अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग १)

Submitted by मो on 3 February, 2021 - 21:59

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा थोडाफार आढावा घेण्याचा प्रयत्न मी काही लेखांमधून करणार आहे.

------

१४९२ मध्ये युरोपमधून अशियाच्या शोधात निघालेला कोलंबस उत्तर अमेरिकेजवळील बेटांवर पोहोचला, आणि त्यानंतर जवळपास १०० वर्षं अनेक युरोपियन या नवीन जगाच्या सफरीकरता, अधिक जागेच्या शोधाकरता येतच राहिले. पण त्यांचा हेतू हा सोने, मसाल्याचे पदार्थ यांचा शोध, लूट, धर्मांतर, काही स्थानिकांना गुलाम म्हणून परत आणणे इथपर्यंतच असे. या नवीन जगात राहण्याच्या हेतूने कोणीही येत नसे. खरं तर कोलंबसच्या आधीही उत्तर अमेरिकेत अनेक खलाशांच्या सफरी झाल्याचे पुरावे आहेत. कोलंबसच्या आधी ५०० वर्ष नॉर्वेमधून Leif Eriksson नावाचा खलाशी कॅनडाच्या उत्तर पूर्व किनार्‍यावर पोहोचला होता. पण तिथे तो किंवा त्याच्यानंतर आलेले खलाशी/प्रवासी फारशी वस्ती करुन राहिले नाही. कोलंबसनंतर स्पेनमधून हर्नन कॉर्टेझ मेक्सिकोला पोहोचला, आणि तिथल्या अ‍ॅझ्टेक साम्राज्याबरोबर लढाईत गुंतला. परंतू स्पेनमधील लोकांनी मेक्सिकोमध्ये स्थलांतर केले नाही. स्थानिकांवर सत्ता चालवणे, त्यांचे धर्मपरिवर्तन करणे आणि मोठी लूट आपल्या देशात घेऊन जाणे हेच सर्व युरोपियनांनी पसंत केले. सोळाव्या शतकात ब्रिटिश, फ्रेंच, स्पॅनिश लोकांनी अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरील काही ठिकाणी मिलिटरी पोस्ट्स स्थापन केल्या आणि स्थानिकांबरोबर थोडाफार व्यवहार सुरु केला.

सतराव्या शतकात युरोपातली परिस्थिती चिघळत होती. सतत चालणारी युद्धं आणि त्यात सुरु असलेला कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट हा वाद याने तेथील प्रोटेस्टंट लोक पिचून गेले होते. प्रोटेस्टंट पंथाला पाठींबा देणार्‍या, सहानुभूती बाळगणार्‍या लोकांची धरपकड आणि कत्तल या काळात सुरु झाली. सर्वसामान्यांची आर्थिक स्थितीही आशादायी नव्हती. अशा परिस्थितीमध्ये १६०७ मध्ये एका नवीन जगात (न्यू वर्ल्ड) एक नवी सुरुवात करण्याकरता उत्सुक असलेल्या १०५ पुरुषांना (सैनिक,'जंटलमेन', कारागीर आणि मजुर) घेउन एक जहाज इंग्लंडमधून अमेरिकेला (सध्याच्या व्हर्जिनिया राज्यातील) जेम्सटाउन या ठिकाणी पोहोचले. किनार्‍याचा हा भाग तोपर्यंत युरोपियनांकडून फारसा 'एक्स्प्लोअर' केला गेलेला नव्हता. सुरुवात आशादायक झाली असली तरी काही काळातच रोगट हवामान, दुषित पाणी, आजार (टायफॉइड, डिसेंट्री), मूळ रहिवाश्यांशी संघर्ष यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आणि ही वसाहत फारशी यशस्वी ठरली नाही. नंतरही काही अयशस्वी वसाहतींचे प्रयत्न झाले. १६२० मध्ये इंग्लंडमधील प्लिमथ या ठिकाणाहून प्युरिटन पंथाचे (इंग्लंडमधील प्रोटेस्टंट्स) साधारण १०० लोक आणि ३० खलाशी इंग्लंडमधील छळाला कंटाळून आणि धरपकडीला घाबरुन मेफ्लावर नावाच्या जहाजातून नवीन जगाकडे जायला निघाले. साधारण २ महिन्यांच्या प्रवासानंतर मॅसेच्युसेट्स राज्यातील एका किनार्‍यावर त्यांच्या जहाजाने नांगर टाकले. ही इंग्लिश लोकांची उत्तर अमेरिकेतली पहिली अधिकृत यशस्वी कॉलनी. या नवीन ठिकाणाचे नाव त्यांनी प्लिमथ असेच ठेवले.

