निर्वासितांना सांधणारे भाषांचे पूल

Submitted by ललिता-प्रीति on 3 May, 2021 - 01:35
निर्वासित आणि परकीय भाषा

‘मी पहिला तुर्की शब्द शिकलो तो म्हणजे ‘सू’... घशाला कोरड पडली होती, प्यायला पाणी हवं होतं... अरबी भाषेत पेय या अर्थी शराब असं म्हणतो आम्ही... पण तो शब्द ऐकून त्या तुर्की माणसाने दारू आणून दिली... मी खाणाखुणा करून कसंबसं शेवटी तुर्की भाषेतलं सू म्हणजे पाणी मिळवलं’...
सिरियातून पळावं लागलेल्या अलाचा तुर्की भाषेशी झालेला हा पहिला सामना. आज चार-पाच वर्षं उलटून गेली. अला तीच तुर्की भाषा आता व्यवस्थित बोलतो. इस्तंबूलमध्ये, म्हणजे तुर्की राजधानीतच राहतो. तिथे एका एन.जी.ओ.मार्फत तिथल्या सिरियन निर्वासित मुलांना कॉम्प्युटर शिकवतो. अरेबिक भाषेचे ऑनलाइन कोर्सही घेतो. तो कोणत्या परिस्थितीत मायदेशातून बाहेर पडला, त्यापूर्वी तो आणि त्याच्यासारख्या इतर अनेकांवर तिथे काय काय परिस्थिती ओढवली, हे तो विसरलेला नाही. मात्र भूतकाळाला कवटाळून न बसता तो आता पुढे निघाला आहे. आपली सिरियन मुळं न विसरता तो तुर्की जीवनाला, तुर्की समाजाला आपलंसं करण्याच्या प्रयत्नात आहे. काही अंशी यशस्वीही झाला आहे.
निर्वासितांच्या पुनर्वसनात भाषाशिक्षण किती महत्वाचं असतं हे अलाच्या उदाहरणावरून अधोरेखित होतं. निर्वासित अनोळखी प्रदेशात आसर्‍याला येतात, तेव्हा ते आपलं घर, सामानसुमान, आपली माणसं एवढंच नव्हे तर आपली भाषा, आपली संस्कृती देखील मागे सोडून आलेले असतात. परक्या प्रदेशात येऊन ठेपलं की पहिला अडसर येतो तो भाषेचाच. रेफ्युजी कॅम्पमध्येही हा प्रश्न राहतोच. मदत करणारा स्वयंसेवक जीवाचा आटापिटा करत असतो; ज्याला मदत हवी असते त्याच्याही जीवाची तडफड होत असते; खाणाखुणा आणि आपली भाषा याशिवाय हाताशी काहीच नसतं.

