व्हिएतनाम - देश फुलांचा!

Submitted by भास्कराचार्य on 3 April, 2021 - 01:25
व्हिएतनामी नववर्ष

खरं म्हणजे अमेरिकन संस्कृतीमध्ये काही वर्षं घालवलेली असल्याने व्हिएतनाम म्हटलं, की युद्धाचीच आठवण होते. माझ्या एका प्राध्यापकांना युद्धविरोधी निदर्शनांत अटक झाली होती म्हणूनही असेल. खरंतर इतक्या सुंदर देशाबद्दल विचार करताना युद्धाची आठवण येणे ह्यासारखा दैवदुर्विलास वगैरे नाही. मी पोचलो, तो नववर्षस्वागताचा आठवडा. 'टेट' हा इथला वसंतागमनाचा सोहळा. आपल्या चैत्रासारखा. बर्‍याच पूर्व आशियाई देशांत हा वसंतागमनाचा सोहळा चांद्र नववर्षानुसार जानेवारी/फेब्रुवारीमध्ये असतो. चिनी ल्युनार न्यू यिअर वगैरेची कल्पना होती. तसा इथे हा टेट. पण 'हॅपी टेट' वगैरे म्हणत नाहीत. तिथे मात्र 'च्युक मुंग नाम मोई' असं काहीतरी कडबोळं वाढून ठेवलं होतं. 'चुकभूल द्यावी घ्यावी'चा हा व्हिएतनामी अवतार असावा, असं मी माझ्या मराठी मनाला सांगितलं, आणि समोरच्या व्हिएतनामी मनाकडे बघून हसलो. सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं. व्हिएतनामी आबालवृद्ध पारंपरिक वेशात सजले होते. फोटो वगैरे काढायची अहमहमिका लागली होती. ह्या अहमहमिकेखातीर आम्हीही थोडे काढून घेतले असतील. नाहीतर आम्हाला काही तशी हौस वगैरे नाही, हो!

अश्या उत्सवी वातावरणात लक्ष वेधून घेतलं, ते व्हिएतनामी धरतीने. अश्या सुंदर सुवेळी ही साजरी धरती कशी बरं मागे राहील? एक तर हा विषुववृत्ताजवळ असलेला देश. त्यामुळे सस्यश्यामला अशी ही पृथ्वी आपल्या विविधरंगी वेधक स्वरूपात आपलं राजस सम्राज्ञीपण इथे मिरवत राहते. अगदी हो चि मिन्ह सिटीसारख्या शहरातसुद्धा ही रूपे क्षणाक्षणाला मन मोहून घेत राहतात. दुकानांच्या दारोदारी सुबक झाडं आपला डोलारा सावरत उभी होती. जर्दाळूची ओळख मुंबईतल्या माणसाला किराणा दुकानातच होत असावी, पण इथे पाहतो तर ठिकठिकाणी पिवळी जर्दाळूची फुलं तोंडभरून 'याऽ' म्हणत हसत उभी होती. लहान मुलाच्या हातातून खेळता खेळता चेंडू अलगद खाली पडावा, तसं अलगद मध्येच एखादं टपोरं फूल पायाशी वाहून घेत होतं. कुठेतरी एखादं फूल दगडाच्या फटीत दडून बसत होतं. मला रेव्हरंड टिळकांच्या 'मी प्रेमें वदलो त्याशी, का येथें दडुनी बसशी -- प्रिय फुला?' ओळी आठवल्या. 'दिसण्यांत फार ते साधे, परि आमोदें, जगामधिं पहिलें -- जगामधिं पहिलें; मन माझे मोहुन गेलें -- किति तरी!' अशी त्या कवीची भावावस्था होण्यामागचं कारण पुन्हा नव्याने जाणवलं.

