यहां पे कोई भी ट्रेन नही रूकती है - एक रहस्यमय रेल्वेस्टेशन

Submitted by रानभुली on 13 February, 2021 - 14:19

भारतात अनेक रहस्यं आहेत. अनेक गूढ गोष्टी आहेत.
या अशा गोष्टींचा खजिना बहुतेक पश्चिम बंगाल मधे मोठ्या प्रमाणात आहे. इथे गुप्त धनाच्या, ट्रेजर हंटच्या गोष्टी समजतील, कुठे जंगलात कुणा राजाचा पुरून ठेवलेला खजिना अशा गोष्टी तर खूप ऐकायला मिळतात.

बंगाली जादू खूप (कु)प्रसिद्ध आहे. पण मला माझ्या वास्तव्यात त्याबद्दल फारसे ऐकायला नाही मिळाले. प्रत्यक्ष ऐकायची पहायची खूपच इच्छा होती. पण भाषेची समस्या, माझं परकंपण असेल किंवा अजून काही कारणं असतील या बाबतीत माझी साफ निराशा झाला. खरे म्हणजे माझा जो इथला ओळखीचा ग्रुप आहे त्यांचीच इच्छा नाही दिसली. त्यांचा विश्वास आहे कि नाही हे सुद्धा समजले नाही.

पण एक अत्यंत विलक्षण गोष्ट इथे समजली. मला जशी समजली तशीच तुम्हाला सांगणार आहे. कदाचित थोडीशी नाट्यमयता येईल माझ्याकडून. पण हे रहस्य माझ्या पोटात राहणारं नाही. ही सत्य घटना आहे. ज्यांना माहीत आहे त्यांनी आपापली कथा प्रतिसादात सांगावी. मला जशी माहीत पडली आणि अनेक ठिकाणावरून खात्री करून घेतल्यानंतर खूपच नवल वाटत राहीलं. आजही नेमका काय प्रकार असावा हे मला कळत नाही. कोलकात्यात जेव्हां मला ही गूढ गोष्ट समजली तेव्हां तिचं महत्व लक्षात नव्हतं आलं. पण काही टीव्ही शोज मधे पण त्याबद्दल ऐकलं आणि लक्षात आलं की ही आता स्थानिक गोष्ट नक्कीच नाही.

तर आता नमनाला जास्त तेल न घालता आपल्या गोष्टीला सुरूवात करते.

-----------------

२०१७ च्या एप्रिल मधे कामानिमित्त कोलकत्याला गेले होते. इतक्या लांबून जाऊन माझं काम काही झालं नाही. त्यामुळे उदास होते. तिथेच एका म्युझिक ग्रुपशी ओळख झाली. त्यांच्यातल्या दोघांचे सिलेक्शन झाल्याने मंडळ खूष होतं. पुढे त्यांच्याशी चांगली गट्टी जमली. आम्ही एकत्र काम पण केलं. त्यासाठी कोलकात्यात मुक्काम वाढवायचा होता. आजी मूळची बंगाली असल्याने आईचे मामा, त्यांची मुलं आजही तिथे रहायला असल्याने ती अडचण नव्हती.

फक्त इतक्या लांबून खूप आशेने येऊन मुख्य काम न झाल्याने मधले काही दिवस कसे काढावेत हे समजत नव्हतं. कोलकाता फिरून झालं. दार्जिलिंगची ट्रीप पण झाली. दोन तीन दिवस कामाचे गेले.
आता बरेच दिवस उगीचच रहायचं होतं. मग एका अड्ड्यावर रोज सकाळी भेटायचं ठरलं. नाश्ता चहा करायचा आणि दुपारी किंवा संध्याकाळी आपापल्या घरी असा कार्यक्रम होता. तिथे प्रॅक्टीस सुद्धा व्हायची.

हळूहळू वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होऊ लागल्या. माझे मामे-मामेभाऊ कम्युनिस्ट. ते ही येत अधून मधून. काही भाजपला जवळ करत होते. बंगाली अशा विषयावर तावातावाने चर्चा करतात. मी पण ऐकत ऐकत तयार होते गेले. पण हे पण एकसुरी वाटायचं. अधून मधून प्रेक्षणीय स्थळं बघायचा विचार यायचा.

