पुन्हा जगायला मिळालं तर?

Submitted by एविता on 13 February, 2021 - 03:29

पुन्हा जगायला मिळालं तर?

मान्य आहे की, एकदा घडून गेलेली गोष्ट पुन्हा नाही करता येत. एकदा शिजलेली भाजी, पुन्हा कच्ची नाही करता येत, एकदा कापलेलं फळ पुन्हा नाहीच जोडता येत.. ऑमलेटचं अंडं नाहीच करता येत..
न का करता येईना; पण तसा विचार करू नये असा थोडाच नियम आहे? विचार तर करून पाहू... विचार करू की, मला मिळालंच नव्यानं पुन्हा आयुष्य तर मी जास्तीत जास्त चुका करण्याचा प्रयत्न करीन. शक्य तितक्या जास्त चुका. मी एकदम बिनधास्त राहीन, रिलॅक्स, फार कमी गोष्टी मी आयुष्यात सिरीयस्ली घेईन.मी नवनवीन जागा भटकून येईन., जमेल तेवढ्या टेकड्या चढून उतरून पालथे घालीन, जमलं तर पोहून घेईन मिळेल त्या नदीत.

जो त्रास होईल तेवढा मी सहन करीनही; पण नको ते कल्पनेतले त्रास, हे झालं तर काय? ते झालं तर काय? कल्पनेतल्या त्रासाला गोळीच मारीन, फार काळजी करत बसणार नाही, कशाला हव्यात सतराशेसाठ गोष्टी?

मला मिळालीच नव्यानं जगण्याची संधी तर मी त्या
लोकांकडे सरळ दुर्लक्ष करीन, जे म्हणतात, अमुक शिक, तमुक शिक, इतिहास शिक, मार्क पाड, त्यापेक्षा मी अशा शिक्षकांच्या पायाशी बसेन, जे म्हणतील रिलॅक्स, मजा कर, जगायला शिक, जगून घे. मला मिळालीच पुन्हा नव्यानं जगायची संधी तर वसंतातल्या सकाळी मी अनवाणी चालून येईन आणि पानगळतीच्या मौसमातही गळलेल्या पाचोळ्यावर चालत राहीन, आनंदाने.

मी गेलोच पुन्हा शाळेत, तर कागदी विमानं बनवून
सोडेन शिक्षकांवर पुन्हा मजा म्हणून.. आणि ते वर्गाबाहेर करतील उभं तर सुखानं उभंही राहीन.
जातधर्माचे टोकाचे समज-गैरसमज बाजूला ठेवता
येतील का मला, मी प्रयत्न करत राहीन, आणि मला ठेवलीच कुणी नावं तर चालेलही मला. पण मला माहिती आहे की असं जगायचं ठरवलं तर अनेक लोक माझ्या विरोधात उभे दिसतील, मला आमच्यात ये म्हणतील..जरा गंभीर हो म्हणतील.. जगात सगळ्यांनीच आपल्यासारखं गंभीर होऊन जगावं म्हणून चौकोनी चेहऱ्याचे अनेक लोक सतत प्रयत्न करत असतात... ते मलाही बोलावतील.
पण मी आता त्यांच्यात जाणार नाही.. मी पुन्हा चुकीचे जगणार नाही..

(पाऊलो कोएलो यांच्या वेबसाइटवरील मजकुराचा
साभार अनुवाद)

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा एवि, तुझं नाव बघुनच आनंद झाला. छान आहे अनुवाद. तुझं काम कसं चाललय? त्याबद्दल वाचायला आवडेल.

सुखी१४, तेजो, मृणाली, queen Piyu आणि डार्लिंग धनुडी, खूप खूप आभार. धन्यवाद. क्रारेसिस चे काम चांगले चालले आहे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने.
लॉक डाऊन च्या काळात आम्ही जो वेगळा " उद्योग" केला होता, त्याचे फळ मिळाले! १६ डिसेंम्बर रोजी मुलगा झाला. त्याचीच सेवा चालू आहे!!!!! मुलाचे नाव कनिष्क ठेवले आहे. तुम्हाला नाव नक्कीच आवडेल यात शंका नाही. थोड्या दिवसांनी परत लिहिते. थँक्स टू ऑल ऑफ यू स्वीट गर्ल्स अँड गाईज.

धन्यवाद अस्मिता, मृणाली समद, क्वीन पियु. तुमच्यासारख्या गोड मावश्या म्हणजे कनिष्कची चैन आहे!

रुन्मेष, होय, माझा टच दिला असता तर वाङ्मय चौर्य ठरलं असतं . तसं नको म्हणून मी अनुवाद केला. पण तुझे धन्यवाद.

किल्ली. धन्यवाद. पार्टी जरूर मिलेगी। पार्टी ज्या खोलीत सजवली असेल त्या खोलीची किल्ली तुझ्याकडे
देणार आहे. ती खोली तू उघडल्या शिवाय पार्टी होणारच नाही!

डिअर नियती आणि वर्णिता, तुमचे खूप खूप आभार.

नंबर१वाचक, अरे, तू तर व्यावसायिक अनुवादक.. ,आणि तुझ्याकडून माझे कौतुक..? व्वा. भरून पावले! थँक्स स्विटी. आणि थँक्स फ्रॉम ऋषी आणि कनिष्क...!

वाचायचं राहूनच गेलं होतं.... आवडलं.
एविता , मस्त बातमी अभिनंदन कनिष्क नाव आवडलं बाळाला गोड पापा! Stay blessed all your family !