अडकलेली भाग - ४ : रेणुका आणि नियतीचा दगा..!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 1 May, 2021 - 08:49

अडकलेली भाग - ४ : रेणुका आणि नियतीचा दगा..!!
_________________________________________

कादंबरी त्या शांतचित्ताने बसलेल्या स्त्री कैदी जवळ आली.

" नाव काय तुमचं ..??" तिने हळुवार त्या स्त्रीला विचारलं.

ती स्त्री शांत बसली होती.. आत्ममग्न होऊन तपोवनी ध्यानधारणा करणारी जणू ती एखादी संन्याशीण असावी; असं तिला पाहून कादंबरीला वाटलं.

" रेणुका नाव आहे तिचं....!!" शेजारच्या कैदी स्त्रीने तिला न विचारता मध्येच उत्तर दिलं.

" पोटुश्या सवतीला विहिरीत ढकलून ठार मारलंय तिने, त्याचीचं शिक्षा भोगतेयं ती..!!" त्या स्त्रीने आगाऊपणे अधिकची माहिती पुरवली.

रेणुकाने नजर वर उचलून कादंबरीकडे पाहिलं. तिचे निष्पाप डोळे अश्रूंनी भरले. कादंबरी त्या निष्पाप नजरेनं विचलित झाली. त्या निष्पाप नजरेत लपलेले अनेक प्रश्न होते. पण त्या प्रश्नांना वाचा नव्हती. ते अबोल होते.. ..रेणुकासारखेचं..!

एकमेकींशी काहीही न बोलता दोघीही आपापल्या वाटेने निघून गेल्या.

रेणुकाची बराक चार नंबरची होती. तिची नेमणूक तुरुंगातील स्वयंपाक घरात झालेली होती. तुरुंगातली तिची चांगली वर्तवणूक पाहूनच रोहिणी मॅडमनी तिला तुरुंगाच्या स्वयंपाक घरात नियुक्त केलं होतं.

आपलं काम रेणुका इमानेइतबारे पार पाडत होती. तिच्या मनात कुणाबद्दल जराही किंतु नव्हता. आपल्या प्राक्तनी आलेले भोग ती निमुटपणे भोगत होती; कुणाकडेही काहीही तक्रार न करता...!!

तुरुंगातल्या कामाच्या वेळेत कधी- कधी रेणुका आणि कादंबरीची गाठ पडत असे. रेणुका नियमित प्रौढ साक्षरता वर्गात बसत होती. प्रौढ साक्षरता वर्गात कादंबरी लेखन- वाचनाशिवाय अवांतर विषयांवर कैदी स्त्रियांशी चर्चा करत असे. आपले विचार त्यांना ऐकवत असे. तिच्यामधल्या दडपून, कोमेजून गेलेल्या व्यक्तीमत्त्वाच्या बीजाला आता अंकूर फुटू लागला होता. त्याचा विकास होत होता. तुरुंगात सर्वांकडून मिळणाऱ्या कौतुकाचे तुषार अंगावर झेलत त्या अंकुराचं आता रोपटं बनू पाहत होतं. ते रोपटं आता तिथे मिळणाऱ्या प्रेमाने बहरू लागलेलं... !!

कादंबरीचे प्रगल्भ होत जाणारे विचार, तिचं बोलणं रेणुका लक्षपूर्वक ऐकून घेई.

कुणाशीही न बोलणारी रेणुका हळूहळू कादंबरीशी बोलू लागली. आजवर ज्या कोणाला सांगता येत नव्हत्या , त्या आपल्या मनातल्या भावना, आपलं दुःख तिच्या पुढ्यात रितं करू लागली. कादंबरीलाही आपल्या भावना समजून घेणारी , आपल्या आईच्या पश्चात एक जिवाभावाची मैत्रीण भेटली. दोघींची मैत्री जमली. दोघी इकडच्या - तिकडच्या गोष्टी सांगून एकमेकींचं दुःख हलकं करायला मदत करू लागल्या. दोघींमध्ये उपजत नैसर्गिक समजूतदारपणा होता. तुरुंगातल्या आपल्या अंगभूत चांगल्या वर्तवणुकीने दोघींनी तुरुंग प्रशासनाच्या, रोहिणी मॅडमच्या तसंच तुरुंगातल्या कैदी स्त्रियांच्या मनात आदराची जागा मिळवली होती.