अशातच मग मला एक दिवस कोलकात्यापासून सुमारे २६० किमी वर असलेल्या एका रेल्वेस्टेशनबद्दल समजलं. मी म्हटलं मला बघायचंय.
गंमत म्हणजे घरी सांगितल्यावर माझा मामा सुद्धा ओरडला. हे कम्युनिस्ट तर पक्के नास्तिक असतात ना ? माझ्या स्वभावानुसार विरोध झाला की विचार पक्का होत गेला. आता न सांगता जाणे भाग होते.

घरी न कळवता जायचे तर एका दिवसात जाऊन येऊन व्हायला हवं होतं. सकाळी निघाले तर ट्रेन काही तरी १० वाजता होती जी इथे थांबत होती. त्या आधीची पहाटे होती. ती पकडणे शक्य नव्हते. पण संध्याकाळी कोलकात्यात परत यायचे तर दुपारी १ ची फास्ट ट्रेन पकडणे गरजेचे होते. १० ची पॅसेंजर तीन चार तास लावण्याची शक्यता होती. ती पोहोचेपर्यंत ही निघून जाण्याची शक्यता होती. ( कुणी जाणारच असेल तर वेळा नक्की पाहून घ्या. गुगल न करता लिहीतीये. शिवाय वेळा बदलल्या असतील ही शक्यता).

शेवटी खासगी कारने जाण्याचा मार्ग दिसत होता.
घरी एका कार्यक्रमासाठी जवळच्या गावात जात आहोत असे सांगितले. मामे भाऊ म्हणाला मी येतो सोडायला. पण ऋतूपर्णचे नाव पुढे केले. त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे मग पुढे कुणी टोकलं नाही. नाहीतर माझ्या स्वभावाची कल्पना असल्याने ही मुद्दाम जाईल ही शंका मामाला होतीच.

सकाळी सकाळी ७ वाजता निघालो. इथे दमट हवा आणि एप्रिल महीन्यामुळे सारखी तहान लागायची. मुंबईत असं ऊन लागत नाही. कोलकत्याला उन्हाचा त्रास असह्य होतो. दार्जिलिंग वरून येऊन कोलकत्यात मुक्काम करूच नये. उलटं करावं नेहमी. पण या वेळी सकाळच्या प्रसन्न वेळी बाहेर पडल्याने मस्तं वाटत होतं. एसी बंद करून खिडया उघडल्या. छान वाटत होतं.

शहर मागे पडलं आणि मोकळं वारं मिळू लागलं. आता जी कहाणी तुटक तुटक ऐकत आले होते ती चंदन घोषला पुन्हा पहिल्यापासून सांग असा आग्रह धरला. त्याला पण खूप इंटरेस्ट असायचा.
चहा पाणी, कोल्ड्रींक्स, नाश्ता यासाठी एका ठिकाणी थांबलो. किमान ड्रायव्हरला फ्रेश ठेवणे क्षगरजेचे होते. मी ताजे सँडविचेस बांधून घेतले. सकाळी सकाळी खाणं जमत नसल्याने आणि नंतर रस्त्यात पुन्हा थांबता येईल याची खात्री नसल्याने हा उपाय केला.

पुन्हा प्रवासाला सुरूवात झाली आणि चंदनने अगदी सुरूवातीपासून कहाणी सुरू केली.

--------------- X --------------------------------------

पश्चिम बंगालचा पुरूलिया हा जिल्हा भारतात अशाच एका रहस्यमय गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात एक गूढ विमान आणि त्यातून शस्त्रं आणल्याचं एक प्रकरण आहे. ते पण खासच रहस्यमय आहे. पुरूलिया शहर झारखंडला लागून आहे. इथून ५० /६० किमीवर एक गाव आहे.
बेगुनकोडोर. झाल्दा तालुक्यात हे गाव आहे तालुक्याचं गाव तसं जवळच आहे.

हे गाव पण चांगलं सधन आणि मोठ्या लोकवस्तीचं. रेल्वे झाल्याने गावक-यांना आता झारखंड किंवा कोलकात्याला जायला यायला चांगली सोय झाली असे वाटत होते. पण कसचं काय. इथे रेल्वे थांबत नसे. बेगुनकोडोरला रेल्वेस्टेशन झालं तर आजूबाजूच्या गावांची पण सोय होणार होती. नाहीतर त्यांना ५० किमी वर पुरूलियाला जावं लागे किंवा मागे ३० किमी वर.

