"तो आणि ती"

Submitted by अ'निरु'द्ध on 18 May, 2021 - 08:03

"तो आणि ती"

ती गहूवर्णी गोरी आणि तो उजळ सावळा.
दोघांचं लग्न जमलं ते रितसर बघण्याचा प्रोग्रॅम करुनच..
तशी आधीची कुठली ओळख वगैरे नव्हती. प्रेम विवाह वगैरेही काही नाही. खरं तर तेव्हा तशी पध्दतच नव्हती.

आणि पुढेही त्यांची विशेष ओळख झाली नाही कारण बघून पसंती ठरल्यावर लगेच साखरपुडा झाला आणि लग्न होईपर्यंत ज्या अवघ्या तीन चार वेळा भेटी झाल्या त्यातल्या दोन भेटी खरेदीच्या वेळी, म्हणजे घरच्या सगळ्या माणसांबरोबर आणि बाकी वेळीही कोणी नी कोणी होतंच सोबत..
त्यामुळे त्यात एकतर निवांतपण नव्हता आणि एकमेकांना जाणणं, एकमेकांना ओळखणं हे तर दूरच राहिलं.
अल्पपरिचयच म्हणाना..

खरं तर बघण्याच्या कार्यक्रमात तिने त्याच्याकडे हळूच एकदा नजर टाकून पाहिलं तेव्हा तिला जाणवल्या त्या त्याच्या रुंद काळ्याभोर मिशा.. आणि भेदक, मनाचा ठाव घेणारे काहीसे कठोर डोळे.
त्यामुळे का कुणास ठाऊक पण थोडं नकोच वाटलं होतं तिला, पण घरच्यांचा आग्रह आणि त्यांचं मातब्बर, तालेवार घराणं पाहून शेवटी होकार दिला गेला.

तिच्या घरापासून त्यांचं गाव (सासर) दोन तासांवर आणि तिथून तो एकटाच शहरात रहात होता व्यवसायाच्या निमित्ताने ते शहर अजून पुढे एक तासावर.

होता होता लग्नाचा दिवस उजाडला.
सगळे विधी पार पडले.
लग्नामध्ये विधींच्या निमित्ताने त्याच्याकडे अधून मधून बघताना तिला पुन्हा जाणवल्या त्याच्या रुंद काळ्याभोर मिशा.. आणि भेदक, कठोर डोळे. थोडीशी हिरमुसलीच ती परत, पण इलाज नव्हता.

लग्न सुरळीत पार पडलं. थोडीशी रडारड, गळामिठी, वगैरे झाल्यानंतर सासरचे सर्वजण तिला घेऊन सासरच्या गावी गेले.
सासरी गेल्यानंतर त्याच्या आईने आणि बहिणींनी तिचा ताबा घेतला. दोन दिवस नव्या नवरीचं कौतुक, पूजा हे सगळं आटपून तिसऱ्या दिवशी दुपारी जेवून तो आणि ती त्याच्या फियाट मधून निघाले.

अगदी दोघंच नकोत, तुमच्या बरोबर कोणीतरी सोबतीला पाठवते, निदान काही दिवस तरी असं सासूबाईंचं चाललं होतं पण स्पष्ट आणि ठाम शब्दांत तो नको म्हणाला. सासरेही त्याच्या बोलण्याला विरोध करत नव्हते.
त्याच्या त्या ठाम शब्दांनी आणि रोखठोक वागण्याने पुन्हा एकदा तिचं मन दडपून गेलं.

सासरहुन अवघ्या तासाभरात ते त्यांच्या शहरातल्या घरी, बंगल्यावर पोहोचले.

बंगल्याचा प्लॉट सात आठ गुंठ्याचा असावा. त्यात तळ अधिक एक मजली बांधकाम होतं. आजूबाजूला छान निगा राखलेला बगिचा केलेला होता. सगळी बंगल्यांचीच काॅलनी होती. प्रथमदर्शनीच तिला ते प्रसन्न घर, तो परिसर खूप आवडला. आणि घर पाहून तिच्या चेहेऱ्यावर नकळत उमटलेलं हसू पाहून त्याचाही चेहेरा हसरा झाला.

