वसतिगृहातल्या गमतीजमती

Submitted by वावे on 3 May, 2021 - 07:52

वसतिगृहात रहात असताना चांगले, वाईट, मजेशीर असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. मलाही आले. त्यापैकी दोन गमतीशीर अनुभव लिहीत आहे. ( नावं बदलली आहेत)

इंजिनीअरिंगची चार वर्षं मी पुण्यात ’कॉट बेसिस’वर रहात होते. पहिली दोन वर्षं एका ठिकाणी आणि पुढची दोन वर्षं दुसर्‍या ठिकाणी.
पहिली दोन वर्षं जिथे रहात होते तिथे आम्ही पाच खोल्यांमध्ये मिळून एकूण पंधरा मुली रहायचो. माझी एक रूममेट दीपालीताई बेळगावची होती, तर दुसरी गीता नागपूरची. गीता माझ्याच वर्गात होती, तर दीपालीताई आमच्याहून चारएक वर्षांनी मोठी. ती एमबीए करत होती. ती होती मराठीच, पण तिला इंग्लिशमध्ये बोलण्याची जास्त सवय होती. अर्थात तिला मराठी कळायचं, त्यामुळे आमच्या गप्पा द्वैभाषिक असायच्या. घरमालक काका-काकू खालच्या मजल्यावर रहायचे. तेव्हा तुरळक प्रमाणात मोबाईलचा वापर सुरु झालेला असला, तरी आम्हा पंधरा जणींपैकी कुणाकडेच मोबाईल नव्हता. त्यामुळे होस्टेलवर असलेल्या एका लॅंडलाईनवर सगळ्यांचे फोन यायचे.
असाच एकदा दुपारी फोन वाजला. जिने फोन घेतला, तिने "दीपालीदीदी..." अशी हाक मारली. दीपालीताई तर नव्हती, म्हणून काही निरोप असेल तर घ्यावा, म्हणून मी जाऊन फोन घेतला.
"हॅलो?"
"हॅलो दीपाली?"
"नाही मी तिची रूममेट बोलतेय, काही निरोप आहे का?"
"तिला सांगा नगरहून तिच्या वकील मित्राचा फोन होता."
"बरं, चालेल"
"मी माझा नंबर देतो. तिला मला फोन करायला सांगा"
मी नंबर लिहून घेतला. दीपालीताई रात्री नऊच्या सुमारास यायची. रूमवर तिच्याकडे कम्प्यूटर नसल्यामुळे त्यांच्या ज्या प्रेझेंटेशनच्या असाईनमेंट्स वगैरे असायच्या, त्या ती कॉलेजमध्येच पूर्ण करून यायची. ती आल्यावर मी तिला हा निरोप सांगितला आणि फोन नंबरही दिला, पण ती म्हणाली,
"I don't have any friend in Nagar"
मी म्हटलं, फोन करून तर बघ. कदाचित कुणी शिफ्ट झालं असेल नगरला. त्यावर ती म्हणाली,
" I don't have any lawyer friend either.. चुकून केला असेल फोन कुणीतरी."

मग मीही सोडून दिलं. यानंतर काही महिने उलटले. मधल्या काळात मी या फोनबद्दल विसरूनही गेले. नंतर परत एकदा संध्याकाळी दीपालीताईसाठी फोन आला आणि मीच तो घेतला. एसटीडीचीच बेल वाजली होती.

"हॅलो?"
"हॅलो दीपाली?"
"नाही मी तिची रूममेट बोलतेय"
"दीपाली कुठे गेली आहे?"
" कॉलेजला"
"अजून आली नाही?"
"नाही ती नऊपर्यंत येईल. आपण कोण बोलताय?"
" रोज एवढ्या उशिरा येते ती कॉलेजमधून?"
"हो. आपण कोण बोलताय?"
इथे माझ्या डोक्यात शंकेची घंटा किणकिणायला लागली. दीपालीताई म्हणाली होती की तिच्या आईबाबांनी एकदोन ’स्थळं’ बघितली आहेत. त्यांच्यापैकी कुणाचा फोन तर नसेल?
" पण ती इतका वेळ कॉलेजमधे काय करते?"
" नाही मला माहिती. तुम्ही बेळगावहून बोलताय का?"
इथे पलीकडचा माणूस एकदम ॲलर्ट झाला.
"बेळगाव? का?"
" नाही, असंच. ठीक आहे, तुमचा काही निरोप आहे का?"
" नाही पण तुम्हाला बेळगावहून फोन आहे असं का वाटलं?"
" नाही, असं काही नाही, एसटीडी बेल वाजली म्हणून वाटलं. तुमचा काही निरोप आहे का?"
" नाही नाही,खरं सांगा. तिचा बेळगावला कुणी मित्र आहे का? "