निर्वासितांच्या पुनर्वसनाच्या कामात अन्न-वस्त्र-निवारा, रोजगार, रोजगारासाठी आवश्यक असणारं शिक्षण, हे सुरुवातीचे प्रमुख टप्पे मानले जातात. निर्वासित या शब्दाची मूलभूत व्याख्या पाहता हे पुनर्वसन मर्यादित कालावधीसाठी असतं. कारण मायदेशातली परिस्थिती सुधारली की निर्वासित आपापल्या देशात परत जातील असं मानलं जातं. मात्र दुसर्‍या महायुद्धानंतरची आणि विशेषतः गेल्या दशकातली जागतिक परिस्थिती यापेक्षा खूपच बदलली आहे. त्यामुळे निर्वासितांचं दीर्घकालीन पुनर्वसन आज अपरिहार्य झालं आहे. दीर्घकालीन पुनर्वसनात फक्त अन्न-वस्त्र-निवारा, रोजगार इतकाच विचार करून पुरत नाही. तिथे भाषिक पुनर्वसन ही गोष्ट अत्यंत कळीची ठरते.
अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, निर्वासितांचं भाषिक पुनर्वसन सर्वार्थाने वेगळं असतं आणि ते वेगळंच गणलं जायला हवं. केवळ घर अथवा नोकरी मिळवण्याचं साधन असं त्याकडे पाहणं पुरेसं नसतं. तर नव्या प्रदेशात निर्वासितांची वैयक्तिक आणि सामूहिक सांस्कृतिक ओळख तयार होण्यासाठी भाषेचा हातभार लागणार असतो. निर्वासितांचा पेहराव, चेहरेपट्टी यावरून यजमान देशात काही ठोकताळे बांधले जातात. त्यांतले काही सांगोवांगी असू शकतात, त्यात एक लादलं जाणं असू शकतं. यजमान देशाची भाषा शिकल्याने काही ऐहिक गोष्टी मिळवता येतात, त्याचबरोबर स्वतःच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह लागण्याचीही शक्यता असते. अशा वेळी स्वतःची मूळ सांस्कृतिक ओळख न विसरता नव्याचा पूर्णतया स्वीकार करण्याची अंतर्बाह्य तयारी असावी लागते. यजमान समाजाचीही असं वैविध्य स्वीकारण्याची तयारी असावी लागते. या दुहेरी स्वीकारासाठी राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती मोठं काम करते.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी निर्वासितांसाठी आपल्या देशाची दारं उघडण्याचं ठरवलं. जर्मन जनतेला त्यांनी सांगितलं- ‘We can do this’. जर्मनीच्या त्या धोरणाचा थोडाफार फायदा झालेल्यांच्या अनेक कहाण्या इंटरनेटवर वाचायला मिळतात. सिरियातल्या अलेप्पो इथला मुहम्मद जाफर आपली बायको आणि तीन लहान मुलींसह २०१५ साली आपला देश सोडून जर्मनीत बर्लिन इथे आला. गेली पाच वर्षं हे कुटुंब बर्लिनच्या रेफ्युजी निवासात राहत आहे. मुली आता उत्तम जर्मन बोलतात, तिथल्या शाळेत जातात. आपल्या आई-वडिलांच्या इंटरप्रीटर म्हणून काम करायलाही त्यांना मजा येते. त्या मानाने मुहम्मदला आणि त्याच्या बायकोला ती भाषा शिकायला वेळ लागला. पाच वर्षांनंतरही ते जर्मनीत पूर्णपणे स्थिरावले आहेत असं म्हणता येत नाही. कारण दैनंदिन जीवनात त्यांना अनेकदा स्थानिकांचा या ना त्या प्रकारे रोष पत्करावा लागतो. तरी जर्मन भाषा येत नसती तर त्याची तीव्रता खूप जाणवली असती, असं ते म्हणतात.