गेल्या गेल्या स्वयंपाकाच्या मावशींनी चहा पाजला.
मग त्याने तिला घरभर फिरवून आख्खं घर दाखवलं. आणि सगळ्यात शेवटी तो तिला घेऊन त्यांच्या बेडरुम मधे आला. आणि म्हणाला… ही आपली बेडरुम..
एकदम हलक्या पिस्ता रंगात रंगवलेली, पांढरे पडदे खिडक्यांना लावलेली, संयत रंगसंगतीची आणि उच्च अभिरुची दर्शवणारी प्रशस्त, प्रसन्न खोली तिला एकदम आवडलीच. आणि नकळत एक शहाराही अंगावर आला.
बेडरुमला लागूनच वाॅक-इन-वाॅर्डरोब आणि त्यातूनच ॲटॅच्ड टाॅयलेटही होतं.
ये. इकडे छान बाल्कनी आहे बघ.. बरीचशी बाग दिसते आपली इथून.

आणि हे बघ. तू गेले दोन तीन दिवस लग्नकार्यात समारंभामुळे दमली असशील. कपडे बदल. जरा वेळ छान आराम कर. मावशी स्वयंपाक करतीलच. लग्नात आणि नंतरही जड जेवणंच झालीयत. तेव्हा साधासाच बेत करायला सांगितलाय. चालेल ना..? तीने मान डोलावली.

मी पण येतो जरा बाकीची हालहवाल बघून. थोडा वेळ लागेल. तोपर्यंत हो निवांत. असं म्हणून तो गेलासुद्धा.
ती ही थोडी निवांत झाली.

तासा दीड तासांनी मावशींची हाक आली, चला जेवायला म्हणून. ती खाली गेली तर ताटं वाढलेलीच होती.
मावशी म्हणाल्या, ताई, तुम्ही इथे नवीन आहात म्हणून आज साहेबांनी मला जेवणं होईपर्यंत थांबायला सांगितलंय.. वाढायला, आटपायला, वगैरे.
पण उद्यापासून मला रोज एवढ्या उशिरापर्यंत नाही थांबता येणार हां. पण काळजी करु नका. मी उद्या सकाळी सगळं स्वयंपाकघर तुम्हाला दाखवून ठेवते. म्हणजे तुमचं कधी काही अडायला नको.

जेवणं झाली, मावशी सर्व आवरुन गेल्या. तिचे पाय मात्र खालीच रेंगाळत राहिले.. तिची वर जायची अनिच्छा, टाळाटाळ तो पहात होताच.
चला.. जायचं नं वरती.. असं म्हटल्यावर ती मुकाटपणे मान हलवून त्याच्याबरोबर वरच्या मजल्यावर गेली. बेडरुमच्या जस्ट आधी मगाशी दाखवताना राहिलेली वरच्या मजल्यावरच्या खोल्यांसाठी असलेली एक चहाकाॅफीची छोटीशी पँट्री होती, ती त्याने दाखवली.
पँट्री बघून ती बेडरुममधे गेली आणि बेडच्या एका कडेवर कशीतरी टेकून, मान खाली घालून बसली.
तिची मान खाली असतानाच तो कधी कपडे बदलून तलम सदरा, लेंगा घालून तिच्याजवळ आला ते तिला कळलं पण नाही.
हे बघ, तू पण आत जाऊन काहीतरी सुटसुटीत, आरामशीर सुती कपडे घालून ये. बरं पडेल झोपताना ते.
कशीनुशी मान डोलावत ती आत जाऊन कपडे बदलून आली.
बाहेर आल्यावर पाहिलं तर तो तिथे नव्हताच.

बेड वर जाऊन ती बसते न बसते तेवढ्यात तो हातात ट्रे घेऊन दारातून आत आला.
अगं जाता जाता मावशींना जायफळ घातलेली काॅफी थर्मास भरुन बनवायला सांगितली होती. घे ओतुन तुला हवी तेवढी. बरं वाटेल.

बोलता बोलता त्याने भगभगीत पांढऱ्या प्रकाशाची ट्युबलाईट बंद करुन मंद प्रकाशाचा दिवा लावला आणि चवीने काॅफी प्यायला लागला.
पण झकास चव असली तरी तिची मात्र सर्कशीतल्या वाघ बकरी सहभोजनासारखी अवस्था झाली होती.
दोन दिवस लग्नाच्या मंडळींच्या गडबड गोंधळात सरले होते. पण आता कसला गोंधळही नव्हता अन् कोणी माणसंही नव्हती.