दोघींनी आपल्याकरता कारागृहात एक लहानसं स्थान निर्माण केलं होतं. आपल्या आयुष्यातली इतर प्रश्नांची उत्तरे एकमेकींच्या साथीने तसंच रोहिणी मॅडमच्या सहकार्याने आपल्याला सोडवता येतील, अशी आशा दोघींना वाटू लागलेली. आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न दोघींच्या विचार - विनिमयातून अविरत चालू राहि.

तुरुंग म्हणजे मानवी स्वभावाचे विविध भावतरंग असलेला एक गूढ डोह जणू..!!

तुरुंगात विविध स्वभावाच्या, वेग-वेगळ्या परिस्थितीतून, वेग-वेगळ्या मानसिकतेतून गुन्हा करून आलेल्या स्त्रिया होत्या. त्यात एक होती कैदी नंबर ३२४ ...राधाबाई ..!!

गुन्हा करणारा गुन्हेगार कधी थंड डोक्याने, थंड रक्ताने कट रचून गुन्हा करतो; तर कधी- कधी जीवनात अचानक परिस्थिती अशी येते की, माणूस उकसवला जातो गुन्हा करण्यासाठी .... !नकळतपणे अपराध केल्याचं पापं त्याच्या पदरी पडतं आणि मग त्या पापाचा तो धनी होतो.

राधाबाई ही अशीच एक स्त्री. पोटच्या दारुड्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होती.

तुरुंगात शिक्षा भोगणारा गुन्हेगार हा शेवटी भाव-भावना असलेला माणूसच असतो. आपल्या हातून घडलेल्या कृत्याचा पश्चात्ताप त्याला आयुष्यात कधी ना कधी हा होत असतोच.

आपल्या पोटच्या मुलाची रागाच्या भरात हत्या केल्याचा असाच पश्चात्ताप राधाबाईला होत होता. ती तुरुंगात कुणाशीही कधी काहीही न बोलता शून्यात नजर लावून बसून राहत असे. तिची मानसिक व शारिरीक स्थिती दिवसेंदिवस खंगत चालली होती; आणि अचानक एके रात्री चादरीच्या सहाय्याने तिने तुरुंगातल्या शौचालयात फास लावून घेतला.

पहाटे शौचालयात गेलेल्या एका स्त्री कैदीने राधाबाईचा लटकलेला मृतदेह पाहून एकच बोंब ठोकली. संपूर्ण तुरुंगात खळबळ माजली; खरं तर आपण केलेल्या पोटच्या पोराच्या हत्येमुळे पश्चात्ताप दग्ध झालेल्या राधाबाईची मानसिक स्थिती खालावली होती ; आणि त्यातूनच तिने आत्महत्या केलेली. परंतु त्या तुरुंगात वेग-वेगळ्या प्रवृत्तीच्या गुन्हेगार स्त्रिया होत्या. काही जणींना तुरुंग प्रशासनावर विशेषतः तुरुंगाधिकारी रोहिणी मॅडम वर मनातून खूप राग होता. कडक शिस्तीच्या रोहिणी मॅडमच्या अंगावर हे आत्महत्या प्रकरण कसं शेकता येईल, यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली.

तुरुंग प्रशासन आणि तुरुंगाधिकारी रोहिणी मॅडमच्या अत्याचाराने, त्यांच्या अन्यायाने त्रस्त होऊन राधाबाईने आत्महत्या केली, असा कांगावा त्यांनी सुरू केला. काही कैदी स्त्रियांनी आपल्या समविचारी स्त्री कैद्यांना हाताशी धरत तुरुंगात आंदोलन उभारलं.

