"शासकीय तंत्रनिकेतनातलं 'काॅपी' प्रकरण आणि अजून बरेच काही........"

Submitted by चंद्रमा on 22 May, 2021 - 05:49

.......प्रिय मायबोलीकर बहुतांश वाचकांनी आपले काॅलेज जीवन अनुभवले असेल तर आपल्या गोड आठवणींना पुन्हा उजाळा द्यायला घेऊन आलो आहे महाविद्यालयीन जीवनाची सफर! चला तर मग या सफरीचा आनंद घेऊया मनमुराद!

"सुर्य जरी मावळला,
तरी त्याचा संधिप्रकाश रेंगाळत असतो!
त्यांचा सहवास जरी संपला;
तरी आठवणींचा सुगंध दरवळत असतो!!"

'शासकीय तंत्रनिकेतन नंदनवनवन' शहराच्या वेशीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेली एक भव्य टोलेजंग आणि प्रशस्त वास्तू! डोंगरांच्या परीसरानी वेढलेली. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापासून अशोक आणि शाल वृक्षांची दुतर्फा झाडे, मोगऱ्याच्या आणि रात राणीच्या सुवासांनी सर्व परिसर दरवळून निघत असे. कॉलेजच्या पाठीमागे 'नंदिनी' नदी वाहायची झुळझुळ! कॉलेजच्या परिसरात फिरलं तर भासे हा राजवाडा! प्रत्येक शाखेची स्वतंत्र इमारत, 'विद्युत', 'यंत्र', 'अनुविद्युत','सिविल', 'पॅकेजिंग', 'टेक्स्टाईल', 'माइनिंग' अशा विविध शाखा.कॉलेजच्या डाव्याबाजूला लायब्ररी आणि कोपऱ्यावर मुलांचे वसतिगृह तर कॉलेजच्या पाठीमागे मुलींचे! म्हणतात ना खजिना आत मध्ये लपवून ठेवलेला असतो सौंदर्याचा! म्हणूनच व्यवस्था पाठीमागे केली होती.

.....तर या नंदनवनात बालगोपाळांचा एक 'पांडव ग्रुप' होता. आता "हे पांडव कोण?" हा प्रश्न वाचकांना पडला असेल. चला तर ओळख करून घेऊया, पांडवांचा मुख्य सूत्रधार 'गोट्या' उर्फ 'सुदर्शन यादव', 'अविनाश म्हात्रे', 'राजाराम गवळी', 'मनोहर पाटील' आणि 'चक्रधर पांडे' 'पांडे' या इसमाला कोणी 'चक्रधर' नावाने हाक मारत नसे. 'पांडे' या व्यक्तीचं नाव कितीही सुंदर असलं तरी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही मूर्ती 'पांडे' म्हणूनच चर्चेत असते. याला सर्व 'पांड्या' म्हणायचे.'गोट्या' तल्लख बुद्धिमत्तेचं व्यक्तिमत्व! सर्व जटिल प्रश्नांची कोडी उलगडण्यात यांचा हातखंडं! आणि शेरोशायरी हे तर त्यांचे रसायन! 'अविनाश' सज्जन आणि शिस्तप्रिय, 'राजाराम' हे साहेब मद्यप्रेमी आणि मद्यावर तत्वज्ञान देणे हा त्यांचा आवडता उपक्रम! राहणीमान राजासारखे असले तरी रामाचे कोणतेही गुणधर्म त्याच्यामध्ये नव्हते.'मनोहर' हे सदाबहार कोणत्या-ना-कोणत्या प्रेम प्रकरणांमध्ये नेहमी अडकलेले असायचे आणि हो विशेष 'पांडे' हे कॅरेक्टर! 'सपोर्टिंग कास्ट' म्हणून! ग्रुप ची सर्व छोटी- मोठी कामे यांच्या खांद्यावर वाहिलेली. स्टेशनरी सामान, बियर,बर्थडे केक तर कधी वडापाव आणि तो पण हे सर्व आनंदाने करायचा. तर असा हा 'पंच पांडवांचा' ग्रुप कॉलेजमध्ये खूपच फेमस!

