मोडलेली मनं, जोडणारे खेळ

Submitted by ललिता-प्रीति on 1 April, 2021 - 12:33
refugee olympic team

ऑगस्ट, २०१६. रिओ ऑलिंपिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे लहान-मोठे चमू आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या-त्या देशांच्या नावांच्या उद्घोषणा होत होत्या. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये १० खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिंपिक्सची खूण असलेल्या पाच वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच समस्त प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये उद्घोषणा झाली- ‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’... सिरियाचे दोन जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे दोन ज्युडोपटू, इथियोपियाचा एक मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे पाच धावपटू... त्या दहाजणांचे स्वतःचे देश आता त्यांचे उरले नव्हते. त्यांचं निर्वासित असणं त्यांना इतरांहून वेगळं करणारं होतं. मात्र ते बोचरं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. ऑलिंपिक्स खेळांनी त्यांना तशी संधी दिली होती. एक नवा इतिहास घडत होता. त्याला कारणीभूत होती जगाची बसलेली एक नवी घडी... की विस्कटलेली?

खेळ, शारिरीक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना करणं आपल्याला आधी अवघड वाटतं. ज्यांच्या घराचा, गावाचा, देशाचाच पत्ता नाही; ज्यांना उद्याचा दिवस दिसणार की नाही याची शाश्वती नाही; खायला-प्यायला-ल्यायला मिळतंय ते निमूटपणे स्वीकारावं अशी ज्यांच्याकडून बहुतेक जगाची अपेक्षा असू शकते; अशांसाठी व्यायाम, खेळांचा विरंगुळा परवडण्यातला असेल का, हा प्रश्न मनात उभा राहतो. मात्र आजचं समाजशास्त्रीय संशोधन सांगतं, की फक्त विरंगुळा, वजन कमी करणं किंवा शारिरीक तब्ब्येत उत्तम राखणं यासाठीच खेळ खेळावेत असं नव्हे. तर त्याचे अनेक मानसशास्त्रीय उपयोगही आहेत. आणि निर्वासितांहून अधिक त्याची किंमत कोण जाणू शकतं?

‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’मधला सिरीयाचा जलतरणपटू रामी अनीस रिओमध्ये जगज्जेत्यांसोबत स्पर्धेत उतरता येईल यासाठीच खूष होता. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची ज्युडोपटू योलांदे माबिका लहानपणीच आपल्या कुटुंबापासून दुरावली. तिची लहानपणीची एकमेव आठवण म्हणजे ती एकटीच पळते आहे, पळते आहे; मग एक हेलिकॉप्टर येतं आणि तिला उचलून राजधानी किन्शासामधल्या बेघर मुलांच्या केंद्रात नेऊन सोडतं. तिथे तिला आपल्या घरच्यांची खूप आठवण यायची; ती एकटीच खूप रडायची. पण त्याच केंद्रात असताना तिची ज्युडोशी ओळख झाली. ज्युडोने मला कणखर बनवलं, असं ती सांगते.
रामी अनीसच्या टीममधली दुसरी जलतरणपटू युसरा मार्दिनी. तिची कहाणी तर विलक्षण आहे. ती सिरियातल्या दमास्कसची. तिथे ती लहानपणापासूनच जलतरणाचं प्रशिक्षण घेत होती. सिरियाच्या राष्ट्रीय संघातर्फे स्पर्धांमध्ये भाग घेत होती. ती १४ वर्षांची असताना तिथे यादवी सुरू झाली. तिचं जलतरण, स्पर्धा सगळं बंद पडलं. तिथली परिस्थिती चिघळली आणि युसराने आपल्या मोठ्या बहिणीसह ऑगस्ट,२०१५मध्ये देश सोडला. आधी दोघी विमानाने इस्तांबूलला आल्या. तुर्की किनार्‍यावर त्या एका लहानशा बोटीत चढल्या. बोट निघाली होती ग्रीसला. जेमतेम १५ मिनिटं झाली असतील आणि ती बोट बंद पडली. बोटीत २० जण होते. सर्वांचा जीव टांगणीला लागला. युसराही आधी थोडी घाबरली; पण मग तिने विचार केला, पाणी तर आपलं लाडकं; आपण दोघी उत्तम पोहू शकतो, मग कशाला घाबरायचं. त्यांनी पाण्यात उड्या मारून बोटीला आधार द्यायचं ठरवलं. बोटीत आणखी दोघं पोहू शकणारे निघाले. चौघांनी आळीपाळीने पोहत, तब्बल तीन ते साडेतीन तासांच्या अथक खटपटीनंतर बोट आपल्यासोबत ओढत पलिकडच्या किनार्‍याला आणली. पुढे ग्रीस, सर्बिया, हंगेरी असं करत करत दोघी जर्मनीत पोहोचल्या. यथावकाश तिथे त्यांना चांगले जलतरण प्रशिक्षक मिळाले. आणि अवघ्या एका वर्षात युसरा ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्यासाठी रिओला पोहोचली होती. अनेक वर्षं मनात बाळगलेलं ऑलिंपिक्सचं तिचं स्वप्न ध्यानीमनी नसताना असं पुरं झालं होतं. पण त्यापूर्वी तिला आपला देश गमवावा लागला होता. मात्र तिला रेफ्युजी म्हणून ऑलिंपिक्सपर्यंतची खडतर वाट तिच्या जलतरणावरच्या प्रेमामुळेच दिसली होती. मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार युसरा त्यादिवशी पाण्यात उडी मारण्याची जिगर दाखवू शकली त्यामागे स्पर्धात्मक क्रीडाप्रकारातला तिचा सहभागच कारणीभूत होता.