काॅफी पिऊन झाल्यावर तो तिच्यावर डोळे रोखून म्हणाला, मला जरा एका बाबतीत तुझ्याशी बोलायचं होतं. आणि मी सांगतोय ते मानण्याची जबरदस्ती नाही. मनापासून पटलं तर सांग मला.

हे बघ. लग्न केलेले बरेचजणं मित्रामित्रांच्या गप्पा, फुशारक्या, नवीन रुजू घातलेल्या परंपरा, खोटा पुरुषार्थ आणि चुकीच्या संकल्पना यावर विसंबून पहिल्या रात्रीच एकत्र येतात. आधीची ओळख असली नसली तरीही.
आणि होतं असं की दुसऱ्या दिवसापासून ते एका स्त्रीशी संसार करतात…. आयुष्यभर..
आणि ज्या मुलीशी त्यांच लग्न झालेलं असतं, जीची त्यांना पुरेशी ओळख झालेली नसते, जिच्या आवडीनिवडींची त्यांना कसलीही कल्पना नसते, अशा गोड मुलीबरोबर ते थोडासुध्दा काळ एकत्र घालवत नाहीत.
हां.. कधीकधी सुरुवातीला पूजा, देवदर्शनात दोन तीन दिवस जातात. पण ते तेवढंच.
आता खरं तर तुझी माझी, आपली काही विशेष ओळख नाहीये. तर थांबायचं का काही दिवस आपण जरा..?
मला आवडेल काही दिवस एका मुलीबरोबर असा संसार करायला.

हे ऐकल्यावर तिने तर पहिल्यांदा सुटकेचा निश्वासच टाकला. उरावरचं प्रचंड ओझं उतरल्यावर आपसूकच तिचा टेन्स चेहेरा नकळत थोडा हसरा झाला.
ह्या भेदक, कठोर डोळ्यांच्या, पोलिसी मिशांच्या नवऱ्याकडून तिने ही अपेक्षाही केली नव्हती. आपोआपच तिला फार हलकं हलकं वाटायला लागलं.

तिची झालेली सुटका, चेहेऱ्यावरचा बदल त्याला खरं तर कळत होता. पण मधेच तो गंभीर चेहेऱ्याने म्हणाला.. म्हणजे तुला चालणार असेल तरच हं..
नाहीतर आपण आत्ताऽऽच..

तिच्या चेहेऱ्यावरचे भाव लगेच बदलले. डोळे विस्फारले..
घाईघाईनेच ती म्हणाली…
नाही.. नाही.. ठीक आहे तुम्ही म्हणता ते.
आधी बोललात तसंच असू दे.

त्याने कसबसं चेहेऱ्यावरचं हसू लपवलं आणि म्हणाला..
मग मुली.. मस्तपैकी झोपून जा. नाहीतरी दोन दिवस लग्नाची गडबड, प्रवास होताच. आणि आधीचेही आठ पंधरा दिवस गडबडीतच गेले असतील. जीव दमतोच. चल कर आराम. झोप शांतपणे. नवीन जागी झोप लागेल नं ? आणि काही वाटलंच, लागलं सवरलं तर आहेच मी बाजूला..
झोपायच्या आधी मी नेहमी बाल्कनीतून जरा वेळ आपली बाग बघत बसतो. अंधारातच..
आख्ख्या दिवसाची गडबड, कोलाहल वितळत जातो हळूहळू. मग झोपही मस्त लागते.
तर मी येतोच जरा वेळात. पण तू वाट नको बघूस मी यायची. झोप निवांत.
तो आला तेव्हा ती खरंच गाढ झोपलेली होती.
सकाळी तिला जाग आली तेव्हा तो शेजारी नव्हताच.
रात्री बाल्कनीतून कधी आत आला कळलंच नव्हतं. आणि झोपही अशी लागलेली की एकदाही जागही आली नव्हती.
खरं तर आपण वेगळ्या ठिकाणी आहोत हेच तिला जरा वेळाने लक्षात आलं. एक नवा अनपेक्षित आख्खा दिवस तिच्यापुढे उभा होता, तोही सर्वस्वी नवीन ठिकाणी..
मग मात्र ती पटकन उठलीच.
टाॅयलेटमधे जाऊन पटकन ब्रश केलं आणि पलंगावर येऊन बसते नं बसते तेवढ्यात तो हातात चहाचा ट्रे घेऊन आलाच.
"चहा घे मुली" म्हणत त्याने चहाचा एक कप तिच्या हातात दिला.
तिला अगदी कसनुसं झालं. विलक्षण अपराधी भावनेनं ती म्हणाली… अहो हे काय..?
हे काय म्हणजेऽऽ.. चहाऽऽ.
तो ही माझ्या हातचा स्पेशल. बिस्किटंही आहेत हवी तर.
अहो तसं नाही..
अगं तसंच आहे. रोजचा पहिला चहा करायची माझी कित्येक वर्षांची सवय आहे. म्हणजे इथे एकटा रहात असल्यापासून. आणि लग्न झालं म्हणून मी काही ती मोडणार नाही. यापुढेही रोज असंच चालू रहाणार.
हं, चहात तुला काय कमी जास्त हवं ते मला पिऊन झाल्यावर सांग. पण तसा चहा मात्र उद्यापासून मिळेल.
चल, घे लवकर. गार होईल.

