अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचा इतिहास - स्लेव्हरी ते ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर चळवळ

Submitted by मो on 18 February, 2021 - 15:43

दर वर्षी फेब्रुवारी महिना हा अमेरिकेत 'ब्लॅक हिस्टरी मंथ' म्हणून साजरा केला जातो. १९७६ सालापासून सुरु झालेल्या या उपक्रमाद्वारे फेब्रुवारी महिन्यात चर्चा, परिसंवाद, लेख, कला याद्वारे कृष्णवर्णीय वंशाच्या लोकांचा इतिहास, वारसा, विविध कार्यक्षेत्रामधील त्यांची कामगिरी आणि योगदान, कृष्णवर्णीय समाजायुष्यातील विविध पैलू हे लोकांसमोर आणले जातात. गेली ४०० वर्षं उत्तर अमेरिकेच्या इतिहासाचा मोठा हिस्सा असलेल्या कृष्णवर्णीयांचा इतिहास ४० वर्षांपासून वर्षातला १ महिना सर्वांसमोर येतो. या उपक्रमाची गरज का भासली, काय होता हा ४०० वर्षांचा इतिहास, अमेरिकेच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या लोकांचा प्रवास कसा झाला आहे याचा थोडाफार आढावा घेण्याचा प्रयत्न मी काही लेखांमधून करणार आहे.

Juneteenth च्या निमित्ताने हा धागा वर काढतेय (आणि त्या निमित्ताने नवीन सदस्यांना हे लेखही दिसतील).

१९ जून हा दिवस अमेरिकेत Juneteenth (June आणि nineteenth एकत्र करुन) या नावाने साजरा केला जातो. Juneteenth चा इतिहास या मालिकेच्या विषयाशी निगडीत असल्याने त्यानिमित्ताने याविषयी थोडे लिहिते.

या मालिकेच्या तिसर्‍या भागात १८६२ साली अमेरिकेतील गुलामी संपवण्याकरता अब्राहम लिंकनने आणलेल्या Emancipation Proclamation बद्दल लिहिले होते. यानुसार १ जानेवारी १८६३ नंतर संपूर्ण अमेरिकेत कृष्णवर्णीयांची गुलामगिरी रद्द करण्याचा कायदा आणण्यात आला. कृष्णवर्णीयांची गुलामी या एका महत्त्वाच्या मुद्द्यापायी अमेरिकेतील उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये १८६१ साली सुरु झालेल्या यादवी युद्धामध्ये दोन्हीही बाजूंचे लाखो सैनिक कामी आले. शेवटी एप्रिल १८६५ मध्ये दक्षिणेकडील राज्यातील कन्फेडरेट सैन्याचा सेनापती रॉबर्ट ई ली याने शरणागती पत्करली आणि युद्ध संपले. पण टेक्सासमधील कृष्णवर्णीयांच्या गुलामीवर याने फारसा फरक पडला नव्हता. एकतर या राज्यापर्यंत युद्ध कधीही पोहोचले नव्हते, आणि इतर राज्यांमधील गुलामांचे मालक त्यांच्या राज्यातून पळून टेक्सासमध्ये आले होते आणि गुलामीचे समर्थन करत होते. युद्ध संपल्यावरही टेक्सासमध्ये लाखो कृष्णवर्णीय गुलामीच्या जोखडाखाली जगत होते. शेवटी १९ जून १८६५ या दिवशी टेक्सास राज्यातील गॅल्व्हस्टन या ठिकाणी जनरल ग्रेंजर याचे सरकारी फौजेसमवेत आगमन झाले, त्यांनी कन्फेडरेट सैनिकांकडून राज्याचा ताबा घेतला आणि सर्व गुलामांची मुक्तता करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी सुमारे अडीच लाख गुलामांना गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यानंतर पुढील वर्षी टेक्सासमधील कृष्णवर्णीयांनी जून १९ हा दिवस ज्युबिली दिवस म्हणून साजरा केला, आणि नंतरच्या प्रत्येक वर्षी सुरुवातीला टेक्सासमध्ये आणि कालांतराने अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये गुलामांच्या मुक्ततेकरता जूनटीन्थ हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

२०२१ साली राष्ट्रपती जो बायडन यांनी या दिवसाची फेडरल हॉलिडे म्हणून घोषणा केली. (यामागे बर्‍याच जणांची चिकाटी आणि कष्ट आहेत).