यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (७)

Submitted by रानभुली on 17 February, 2021 - 14:15
bhutiya railway station

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

( ही मालिका एका सत्य घटनेवर आधारीत आहे. जे पहिल्या भागापासून वाचताहेत त्यांचे सर्वांचे मन:पूर्वक आभार. सुरूवातीला गप्पांच्या स्वरूपात लिहायचे होते. पण ब-याच घटना या मुलाखतींदरम्यान समजल्या. तसेच त्या नंतर मासिके, न्यूज पेपर्स आणि गुगलवरून कन्फर्म केल्या. त्या आधी आम्ही रेल्वे स्टेशनला भेट दिली. हे सर्वच सांगण्यासारखे आहे. जी कहाणी भूताशी संबंधित आहे ती नक्कीच इंटरेस्टींग आहे. पण खरंच तसं काही आहे कि नाही हे पाहणे महत्वाचे होते. असे काही प्लानिंग केले नव्हते. पण जस जसे घडत गेले ती ही एक कहाणीच आहे. जी मूळ भूतकथेइतकी इंटरेस्टींग नाही पण माझ्यासाठी ती महत्वाची आहे. कारण नंतरच्या घडामोडी इतक्या रोचक नाहीत. भूतकहाणी सांगता सांगता मी आपोआप कथेच्या फॊर्मॆट मधे केव्हां गेले हे मलाही नाही समजले. त्यानंतरही वाचक रस टिकवून ठेवतील ही अपेक्षा ).

बाबू मोंडल सकाळी उठले.
त्यांना क्लर्क विचारत होता काही हवे नको.

त्याचे प्रश्न मोंडल बाबूंना समजत नव्हते. त्यालाही मोंडल बाबूंचं वागणं समजत नव्हतं.
रात्री ते झाडाकडे बघत होते. खूप घाबरले आणि बेशुद्ध झाले.

त्या आधीचा ट्रेनच्या मागे पळणा-या मुलीचा प्रसंग त्याने पाहिला होता. पण झाडाकडे मोंडल बाबू का बघत होते हे त्याला समजले नाही.
बराच वेळ निरर्थक प्रश्नोत्तरे झाल्यानंतर त्याला शंका आली.

मोंडल बाबूंना रात्रीचे काही आठवत नाही असे तर नाही ना ?

मग त्याने रात्रीचा प्रसंग त्यांना सांगितला. त्यांना खरंच काही आठवत नव्हते.
ते म्हणत होते की मी स्वप्नात काही तरी भयानक पाहीले बहुतेक.

दिवसभरात गावातले अनेक जण मोंडल बाबूंना भेटून गेले.

हा प्रकार गावातही अनेकांनी पाहिलेलाच होता. आता हे तिसरे स्टेशनमास्तर होते. गावातही चर्चा चालू झाली होती.
आता मोंडल बाबूंचा स्टाफही हबकलेला होता.
पण बाबूंना काहीच आठवत नव्हते.

ते पुन्हा रात्री थांबणार होते.
त्यांच्या बरोबर थांबणे भाग होते पण कुणालाच तशी इच्छा नव्हती.
begunkodor4.jpg

मोंडल बाबू एक तर खूप भाग्यवान असावेत किंवा केअरींग !
कारण स्टाफचं प्रेम होतं त्यांच्यावर.

ज्यांची ड्युटी नाही ते ही रात्री मोंडल बाबूंसोबत थांबणार होते.
आणि
आश्रमातले एक साधू पण आज थांबणार होते. ते संन्यासी होते. मांत्रिक वगैरे नव्हते.
मात्र त्यांची उपस्थिती सर्वांच्या मनाला आधार देणारी होती.

संध्याकाळ झाली.
एक अनामिक हुरहूर प्रत्येकाच्या मनात होती.
ट्रेनची वेळ अद्याप झालेली नव्हती.

साधू बुवा बाकड्यावर मांडी घालून बसले होते.

पूलावरून ट्रेन येताना दिसली.
लांबूनच शिट्टी मारली आणि

प्लॅटफॊर्मवर ती दिसू लागली.
ती नाचत होती. हसत होती. उड्या मारत होती,

साधू बुवांचं लक्ष गेलं आणि त्यांच्या तोंडाचा आ विस्फारलेलाच राहिला.

ट्रेनने स्टेशनच्या आधीच वेग वाढवला होता.
तिने त्या ट्रेनच्या मागे धावायला सुरूवात केली. तिचा वेग पाहून साधू बुवा स्वत:च घाबरले होते.
नेहमीप्रमाणे ट्रेन च्या पुढे जाऊन ती दिसेनाशी झाली.

