यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (८)

Submitted by रानभुली on 19 February, 2021 - 16:50
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

( मोठ्या कादंबरीच्या लेखकांची चिकाटी, बैठक याची महत्ता मला समजली. सलग लिखाणाशिवाय असं काम होऊ शकत नाही. माझ्यासारखीला दर वेळी मनाने पुन्हा तिथे हजर झाल्याशिवाय काही पुढचा भाग लिहीता येत नाहीये. त्यामुळे होत असलेल्या उशीराबद्दल दिलगीर आहे. आता शेवटाकडेच वाटचाल आहे. टिकून राहील्याबद्दल सर्वांचे आभार)

आमच्या गाड्या बेगुनकोडॉरला थांबल्या. एक हायर केलेली आणि एक खासगी.
इथे मोकळा टापू होता. शेती आणि झाडी. तुरळक घरं होती.

Picture2_1.jpg
गाव बरंच लांब दिसत होतं. जवळचं जे गाव आहे त्याचं नाव भलतंच आहे. लिहून घेतलं नाही त्यामुळे लक्षात नाही.
बेगुनकोडॉरला चांगलंच चालत जावं लागत होतं. पुढे सहा किमी वर झाल्दा आहे. ते तालुक्याचे गाव.

आतापर्यंत वाचले, ऐकले त्यापेक्षा थोडेफार वेगळेच निघाले गाव.
खूपच मागास भाग आहे. त्याच सोबत नितांतसुंदर
गावं अशी नितांतसुंदर राहण्यासाठी त्यांचं मागास असणं टिकवून ठेवायला पाहीजे का ?
किमान दोन गावांना स्टेशनमुळे रोजगार मिळाला होता.

रेल्वे स्टेशन म्हणून एक मोडकळीला आलेली बंद वास्तू दिसत होती. रस्त्याच्या आणि रेल्वेलाईनच्या मधे पण मोकळा टापू होता.
पाऊस येऊन गेल्याने पाय चिखलात भरणार होते. गाड्या फिरवून तिकडे लावाव्यात असे वाटत होते.
चिखलामुळे शेवटी लांबून रेल्वेलाईन ओलांडून गाड्या स्टेशनकडे आणल्या. स्टेशनपासून थोड्या दूर लावल्या.

Picture10.jpg

एक दोन स्थानिकांनी आमच्याकडे पाहीलं. पण त्यांना सवय असल्याप्रमाणे जास्त लक्ष दिलं नाही.
दुपारचे दोन वाजून गेले होते. जंगलात थांबलो नसतो तर लवकर आलो असतो.
काहींना तासभर वेळ घालवून परत निघावे असे वाटत होते.
काहींना घाई नव्हती.

मी दुस-या गटात होते. आता आलोच आहोत तर सर्व शंका कुशंका फेडून घेऊ इतकाच माफक विचार होता.
कुठलाही प्लान नव्हता. त्यामुळे तयारी काहीच नव्हती.

रेल्वेस्टेशनला पायी पायी निघालो.
पाणी टाळतच चाललो होतो. मी शूज घातले होते.
बंदनाने नेमके हाय हिल्स आणले होते. तिला चालता येत नव्हतं.
कारण रूळाच्या जवळ खडी होती. आणि त्यातून बाजूला येऊन चालायचा प्रयत्न केला की ते रुतून बसत होते.
मा़झ्याकडे स्पोर्ट्स सँडल्स पण होत्या आणि आज नेमक्याच आणल्या होत्या.
मग दोघी पुन्हा मागे गेलो चावी घेऊन.
तिच्या हाय हिल्सच्या पादुका कागदात गुंडाळून गाडीत सीटखाली ठेवल्या. आणि तिला पादत्राणे दिली.
आता तिला चालता येत होते.
ती अशा जागी कधीच आलेली नव्हती असं नंतर मला सांगत होती.

Picture3_0.jpg
रेल्वेचा फलाट आणि रूळ हे एकाच लेव्हलला होते. म्हणजे उतरताना पाय-यांवर सर्कस करत उतरावे लागत असणार. गाडीच्या फ्लोअर लेव्हलपर्यंत प्लॅटफॉर्म उंच नव्हता. खूपच घाईत बांधले असावे स्टेशन

रेल्वे स्टेशन एखाद्या रया गेलेल्या इमारतीसारखे होते. रंगरंगोटी नाही. ना कसला मेन्टेनन्स.
आता ते चालू होते.

४२ वर्षांनी रेल्वे स्टेशन चालू झाले.
त्याचे श्रेय पुन्हा इथल्या आमदारांना जाते.

रेल्वे ने १९६७ ला भुताळी रेल्वे स्टेशन म्हणून नोंद करून रेल्वे स्टेशन बंद करून टाकले तेव्हांपासून अधिका-यांमधे असा एक गट होता की हे सर्व प्रकार संशयास्पद आहेत. प्रशासनाला पूर्वीपासून संशय होता,
पण लोकभावना. आमदार, खासदार इतकेच काय मुख्यमंत्र्यांचाही दबाव येत होता.
पुरूलिया चे डेप्युटी डीएम श्रीकांत माहतो (उच्चार अजब असतात इकडे) यांनीही ही गोष्ट लेखी आणि नंतर काही मुलाखतीत सांगितली आहे. त्यांनीही इथे भूताचा वावर असल्याचे म्हटले होते.

या सर्वांपुढे प्रशासन गप्प बसले होते. पण हा प्रवाद कायम होता.

---------------------------------------------------------------------------

चंदनने सांगितलेल्या कथेत आम्ही अगदी रंगून गेलो होतो.
आता इथे पोहोचल्यानंतर कथेचे वेगवेगळे अवतार समजू लागले. चंदनपेक्षा ते महत्वाचे वाटत होते.

एक म्हणजे मोहनबाबू एकटे राहत नव्हते. त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती.
त्या दिवशी मोहनबाबू आणि त्यांची पत्नी हे दोघेही मृतावस्थेत सापडले होते. ते खूप दिवस वगैरे आजारी नव्हते.

दुसरी एक आवृत्ती म्हणजे त्यांच्यानंतर जो लगेचच आलेला स्टेशनमास्तर होता त्याच्याच काळात रेल्वे स्टेशन बंद झाले. आम्ही तअयकि मग छापून आल्याप्रमाणे अजून एक बाबू आले होते. तर स्थानिक म्हणाले त्यांना काय माहीती ?

तिस-याचा उल्लेख आता वयस्कर झालेल्या एकाने केला. पण ते स्टेशनमास्तर नव्हते. तर रेल्वेला या स्टेशनला येण्यासाठी स्टाफ इच्छुक नसल्याचे लक्षात आले होते. त्यातच दबाव होता. पण बंद करण्यासाठी कारण द्यायचे होते. त्यासाठी एक स्टेशन मास्तर आले होते ते बंद करण्यासाठीच आले होते. या दोघांची नावे आम्हाला मिळाली नाहीत. त्यामुळे इथे काल्पनिक नावे वापरली आहेत. मोहन बाबू हे तर आता प्रसिद्ध झाले आहेत.

हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे एक तर झालेल्या प्रकाराबद्दल न बोलणारे किंवा खूपच बडबड करणारे स्थानिक , रहस्यमय नोकर किंवा कंदीलवाला असे कुणी भेटले नाहीत. अगदी खरं सांगायचं तर मी अपेक्षाच करत होते. एखादा वेडसर मनुष्य तरी भेटेल असे वाटले. पण रामसेंनी सेट केलेले हे नियम हे स्टेशन अजिबात पाळत नव्हतं.

एकंदरीत पहिल्या भेटीत या रहस्यमयी स्टेशनबद्दलची प्रतिमा धुळीला मिळाली. आता जे चित्रं दिसत होतं ते काही फारसं आकर्षक वाटत नव्हतं. जर मला साडी नेसता येत असती तर घरून एक पांढरी साडी आणली तरी असती. म्हणजे अंधार झाल्यावर केस मोकळे सोडून एखादं हॉण्टिंग गाणं म्हणत हातात कंदील घेऊन मी गोल गोल फे-या मारल्या असत्या तर थोडी वातावरणनिर्मिती झाली असती. माझा हा व्हिडीओ अल्बम आम्ही जगलो वाचलोच तर नंतर युट्यूबवर व्हायरल सुद्धा होऊ शकला असता. कदाचित मला बॉलीवूडच्या ऑफर्स...

कंट्रोल कंट्रोल......!

दुसरं कोण ? मीच मला बजावले.

सिच्युएशन काय आणि आपण कुठल्या कुठे भरकटतोय.
शेखचिल्लीण नको होऊस माझं एक मन बाहेर येऊन मला सांगत होतं. ते मला तीनदा ऐकू येत होतं.
मी मग कानावर हात ठेवले आणि नही असं ओरडणारच होते,,

पण पुन्हा

कंट्रोल कंट्रोल !

