मला ' दिसलेले' पुलं : थोडे वेगळे पैलू

Submitted by वावे on 28 February, 2019 - 23:31

मराठी भाषा दिवसानिमित्त पुलंबद्दल लिहायचं ठरवल्यावर किती लिहू आणि किती नको असं वाटायला लागलं. कितीही लिहिलं तरी ते कमीच पडेल. यातून मार्ग काढण्यासाठी विनोदी लेखनाच्या पलीकडे असलेले पुलं मला ज्यातून दिसले, त्या पुस्तकांबद्दल आणि कॅसेटबद्दल लिहायचं ठरवलं. अलूरकर म्युझिक हाऊसची ’ एक आनंदयात्रा कवितेची’ ही, पुलं-सुनीताबाईंनी केलेल्या बा. भ. बोरकरांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाची कॅसेट, ’ एक शून्य मी’ हा पुलंच्या गंभीर लेखनाचा संग्रह आणि ’ जीवन त्यांना कळले हो’ अशा सार्थ नावाचे, परचुरे प्रकाशनाचे, पुलंवरच्या विविध मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन असे तीन संदर्भ या लेखात मुख्यत: वापरले आहेत.

पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अनेक पैलूंमधला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संगीतावरचं त्यांचं प्रेम. गायक, वादक, रसिक श्रोते अशा सर्व नात्यांमधून त्यांनी संगीतकलेची आराधना केली. यापैकी रसिक श्रोतेपणाचा प्रत्यय त्यांनी लिहिलेल्या अनेक गायक-गायिकांच्या व्यक्तिचित्रणांमधून येतो. त्यांचं हार्मोनियमवादन हाही भल्याभल्यांच्या कौतुकाचा विषय होता. पुलं कॉलेजला असताना कवी राजा बढे यांच्या कवितांना चाली लावून कार्यक्रमांमधून गात असत. पण हे सगळं फक्त कुठे कुठे वाचल्यामुळेच मला माहिती होतं. मला पुलंच्या आवाजाची ओळख ’ चितळे मास्तर’ , ’ हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका’ अशा त्यांच्या गद्य कॅसेट्समधूनच झालेली होती. पुलंचं गाणं ऐकण्याची संधी कधी मिळण्याचं कारण नव्हतं. कथाकथनांमधून दोन-तीन ओळी तुकड्या-तुकड्यांमधून कधी ऐकल्या असतील, तेवढ्याच. पण ’ पाळीव प्राणी’ मधल्या अगदी ’ कावळा म्हणे मी काळा, पांढरा शुभ्र तो बगळा’ सारख्या एखाद्या ओळीतही त्यांच्या गळ्याचा गोडवा जाणवून जायचा. हा गोडवा भरभरून अनुभवता येतो, तो ’ एक आनंदयात्रा कवितेची’ या कार्यक्रमात! पुण्यात कॉलेजला असताना एकदा सहज ’ अलूरकर’ मध्ये चक्कर टाकताना या कार्यक्रमाची कॅसेट हाती लागली. असंख्य वेळा ती ऐकली, अजूनही त्या कविता ऐकण्याचा कंटाळा आलेला नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितांचं पुलं आणि सुनीताबाईंनी केलेलं हे वाचन/गायन ऐकणं म्हणजे एक सदाबहार आनंदाचा ठेवाच आहे.

