दोन चंद्र

Submitted by वावे on 27 February, 2021 - 14:00
moon

कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ’हा चंद्र’ नावाची. त्यात ते म्हणतात,
"त्या चंद्राचे या चंद्राचे मुळीच नाही काही नाते"

’हा चंद्र’ म्हणजे आपल्याला नेहमी आकाशात दिसतो, तो. लहानपणी गाडीतून जाताना आपल्यासोबत पळणारा, पण गाडी थांबली तर पुढे पळून न जाता आपल्यासाठी थांबून राहणारा. मोठेपणी ’चंद्र आहे साक्षीला’, ’ एकसो सोला चॉंद की रातें’ वगैरे ओळींची आठवण करून देणारा.

’तो चंद्र’ म्हणजे पृथ्वीचा उपग्रह. पृथ्वीभोवती सत्तावीस दिवसांत एक, अशा प्रदक्षिणा घालत राहणारा, सूर्याच्या सोबतीने समुद्रात भरती-ओहोटी घडवणारा, कधी सूर्यालाच ग्रहण लावणारा.

कुसुमाग्रज म्हणतात, हे दोन वेगवेगळे चंद्र आहेत. त्यांचा एकमेकांशी काय संबंध?

"त्या चंद्रावर अंतरिक्षयानात बसूनी माकड,मानव, कुत्रा यांना जाता येते
या चंद्राला वाटच नाही, एक नेमके ठिकाण नाही
हाही नभाचा मानकरी, पण लक्ष मनांच्या इंद्रगुहांतून भटकत राही"

over_the_city_0.JPG

पुण्याला कॉलेजला असताना मी आकाशनिरीक्षणासाठी बर्‍याच वेळा एका ग्रुपबरोबर पुण्याबाहेर जायचे. तारे, तारकापुंज आणि ग्रह चांगले स्पष्ट दिसावेत म्हणून शक्यतो हे आकाशदर्शनाचे कार्यक्रम अमावास्येच्या आसपासच्या दोनतीन दिवसात सोयीस्कर रात्र पाहून आखले जातात. (चंद्रप्रकाश जास्त असला तर अंधुक तारे नीट दिसत नाहीत) तेव्हा रात्र जागवून परत पुण्याला येताना कधीकधी समोर उगवणारी चंद्राची लांबलचक पातळ कोर दिसायची. त्या काळात एकदा संध्याकाळी चंद्र-शुक्र युती दिसणार होती, म्हणजेच चंद्र आणि शुक्र ग्रह एकमेकांच्या खूप जवळ दिसणार होते. संध्याकाळ झाली आणि पश्चिमेला चंद्र-शुक्र युतीचं सुंदर दृश्य दिसू लागलं. नुसत्या डोळ्यांनी पाहताना आकाशात जणू पणती लावली आहे असं वाटत होतं. चंद्रकोरीची पणती आणि शुक्राचा तेजस्वी ठिपका बरोबर ज्योतीच्या जागी. टेलिस्कोपमधून पाहिल्यावर तर तेच दृश्य अजून सुंदर दिसत होतं. चंद्राची मोठी कोर आणि शेजारी तिची जणू छोटी प्रतिकृती असावी तशी शुक्राची कोर! आता इतकी वर्षं झाली, तरी ते दृश्य अजूनही मनात ताजं आहे.

moon_venus.jpg

(प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)

कधी शरद पौर्णिमेचा प्रफुल्लित, तरीही शांत चंद्र, कधी गुलजारांच्या ’पतझड’ कवितेतल्यासारखा ’कमजोर सा पीला चांद’, ’या’ चंद्राची अशी निरनिराळी रूपं आपल्या मनात आपण साठवून ठेवलेली असतात.

dhauli (2).JPG

’त्या’ चंद्राची कहाणीही सुरस आहे. पृथ्वीचा हा एकमेव नैसर्गिक उपग्रह. आकाराने पृथ्वीच्या जवळपास एक चतुर्थांश. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो. सूर्यापासून त्याचं (आपल्याला भासणारं) कोनीय अंतर रोज बदलत जातं, त्यामुळे आपल्याला चंद्राच्या वेगवेगळ्या ’कला’ दिसतात.
अमावास्येला आपल्याला चंद्र दिसत नाही, कारण त्या दिवशी चंद्र सूर्याबरोबरच उगवतो आणि मावळतो. म्हणजेच, चंद्र आणि सूर्याचं पूर्व-पश्चिम कोनीय अंतर आपल्यासाठी शून्य असतं.

खाली दिलेला फोटो म्हणजे स्टेलारियम या आकाशनिरीक्षणासाठीच्या अ‍ॅपमधला अमावास्येच्या दिवशीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाशात शेजारी शेजारी दिसतायत.