या वेळी आमची टीमच नाही स्टेशनवरचे लोक पण धावत आले असते की हिला काय दिसलं !
मला त्या ही परिस्थितीत माझंच हसू आलं.
हे माझं वैशिष्ट्य आहे. मी कौतुक देखील माझं स्वत:च करते आणि स्वतःवर हसते पण.
काय आहे ना दुसरं कुणी सांगेल तेव्हांच आत्मनिर्भर व्हायचं असं काही नसतं. आपली स्तुती करायला दुस-यावर कशाला ना विसंबून रहावं ?

-------------------------------------------------------------------------------

स्टेशन बंद झालं.
लोक आता लांबच्या स्टेशनला उतरू लागले. कुणीच स्टाफ नसल्याने दिवसाही कुणी नसायचं. त्यामुळे दिवसाच्या गाड्याही इथे थांबायच्या बंद झाल्या.

इथे एकाचं चहा कॉफी आणि बिडी सिगरेटचं दुकान होतं. त्याचं दुकान बंद झालं.
त्याच्या म्हणण्यानुसार गावाला स्टेशनचा खूप फायदा होत होता.
गावची अर्थव्यवस्था गतीमान झाली होती.
स्टेशन बंद झाल्याने गावची अर्थव्यवस्था ४२ वर्षे मागे राहिली.

हा काळ असा होता की शिक्षण हे खूप कमी लोकांचं क्षेत्र होतं.
आईचं आजोळ इथल्या क्षत्रिय जातीत मोडतं. त्यांच्याही मागच्या चार पिढ्यापासूनच शिक्षण आहे. त्या आधी गोडी म्हणून जे शिकले ते शिकले. आधीच्या पिढ्यात यांच्यातही अक्षरशत्रू होते. फक्त जमीनदारीची कामे आली कि झालं.
शेती आणि शेतीवर अवलंबून असलेल्यांमधे शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी होते.

महाराष्ट्राप्रमाणेच बंगाल मधेही शिक्षणाचा प्रसार खूप वेगाने होत गेला. कम्युनिस्ट राजवटीने भले उद्योगधंदे आणले नसतील पण शिक्षण खेड्यापाड्यात नेले.

बेगुनकोडार मधल्या आदिवासी पाड्यातही शिक्षणाची गंगा वाहू लागली. ही गावं आदिवासी बहुल आहेत.
हळू हळू पुढच्या पिढीत दृष्टीकोण बदलू लागला. दोन पिढ्यातलं अंतर तंत्रज्ञानाने कमी केलं.
म्हणजे पूर्वी पिढी ४० वर्षांनी बदलत असेल तर आता दर तीन वर्षांनी मागची पिढी जुनी होते. जनरेशन गॅप तीन वर्षावर येऊन ठेपलीय. इथेही तसेच होत होते.

आता नवं सहस्त्रक साल आलं होतं.
शिक्षण आणि धार्मिक कट्टरताही हातात हात घालून खेडोपाडी पसरत होती. मोबाईल क्रांती झाली.
तळहातावर तंत्रज्ञान आलं.

आता नव्या पिढीला स्टेशन आहे पण रेल्वे थांबत नाही याचा राग येऊ लागला होता.
त्यांना आपल्या मागच्या पिढ्या कशा भाबड्या होत्या हे चांगलं ठाऊक होतं. या सर्वांना ट्रेन इथे थांबायला हवी होती.
क्षीण असला तरी या मागणीसाठी आवाज उमटू लागला.

मग या विचाराचे लोक पुढे येऊ लागले. एकत्र होऊ लागले.
त्यातून रेल्वे स्टेशनचा उपयोग व्हावा ही भावना जोर धरू लागली. त्यामागे फक्त दूर जावं लागतं हेच एक कारण नव्हतं.

दुस-या गावातल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन स्टॉल लावणे अशक्य होते. संधी, त्यातून येणारी स्पर्धा, त्याला स्थानिक राजकारण्यांचे संरक्षण, त्यांचे न्यायनिवाडे यामुळे दुस-या गावातल्या कुणाला प्राधान्य मिळणे कसे शक्य होणार ?
झारखंडपर्यंत जाऊन एका दिवसात कामं होत होती. तिथून काही आणून विकता येत होतं.
या सगळ्याला फुल्लस्टॉप लागला होता.

