दगा

Submitted by रूपाली विशे - पाटील on 4 March, 2021 - 10:54

दगा..!!
_________________________________________

ते गाव तसं शांत होतं. गावातली जनता एकमेकांच्या सोबतीने गुण्यागोविंदाने नांदत होती. आता तुम्ही विचार कराल की, असं गाव फक्त कथेत असतं, वास्तवात कुठे असतं का असं गाव ? पण खरंच होतं असं एक गाव..! अगदी लेखकाच्या कल्पनेत असतं तसंच ..! तर गावातलं एक बडं प्रस्थ म्हणजे जीवननाना .! आता बडं प्रस्थ म्हणायचं कारण म्हणजे भूतकाळात जीवननानांचे आजे- पणजे गावचे प्रमुख होते. इंग्रजांच्या दरबारी चाकरी करणारे. इंग्रजांच्या दरबारी सेवेला असलेले म्हणजे गावात मान- मरातब मिळणारचं!!...गोरे इंग्रज साहेब त्यांच्या दारी पायधूळ झाडत असत. मग काय सगळं गाव जीवननानाच्या आज्या- पणज्याला सलाम ठोकत असे. यथावकाश देश स्वतंत्र झाला आणि इंग्रजांनी आपल्या स्वतःच्या देशाची वाट धरली. परंतू इंग्रज इथून गेल्यावरसुद्धा जीवननानाच्या खानदानाला पिढ्यान - पिढ्या गावात मिळणारा मान काही कमी झाला नाही. पूर्वापार चालत आलेला आदर आणि मान जीवननानाच्या वाट्याला ही आता येऊ लागला होता.

जीवननाना अगदी पाप्याचे पितर..! साधा - सरळ माणूस, कुणाच्याही अध्यात-मध्यात नसलेला. तीन एकर जमीन आपल्या नावावर बाळगून असणारा. गावातच त्याचं सागवानी माळवदांनी आणि विलायती कौलांनी सजलेलं . . वडिलोपार्जित घर होतं. घरासमोर मोठं अंगण आणि मागच्या परसात बारा महिने सदैव पाण्याने भरलेली विहीर तसचं पुढच्या दारी तुळशी वृंदावन.!! घरासमोरचं अंगण, घरामागचा परिसर तरू, लतावेलींनी सजलेला... सुंदर .. नयनरम्य!

जीवननानाच्या पूर्वजांनी इंग्रजांची चाकरी करून त्यांच्याकडून बक्षीस म्हणून लाटलेली गावच्या शिवाराची जमीन; जीवननानाच्या पूर्वजांनी मदिरा आणि मदिराक्षीवर फुंकून टाकली होती. पुढे काही एकर जमीन कुळ कायद्यात गेली आणि उरलेली जमीन वाटण्या होत जीवननानाचे चुलते आणि जीवननानाच्या नावावर झाली होती. तर त्या जमिनीच्या तुकड्यावर जीवनानानाचं तसं बरं चाललं होतं. पण....! बघा, आला की नाही पण... एवढं सगळं चांगलं, सुरळीत चाललेलं असताना माणसाच्या आयुष्यात काही समस्या असायला नको का? तर साध्या- सरळ , भोळ्या-भाबड्या जीवननानाच्या लग्नाला आठ वर्षे होऊनही त्याच्या घरी पाळणा काही हलत नव्हता. ते घर, त्या घरातली माणसं आणि घरापुढचं अंगण लहान बाळाच्या गोड बाळलीला पाहण्यास आसुसलेलं होतं. वैद्य - हकीम, उतारा- धुपारा, उपास-तापास, मंदिर- दर्गा, जत्रा- उरूस, सगळ्या देवांना नवस बोलून झाले पण जीवननानाच्या प्रयत्नांना यश काही मिळेना. शेवटी शहरातला चांगला दवाखाना झाला तरी गुण काही येईना. रेणुका... जीवननानाची सहचारिणी. गुणी आणि लाघवी स्वभावाची रेणुका अजून आपल्या पदराखाली पान्हा फुटत नसल्याने आतल्या आत खंगत चालली होती. बिचारी दैवाला दोष देत होती.

