शहर सोडताना..

Submitted by पाचपाटील on 27 May, 2021 - 15:58

सगळ्यांत जास्त काय वाईट?
सवय..!
जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची
बारची वाईन शॉपींची
पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची..
शहर सोडताना अवघड जातं मग

शहर काही वाईट नसतं..
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू
आणि कळतं की आता जावं लागेल..

निरवानिरव करावी लागते मग
दूधवाला गॅसवाला पेपरवाला
आवराआवर बांधाबांध
भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच..
बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट
ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास
रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं
नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं

ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्या बऱ्या
त्यांच्यासोबत ही सगळी वर्षंही वाहूनच गेलेली बरी..
त्याच लायकीची होती ती..!

पुस्तकांना निरोप..
खूप दिलं बाबांनो तुम्ही.. माझ्यात आजही जे काही चांगलं असेल, शुभ असेल, ते सगळं तुमच्यामुळेच आहे..
तुमच्यापासून काय लपलंय माझं..! सगळंच माहितीय
तुम्हाला..
आणि मी भिकारी.. मजबूर.. तुम्हाला सोबत नेऊ शकत नाही.. मला तुम्हाला सांभाळता येत नाही यापुढे.. ही शरम घेऊन जगता येतं का बघावं म्हणतो...

शेवटी रिकामा भकास फ्लॅट.. दार बंद.. किल्ली ओनरकडे जमा..
'चलता हूं भैय्या'.. हे वॉचमनसाठी.

गाडीच्या काचांमधून शहर मागे मागे पडत जाताना दिसत
राहतं.. डोळे मिटून घेतले तरीही फरक पडत नसतो.. मनाची
व्हायची ती मोडतोड होतच असते..
शिवाय सोबतीला 'पुढं काय' हा रक्त काढणारा प्रश्नही...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं

>> शेवटी रिकामा भकास फ्लॅट.. दार बंद.. किल्ली ओनरकडे जमा..

आई शप्पथच _/\_
पाटलानू, काय लिवलंय राव
शेवटी गाडीच्या काचमधून ऐवजी साहित्य भरलेल्या टेम्पोतून मागे मागे पळणारा रस्ता सुद्धा चाललं किंवा पळलं असतं!

सुंदर
एकटा राहणारा शहर सोडतो तेव्हा त्याच्या सामानाला टेंपो लागत नाही. आधीच्याच ओळींत पुस्तकंही सोबत न घेता आल्याची शरम व्यक्त झाली आहे.

आवडला.
निरोप हे प्रकरण एकंदरीत कठीणच.
घर रिकामं करताना मन आठवणींनी आणि गुंतलेपणाने भरून जातं ते पुढे रिकामं होता होत नाही.

छानच लिहिलंय !
पण माझ्यामते मुळं रुजतात रुतत नाहीत.
पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
>>>> इथे थोडे खटकले.

आणि मुळं रुजवायला जमली नाही तरी शहर हृदयात रुतलंय अगदी हे जाणवतंय

मी सिव्हील इंजीनियर असल्याने पोटापाण्याकरता अनेक गावे फिरलोय. मुळं रुजताहेत ना रुजताहेत तोवर गावं सोडावी लागत त्याची आठवण झाली. स्मरणरंजनात बुडालो.

भारी लिहिलंय.... खपल्या खरवडणारं...!

कुठल्याही ठिकाणचा निरोप घ्यायची वेळ आली की एक प्रकारची अनामिक हूरहूर लागतेच.

*मला तरी यात एक रूपक दिसलं.* +1.
( अवांतर - मला एक किस्सा आठवला. असंही एक शहर सोडणं असूं शकतं -
एक नामवंत फ्रेंच लेखक प्रवासासाठी बांधाबांध करत असताना त्याचा मित्र त्याच्या पॅरिसमधील घरीं टपकतो.
' अरे, कूठे निघालास पर्यटनाला ? '
' पॅरीसला ! '
' तूं सरळ उत्तर देणार कीं मीं निघूं इथून ?'
' अरे बाबा, या जगात पॅरीसहून सुंदर असं बघण्यासारखं कांहीं आहे का ? पण बाहेरून येवून माझं पॅरीस बघण्याची आगळीच गंमत अनुभवायला मीं कुठेतरी पॅरीस सोडून जावून परत येणार आहे ! ' )

मस्त लिहिले आहे !
मुंबई सोडताना काय झालेले ते आठवले... किंबहुना मुंबईतही जुन्या बिल्डींगमधून त्याच शेजारी बांधलेल्या नवीन टॉवरमध्ये जाताना आणि मग आपली जुनी बिल्डींग तोडताना बघून जे वाईट वाटलेले ते जास्त वाईट होते..

आवर्जून दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.. सगळे प्रतिसाद आश्वासक आहेत... _/\_

पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला
>>>> इथे थोडे खटकले
.
@ हर्पेन,
'रूतवणं' हाच शब्द योग्य वाटतोय..
गावखेड्यांतून शहरात स्थलांतरित झालेला माणूस सदैव आपली मूळं 'रूतवायच्या' प्रयत्नातच असतो..
आणि 'रूतवणं' हे नैसर्गिक नसतं.. त्यात एक प्रकारची जबरदस्ती असते.. शोषण असतं.. संघर्ष असतो.. चीडचीड असते..

ह्याउलट रोपट्याची मूळं मातीत 'रूजतात'.. अगदी सेंद्रिय सहजपणाने ते होत असावं... पण वाढ झालेल्या झाडाला तिथून उपटून दुसरीकडे नेऊन लावलं तर ते पुन्हा 'रूजणं' एवढ्या सहजपणाने घडेल असं वाटत नाही...

<< मला तरी यात एक रूपक दिसलं. अंतिम निरोपाचं, महा प्रयाणाचं... >> +१

बाब्बो फारच अफाट लिहिलंय.
मुंबई सोडताना सामानाचा टेम्पो पुढे गेलेला. कुटुंबीय नंतर समान लागल्यावर येणार होते. शिवनेरीत डोळे बंद करून पण अश्रू पाझरतच होते.

गाडीच्या काचांमधून शहर मागे मागे पडत जाताना दिसत
राहतं.. डोळे मिटून घेतले तरीही फरक पडत नसतो.. मनाची
व्हायची ती मोडतोड होतच असते..