वरती दुहेरी स्वीकार म्हटलं ते या अर्थाने. भाषावापराच्या दृष्टीने बोलायचं, तर आपल्याला अनोळखी असलेली भाषा कानांवर पडते, लिहिलेली दिसते, आपल्याला जेमतेम कळते किंवा अजिबात कळतच नाही, तेव्हा एकतर त्याची गंमत नाहीतर आश्चर्य वाटू शकतं किंवा थेट त्या भाषेला झिडकारण्याचीच भावना निर्माण होऊ शकते. यजमान देशांतल्या माणसांना हे आपल्यावरचं एक प्रकारचं आक्रमण वाटू शकतं. ते जन्मापासून जे भाषिक वैविध्य पाहत आलेले असतात त्यापलिकडचं काहीतरी त्यांच्या समोर आलेलं असतं. त्याने आपली भाषा बिघडेल की काय अशा शंका-कुशंका त्यांना छळायला लागतात. अशा वेळी ती परकी भाषा आणि ती बोलणार्‍या व्यक्ती दोन्हींकडे शत्रुत्वाच्या नजरेने पाहिलं जातं. हे होऊ न देण्यासाठी काय करायला हवं हे सांगताना समाजशास्त्रज्ञ ‘भाषिक सद्भावना’ (linguistic goodwill) ही संज्ञा वापरतात. अनोळखी भाषांमध्ये रस दाखवणं, मानवाने निर्मिलेली एक गोष्ट म्हणून त्याबद्दल आदर बाळगणं, त्यावर कोणतेही शिक्के मारण्याचं टाळणं आणि त्या भाषा बोलणारे जे कुणी असतील त्यांच्याशी संवाद साधण्याची तयारी दर्शवणं; भाषिक सद्भावनेत हे सारं अंतर्भूत असतं. विचार करा, सर्वसाधारण परिस्थितीत सुद्धा हे किती कठीण असतं. भारतात असं काही करायचं म्हटलं तरी आपण काही राज्यांमधल्या भाषांच्या बाबतीत हे पूर्णपणे आचरू शकतो का? त्याचे उलट परिणाम घडण्याचीच अधिक शक्यता असते. मग तेच निर्वासितांसाठी परक्या देशात आचरणात आणणं किती अवघड जात असेल. ‘आपण यांच्याहून वेगळे आहोत’ किंवा ‘हे कोणीतरी भलतेच आहेत’ इथपासून ‘आपल्याला आता यांच्यातलं एक होऊन राहायचं आहे’ किंवा ‘वेगळे असले म्हणून काय झालं, हे आता आपल्यासोबत राहणार आहेत’ इथपर्यंतचा हा दुहेरी प्रवास असतो.
तुर्कस्तानच्या गाझियान्तेप इथे राहणारा मध्यमवयीन अहमद, आधी सिरियात कन्स्ट्रक्शन इंजिनिअर म्हणून काम करायचा. एक दिवस बॉम्बहल्ल्याच्या भीतीने त्याच्या कामाच्या ठिकाणाहून अचानक त्याला पळ काढावा लागला. तो पळाला आणि पुढच्या पाच-दहा मिनिटांत त्याच्या ऑफिसची इमारत बॉम्बने बेचिराख झाली. पुढच्या अर्ध्या-एक तासांत घरातलं जमेल तितकं सामान बांधून, आपल्या लहान मुलांना घेऊन त्याला आधी आपलं गाव आणि मग आपला देश सोडावा लागला. ते तुर्कस्तानात आले तेव्हा त्याच्याजवळ जेमतेम पैसे शिल्लक होते. तो म्हणतो, ‘मी तो पैसा तुर्की भाषा शिकण्यासाठी खर्च केला. कारण नाहीतर आमचा निभाव लागला नसता. इथे आपण वेगळं पडू नये, जरा बर्‍या परिस्थितीत राहता यावं, आसपासच्या लोकांमध्ये मिसळता यावं यासाठी हे आवश्यक होतं असं मला तेव्हा वाटलं.’