कुठेतरी एखाद्या दुकानाच्या भिंतीवर एखादं रोपटं हळूच वाढताना दिसत होतं. ही रोपटी मोठी द्वाड असतात नाही? कुठेतरी मूळ धरतात, 'कसं होणार ह्याचं वार्‍यापावसात?' अशी उगीच चिंता करायला लावतात, आणि बघता बघता अशी मोठी होतात, की ज्याचं नाव ते! मध्येच एखादी बोगनवेल आपला पुष्पसंभार खांद्यावर माळून उभी असलेली दिसायची. एवढंच काय, नदी ओलांडणार्‍या पुलाच्या सुरवातीला एक गरती केळसुद्धा वजनाने थोडी वाकलेली, थोडी नाजूक अशी श्रांत उभी होती. तसं भरपूर शहरीकरण इथं झालेलं आहे, पण ह्या झाडांना अजून धक्का लागलेला नाही. वास्तविक आदल्या दिवशीच आम्ही व्हिएतनामचे प्रसिद्ध 'कु चि बोगदे' बघून आलो होतो. अमेरिकन सैन्यापासून दडून राहण्यासाठी व्हिएतकाँग सैन्याने जमिनीत खणलेलं हे बोगद्यांचं जाळं. ते नष्ट करण्यासाठी अमेरिकनांनी 'कार्पेट बाँबिंग'खाली तो सगळा भाग अक्षरशः जाळून काढला. त्यात 'इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा' म्हणत जंगलातली झाडंही मृत्यूमुखी पडली. आता तिथे पुन्हा नव्यानं झाडं लावली आहेत, पण कुठेकुठे खुरटलेली, अर्धवट तुटलेली झाडं दिसत राहतात. शेकडोंच्या संख्येने उभे असलेले अर्धेमुर्धे तुटके बुंधे फोटोंमध्ये आपल्याभोवती घोंघावत राहतातच. अमेरिकनांनी पुढचामागचा विचार न करता वापरलेल्या 'एजंट ऑरेंज'सारख्या विषारी नर्व्ह गॅसमुळे अशीच एक पिढी अर्धीमुर्धी जन्माला आली होती. ती अपुरी बालशिल्पे, आणि ही झाडांची अपुरी काष्ठशिल्पे! हे साम्य व्हिएतनामी मनांना बोचत असेल का? कदाचित त्यामुळेच अजूनही ते झाडांना आपल्या फायद्यासाठी हात लावायला धजावत नसतील का? शेवटी माणूस युद्ध, दंगे, त्यातून होणारी अपरंपार हिंसा, ह्यातून कधीतरी काहीतरी धडा घेतो का? कोणास ठाऊक!

destroyedtrees.png

गावाबाहेर पडताना अनेक लोक आपापल्या दुचाक्यांवर कुंडीमध्ये छोटी झाडं घेऊन निघालेले दिसत होते. बर्‍याच झाडांना संत्र्यासारखी छोटी फळं लगडलेली दिसत होती. लांबून पिवळसर नारंगी दिसणारी ही झाडं होती. काही झाडं त्या पिवळ्या जर्दाळूची दिसत होती. हा काय प्रकार म्हणून चौकशी केली, तर कळलं, की कमक्वाट नावाची ही फळं वसंतागमनाच्या समारंभासाठी फार महत्त्वाची. व्हिएतनामी समाजात ती निसर्गाच्या फलदायित्वाचं प्रतीक आहेत. नशीब आणि आरोग्य चांगलं व्हावं, म्हणून बैठकीच्या खोलीत ही झाडं ठेवण्याची परंपरा आहे. एकमेकांना भेट म्हणूनही ती दिली जातात. कुठे त्या नतद्रष्ट एजंट ऑरेंजची आठवण, आणि कुठे ही सुंदर गोड संत्र्यासारखी फळं! जीवनाची, निसर्गाची फळण्याची उर्मी दर्शवणारी ही फळं कुणीकडे, आणि कुठे त्या फळांसारख्याच गोड मुलांच्या आयुष्यात वाळवंट आणणार्‍या माणसाच्या नालायक प्रवृत्तीला दिलेलं तसंच नाव. पण शेवटी 'मृत्योर्मा अमृतम् गमय' म्हणणारा माणूससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जहाल विचारसरणीच्या बंधनातून माणसाला मुक्त करा, तो ह्या पृथ्वीवर बागा फुलवील, नंदनवन आणेल. ही सोन्यासारखी फुलं, फळं एकमेकांना देऊन नवीन वर्षाचं स्वागत करण्याची वृत्ती माणसात काही उगाच दिसत नाही. 'सोन्यासारखी' म्हणजे अगदी सोन्यासारखी बरं का! ही पिवळी झाडं प्रमुख असण्याचं कारण तेच आहे. सोन्यासारखा पिवळा रंग व्हिएतनाममध्ये समृद्धी आणि आरोग्याचं लक्षण म्हणून ओळखला जातो. त्यातून ते पिवळे जर्दाळू म्हणजे व्हिएतनाममध्ये सर्वात आधी फुलणारी झाडं. शिशिरातल्या शुभ्रतेवर विजय मिळवणारं हेच झाड. ह्याच्या तर प्रत्येक पाकळीला अर्थ आहे. दीर्घायु, संपत्ती, शांती, आरोग्य, आणि सच्छीलता ही पंचतत्त्व ह्या पाच पाकळ्यांमध्ये सामावली आहेत म्हणा ना!