मुळात बोरकरांशी पुलंचा खूप जुना परिचय. पुलं शाळेत शिकत असताना एक उगवता कवी म्हणून बोरकर पुलंच्या आजोबांना भेटायला आलेले असताना त्यांची बोरकरांशी प्रथम भेट झालेली होती. पुढेही अगदी बोरकरांच्या मृत्यूपर्यंत पुलं-सुनीताबाईंचे त्यांच्याशी अगदी जवळचे, घरोब्याचे संबंध होते. कविता हा सुनीताबाईंच्या खूप जिव्हाळ्याचा विषय. उभयतांचं वाचनही अक्षरश: अफाट. अनेक संदर्भ मनात जागे. त्यामुळे हा कवितावाचनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच जातो. पुलंचं काव्यगायन इतकं गोड आहे, की ही रंगलेली मैफ़िल संपूच नये असं आपल्याला ही कॅसेट ऐकताना वाटत राहतं. ’ चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे’ , ’ घन लवला रे घन लवला रे’ अशा कवितांमध्ये आपलं मन गुंगुन जातं. ’तव नयनांचे दल हलले गं’ या ओळीतले दल म्हणजे पाकळी की शस्त्रसज्ज सैन्यदल, असे शब्दांच्या अर्थाचे सुनीताबाई आणि पुलंनी केलेले खेळ, कवितेत मधेमधे सहजपणे आलेले पिसोळे, तार, भिरी असे लडिवाळ कोकणी शब्द दाखवणं, निळ्या रंगाबद्दलची कविता आल्यावर ज्ञानेश्वरांपासून ते थेट कवी ग्रेस यांच्या काव्यांमधल्या निळ्या रंगावरच्या ओळी सांगणं, बोरकरांच्या हृद्य आठवणी सांगणं, अशा वाटेने ही मैफिल कमालीची रंगतदार होत जाते. ’माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता सुनीताबाई वाचत असताना ’ माझ्या गोव्याच्या भूमीत, सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची, साऱ्या षड्रसांची नांदी’ ही ओळ आल्यावर बोरकरांचं माशांवर काय विलक्षण प्रेम होतं, असं सुनीताबाईंनी म्हणायचा अवकाश, माशांवर तितकंच प्रेम करणारे पुलं उत्स्फूर्तपणे बोरकरांची दुसरी कविता तालासुरात सुरू करतात.. ’मासळिचा सेवित स्वाद दुणा.. इतुक्या लौकर येइ न मरणा..’ आणि या उत्स्फूर्ततेला प्रचंड दाद मिळते. हा कार्यक्रम जेव्हा ध्वनिमुद्रित झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एस एम जोशी हजर होते. ’जीवन त्यांना कळले हो’ ही कविता वाचायला सुनीताबाई सुरुवात करत असतानाच त्यांना थोडं थांबवून पुलं म्हणतात की ही कविता जणू काही ज्यांना उद्देशून लिहिली आहे असं वाटावं असे एसेम जोशी आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. एसेम जोशींच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मग या कवितेच्या वाचनाला एक निराळीच उंची प्राप्त होते. या कवितेचा अर्थ इतका आतपर्यंत समजून-उमजून वाचण्यासाठी पुलं-सुनीताबाईंसारख्या ’ जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करीं’ अशा वृत्तीच्या व्यक्तीच हव्यात. त्या दोघांमधला कवितांच्या निमित्ताने घडणारा हा संवाद या कार्यक्रमाला अधिकच जिवंत करतो. या सगळ्या कवितांना लावलेल्या चाली पुलंनीच लावलेल्या आहेत का ते मला माहिती नाही, पण या चाली आणि गाण्याची पुलंची पद्धत, दोन्ही गोष्टी त्या कवितांना अगदी पूरक आहेत. ’जपानी रमलाची रात्र' सारख्या शृंगारिक कवितेपासून ते ’ सुखा नाही चव’ अशा उदास कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता अतिशय ताकदीने आणि कवितेच्या अर्थाशी समरस होऊन पुलं आणि सुनीताबाई सादर करतात.’ त्यां दिसां वडाकडे’ यासारख्या काही कोकणी कविताही या कार्यक्रमात ऐकायला मिळतात आणि ’ डाळिंबीची डहाळीशी’ या बोरकरांच्या कवितेची त्यांनीच लिहिलेली कोकणी आवृत्तीही ऐकायला मिळते. कोकणी भाषेचा गोडवा अगदी खास कोकणी उच्चारांमधे पुलं आपल्यापर्यंत पोचवतात. पुलंचं आजोळ कारवारी असल्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कानांवर कारवारी कोकणी भाषा पडलेली होती. त्यामुळे त्यांचे कोकणी उच्चार अगदी ' ओरिजिनल ' होते. या कोकणी कवितांमुळे या कार्यक्रमाला एक वेगळा आयाम मिळतो. मी या कार्यक्रमाबद्दल कितीही लिहिलं, तरी ती मुळातूनच अनुभवण्याचीच गोष्ट आहे. (यूट्यूबवर मला तरी यातली एकही कविता सापडली नाही त्यामुळे मी इथे लिंक देऊ शकत नाही. त्याबद्दल दिलगीर आहे).