एखादी नवी भाषा आवड म्हणून शिकणं आणि अशी अपरिहार्यतेतून शिकावी लागणं यात फरक आहे. ‘स्थलांतरित’ (स्वखुषीने आपला देश सोडलेले, migrants) आणि ‘निर्वासित’ (refugee) असाही त्यात भेद असतोच. एका अभ्यासानुसार स्थलांतरितांपेक्षा निर्वासितांना काहीही नवीन शिकून घ्यायला खूप जास्त वेळ लागतो. त्या अभ्यासाच्या आकडेवारीत शिरण्याची ही जागा नाही. मात्र त्यामागचं मर्म लक्षात घ्यायला हवं. नादर, अम्मान (जॉर्डन) इथल्या अझराक रेफ्युजी कॅम्पमधला १६ वर्षांचा मुलगा. सिरियात यादवी सुरू झाल्यावर नादरच्या कुटुंबाला दमास्कसमधून पळ काढावा लागला. पुढच्या एका वर्षात त्यांनी २०-३० ठिकाणं बदलली. त्यांना रेफ्युजी कॅम्पमध्ये त्यातल्या त्यात स्थैर्य मिळालंय. नादरला शिकून पुढे काहीतरी चांगलं करण्याची इच्छा आहे. त्याची सुरुवात म्हणून तो तिथे इंग्रजी शिकतो आहे. स्वतःचं नाव, वय सांगण्याइतपतच त्याला इंग्रजी यायला लागलं आहे. पुढे आपल्याला आणखी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे, ही जाणीव त्याला आहे.
आपलं गाव, आपला देश सोडून इतरत्र आसर्‍यासाठी वणवण भटकताना नादरसारख्या मुलांची शिक्षणाची वर्षं वाया जातात. कित्येकजण मुळातच फारसे शिकलेले नसतात. अनेकांना तर लिहिता-वाचताही येत नसतं. मातृभाषेच्या बाबतीतच ही गत, मग परक्या भाषेबद्दल तर बोलायलाच नको. असे निर्वासित गुन्हेगारांच्या, मानवी तस्करांच्या जाळ्यात अलगद अडकतात. स्थानिक भाषा शिकून घेतली तर यातले अनेक धोके कमी होतात. ग्रीसमधल्या थेसलोनिकी इथल्या निर्वासितांच्या छावणीत स्वयंसेवक म्हणून काम करणारी ओल्गा कॅलोमिनिदू म्हणते, ‘ही मुलं शाळेत ग्रीक शिकली नाहीत तर त्यांना तुरुंगात शिकावी लागेल.’
समेर जफार, सिरियातून पळाला आणि ग्रीसच्या पूर्व किनार्‍यावर एका डोंगराळ भागात आला. तिथल्या व्यावसायिक शिक्षण देणार्‍या शाळेने त्याला बोलावलं. बाकी काहीच करण्यासारखं नव्हतं; मग तो शाळेत शिकायला लागला. आज तो १८ वर्षांचा आहे. गावातल्या एका वयस्क माणसाचे उद्गार तो आजही विसरलेला नाही- ‘तू ग्रीक भाषा बोलतोस, शाळेत जातोस... माझ्यासाठी तू ग्रीकच आहेस.’
परक्या देशात स्थिरावण्याच्या आटापिट्यात स्थानिक भाषा अशी कळीची ठरते. इब्राहिम कमारा हा गांबिया देशाचा तरुण. गांबिया हा पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवरचा नखाएवढा देश. देशातल्या असुरक्षित वातावरणामुळे इब्राहिम आधी लिबियात आला. तिथून भूमध्यसमुद्र पार करून इटलीत जाण्याचं ठरवून तो निघाला. पण त्यांची खचाखच भरलेली बोट सायप्रसच्या किनार्‍याला लागली. इब्राहिमने त्या देशाचं कधी नावही ऐकलेलं नव्हतं. पण त्याला तिथे उतरण्यावाचून गत्यंतरही नव्हतं. पुढचे १५ दिवस तो उत्तर सायप्रसमध्ये भकासपणे फिरत होता. तो चांगलं इंग्रजी बोलणारा, पण सायप्रसमध्ये ग्रीक भाषा जास्त वापरली जाते. त्यामुळे त्याला काहीच कळायचं नाही. पण तिथून जाणार कुठे? आज दोन वर्षं झाली, तो तिथेच आहे, हळूहळू ग्रीक शिकतो आहे. तिथे त्याला कामही मिळालं आहे. युरोपच्या मुख्य भूमीवर जाता आलं असतं तर त्याला आयुष्यात अधिक बरे दिवस पाहता आले असते; पण आता तो त्याची खंत बाळगत नाही. ग्रीक भाषा आणि सायप्रस दोन्ही त्याला आवडायला लागलं आहे.
मध्यपूर्व आफ्रिकेतल्या बुरुंडी या चिमुकल्या देशात पाच-एक वर्षांपूर्वी निवडणुकांपश्चात यादवी माजली. हजारो बुरुंडीवासियांना शेजारच्याच रवांडा या आणखी एका चिमुकल्या देशात आसरा घ्यावा लागला. बुरुंडीत फ्रेंच भाषेचा वरचष्मा, तर रवांडात इंग्रजीचा अधिक वापर. तिथल्या निर्वासित मुलांच्या पुनर्वसनाची सुरुवातच इंग्रजी भाषेसाठीच्या ओरिएन्टेशन प्रोग्रामने करावी लागली. त्याशिवाय पुढे काहीच शक्य झालं नसतं. असंच, युक्रेनच्या कीव्हमधल्या ‘इंटिग्रेशन सेंटर फॉर रेफ्युजीज’मध्ये निर्वासित युक्रेनी भाषा शिकताहेत. व्हेनेझुएलामधून जवळच्या त्रिनिदाद बेटावर गेलेले निर्वासित स्पॅनिश आणि इंग्रजीच्या कात्रीत सापडले आहेत.