1a8c84d2a35758bcebe5564be7315517.jpg

पण फक्त पिवळ्याच रंगाला सगळा मान जातो असं काही नाही हं! पीच फुलांचासुद्धा काय बहर असतो म्हणून सांगू! माणसाच्या चेतनगुणोक्तीमध्येही काय गंमत असते. पीचसुद्धा व्हिएतनामात फार लवकर बहरतो. पण पीचला मात्र व्हिएतनामात जर्दाळूसारखं नाजूक वसंताचं प्रतीक समजत नाहीत. पीचच्या झाडाला इकडे निधड्या छातीचं मानलं जातं. त्यामुळे पिवळेधम्मक जर्दाळू आणि गुलाबी पीच अशी परस्परविरोधी तरी एकमेकांत मिसळून जाणारी रंगसंगती आणि योजना कितीतरी वीजीगिषु दुकानदार आणि घरमालकांनी केली होती.

2-3504-1485241491.jpg

खरंच, माणसाची सौंदर्याची ओढ किती किती रूपांनी समोर येते. कितीतरी वेळा त्याचीच नित्योपासना मानव वेगवेगळ्या तर्‍हेने करत असतो. अगदी देवांनासुद्धा मानव स्वतःच्या हस्ते अलंकार चढवत असतो, त्यांची पूजा करत असतो. धरतीच्या बाबतीत तरी तो कसा मागे राहील? भल्या पहाटे शाल पांघरून एकसुरात देवीची काकडआरती करणारे तिचे काकडणारे भक्तच धरणीमातेची पूजा करून तिच्या विश्रांतीच्या वेळात तिची मशागत करत असतात. तिच्या अंगावर कुठे तण राहणार नाही, कुठे कुठली ढेकळं उगवणार नाहीत, ह्याची दक्षता घेत असतात. पुन्हा दिवसाची सुरूवात होण्याच्या वेळेस सकाळी घंटानाद करून महापूजा करणारे भक्त देवीला स्नान घालतात, मूर्तीचा कुंकूने मळवट भरून तिला सजवतात. हेच भक्त त्यांच्या जमिनीची अशीच काळजी घेत नाहीत का हो? पेरणीच्या मोसमाची चाहूल लागली, की जमिनीचं मार्जन करून तिला साफ करून तिला येणार्‍या पिकासाठी सजवायचा असाच सोहळा असतो. पुन्हा माध्यान्हवेळेस देवीची पूजा होते, तिच्या भक्तांचे अभिषेक होतात. पेरणी अन् लावणी झाल्यानंतर जेव्हा पर्जन्यराज धरणीला अभिषेक करतो, तेव्हा असंच समाधान तिच्या भक्तांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत असतं. या महापूजेच्या वेळेस भक्त देवीला नैवेद्य समर्पित करतात. तीही उदार मनाने त्याच्या शंभरपट प्रसाद भक्तांना देऊ करते. मूठमूठ धान्य देवीला अर्पण करून पोतीच्या पोती घरी घेऊन जा म्हणून सांगते. ह्यानंतर देवीचे भक्त स्वतःच्या कुशलतेने तिला अलंकार चढवतात, आणि अलंकारपूजा करतात. तसेच ते स्वतःच्या कष्टाचे घामाचे मोती स्वतःच्या शेतात राबून त्या पृथ्वीला अर्पण करतात. त्या भक्तांच्या कष्टाने सोनसळी पीक झळाळून उठतं, आणि सुंदरतेची लेणी लेऊन ती भूमी मंद हसत उभी असते. देवीची नंतर रात्रीची पूजा असते. पंचोपचारयुक्त पूजा होऊन तिचे दागिने उतरवून जामदारखान्यात काळजीपूर्वक नेले जातात. डोळे भरून हा सोहळा पाहणारा भक्तगण अशीच योग्य वेळ आली, की झोडपणी, मळणी वगैरे उपचार करून आपलं धान निगुतीने साठवून ठेवत असतो. आणि शेवटी अगदी रात्री देवीची शेजारती असते, त्या वेळेस समस्त भक्तवर्ग देवीच्या शयनासाठी शेजारती म्हणून, तिला विडा ठेवून पाण्याचं तांब्याभांडंही ठेवतो. तिला विश्रांती घेण्यासाठी विनवतो. आणि मग प्रतीक्षा असते, ती पुढील काकडआरतीची. धरणीमायेची विश्रांती घ्यायची वेळ आली, की तिचा भक्त अशीच काळजीने तिच्या शांत झोपेसाठी खपतो. पुढील हंगामापर्यंत धरतीला कस पुन्हा मिळण्यासाठी तिच्या सुखनिद्रेसाठी प्रार्थना करतो. आणि पुढच्या हंगामाची वाट पाहतो!