यानंतर हळूहळू इंग्लंडमधून, आणि युरोपातील इतर भागांमधून लोकांचे उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर स्थलांतर सुरु झाले. या लोकांनी झाडं, जंगलं साफ करुन राहण्याची व्यवस्था, शेती इत्यादी करता जागा बनवायला सुरुवात केली. यातील काही लोकांनी तेथील मूळ रहिवाश्यांबरोबर (नेटिव्ह/इंडियन्स) सलोख्यात राहायचा प्रयत्नही केला, आणि काही वेळा ते यशस्वीही झाले. पण अचानक आलेले हे लोक आपल्या जागेवर अतिक्रमण करताना, शिकार करताना, नासाडी करता पाहून नेटीव्ह अमेरिकन त्यांना विरोध करत आणि त्यातून चकमकी होत. बंदुकांनी लढत असल्याने युरोपियन हे बहुतेक वेळा या चकमकीत जिंकत असत. नेटिव्हज गनिमी काव्याने, रात्री हल्ला करुन नासधूस करत असत. जसे लोक वाढायला लागेल तसे अतिक्रमण, आणि संघर्ष वाढायला लागला. अनेक मूळ रहिवाश्यांच्या जमातीला पूर्वी आलेल्या खलाश्यांचे चांगले अनुभव नव्हते, कित्येकदा त्यांनी केलेल्या चांगुलपणाचा मोबदला हा फसवणूक आणि लुटीत झालेला होता त्यामुळे आलेल्या या लोंढ्याबद्दल ते साशंक होते. तरी व्यापार करण्याच्या हेतुने किंवा नाइलाजाने अनेक जमातींनी या नवीन पाहुण्यांबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या भागात सुपीक जमीनीची कमी नव्हती, शेती करण्यास भरपूर वाव होता, पण ही शेती करायला मनुष्यबळ मात्र नव्हते, आणि तिथून सुरु झाली उत्तर अमेरिकेतील स्लेव्हरीला सुरुवात!

स्लेव्हरी किंवा गुलामगिरी ही युरोपियनांकरता नवी नव्हती. स्लेव्हरीचा इतिहास हजारो वर्षं जुना आहे. ग्रीक, रोमन साम्राज्यात अफ्रिकेतून गुलाम आणणे, किंवा पराजितांच्या योद्ध्यांना गुलाम बनवणे हे सर्वमान्य होते. लढाई, रानटी खेळ, राजेरजवाड्यांचे सेवक इत्यादी करता गुलामांची नेमणूक व्हायची. बरेच गुलाम नंतर मुक्त केले जायचे. त्यांच्या शौर्यावर सैन्यामध्ये त्यांची बढती होत जायची. अनेकदा गुलामांनी त्यांच्या लायकीप्रमाणे राजदरबारात काही महत्त्वाची पदे पण भूषविली आहेत. पण युरोपियन अमेरिकेत आले, आणि या स्लेव्हरी किंवा गुलामगिरीचा एक वेगळा आणि दु:खप्रत अध्याय सुरु झाला.