युसराने दाखवलेली जिगर आणि इतर कोणत्याही सर्वसाधारण खेळाडूने त्याची शर्यत किंवा सामना जिंकताना दाखवलेली जिगर यांची मूळ जातकुळी तशी एकच. स्वतःच्या क्षमता ताणणं, त्या सतत तपासून पाहणं, नजरेसमोर काही एक उद्दीष्ट असणं, त्या उद्दीष्टाच्या दिशेने प्रवासाची आखणी करणं, आपल्या चुका सुधारणं... माणसाला स्वतःचं असणं दिसण्यासाठी हे सारं गरजेचं असतं. आणि निर्वासितांसाठी या वाटांचे सारे पर्यायच एका क्षणात, खटका दाबल्यासारखे बंद झालेले असतात. त्याबरोबर मिटून जातात त्यांच्या संवेदना, त्यांचा जिवंतपणा. खेळ, शारीरिक व्यायाम त्यांना हा जिवंतपणा पुन्हा बहाल करतात; त्यांचं असणं त्यांना दाखवतात.

व्यायाम, खेळ यामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिन्स नावाचे हॉर्मोन्स स्त्रवतात. मेंदूतल्या रिसेप्टर्सशी त्यांचा संबंध आला, की माणसाची एकूण वेदनेची जाणीव कमी कमी होते. शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कोणत्याही खेळाचे काही विशिष्ट नियम असतात. सांघिक खेळांसाठी टीमवर्क फार कळीचं असतं. पण अशा सूत्रबद्ध चौकटीत राहूनच निर्भेळ आनंदही मिळतो. एखादी गोष्ट ठरवून साध्य करण्यातली मजा तिथे असते. शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी मग त्याला खेळाडूंची हरकत नसते. टीव्हीवरचा क्रिकेटचा सामना भान हरपून पाहताना हे सर्व आपल्याही मनात, डोक्यात सुरू असतं. त्या एका सामन्यापुरतं आपल्या चिंता, व्यवधानं विसरण्याची मुभा आपल्याला मिळालेली असते. घरबसल्या इतकी मुभा, तर प्रत्यक्ष मैदानावर उतरल्यावरची चैन कशी असेल, कल्पना करून बघा. निर्वासितांसाठी ही मुभा, अशी चैनच फार मोठं काम करून जाते.