ह्या सर्वांतून विश्वव्यापी आदिचेतनेचे पूजन होत असते. जणू ही आदिशक्ती सचेतन होऊन आपल्या बहिर्चक्षूंपुढे हसत उभी असते. ही मातृरूपी शक्ती धरणीमधून आपल्याला पालवीत असते. नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेची ही सारी रूपे इंद्रियांनाही दिसतात, आणि इंद्रियातीतही असतात. कुणी म्हणेल, हे सगळं काय मिथ्या पाल्हाळ लावून ठेवलंय, पण अशी अनेक श्रद्धांची मिथकं आपण निर्माण करतच असतो, आणि जणू दिक्कालाची बंधनं तोडून आपल्या अनेक पूर्वसुरींना त्यातून भेटतही असतो. त्या आदिमायेचं रूप जिथे दिसेल, तिथे ते हजार चक्षूंनी आणि जसंजसं बघता येईल, त्या त्या भावावस्थेत अनिमिष बघतच राहावं, असंच मला नेहमी वाटतं.

IMG_20200121_164552-low.jpg

असंच बघत बघत सफर चालू होती. सभोवार सर्वत्र हिरवीगार शेतं पसरली होती. त्यांच्या बांधावर आणि आजूबाजूला गगनचुंबी पोफळीची झाडं वार्‍याने डोलत उभी होती. मधूनच कुठेतरी प्लमचा फुलोरा दिसत होता. कुठे पांढरा तर कुठे मंदसा गुलाबी. इथे म्हणे हा फुलोरा फार नाजूक. अगदी कमी काळ अनुभवायला मिळणारा. जानेवारीचा शेवट आणि फेब्रुवारीची सुरवात अश्या मर्यादेत फुलणारा. आम्ही थोडे आधी गेलो असल्याने असा शेकड्याने बहर बघायला नाही मिळाला, पण हेही नसे थोडके! दक्षिण व्हिएतनामचा हा भाग आपल्या तमिळनाडू वगैरेच्याच अक्षांशावर पडतो. तिकडेही जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान अशीच झाडं बहरलेली बघितली आहेत. त्यातून रस्त्यालगत असलेली छोटीछोटी गावं, तिथे असलेले ते सुबक शॉपिंग प्लाझा, बसकी घरं, रस्त्यालगत असलेल्या छोट्या हाटेलांच्या टपर्‍या, हे सगळं अगदी तमिळनाडूसारखंच! एवढंच काय, त्यांच्याबाहेर लावलेल्या पाट्यांमधल्या अक्षरांचा 'फाँट'सुद्धा तोच. त्यामुळे गाडी मध्येच बाजूला लावून काही नाही तरी गल्लीवरच्या अण्णाला डोसा, परोट्टा अशी काही ऑर्डर द्यायची फार इच्छा होत होती.