पण अजूनही भूतकथेवर विश्वास असलेले लोक कमी झाले नव्हते.
नवीन पिढीला (त्यातही काही विश्वास ठेवणारे आढळले) त्यात इंटरेस्ट नव्हता.

पण या तरूणांनी बैठका घ्यायला सुरूवात केली. चर्चा केल्या. त्यामुळे विश्वास ठेवणा-यांचा विश्वास कमी नाही झाला पण विरोधाची धार कमी झाली. पोरं गावासाठी करतात ही भावना सर्वत्र होती. त्यामुळे पाठिंबा नसेल तरी विरोध पण नाही अशा मोड मधे हे लोक गेले. विरोध करणारे अर्थातच होते. पण भारतात कुठलेही गाव घ्या.

बहुमतात असलेली मंडळी इतरांवर निर्णय लादत असतात. ग्रामसभा हे निर्णय मंजूर नसलेल्यांना दडपण्याचं हत्यार आहे. ग्रामसभेत जो ठराव पास होईल तो कायद्याला धरून आहे किंवा नाही. घटनात्मक हक्कांवर गदा आणतो कि नाही याची आजही फिकीर केली जात नाही तर त्या वेळी काय आणि कोण करणार ?

या केस मधे मात्र घटनेला अभिप्रेत वैज्ञानिक दृष्टीच्या बाजूने ठराव होत होता. गावच्या हिताचा ठराव होत होता.
पण जे अंधविश्वासाचे बळी होते त्यांच्या मनाविरूद्ध सगळे घडत होते. पण बहुमतशाहीने त्यांना ते स्विकारणे भाग होते.
जर अंधविश्वासवाल्यांचे बहुमत असते तर ?

ते तर भोगलेच होते ना गावाने ? विकास खुंटला होता गावचा,

-------------------------------------------------------------------------------------------------------

स्टेशनवर स्टेशनमास्तर होते. ते आम्हाला पाहून अजिबातच प्रभावित वगैरे झाले नाहीत. त्यांनी लक्षच दिले नाही.
थोड्या वेळाने बुकींग क्लार्क आला. त्याने निरोप दिला की पाच वाजल्यानंतर सर्व स्टाफ जाणार आहे. तुम्ही इथे थांबू नका.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

पोरांच्या पाठपुराव्याने आता चांगलंच आंदोलनाचं रूप घेतलं. या भागाचे आमदार ( बहुतेक देवव्रत चक्रवर्ती ) यांना पण मुलांचे म्हणणे पटले.
आताशा रेल्वे स्टेशनवर त्या मुलीला पाहीले असे म्हणणारे दिसत नव्हते.
जुने लोक छातीठोकपणे सांगत होते.

अजूनही काही काही लोक सांगत.
ड्रायव्हर्सकडून इतक्यात किस्से येत नव्हते. म्हणजे बंदच होते.

भीतीपोटी एक रिवाज पडून गेला असावा. त्यामुळे इथे ट्रेनचा स्पीड वाढत होता.
खंडाळ्याच्या घाटात एका ठिकाणी रेल्वेचा स्पीड कमी व्हायचा. आता तिथे पाच सेकंदाचा थांबाच आहे.

केंद्रात लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री होते. त्यांच्याकडे मागण्या गेल्या.
लालू तसे पुरोगामी विचारांचे. पण प्रत्यक्षात पुरोगामी नेते भयंकर श्रद्धाळू असतात. अंधश्रद्धाळूही असतात.
लालूंनीही आढावा घेतला. भूतावर श्रद्धा असणा-या भाविकांचे म्हणणे लक्षात घेतले आणि कुणाच्या भावना नकोत दुखवायला म्हणून भूताला तसेच राहू दिले.
त्यांनी सहीच केली नाही
----------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यांच्या नंतर ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या.
पोरांनी पुन्हा उचल खाल्ली. ममता बॅनर्जींची ताकद पश्चिम बंगाल मधे चांगलीच वाढलेली होती. कम्युनिस्टांचे गढ त्यांच्यामुळे ढासळत चालले होते. माझे दोन मामा पण हार्डकोअर कम्युनिस्ट होते. पण सत्ता जिकडे तिकडे आपण या न्यायाने ते ही ममतादिदींसोबत गेले.
राजकारण बदलत चालले. त्यामुळे निर्णयप्रक्रियेवर पण परिणाम होतो.

ममता दिदींना या मागणीत पहिल्याप्रथम तथ्य दिसलं. मग भूताच्या भक्तांचा विचार न करता त्यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे रेल्वे स्टेशन चालू करण्याचा निर्णय घेतला. पण त्या आधी सर्व खात्री करण्याच्या सूचना दिल्या.