अस्तित्वाची धडपड सुरू झाली की सवयीची साधनं पुरेशी ठरत नाहीत, हे जो ओळखतो तो तगतो. मग नवी साधनं धुंडाळण्याची नवी धडपड सुरू होते. नवी भाषा हे असंच एक साधन; ते एकदा हाताशी आलं की कायमचा आणि भक्कम आधार मिळू शकतो. राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, लिंग अशा अनेक दर्‍या एकट्या भाषेच्या मदतीने पार करता येतात. त्यात त्वरित यश नसतं; तातडीने परिणाम दिसत नाहीत. शिवाय प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात; मिळालेल्या मदतीचा कसा आणि किती विनियोग करायचा याची प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. एकीकडे पोटात उसळलेल्या आगडोंबाला दुर्लक्षून चालणार नसतं. पण अशा सार्‍या अस्ताव्यस्त अनागोंदीतूनच काही ठोस मॉडेल्स विकसित करण्यासाठी जगभरातले स्वयंसेवक, अभ्यासक धडपडत असतात.
----------
बदलत्या जागतिक परिस्थितीत विशेषतः निर्वासितांच्या काही भाषांबद्दल इतर लोकांच्या मनात कायमस्वरूपी आकस निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्या भाषा बोलणार्‍यांना असं वाटायला लागतं, की आपल्या भाषा पुढच्या पिढीकडे गेल्या नाहीत तरच बरं. समाजशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार निर्वासितांच्या समस्येचा हा छुपा परिणाम तितकासा लक्षात घेतला जात नाही; पण दीर्घकालीन भाषिक पुनर्वसनाच्या पद्धतशीर उपायांमध्ये याचं उत्तर सापडू शकतं. यजमान देशांनी आपल्या भाषाशिक्षणाच्या चौकटीत अशा भाषांना प्रतिकात्मक स्थान दिलं तरी बरंच काही साध्य होऊ शकतं. कारण त्या भाषांसोबत येणारी प्रवाही संस्कृती म्हणजे यजमान देशांच्या पुढच्या पिढ्यांसाठीही एक ठेवा असतो. तो असा गमावणं कुणाच्याच हिताचं नसतं.
याचंच एक वेगळं, खरंतर उलट्या दिशेचं, मॉडेल ब्राझिलमध्ये आकाराला येतं आहे. हेलोईझा दाहीर हिचं सिरियन-लेबनीझ कुटुंब साठ-एक वर्षांपूर्वी ब्राझिलमध्ये आलं. तिच्या आईवडिलांनी तिला कटाक्षाने फक्त पोर्तुगीज भाषा शिकवली. तिचं वय वाढत गेलं तसं आपल्या अरेबिक मुळांचा शोध घेण्याची तिची जिज्ञासा वाढत गेली. ती भाषा शिकून घेणं हा त्यातला मुख्य टप्पा होता. पण ब्राझिलमध्ये राहून ते करणार कसं? याचं उत्तर तिला आज इतक्या वर्षांनी मिळालं आहे. आता ती साओ पावलो इथल्या ‘अब्रासो कल्चरल’ या भाषाशिक्षण शाळेत अरेबिक शिकते आहे. यात विशेष काय? तर, त्या शाळेतले शिक्षक म्हणजे हैती, काँगो, व्हेनेझुएला, सिरिया इथून आलेले निर्वासित आहेत. निर्वासितांना उदरनिर्वाहाचं साधन मिळवून देण्याच्या उद्देशाने ती शाळा सुरू झाली. आजवर त्या शाळेमुळे ५५ निर्वासितांना रोजगार मिळाला आहे. आणि हेलोईझासारख्यांमुळे स्थानिक समाजात त्या बाहेरच्या भाषा झिरपायला सुरुवात झाली आहे.