167190911_4028838837154567_1430989377868626611_n.jpg

गावागावांमध्ये असणार्‍या शेतांमध्ये गोड खळाळते झरे मधूनच दर्शन देत होते. मध्यम आकाराचे जलाशय शांत लकाकत पहुडले होते. क्वचित कोणाचातरी बंगला रस्त्यालगत पाईपचे झुरके मारत सावलीत बसल्यागत दिसत होता. छोट्या भिंतीपलीकडे फुलांचे ताटवे होते. एखादी बोगनवेल शांतपणे हा सगळा येणार्‍या-जाणार्‍या वाहनांचा पसारा बघत उभी होती. अगदी क्वचित कुठेतरी बुद्धाचं एखादं छोटंसं देऊळ, त्याच्या पुढ्यात लावलेल्या उदबत्त्या, धूप असंसुद्धा मध्येच दिसून जायचं. कुठेतरी चाफा असा उसासून फुललेला होता. समुद्राकाठी जात जावं तसतसा हा जास्त जास्त दिसायला लागला. वार्‍याची एखादी झुळूक आली, की त्याचा आंबटगोड सुगंध मनाला स्पर्शून जात होता. तळ्यांमध्ये वॉटर लिलीची फुलं दिसत नसली तरी कितीतरी सुंदर पानं हात पसरून उभं असल्यागत दिसत होती. ह्या भूमीला प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे तरी कुठल्यातरी सचेतनाचा स्पर्श झालेला आहे, ह्याची खात्री पटत होती. टागोरांच्या 'मरुविजयाची' मला हटकून आठवण झाली. हा असाच मरुविजय त्या सर्जक महात्म्याने स्वबलाने मुर्दाड झालेल्या भारतीय मनांवर मिळवला होता. ही फुलं जशी फुलली होती, तशीच माणसांतली शिल्पं टागोरांनी त्यांच्या शांतीनिकेतनात घडवली होती. जात, धर्म, प्रदेश, इतकंच नव्हे, तर देश ह्यांच्याही पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाला करुणेच्या, क्रियाशीलतेच्या, आणि प्रेमाच्या धाग्यांनी बांधण्याची स्वप्नं बघणारी ही टागोर आणि बुद्धासारखी माणसं! इतर करंट्यांनी किती विनाशाचा प्रयत्न केला, तरी नवसर्जनासाठी उर्जा पुरवणारे हे महात्मे. उगाच नाही बुद्ध अगदी मंगोलिया, कोरिया, जपान इथवर जाऊन विविधरूपांनी नटला. प्रत्येकाला तो आपल्या देशातलाच वाटला. अश्या लोकांच्या कार्याकडे बघताना बाह्यचक्षू पुरेसे नाहीत. आपल्या अंतःचक्षूंपुढे सुखशांतीचे भांडार खुले करण्याचा तो मार्ग असायला हवा. निसर्गशक्तीवर ह्या लोकांचं अपार प्रेम होतं. बुद्धाच्या प्रतिमासागरात कमळांना फार महत्त्व आहे, ते उगाच नाही. 'ओम् मणिपद्मेहूं' हा अवलोकितेश्वराचा मंत्र कधी बुद्धाच्या मंदिरात गंभीरपणे उच्चारावा, काय वेगळीच बहार येते! टागोरांचंसुद्धा फुलांवर किती प्रेम. अशोक, पळस, रक्तकारवी ही फुलं त्यांना प्रिय असल्याचं मी ऐकलेलं आहे. नीलमणीलता अशी काहीशी कविता बंगालीतून वाचायचा प्रयासही केलेला आहे. मला बंगाली येत नसल्याने त्यांच्या कविता मूळ वाचता आलेल्या नाहीत. शिकायला हवं. पण त्यांचं पुष्पप्रेम सर्वज्ञात आहे. त्यांच्या जमिनदारीमध्ये अगदी दलदलीतल्या फुलांनी त्यांना वेड लावलं होतं. फुलांमध्ये, झाडांमध्ये, निसर्गामध्ये बागडणारा हा महर्षी होता. भारतीय जीवनातलं, शिक्षणातलं निसर्गाचं महत्त्व त्यांनी यथार्थ जाणलं होतं. त्या सर्जनशील सौंदर्यातून विधायक विचार आपल्यात यायला हवेत. पण कधीतरी एखादवेळेस माझ्यासमोरच्या ह्या अद्भुत दृश्यासारख्या अनुभवामुळे त्या विस्मृत क्षणांना वर्तमानाचा असा स्पर्श होतो, तेव्हा स्वतःतल्या रसरशीत जिवंतपणाचा अनुभव असा अवचितच येतो. अन्यथा आम्हाला कुठले टागोर आठवायला!