वेणूआक्का, जीवननानाची जन्मदात्री!!. स्वभावाने अतिशय भांडखोर स्त्री होती. गरीब , शांत स्वभावाच्या रेणुकाला वेणूआक्काने ह्या आठ वर्षात तिचा छळ मांडून अक्षरशः बेजार करून सोडलं होतं. वडीलोपार्जित मिळालेल्या जमिनीच्या तुकड्याला अजून वारस नाही म्हणून रेणुकाला ती रोजच टोचून बोलत असे. रोजच्या कटकटींना जीवननाना खूप वैतागला होता. घर - संसार सोडून वैराग्य अंगिकारावे असे विचार त्याच्या मनात ठाण मांडू लागले.

जे नियतीच्या मनात नाही ते आपल्या आयुष्यात कधीच घडू शकणार नाही, मग त्यात आपला आणि रेणुकाचा काय बरं दोष? जीवननाना सदैव चिंतेत राही. पदरी मुलं नव्हतं; तरीही जीवननानाचं रेणुकावर जीवापाड प्रेम होतं. एकमेकांवर असणारा विश्वास आणि एकमेकांवरचं गाढं प्रेम यामुळे त्यांचं नातं पदरी संतती नसतानाही भक्कम होतं. त्यांच्या नात्याचा डोलारा विश्वासाच्या मजबूत पायावर उभा होता; आणि हेच दुष्ट वेणूआक्काच्या डोळ्यांवर येत होतं. तिला फक्त वंशाचा दिवा हवा होता; आपली वंशवेल वाढवण्यासाठी...! आणि रेणुकाकडून आपलं ईप्सित साध्य होईल अशी तिला आता आशा वाटत नव्हती. मग काय करावं बरं? विचार करता- करता तिच्या डोक्यात आलं की, रेणुका जर आई बनू शकत नसेल तर आपण आपल्या मुलाचं दुसरं लग्न करून देऊन हे सुख आपल्या आणि आपल्या लेकाच्या पदरात पाडू शकतो. ह्या विचाराने तिच्या सुरकुतल्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पण तिच्या मनात प्रश्न हा होता की, जीवननाना दुसऱ्या लग्नाला तयार होईल का? तो प्रथम पत्नी रेणुकाशी फारकत घेईल का? तर ह्या प्रश्नांचे उत्तर शंभर टक्के 'नाही'' हेचं होतं. तरीही कावेबाज वेणूआक्काने अंधारात बाण मारायचं ठरविलं. एके दिवशी रेणुका घरात नसताना वेणूआक्काने तिच्या मनातला विचार जीवननानाला बोलून दाखवला. जीवननानाने तिचं बोलणं पूर्णपणे उडवून लावलं. आम्हाला संतती नसली तरी चालेल पण मी रेणुकाला अंतर देणार नाही, असं ठामपणे सांगून त्याने विषय बंद केला. पण माघार घेईल ती वेणूआक्का कसली..! तिने तिच्या परीने प्रयत्न सुरु केले. तिने आता गोडी-गुलाबीने रेणुकाचे मन ह्या गोष्टीसाठी वळविण्यासाठी तयारी सुरू केली.