अरेच्चा! मी काहीच बोलले नाही. डोक्यातल्या घंटेची घणघण जोरात ऐकू यायला लागली.
" लाजू नका. तुम्हाला जे माहिती असेल ते सांगा. तिला कुणाचे फोन येतात का बेळगावहून?"
हे शब्द ऐकून तर मला काय बोलावं ते कळेचना. शेवटी मी म्हटलं,
" नाही, मला काही माहिती नाही. ती बेळगावची आहे म्हणून मला वाटलं की बेळगावचा फोन आहे. "
" ती बेळगावची आहे असं सांगितलंय तिने? ती नगरची आहे"
"अहो नाही, ती बेळगावची आहे. दीपाली कदमबद्दल बोलताय ना तुम्ही?"
" कदम नाही. दीपाली राणे. "
"राणे? इथे दीपाली राणे नाहीये कुणी"
"असं कसं? मला तिने हाच नंबर दिला होता. मी आधीपण तिला फोन केला होता या नंबरवर"
"एक मिनिट"
मी तिथून जाणार्‍या एका मुलीला थांबवलं. ती माझ्याआधी एक वर्षापासून तिथे रहात होती. मी तिला विचारलं, "दीपाली राणे कौन है?"
"वो सामनेवाले होस्टेल में रहती है।"
" उसके लिये फोन है।"
"अच्छा रुक एक मिनट" असं म्हणून ती बाहेर गेली आणि तिने समोरच्या होस्टेलमधल्या एका मुलीला बोलावून आणलं. आदल्या वर्षी म्हणे समोरच्या या होस्टेलला लॅंडलाईन नव्हता, म्हणून तिथल्या मुलींचे फोनही आमच्याच नंबरवर यायचे. आता हे मला काय माहिती? दीपालीताई आल्यावर मी तिला हा किस्सा सांगितला आणि आम्ही भरपूर हसलो. मग मला तो आधी आलेला ’ नगरच्या वकील मित्राचा’ फोनही आठवला. तो हाच मुलगा असणार आणि त्याने त्याचा फोननंबर देऊनही त्या दीपाली राणेने त्याला फोन न केल्यामुळे तो अस्वस्थ झाला असणार. बिचारा! त्याच्या त्या ”लाजू नका" या वाक्यावर तर आम्ही भयंकर हसलो.