क्रमशः

(पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Picture3_0.jpgPicture9.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.
या सत्यकथेतला रहस्यमय भाग आणि नंतरचा भागही येऊन गेल्यामुळे , तसेच गुगल मुळेही आता पुढे कुणी टिकून राहील का ही भीती वाटते. अशा प्रतिसादांमुळे हुरूप येतो. Happy

छान लिहिलंयस
नेक्स्ट टाईम कंदील फॉटोशूट बनता है.

छान लेख ..
अंतिम भाग वाचल्यावर गूगल वर बघेन. तोपर्यंत नाही Happy

स्टेशन चा फोटो पाहिला तरी ती दिसते म्हणे, बरे झाले मी स्कीप केला तो फोटो..

मस्त चालली आहे ... ब्लॉग प्रकारे लेखन छान वाटत आहे

स्टेशन चा फोटो पाहिला तरी ती दिसते म्हणे, बरे झाले मी स्कीप केला तो फोटो..>>> हो हे खरं आहे. ज्यांनी ज्यांनी स्टेशनचे फोटो पाहिलेत त्यांना काही दिवसांनी ती दिसली आहे. खास करून अमावस्या पौर्णिमेला रात्री दिसते असा अनुभव आहे. रात्री बाहेर जाताना किंवा घरी येताना लोक्स सहज मागे वळून बघतात तर ही धावत येत असते.

स्टेशन चा फोटो पाहिला तरी ती दिसते म्हणे>>>>>>>>>

हो ना मी सांगणारच होते मला पण आमच्या इथे आवारात दिसली म्हणून मी पुढचे फोटो पाहिला च नाहीत.

छान लिहिलं आहे. मी अजून तरी गूगल करून बघितलं नाही, नाही तर मजा जाईल. अंतिम भाग झाल्यावर बघीन इतर लिंक्स.

कुमार सर >> धन्यवाद

मी_अनु >>>> Lol
च्रप्स, बोकलत आणि मृणाली >>> धम्माल Rofl

हरचंद पालव >> धन्यवाद
धनवन्ती >>> आभार.

रात्री बाहेर जाताना किंवा घरी येताना लोक्स सहज मागे वळून बघतात तर ही धावत येत असते.>>
खरंय. माझ्याकडे एक खास पिंजरा आहे. तो डोळ्यांनी दिसत नाही, मंत्र शक्तीच्या भिंती आहेत त्याला. त्यात भूतांना अडकवता येते. येत्या अमावस्येला हीला अडकवून, सगळी सत्यकथा तिच्या तोंडून वदवून व्हिडीओ शेअर करेन.
डायरेक्ट फ्रॉम घोस्ट्स माऊथ. तो पर्यंत तुम्ही लोक काळजी घ्या रात्री अपरात्री.

तो व्हिडिओ पण मागे वळून पहायला लागेल का?>>> Lol
मानव सर एव्हडी मेहनत नका करू. तिला माझं फक्त नाव जरी सांगितलंत तरी ती थरथर कापत तुमच्यासमोर हात जोडेल.

लिहा तुम्ही, छान चाललेय. आम्ही बाचतोय
गूगल करून वेचायचे कष्ट कोण घेत बसणार जर तुम्ही आयते वेचून देत असाल तर.. Happy

प्रतिसाद कमी येणे स्वाभाविक आहे कारण भूताची सत्यकथा म्हटले की आजही कित्येक लोकं घाबरतात..

तो व्हिडिओ पण मागे वळून पहायला लागेल का?>> Lol
नाही. तो व्हिडीओ पहात असताना घाबरून मागे वळलात तरी व्हिडिओ डोळ्यासमोर दिसत राहील पूर्ण होईस्तो.

मला उगीच चला हवा येऊ द्या जोक आठवला हे वरचे वळून बघण्याचे प्रतिसाद वाचून Happy
एक माणूस लहान मुलांना एका रस्त्याकडे बोट दाखवून विचारतो 'एमजी रोड वर असंच जायचं ना?'
आणि मुलं म्हणतात, "नाही, हात खाली करुन गेलात तरी चालेल"

"नाही, हात खाली करुन गेलात तरी चालेल" >> बरोब्बर! तो मूळचा चिंटूचा जोक आहे. 'नाडकर्णींकडे असंच जायचं ना' ह्या प्रश्नावरचा.