पुलं स्वत: कोकणी उत्तमप्रकारे जाणत होते इतकंच नाही, तर कोकणीबद्दल त्यांना खूप आपुलकीही होती. मंगळुरी, मालवणी वगैरे कोकणीचे उपप्रकारही त्यांना चांगलेच माहिती होते. परंतु कोकणी ही मराठीची बोलीभाषाच आहे, स्वतंत्र, अभिजात भाषा नाही, असं मात्र त्यांचं ठाम मत होतं. मुळात माणसांमध्ये नसलेला कोकणी-मराठी वाद उभा करण्यामागे कसलं राजकारण आहे, याचंही त्यांना चांगलंच भान होतं. ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या एका लेखात पुलंनी सडेतोडपणे आपलं हे मत मांडलेलं आहे. एकंदरीतच या पुस्तकातल्या सगळ्याच लेखांमध्ये पुलंचं एक निराळ्याच प्रकारचं लेखन वाचायला मिळतं. ’व्यक्ती आणि वल्ली’ सारख्या पुस्तकांमधली व्यक्तिचित्रणं किंवा ’असा मी असामी’सारखं पुस्तक लिहिताना पुलं स्वत:कडे त्या त्या विषयाला साजेशी एक विशिष्ट भूमिका घेऊन लिहितात, मग ते कधी मुंबईत खर्डेघाशी करणारे, मर्यादित विश्व असलेले बेनसन जानसन कंपनीच्या कचेरीतले कारकून असतात, कधी रत्नागिरीतल्या चितळे मास्तरांच्या पहाटे भरणार्या स्पेशल क्लासमधले स्कॉलर विद्यार्थी असतात, तर कधी रत्नागिरी ते मुंबई एसटीतून प्रवास करणारे प्रवासी असतात. त्या त्या लेखनात व्यक्त झालेली निवेदकाची मतं ही त्या त्या भूमिकेला साजेशी असतात. पण अर्थातच ललितलेखन करताना घेतलेलं हे स्वातंत्र्य असतं. प्रत्यक्षातल्या पुलंची विविध सामाजिक विषयांवरची जाणकार आणि परखड मतं ही ’ एक शून्य मी’ या पुस्तकातल्या लेखांमध्ये वाचायला मिळतात. हे सगळे लेख विविध नियतकालिकांमधून पूर्वप्रकाशितच आहेत, पण विनोदी लेखक, नाटककार, एकपात्री प्रयोग करणारे अभिनेते वगैरे ओळखींखाली एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार करणारे, कोणत्याही क्षेत्रातल्या दांभिकतेची चीड असणारे, त्याचबरोबर सखोल सामाजिक भान असणारे साहित्यिक ही त्यांची ओळख काहीशी झाकोळलीच गेली असं म्हणायला लागेल.

’ धर्म, अंधश्रद्धा नि तुम्ही आम्ही’ या लेखात पुलंनी भारतीयांच्या झापडबंद वृत्तीबद्दल तीव्र मतं व्यक्त केली आहेत. पुलं म्हणतात की ही झापडबंद प्रवृत्ती, उच्च-नीचतेची मानसिकता आपल्याकडे सर्वव्यापी आहे. या बाबतीत कुठलाच धर्म अपवाद नाही. स्वत: पुलं नास्तिक होते, विवेकवादी होते. त्यांच्याच शब्दांत, ’ विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही आणि सत्याचे दर्शन घडवणार्या वैज्ञानिकांचा देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सर्वांत अधिक छळ केला आहे.’ जातीपातीच्या आधारावर केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल पुलं विषादाने लिहितात. ते म्हणतात की ’ जात नावाचा व्हायरस’ आपल्या स्वभावात घट्ट रोवून बसलेला आहे. ते अशी खंत व्यक्त करतात की बाबासाहेब आंबेडकरांकडे एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा, व्यासंगी, कृतिशील आणि द्रष्टा नेता म्हणून न बघता केवळ दलितांचा नेता म्हणून बघितलं गेलं आणि त्यामुळे त्यांची पुरेशी ओळखच कुणाला झाली नाही. हे वाचून मला कुसुमाग्रजांच्या ’ पुतळे’ या कवितेची आठवण होते. त्या कवितेतही कुसुमाग्रज हाच सल व्यक्त करतात, की शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना शेवटी आपण केवळ एका-एका जातीपुरतं मर्यादित करून टाकलं. त्या कवितेत शेवटी गांधीजी म्हणतात की तुम्हा सर्वांच्या पाठीशी निदान एकेक जात तरी आहे, माझ्या पाठीशी सगळे असूनही कुणीच नाही ( माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेऱ्यांमधल्या भिंती). हीच वेदना ’गांधीयुग व गांधीयुगांत’ या, गांधीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिलेल्या लेखात पुलं व्यक्त करतात. गांधीजींबद्दल अतीव आदर असलेले पुलं, गांधीजींचं फक्त नाव घेऊन एरवी भ्रष्टाचार करायला मोकळे असलेले पुढारी बघून तीव्र संतापलेले आणि काहीसा अपेक्षाभंग झालेले इथे दिसतात. तसाच अपेक्षाभंग आणि संताप त्यांच्या ’ सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ या लेखात, आणीबाणीनंतर जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून आणलेल्या जनता पक्षाच्या सरकारबद्दलही दिसतो. पुलंनी स्वत: आणीबाणीला जोरदार सक्रिय विरोध केला होता आणि निवडणुका जाहीर झाल्यावर जनता पक्षाच्या प्रचारसभांमधून प्रभावी भाषणेही केली होती. नंतर सत्तेवर आलेल्या सरकारकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्यांच्यावर परखडपणे टीकाही करण्याइतका विचारांचा मोकळेपणा त्यांच्याकडे होता. कारण त्यांनी स्वत:ला त्या पक्षाशी बांधून घेतलेलं नव्हतं. निवडणुकांचे निकाल लागल्यावर ते आणि सुनीताबाई स्वत:हून त्यातून अलगद बाजूला झालेले होते. त्यामुळे पटतील त्या मुद्द्यांना पाठिंबा आणि न पटणार्या गोष्टींना विरोध ही आपली भूमिका ते ठामपणे निभावू शकले. या पुस्तकात विनोबांवरही एक लेख आहे. या आणि ‘गुण गाईन आवडी' या पुस्तकातल्या विनोबांवरच्या लेखांमध्ये त्यांच्याबद्दलचा निखळ अपरिमित आदर दिसतो. (भूदान चळवळ समजून घेण्यासाठी स्वत: पुलं विनोबांबरोबर त्यांच्या भूदानाच्या पदयात्रेत दोन वेळा आठ-दहा दिवस चाललेले होते.) विनोबा, बाबा आमटे, साने गुरुजी ही पुलंची श्रद्धास्थाने होती. आनंदवनात पुलं घरच्यासारखेच होते. ’ दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ हे त्यांचे सूत्र होते.

