आईच तर आहे..!

Submitted by पाचपाटील on 6 May, 2021 - 15:22

कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि
पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते,
असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..!
आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..!

मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे...
एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी..
विचारपूस करावी सगळ्यांची...
स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे..
पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी,.. काळजी करू नकोस.. होईल माझं सगळं व्यवस्थित...!

एवढंही खूप असतं आयांना..!!

फोन केलेलं तुला आवडत नाही, म्हणून मग तिला माहित असलेल्या तुझ्या जुन्या मित्रांना फोन करत राहते ती..
विचारत राहते तुझ्याबद्दल.. ते तरी काय सांगणार..!
आणि ती तरी असे इकडं तिकडं फोन करत राहण्याशिवाय, काळजी करण्याशिवाय दुसरं काय करू शकते सांग बरं..

हे असं वर्षानुवर्षे दूर दूर राहणं, फोनला उत्तरं न देणं,
स्वतःबद्दल काहीही न कळू देणं, हे जरा जास्ती होतंय,
असं वाटत नाही का तुला ?

वयही झालंय आता तिचं आणि ह्या वयात कुणाच्या जीवाला असा घोर लावू नये..
शिवाय कधीतरी एके दिवशी हे फोन येणंही बंद होऊन जाईल कायमचं, हे ही लक्षात असू दे..

स्वतःवर नाराज असण्याचा एक काळ असतो.. त्या दिवसांत आपण जन्मदात्यांशी कसं वागतो, हे जाणवत नाही..
नंतर जेव्हा जाणवतं, तेव्हा मग आयुष्यभर स्वत:ला कुरतडत
राहण्याशिवाय हातात काही राहिलेलं नसतं,
हे माझ्याहून चांगलं कुणाला माहीत असणार...!

असो.. चल ऊठ आता..खूप झालं.. तोंड धुवून घे...
आणि कॉल कर तिला... शब्द सापडतात रे आपोआप... आणि नाही सापडले तरी काय बिघडणार आहे..!!
आईच तर आहे..!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान च.
आईला फोन नाही केला असा एकही दिवस नाही लग्नानंतर. Happy

खरंच. .
मला वाटते की मुलांना हा प्राॅब्लेम जास्त येतो.
मुली कुठल्याही वयात आईशी कितीही वेळ फोनवर बोलू शकतात. .

पाचपाटील
कमी शब्दात केवढे सामर्थ्य असते ते या कथेवरून समजते.
मला त्या माकडाची आठवण झाली. आईचे काळीज सुसरीला देण्यासाठी निघालेल्या. त्याला ठेच लागते तर आईला काळजी.

@ केया , @ ए_गौरी, @ VB..प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे
प्रभुदेसाई, धन्यवाद _/\_

पण जर एखाद्याला घरुन फ़ोनच येत नसतील तर...
एखद्याची आई काळजी न करणारी असेल तर..>>> असही असत पण त्याबद्दल कोणी काही बोलत नाही.