दुसरा किस्सा घडला तेव्हा मी होस्टेल बदललं होतं. मधल्या काळात मी एक दुचाकी घेतली होती. इथेही माझी एक रूममेट माझ्याच वर्गात होती, तर दुसरी रूममेट आमच्याच कॉलेजला, पण दुसर्‍या डिपार्टमेंटला होती. तिचं नाव होतं शालिनी. तिच्याकडेही गाडी होती आणि मोबाईलही होता. तर एकदा काय झालं, प्रिपरेशन लीव्ह चालू होती आणि मी काही झेरॉक्स काढण्यासाठी गाडीवरून कॉलेजजवळच्या एका झेरॉक्सच्या दुकानात गेले होते. माझं काम तर झालं, पण माझ्या गाडीची किल्ली कुठेतरी पडली, ती सापडेचना. खूप शोधाशोध केली, पण किल्ली मिळाली नाही. तेवढ्यात तिथे देशमुख सर आले. देशमुख सर त्याच वर्षी आमच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले होते. त्यांना शिकवण्याचा अनुभव नसला, तरी ते चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे त्यांच्याविषयी आमचं मत तसं बरं होतं. त्यांनी काय झालं वगैरे चौकशी केली, पण त्यांनाही काही करता आलं नाही. लॉक ॲंड की मेकरचं दुकान तिथून थोडं लांब होतं. म्हणून मी जवळच्या कॉईनबॉक्सवरून शालिनीला मोबाईलवर फोन केला. तीही लगेच आली आणि आम्ही तिच्या गाडीवरून किल्लीवाल्याकडे जाणार, तेवढ्यात झेरॉक्स दुकानदाराने त्याच्याकडची एक किल्ली देऊन म्हटलं, ही लागतेय का बघा. आणि आश्चर्य म्हणजे त्या किल्लीने चक्क हॅंडल लॉक उघडलं आणि गाडीही सुरू झाली. आनंदाने मी गाडीवर बसून शालिनीकडे पाहिलं. तिनेही तिच्या गाडीकडे जात ’ तू चल, मीपण येतेच’ असा हात हलवला. मी रूमवर पोचले, पण पंधरावीस मिनिटं झाली तरी शालिनी आली नाही. मी गच्चीवर जाऊन अजून दहा मिनिटं तिची वाट पाहिली, तरी ती आली नाही. शेवटी काळजी वाटून मी बाहेर जाऊन कॉईनबॉक्सवरून परत तिला मोबाईलवर फोन केला. ती म्हणाली, येतेच दहा मिनिटांत. मी परत रूमवर आले. पंधरावीस मिनिटांनी शालिनीही आली. आल्या आल्या ती पहिलंच वाक्य म्हणाली, " तुझी किल्ली मला बरीच महागात पडली" मी आश्चर्याने विचारलं, "काय झालं?" त्यावर तिने काय काय झालं ते सविस्तर सांगितलं. मी तिथून निघाल्यावर देशमुख सर तिच्याकडे गेले. त्यांनी तिचं नाव वगैरे विचारलं. तिच्याशी ओळख करून घेतली. त्यांनी तिला आधी कॉलेजमध्ये, बाहेर असं काही वेळा पाहिलं होतं म्हणे. ते चक्क तिला म्हणाले की तू मला आवडतेस. मी तिला जेव्हा फोन केला तेव्हा ते दोघे जवळच्या एका हॉटेलमध्ये बसलेले होते. माझा फोन आल्यावर त्यांनी तिला बजावलं की तिला (म्हणजे मला) अजिबात सांगू नको. तिथून निघतानाही त्यांनी परत परत तिला मला न सांगण्याबद्दल बजावलं होतं. कारण मी जर आमच्या वर्गात किंवा त्याहून वाईट म्हणजे एचओडींना वगैरे हे सांगितलं असतं, तर त्यांची चांगलीच पंचाईत झाली असती. शालिनीने मात्र आम्हा दोघींना हे सर्व सांगून टाकलं . तिला त्यांच्यात अजिबात रस नव्हता, पण ती तशी भिडस्त स्वभावाची असल्यामुळे ती हे थेट त्यांना सांगू शकली नव्हती. तिचं डिपार्टमेंट जरी वेगळं असलं, तरी शेवटी आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. देशमुख सरांनी तिचा मोबाईल नंबर घेतला होताच. ते तिला अधूनमधून फोन करायचे, कॉलेजमधेही तिच्याशी बोलायचे. दोन तीन महिने हा प्रकार चालला असेल. मी आणि माझ्या दुसर्‍या रूममेटने (जी माझी क्लासमेटही होती) हे आमच्या वर्गात कुणालाच सांगितलं नाही. शालिनीला तसा देशमुख सरांचा काही त्रास नव्हता, पण तिलाही हे थांबलं तर हवंच होतं. माझा अंदाज असा होता की त्यांनी तिला फोन केला आणि मी तो घेतला तर हे थांबेल. पण तशी संधी येत नव्हती. शेवटी एकदा तशी संधी आली. पण मी फोन उचलताच त्यांनी फोन कट केला. मी लगेच परत त्यांना फोन केला आणि अगदी नॉर्मल आवाजात म्हटलं की सर, शालिनी जरा बाहेर गेली आहे. काही निरोप आहे का? त्यांनी थातुरमातुर काहीतरी निरोप सांगितला आणि फोन ठेवला. परत त्यांनी कधीही शालिनीला फोन केला नाही आणि कॉलेजमध्येही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. नंतर कॉलेजमध्येही आम्ही त्यांच्याशी आणि ते आमच्याशी, जणू काही झालंच नाही अशा प्रकारे वागत राहिलो. पुढच्या वर्षी त्यांचं लग्नही झालं आणि हा सगळा विषयच संपला!