‘रेफ्युजी ऑलिंपिक टीम’मधले सुदानचे पाच धावपटू केनियाच्या काकुमा रेफ्युजी कँपमधले होते. एकीकडे त्यांची ऑलिंपिक्ससाठीची तयारी सुरू असताना कँपमधल्या इतर अनेक खेळाडूंसाठी व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. एक मॅरेथॉन शर्यतही झाली. खेळाच्या धाग्याने ते आपल्या पाच ऑलिंपियन दोस्तांशी जोडले गेले. कँपमध्ये मदतकार्य करणार्‍या संस्थांचे कार्यकर्तेही या स्पर्धांमध्ये सहभागी झाले. तिथे मुलींच्या व्हॉलीबॉलसाठी काम केलेली एक जुनी क्रीडाप्रमुख म्हणते- ‘निर्वासित मुलींसाठी शिवणकाम, विणकामाचं साहित्य पाठवलं म्हणजे आपलं काम झालं असं मानू नका. एका जागी बसून शांतपणे शिवणकाम करताना त्यांना त्यांचे भीषण अनुभव सतत आठवत असतात. त्यांना शिवणकाम नव्हे, तर खेळाच्या मैदानातले आनंदोपचार हवे आहेत.’
-----
जगभरात सर्वाधिक पाहिला, खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. निर्वासितांसाठी जगभरात सुरू असलेल्या क्रीडाविषयक उपक्रमांमध्येही सर्वाधिक प्रमाण फुटबॉलचंच असावं. दोन-एक वर्षांपूर्वी बांग्लादेशातल्या कॉक्स बझारजवळच्या बलुखाली इथल्या रोहिंग्या रेफ्युजी कँपमधल्या दोन फुटबॉलप्रेमी मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या दोघांनी फुटबॉल खेळासाठी आवश्यक असणारी ‘ड्रिबल’सारखी पाच मूलभूत कौशल्यं निवडली आणि आपापसांत त्यांवर आधारित एक स्पर्धा खेळली. या व्हिडिओची मूळ कल्पना ‘युनिसेफ’ची होती. पण त्यातलं त्या मुलांचं फुटबॉलप्रेम, आवडत्या फुटबॉल खेळाडूंची नावं नीट उच्चारता येत नसूनही त्यांच्याबद्दल त्यांचं धीटपणे बोलणं, लहानशा जागेत हाताशी असलेल्या साहित्यातून त्यांनी उभं केलेलं फुटबॉल मैदान आणि त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद हे सारं त्या मुलांचं स्वतःचं होतं.
लहान मुलांच्या बाबतीत असं म्हणतात, की ‘गिव्ह अ बॉल टू अ किड अ‍ॅण्ड दे आर गोइंग टू लुक फॉर अ फ्रेंड टू किक इट टू...’ फुटबॉल हा असा इतका सहजगत्या जोडून घेणारा खेळ आहे.

बलुखाली आणि त्याच्या आसपासचे काही भाग मिळून बनलेला कुटुपलाँग रेफ्युजी कँप म्हणजे जगातली सर्वात मोठी निर्वासितांची छावणी आहे. या कँपमध्ये वर्ल्ड कपच्या थाटात आणि तितक्याच जोशात फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात भाग घेणार्‍या खेळाडूंसाठी आपापले संघ म्हणजे एक ओळख बनली आहे; इतकी, की हे खेळाडू तिथे नव्याने येणार्‍या निर्वासितांच्या मदतीसाठी जाताना आपापल्या संघांच्या गणवेषात असतात. त्यातल्या एका संघाच्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये रक्तगट लिहिण्यासाठीचा एक रकाना आहे. का, तर कँपमध्ये कधी गरज भासल्यास रक्तदानाची सोय त्वरित करता यावी. हे विलक्षण आहे.