आज मोंडल बाबू खूपच नॉर्मल होते.
आज झाडाकडे त्यांनी पाहीले पण ते घाबरलेले नव्हते.

घाबरले होते ते साधू बुवा !
त्यांनी सर्वांना स्टेशन मधून बाहेर पडायचा आदेश दिला.
ते भयंकर घाबरलेले होते.

दुस-या दिवशी मोंडल बाबूंना सगळे आठवत होते. परवाचं मात्र अद्याप आठवत नव्हतं.

मात्र त्यांनी झाडाकडे बघून "ती ती " असं ओरडलेलं क्लर्कने ऐकलेलं होतं.
साधूबुवांनाही झाडावर ती दिसली होती.

--------------------------------------------------------------------------

इतके झाल्यावर गावात बैठका होऊ लागल्या.

मोंडल बाबूंनीही इकडे स्टाफसोबत मिटींग घेतली. स्टाफने आम्ही आता ड्युटी करू शकत नाही असे निक्षून सांगितले.
मोंडल बाबू समजून चुकले होते.

त्यांनी शेवटचा रिपोर्ट रेल्वेला पाठवला आणि इथे स्टाफ ड्युटी करायला तयार नसून त्यांना एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटते आहे असे कळवले. त्याबद्दलही त्यांनी लिहीले. तसेच हा प्रकार आपणही कन्फर्म केला असून ते नेमके काय आहे हे समजत नाही. मात्र जोपर्यंत या प्रकाराची तज्ञांकडून चौकशी होत नाही तोपर्यंत ड्युटीची सक्ती करणे शक्य नाही असे सांगून इथे भविष्यातही कुणाची नेमणूक करू नये अशी शिफारस केली.

मोंडलबाबूंना ही शिफारस करण्याचा दबाव स्थानिकांकडून आलेला होता.
ज्या गावाने भांडणे करून स्थानक उभारले त्यांनाच आता ते नको होते.

तिथल्या आमदाराने मोंडलबाबूंना रिपोर्टमधे इथे कुणाची नेमणूक करू नये हे नमूद करायला सांगितले होते. तुम्ही हे लिहा तुमच्यावर कारवाई होणार नाही हे पाहणे माझे काम आहे असे ते म्हणाले.

कम्युनिस्टांची सत्ता होती. मुख्यमंत्री ज्योती बसूंपर्यंत तक्रारी गेल्या होत्या.
त्यांनी रेल्वे मंत्र्यांच्या कानावर हा प्रकार घातला होता.

रेल्वेच्या इतिहासात ही भलतीच केस होती. पहिलीच केस होती. असे नाही कि त्यांच्या कानावर अशा घटना आलेल्या नव्हत्या. पण इथे लोकांचा मोठा दबाव होता. स्थानिक आमदार पाठपुरावा करत होते. त्या भागाच्या खासदाराच्या कानावर देखील तक्रारी गेल्या होत्या. त्यांच्या ही कडे पाठपुरावा चालूच होता.

अखेर पश्चिम बंगाल सरकार, स्थानिक आमदार आणि बेगुनकोडरच्या रहिवाशांचा लेखी पाठपुरावा, मोंडल बाबूंचे रिपोर्ट्स याचा परिणाम झाला. रेल्वे मंत्रालयाने स्वत:च्या कातडीचा बचाव करत लोकांच्या माहितीनुसार या स्टेशनला भुताळी रेल्वे स्टेशन म्हणून जाहीर केले.

त्यांनी जाहीर करण्याआधीच ते स्टेशन ओसाड पडले होते. मोंडल बाबू आणि त्यांचा स्टाफ पुरूलिया रिपोर्ट करू लागला होता. त्यांची व्यवस्था लागेपर्यंत दुसरा स्टाफ रेल्वेने बेगुनकोडारला नेमला नाही. कोणतीही ट्रेन संध्याकाळनंतर पूर्वीपासूनच थांबणे बंद झाले होते. आता मात्र दिवसाही ट्रेन थांबणे बंद झाले होते.

कारण ट्रेन थांबण्यासाठी स्थानकावर मनुष्यबळ लागते. इथे ना गार्ड, ना हमाल, ना बुकींग क्लर्क ना कुणी.

रितेश गोस्वामीचे आजोबा १९६७ साली बेगुनकोडारचं तिकीट घेऊन रांची एक्स्प्रेसमधे बसले होते. ते आर्मीतून सुटीवर येत होते.
गाडी बेगुनकोडरला थांबली नाही.
त्यांना चेन ओढायची होती. पण सहप्रवाशांनी त्यांना तसे करू दिले नाही.