Screenshot_20210227-162810.jpg

हळूहळू हे अंतर वाढायला लागतं. चंद्र रोज थोडा थोडा उशिरा उगवू लागतो. (रोज ५२ मिनिटे) .रोज चंद्र आणि सूर्यातलं (आपल्याला दिसणारं ) पूर्व-पश्चिम कोनीय अंतर वाढत वाढत जातं, चंद्राची कोर मोठी-मोठी दिसू लागते, अधिकाधिक पूर्वेकडे सरकू लागते. या मार्गावर अश्विनी, भरणी, कृत्तिका इत्यादी २७ नक्षत्रं आहेत. यापैकी रोज एका नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर चंद्र आपल्याला दिसतो. असं होत होत पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण चंद्र पूर्वेला उगवतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. उदा. चंद्र चित्रा नक्षत्रात असेल तर चैत्र, विशाखा नक्षत्रात असेल तर वैशाख, इत्यादी. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका काळ लागतो, तितकाच काळ त्याला स्वतःभोवती एक फेरी मारायला लागतो. त्यामुळे, चंद्राची ’मागची’ बाजू आपल्याला पृथ्वीवरून कधीच दिसत नाही. चंद्रावरचा ’दिवस’ हा आपल्या २७ दिवसांइतका मोठा असतो.

अमावास्येला आणि पौर्णिमेलाच ग्रहणं होऊ शकतात, कारण या दोनच तिथींना पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येऊ शकतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू शकते (पौर्णिमेला, चंद्रग्रहण) किंवा चंद्राची सावली पृथ्वीवर पडू शकते (अमावास्येला, सूर्यग्रहण). योगायोगाने, चंद्र आकाराने सूर्यापेक्षा जितक्या पटीने लहान आहे, जवळपास तितक्याच पटीने तो आपल्याला सूर्यापेक्षा जवळ असल्यामुळे आकाशातला त्याचा आकार आपल्याला जवळजवळ सूर्याइतकाच दिसतो. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस तो सूर्याला पूर्णपणे झाकून टाकू शकतो. जेव्हा ग्रहणाच्या वेळी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकत नाही, तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होतं.

eclipse.jpg

२१ जून २०२० रोजी भारतातून दिसलेलं खंडग्रास सूर्यग्रहण.

प्रत्येक अमावास्येला आणि पौर्णिमेला ग्रहणं घडत नाहीत कारण प्रत्येक अमावास्येला (पृथ्वीवरून पाहताना) चंद्र-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्र-सूर्य आकाशात शेजारी-शेजारी असतील) त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेलाही (चंद्रावरून पाहताना) पृथ्वी-सूर्यातलं पूर्व-पश्चिम अंतर जरी शून्य असलं, तरी उत्तर-दक्षिण अंतर शून्य असेल असं नाही. (चंद्राच्या आकाशात पृथ्वी आणि सूर्य शेजारी-शेजारी).

powershot_3 473_0.JPG

३१ जानेवारी २०१८ रोजी भारतातून दिसलेलं चंद्रग्रहण. ( चंद्रोदय होताना ग्रहण लागलेलंच होतं. हा फोटो ग्रहण सुटत असतानाचा आहे.)

चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा बरोब्बर वर्तुळाकृती नसून लंबवर्तुळाकृती आहे. त्यामुळे चंद्र आपल्यापासून कधी थोडा जवळ असतो, तर कधी थोडा लांब. खग्रास सूर्यग्रहण होण्यासारखी पृथ्वी-चंद्र-सूर्य या त्रयीची स्थिती असेल आणि चंद्र पृथ्वीपासून लांब असेल, तर तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही आणि आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं.

eclipse_sagar.jpg

२६ डिसेम्बर २०१९ दक्षिण भारतातून दिसलेलं कंकणाकृती सूर्यग्रहण (प्रकाशचित्र ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या सागर गोखले यांच्याकडून साभार)

याउलट, चंद्र जर त्यातल्या त्यात जवळ असेल आणि तेव्हा पौर्णिमा असेल, तर तेव्हा आपल्याला ’सुपरमून’ दिसतो, म्हणजेच नेहमीपेक्षा चंद्रबिंब मोठं दिसतं.