तुमचेही असे काही हलकेफुलके अनुभव असतील तर जरूर लिहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हलकाफुलका मस्त धागा. तुमचे अनुभव खरे तरी आहेत.
आम्ही काय लिहावं ?

जिवंत असतानाची गोष्ट. आम्ही मुलांच्या हॉस्टेलवर रहायचो. मुली सारख्या मोबाईल नंबर मागायच्या. आम्ही मुलं एकमेकांना सांभाळून घ्यायचो. चुकूनही कुणा मुलीला फोन नंबर समजता कामा नये यासाठी विशेष प्रशिक्षण चालायचं.
तरीही काही भोळी मुलं फसायचीच. स्मार्ट फोन नव्हते आले. पुढचं लिहीलं असतं. पण शेवटी मुलांचं शील ते. मुलींनी छेड काढली तरी आपलीच बदनामी होणार. जाऊच द्या.

मस्त धागा
आहेत किस्से लिहिते सावकाश
तुझे किस्से पण भारी आहेत Happy

किल्ली येऊदे किस्से! पा. आ., प्रभुदेसाई, तुमचेही किस्से असतील तर येऊद्या!

मेस हा एक स्वतंत्र विषय आहे. मी पहिली दोन वर्षं जिथे राहिले, तिथल्या काकू रात्रीची मेसही चालवायच्या. दुपारी कॉलेजच्या जवळच्या एका मेसमध्ये जायचो. पी.एल. मध्ये मात्र दोन्ही वेळी काकूंकडेच. एकदा काकू तीन चार दिवस कुठेतरी गावाला गेल्या होत्या म्हणून मेस बंद होती. पी.एल. असल्यामुळे रोज दोन वेळा उठून बाहेर जेवायला जायचा कंटाळा आला. तेव्हा पेपरमध्ये एक जाहिरात आली होती ती वाचून एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही फोन करून होम डिलिव्हरी मागवली. एक मुलगेलासा माणूस जेवण घेऊन आला. बिचारा तीनचार किलोमीटर उन्हात सायकल चालवत आला होता. जेवण चांगलं होतं म्हणून दुसऱ्या दिवशी परत फोन करून मागवलं. तोच मुलगा परत आला. मात्र यावेळी त्याने काकुळतीला येऊन विनंती केली की तुम्ही प्लीज परत होम डिलिव्हरी मागवू नका. मला उन्हातून सायकल चालवत यावं लागतं आणि मला याचे वेगळे पैसे पण देत नाहीत. आम्हालाही त्याची दया आली. आम्ही परत फोन नाही केला मग.

छान आहेत किस्से, अजून कोणाचे आले तर वाचायला आवडतील.
लिहायचे म्हटले तर मात्र अवघड आहे. विचार जरी केला लिहायचा तरी शेकडो एकाच वेळी डोक्यात भुनभुणायला लागतील Happy

मुलांच्या हॉस्टेलचे किस्से चालतील का?
>>>>>
नको मुलींच्याच हॉस्टेलचे येऊ द्या. थोडे वेगळे जग समजेल Happy

माझंं शिक्षण घरी राहूनच झालंं. त्यामुळे तसा होस्टेलचा अनुभव नाही. मग मात्र ट्रेनिंग मध्ये होस्टेलमघे रहावंं लागल.
तेव्हा बरोबर एकेक नग होते. त्यांना आम्ही चतऱेे म्हणायचो. आमच्या होस्टेल समोरून ट्रेन जात असे.त्या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांकडे बघत वेळ घालवायचा. दुसरे काहीच नव्हते. एकदा एक ट्रेन समोरून जात होती. तेव्हा हा चतऱ्या येऊन म्हणाला ," आयला , आज वन डाऊन लेट?" आणि निघून गेला. इकडे आम्ही सर्व तावातावाने वाद घालत होतो की ही गाडी कोणती होती ? अर्धा एक तास सहज निघून गेला.
जेव्हा मला त्याची ही ट्रिक समजली तेव्हा धमाल हसू आले.