‌" जीवन तुला काही सोडणार नाही. तू त्याची प्रथम पत्नी आहेस. तुझं स्थान घरात तेच राहील जे सध्याच्या स्थितीला आहे. घराच्या वारसासाठी, आपल्या पतीच्या आनंदासाठी तू एवढंसुद्धा करू शकत नाही का?" कावेबाज म्हातारी वेणूआक्का रेणुकाला भावनिकरीत्या जाळ्यात ओढू लागली. पण तुम्हीच सांगा, कुठली स्त्री एवढ्या सहजासहजी आपल्या जिवाभावाच्या पतीला, त्याच्या प्रेमाला वाटून घ्यायला तयार होईल का बरं? रेणुकासाठी वेणूआक्काचं बोलणं धक्कादायक होतं. आपल्या व्यतिरिक्त आपल्या पतीच्या आयुष्यात दुसरी स्त्री ; ती पण सवतीच्या रूपाने यावी, हा विचारच तिचं काळीज कुरतडवून टाकत होता. जीवननाना आणि रेणुका काही आपल्याला बधत नाही हे पाहून अखेर वेणूआक्काने आपल्या भात्यातील शेवटचं अस्त्र बाहेर काढलं. मी जिवंत असेपर्यंत जर नातवाचं तोंड मला बघायला मिळालं नाही, तर मी त्या मागच्या दारातल्या विहिरीत उडी घेईन. झालं..! शेवटचा बाण जीवननानाच्या बरोबर वर्मी लागला. रेणुकाही वेणूआक्काच्या ह्या पवित्र्याने घाबरली. आपण ह्या घराला वारस देऊ शकत नाही, पतीच्या आयुष्यात संतती सुख देऊ शकत नाही आणि जर का या स्त्रीने ह्या गोष्टीसाठी जीव दिला, तर सगळे लोकं आपल्यावर छी-थू करतील या विचाराने ती धास्तावली. बापडी रेणुका ..! शेवटी टीचभर जमिनीसाठी तसचं घराला वारस मिळावा म्हणून म्हातारीच्या हट्टापुढे रेणुका नमली आणि स्वतःला सवत आणू देण्यास राजी झाली. मनाविरुद्ध का होईना ; तिने जीवननानाला दुसऱ्या लग्नासाठी तयार केलं. पतीचा वंश पुढे चालावा म्हणून रेणुकाने आपला पती, त्याचं प्रेम दुसऱ्या स्त्री सोबत वाटून घ्यायचं ठरविलं. पण तिला खात्री होती की, दुसरी स्त्री जरी आपल्या पतीच्या आयुष्यात आली तरी आपला पती आपल्याला कधीच स्वतःपासून दूर सारणार नाही. पतीच्या काळ्याभोर गहिर्‍या डोळ्यांत तिला नेहमीच तिच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि गहिरा विश्वास दिसत असे. म्हातार्‍या आईच्या हट्टापुढे आणि रेणुकाच्या समजविण्याने जीवननाना अपत्यासाठी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यास तयार झाला. वेणूआक्काने आपल्या माहेरच्या गावातली एक तरुणी जीवननानासाठी हेरून ठेवली होती. 'प्रेमा' तिचं नाव. प्रेमा नावासारखीचं होती ; अगदी कुणीही तिच्या प्रेमात पडावं अशी! जीवननानाला गावात मिळणारा मान आणि त्याच्या एकट्याच्या नावाने असणारी तीन एकर जमीन, त्याच्या घरातली सुबत्ता पाहून गरिबाघरची ' प्रेमा ' मोठ्या सवतीच्या हाताखाली येण्यास तयार झाली. जीवननाना सोबत लग्न करण्यास राजी झाली. दोघांचं देवळात साधेपणानं लग्न झालं. जीवननानाच्या नव्या नवरीला पाहून सगळं गाव आश्चर्यचकित झालं. एवढी सुंदर पत्नी, ती पण दुसऱ्या लग्नावेळी जीवननानाला मिळाली म्हणजे जीवननाना खरंच भाग्यवान म्हणावा की...!! नवऱ्याच्या सोबतीने शेतात जाणारी ' प्रेमा ' लचकत - मुरडत जेव्हा गावातून जात असे ; तेव्हा तिचं सौदर्यं, तिचा ठसकेबाज ताठा पाहून गावातले तरुण - तुर्क, म्हातारे - कोतारे जीवननानाचा हेवा करु लागले. दिवस भराभर उलटत होते. शेवटी 'कानामागून आली अन् तिखट झाली', ही म्हण जीवननानाच्या घरात प्रत्यक्षात आकार घेऊ लागली. माहेरच्या गावातली मुलगी आणि दिसण्यात रेणुकापेक्षा उजवी म्हणून वेणूआक्काचं प्रेमासोबत चांगलं गूळपीठ जमलं होतं. दोघींनी मिळून शांत स्वभावाच्या रेणुकाला छळायला सुरुवात केली. रेणुकाने मोठ्या मनाने प्रेमाला लहान सवत म्हणून स्वीकारले होते; पण धूर्त प्रेमाला मात्र आपल्या पतीवर, घरावर आपला एकटीचा पूर्ण हक्क असावा असं प्रकर्षानं वाटू लागलं होतं. प्रेमा आणि जीवननानाच्या लग्नाला वर्ष उलटलं आणि एकदाची ' ती' गोड बातमी संपूर्ण घराला मिळाली, जे ऐकायला त्या घराचा कोपरा न् कोपरा आसुसलेला होता. प्रेमाला दिवस गेले. वेणूआक्का तर हर्षाने वेडी व्हायचीचं बाकी राहिली होती. प्रेमाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं तिला झालं. रेणुकासुद्धा हया गोड बातमीने आनंदली. आपल्या पोटी नाही; पण प्रेमाच्या पोटी आपल्या पतीचा अंश आकार घेतोय ह्याचं तिला निर्मळ समाधान वाटलं. जीवननाना आता प्रेमाची जास्तच काळजी घेऊ लागला. रेणुकाला हे पाहून