आणि तिची रोजची सकाळची सुरुवात अशीच होत गेली.
कधी.. चहा घे मुली..
कधी.. ए पोरी, चहा घे..
आणि कधी तर.. बालिके, तुझा चहा.. म्हणत ट्रे मधून तो अगदी तिच्या हातात चहाचा कप द्यायचा.

रोज रात्री तो तिच्या शेजारीच असायचा पण अंतर राखून.

घरातही ती हळूहळू रुळत होती. मावशी होत्याच पण तिने आता बागेतही इंटरेस्ट घेतला होता. माळीकाका होतेच मदतीला.
त्या पंधरवड्यात दोन तीन वेळा त्याच्या वेगवेगळ्या विवाहित मित्रांच्या घरी ते जाऊन आले. त्यांच्या घरात त्याचं वागणं आणखीनच वेगळं असायचं, उत्फुल्ल..

रात्रीची जेवणं झाल्यावर त्याच्याशी बोलताना कधी ती त्याला तिच्या आधीच्या आठवणी सांगायला लागली ते तिलाही कळलंच नाही. आणि झोपायच्या आधी तीही आता त्याच्यासोबत बाल्कनीत जात होती. त्यांची बाग बघत. निःशब्द.

एकदा बुलेट वरून तो तिला थोड्या दूरच्या टेकडीवर सूर्यास्त दाखवायला घेऊन गेला होता. तीची सुळसुळीत साडी बघून तो काळजीने म्हणाला.. सवय आहे ना..? धरुन बस नीट. पडशील नाही तर.
तसं खांद्यावर हात ठेवून पहिल्यांदाच बसताना थोडी तारांबळच उडाली तिची. पण तो सूर्यास्त आणि येता जातानाचा परतीचा प्रवास तिच्या कायमच लक्षात राहिल असा झाला.

पुढच्या आठवड्यात दोन चित्रपटही त्यांनी पाहिले. त्यातला पहिला एक छान कौटुंबिक चित्रपट होता पण दुसरा मात्र कुठल्यातरी एका जुन्या हवेलीत पांढऱ्या कपड्यात दिवे घेउन फिरणाऱ्या बाईचा हाँटेड चित्रपट होता.
त्या रात्री मात्र भिती वाटुन ती त्याच्या बाजूला सरकूनच झोपली होती.

पण असं सगळं होत असताना कोणाच्या चुका झाल्या.. मग त्याच्या ऑफिस मधले असोत किंवा नियम मोडणारे रस्त्यावरचे कुणी..
की मग मात्र फोनवरचे किंवा प्रत्यक्षातले त्याचे शब्द विलक्षण कठोर होत. डोळे अजूनच भेदक. आणि चेहेरा कोणी त्याच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही असं वाटणारा, एकदम दगडी.
कुठल्याही विचारात गढून गेला असला की असंच व्हायचं आणि आत्तापर्यंत कितीही चांगला वागला असला तरी त्या डोळ्यांची तिला भितीच वाटत रहायची.