नक्की का?
Rofl

अस काय करता ? तोपर्यंत न राहिलेल्या होस्टेलचा एखादा किस्सा तयार करायला तेवढाच वेळ मिळेल.

मस्त धागा . खरं तर धावायला हवा हा धागा, तर सगळे ह्या / त्या होस्टेलचे चालतील का विचारत बसलेत. वरचे किस्से मस्त.
हॉस्टेल लाईफ अनुभवता आलं नाही कधी. पण एका ट्रेनिंग साठी घर सोडून महिनाभर एका ठिकाणी रहायला लागलं होतं. पुण्यात. राहणं आणि रात्रीचं जेवण त्यांच्याकडे होतं. आम्ही दोघी होतो. संध्याकाळी साडे सात पर्यंत रूमवर पोचत असू. एकदा संध्याकाळी प्रोजेक्ट मधल्या एकीचा बड्डे होता तो अचानक सेलिब्रेट करायचं ठरलं. मग कुठे कुठे खादाडी केली भरपूर. तेव्हा रात्रीच्या जेवणाचं येणार नाही सांगायचं राहून गेलं. तरी उशीर होईल , सांगितलं नाहीये म्हणत आम्ही दोघी लवकरच ग्रुपमधून बाहेर पडलो. तशा त्या काकू थोड्या कडक स्वभावाच्या वाटायच्या. म्हणून मैत्रिणीने पोट गच्च भरलेलं असतानाही रात्रीचं पूर्ण जेवण त्यांच्याकडे केलं, अगदी हळूहळू जेवत बसली . मी मात्र पोट ठीक नाही सांगून टाळलं. त्याना संशय आलाच की बाहेर खाऊन आलोय. बिचारी जेवत तर होती तरी एकीकडे ऐकत ही तीच होती की आधी सांगायचं नाही का मग. बनवलेलं जेवण वाया नाही का जात वगैरे.