निर्वासितांसाठी फुटबॉलचं महत्व समजून घेताना त्याच्या अनेक बाजू समोर येतात. लुमा मुफलेह, अमेरिकेत राहणारी जॉर्डनची निर्वासित. अमेरिकेत नव्याने बस्तान बसवण्यापूर्वी तिला तिथे अनेक शहरांमध्ये वणवण फिरावं लागलं. काही काळाने तिला कसंबसं एक काम मिळालं, कणभर स्वस्थता मिळाली. तरी आपलं घर म्हणावं अशा जागेचा तिचा शोध सुरूच होता. एकदा ती कुठेतरी निघालेली असताना रस्ता चुकली आणि एका गल्लीत तिला काही निर्वासित मुलं अनवाणीच फुटबॉल खेळताना दिसली. तिने पाहिलं की तो खेळ हेच त्यांचं घर होतं; स्वतःच्या घरात अनुभवायला मिळणारी मुक्तता ती मुलं त्या खेळात अनुभवत होती. तिने तासभर थांबून लांबूनच त्या मुलांचा खेळ पाहिला आणि तिला पुढच्या आयुष्याचं उद्दीष्ट लख्खपणे समोर दिसलं. आज ती अमेरिकेत खास निर्वासित मुलांसाठी शाळा चालवते आहे. तिथे शिक्षणाबरोबरच मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यावर मुख्य भर दिला जातो.

रोझ्मा गफुरी, दोन दशकांपूर्वी अफगाणिस्तानातून पळावं लागलेली एक निर्वासित. तिच्या कुटुंबाने इराणमध्ये आसरा घेतला. रोझ्माचं बहुतांश बालपण कष्ट करण्यात गेलं. तिला लहानपणी बाहुल्यांशी वगैरे खेळायला आवडायचं नाही. तिला एकच नाद होता- फुटबॉलचा. त्यामुळेच तिने निश्चय केला की मोठेपणी निर्वासित मुलांना खेळाकडे वळवण्याचे प्रयत्न करायचे. आता ती इराणमधल्या शिराझ इथे निर्वासित मुलांची फुटबॉल कोच म्हणून काम करते. तिला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली आहेत. सुरुवातीला रोझ्मा आणि तिच्या सहकार्‍यांना शिराझच्या आसपासच्या अफगाण निर्वासितांच्या छावण्यांमध्ये अक्षरशः दारोदार फिरावं लागायचं. मुलांनी फुटबॉल खेळायला यावं म्हणून त्यांच्या घरच्यांच्या विनवण्या कराव्या लागायच्या. पण त्यांनी या पालकांशी ओळखी करून घेतल्या. त्यांच्याशी बोलून त्यांना तयार केलं. खेळांमुळे मुलांमध्ये घडून येणारे फरक दिसायला लागले तसं पालकांना रोझ्माचा प्रयत्नांचं महत्व कळून आलं.

खेळांसंबंधीच्या अशा उपक्रमांतून आणखी एक महत्वाची गोष्ट साध्य होते. निर्वासित आणि त्यांच्या यजमान देशवासीयांमध्ये एक बंध निर्माण होतो. यजमान देशाला आपण नकोसे आहोत ही भावना खूप त्रासदायक असते. अस्तित्वासाठीच्या धडपडीत पायांखाली जमीन असणं गरजेचं असतं. ती मिळाली तरी त्यात याचक आणि दाता हा भेद असेल तर उपरेपणाची भावना पाठ सोडत नाही. खेळांमध्ये ही भावना नष्ट करण्याची ताकद असते. खेळांमधून झालेली मैत्री भेदाभेदाच्या इतर कोणत्याही भिंती मानत नाही.