supermoon.jpg

उगवणारा सुपरमून

चंद्र टेलिस्कोपमधून किंवा भरपूर झूम असलेल्या कॅमेर्‍यातून पाहिला, तर चंद्रावरची खोल विवरं आणि चंद्रावरचे पसरट डाग छान स्पष्ट दिसतात. हे डाग म्हणजे चंद्रावरच्या खोलगट भागातला थंड झालेला लाव्हारस आहे. पृथ्वीवर जसा अग्निजन्य खडक असतो, तसाच हा चंद्रावरचा अग्निजन्य खडक. चंद्रनिर्मितीच्या सध्या सर्वाधिक मान्यता असलेल्या सिद्धांतानुसार, अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक मोठा ( आकाराने साधारणपणे मंगळाएवढा) गोळा येऊन आदळला. त्या आघातामुळे जे द्रव्य बाहेर फेकलं गेलं, त्यापासून चंद्र तयार झाला आणि तो पृथ्वीभोवती फिरायला लागला. या आघातातून जी उष्णता निर्माण झाली होती, त्यामुळे चंद्र तेव्हा वितळलेल्या स्थितीत होता. हळूहळू तो थंड होत गेला. पृथ्वीप्रमाणेच, बाहेरचा भाग आधी थंड आणि त्यामुळे घनरूप झाला. आतला द्रवरूप लाव्हा ज्वालामुखींच्या उद्रेकातून बाहेर येत राहिला आणि पृष्ठभागावर पसरला. लाव्हाचे हे थंड झालेले समुद्र म्हणजेच आपल्याला चंद्रावर दिसणारे डाग. या डागांचा आकार कुणाला सशासारखा वाटला आणि चंद्राला ’शशांक’ हे नाव मिळालं, तर कुणाला हरणासारखा वाटला आणि चंद्र ’मृगांक’ झाला.
ही पसरट विवरं पृथ्वीवरून पाहताना ती समुद्रासारखी दिसल्यामुळे लॅटिन भाषेत त्यांना ’Mare’, म्हणजे समुद्र, असं संबोधलं गेलं.
पृथ्वीवर जशा उल्का येऊन आदळतात, तशा चंद्रावरही आदळतात. पण पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे पडणारी उल्का जळते आणि तिचा आकार कमी होतो किंवा अगदी लहान असेल तर ती जळून नष्ट होते. खूपच मोठी उल्का (अशनी) असेल, तर लोणारसारखं किंवा ॲरिझोनासारखं विवर तयार होतं. अशी मोठी उल्का (asteroid) पडल्यामुळेच डायनॉसॉर्स नष्ट झाले असं सांगितलं जातं. पण पृथ्वीवर वातावरण आहे, पाणी आहे, त्यामुळे जमिनीची धूप होते, भूपृष्ठामधे सतत बदल होत राहतात. पृथ्वीच्या पृष्ठभागातल्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे आणि इतर भूशास्त्रीय घटनांमुळे लहानसहान विवरं झाकली जातात, भरली जातात. चंद्रावर असं घडत नाही. त्यामुळे चंद्रावर उल्का आणि अशनी पडल्यामुळे जी काही लहानमोठी विवरं तयार होतात, ती तशीच राहतात. याच कारणामुळे चंद्रावर आपल्याला भरपूर विवरं दिसतात. या विवरांना नावं देण्यात आली आहेत. समुद्राप्रमाणे दिसणार्‍या पसरट विवरांना समुद्राची, तर इतर विवरांना विविध शास्त्रज्ञांची.
चंद्राचे फोटो काढल्यावर ही विवरं ओळखून त्यांना नावं देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

crators1.JPG

प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ Mare Serenitatis या पसरट विवराच्या आत असलेल्या एका विवराला साराभाई विवर असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात, ते विवर बरंच लहान असल्यामुळे या फोटोतून दिसणं शक्य नाही. सर जगदीशचंद्र बोस, प्रा. शिशिरकुमार मित्रा या अजून दोन भारतीय शास्त्रज्ञांची नावं ज्या विवरांना देण्यात आली आहेत, ती विवरं मात्र चंद्राच्या ’मागच्या’ बाजूला आहेत.

crators2.JPG

ही अजून काही विवरं.

हा चंद्र म्हणजे डोळ्यांना सहज दिसणार्‍या सौंदर्यातला आनंद.
तो चंद्र म्हणजे कुतूहलापोटी, जिज्ञासेपोटी, थोडं खोलात शिरून मिळवलेल्या ज्ञानातला आनंद.

हे दोन्ही चंद्र आनंददायी आहेत. अंधा‍र्‍या रात्री चांदण्यांनी चमचमणारं आकाश आपल्या डोळ्यांना आनंद देतंच. पण जर आपली नक्षत्रांशी, ग्रहतार्‍यांशी ओळख झाली, तर तेच आकाश पाहताना आपला आनंद द्विगुणित होतो असा माझा अनुभव आहे. इंद्रधनुष्य डोळ्यांना सुंदरच दिसतं, पण ते सात रंग का दिसतात, ते थोडा प्रयत्न करून समजून घेतलं, तर ते पाहण्यातली मजा वाढते, कारण अशा वेळी कुसुमाग्रजांचे हे दोन चंद्र एकरूप झालेले असतात.