शेतीकरता मदत म्हणून १६१९ मध्ये २० गुलामांना अफ्रिकेतून आणले गेले ही अमेरिकेतील स्लेव्हरीची पहिली नोंद आहे. पण सुरुवातीला आणले गेलेले स्लेव्हज हे Indentured slaves होते, म्हणजे ते काही दिवसांच्या करारावर आणले गेलेले होते. कराराच्या मुदतीचा काळ संपल्यावर ते मुक्त होत. केलेल्या कामाबद्दल त्यांना पैसेही मिळत. ते गुलाम म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध, कुटुंबापासून तोडून जबरदस्तीने आणले गेलेले असले तरी त्यांच्या नंतरच्या पिढ्यांवर जे कोसळले त्या मानाने ते भाग्यवान होते. यातील काही स्लेव्हजनी करार संपल्यावर जमिनी घेऊन स्वतःकरता शेती केल्याच्या नोंदीही आहेत. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ही पद्धत चालू राहिली. या काळात करिबियन बेटांवरील कापुस, तंबाखु आणि इतर पिके तर ब्राझिल आणि इतर पोर्तुगिज, स्पॅनिश कॉलनींमध्ये शेती, खाणव्यवसाय वाढायला लागले आणि कामगारांची मागणी प्रचंड वाढली. त्यांना पगार देणे, ठराविक काळानंतर मुक्त करणे हे मोठ्या बागायतदारांकरता फायदेशीर ठरेना. माणूस स्वार्थापायी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे उत्तर-दक्षिण अमेरिकेत युरोपियनांनी अफ्रिकेतील दलालांसमवेत सुरु केलेला गुलामांचा व्यवसाय! जशी जशी युरोपियनांनी अमेरिकेतील मूळ रहिवाश्यांकडून अधिकाधिक जागा हिसकावून घेऊन शेतीची व्याप्ती वाढवली, तशी तशी अफ्रिकेतून गुलामांची आयात वाढत गेली आणि पुढची अडीचशे वर्षे या गुलामांच्या अनेक पिढ्यांकरता कमालीची क्लेशकारक ठरली.

transatlantic
(स्रोत - news.emory.edu)

अफ्रिकेतून उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत गुलाम आयात करण्याचा जो व्यापार होता होता त्याला 'ट्रान्स अ‍ॅटलांटीक स्लेव्ह ट्रेड' असे नाव पडले. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात करिबियन बेटे, दक्षिण आणि उतर अमेरिकेत गुलामांची मागणी वाढायला लागल्यावर अफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावर गुलामांचा पुरवठा करणारे दलाल वाढत गेले. या दलालांच्या सशस्त्र टोळ्या आतल्या देशांमध्ये जाउन लोकांना बळाने, साखळ्या बांधून आणत आणि मोठमोठ्या जहाजांमधून उत्तर/दक्षिण अमेरिकेला, करिबियन बेटांवर पाठवत असत. यात स्त्रिया, पुरुष आणि मुलांचाही समावेश असे. एकदा का या दलालांनी पकडले की हे लोक कुटुंबांपासून नेहेमी करता तुटले जात, पळून जाणेही त्यांच्याकरता जवळपास अशक्यच असे. जहाजातही हे लोक कमी जागेत, एकमेकांना खेटून, साखळीत जखडून ठेवले जात. या जहाजातील परिस्थिती इतकी भयंकर असे ही बरेच लोक हे तिथेच आजारी पडून मरत. पण त्यांच्या जिवाला काही किंमत नव्हती. फुकट मिळालेले लोक अतिशय स्वस्तात अफ्रिकेतील दलाल विकत असत, आणि मग अमेरिकेला आणले की तेथील पुरवठादार त्यांची जास्त पैसे देऊन विक्री करत. एकदा एखादा गुलाम विकत घेतला की ती घेणार्‍याची मालमत्ता होत असे. मग तिचा वापर कसा करायचा हे मालक ठरवीत असे. विकत घेणारे लोक त्यांना विविध कामांकरता विकत घेत. गुलामाच्या वय, लिंग, तब्येत यावर त्याची किंमत ठरे. यात भरपूर घासाघीस चाले. या सर्वात गुलाम हा एका निर्जीव वस्तुप्रमाणे वागवला जाई. १८व्या शतकात अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावर गुलामांच्या विक्रीकरता मोठी केंद्रे स्थापन झाली होती.

