल्या बद्दल सुद्धा !!

ढब्बू ची गोष्ट आठवतीये का कोणाला , एक मुलगा जो थोडा जाड आहे , मित्र फारसे नाहीत , अभ्यासात मागे आहे , त्याच्या जवळ एक लष्करातले काका राह्यला येतात आणि त्यांच्या बरोबर राहुन त्याला आत्मविश्वास येतो , अभ्यासात पुढे जातो , अशी गोष्ट होती. शेवटचे वाक्य - ढब्बू चा आता खणखणीत रुपया झाला होता असे काहीसे होते ......

श्री. दा. पानवलकरांची 'श्रीखंडाचं बोट' वाचली आणि यक्क झालं
>>> मलाही... काय विचार करून किशोर मधे असली कथा टाकली असावी? ना त्यात मेसेज होता ना मनोरंजन... कायच्या के...

एक गोष्ट मला आठवतेय उडत्या माकडांची टोळी, त्या गोष्टीत आधी एक अख्खं घर जेरुसलेमच्या वाळवंटातून उडून कुठेतरी जातं त्या घरात एक मुलगी असते नंतर तिला एक घाबरट राजकुमार, भित्रा सिंह ,.पत्र्याचा यंत्रमानव टाईप, अजून कोण कोण भेटत जातात.ते सगळेजण स्वतः च्या वैगुण्यावर मात करुन ते घर परत घेऊन जातात .एक चेटकीण पण आहे गोष्टीत. छान होती गोष्ट.
मला अजून एक आठवतेय एका १२-१३ वर्षाच्या मुलीचा वाढदिवस असतो तर तिच्या साठी करून ठेवलेले गुलाबजाम कि केक काहितरी एक गोष्ट ती मुलगी एकटीच खाऊन टाकते. तर घरचे सगळेजण तिला न ओरडता कसं समजवतात ती गोष्ट आहे.तिच्याकडे काम करणारी मोलकरीण आंबा दिल्यावर तिथेच न खाता घरी घेऊन जाईन म्हणते, मला ते आंबा धरलेलं चित्र पण आठवतय

चिन मधल्या जुन्या शोध कथा पण बऱ्याच वाचल्या आहेत. फटाक्यांचा शोध, मग रेशमाच्या धाग्यांचा ,चिनी मातीच्या बरण्या भांडी ह्या बद्दल वाचल्याचं आठवतंय किशोर मधे. आणि ह्या सगळ्या वरची चित्रं पद्मा सहस्त्रबुद्धे ह्यांची असायची . ती चित्रं मला खुपचं आवडायची .गोड चेहरे अगदी. मला त्यांची स्टाईल खुप आवडते चित्राची.

धनुडी, तो wizard of oz या गोष्टीचा भा रा भागवतांनी केलेला नितांत सुंदर अनुवाद होता - क्रमशः येत होता. आता नाव आठवत नाहीये.

मुलीचं नाव जुई, तिचा कुत्रा टाटू, पत्र्यामारुती, घाबरट सिंह, गवत भरलेलं बुजगावणं, चेटकी, नेटकी, जैसलमेरमधून जुईला घेऊन उडणारं घर, उडणारी माकडं, जुईचा लाल बूट, जादुगार , पाचूनगरी .. भारी आहे ती गोष्ट.

पाचूनगरीत जुई असं नाव आहे का?

>> श्री. दा. पानवलकरांची 'श्रीखंडाचं बोट' वाचली आणि यक्क झालं
>> >>> मलाही... काय विचार करून किशोर मधे असली कथा टाकली असावी? ना त्यात मेसेज होता ना मनोरंजन... कायच्या के...

वाचली हि कथा आत्ताच. लहान मुलांसाठी केवळ विनोद निर्मिती हा हेतू ठेऊन लिहिली असावी असे वाटते. आजच्या घडीला हे विनोदी वाटत नाही हे खरेच. पण माझ्या लहानपणी "घशात बोट घातले तर, बोटाला श्रीखंड लागेल" हि पोटभर जेवण झालेय हे सांगण्याची विनोदी पद्धत होती हे मला पुसटसे आठवतेय. अर्थात, अनेक तत्कालीन "सेन्स ऑफ ह्युमर" आता कालबाह्य झालेत हे सुद्धा खरे आहे.

(बायदवे, कथा ज्या पानांवर आहे ती पाने गायबच आहेत असे वाटले आधी. कारण १८ नंतर २९ पण आहे पीडीएफ मध्ये. पण नंतर पाहतो तर हि मधली दहा पाने शेवटी जोडली आहेत)

>> अख्खं घर जेरुसलेमच्या वाळवंटातून उडून कुठेतरी जातं त्या घरात एक मुलगी असते नंतर तिला

हे मी सुद्धा वाचल्याचे अगदी पुसटशी आठवण आहे. घर उडून जात आहे. पण त्यातली मुले विमानात असल्यासारखी त्या उडत्या घरात सुरक्षित आहेत असे काहीसे फारच छानसे (कल्पनाविलासी सुखदायक) चित्र पण दाखवले होते त्यात... (?)

धनुडी, तो wizard of oz या गोष्टीचा भा रा भागवतांनी केलेला नितांत सुंदर अनुवाद होता - क्रमशः येत होता. आता नाव आठवत नाहीये.>>>>>>>>>हो क्रमशः यायची. केवढी वाट बघायचे मी किशोरची त्यावेळेस.. धन्यवाद मामी ,मला हे आठवत नव्हतं कि भा रां नी अनुवाद केला होता ते.

Pages