सिरियातला अहमद अल-रशीद हा इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा चाहता. इंग्लिश साहित्याचा अभ्यास करताना त्याने इंग्लिश संस्कृतीचाही जमेल तसा अभ्यास केला. फुटबॉल हा त्यातला मोठा भाग होता. सिरियातल्या यादवीमुळे अहमद देश सोडून युरोपात गेला. बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीमुळे त्याची कथा जगापुढे आली. पुढे त्याला इंग्लंडमध्येच अधिकृत आश्रय मिळाला. आणि मग नोव्हेंबर, २०१७मध्ये त्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आला. ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ आणि इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशनतर्फे त्याला लंडनमधल्या प्रसिद्ध वेंब्ली स्टेडियममध्ये इंग्लंडचा एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना पाहण्याची संधी मिळाली. तिथे झालेल्या स्वागताने तो भारावून गेला. आता तो लंडनमध्येच राहतो. इंग्लंड हे त्याला आपलं घरच वाटतं, फुटबॉलप्रेमामुळे मिळालेलं दुसरं घर. वेंब्लीमध्ये त्यादिवशी अहमदसारखेच इतरही काही निर्वासित आलेले होते. फुटबॉलने त्या सगळ्यांना भविष्याकडे बघण्याचा आधार मिळवून दिलेला होता. कारण फुटबॉल (किंवा इतर कोणताही खेळ) म्हणजे निव्वळ एक अ‍ॅक्टिव्हिटी नसते, तर एक प्रवृत्ती असते.

याच प्रवृत्तीतून क्रीडाक्षेत्रात अनेक वर्षं काम केलेल्या मॅथ्यू बॅरेट या फुटबॉलप्रेमीने संयुक्त राष्ट्रांच्या रेफ्युजी एजन्सीच्या (यू.एन.एच.सी.आर.) सहकार्याने ‘गोल क्लिक’ हा उपक्रम सुरू केला. याला तो ‘ग्लोबल फुटबॉल स्टोरीटेलिंग प्रोजेक्ट’ असं म्हणतो. या उपक्रमाअंतर्गत जगभरात विविध ठिकाणी माणसांना साधे कॅमेरे दिले जातात. त्यांनी फुटबॉलचं त्यांच्या आयुष्यातलं महत्व फोटोंद्वारे सांगावं अशी अपेक्षा असते. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी फुटबॉलचे वेगवेगळे अर्थ असतील, मात्र त्याला काही ना काही अर्थ असतोच असतो; या संकल्पनेवर हा उपक्रम उभा राहिला आहे. त्यातून जमा झालेले फोटो ‘गोल क्लिक’च्या वेबसाइटवर बघायला मिळतात. जॉर्डनमधल्या झाटरी रेफ्युजी कॅपमध्ये युनिसेफतर्फे मुलींची एक फुटबॉल टीम तयार करण्यात आली आहे, हे तिथे आपल्याला समजतं. निर्वासितांच्या छावणीतला कुणी अनामिक खेळाडू व्यावसायिक फुटबॉलपटूच्या रुपात आणि त्यामुळे रुबाबात कॅमेराला सामोरा जाऊ शकतो, हे तिथे दिसतं. दक्षिण सुदानमधल्या यिदा रेफ्युजी कँपमधली मुलं फुटबॉल संघाच्या गणवेषात ग्रूप फोटोला उभी राहिलेली दिसतात. स्थलांतरितांसाठीही वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं जातं हे तिथे कळतं...
असे अनेक फोटो, अनेक कथा, अनेक निर्वासित आयुष्यं आणि एक फुटबॉल...
एक गोल, एक सामना, एक चुरशीची शर्यत...
अटीतटीचे प्रयत्न, तीन तासांच्या झगड्याला मिळालेलं पूर्णत्व, खेळांचं आपल्या आयुष्यातलं महत्व ठळक करणारं, निर्वासितांना इतरांमध्ये सहजी मिसळू देणारं, जन्मभर पुरणारं!
-----
कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी रद्द झालेलं टोक्यो ऑलिंपिक्स यंदा जुलैमध्ये आयोजित होत आहे. युसरा मार्दिनीला सलग दुसर्‍या ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्याची इच्छा आहे. आपल्या देशातर्फे हे करता येणार नाही हे ती जाणून आहे. त्यामुळे ती ‘टोक्योतही रेफ्युजी ऑलिंपिक टीम असेल’ अशी आशा व्यक्त करते. मात्र अशा टीमची गरजच भासू नये, त्यापेक्षा जगाची ही विस्कटलेली घडीच व्यवस्थित व्हावी, ही आस ती ठेवू शकत नाही. तिची जिगर त्यासाठी तोकडी आहे अजून.