SlaveMarket
(स्रोत - http://historynet.com/)

Ads-collage
(स्रोत - https://www.nationalgeographic.org/)

अमेरिकेत आलेले हे स्लेव्ह्ज सुरुवातीला गांगरलेले असत. भाषा, चालीरिती सगळेच वेगळे. सुरुवातीला त्यांना बाप्तिस्मा देऊन खिश्चन बनवण्यात येत असे. त्यांना नवीन नाव देण्यात येई. त्यांचे आडनाव मात्र मालकाप्रमाणे बदलत असे. त्यामुळे एकाच गुलामाचे आयुष्यात अनेकदा आडनाव बदलू शकत असे. या गुलामांचे पूर्वायुष्य पूर्णपणे पुसून टाकून त्यांचे मूळभूमीशी असलेले नाते हरप्रकारे लवकर तोडण्याचा प्रयत्न होत असे. स्लेव्हज ही मालमत्ता असल्याने त्यांना अक्षरशः निर्जिव वस्तूंसारखे वागवण्यात येई, त्यांचा भावनांना काहीही किंमत नसे. त्यांच्याकडून फक्त काम करुन घेणे, जास्तीत जास्त पिळवणूक करुन फायदा करुन घेणे, कुठलीही छोटी चूक (बहुतेक वेळेला फक्त मालकाची गैरमर्जी) झाल्यास चाबकाने फटके, सतत अपमान, खच्चीकरण, कमालीची जरब अशा परिस्थितीत हे स्लेव्ह्ज राहत. त्यांच्यात आपासात लग्ने होत. जास्तीत जास्त मुले होणे हे मालकाच्या फायद्याचेच असे, कारण मुलांवरही मालकाचा हक्क असे. मुले सुरुवातीची १०-१२ वर्षं आईवडीलांजवळ राह्त. त्यानंतर अनेकदा मालक त्यांना दुसरीकडे विकून टाकत असे. यात मुलांच्या, आईवडीलांच्या आर्त किंकाळ्यांना काहीच किंमत नसे. गुलाम हे मालमत्ता असल्याने ते एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत केले जात किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना भेटवस्तू म्हणूनही दिले जात. तिथेही गुलामांच्या कुटुंबाची ताटातूट होते असे. स्त्रियांचे आयुष्य अजुन भयंकर असे. जर मालकाची वक्रदृषी पडली तर तिला कोणीही वाचवू शकत नसे, कारण ती मालकाची मालमत्ता असल्याने तिचा नवरा किंवा बाप यांचाही तिच्यावर काही हक्क नसे व ते तिच्याकरता काहीही करु शकत नसत. 'तुम्ही काहीतरी पाप केलेले असल्याने तुम्हाला देवाने ही शिक्षा दिली आहे, तुम्ही कनिष्ठ, दुय्यम आहात, तुम्ही वाईट आहात, देवाचा तुमच्यावर कोप आहे' वगैरे गोर्‍या धर्मगुरुंकडून त्यांच्या भोळ्या मनावर बिंबविले जात असे. त्यांना शिक्षण घेण्यास मज्जाव असे. कुठलाही स्लेव्ह हा चोरुन शिक्षण घेताना दिसला तर जबर शिक्षा केली जाई. पळून जाताना आढळलेल्या स्लेव्हची अवस्था तर अतिशय भयंकर होत असे, जेणेकरुन इतर त्यातून धडा घ्यावा. बर्‍याच स्त्री गुलामांना मालकांपासून मुले झालेली असायची. अडीचशे वर्षात अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणात मिक्स्ड ब्रीडींग झाले. मात्र या सर्व मुलांमध्ये अफ्रिकन रक्त असल्याने ते गुलामच रहायचे, आणि शेवटी विकले जायचे.