'गोट्या' मेकॅनिकल ला होता. तो आपल्या गावावरून अप-डाऊन करायचा. 'अविनाश' आणि 'मनोहर' इलेक्ट्रिकल ला 'राजाराम' सिविल तर 'पांडे' हा पॅकेजिंग ला! वेगवेगळ्या शाखेमध्ये जरी असले तरी त्यांची मैत्री 'घट्ट' आणि 'जिगरी' होती.
'गोट्या' चे लेक्चरला नेहमी बंक! पटांगणाच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाखाली सर्व मंडलीला घेऊन बसायचा. त्याने या जागेला "बाबा का मठ" असे नामकरण केले होते आणि गोपाळकाला सुद्धा तिथेच!पांडे ची आई डब्यामध्ये 'श्रीखंड पुरी','बासुंदी', 'आलू पराठे', तर कधी 'कटलेट' असे विविध पदार्थ द्यायची. पांडवांना हे कळले होते मग ते प्लॅन करायचे 'पांडे' ला पैसे द्यायचे आणि सांगायचे "हे पांड्या वडापाव घेऊन ये"! पांडे पण लगेच निघायचा आणि परत येतो तर काय 'डबा' लंपास! 'पांडे' हात चोळीत बसायचा मग काय तेच आणलेले वडापाव खाऊन दिवस ढकलायचा. 'गोट्या' मित्रांवर आपली छाप सोडायची असेल तर बोलायचा 'अर्ज कीया है,जरा गौर फरमाइयेगा'
"कदम-कदम पे इम्तिहान लेती है जिंदगी,
हर वक्त नए सदमे देती है जिंदगी!
हम जिंदगी से शिकवा करे भी तो कैसे करें;
आप जैसे दोस्त भी तो देती है जिंदगी!!"
मग लगेच 'वाहवा वाहवा', 'क्या खूब', 'माशाअल्ला',
'सुभान अल्ला' अशी दाद मिळायची 'गोट्या' अशी रोजच मैफिल सजवायचा. 'अविनाश' आणि 'मनोहर' यांना सतत लेक्चर्स ला बसावे लागे. तर राजारामच्या नेहमी साईट प्रोजेक्ट! 'पांडे' हे क्लासमध्ये बसायचे नाही पण डिलिव्हरी बॉय म्हणून नेहमी व्यस्त असायचे.
लेक्चरला 'गोट्या' गैरहजर असतो म्हणून 'एचओडी' कडे तक्रार गेली आणि 'प्रतीक्षा' मॅडमला 'बाबाच्या मठा' बद्दल पण खबर मिळाली तर प्रतीक्षा मॅडम चक्क स्टीलची छडी घेऊन बाबाच्या मठावर! एका एकाला क्लासमध्ये ओढत घेऊन गेल्या. बिचाऱ्या प्रतीक्षा मॅडमला ही मुलं नेहमी वाट बघायला लावायचे त्यांच्या नावाप्रमाणेच! त्यांचे लेक्चर नेहमी विद्यार्थ्यांची वाट बघत बसायचे.पांडवांनी तर कॉलेजमध्ये सर्व लेक्चरर चे नामकरण केले होते 'चव्हाण सरांना' 'उजडा चमन' म्हणायचे कारण त्यांचे टक्कल होते. जॉन मॅथ्यू सरांना 'डीटेक्टीव' कारण ते नक्कल पकडण्यात पटाईत होते. देशपांडेना 'डेस्पो'तर परांजपेंना 'पारा'! 'प्रतिक्षा' मॅडमला 'वेटिंग रूम' तर 'रक्षा' मॅडमला 'चुम्मा' म्हणायचे कारण शिकवताना त्यांच्या होटांचा चंचू होत असे. तर अशी ही 'खट्याळ नामावली' पांडवांनी नंदनवनात प्रसिद्ध केली होती.