पण तरीही हल्ली तो सोबत असला की तिला बरं वाटायचं. त्याची संगत तिला आवडायला लागली होती. आधीचा परकेपणा जाणवेनासा झाला होता.

त्याच्या भेदक नजरेमुळे, जाड मिशांमुळे कुठेतरी त्याला न स्विकारणारं तिचं मन आता तिलाच दगा देऊ लागलं होतं. ह्रदय बेईमान होऊ लागलं होतं. त्याच्या सान्निध्यात तिच्या अंगावर उठणारे रोमांच आता त्यालाच फितुर झाले होते. तिचा गंध आता तिच्या मनातल्या भावनांची चुगली करु लागला होता.
आणि वाईट गोष्ट ही होती की बहुतेक हे सारं सारं त्याला कळत होतं.

एके दिवशी तो तिला म्हणाला : काय हो..?
किती दिवस असं मुलगी मुलगी म्हणून घरात फिरणार.. बाई म्हणून काही महत्वाची जबाबदारी घ्या की आता..
आणि हे बोलताना त्याच्या मिशा मिशातून एक लबाड, चावट हसू झिरपत होतं. आणि हे ऐकून तीची धडधड मात्र विलक्षण वाढली होती.

पुढे दोन दिवसांनीच, बालिकेऽऽऽ. चऽऽहा.. असं म्हणून चहा देऊन एकत्र चहा पितापिताच तो तिला म्हणाला…
अगं ऐक.. उद्या संध्याकाळी ५ किलो गुलाब पाकळ्या मागवतोय…
म्हटलं तुझ्या सोईचा दिवस आहे का ते तुला विचारुया… नसेल तर तू म्हणशील तेव्हा..
मग चालेल नं उद्या..?
विचारताना त्याची नजर वरकरणी भयंकर निरागस होती..
पण आटोकाट लपवलेले हसू त्याच्या ओठांच्या कोपऱ्यातून झिरपतच होतं.
संपूर्ण शरीर थरथरत असताना तिच्याही नकळत तिने कधी होकारार्थी मान हलवली ते तिचं तिलाही कळलं नाही.
आता त्याचे डोळेही हसले आणि मग त्याचं झिरपणारं हसू चेहेऱ्यावरुन निथळायला लागलं..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो तिला म्हणाला..
अगं, ऐक ना. एक कबुली द्यायची होती.
त्या गुलाबाच्या पाकळ्या फक्त परवानगी पुरत्याच होत्या बरं का.. ते पाकळ्या वगैरे फार फिल्मी वाटतं ना.. म्हणून त्या फक्त कॅन्सल केल्यायत. बाकी बेतात मात्र माझ्याकडून तरी काहीच बदल नाहीये.

त्या रात्री त्यांच्या बाल्कनीला त्या दोघांची अनुपस्थिती विशेष जाणवली.

आजही, ती या घरात आली होती तेव्हाच्या पहिल्या रात्री सारखीच अवघडून पलंगावर बसली होती. आजही उरात धडधड होत होती.
पण आज तो तेवढा परका नव्हता. नकोसा तर अजिबातच नव्हता. पण त्याच्या नजरेला नजर मात्र आजही देववत नव्हती. एरवी एकाच पलंगावर पण तरीही अंतर राखून असणारा तो आता अगदीच जवळ होता. आणि ते डोळेही तिच्या चेहेऱ्याच्या अगदी जवळ.

पण त्याच्या चेहेऱ्याला उग्रपणा देणाऱ्या, भितीदायक मिशा आता अचानक मृदु, फुलपाखरी झाल्या होत्या. गुदगुल्या करणाऱ्या.
ती स्वतःची उरली नव्हती.

अन् तेव्हांच तो अचानक म्हणाला…
बघायला आल्यापासूनच तू मला काहीशी नाराज वाटत होतीस. म्हणजे तूझा पूर्ण नकार नाही… पण अगदी आवर्जून, मनापासून होकार असाही नाही. काहीतरी किंतु असल्यासारखी..
त्यामुळे तुझा तो किंतु नाहिसा होईपर्यंत मी थांबायचं असं ठरवलं होतं. आता तो गेलाय असं मला वाटतं.
अर्थात काही दिवस मला तुझ्यासारख्या गोड मुलीबरोबर असे काढायचे होतेच.
पण अजुनही तुझ्या मनात काही किंतु असेल तर मी इथेच थांबू शकतो.
तिने त्याच्या तोंडावर हात ठेऊन त्याचं बोलणं थांबवलं आणि त्याला जवळ ओढून घेतलं.