मराठी राजभाषा दिन आणि विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर लेख!!! छान वर्णन, अभ्यासपूर्ण मांडणी आणि फोटोजसुद्धा मस्तच. आपण आकाश निरीक्षिका आहात असं वाटलं!

उद्या पुण्यात 'शून्य सावली दिवस' म्हणजे zero shadow day असणार आहे. उद्या दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी पुण्यात सूर्य बरोबर डोक्यावर येईल. एरवी आपण सूर्य माथ्यावर आला वगैरे म्हणतो, पण तो तसा बरोब्बर डोक्यावर वर्षातून फक्त दोनदा येतो. तेही फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मधल्या भूभागात. कर्कवृत्ताच्या उत्तरेला आणि मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे सूर्य डोक्यावर कधीच येत नाही.
इथे बंगळूरला २४ एप्रिलला शून्य सावली दिवस झाला. त्यावेळेस काढलेले हे दोन फोटो.

IMG-20210424-WA0003.jpg

1
IMG-20210424-WA0002.jpg
2

https://www.nasa.gov/feature/goddard/from-a-million-miles-away-nasa-came...
This animation features actual satellite images of the far side of the moon, illuminated by the sun, as it crosses between the DSCOVR spacecraft's Earth Polychromatic Imaging Camera (EPIC) and telescope, and the Earth - one million miles away.
नासाचा विडिओ आहे. ग्रहमालेतील सर्व ग्रह-उपग्रहांपेक्षा पृथ्वी किती सुरेख आहे !!

हो, प्रथमेश जाजूने काढलेला चंद्राचा हा फोटो सध्या खूप गाजतोय. प्रथमेश ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सदस्य आहे. याआधीही त्याने काढलेले अनेक सुंदर फोटो पाहिलेत.
अस्मिता, छान आहे लिंक.

<<<प्रथमेश ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा सदस्य आहे. >>>>
वावे
ह्या संस्थेच्या मीटींग्स कुठे होतात ? मी जेव्हा सदस्य होतो तेव्हां टि स्मा मंदिराच्या परिसरात दर रविवारी होत असत. एक छोटी दुर्बीण होती, प्रत्येक सदस्यास कुठलातरी टॉपिक घेऊन बोलावे लागत असे. शेवटी छान पैकी कॉफी मिळत असे.
गोखले म्हणून हवामान खात्यातले सिनिअर फोरकास्टर होतेे ते मार्गदर्शन करत असत. ते बॉब होप सारखे दिसत.
Now do not ask me anything more. वाईट वाटते म्हणून.

प्रभुदेसाई, हवामान खात्यात असलेले ज्योतिर्विद्या परिसंस्थेतले कुणी गोखले माझ्या तरी डोळ्यासमोर येत नाहीयेत. फडणीस नाही ना?किती वर्षांपूर्वीची गोष्ट आहे?
अजूनही संस्थेचं ऑफिस टि.स्मा. मधेच आहे. सामान्यतः रविवारी संध्याकाळी तिथे बरेचजण जमतात. सध्या अर्थातच नाही.

उद्या पुण्यात 'शून्य सावली दिवस' >> >बंगलोर व पुण्यात जवळजवळ तीन आठवड्यांचा फरक कसा काय? रेखावृत्तातील फरक धरला तरी इतके दिवस जास्त वाटतात. म्हणजे त्या दिवशी पुण्यात हे करायचे राहून गेले तरी दुसर्‍या दिवशी काही किमी उत्तरेकडे जाउन पकडता येइल असे दिसते.

बंगलोर आणि पुण्याच्या अक्षवृत्तातला (रेखावृत्तातला नाही) फरक सहा अंशांचा आहे. त्यामुळे मधे एवढे दिवस जातात. सूर्य परत खाली दक्षिणेकडे येतो तेव्हा परत शून्य सावली दिवस येतो, पण तेव्हा पावसाळा असतो.

मकरवृत्त ते कर्कवृत्त हा (साडेतेवीस दुणे) सत्तेचाळीस अंशांचा प्रवास करायला सूर्याला सहा महिने लागतात (परत यायला पुन्हा सहा महिने) म्हणजे एका महिन्यात साधारणपणे आठ अंश. त्यामुळे सहा अंशांसाठी तीन आठवडे.