‌प्रेमाबद्दल थोडा हेवा वाटू लागला. फक्त हेवा. ..! तिच्या मनात प्रेमाविषयी द्वेष , मत्सर कधीच नव्हता; पण प्रेमा मात्र तिचा नेहमीच तिरस्कार करीत असे. समंजस रेणुकाला पाण्यात पाहत असे. आता तर गर्भवती राहिल्याने घरात तिचं पारडं जड झालं. घरात तिचीच मर्जी चालू लागली. वेणूआक्काची तिला पहिल्यापासून फूस होती. जीवननानाला घरातला आंधळा कारभार दिसत होता ; रेणुकावर अन्याय होतोय हे समजत होतं ; पण वेणूआक्का आणि प्रेमापुढे त्याचं काही एक चालत नव्हतं. आता एका म्यानात दोन तलवारी कश्या बरं राहणार? तरीही समंजस रेणुका नेहमीच पडती बाजू घेत असे. परंतु धूर्त प्रेमा व भांडखोर वेणूआक्का रेणुकाला घराबाहेर तसंच जीवनानानाच्या आयुष्यातून कसं हाकलून लावता येईल यासाठी कट रचू लागल्या. आणि एके दिवशी दोघींनी संधी साधून प्रेमाचे दागिने चोरीला गेले अशी खोटी आवई उठवली. प्रेमाचे दागिने रेणुकानेचं चोरले आहेत असा धडधडीत खोटा आरोप रेणुकावर त्यांनी लावला. ह्या भांडणात जीवननाना काहीच न बोलता बघ्याची भूमिका घेऊन बसला. त्याला रेणुकावर पूर्ण विश्वास होता; तरीही तो मूग गिळून गप्प राहिला. कावरीबावरी झालेल्या रेणुकाने देवाच्या डोक्यावर हात ठेवला. शपथा घेतल्या; पण त्या दोघी पाताळयंत्री स्त्रियांनी तिला आपली बाजू मांडू द्यायची बिल्कुल संधी दिली नाही. जीवननानाची आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी स्थिती झाली. आपला पती आता पूर्ण बदलला आहे; तो प्रेमाच्या पूर्णपणे कह्यात आहे याची जाणीव रेणुकाला झाली. ती आतून प्रचंड दुखावली. परंतु माणसाच्या सहनशक्तीला काही अंत असतो की नाही? रोजच्या कटकटी, भांडण, अपमान , टोमणे ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळलेल्या रेणुकाने, आता मी अन्याय सहन करणार नाही. यापुढे जर तुम्ही मला त्रास देणं बंद केलं नाही तर, मी तुम्हां सर्वांची पोलिसांकडे तक्रार करून सांगेन की, माझ्या पतीचा प्रेमासोबतचा विवाह हा बेकायदेशीर असून तुम्हां सगळ्यांना मी तुरुंगांची वाट दाखवून देईन,असा निर्वाणीचा इशारा तिने जीवननाना, वेणूआक्का तसचं प्रेमाला दिला. रेणुकाने रणचंडीकेचा अवतार धारण केला. तिचं हे नवीन रूप पाहून जीवननाना चकित झाला. साधी- भोळी रेणुका आपल्याला तुरूंगात धाडण्याची धमकी देते ? कसं शक्य आहे हे?. शेवटी तिच्या इशाऱ्यामुळे जीवननाना नरमला आणि त्याला वाचा फुटली. त्याने तिघींच्या भांडणात मध्यस्थी केली आणि भांडण मिटविले. त्यादिवशी मात्र रेणुकाला आपल्या पतीच्या काळ्या गहिऱ्या डोळ्यांत दुःखाची अंधुक रेघ उमटलेली दिसली. पतीचा आपल्यावर असलेला विश्वास कमी झाल्यासारखं जाणवलं. आपल्या पतीला रागाच्या भरात धमकी दिल्याचा पश्चाताप तिला होऊ लागला. रागाच्या भरात का होईना आपण असं बोलायला नको होतं; असं तिला राहून राहून वाटू लागलं. त्या गोष्टीचं तिला मनस्वी वाईट वाटलं. त्या दिवसांपासून जीवननाना घरात रेणुकाशी तुटकपणे वागू लागला. कालचक्र वेगाने फिरत होते. दिसामाजी प्रेमाच्या पोटात नवा अंकुर चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत होता. घरातलं वातावरण शांत, गंभीर झालं होतं. परंतु ते कदाचित वादळापूर्वीची शांतता असल्यासारखं रेणुकाला जाणवू लागलं. रेणुकाने आता परिस्थितीशी हातमिळवणी केली होती. सगळ्या मनस्ताप देणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची सवय तिने स्वतःला लावून घेतली. आणि अचानक एके पहाटे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अघटीत घडलं. मागच्या परसातील विहिरीत पहाटेच्या अंधारात पाणी शेंदताना सहा महिन्यांची गर्भार असलेली प्रेमा पाय घसरून विहिरीत पडली. बराच वेळ प्रेमा घरात आली नाही म्हणून वेणूअक्का तिच्या काळजीने घराबाहेर आली. विहिरीबाहेर अर्धवट भरलेली पाण्याची बादली पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. ती घाबरतच विहिरीजवळ आली. धडधडत्या छातीने तिने विहिरीच्या आत डोकावलं अन् पाण्यावर तरंगणारं प्रेमाचं कलेवर पाहून ती जागेवरच किंकाळी फोडून कोसळली. गोठ्यात गाईचं पहिल्या धारेचं दूध काढणारी रेणुका धावत मागच्या दारी आली. तिने विहिरीत डोकावलं आणि समोरचं दृश्य पाहून तिचं काळीज फाटलं. तिने आरडाओरडा केला. सगळं गाव विहिरीभोवती जमा झालं. समोरचं दृश्य पाहून जीवननाना पुतळ्यासारखा उभा होता. त्याला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला. कुणीतरी पोलिसांना कळवलं. पोलीस आले. मृत झालेल्या प्रेमाला विहिरीतून बाहेर काढलं. गर्भार असलेल्या प्रेमाचं पाण्यात बुडल्यामुळे पोट अजूनच फुगून आलेलं पाहून सगळं गाव हळहळलं. बऱ्याच वेळाने शुद्धीवर आलेली वेणूआक्का मृत झालेल्या प्रेमाच्या देहाला पाहून छाती बडवून आक्रोश करू लागली. अचानक रडता- रडता तिने तारवटलेल्या डोळ्यांनी रेणुकाकडे पाहत अश्रू ढाळणाऱ्या बेसावध असलेल्या रेणुकावर झेप घेऊन तिचा गळा पकडला.