आता मात्र तो ही त्याचा उरला नव्हता.

तीला सकाळी जरा उशिराच जाग आली. आजची सकाळ वेगळीच होती. एकाच वेळी उत्साही आणि त्याचवेळेला आळसावलेली. तिने हात ताणून एक मोठ्ठा आळस (अंगडाई शब्दाचं महत्व इथे कळतं) देत शेजारी पाहिलं. तो नेहमीप्रमाणेच शेजारी नव्हता.

एवढ्यात दारात पावलं वाजली आणि हातात चहाचा ट्रे घेऊन तो दारातून प्रवेशला.

बाईसाहेबऽऽ… चहाऽऽ…

त्या बदललेल्या संबोधनाने पुन्हा एकदा लख्खपणे आदली रात्र तिच्या डोळ्यासमोरुन गेली.
एकाच वेळी धसमुसळा आणि नंतर लगेच सांभाळून घेणारा तो..
कधी राकट तर कधी हळूवार स्पर्श करणारा तो..
कधी समंजसपणे तर कधी लहान मुलासारखा हट्टीपणाने वागणारा तो..
कधी हक्क गाजवणारा तर कधी आर्जवं करणारा तो..

अनेक रुपं..

चहाचा ट्रे साईड टेबलवर ठेउन तिच्याकडे वळलेल्या त्याच्या चेहेऱ्यावर तिची नजर स्थिरावली.
तिच्याशी सलगी झालेल्या त्या मिशा आता तिच्या नजरेला खुपत नव्हत्या.
त्याच्या नजरेला तिची नजर भिडली आणि तिथेच अडकली.
एरवी भेदक वाटणारे ते डोळे आता अजिबातच तसे वाटत नव्हते.
त्या प्रेमळ, आपुलकीने, अथांग मायेने भरलेल्या डोळ्यांकडे पहाता पहाता ती त्या नजरेत हरवून गेली.
आणि त्या दिवसाचा पहिला चहा मात्र थंडगार होऊन तसाच पडून राहिला..

** : का म आ क..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप गोड, रोमॅण्टिक कथा आहे
एकदम मिश्या म्हटल्यावर या शॉर्ट फिल्म मध्ये मी अतुल कुलकर्णी किंवा अनिल कपूर कास्ट करून टाकला. Happy
कथा वाचक कोण कोण कास्ट करतील हेही (धागालेखकाची काही हरकत नसल्यास) तुमच्या अभिप्रायाबरोबर सांगा.

कथा आवडली.
मिश्यांमुळे नायक - चंद्रकांत/सूर्यकांत
नायिका-क्रीती सनोन
कल्पनाच तर करायचीये. Happy

खूपच छान !! मी-अनु ला अतुल कुलकर्णी बाबत अनुमोदन !! . दुसरा पर्याय कुलदीप पवार आला डोळ्यासमोर . 'ती' साठी मात्र विचार करावा लागेल.

कथा छान लिहिली आहे.
पण सध्याच्या जमान्याचा मापदंड लावता हे नवरोबा कम आजोबा प्रकरण एकंदर फार बोरींग व्यक्ती वाटले.

अनु Lol
मला 'राझी' सिनेमा आठवला होता.

हो मिलिंद गुणाजी पण
मनोज वाजपेयी चालेल का?
किंवा आताचा म्हटलं तर सोनू सूद विकी कौशल वगैरे

शीर्षक वाचून आधी वाटले की टारझनचा पुढचा भाग आहे की काय?
खूप छान आहे कथा. हल्लीच्या मायबोलीवरील कथांपेक्षा वेगळी...
मराठी मिल्स बून्स Happy

किती मस्त सुरवात .. संसाराची....मिश्या म्हटल्यावर.. माझा नवरा आला डोळ्यासमोर..
नंतर ..मला रोजा चा अरविंद स्वामी आला डोळ्यसमोर.. मधू अशीच मनात नसताना लग्न केलेली..

मस्त रोमँटिक कथा.

श्रवू, मलाही रोजाचा अरविंद स्वामी आणि मधु आठवले.

Pages