पुढच्या स्टेशनला जेव्हां गाडी थांबली तेव्हां ते संतप्त झाले होते.
टीसी त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला
"क्या आप को पता नही ?"
" क्या ?"
" बाबू, यहा पर कोई ट्रेन रूकती नही है "

आणि मग त्यांची समजूत घालण्यात आली.
बेगुनकोडर आता रेल्वे च्या इतिहासात एक भुतिया रेल्वे स्टेशन म्हणून नोंद झाले होते.
१९६७ सालापासून तिथे कुणी प्रवासी उतरला नाही कि चढला नाही.
ना कुठली ट्रेन थांबली.

पण हे स्टेशन आलं की ट्रेनचा स्पीड वाढत होता.
गाडीतले प्रवासी खिडक्या बंद करून घेत होते. डोळे बंद करून घेत होते.
ती मुलगी नंतरही अनेकांना दिसत राहिली.

begunkodor.jpg

काही चुकल्या माकल्यांना जेव्हां ती दिसली तेव्हां ते आजारी पडले.
त्यांचा मृत्यूही झाला असे लोक म्हणत होते.
तेव्हापासून ती दिसली की मृत्यू होतो अशी अफवा पसरली.

बेगुनकोडर या निसर्गरम्य गावाला एक शाप लाभला.
ते आता एक बदनाम रहस्यमय स्टेशन झाले.

पण...

पुढे असं काय घडलं ?

जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची प्रतिक्षा करावी ही विनंती.
क्रमश:

( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे कथा. काल गूगल करून सगळी माहिती काढली ह्या रेल्वे स्टेशनची . Inetersting आहे, तुमच्या भाषेत वाचायला आवडेल. रेल्वे स्टेशन ममता बॅनर्जीने परत सुरु केले म्हणे २००९ पासून पण अजूनही लोक रात्रीचा प्रवास करत नाहीत ह्या स्टेशनवरून.

हाही भाग जबरदस्त. मिरजेत आता वादळी पाऊस पडतोय मजा आली या वातावरणात वाचायला. माझ्या माहितीप्रमाणे दिवसाव्यतिरिक्त या रेल्वे स्टेशनवर रात्री साडेनऊ आणि सकाळी साडेपाच अशा दोन ट्रेन्स थांबतात. आता त्या थांबतात तेव्हा प्रवासी चढतात, उरतात, ट्रेन दारं खिडक्या उघड्या, बंद असतात याबद्दल काही कल्पना नाही.

आज सगळेच भाग वाचले. छान लिहिले आहे. आधीची चित्रंही सुरेख होती. मला बंगाली पार्श्वभूमी खूप चार्मिंग वाटतेयं. पुभाप्र.

आत्तापर्यंतचे सगळे लेख वाचले. 'लिखाणाची गाडी रुळावर आल्ये आता तिला पटरी सोडून देऊ नका.' ह्या मागच्या लेखावरच्या हर्पेन ह्यांच्या प्रतिक्रियेशी सहमत. मजा येतेय वाचताना. तरी पहिला लेख वाचायच्या आधी गुगलून पाहिल्याने काही प्रश्न आहेत ते शेवटचा लेख आल्यानंतर विचारेन.

सर्वच वाचकांचे मनापासून आभार.
घटना सत्य असल्याने कितीही बढा चढा के नाट्य आणायचं म्हटलं तरी मर्यादा आहेत. आपण ख-या घटनेची चौकट पूर्ण सोडून वाटेल ते स्वातंत्र्य घ्यायचं नाही हे ठरवूनच लिहीतेय. (आमच्या टीम मधला चंदन नंतर आमच्याशी खूप वाईट वागला. त्याने फोटो, व्हिडीओज दिले नाहीत. नाहीतर स्वतःच्या मोहीमेचे फोटो वापरायला खूप आवडलं असतं).
अशी घटना मालिका स्वरूपात लिहिताना वेळ लागत असल्यास साहजिकच गुगलवर पाहीलं जाणार हा धोका पत्करूनही लिहीतेय. कारण एकदा गूगल वर दोघा तिघांच्या त्यांच्या कथा ऐकल्या की मग फारसा इंटरेस्ट राहणार नाही. मला फक्त काम पूर्ण करायचं दडपण येतं तसं इथेही होतंय. त्यामुळे नव्या भागाला सुरूवात करताना स्वतःला फ्रेश ठेवायचा प्रयत्न करावा लागतोय. आज मात्र कंबर कसून, पदर खोचून जास्तीत जास्त पूर्ण करतेय.