अमेरिकन हँगओव्हर!--- अमेरिकन गाठोडं! प्रस्तावना.

Submitted by सुरेशकुलकर्णी on 22 January, 2021 - 23:03

खूप दिवसांनी वश्या दिसला. आधीच कळकट ध्यान, त्यात मांजरवक्या रंगाचं ढोपरापर्यंत ओघळलेली हुडी, पायात मात्र फ्लुरोसंट रंगाचे स्पोर्ट शूज होते. आम्ही, म्हणजे मी अन श्याम्या, मुडक्याच्या 'टी शाप' मध्ये बसलो होतो.
"सुरश्या, आलं बघ वश्याच ध्यान!" श्याम्या खाली मुंडी घालून, चहात खारी बुडवून खाताना पुटपुटला. तोवर वेश्या जवळ आला. त्याने नाकाला एका हाताने रुमाल लावला होता. सतराशे साठ खिशे असलेल्या पॅंटीच्या एका खीशातून, दुसऱ्या हाताने एक टिशू पेपर काढून, त्याने आधी बाकड्यावरली धूळ साफ केली. मग उगाच खांदे उडवत शेजारी बसला.
श्याम्याने खारी संपवून टाकली होती. श्याम्याचा चेहऱ्यावरून तो वश्याचा ताबा घेणार हे मला कळलेच होते.
"वश्या, चहा घेणार का ?" श्याम्याने विचारले.
"नॉप!"
"वश्या, नाकाला रुमाल का धरलास? सर्दी झालीयय का?"
"नॉप! पण इथं कस डर्टी डर्टी वाटतंय!, किती डस्ट आहे? कशाला असल्या ठिकाणी तुम्ही लोक बसता? आणि बसवत तरी कस तुम्हाला या घाणीत?" वश्याने पुन्हा नाक मुरडले.
"का रे कुठे होतास? या चार दोन महिन्यात दिसला नाहीस. कोठे गावाला गेला होतास कि काय?" मी न राहवून विचारलेच. वश्या पक्का आतल्या गाठीचा आहे. त्याचे प्लॅन तो कधीच सांगत नाही.
"या या!"
"सुरश्या, तू पण बावळटच आहेस! वश्या, तू नको या सुरश्याकडे लक्ष देवूस! मला सांग कशी काय होती अमेरिका?"
मी उडालोच. या श्याम्याला काय ठाऊक, वश्या अमेरिकेत गेला होता ते?!
"तुम्हाला कोण सांगितलं कि, मी यूएस ला गेल्तो म्हणून?!" वश्यानेच माझी शंका बोलून दाखवली.
"सांगायला कशाला पाहिजे! तुझा गेटअप, ते बोलणं, ते डर्टी-डर्टी करत फिरणं! हे सगळं तुला अमेरिका चावल्याने तू पिसाळयाची लक्षणे सांगताहेत! साल्या, गेल्या होळीला याच मुडक्याच्या हाटेलीत आमच्या सोबत, जमिनीवर फतकल मारूनबसला होतास आणि गांजाची भजी खाल्ली होतीस! विसरलास काय?अन आता डर्टी-डर्टी करून नाक दाबून फिरतोस का?"
वश्या विचित्र हावभाव करत निघून गेला.

दारुड्याला जसा दारूचा अंमल उतरला तरी, हँगओव्हर असतो, तसा आमच्या लोकांना पाश्चिमात्य देशांच्या भ्रमण करून आले कि, 'फॉरीन हँगओव्हर' येतो. काही जणांचा तो काही दिवसात उतरतो, तर काही लोकांचा हा झटका दीर्घकाळ राहतो.