हो वर्णिता, हे एक नक्की लक्षात ठेवायला लागायचं. रात्री जेवायला नसलो तर काकूंना वेळेत ( म्हणजे त्यांची पोळ्यांची बाई यायच्या आधी) सांगायला लागायचं. नाही तर नंतर बोलणी ठरलेली. बिचारी तुझी मैत्रीण Lol
माझ्या पहिल्या होस्टेलचा हा अजून एक किस्सा. नंतर काही गंभीर घडलं नाही म्हणून मजेशीरच म्हणायचा.
तिथे एक बोअरवेल होती. काकाच सकाळ-संध्याकाळ पाण्याची मोटर लावायचे. आम्ही कधी त्यात पडायचो नाही. एकदा रात्री दहा वगैरे वाजले असतील, मोटर सुरू झाल्याचा आवाज आला. दीपालीताई झोपण्याच्या तयारीत होती. ती नऊला आली की घाईघाईने खाली जाऊन जेवायची आणि वर येऊन कपडे वगैरे बदलून थोड्या वेळातच झोपून जायची. आम्ही तिघी एकमेकींकडे बघून हसलो. 'एवढ्या रात्री काकांना मोटरचं का सुचलं?' या अर्थाने. दीपालीताई झोपून गेली. तिला चुटकीसरशी झोप लागायची. पाच मिनिटांनी काकांचा मोठा आवाज आला, "मोटर कुणी लावली? बरं, चुकून लावली तर बंद करता येत नाही? मला वर यायला लावलंत" वगैरे वगैरे. त्यांनी मोटर बंद केली आणि ते खाली परत गेले. याचा अर्थ मोटर त्यांनी लावलीच नव्हती. मग कुणी लावली? थोड्या वेळाने पलीकडच्या खोलीतली नीता आमच्या खोलीत आली आणि तिने आम्हाला विचारलं, "तुमच्यापैकी कुणी मोटर लावली का? खरं सांगा" आम्ही अर्थात नाही म्हटलं. तिने हे प्रत्येक खोलीत जाऊन विचारलं. आम्हीही बाहेर गेलोच. असं निष्पन्न झालं की कुठल्याही मुलीने हा उद्योग केला नव्हता. मग कुणी लावली मोटर? आम्ही काकांना वर बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही कुणी मोटर लावली नाही, तुम्हीही नाही, याचा अर्थ बाहेरून कुणी तरी आलं असणार. याला पार्श्वभूमी अशी होती की काही मुलींना यापूर्वी रात्री काही वेळा गच्चीवर कुणीतरी चालत असल्यासारखे आवाज आले होते. (मला किंवा रूममेटला नव्हते आले कधी) आमचं होस्टेल जिथे होतं ती जागा तीव्र उतारावर होती. (म्हणजे नवीन ड्रायव्हिंग शिकलेल्याला हाफ क्लचचा सराव करायला उत्तम रस्ता होता म्हणा ना Wink ) तर त्यामुळे आमच्या वरच्या बाजूला असलेल्या घराच्या आणि आमच्या लेव्हलमधे अर्ध्या-पाऊण मजल्याच्या उंचीइतका फरक पडायचा. तिथून एखाद्याने ठरवलंच तर आमच्या गच्चीवर येणं काही कठीण नव्हतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत इथे मुलं रहायची. नंतर काही कारणाने काका-काकूंनी हे मुलींचं होस्टेल करायचं ठरवलं. हे आम्हाला माहिती होतं. त्या मुलांपैकी कुणी आम्हाला घाबरवायला, त्रास द्यायला हा प्रकार करत असणं अशक्य नव्हतं. या सगळ्याचा विचार करून आम्ही काकांना बोलावलं आणि म्हटलं की आपण बघूया कुणी कुठे लपून बसलंय का ते. सगळ्यांनी आपापल्या खोल्यांना बाहेरून कड्या घातल्या. आम्ही घातली नाही कारण दीपालीताई आत झोपली होती. आम्ही सगळ्याजणी आणि काकांनी हातात टॉर्च आणि काठी घेऊन बागेत आणि गच्चीवर सगळीकडे फिरून बघितलं. अर्थातच कुणी सापडलं नाही. मी तर खोलीत परत आल्यानंतर कॉटखालीही वाकून बघितलं Lol कारण आमचं दार बंद केलं नव्हतं.
परत असं कधी झालं नाही. मोटर कुणी सुरू केली हे मात्र कळलं नाही.

नंतर दुसऱ्या होस्टेलवर मला भिंतीतून घोरण्याचा आवाज आला होता त्याची गंमत मी
इथे
लिहिली आहे त्यामुळे परत लिहीत नाही.

मोटर कुणी सुरू केली हे मात्र कळलं नाही. >>>>> स्पस्पेन्स क्रिएट करून काहीच झाले नाही म्हणून सोडून दिलेत Happy
बाकी एखाद्या मुलीच्या हातून चुकून झाली असेल. बंद करायचे कसे ते कळले नसेल. घाबरून बोलली नसेल..

चुकून नसेल. केली असेल तर मुद्दामच केली असेल एखाद्या मुलीने. कारण मोटरचं बटण जिथे होतं तिथे हात लावायला आमचा काही संबंध यायचा नाही. पॅसेजच्या दिव्याचं बटण दुसरीकडे होतं.
किंवा खरोखरच कुणीतरी येऊन गेलं होतं.
काकांचं स्पष्टीकरण असं होतं की संध्याकाळी त्यांनी जेव्हा मोटर लावली होती तेव्हा नंतर वीज गेली होती. मग त्यांनी वर येऊन बटण बंद केलं की नाही हे त्यांना आठवत नव्हतं. कदाचित ते बटण बंद करायला विसरले आणि कुठेतरी लूज कनेक्शन असेल त्यामुळे मोटर परत सुरू झाली नाही. नंतर रात्री उंदराने वगैरे उडी मारली असेल आणि कनेक्शन होऊन मोटर सुरू झाली. आम्हाला हे अजिबात पटलं नाही.