__आणि त्या आंदोलनाची म्होरक्या होती, 'उर्वशी चॅटर्जी' ..! पैसा आणि संपत्तीसाठी आपल्या सावत्र मुलीची थंड डोक्यानं कट रचून हत्या करणारी... एका श्रीमंत , प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध उद्योगपतीची ..अति प्रसिद्ध उद्योजक पत्नी ...!!

' उर्वशी चॅटर्जी' वयाने जरी प्रौढ असली , तरी त्या वयातसुद्धा तिने स्वतःला सुंदर ठेवले होते. ती अति- महत्वाकांक्षी होती. रक्तातच बंडखोरपणा असणारी, प्रसिद्धी - पैशांसाठी कुठल्याही थराला जाणारी ती एक पाताळयंत्री स्त्री होती. तुरुंग प्रशासना विरोधात बंड करण्यासाठी तिला राधाबाई आत्महत्या प्रकरणाने हातात आयतंच कोलीत मिळालं.

तिला भेटण्यासाठी तुरूंगात मोठ-मोठाली माणसं, नामांकित वकील येत असत. तिने राधाबाई आत्महत्या प्रकरण त्यांच्यामार्फत समाजमाध्यमं तसंच प्रसारमाध्यमां पर्यंत पोहचवलं. बाहेरच्या जगात खळबळ उडाली. जनता खवळून उठली. तुरुंग प्रशासनावर, सरकारवर टिकेची झोड उठली. तुरूंग प्रशासन, राज्य सरकार, बाल आणि महिला विकास खातं झोपेतून खडबडून जागं झालं.

मानवी हक्क आयोगाने ह्या प्रकरणाची दखल घेतली; आणि कर्तव्यनिष्ठ रोहिणी मॅडमच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार उभी राहिली. सरकारकडून ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली.

राधाबाई आत्महत्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली. शेवटी विजय सत्याचाच झाला. मानसिक स्थिती खालावलेल्या राधाबाईचे ज्या मानसोपचार तज्ञाकडे समुपदेशन, औषध उपचार चालू होते त्यांची साक्ष, इतर कैदी स्त्रियांनी दिलेली साक्ष ही त्या प्रकरणात महत्त्वाची ठरली.

अंगावर नामुष्की ओढवणाऱ्या ह्या प्रकरणातून रोहिणी मॅडम सही - सलामत सुटल्या... आणि तुरुंगात कैद्यांना चिथावणी देऊन माथा भडकाऊ आंदोलन करणाऱ्या 'उर्वशी चॅटर्जीची' रवानगी दुसर्‍या तुरुंगात झाली.

दिवसां मागून दिवस, मासां मागून मास, वर्षां मागून वर्षे पुढे सरकत होती. कादंबरीचं अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण होत आलेलं. इतर कैद्यांना त्यांचे नातेवाईक तुरुंगात भेटायला येत असत, परंतु रेणुका आणि कादंबरीला मात्र कुणीही भेटायला येत नसे. मात्र रेणुकाला तिच्या गावातली तिची जिवलग मैत्रीण नेत्रा नेहमीच पत्र पाठवत असे. तिची ख्याली-खुशाली विचारत असे. एके दिवशी नेत्राचे पत्र रेणुकाच्या हातात पडले.

रेणुकाने अतिशय आतुरतेने ते पत्र फोडलं आणि वाचायला सुरुवात केली. पत्र वाचता - वाचता तिचे डोळे भावनाशून्य झाले. ती नकळतपणे खाली बसली. जवळच उभी असणारी कादंबरी धावत तिच्या जवळ आली. तिने रेणुकाला सावरलं. तिच्या हातातले पत्र आपल्या हातात घेत तिने वाचायला सुरुवात केली.