Nerium_oleander_flowers_leaves-low.jpg

अशा वेळी अजून एक विचार मनात येतो. विंदा करंदीकर अमेरिकेला गेले होते, तेव्हा तिथे त्यांना कॅक्टस पाहून तुळशीवृंदावन आठवलं होतं. म्हणजे 'माझे भाऊबंद मजला भेटतायत' ह्या केशवसुतांच्या वारीमधलेच तेही एक वारकरी. परंतु ही भाऊबंद भेटण्याची तर्‍हा फार वेगवेगळी असू शकते. नामदेव ढसाळांसारख्या कोण्या कवीला ही तुळशीवृंदावनं वगैरे न दिसता अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांमध्ये कुठेतरी 'घेटो'मध्ये राहणार्‍या कुठल्या ट्रेव्हॉनमध्ये आपला भाऊबंद भेटत असेल. इथे मला ही अशी सगळी फुलं आणि बुद्ध वगैरे दिसतो आहे, तसा तो इतर कोणाला आपल्या वस्तीमधल्या बुद्धमूर्तीपुढे ठेवलेल्या कोरांटीमधून भेटेल. एकाच्या अनुभवांनी दुसर्‍याचा अनुभव 'कॅन्सल' होऊ शकत नाही. तसा तो अधिकारशाही किंवा 'प्रिव्हिलेज'ने करण्याचे प्रयत्न होतात. म्हणून विद्रोही वगैरे म्हणवली जाणारी कविता महत्त्वाची ठरते. उलटं 'कॅन्सल 'कल्चर'ही चुकीचं आहे. हे हिरवेगार गालिचे पाहून मला फार छान वाटत असेल, तर कोणाला शेती करताना सोलले जाणारे पाय आठवत असतील. पण म्हणून माझं छान वाटणं चुकीचं आहे, असं नाही. दोघे जण एकाच अनुभवाकडे वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर कलाक्षेत्रात जरी ह्या अनुभवांचं प्रत्येकाचं वेगळं स्थान असेल - आणि ते असायलाच हवं, असं मला वाटतं - तरी सामाजिक क्षेत्रात असलेल्या असमानतेमुळे एकाच्या अनुभवांना जी शिष्टसंमती मिळते, ती दुसर्‍याच्या अनुभवांना मिळतेच असं नाही. किंबहुना नाहीच मिळत. आणि ह्यामुळे प्रत्येकाने आपापलं प्रिव्हिलेज ओळखून असायला हवं, आणि ते आहे, ह्याचं भान ठेवायलाच हवं. दुसर्‍या व्यक्तीचे अनुभव आपल्याशी एकरूप नाहीत, म्हणून त्यांची ओळखच पुसून टाकणं हे सुसंस्कृत मनाचं लक्षण नाही.