मी मास्टर्स करत असताना जिथे रहात होते तिथला हा किस्सा.
माझी रूममेट माझ्याच कॉलेजला होती. ती उत्तर भारतातली होती. तिची एक मामेबहीण एकदोन महिन्यांसाठी पुण्यात काही तरी कोर्स करायला आली होती आणि ती आमच्याच रूममध्ये राहिली होती. आम्ही सोडून तिथल्या बाकी सगळ्या मुली नोकरी करणाऱ्या होत्या.
तर एकदा, मी आणि ही मामेबहीण, तिला आपण पिंकी म्हणू, अशा दोघीच रूमवर होतो. मला कॉलेज नव्हतं बहुतेक. माझी रूममेट कॉलेजला गेली होती. त्या दिवशी मेसला सुट्टी असावी, कारण आम्ही दुपारी जेवायला बाहेरून आलू पराठा पार्सल आणून खाल्ला होता हे आठवतंय. खाऊन झाल्यावर माझं काही काम करायला मी बाहेर गेले. अर्ध्या पाऊण तासाने परत आले तर पिंकी दार बंद करून झोपली होती. खूप वेळा दार वाजवूनही उठली नाही. मग मी मोबाईलवरून तिच्या मोबाईलवर फोन केला. ती रिंग मला बाहेर ऐकू येत होती, पण त्या आवाजानेही ती जागी होत नव्हती. इतकंच नाही, तर तिने झोपण्यापूर्वी पीसीवर गाणी लावली असावीत, तीही मला बाहेर ऐकायला येत होती. मला खूप आश्चर्य वाटत होतं कारण एरवी रात्री ती झोपली असताना तिचा फोन व्हायब्रेट झाल्याबरोबर तिला लगेच जाग यायची. शेवटी बराच वेळ दार आणि फोन, दोन्ही वाजवून झाल्यावर मी माझ्या रूममेटला फोन केला. मग तिनेही पिंकीच्या दुसऱ्या मोबाईलवर फोन करायला सुरुवात केली. (हो, तिच्याकडे टाटा इंडिकॉमचा अजून एक फोन होता, ज्यावरून बहुतेक विशिष्ट नंबर्सना फुकट फोनची सोय असावी.) आता त्या दोन्ही फोनच्या बेल्स, माझं दार वाजवणं असं पाचदहा मिनिटं चाललं आणि अचानक दार उघडलं. पण आत जाऊन बघते तर ही तर झोपलेलीच. आमच्या त्या दाराला दोन कड्या होत्या. एक आडवी आणि दुसरी वरच्या बाजूला उभी. आम्ही आडवीच कडी लावायचो, पण पिंकी हमखास वरची कडीच लावायची नेहमी. आत्ताही ती वरचीच कडी लावून झोपली होती आणि मी दार वाजवून वाजवून ती कडी हलल्यामुळे खाली आली आणि उघडली!

आणि आश्चर्य म्हणजे एवढा सगळा गोंधळ होऊनही न उठलेली ही मुलगी मी तिच्या जवळ जाऊन खांद्याला हलकेच हात लावून हाक मारली तेव्हा चटकन उठली.

