यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन (६)

Submitted by रानभुली on 16 February, 2021 - 10:46

(या आधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

अंतर थोडंच राहीलं होतं.
मला डुलकी लागली. डोळ्यासमोर मंडल बाबू उभे होते.

मोंडल बाबूंनी मोहनबाबूंची कहाणी शोधून काढली. मोहनबाबूनंतर जो स्टेशनमास्तर आलेला तो दाक्षिणात्य होता. त्याने हेडक्वार्टर मधे कुणा दाक्षिणात्य अधिका-याला भेटून ताबडतोब बदली घेतली.

मोहन बाबूंचा स्टाफही बदलून गेला होता. आताचा सगळाच नवीन होता.
त्यामुळेच मोंडल बाबूंना लगेचच हकीकत समजली नव्हती.

मोहन बाबूंचं निधन झालं. त्या आधी त्यांना काही तरी दिसत होतं असं ते म्हणायचे.
ते आपल्या स्टाफला इथून निघून जा म्हणायचे.
ते पण घरी जाणार होते. जमल्यास बदली किंवा नोकरी सोडून.
पण त्या आधीच ते गेले.
त्यांना नेमके काय झाले होते हे समजलेच नाही.
त्यांचा स्टाफही गेला.

मोहन बाबू गेल्यानंतर मग ही हकीकत वा-यासारखी सगळीकडे पसरली. आता लोक उघडपणे बोलू लागले.
रात्री अपरात्री उतरलेल्या प्रवाशांनी या मुलीला तिथे पाहिले होते. ती स्टेशनवर नाचायची. मधेच हातवारे करायची.
काहींनी तिला झाडावर बसलेली पाहिली होती.

तर ब-याच जणांनी दिवसा विहीरीतून आवाज ऐकले होते.

मोहन बाबू गेले त्या दिवशी पुरूलिया आणि रांची स्टेशनवरही ही चर्चा झाली.
तिथून जाणा-या ट्रेन्सचे ड्रायव्हर्स या स्टेशनवर त्यांना आलेले अनुभव सांगत होते.

राघवन नावाचे स्टेशन मास्तर आले होते.
त्यांनी न थांबणा-या ट्रेन्सवर कारवाईचा इशारा दिलेला होता.
ते पुरूलिया आणि रांची पुरूलियाच्या मधल्या एका स्टेशनवर देखील जाऊन आले होते.
त्यांनी ट्रेन ड्रायव्हर्सच्या मुलाखती घेतल्या होत्या.
याची हकीकत मोंडल बाबूंना आता जुन्या फायलीत मिळाली होती.

हावरा रांची एक्स्प्रेस पुरूलियावरून संध्याकाळी ६ वाजता निघाली होती.
अंधारून आलेलं होतं.

मधे नदीवरचा पूल होता. साधारण ताशी ५० च्या आसपास ट्रेनचा स्पीड होता. पूल गेल्यानंतर तो वाढला. बेगुन कोडोरला येईपर्यंत वेग ताशी ७० च्या पुढे सहजच होता. स्टेशनमधे ट्रेन घुसली आणि ड्रायव्हर आणि गार्डला काहीतरी विचित्र प्रकार दिसला.

पी रैना यांची ड्युटी संपलेली होती आणि ते रांचीला घरी परतत होते. त्यांनी आपल्या मित्राच्या जवळ म्हणजे ड्रायव्हर अली अब्बासच्या केबीनमधेच बसून जायचं ठरवलं होतं.
पूल पार होताना दोघेही गप्प बसले होते. पुढे स्टेशन दिसत होतं

गाडी स्टेशनात घुसली आणि आपल्या बाजूने कुणीतरी धावतंय असा अब्बास यांना भास झाला. त्यांनी बाजूला पाहीलं तर एक पांढ-या वस्त्रातली एक मुलगी त्यांच्या सोबत धावत होती. अब्बास यांना झटकन आपल्या गाडीचा स्पीड किती आहे याची आठवण आली. त्यांचा भूताखेतांवर चांगलाच विश्वास होता. त्यांनी रैना यांना खूण केली. रैना उठून बघायला लागले.