अमेरिकेला १७७६ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तोपर्यंत अमेरिका ही इंग्लंडची कॉलनी म्हणून ओळखला जायचे आणि त्यांना इंग्लडच्या तिजोरीत कर भरावा लागायचा. थोडी स्वायत्तता असली तरी महत्त्वाचे निर्णय हे इंग्लंडचा राजाच घ्यायचा. अमेरिकेतील बुद्धीजीवी नेत्यांना, लोकांना हे सहन होत नव्हते, आणि तिथे त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुरुवात झाली. खरं तर अमेरिकेत आलेले लोक हे तिथल्या मू़ळ (नेटिव्ह) लोकांची जमीन बळकावून राहत होते, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्लेव्हरी कमी न होता वाढतच होती. पण याच राज्यांना इंग्लंडची त्यांच्यावर चाललेली सत्ता मात्र मान्य नव्हती. इंग्रज सैन्यावर निर्णायक विजय मिळाल्यावर ४ जुलै १७७६ अमेरिकेने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. स्वातंत्र्यानंतर १३ राज्यांनी बनलेल्या अमेरिकेत स्लेव्हरीच्या प्रश्नावर मात्र मुळीच एकमत नव्हते. व्हर्जिनिया आणि त्याच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये स्लेव्हरीला पाठींबा तर व्हर्जिनियाच्या उत्तरेला असलेल्या राज्यांचा स्लेव्हरी बंद करण्याकडे कल होता.

13-colonies
(स्रोत - https://subratachak.wordpress.com/)

अमेरिकेचे फाउंडींग फादर्स अतिशय विद्वान, धोरणी लोक होते. त्यांच्यातल्या काहीजणांचा स्लेव्हरी बंद किंवा हळू हळू कमी करत नेऊन बंद करण्याकडे कल होता (आणि बर्‍याच जणांकडे स्वतःचे स्लेव्ह्जही होते). उत्तरेकडील राज्यांमध्ये काही लोक उघडपणे स्लेव्हरीला विरोध करायला लागले होते. अमेरिका स्वतंत्र झाल्यावर स्लेव्हरी बंद करावी याकरताही काही जणांचा आग्रह होता. पण अमेरिकेच्या दक्षिण भागातील राज्यांचा याला विरोध होता. दक्षिणेत अनेक मोठमोठे बागयतदार (प्लँटेशन ओनर्स) होते आणि त्यांची प्रचंड मोठी शेती ही या स्लेव्हरीच्या जीवावर चालत होती. या गुलामांमध्ये त्यांची मोठी आर्थिक गुंतवणूक होती. स्लेव्हरीचा अंत म्हणजे या स्लेव्ह कष्टकर्‍यांना पगार द्यायला लागणार, आणि त्याने व्यवसायातला नफा कमी होणार त्यामुळे स्लेव्हरी बंद करण्यास त्यांनी कडा विरोध केला. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीच्या १३ राज्यांमधील युनियन टिकवून ठेवण्याकरता स्लेव्हरीच्या प्रश्नावर काहीही निर्णय घेतला गेला नाही. अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटिटीव्ह मध्ये राज्याच्या लोकसंख्येनुसार त्या राज्याला प्रतिनिधी मिळतात. स्लेव्हना मालमत्ता म्हणून समजले जात असल्याने मतदानाचा अर्थातच हक्क नव्हता पण त्यांना लोकसंख्येत धरण्याची दक्षिणेतील राज्यांची इच्छा होती जेणेकरुन संसदेत राज्याचे प्रतिनिधी म्हणजे वर्चस्वही वाढणार. उत्तरेतील राज्यांना हे दुट्टपी धोरण मान्य नव्हते. त्यामुळे तोडगा म्हणून प्रत्येक स्लेव्हला लोकसंख्येत तीन पंचमांश (३/५) धरले गेले. स्लेव्ह मालमत्ता असल्याने त्यांच्यावर कर भरला जात असे, कर भरतानाही माणशी हाच तीन पंचमांश आकडा धरला गेला. एका मनुष्यप्राण्याला गणताना त्याला पूर्ण माणूस म्हणून नाही तर ३/५ गणणे या पेक्षा अजून मानहानीकारक आणि लाजिरवाणे काय असू शकेल! स्लेव्हरीचा सगळा अध्यायच माणुसकीला काळीमा फासणारा होता.