शेवटी सुसंस्कृत मन हेसुद्धा ह्या धरतीसारखं असतं. ते शिष्टाचार, एक ठराविक विधीवत् आचारपद्धती ह्याने मनाची संस्कृती ठरत नाही. त्यावर कश्या प्रकारचे संस्कार झाले आहेत, हे त्यातून किती उत्कटतेने आणि खरेपणाने ह्या फुलांसारखे विचार बाहेर पडतायत, त्यावरून ते दिसतं. कितीतरी लेखकांनी अनुभवांच्या पेरणीची महती वेळोवेळी सांगितली आहे. मग ते अनुभव लेखी असोत, की मुखी, की देखी, ह्याने फरक पडत नाही. परंतु त्यातून आपण काय शिकतो, लोकांना काय देतो, हे महत्त्वाचं. तशीच ही व्हिएतनामी जमीन फार नामी होती. एवढी सगळी फुलं दिसली, तरी अजून वेगवेगळे प्रकार दिसायचे थांबतच नाही. 'पिकवाया मोती आसुसली धरती' असा प्रकार आहे. रस्त्याजवळ अझालीयाची फुलं होती. कुठेतरी हळूच पिवळीधम्मक मिमोसाची फुलं खुणावत होती. पीच, अ‍ॅप्रिकॉट, हे वर आलेले प्रमुख नेते तर जागोजाग होतेच. त्याचबरोबरीने रंगीबेरंगी कपड्यांतली, गवती टोप्या घातलेली माणसंही तुरूतुरू इकडेतिकडे जात होती. युद्धाच्या काळात ह्याच लोकांचे पूर्वज असेच तुरूतुरू जमिनीखालच्या बोगद्यातून धावत अमेरिकेच्या महासत्तेला शह देत होते. शेवटी ह्या जमिनीसाठीच लढणारा माणूस ह्या जमिनीच्या साहाय्याने काय काय करू शकतो, ह्याचंच हे द्योतक. आता काळ बदलत चालला आहे. व्हिएतनाममध्ये प्रचंड कारखाने उभे राहतायत. ते ह्याच जमिनीवर उभे राहतील. तेव्हा ही फुलं पाव्हणी म्हणून तरी उरतील का? कोणास ठाऊक? पण सध्यातरी ह्या जमिनीत आणि माणसांत सुसंस्कृत सर्जनशीलतेचा तोटा नाही!

167119710_4032273160144468_6616303244860818853_n.jpg

(काही चित्रे आंतरजालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितांतसुंदर लेख आणि तो ही अनेक पातळ्यांवर झाला आहे भाचा.
सुरुवातीला निसर्गाचं प्रत्ययकारी वर्णन, मग युद्धाच्या पार्श्वभूमीवरील दाहकता आणि या सगळ्यात एकरुप होत ऐकू येणार्‍या वेगळ्या आणि आपल्या संस्कृतीतल्या तेच भाव सांगणार्‍या कविता. हे सगळं लिहिताना वापरलेली समृद्ध मराठी भाषा. आणि हे सगळं कमी होतं की काय वाटत विविध अनुभवविश्वे जगलेल्या व्यक्तींना एकाच गोष्टींत दिसणारे परस्पर विरोधी आयाम/ आठवणी आणि त्या आठवणी अस्सल असल्या की कुठली एक खुजी असत नाही याचं भान. मग अगदी आजचा, तुझा स्वतःचा 'कॅन्सल कल्चर' आयाम.
लेख संपवला आणि काही तरी गवसल्याची मिळाल्याची भावना मनात आली. खूपच सुंदर!

थँक्स अमित! Happy एवढं भरभरून लिहावंसं तुला वाटलं म्हणजे नक्कीच चांगलं आहे. एखाद्या रिलॅक्सिंग जागी असल्यावर विचार असे अनेक पातळ्यांवर येतात, असं मलाही जाणवलं आहे. ते एकत्र करून हे गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लिहून काढलं होतं.

लेख संपवला आणि काही तरी गवसल्याची मिळाल्याची भावना मनात आली. >>> Happy ह्याबद्दल विशेष आभार.

