यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन ( २ )

Submitted by रानभुली on 13 February, 2021 - 23:27

(याआधीच्या भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

स्टेशन मास्तर बाबू मोंडल हे आलेल्या ट्रेन्सवर काय काय सामान चढवलं उतरवलं याचा हिशेब टॅली करत बसले होते.
इतक्यात सिग्नलम नरेन कुंडू समोर येऊन थांबला. त्याची फक्त चुळबूळ चालू होती. स्टेशनमास्तर कामात असल्याने विषय कसा काढावा हे त्याला समजत नव्हते.

बाबू मोंडल यांना कुंडू येऊन उभा राहील्याची जाणीव तर होती. पण तो काहीतरी बोलेल मग आपण बोलू म्हणून ते काम संपले असतानाही चार्ट मधे डोकं खुपसून बसले होते. पण कुंडू काही बोलत नाही म्हणून ते शेवटी त्याच्यावर खेकसले.

कुंडूंने शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाला
" उद्यापासून मला संध्याकाळच्या वेळी सिग्नल्स चेक करायला पाठवू नका"
बाबू चिडले. ते डाफरले.
पण कुंडू ठाम होता. त्याला खरे तर ट्रान्स्फरच हवी होती. पण ती तडफाफडकी मिळणार नाही हे त्याला ठाऊक होतं. म्हणून ट्रान्स्फर होईपर्यंत संध्याकाळी काम नको म्हणत होता.

इतल्यात दुसरा सिग्नलमन देखील आला. त्या दोघांच्यातच भांडण सुरू झालं.
दुसरा आलेला कुंडू ला म्हणत होता, संध्याकाळी तुला नको मग काय मी कायमचा करू का नाईट शिफ्ट ?

आता हे भांडण का चाललेय हे बाबू यांना समजेना. हळू हळू त्यांना उलगडा होऊ लागला.
दोघांना कसली तरी भीती वाटत होती.

बाबू विचारात पडले. मग त्यांनी दोघांची समजूत काढायचे ठरवले.
रेल्वे हे सरकारचे खाते. त्यात कुणाला भीती वाटते म्हणून ड्युटी नको असे सांगता येत नाही. अशी शिफारस पाठवणे त्यांनाही शक्य नव्हते. पण दोघे अजिबात ऐकायला तयार नव्हते.

दोघांना रात्री काही तरी रहस्यमय प्रकार दिसले होते. जे त्यांना दिसले होते ते विलक्षण होते आणि भयानक सुद्धा.
बरं अजून काही जणांनी हा प्रकार पाहिला होता.

संध्याकाळ झाली कि रेल्वे स्टेशनवर एक तरूणी फिरत असे. एव्हाना स्टेशनमास्तर घरी गेलेले असायचे. त्यांना याबद्दल काहीच माहीत नव्हते.
या दोन सिग्नलमन मुळे पहिल्यांदा ते ऐकत होते.

त्यामुळेच गेल्या काही दिवसातल्या घटनांचा अर्थ आता त्यांना लागत होता.

गेल्या काही महीन्यांपासून इथे संध्या़काळनंतर ट्रेन्स न थांबण्याचे प्रकार होत होते. सुरूवातीला त्यांनी इग्नोर केलं.
पण दोन तीनदा झाल्यावर त्यांनी पुढे रिपोर्ट्स पाठवले. आता मात्र सर्रास ट्रेन्स थांबत नव्हत्या.

१९६२ साली हे स्टेशन सुरू झाले. पाचच वर्षे झाली होती. आज १९६७ चालू होतं.
बाबू मंडल नुकतेच आले होते.

त्यांना इतक्यात इथे काय काय चालू आहे याची कल्पना नव्हती.
पण नंतर समजत गेले.

आधीचा स्टेशनमास्तर इथून भिऊन बदली करून घेऊन पळाला होता. त्याचे वरपर्यंत संबंध असल्याने ताबडतोब त्याला बदली करून मिळाली आणि बाबू मंडल यांना इथे पोस्टींगचं भाग्य लाभलं.

-------------------------------------------

आमची गाडी धक्के खात होती. चांगल्या रस्त्याने जायच्या ऐवजी हा आतला रस्ता घेतला होता. जवळपास ६० - ७० किमीचं अंतर कमी होत होतं. पण तो रस्ता चांगला होता असं ड्रायव्हरचं म्हणणं होतं. दुर्गापूर मार्गे गेल्याने ३५० किमी अंतर होत होतं. या रस्त्याला मोठं गाव एक तर नाही. आरामबाग नावाचं एक गाव त्याच्या नावामुळे लक्षात राहीलेलं. या मार्गाने २५० किमी अंतर होत होतं. म्हणजे पुणे कोल्हापूर. आता कोल्हापूरचा पूर्वीचा रस्ता आठवून बघा. वेळ वाचण्याची शक्यता नव्हती.

एक बंकुरा नावाचं गाव लागलं. इथे जेवायची सोय दिसत होती. ड्रायव्हरचं म्हणणं की सहा सात तासाचं अंतर आहे. आपण फार तर पाच तासात जाऊ शकतो. मधे जेवायची सोय नाही.

इथे एका घरासारख्या होटेलमधे मासे मिळत होते. जेवायला सगळे थांबले.
मी सॅंडविचेसवर ताव मारला.
अर्धा तास यात गेला.

आता पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो याची काळजी लागली होती. पुन्हा परत किती वेळात येऊ ही काळजी माझ्या चेह-यावर दिसत होती.
पण बंदना म्हणाली कि जर तशीच वेळ आली तर आपण तुझ्या घरी फोन करून काही तरी कारण सांगू.

या मंडळींना पुरूलिया मधे पण फिराय़चं होतं. त्यातही तासभर सहज गेला असता. चंदनला इथे ऑटोमॅटीक नूडल्स मशीन बघायची होती. कुणाला सिंग बाजार मधे काम होतं. तर पुरूलिया मधे राहून सकाळी निघावे असा विचार जोर धरत होता. पुरूलिया निसर्गसौंदर्याने बहरलेलं आहे हे कबूल करावेच लागेल.

हे सगळे माझ्या कामासाठी निघाले होते तर आता यांच्या कामांना ना म्हणणे अवघड होते. मला फक्त मामा काय म्हणेल याची भीती वाटत होती. पण ती जबाबदारी सर्वांनी घेतली होती. तरी भीती होतीच.
कारण मामाला तोंड देताना चेह-यावर त्याला ते वाचता येणारच होतं.

क्रमशः
(या पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान...
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!