‌" कैदाशीण, तूच मारलसं माझ्या प्रेमाला ! तुला नको होती ती या घरात ... घात.. घात केलास तू तिचा..! कुठे फेडशील हे पाप ..! जीवन, अरे.. ही...हीच सटवी कारणीभूत आहे प्रेमाच्या मृत्यूला. माझ्या पोराच्या वाट्याला येऊ पाहणारे सुख हिने उध्वस्त केलं. प्रेमाला विहिरीत हिने ढकलयं.! मी.. मी पाहिलं माझ्या डोळ्यांनी ..! " कांगावाखोर वेणूआक्काने रेणुकाला पोलिसांसमोर व अख्ख्या गावासमोर गुन्हेगार म्हणून उभं केलं. रेणुका सासूच्या हया आरोपाने कोलमडली. आपण निर्दोष आहोत हे घसा फोडून सगळ्यांना सांगू लागली. रेणुकावर केलेल्या ह्या आरोपाने जीवननाना चमकला. रेणुका असं काही करू शकेल? त्याच्या डोळ्यांत रेणुकाविषयी अविश्वास दिसू लागला. अखेर रेणुकाने निश्चल बसलेल्या आपल्या पतीकडे धाव घेतली.

" तुम्ही तरी विश्वास ठेवा हो माझ्यावर ...! मी गुन्हेगार नाही. एवढं मोठं पाप माझ्या हातून खरंच घडेल का हो? तुम्ही तरी सांगा ना सगळ्यांना..! ! गप्प का आहात? बोला ना काहीतरी! " रेणुका केविलवाण्या स्वरात रडत जीवननानाला विनवू लागली; पण जीवननाना जिवंत पुतळा बनला होता. रेणुकाने आपल्या पतीच्या मोहात पाडणाऱ्या काळ्या गहिर्‍या डोळ्यात एकवार नजर घालून पाहिलं. आज ती नजर तिला वेगळी भासली. त्या नजरेत तिच्याविषयी कमालीचा अविश्वास, तिरस्काराची झाक दिसू लागली. ती जीवननाना पासून मागे सरकली.
गमावलं... सारं काही गमावलं ...! जे नातं विश्वास आणि प्रेमाच्या पायावर उभं होतं, त्या नात्याचा पायाच क्षणात कोसळला. प्रेमाच्या मृत्यूला रेणुका जबाबदार आहे हे असत्य जीवननानाच्या आणि पोलिसांच्या मनावर ठसवून देण्यात कावेबाज वेणूआक्का यशस्वी ठरली. आता गुन्हा घडताना प्रत्यक्ष पाहिलेल्या साक्षिदारानेचं साक्ष दिल्याने निष्पाप रेणुकाची निर्दोष बाजू कमी पडली. पोलिसांनी पंचनामा केला आणि प्रेमाच्या अनैसर्गिक मृत्यूची संशयित गुन्हेगार म्हणून रेणुकाला आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सोबतीने रेणुका पोलिसांच्या गाडीच्या दिशेने चालू लागली. घरातून निघताना तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही; पण जाताना तिने एक मात्र केलं.. पतिव्रता असलेल्या रेणुकाने आपल्या गळ्यातलं पतीच्या नावाचं मंगळसूत्र आणि हातातल्या हिरव्या बांगड्या काढून तुळशी वृंदावनाजवळ ठेवून त्या तुळशीला मनोभावे वंदन केलं. ज्या नात्यातला विश्वास संपला, ज्या नात्याला आता काही भवितव्य उरलं नव्हतं; ते नातं जोडून ठेवण्यात तिला काडीमात्र रस वाटेना. संपूर्ण गाव ही सारी घटना पाहून हळहळत होतं. अख्खं गावं जाणून होतं की, रेणुका प्रेमाच्या मृत्यूला जबाबदार असणारचं नाही. ती हा गुन्हा करणार नाही. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? कजाग वेणूआक्कापुढे कुणाला काही म्हणायची सोय नव्हती. हे सगळं वेणूआक्कामुळेचं घडतयं असं गावकरी एकमेकांत कुजबुजू लागले. बऱ्याच वर्षापूर्वी वेणूआक्काच्या छळापायी तिच्या सासूने घरामागच्या विहिरीत उडी घेतली होती आणि तिचा अतृप्त आत्मा आता वेणूआक्का आणि जीवनानानाला अश्या रितीने नडतोयं असं सगळे म्हणू लागले. साऱ्या गावाला जीवननानाबद्दल कणव दाटून येत होती. नियती पण किती क्रूर असते ना ? हातातोंडाशी आलेला सुखाचा घास कसा एका झटक्यात निर्दयीपणे ओढून नेते. देवाने आता जीवननानाला दुःख पचवायची ताकत देवो.. ! अशी कामना सारे करू लागले.