हे हे मस्त किस्सा विशाखा
.
मी engg ला असताना रूमवर राहत होते, private hostel ला.
मी राहत असलेल्या रूम वर भूत पाहिले आहे असे अनेक किस्से ऐकले होते.
माझी roomamte अत्यंत गोरी, उंच आणि कुरुळे केस कसलेली होती. एके दिवशी मध्यरात्री मला जाग आली आणि मी दचकले (actually खूप घाबरले होते ) कारण बाईसाहेब घरी बनवलेल तुपाचं काजळ रात्री लावून झोपल्या होत्या. ते खाली ओघळलं होतं. ठोसा मारल्यासारखा चेहरा, अर्धवट डोळे उघडे, केस अर्धे सरळ अर्धे कुरळे विस्कटून पसरलेले आणि तोंड उघडे!!! छोट्या बल्ब च्या प्रकाशात तिचे हे रूप बघून मला घाम फुटला होता. सकाळी तिला सांगितलं तर आधी तिच खूप हसली, परत म्हणे मोठा light लावून झोपत जाऊया आपण Lol

हाहाहा! डेंजर किस्सा किल्ली!
आमच्या शेजारच्या रूममध्ये राहणारी एक मुलगी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसली होती. पंखा चालू होता. पंख्याचा आवाज जास्त येत होता म्हणून ती (पंखा बंद करून) खुर्चीवर चढून पंख्याच्या पात्यांना हात लावून काही तरी करत होती बहुतेक. तेवढ्यात तिची रूममेट जागी झाली (पंखा बंद झाल्यामुळे असेल) आणि हिला बघून जोरात किंचाळली. तिला वाटलं ही गळफास वगैरे लावून घेतेय की काय! Uhoh

माझ्या पहिल्या होस्टेलमधली ही गंमत. तिथे पंधरा मुलींना मिळून दोन कॉमन बाथरुम्स होती.
होस्टेलला आंघोळीसाठी नंबर लावायची पद्धत म्हणजे आपली बादली बाथरूमच्या दाराबाहेर रांगेत ठेवून द्यायची. एरवी एका वेळी फार तर दोन बादल्या असायच्या दाराबाहेर. पण एकदा काही दिवस उगाचच या बाबतीत एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली होती. प्रत्येक मुलगी सकाळी उठल्या उठल्या घाईघाईने आंघोळीसाठी नंबर लावायला बादली दाराबाहेर ठेवू लागली आणि मग बाथरूमबाहेर बादल्यांची रांग. तर एकदा पहाटे तीन साडेतीन वाजता काही तरी आवाज झाला आणि आम्ही तिघी (मी, गीता, दीपालीताई) जाग्या झालो. गीता आधी जागी झाली होती आणि त्यामुळे तिला रात्रीचे किती वाजलेत याचं भान होतं. आम्ही दोघी मात्र नंतर जाग्या झालो आणि सकाळ झाली असं समजून घाईघाईने कॉटखालून आपापल्या बादल्या घेऊन आधी बाहेर गेलो Lol जवळजवळ झोपेतच, डोळे अर्धवट मिटलेले, पण आंघोळीसाठी नंबर लावायची घाई! गीता एकीकडे हसू आवरत आम्हाला सांगायला लागली की अगं अजून रात्र आहे, आत या...तेव्हा कुठे आमच्या लक्षात आलं आणि गुपचूप आत येऊन झोपलो. Rofl

Lol
आम्ही एक्झामच्या आदल्या रात्री घड्याळ पुढे करून खोटे अलार्म लाऊन मध्यरात्रीच उठवायचो पोरांना.. एक्झामच्या टेंशनमध्ये नालायक प्रकार होता जरा. पण चालायचे. कोणी चिडायचे नाही.. तर बदला घ्यायचे Proud

Lol
अभ्यासाच्या बाबतीत मी हा एक ऐकलेला प्रकार. त्या मुलीला मी ओळखत नाही. तिच्या रूममेटने नंतर सांगितलेला किस्सा. ती मुलगी रात्री उशिरा/पहाटे लवकर उठून अभ्यास करत बसायची. पण आपण अभ्यास करतोय हे तिला दाखवायचं नसायचं. म्हणजे रूममेट झोपली असताना ती अभ्यास करायची, पण ती जागी होतेय असं लक्षात आलं की ही घाईघाईने पुस्तक बंद करून झोपण्याचं नाटक करायची Uhoh
अशा काही जणी बघितल्या आहेत मीही. वर वर दाखवायचं की काही अभ्यासच झालेला नाही. पण खरंतर अभ्यास झालेला असतो. याने काय मिळतं माहिती नाही.

Pages