अमेरिकेतील उत्तरेतल्या राज्यांमध्ये ही अमानुष पद्धत बंद करण्याकरता चळवळ जोर धरत होती आणि शेवटी १८०४ पर्यंत उत्तरेतील राज्यांनी स्लेव्हरी ही संपुष्टात आणली. इंग्लंड आणि युरोपातही ती या काळापर्यंत हद्दपार झाली होती. उत्तरेत संपूर्ण अमेरिकेत स्लेव्हरी संपवण्याकरता अ‍ॅबॉलिशनिस्ट मूव्हमेंट सुरु झालेली होती. पण दक्षिणेत मात्र ती जास्त अमानुष होत होती. याचे एक कारण म्हणजे १८०३ मध्ये अमेरिकेने फ्रांसकडून लुइझियाना पर्चेस कराराखाली मिळवलेला जमिनीचा खूप मोठा तुकडा! या करारानुसार थॉमस जेफरसनने मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला पसरलेला विस्तीर्ण, सुपीक जमिनीचा तुकडा फ्रांसकडून विकत घेतला. लुइझियानाची दमट हवा आणि कमी काळ असणारी थंडी यामुळे तिथे कापसाच्या पिकाची लागवड चांगली व्हायला लागली. काही वर्षांपूर्वी कॉटन जिन या यंत्राचा शोध लागला होता आणि कापूस हे अतिशय नफादायक पीक ठरायला लागले होते. अमेरिकेतील दक्षिणेतून कापूस उत्तरेतील राज्यात, आणि तेथील कारखान्यांमधून कपड्याच्या रुपांतरात सर्व युरोपमध्ये निर्यात होऊन जायला लागला. तंबाखु, कापूस, ऊस यांची प्रचंड मोठी शेती जॉर्जिया, अ‍ॅलाबामा, मिसिसिपी, लुइझियाना राज्यांमध्ये वाढली आणि स्लेव्हचे आयुष्य कमालीचे हालाखीचे झाले. या प्लँटेशन्स मध्ये स्लेव्ह्जकडून प्रचंड काम करुन घेतले जायचे. अपुरे खाणे, पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जबरी शिक्षा, राहायला हालाखीची परिस्थिती, प्लँटेशनचा मालक, मुकादम यांच्याकडून मारहाण... प्राण्यांपेक्षाही खालच्या पातळीवर या लोकांना वागविले जाई. या राज्यांमध्ये प्लँटेशन्सवर काम करण्याकरता विकले जाणे ही स्लेव्ह्जकरता सर्वात भयावह गोष्ट होती.

लुइझियाना पर्चेस नंतर पश्चिमेला वाढलेली अमेरिका
Louisianapurchase
(स्रोत - https://www.enchantedlearning.com_)

अमेरिका स्वतंत्र झाल्यावर १७९० च्या आसपास अमेरिकेत साधारणपणे ७ लाख स्लेव्हज होते तोच आकडा १८६० पर्यंत ४० लाखापर्यंत पोहोचला. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तरेत अ‍ॅबॉलिशन मूव्हमेंट जोर धरत होती, पण दक्षिणेच्या हातात बर्‍याच आर्थिक नाड्या असल्याने, आणि त्यांचा स्लेव्हरी बंद करण्यास कडवा विरोध असल्याने सरकार अजुनही स्लेव्हरी अधिकृतरित्या बंद करु शकत नव्हते. त्याकरता उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांचे एक मोठे युद्ध आणि प्रचंड रक्तपात होणे बाकी होते...