प्रेमाचं उत्तरकार्य झालं. नातेवाईक, गावकरी बारा दिवस जीवननानाचं सांत्वन करून आपापल्या घरी मार्गस्थ झाले. त्या रात्री लाकडी खुर्चीवर प्रेमाचा फोटो ठेवलेला होता; आणि त्या फोटोपुढे समईची वात मंद तेवत होती ... त्या तेवणाऱ्या समईच्या मंद प्रकाशात फोटोतील प्रेमाचा चेहरा उजळून निघालेला होता. जीवननाना एकटाच प्रेमाच्या फोटोपुढे बसून राहिला होता. आपलं दुःख एकाकीपणे पचवत..! जीवननाना बसल्या जागेवरून उठला. घरातल्या जुन्या शिसवी कपाटातल्या चोर कप्प्यातून त्याने रेणुका आणि त्याच्या लग्नाच्यावेळी हौसेने जोडीने काढलेला फोटो व एक घडी घातलेला कागद बाहेर काढला. तो फोटो आणि कागद घेऊन प्रेमाच्या फोटो पुढे तो पुन्हा येऊन बसला. समईच्या उजेडात तो हातातला फोटो आपल्या अश्रूभरल्या डोळ्यांनी निरखत पुटपुटू लागला, " रेणुका, का वागलीस गं अशी तू? किती विश्वास होता माझा तुझ्यावर! पण तू विश्वासघात केलास माझा. मला तुरुंगात धाडण्याची धमकी देत राहिलीस.. आणि बघ , नियतीने कसा डाव फिरवला .. माझ्याऐवजी तू गेलीस तिथे ..आपल्या कर्माने...! विश्वासघातकी आहेस तू..! " आणि जीवननानाने रेणुकासोबतचा तो फोटो फाडून फेकून दिला. भरले डोळे पुसत जीवननाना प्रेमाच्या फोटो समोर येऊन बसला. हातातला कागद समईच्या उजेडात धरून पुन्हा- पुन्हा पाहत, त्या कागदावरील अक्षरं वाचत तो पुटपुटू लागला,