ती पत्रातलं एक - एक अक्षर उत्सुकतेने वाचू लागली; आणि तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागला.. ...नियतीने घेतलेला बदला ..नियतीने दिलेला दगा....आणि रेणुकाला नियतीकडून मिळालेला न्याय....!!

नियतीकडून मिळालेल्या न्यायापासून रेणुका अनभिज्ञ होती. परंतु कठोर नियती ही निष्पापांवर कधीच अन्याय होऊ देत नाही.. कधीचं नाही...!!

रेणुका प्रेमाच्या हत्येची अपराधी नसतानाही गुन्हेगार म्हणून जीवनानानाच्या कट-कारस्थानांमुळे तुरुंगात गेली. प्रेमाचा मृत्यू आणि रेणुकाच्या तुरुंगात जाण्यामुळे आता घरात जीवननाना आणि वेणूआक्का दोघंच उरले होते.

वेणूआक्काला दिवसें दिवस नातवाची स्वप्नं पडत होती. ती जीवननानाला तिसऱ्या लग्नासाठी गळ घालू लागली. पण ह्या वेळेस जीवननाना तिच्या प्रयत्नांना फशी पडला नाही.

वेणूआक्काची मानसिक स्थिती दिवसें दिवस बिघडू लागली. नातू पाहण्याच्या अतृप्त इच्छेने तिच्या मनाचा पूर्ण ताबा घेतला. तिची सारासार विचारबुद्धी हळूहळू नष्ट होऊ लागली. ती एकटीच बडबडू लागली. तिला विचित्र भास होऊ लागले. मृत पावलेली प्रेमा आणि तिचं बाळ तिला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी दिसू लागलं.

बाळाला स्तनपान करणारी प्रेमा, बाळाला पाळण्यात ओव्या गात झोपवणारी प्रेमा, बाळाला आंघोळ घालणारी प्रेमा तिला दिसू लागली. तिचे भास दिवसें दिवस वाढू लागले.

शेजारी-पाजारी, गावकरी वेणूआक्कां पासून लांब पळू लागले. रस्त्यातून येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांचा दगड घेऊन ती पाठलाग करू लागली. खरं तर तिच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीवर मानसोपचार तज्ञाची, उपचारांची गरज होती. लोकांनी जीवननानाला तसं आडून - आडून सुचवून सुद्धा पाहिलं ; पण जीवननानाने लोकांच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं ; कारण मुळातच विकृत आणि विक्षिप्त माणूस होता तो..!!

__आणि एके दिवशी विहिरीच्या काठावर बाळ घेऊन उभी असलेली व तिला जवळ बोलविणाऱ्या प्रेमाचा भास होऊन, ओरडत , ठेचकाळत तिच्या मागे धावत जात... 'माझी प्रेमा... माझा नातू ... 'असं म्हणत वेणूआक्काने मागच्या दारातल्या विहिरीत उडी घेतली.

नियतीने एक जबरदस्त तडाखा जीवननानाला दिला. नियतीने दिलेल्या ह्या तडाख्याने जीवननाना मुळापासून हादरला. जीवननानाच्या आजीचा आणि प्रेमाचा अतृप्त आत्मा त्या विहिरीभोवती फिरतोयं; तो आता त्या घरात जीवननानालाही सुखासुखी राहू देणार नाही, अशी चर्चा दबक्या आवाजात गावात होऊ लागली. ते घर , ती जागा शापित असावी , म्हणून लोक जीवननानाच्या घरापासून, त्याच्यापासून दूर राहू लागले.

जीवनानानाला जबरदस्त मानसिक धक्का बसला; आपल्या आईच्या अश्या अनपेक्षित जाण्याने..! त्याने स्वतःला घरात कोंडून घेतलं. बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध जवळ-जवळ संपला. फक्त कामापुरता तो बाहेर पडू लागला.

त्याने दारामागची विहिर बुजविण्याचा निर्णय घेतला ; आणि तो त्याने तत्परतेने अंमलात आणला सुद्धा...!!