स्रोत -
पुस्तके:
A History of Us - Joy Hakim - ११ पुस्तकांचा संच
The Life and Times of Frederick Douglass - Frederick Douglass
12 Years a Slave - Solomon Northup
Incidents in the Life of a Slave Girl - Harriet Jacobs
वेबसाईट्स:
http://history.org
https://en.wikipedia.org

(maitrin.com या संकेतस्थळावर पूर्वप्रकाशित)

------

अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ (भाग २)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मो, खुपच छान! या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. तुम्ही छान व अभ्यासपुर्ण आढावा घेत आहात. अमेरिकेचा इतिहास हा माझा आवडता विषय आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

मी मागे बर्‍याच ठिकाणी मायबोलिवर जेव्हा जेव्हा कृष्णवर्णिय लोकांच्या गुलामगिरीचा विषय निघाला होता तेव्हा प्रत्येक वेळेला वाचकांना १९७६ मधे बनवलेली “ रुट्स“ नावाची टि व्ही सिरिज ( लव्हार बर्टन अ‍ॅज कुंटे किंटा) आवर्जुन बघायला सांगीतली होती. इथेही परत मी वाचकांना आवर्जुन सांगीन की ती सिरीज जर बघीतली नसेल तर जरुर बघा. मो ने वर जे काही गुलामांच्या जिवनाबद्दल व त्यांना मिळालेल्या अतिशय अमानुष वागणुकीबद्दल जे लिहीले आहे ते इतक्या प्रभावी पद्धतीने त्या सिरीज मधे दाखवले आहे की बघताना मन सुन्न होते. हॅट्स ऑफ टु दॅट सिरीज!

रूटस वाचली आहे शाळेत असताना. बरीच वर्षे त्या कांदबरीचा प्रभाव होता. या विषयाशी ओळखच त्या पुस्तकाने झाली आहे माझी.

>>रूटस वाचली आहे शाळेत असताना. बरीच वर्षे त्या कांदबरीचा प्रभाव होता. या विषयाशी ओळखच त्या पुस्तकाने झाली आहे माझी

+1
रुट्स आणि एक होता कार्व्हर या दोन पुस्तकांनी अमेरिकेतल्या गुलामगिरीबद्दल पहिल्यांदा जवळून ओळख झालेली.

छान लिहीले आहे. मध्यंतरी Three fifth compromise बद्दल बरेच वाचले होते.

फाउण्डिंग फादर्सचा गुलाम फ्री करण्याकडे कल होता वगैरेही वाचले आहे. पण जॉर्ज वॉशिंग्टन सोडला तर बहुधा इतर स्लेव्हओनर्सनी ते फ्री केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाकी थोरपणामुळे याबाबतीत त्यांचे चॅरिटेबल वर्णन करण्याचा काहींचा कल असतो, तर काही वोक लोक त्यांना आत्ताची मूल्ये वापरून जोखतात. त्यापेक्षा जे होते त्याप्रमाणे वर्णन करणारे व त्यांच्या मुख्य कार्यक्षेत्रात महान कामगिरी करणारे हे लोक इतर बाबतीत तेव्हाच्या प्रचलित समजांप्रमाणे वागत होते हे मान्य करणे व त्यांना आत्ताच्या मूल्यांच्या चौकटीत बसवायचा खटाटोप न करणे हेच बरोबर आहे. एखाद दुसरी थोर व्यक्ती काळाच्या खूप पुढे असते पण ते अपवाद.