" चांडाळीण, दगा.. दगा दिलास तू मला ...! कुलटा, व्याभिचारी स्त्री.. माती खाल्लीस तू.. जे माझं नाही ते पाप माझ्या माथ्यावर मारायला निघाली होतीस ? सारी लाज कोळून प्यायलीस.. निर्लज्ज नार..!! हिचं शिक्षा योग्य होती तुला.. तुझ्या कर्माचं फळं तुला दिलं मी..!" जीवननानाचे गहिरे काळे डोळे क्रुद्ध बनले होते. त्या खोल डोहासारख्या भासणाऱ्या डोळ्यांत विक्षिप्तपणाची चमक झळकू लागली. हातातल्या त्या कागदावर शहरातल्या डॉक्टरने लिहिलेला तो शेरा पुन्हा एकदा वाचून त्याच्या हृदयात दुःखाची कळ आली. त्याचे डोळे तो पेपर वाचून पुन्हा एकदा भरून आले...अंतरीच्या वेदनेने, आपल्यातल्या कमतरतेने..! आयुष्यात कधीच बाप बनू शकणार नाही हा शेरा पुन्हा एकदा वाचून तो कागद जीवननानाने मंद तेवणाऱ्या समईच्या ज्योतीवर धरला. कागद पूर्ण जळला. जीवननानाचं गुपित आता त्याच्यापुरतचं राहणार होतं. त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं एका विकृत आनंदाचं..!! एका दगडात दोन पक्षी.. नव्हे.... दोन पक्षिणींची शिकार केल्याचं विक्षिप्त , विकृत समाधान त्याच्या चेहर्‍यावर झळकू लागलं. त्या समाधानाने झळकणारा त्याचा चेहरा त्या समईच्या उजेडात भयाण दिसू लागला. क्रुद्ध झालेले त्याचे डोळे अचानक पाझरू लागले.. आपल्या आजीच्या प्रेमळ आठवणींनी..! जीवननाना लहान मुलासारखा रडू लागला.

"आजी...! किती लाडका होतो गं मी तुझा? किती प्रेम करायची तू माझ्यावर ...आणि मी तुझ्यावर..! पण तू का गं अशी वागलीस? आपल्या लाडक्या जीवूसोबत? जमिनीची वाटणी करताना दुजाभाव केलास तू. चांगली सुपीक जमीन अण्णांच्या नावे केली आणि गावच्या शेवटच्या टोकावरची खडकाळ जमीन माझ्या नावावर....तू सुद्धा दगा दिलास मला..! तुलाही तीच शिक्षा योग्य होती. तुम्ही सगळ्यांनी मला दगा दिला. विश्वासघातकी आहात तुम्ही सगळ्याजणी.. तुमचा हिशोब बरोबर झाला...! " जीवननाना गडगडाटी हसू लागला.. त्याचं ते भयाण हास्य राक्षसाच्या हास्यालासुद्धा लाजवेल असं होतं ...आणि तिथे मागच्या पडवीत ढाराढूर झोपलेली वेणूआक्का स्वप्नं पाहत होती... नव्या सुनेची आणि तिच्या पोटी येणाऱ्या आपल्या नातवाची..!! आपल्या सासरच्या वडिलोपार्जित जमिनीच्या टिचभर तुकड्याच्या वारसाची..!