हेलोईझाला अरेबिक भाषा शिकवणारा अलि जेरातली मूळचा सिरियातला, दमास्कसमध्ये एका हॉटेलमध्ये नोकरी करायचा. यादवी युद्धामुळे तिथला पर्यटन व्यवसाय कोलमडला. अलि इराक, तुर्कस्तान इथे काही काळ घालवून अखेर थेट ब्राझिलमध्ये आला. त्यामागे केवळ तार्किक विचार होता. इराक किंवा तुर्कस्तानात त्याला परिचित वातावरण मिळालं असतं; मात्र ब्राझिलमध्ये अधिकृत प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया तुलनेने कमी कटकटीची होती. त्यामुळे त्याने त्वरित त्या देशात जाण्याचा निर्णय घेतला. तो ब्राझिलमध्ये आला तेव्हा त्याला पोर्तुगीज भाषा ओ की ठो कळत नव्हती. पुढच्या काही वर्षांत त्याने ती कसर थोडीफार भरून काढली. २०१५ पासून तो ‘अब्रासो कल्चरल’ शाळेत काम करतो आहे. हेलोईझासारख्या त्याच्या विद्यार्थ्यांमुळे त्याचं पुढचं पोर्तुगीज भाषेचं शिक्षण आपसूक होईल यात शंका नाही.
----------
या सगळ्यात आणखी एक भाषा उरते- साइन लँग्वेज. खाणाखुणांची असली तरी ती देखील भाषाच. जगभरात काही ठिकाणी मूकबधीर निर्वासितांसाठी साइन लँग्वेज क्लासेस चालवले जातात. अनेक निर्वासित आयुष्यात प्रथमच अशा प्रकारच्या संवादांना सामोरे गेले आहेत. हे त्यांच्यासाठी जगावेगळं काहीतरी आहे.
जगावेगळं तर निर्वासितपणच असायला हवं; पण ते हळूहळू जगाच्या सवयीचं होतंय की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. मूळची सिरियाची आणि आता तुर्कस्तानात सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करणारी नूर म्हणते, ‘भाषा वेगवेगळी असेल, तर तुमचं म्हणणं माझ्या मेंदूपर्यंत पोहोचेल; पण आपण एकसारखी भाषा बोलत असू, तर तुमचं म्हणणं माझ्या हृदयापर्यंत पोहोचेल.’
निर्वासितांची वेदना जाणणार्‍यांना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठीची ही धडपड अविरत सुरू ठेवावी लागणार आहे.

----------------------------------------

अनुभव - फेब्रुवारी २०२१ अंकात प्रकाशित झालेला लेख. (फोटो प्रातिनिधिक आहे; इंटरनेटवरून घेतला आहे.)

यापूर्वीचे लेख :

१. अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

२. क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’

३. मोडलेली मनं, जोडणारे खेळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत एकदा खोल विचारात पाडणारा लेख.
जगावेगळं तर निर्वासितपणच असायला हवं; पण ते हळूहळू जगाच्या सवयीचं होतंय की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. >>> हे वाक्य अंगावर आलं एकदम

सुंदर लिहीले आहे! निर्वासितांच्या विश्वाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

कुठल्या संस्थेशी संबंधित आहात का ? >>> नाही.

गेली ३-४ वर्षं मी स्वतःपुरता, जमेल तसा हा विषय फॉलो करते आहे. त्यातून या लेखांची कल्पना डोक्यात आली. अनुभवच्या संपादकांना ती आवडली. त्यामुळे लिहायला सुरुवात केली.