भास्कराचार्य, अतिशय उत्तम लिखाण. अमितवशी सहमत. त्यांनी तुमच्या लिखाणाचा छान आढावा घेतला आहे.
रात्री लेख पुन्हा एकदा वाचायला आवडेल.

भास्कराचार्य, अतिशय उत्तम लिखाण. अमितवशी सहमत. त्यांनी तुमच्या लिखाणाचा छान आढावा घेतला आहे.
रात्री लेख पुन्हा एकदा वाचायला आवडेल.

भास्कराचार्य, अप्रतिम लिहिलं आहे तुम्ही!

अधलंमधलं मुक्त चिंतन तर खासच आहे. तुमचा कोणताही लेख, मग तो गणिताबद्दल असो की प्रवासाबद्दल, वाचला की समृद्ध होत असल्याचं अगदी जाणवतं.

अमितव +१

मस्त! फोटो, फुलांची वर्णने, मधली मुक्तके सगळेच सुंदर लिहीले आहे.

एकूण शैलीवरून तर अगदी "पूर्वरंग" मधला लेख वाचतोय असे वाटले.

सुंदर लिहिलं आहे! शेवटचे दोन परिच्छेद विशेष आवडले.
तमिळनाडूसारखा 'फॉन्ट' >> अगदीच!! मला हसायलाच आलं ती पाटी बघून. अक्षरशः फक्त लिपी वेगळी आहे!

पूर्वरंगची आठवण मलाही झाली. बांडुंग, जकार्ता, बाली वगैरेची वर्णनं आठवली. (आणि दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकरही! Proud )

फोटो आणि लिखाण दोन्ही तितकेच सुंदर आणि निर्विष.
मध्येमध्ये व्हिएतनाम मधलया बागा पाहुन लिझिकी चॅनल ची आठवण आली..

मीरा, प्रज्ञा, फा, रमड, वावे, आसा, अनु, बोकलत, खूप धन्यवाद. समृद्ध करणारं, निर्विष, पुन्हा वाचावंसं वाटणारं, हे सगळं कौतुक मला खूप भावलं. Happy कुठेतरी 'असं आपण असावं' असा विचार मनात बर्‍याच वेळा येतो. तसा मी निश्चितच नसेन, तरी तसं माझ्या लेखातून तरी मी एखादवेळेस व्यक्त झालो, आणि ते इतरांना दिसलं, हेही छान वाटतं.

फारेंडा, पूर्वरंगची आठवण येते असं तुझ्यासारख्या पुलंफॅनने म्हणावं, हे माझ्यासाठी खूप भारी आहे. Happy वावे, तुम्हीही ते म्हटलंत ह्याने गोडी अजूनच वाढली. (दगडी शिदोबा बेडकीहळ्ळीकर Proud ) तसा काहीसा प्रभाव आपसूक मनात पडलेला असेलच. शेवटी we are all standing on the shoulders of giants. Happy विशेष थँक्स!

'असं आपण असावं' असा विचार मनात बर्‍याच वेळा येतो. तसा मी निश्चितच नसेन, तरी तसं माझ्या लेखातून तरी मी एखादवेळेस व्यक्त झालो, आणि ते इतरांना दिसलं, हेही छान वाटतं.>>
आपल्याला जसं (ज्या गुणधर्मांचं) वाचायला आवडतं तसं आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो (असं मला वाटतं)
कधी जमतं, कधी नाही.

धन्यवाद मंजूताई. Happy

वावे, तसं असेलही कदाचित. पण मला मिस्टरी थ्रिलर वाचायला आवडतात, आणि तसं काही मी लिहीन असं मला वाटत नाही. Happy त्यामुळे फक्त तितकंच मर्यादित नसावं. तो एक मोठा भाग नक्की असू शकतो.

अमितव, फार‌एंडशी सहमत...
आदिशक्ती पुजा विशेष आवडली...
वाचण्याआधी माझ्याही डोक्यात युद्ध होते आणि तेच तुम्ही सुरवातीला लिहिले...टेलीपथी...
रविंद्रनाथ, बुध्द खूप छान संदर्भ दिलेत...
एकंदरीत सर्वांगसुंदर लेख...