<<त्या दिवशी पुण्यात हे करायचे राहून गेले तरी दुसर्‍या दिवशी काही किमी उत्तरेकडे जाउन पकडता येइल असे दिसते.>> बरोबर.

zsd_maha_thumb.jpg
महाराष्ट्र
zsd_kar_goa_thumb.jpg

कर्नाटक

थॅंक्स वावे

पुण्याच्या अक्षवृत्तातला (रेखावृत्तातला नाही) फरक सहा अंशांचा आहे >>> हो बरोबर Happy लिहीताना रेखावृत्त लिहीले पण डोक्यात आडव्या रेषाच होत्या Happy

फार इण्टरेस्टिंग विषय आहेत हे. एखादी गोष्ट चेक करायला वेब्/विकि वर गेलो की तेथे आणखी कुतूहल वाढत जाउन बराच वेळ आपण वाचत बसतो.

फारएण्ड Happy
दीपक, धन्यवाद!
प्रभुदेसाई, हो पाहिले हे फोटो. छानच आहेत. मला मात्र उशिरा कळलं सूर्याला खळं पडलं होतं ते. गेल्या महिन्यातही असं एकदा खळं पडलं होतं इथे. तेव्हा काढला होता मी फोटो.
DSCN8128 (3).jpg

उद्या खग्रास चंद्रग्रहण आहे, पण भारतातून ते दिसणार नाही. आपल्याकडे चंद्र उगवेपर्यंत ग्रहण संपलेलं असेल.
ग्रहण कुठून कुठून दिसेल ते इथे सविस्तर दिलेलं आहे.
https://www.timeanddate.com/eclipse/lunar/2021-may-26

वा, अतिशय आवडला हा लेख. गणेशोत्सवातल्या धाग्यांवर ही अशी एकेक रत्नं गवसताहेत.

वावे
प्रथम खूप धन्यवाद या सहजसोप्या भाषेतल्या लेखाबद्दल.
काही प्रतिसाद आणि त्यांना दिलेली उत्तरं अजून लेख रंगतदार करून गेली... त्याचबरोबर या विषयावर तुमची छान पकड आहे हे दिसलं... त्यासाठी जोपासलेली जिज्ञासू वृत्ती कौतुकास्पद आहे.
सूत्रांतर आणि हा लेख कायम स्मरणात राहील...तुमच्या मॅडनेसला सलाम...

या धाग्यात पहिल्या पानावर माझ्या एका प्रतिसादात चिक्सलब (Chicxulub Impact)चा उल्लेख आहे. हा उल्कापात किती भीषण होता व त्याचे काय परिणाम झाले असावेत हे दर्शवणारा व्हिडीओ.
https://www.youtube.com/watch?v=UvjSXBqQe4A

नाव वाचून वाटलेलं की पृथ्वीवरचा एक आणि आकाशातला एक असे काहीतरी लेखन असेल. पण वैज्ञानिक माहितीपर असूनही वाचायला मजा आली.

सुंदर आणि सोपा लेख वावे, त्यामुळे खुप गोष्टी कळायला सोप्या झाल्या.
प्रतिसादही माहितीपुर्ण आहेत.

असं होत होत पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी पूर्ण चंद्र पूर्वेला उगवतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून त्या महिन्याचं नाव ठरतं. >> माझा नेहमी गोंधळ असे की चंद्र नेमका पुर्वेला उगवतो की कुठे, आता नीटच कळाले. महिन्याच्या नावाचेही लॉजिक नव्हते माहीत.

आवडला लेख.
शीर्षकावरून असे वाटले होते की कुठेतरी हिल स्टेशनला आकाशात पूर्णाकृती चंद्र उगवलेला आहे आणि त्याकडे पाठमोर्‍या पोझमधे पाहणार्‍या नवर्‍याच्या डोईवर देखील एक चंद्र उगवलेला असावा..

>>म्हणजे स्टेलारियम या आकाशनिरीक्षणासाठीच्या अ‍ॅपमधला अमावास्येच्या दिवशीचा स्क्रीनशॉट आहे. त्यात आपल्याला सूर्य आणि चंद्र आकाशात शेजारी शेजारी दिसतायत.>> इथे पौर्णिमा हवं ना?

नाही, अमावास्याच.
पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य एकमेकांच्या बरोबर विरुद्ध दिशेला असतात. (एकाच आकाशात, पण एक उगवला की दुसरा मावळतो Wink )
अमावास्येला दोघे एकदम उगवतात आणि मावळतात. (चंद्र थोडा थोडा मागे पडतो, पण फार नाही. परिणाम असा की सूर्यप्रकाशामुळे चंद्र आपल्याला दिसत नाही)

Pages