जीवननानाचा विक्षिप्तपणा वाढत चाललेला. त्याचं शरीर कृश बनत चाललं होतं. त्याच्या दाढी-मिशा वाढू लागल्या होत्या. एखाद्या वठलेल्या जुन्या वृक्षाच्या खोडासारखा तो दिसू लागला. आपल्याच तंद्रीत तो शून्यात नजर लावून बसून राहू लागला... आणि एका धुंवाधांर पावसाळ्यातली ती वादळी रात्र जीवना नानासाठी काळरात्र ठरली.

सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे घरामागचं एक जुनं चिंचेचं झाड अचानक कडाकडा आवाज करत कोसळलं ...जीवननाना झोपलेल्या पडवीवर..!! पडवी कोसळली आणि जीवनानानाचा कृश देह त्याखाली दबला गेला. त्याचा जीव शांत झाला ....कायमचाच..!!

एक वर्तुळ पूर्ण झालं. नियतीने खऱ्या अर्थाने जीवननानाला खराखुरा दगा दिला. तिने खऱ्या अर्थाने न्याय दिला.. निष्कलंक , निरपराध रेणुकाला... !!

__आणि जीवननानाच्या पाठी राहिलेली त्याच्या तीन एकर जमिनीची मालकी कायद्याने रेणुकाच्या नावे आली. परंतु तिला कसलाच मोह नव्हता. तुरुंगातून सुटल्यावर पुढे काय करायचं , हे तिने मनोमन पक्क ठरवलं होतं.

तुरुंगातून सुटल्यावर आपल्या गावी जाण्याचं तिने ठरवलं होतं. ती जाणून होती की, गावातले लोक तिच्याशी कधीच वाईट वागणार नाहीत. तिला गावाने गुन्हेगार म्हणून कधीच ओळखलं नसतं; कारण अख्खं गाव जाणून होतं की, प्रेमाच्या मृत्यूला रेणुका कारणीभूत असू शकणारंच नाही , ती हा गुन्हा कधीच करणार नाही...!!

काळ अविरतपणे पुढे सरकत होता. तुरुंगातलं जीणं कादंबरी आणि रेणुकाच्या अंगवळणी पडलं होतं.

एके दिवशी तुरुंगाच्या आवारात एका लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजाकडे कादंबरीचं लक्ष वेधलं गेलं. रडण्याचा आवाज कुठून येतोयं, हे पाहायला ती त्या आवाजाच्या दिशेने निघाली.

क्रमशः

धन्यवाद..!

रुपाली विशे - पाटील
_______________________________________

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा..!!

टिप - १) सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील प्रसंग हे वाचनात आलेल्या वृत्तपत्रातल्या सुन्न करणाऱ्या बातम्या, कधीकधी कानावर पडणाऱ्या कथित कहाण्या यावर आधारीत असून तसेच कल्पनांती रचलेले आहेत. कथेचा प्रत्यक्ष जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत काही साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच कथेत लिहिलेल्या काही प्रसंगांनी मन विचलित होऊ शकतं त्याबद्दल वाचकांची मी मनस्वी दिलगीर आहे. कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा बिल्कुल उद्देश नाही.

२) कथेतील तुरुंग जीवन, तुरुंगातल्या कैद्यांच्या जीवनातील प्रसंग हे पूर्णपणे कल्पनेने रचलेले असून काही संदर्भ, तपशील हे वृत्तपत्रातल्या बातम्या, मासिकातले लेख यावर आधारीत आहेत.

३) कथेतील ह्या भागाचा संबंध माझ्या 'दगा' ह्या कथेशी जुळलेला आहे. वाचक खालील लिंकवर हि कथा वाचू शकतात.
https://www.maayboli.com/node/78246

__________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकदम वाचले मागचे आणि हा भाग. छान चालू आहे कथा. जीवन , विहीर ,सवत हे वाचून कुठंतरी वाचलंय हे आठवत होते तोपर्यंत शेवटी उल्लेख ही आलाच .
"आंदोलनाची मोरक्या होती, 'उर्वशी चॅटर्जी'" --चुकून टायपो झालाय, म्होरक्या हवंय.