त्यांचीही बोबडीच वळायची बाकी होती. कारण आता त्या मुलीने वेग वाढवला आणि ती ट्रेनच्या पुढ्यात रूळात आली होती.
जोरात ब्रेक लावायची अब्बास यांना इच्छा झाली.

पण काही वेळा गोष्टी जुळून येतात. रैना हे त्यांना काय वाटलं आणि इंजिनमधे बसायला आले होते.
त्यांनी अब्बास यांच्या हातावर चापट्या मारल्या आणि खूण केली.

त्या खूणेचा अर्थ होता कि ब्रेक नाही.
अचानक कुणी मधे आले तर त्या एकाला वाचवायचे की गाडीतले असंख्य जीव वाचवायचे हा निर्णय घ्यावा लागतो. रैना यांनी त्याचे स्मरण करून दिले. पण ती तरूणी ट्रेनला मागे टाकून दिसेनाशी झाली.

अब्बास घामाने निथळत होते.

दुस-या दिवशी रांचीला त्यांनी हा अनुभव सांगितला. तेव्हां असाच अनुभव आलेले प्रदीप सेन पुढे आले.
त्या दिवशी रांचीला या अनुभवाचीच चर्चा होती.

येताना अब्बास यांच्या गाडीला बेगुनकोडरचा थांबा होता. वेळ सायंकाळची. कोलकत्याला जाणारे प्रवासी रांची कोलकाता गाडीत चढणार होते.
पण अब्बास यांना जीव वरखाली होत होता.

बेगुनकोडर येता येता त्यांच्या गाडीचा वेग ८० च्या आसपास पोहोचला होता.
गार्डचा लाल झेंडा पाहूनही गाडी थांबली नाही.

स्टेशन संपता संपता झाडाजवळून तीच मुलगी ट्रेनच्या जवळून धावायला लागली. या वेळी ती अब्बास यांना हात करत होती. हसत होती. खुणावत होती.
आणि ती त्यांच्याही पेक्षा वेगात पुढे जाऊन रूळाच्या मधोमध कमरेवर हात देऊन उभी राहिली.
आज तर रैना पण नव्हते सावरायला.

अब्बास यांनी डोळ्यावर हाताचं मनगट धरलं आणि डोकं मागच्या बाजूला वळवलं.

गाडी त्याच वेगात पुढे निघून गेली.
गाडीखाली काही आल्याची जाणीव झाली नाही.
पुरूलिया इथेही कसलाच संदेश आलेला नव्हता. कोलकात्याला पोहोचतानाही स्टेशनमधे कुणी गाडीखाली आल्याचा मेसेज आला नव्हता.

अब्बास यांनी कोलकत्यात फक्त जवळच्या सहका-यांजवळ या प्रकाराची वाच्यता केली.
असा रितीने बेगुनकोडरची किर्ती हळू हळू पसरायला लागली.

राघवन साहेबांना अब्बास यांची कहाणी समजली.
त्यानंतर ते पाच दिवस रेल्वे स्टेशनवर थांबत होते.

सहाव्या दिवशी त्यांनी पोबारा केला. आपल्या स्टाफलाही जायला मदत केली.

आणि मोंडल बाबू तिथे आले.
मोंडल बाबूंनी बरंचसं उत्खनन केलं होतं.
या प्रकाराचा सोक्षमोक्ष लावायच्या तयारीने ते आले होते.