'मनोहर' ला फर्स्टइअर इलेक्ट्रॉनि्क्स ची 'प्राजक्ता' आवडायची. ही मुलगी काही पहिलीच नव्हती पण आवडायची. मनोहरने लायब्ररीमध्ये तिला 'हाय' केलं नंतर लायब्ररीतून बाहेर पडल्यावर तो तिला म्हणाला, "तुला काही नोट्स वगैरे लागले तर मला सांग हं, मी नक्की तुला मदत करेल!" प्राजक्ता म्हणाली "नक्कीच दादा!" 'दादा' म्हटल्याबरोबर मागे उभे असलेले गोट्या आणि राजाराम खळाळून हसले. त्यांना काही हसू आवरेना! मनोहरच्या तर तोंडचे पाणीच पळाले. तो चाट पडला. मग गोट्याने आपल्या भात्यातून एक तीर काढला आणि म्हणाला जा तीला म्हण......
"मी दिसतो असा तसा,
मला समजू नको सादा!
‌ मरतो ग तुझ्यावर मी;
मला म्हणू नको दादा!!"
आणि पुन्हा हशा पिकला यावेळी मनोहरने पण हसून दाद दिली. असेच थट्टामस्करी करीत करीत दोन वर्षे कशी निघून गेली कळलं सुद्धा नाही आता फायनल इयर होते आणि कॅम्पस सिलेक्शन पण! अविनाश आणि मनोहरला संधी! कारण हे दोघेही 'एसी' म्हणजेच 'ऑल सब्जेक्ट क्लिअर!' तर सिलेक्शन ची डेट आली. आधी एप्टीट्यूड नंतर टेक्निकल आणि फायनल इंटरव्यू असे तीन राउंड होते. तर या कॅम्पस सिलेक्शन ला गोट्या पण गेला एप्टीट्यूड लकीली पास झाला. टेक्निकल पण तूक्के मारून क्लिअर केले पण इंटरव्यूला बोंब होती कारण यांचा मशीन ड्रॉइंग अजूनही बॅक होता त्यामुळे त्याने धूम ठोकली.
'अविनाश' आणि 'मनोहर'ने पहिले दोन राऊंड क्लीयर केले. इंटरव्यू मध्ये मनोहर फेल झाला तर अविनाश पास! सर्वांनी हर्षोल्हास केला. थ्री चिअर्स फॉर 'अविनाश'! हिप हिप हुर्रे!हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे!मग पार्टीचा दिवस ठरला कारण 'अविनाश' ची सेकंड ईयर ची 'स्कॉलरशिप' आली होती. आणि 'अविनाश' ने पण आपल्या दोस्तांसाठी होकार दिला. मग महफिल सजली आणि सुरु झाले बाटल्यांचे चीत्कार! आता पार्टीचा मुख्य सूत्रधार होता 'राजाराम मद्यपि'........ पहिला-वहिला पॅक घेतला की लगेच सुरू, "बाबा रे ही दुनिया खुप वाईट!" ही त्याची स्टाइल होती "बाबा रे" या संबोधनातून तो मित्रांना दाखवून द्यायचा की मी खूप मोठा ज्ञानी आणि तुम्ही अजान, अज्ञानी बालक! मग काय सर्वांना नशेचा अंमल असायचा मग ते पण त्याला दाद द्यायचे "खरंय!" "खरंय!" मग पांडे आपला सूर आवळायचा "'महाराज' म्हणजे 'राजाराम' तुम्ही दारूला इतके महत्त्व का देता?" तर राजाराम बोलायचा "अजाण बालका मद्यपान हा आयुष्याचा अविभाज्य पार्ट आहे. बियर विस्की आणि रम पिण्यामागे सायन्स तर देशी दारू पिण्यामागे आर्ट आहे. यामुळे मिळते ताकत! यामध्ये वेगळीच मज्जा असते आणि आयुष्यभराची मवाळ व्यक्ती या क्षणी राजा असते."
महाराजांचे हे तत्त्वज्ञान सर्वानुमते संमत व्हायचे कारण सगळेच झिंगलेले असायचे मग पेंगत पेंगत "ये दोस्ती हम नही तोडेंगे" गात-गात होस्टेलला परत यायचे......

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान सुरुवात...!
लेखनात सहजता येत चाललीयं..
पुढील लेखनास शुभेच्छा..!