छान झालाय हा भाग.
शिर्षक वाचून कल्पना आलीच होती कि आधीच्या कथेतील रेणुका असणार. छान गुंफलेय या कथेत.
उत्कंठा वाढतेय.
पुढील लेखणास शुभेच्छा!

धन्यवाद वर्णिता.. तुझ्या नेहमीच्या प्रतिसादासाठी आणि प्रोत्साहनासाठी...!

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद गं..! दुरुस्त केलीयं..

धन्यवाद गार्गी...
धन्यवाद मृणाली..

भाग आवडला वाचून छान वाटलं...

खरी केस प्लस तुझ्या एका कथेचा रेफसन्स आल्याने पुढे काय होणार ही उत्सुकता वाढलीये . पुभाप्र

छानच....
तुझ्या 'दगा' कथेतील रेणुकाही आल्यामुळे आता पुढील भागाची उत्सुकता वाढली आहे....

छान सुरू आहे कथा. एका सत्यघटनेचे प्रतिसाद कथेत उमटले आहेत ते लक्षात आले आणि दगा कथेचे धागेदोरेही इथे बेमालूम जुळवले आहेस. छान संकल्पना आहे ही.

रानभुली, जाई, लावण्या, मामी ... खूप आभार तुमचे कथा आवडल्याबद्दल..!!

@ रानभुली , मामी...
तुमचा अंदाज अचूकचं आहे.

पुढचा भाग दोन दिवसांनी टाकेन.

मलाही आधीची कथा आठवली. एक गाजलेले खून प्रकरण सुद्धा आठवले.
छान चालू आहे कथा. पुभाप्र.>> असेच म्हणते

सुखदा , दिपक ..!!
धन्यवाद,: तुम्हाला प्रतिसादासाठी..!!

मामी +१

मूळ एक कथानक चालू आहे , त्यामध्ये समाजात घडणाऱ्या घटनांचा समावेश अन त्यामध्ये स्वतःच्याच एक कथेचाही समावेश ...
मस्त आहे हा प्रयोग . एखादा चित्रकार रंगाशी खेळून बघतो तसंच काहीस .
पुलेशु

शब्दवर्षा, शापित आयुष्य ... धन्यवाद तुम्हांला प्रतिसादासाठी.!!

बिपिनजी - धन्यवाद, इतका सुंदर प्रतिसाद वाचून खूप छान वाटलं. मला असा प्रतिसाद कधीच देता आला नसता..!!

छान चालू आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

लेखनशैली छान आहे तुमची. तुम्ही खूप वाचन करत असणार त्याशिवाय इतके छान लिहीता येणार नाही. आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक भागात कथा पुढे सरकत आहे. उगाचच फाफटपसारा टाकून भागांची लांबी वाढवली आहे असे अजिबात वाटत नाही.

दुसरी दगा ही तुमची कथा आधी वाचली होती. ती कथा इथे मस्त जोडलीत. त्या कथेतल्या रेणूकाला शेवटी न्याय मिळाला.

@योगी ९०० >> धन्यवाद , प्रतिसादासाठी..!!

तुम्ही खूप मोठ्या मनानं कौतुक केलंय माझं. पण अगदी खरं सांगू, ह्या चार-पाच वर्षात वेळेअभावी वाचन खूप कमी झालंय माझं .. !! त्याआधी बऱ्यापैकी वाचन व्हायचं, पण आता रोजचं वर्तमानपत्र सुद्धा वेळेअभावी धड वाचता येत नाही.

तरी मायबोली वरचं वेळ मिळेल तसं , जमेल तेवढं वाचते. आणि आवड म्हणून लिहायला वेळ काढते.