समाप्त..!!

धन्यवाद..!!

रुपाली विशे- पाटील
rupalivishepatil@gmail.com

_________________ XXX_________________

(टिप - सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेद्वारे कुणाच्याही भावना दुखविणे हा कथा लेखिकेचा उद्देश नाही.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे! अंगावर काटा आला.
गावोगावच्या अशा काही घटना ऐकून आहे. त्यामुळे वाचताना खरंखुरं बघतेय असं वाटलं
लेखणीला सलाम!!

रात्री ही कथा वाचून झोपले
मला स्वप्नात पुढची कथा दिसली, त्यात रेणुकेला न्याय मिळाला होता Happy

छान लिहिली आहे

Lol .. मस्त.
फक्त ह्या 'जीवननाना'चे काळेभोर , गहिरे, टपोरे, भावपूर्ण वगैरे डोळे.. काही केल्या इमॅजीन करता येत नाहीएत....!!!

भारीच गोष्ट!
हरवून जायला होतं तुझ्या कथा वाचताना !!मलाही अजिबात अंदाज आला नाही शेवटाचा !!!

मोहिनी - धन्यवाद.. तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी!

रानभूली - धन्यवाद .. छान प्रतिसाद . तुझ्या कथेची वाट बघतेयं .
.
लावण्या - धन्यवाद.. तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी
मामी - धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

सिमंतिनी - धन्यवाद.. ! भारी प्रतिसाद दिलास तू.. खरचं, माझ्या लक्षातचं नाही आलं जीवननानाच्या नावाबद्दल .. !

कविन - धन्यवाद .. छान वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून..!

अस्मिता - धन्यवाद.. तुझ्या नेहमीच्या प्रोत्साहनपर
प्रतिसादासाठी!

रीया - धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

साधा माणूस - .. धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

नताशा - धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

स्वस्ति - धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..

मला वाटतं , तुमच्या प्रश्नाचं उत्तर कविनने तुम्हांला दिलयं .. धन्यवाद कविन.!

किल्ली - धन्यवाद.. छान प्रतिसाद आहे .कथेवरचा .. पुढे काही सुचलं तर रेणुकाला न्याय द्यायला हरकत नाही.

आंबट-गोड - धन्यवाद तुम्हांला प्रतिसादासाठी.. तुमची शंका अगदी रास्त आहे ; पण कथेत नेहमी घाऱ्या, तपकीरी, करड्या रंगाच्या डोळ्यांनाचं का बरं लबाड ठरवायचं म्हणून कथेत काळ्या रंगाच्या डोळ्यांचा आधार घेतला आणि कदाचित तसं नसतं केलं तर कथेतलं गूढ कमी झालं असतं.

बन्या - धन्यवाद , कथेवरच्या तुमच्या प्रामाणिक प्रतिसादासाठी.. पुढे कधी सुचलं, तर तुमच्या चेहर्‍यावर हसू येईल अशी कथा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.. त्यावेळी मी तुमच्या प्रामाणिक प्रतिसादाची नक्की वाट पाहीन.

वावे - धन्यवाद .. तुला कथा आवडल्याबद्दल..!

नंबर एक वाचक - धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

मृणाली - धन्यवाद.. तुझ्या नेहमीच्या प्रतिसादासाठी ..
तुझ्या प्रतिसादाची नेहमीचं वाट बघते.

शितल -धन्यवाद .. तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

स्नेहा, अंकू, चैत्राली ..!
खूप धन्यवाद तुम्हांला कथा आवडल्याबद्दल..!

सामो, स्वातीताई..!
खूप धन्यवाद... तुमच्या नेहमीच्या प्रोत्साहनपर प्रतिसादासाठी.!

mast

मस्त सूडकथा. शेवट असा असेल याचा अंदाज मला नाही आला. रेणुका पुढे काय ऍक्शन घेईल याची कथा पण वाचायला आवडेल.

मस्त लिहलीय कथा..आवडली..!
सगळी पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली. शेवट असा असेल असे वाटलेही नाही.

Pages