यहा कोई ट्रेन रूकती नही ही या गावक-यांची तक्रार जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार पासून ते मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यापर्यंत जायची. बंगाली लोकांनी एकदा एक गोष्ट मनावर घेतली की ते मागे हटत नाहीत. भांडायला पण बंगाली एक नंबर. स्थानिक आमदार पण मेटाकुटीला आला होता. गावक-यांना गावातून रेल्वे जाते पण थांबत नाही हे खटकायचं.

शेवटी एकदाचं पाठपुराव्याला यश येऊन १९६२ ला इथे रेल्वे थांबू लागली. एकच जल्लोष झाला.
रेल्वे थांबू लागल्याने गावाला झळाळी आली. रेल्वे स्टेशनच्या आसपास दुकाने झाली. प्लॅटफॉर्मवर ठेलेवाले , फेरीवाले यांचा वावर वाढला. व्यापारी कोलकत्याला जायला इथे येऊ लागले. आजूबाजूच्या गावातले लोकही इथे येऊ लागले. त्यांच्यासाठी मग टांगे धावू लागले. आर्थिक व्यवहार वाढले. हळूहळू त्यातलं नावीन्यं, अप्रूप कमी होऊ लागलं.

एक दिवस ..

(क्रमशः)

(या पुढील भागासाठी कृपया इथे टिचकी मारावी )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत धन्यवाद. पुढचा भाग टंकायचे कष्ट वाचले. यात सगळेच रहस्योद्घाटन सफळ संपूर्ण झाले आहे.
नव्याने काही लिहू शकत नाही. ही कहाणी मी अनेक ठिकाणी पडताळून पाहिली आहे.
लिंक्स देऊन लिहायचे कष्ट वाचवण्याची आयडिया आवडली. त्या सर्व लिंक्स इथेच देते.

२६० किमी चार तासांत? >> आम्ही ट्रेनने गेलो नाही. मी शक्यता आहे असं म्हटलं. जास्त पण लागू शकतात. मुद्दा परतीच्या ट्रेनचा होता. चार तासात पोहोचलो तरीही ट्रेन मिळण्याची शक्यता नाही हे सांगायचं होतं. बोकलत यांनी लिंक दिली आहे. त्यात सगळी कहाणी आलेली आहे.

ठीक आहे धनवन्तीआभार.
मी दुसरा भाग टाकायालाच आले होते.
(जर कुणाला दुसरे version माहीत असेल तर प्रतिसादात द्यावे असे मी आवाहन केले आहे. थोडा धीर धरला तर सर्वांनाच आपापली कथा सांगता येईल).

छान कथा.. मस्त लेखनशैली.
काही स्टोरीज माहिती असल्या, तरी अशा खुमासदार शैलीत वाचायला आवडतात!!!
पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!!

मृणाली, हरचंद पालव, अज्ञातवासी, रूपाली, देवकी, निलेश,
झम्पू दामले, ब्लॅक कॅट
मला सवय नाही लिखाणाची. पण तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे थोडे फार खरडले आहे. Happy
सर्वांचे मनापासून आभार,

लेखनशैली खूपच छान. लेखमाला वाचली. "झपाटलेली" ठिकाणे आहेत पण याविषयी पहिल्यांदा वाचले.
चांगले लिहिले आहे.

>> या जिल्ह्यात एक गूढ विमान आणि त्यातून शस्त्रं आणल्याचं एक प्रकरण आहे. ते पण खासच रहस्यमय आहे.

हो, एक विमान आले होते आणि एका रात्रीत शस्त्रांचे ढीग टाकून गायब झाले. ते विमान कोणत्या देशातून आले व त्यात कोण कोण होते याविषयी नंतर तपास झाला खरा. मुख्य सूत्रधार सोडून बाकी सगळे सापडले. त्यांना शिक्षा झाली व सोडले सुद्धा. त्यातसुद्धा बरेच राजकारण झाले, वगैरे वगैरे. पण हि शस्त्रे का व कोणासाठी टाकली होती याबाबत आजतागायत गूढच राहिले. तेंव्हा वृत्तपत्रातून त्याविषयी सारख्या बातम्या येत असत ते आठवले.