जेफरसनने गुलामांना स्वातंत्र्य दिले नाही, नेटिव्ह अमेरिकन्स, स्त्रियांचे हक्क याबाबतीतही त्याने काही विशेष स्टॅण्ड घेतला नाही. पण इतिहासातील जवळजवळ सर्व उदाहरणे अशा अंतर्विरोधाने भरलेली आहेत. "All men" मधे मुळात स्त्रिया नव्हत्या, इतकेच नव्हे तर सर्व प्रकारचे "Men" सुद्धा धरलेले नव्हते.

पण त्यामुळे त्यांच्या मुख्य कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. किमान त्यांनी तेव्हा जे नियम लिहीले त्यातून पुढे कायदेशीर समानता येण्यात - आफ्रिकन अमेरिकन्स, स्त्रिया, नेटिव्ह अमेरिकन्स वगैरे सर्वांना समान हक्क मिळण्यात तेव्हा लिहीलेली घटनेची तत्त्वे आड आली नाहीत, हे ही महत्त्वाचे.

छान माहितीपुर्ण लेख. अमेरीकेत पुर्वी गुलामगिरी होती एव्हढंच आतापर्यंत या विषयाची माहिती होती. तुमच्या लेखमालेमुळे आता अत्यंत रोचक माहिती मिळत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

>>>>>'तुम्ही काहीतरी पाप केलेले असल्याने तुम्हाला देवाने ही शिक्षा दिली आहे, तुम्ही कनिष्ठ, दुय्यम आहात, तुम्ही वाईट आहात, देवाचा तुमच्यावर कोप आहे' वगैरे गोर्‍या धर्मगुरुंकडून त्यांच्या भोळ्या मनावर बिंबविले जात असे. त्यांना शिक्षण घेण्यास मज्जाव असे. >>>> Sad

अतिशय दु:खदायक इतिहास, पण समजुन घेणे गरजेचे, कारण यांच्याच पैशावरती जेव्हा देशात बरीच लोक येथिल चातुर्वर्ण्य व्यवस्तथेवर अनर्गल भाष्य करतात, तेव्हा हे समजुन घेणे गरजेचे ठरते. असो.
धन्यवाद

खूप सुन्दर लेख. माहितीपूर्ण!
DJANGO सिनेमात मिसिसीपी मधील गुलामांचे आयुष्य बघितले. अंगावर काटा आणि संताप एकदम अनुभवले.

अभ्यासपूर्ण माहिती...
कृष्णवर्णीयांवरील अत्याचारावर बरंच वाचलं आहे आणि लिहिलंही आहे...
जॉर्ज फ्लॉयडचा चटका लावणारा मृत्यू () पासून दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी धोरणापर्यंत () बरंच काही लिहिलंय.
त्यामुळे ही लेखमालिका चवीने वाचली.

आज अमेरिका मध्ये जाणे हे जगातील सर्व देशातील तरुणांचे स्वप्न आहे.

भारतातील तर सर्व तरुणांचे अमेरिका मध्ये जाणे जे स्वप्न आहे.

उत्तम आयुष्य,खूप पैसे ,उत्तम राहणीमान हवं असेल तर अमेरिका मध्ये जाणे आणि ग्रीन कार्ड मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.
इतकी अमेरिका प्रगत तर आहेच पण सुरक्षित पण आहे.

मुलगा अमेरिकेत नोकरीला असेल तर डोळे झाकून त्या मुलाला लग्नासाठी मुली मिळतात.

अमेरिका चा पहिला इतिहास काय होता हे फक्त tp म्हणून लोक वाचतात .
कोण्यी तो गंभीर पने घेत नाही.
ना त्यांचा इतिहास वाचून जगातील कोणताच देश त्यांच्या संबंध तोडत नाही.
ना जगातील कोणतीच व्यक्ती अमेरिका मध्ये जाण्याची संधी आली तर सोडत नाही