---------------------------------------------------------------------------------------------

रात्री मोंडल बाबू शाल घेऊन रेल्वे स्टेशनवर रात्र काढायला आले.
आताशा रात्रीचे प्रवासी बंद झाले होते.
शुकशुकाटच होता,

त्यांना जास्तच थंडी वाजत होती.
जणू काही इथे उणे तापमान असावं असा गारवा सुटला होता.
मोडल बाबूंना आपल्या भोवती थंड हवेचं काही तरी असल्याचे भास होत होते. तिकीट खिडकी बंद झाली होती. पण क्लार्कला त्यांनी थांबायला सांगितले होते. त्ते ज्या बाकड्यावर बसले होते त्याच्या मागून कुणीतरी चालतंय असं त्यांना वाटलं. त्यांनी मागे वळून पाहीलं.
कुणीच नव्हतं.

ट्रेन यायला अवकाश होता,
ते ऑफीस मधे आले. बल्ब लावला. पण जणू काही त्याची प्रकाश फेकायची शक्तीच नाहीशी झाली होती.
एखाद्या पहिलवानाला दहा किलो वजनही उचलता येऊ नये अशी त्या बल्बची अवस्था झाली होती.

मोंडल बाबूंनी स्टेशनकडे तोंड करून असलेली खिडकी सताड उघडी ठेवली होती.
मानेच्या मागे दोन्ही हात ठेवत ते खुर्चीत बसले होते.

खिडकीतून त्यांना शुभ्र वस्त्रातली एक बाई दिसली.
मोंडल बाबू सावध झाले.
त्यांच्या ऑफीस मधे ते एकटे नाहीत याची त्यांना जाणीव होऊ लागली.
आणि मग ऐकलेले असंख्य किस्से फेर धरून नाचू लागले.
इतकेच की आता ते प्रत्यक्ष या प्रसंगाचा भाग होते.

ऐकणे वेगळे, त्यावर शेरेबाजी करणे वेगळे आणि आता साक्षीदार होने वेगळे.
मोंडल बाबू सावध होते. त्यांना जिवाची रिस्क घ्यायची अजिबात इच्छा नव्हती.

ते झटकन बाहेर आले.

स्टेशनच्या कोप-यात तीच उभी होती.
स्टेशनवर फक्त दोघे उभे होते.

एक ते स्वतः
आणि दुसरी ती ....

------------------------------------------------------------

मोंडल बाबूंनी तिकीट खिडकी कडे पाहीले.
क्लार्क बहुतेक आत बसून बसून झोपलेला असावा.

प्रसंग बाका होता,
समोर काय आहे याची मोंडलबाबूंना निश्चित कल्पना आली होती.
आता काय घडतेय याची वाट पाहणे इतकेच हातात होते.

त्यांनी मागे पाहीले.
गरज पडली तर स्टेशनमधून तीराच्या वेगाने वाहेर पडत गावाच्या दिशेने धावत सुटलं तर ?
पण मधला सताड मोकळा पट्टा कितीतरी मोठा होता.
आणि निमनुष्यही !

मोंडल बाबू देवाचा धावा करू लागले.
आणि इतक्यात ट्रेनचा आवाज आला.

ती एकदम ताठ उभी राहिली. तिचं मोंडलबाबूंकडे दुर्लक्ष झालं.
एव्हढ्याच संधीचा फायदा घेऊन बाबू तिकीटघरात गेले. क्लार्कला डुलकी लागलेली.
त्याला जागे केले आणि दोघे फलाटावर लपून बघू लागले.

ट्रेन जवळ येऊ लागली तसा तिचा वेग वाढला होता.
आणि ती फलाटावरून झाली उतरून ट्रेनच्या बाजूने धावू लागली.
आधी प्रवाशांनी तिला पाहिली.

आता हे सर्वांनाच ठाऊक झाले होते.
प्रवासी घाबरून बसलेले. ब-याच खिडक्या बंद होत्या. पोराबाळांना आतल्या बाजूला बसवले गेले. काहींनी डोळे बंद करून घेतले होते.
तर काहींना उत्सुकता आणि भीती दोन्ही होती.
ते बघत होते.