या झटक्यात लोक बऱ्याच लोकोत्तर गोष्टी करून जातात. तेथून आल्या आल्या याना लेखनाची खुमखुमी येते. आयुष्यात रजेच्या अर्जा शिवाय लिखाण शून्य असते. तरी घराबाराची झोपमोड करून , दिवसरात्र खपवून हे पुट्ट्लच्या पुट्ट्ल कागद भरून, निघालेल्या दिवसांपासून परत येई पर्यंतचे, अहवालछाप लेखन करून टाकतात. त्याला नाव 'गोऱ्यांच्या देशात!' किंवा 'माझी अमेरिका!'--(यात मी पाहिलेली -मला दिसलेली! दोन्ही आले. मला 'समजलेली' मात्र नसते!). पुढची पायरी प्रकाशनाची! उधाऱ्या करून ते पुट्टल छापून घेतात. पदरमोड करून त्या पुस्तकाचा 'प्रकाशन सोहळा!' करतात आणि त्या दिवशी उपस्थित असलेल्या पाहुण्यांना एक एक पुस्तकाची प्रत देतात! बाकी, राहिलेले आयुष्यभर सांभाळतात! आणि छापीलचुका दुरुस्त करत राहतात! अस्तु.

दुसरे गोष्ट म्हणजे, अमेरीकेत कसे छान आणि भारतात कसे गलिच्छ हा, विस्ताराने सांगण्याचा सिंड्रोम जडतो. एक तर सगळीच अमेरिका चांगली नाही, आणि सगळाच भारत गलिच्छ नाही! हे लोक दोन देशाची तुलना करताना, भारतावर, खूप हीन पातळीवर येऊन टीका करतात. त्यात हि 'स्वच्छता' हा मुद्दा ठळक असतो. एकटं सरकार पूर्ण देश स्वच्छ नाही ठेवू शकत! प्रत्यक्ष नागरिकाचा सहभाग असावा लागतो, तो परदेशात आहे. लांब कशाला आपलेच भारतीय, अमेरिकेत किती छान वागतात, टिशू पेपर, कॉफी कॅन डस्टबिन मध्ये टाकतात. पण भारतात आले कि, बेगुमान पणे रस्त्यावर भिकावून देतात! अस्तु.

सध्या मी अमेरिकेच्या टेक्सस मध्ये आहे. हा भाग, माझ्या कुवती नुसार पाहतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
काल शाम्याचा फोन आला होता.
"काय सुरश्या, काय करतोयस?"
"मी,न? सकाळी उठून फेसबुकवर सगळ्यांना 'गुड नाईट' अन रात्री 'गुड मॉर्निंग' करतो!"
"ते नाही रे! तेव्हड, अमेरिकेचं गुणगान ----"
"नाही करणार! "
"बेकूफ! पूर्ण ऐक! गुणगान नको करुस, पण तुला काय वाटतंय ते खरड! आल्यावर आपण ठरवू , फेसबुकवर थापायच का, नाही ते!"
शाम्याचा शब्द टाळायचा नसतो, हे अनुभवाने मला कळले आहे.

तर मित्रानो, मी खरडून ठेवलंय! तुम्हाला माझ्यासोबत अमेरिका घुमवून आणतो. येताय ना? माझ्या 'अमेरिकन गाठोड्यात!' काय काय बांधून आणलंय ते तर पहा. (म्हणजे वाचा.) उद्या पासून! ओके?

सु र कुलकर्णी. तुमच्या प्रतिक्रियांची वाट पहातोय. पुन्हा भेटूच. Bye.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लयी भारी

उच्च आयटी जमात स्टार्टर कीट : डोक्यावर टक्कल, ढगळ टी शर्ट, थ्री फोर्थ( बेज कलर), शुझ, गळ्यात डिएसलार, एकदम हळुवार बोलणे. एखादी एसयुव्ही, पुण्यात दोन पाच फ्लॅट, एखादे फार्महाऊस तळेगाव ला,रेग्युललर लंटन अमेरिका वारीझ

-(यात मी पाहिलेली -मला दिसलेली! दोन्ही आले. मला 'समजलेली' मात्र नसते!)
------>
जबरदस्त.

सगळं तुला अमेरिका चावल्याने तू पिसाळयाची लक्षणे सांगताहेत! >>>>>>>> Rofl
मस्तच सुरुवात... आम्हाला ही आवडेल तुमच्या लिखाणातून अमेरिका फिरायला !!
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत !