तांदळाचे पापड

Submitted by जेसिका on 15 April, 2021 - 06:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ कप पाणी
२ कप तांदळाच पीठ
१ टीस्पून जिरे
५-६ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून मीठ
२-३ टीस्पून पापडखार

क्रमवार पाककृती: 

१. मिक्सरच्या भांड्यात जिरे, हिरवी मिरची घालून जाडसर भरड काढा. पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात हि भरड घाला. नंतर मीठ व पापडखार घाला. तांदळाचे पीठ चाळणीने चाळून घ्या.
२.आता पाण्याला उकळी आली कि तांदळाचे पीठ घालून एकजीव करा. मग गॅस बंद करून झाकण ठेवून २ मिनिटे ठेवा. नंतर परातीत पीठ काढून हलकेच मळून त्याचे लांबट आकाराचे मुटके बनवून चाळणीला थोडा तेलाचा हात लावून त्यात हे मुटके लावून त्याला बोटाने भोक पाडून घ्या, म्हणजे ते आतपर्यंत वाफवले जातील. हे मुटके १५ मिनिटे वाफवून घ्या.
३. वाफवून झाले कि एकेक मुटके काढून वाटीने दाबून गुठळ्या सोडून घ्या. चांगल मळून त्याचे छोटे - छोटे गोळे बनवा. (इथे एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे कुठेही तेलाचा वापर केला नाही, कारण तेलाने पापडाला खवट वास येतो मग ते जास्त दिवस टिकत नाही.)
४.आता दोन प्लास्टिक पेपर घेऊन एका प्लॅस्टिकवर गोळा ठेवून त्यावर दुसरे प्लास्टिक ठेवून वरून वाटीने गोलाकार फिरवा म्हणजे ते लाटल्यासारखे दिसेल. वरचे प्लास्टिक काढून पापड दुसऱ्या एका मोठया प्लास्टिक पेपरवर केलेले पापड ठेवून उन्हात सुकायला ठेवा. एक दिवसानंतर पापड उलटवून दुसरी बाजू सुकवा असे चार दिवस कडक उन्हात वाळवून घ्या. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि वर्षभर वापरा. हवे तेव्हा काढून भरपूर तेलात तळा. भरपूर तेलात एवढ्याच साठी की हे पापड दुप्पट आकाराने फुलतात. हे पापड असेच खायलाही रुचकर लागतात.
५.वाळलेले पापड व तळलेले पापड बघा कसे छान फुलून आलेत ते (म्हणूनच छोटे छोटे पापड करा)

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.

आई गुजराथी पद्धतीने तांदुळाचे पापड करायची, ढोकळयासारखी थाळी करून मग त्याचे पापड करायची, सारवडे म्हणतात बहुतेक त्याला. एक थाळी आम्हाला खायला ठेवायची, पापडनो लोट खायला मजा यायची. झरझर लाटलेही जायचे हे पापड. लाटायला आणि वाळवायला आमची मदत.

Mrunali पापडखार पांढरया रंगाची पुड असते जी पापड सांडगे मध्ये ते फ़ुलून येण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी वापरतात.
मी चिन्मयी तुमचे पापड मस्त झालेत..
तुमचे फोटो बघून मला ही हे पापड करायची इच्छा झाली.
यात तांदळचे पिठ कसे तयार केले. नुसते तांदूळ दळुन का ते 2 दिवस भिजत घालून वाळवुन म दळुन

यात तांदळचे पिठ कसे तयार केले. नुसते तांदूळ दळुन का ते 2 दिवस भिजत घालून वाळवुन म दळुन>>> अमुपरी, तांदूळ एकदाच धूवुन सुकवुन घेतले होते फक्त. भाकरीसाठी दळलेलं पीठ होतं. तेच वापरलं मी.
ते दोन दिवस भिजत घालून वगैरे तांदळाच्या पापड्या बनवतात बहुतेक. जाम किचकट. त्यापेक्षा हे बरं. सोपं, सुटसुटीत.