बघता बघता ती इंजिनजवळ गेली आणि आत चढायचा प्रयत्न करू लागली.
ड्रायव्हरने वेग अजूनच वाढवला.

मग तिने ट्रेन सोडून दिली.
ती बाजूला दिसेनाशी झाली.

मोंडल बाबू थरथर कापत होते.
आता चटकन निघावं म्हणून ते झाडाजवळून निघणार तर..

ती झाडावर बसून दोघांकडे बघत होती !

( पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खतरनाक...!
फुकट झोपायला जायच्या आधी वाचले, आता एक वाजलाय.. आता मी कॉफी पितो, तास दोन तास झोपायला नको. नाहीतर कुशीत वळायचो आणि माझ्याच उशीवर ती पांढरी बाई झोपलेली दिसायची Sad

थरारक.
बरं आहे ती भुतबाई आत्ता धावत नाही ट्रेनमागे. नाहीतर न्युज चॅनलवाले तिच्या मागे धावत सुटले असते कॅमेरे घेऊन.

इंटरेस्टिंग!

बाई भूत बरंच स्टॅमिना वालं दिसतंय >> एक प्लाटफार्म दौडने की कीमत तुम क्या जानो मोंडल बाबू!!

रात्रीच वाचायच्या असतात अशा गोष्टी. खास करून घरी एकटे असताना. नाहीतर किमान अशा गोष्टी वाचल्या की त्या रात्री एकट्या/एकटीने वेगळ्या खोलीत तरी झोपावे, बाल्कनीचे दार, खिडकी उघडी ठेऊन.

नाहीतर लेखक/लेखिकेवर घोर अन्याय होतो.

रानभुली तुमची लेखनशैली उत्तम आहे, छान रंगवून लिहिल्याने मजा येतेय वाचायला.

सर्वांचे मनापासून आभार. पहिलाच प्रयत्न आहे. सर्वांच्या प्रोत्साहनामुळे लिहीले.
आधी गप्पा मारतात तसं या प्रकाराबद्दल सांगायचा विचार होता. पण जी कहाणी आहे ती सुरू करताना मी आपोआप कथा फॉर्म मधे गेले. आता पुढची जी झाडाझडती आहे ती मला गप्पाटप्पा फॉर्म मधेच सांगावी लागणार आहे.
ही घडलेली कथा आहे. अगदी रेल्वेच्या रेकॉर्डमधे पण आहे.

छानच लिहिलंय.
लिखाणाची गाडी रुळावर आल्ये आता तिला पटरी सोडून देऊ नका.

आता पुढची जी झाडाझडती आहे ती मला गप्पाटप्पा फॉर्म मधेच सांगावी लागणार आहे >> मला तो फॉर्म जास्त चांगला वाटला. गोष्टी जास्त खर्‍या वाटतात ते वाचताना.

खरी आणि सर्टिफाईड आहे>>>
शपथ!!! असे किस्से खूप ऐकले आहेत bikers लोकांचे पण ट्रेन ला पण असं काही दिसत असेल तर कठीण आहे

खरे, कितपत खरे, किती नाही वगैरे कॉमेंट्स - चर्चा सगळे भाग पोस्ट होई पर्यंत टाळा.

खरे, कितपत खरे, किती नाही वगैरे कॉमेंट्स - चर्चा सगळे भाग पोस्ट होई पर्यंत टाळा.>>>>
येस्स...

खूप सुरेख लिहीलीय. अगदी उत्कंठावर्धक. लेखन शैली उत्तम आहे. पुढच्या भागात थोडा उलगडा होईल असे वाटतेय.

मानव +१
कथा म्हणून आनंद घेऊया.

बस्स. आता शेवटाकडेच आहे. अजून फारतर तीन भाग,
त्यातला एक पोस्ट केलाय नुकताच.

सर्वांचे मनःपूर्वक आभार.