*****

अनुभव - जानेवारी २०२१ अंकात प्रकाशित झालेला लेख. (फोटो इंटरनेटवरून घेतला आहे.)

*****

याआधीचे लेख :

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !! --> https://www.maayboli.com/node/77208

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स : निर्वासित मुलांना रिझवणारे ‘जोईज्’ --> https://www.maayboli.com/node/77763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच !
ह्यातहा पहिला भाग आधी लिहिला होतास का ? हा पूर्ण लेख आधी कुठे आला होता ? (अनुभव - जानेवारी २०२१ च्या आधी).

हा पूर्ण लेख आधी कुठे आला होता ? >>>
आधी कुठेही आला नव्हता. अनुभव मासिकाच्या फेसबूक पेजवरच्या प्रमोशनमध्ये यातला काही मजकूर आला होता.

खूप छान. मनापासून धन्यवाद ह्या लेखा करता.

खेळांमधून झालेली मैत्री भेदाभेदाच्या इतर कोणत्याही भिंती मानत नाही. हे अगदी खरे आहे.

युसरा मार्दीनी म्हणजे अगदी महिषासुरमर्दीनीचाच अवतार जणू. किती स्पृहणीय लढाऊ वृत्ती.

फारच छान आहे लेख.

मात्र अशा टीमची गरजच भासू नये, त्यापेक्षा जगाची ही विस्कटलेली घडीच व्यवस्थित व्हावी, ही आस ती ठेवू शकत नाही. >>> हे किती वाईट सत्य आहे Sad

छानच लेख !
खेळांचा एक महत्वाचा पैलू इथे अधोरेखित झाला. शिवाय, लहानपणीं आवडीचा खेळ खेळायला मिळणं हें मनोविकासासठी आत्यंतिक महत्वाचं, हा खूपच व्यापक फायदा तर आहेच आहे !

छान लेख. न्युज लाँड्री साइट ला मराठी साहित्य नाट्य कला विश्वातील ताज्या घडामोडींचा रेगुलर आढावा घेणारे कोणीतरी हवे आहे. त्यांचा एन एल हफता म्हणून वीकली पॉड कास्ट असतो त्यात त्यांने सांगितले होते. अभिनंदन म्हणून ओनर आहे त्याने.

तेव्हा तुमचेच नाव पटकन ध्यानात आले. तुम्हाला इंतरेस्ट असल्यास जरू र संपर्क करा.

फार फार सुरेख लेख आहे. नवीन नवीन गोष्टी आपल्यामुळे कळतात. मनाची , माहीतीची नवीन कवाडे उघडतात. प्लीज लिहीत रहा.

यावेळी टोकियो ऑलिंपिक्समध्ये २९ सदस्यांची रेफ्युजी ऑलिंपिक टीम आहे.

उद्घाटनाच्या सोहळ्यात या टीमने ग्रीसच्या पाठोपाठ दुसर्‍या क्रमांकावर स्टेडियममध्ये प्रवेश केला.

युसरा मार्दिनी सलग दुसर्‍या ऑलिंपिकमध्ये सहभागी झाली.

हो, मी त्यांच्या अफगाण सायक्लिस्टची मुलाखत वाचली तेव्हाच ह्या लेखाची आठवण झाली होती. छान माहिती दिली होतीस त्यामुळे रेफ्यूजी टीम बद्दल आवर्जून वाचते.
https://www.bbc.com/sport/olympics/57994322

हा लेख वाचला होता. प्रतिसाद द्यायचं राहून गेलं होतं. तुमच्या लेखांतून काही नवीच माहिती मिळते.