नवे मराठी शब्द तयार करण्याच्या सरकारी धोरणातल्या काही चुकीच्या बाबींवर ’ क्व च भवान क्व पुल: क्व च सूकर:’ या उपरोधिक लेखात पुलंनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत, तेही मधूनमधून मिश्कील चिमटे काढत! ’ अत्रे : ते हशे आणि त्या टाळ्या’ हा आचार्य अत्र्यांवरचा लेख म्हणजे एका सिद्धहस्त विनोदी लेखकाने, दुसऱ्या एका सिद्धहस्त विनोदी लेखकाच्या लेखनाचा, एका जाणकार चाहत्याच्या भूमिकेतून घेतलेला आढावा आहे. पुलंच्या व्यक्तिमत्त्वातल्या अशा अनेक पैलूंचं दर्शन या विविध लेखांमधून आपल्याला होतं. तसं ते थोडंफार इतर पुस्तकांमधूनही झालेलं असतंच म्हणा! ’ एक लाख खाल्ले की पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी!’ म्हणणारे ’ अंतू बर्वा’ मधले अण्णा साने, ’ शिंचे मुहूर्त बघतात, हातात कुठल्या कुठल्या बाबांच्या अंगठ्या घालतात, गळ्यात लाकिटं घालतात, धिस इज रिअली पझलिंग' म्हणणारे चितळे मास्तर, ’ आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तर तो पुढारी राहणार का? वुई आर ए पार्ट ॲंड पार्सल ऑफ हिज पुढारीपणा’ म्हणणारा परोपकारी गंपू, ’ हे जग कसलं आहे ठाऊक आहे तुम्हाला? मुखवट्यांचं’ असं म्हणणारा ’ तो’, ह्या सर्व व्यक्तींच्या तोंडून त्या त्या वेळी जणू पुलंच बोलत असतात.

‘गुण गाईन आवडी' , ‘गणगोत’, ‘मैत्र' यांसारख्या पुस्तकांमधून पुलंच्या गुणग्राहक आणि जगात कुठेही काही उत्तम, उदात्त, उन्नत, दिसलं की उत्कटतेने दाद देण्याच्या प्रवृत्तीचं दर्शन घडतं. पुलंचं गणगोत खरंच खूप मोठं होतं. शाळा-कॉलेजमधली नोकरी, चित्रपटव्यवसाय, रेडिओ आणि दूरदर्शनमधली कारकीर्द, नाट्यव्यवसाय, पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यांना केलेली मदत या सर्व टप्प्यांवर पुलंनी अगणित मित्र, चाहते आणि हितचिंतक जोडले. संगीत ही तर त्यांच्यासाठी अगदी जिव्हाळ्याची कला! त्यामुळे अनेक दिग्गज गायक, वादक, रसिक त्यांच्या खास बैठकीतले! वयाच्या पन्नाशीनंतर पुलं बंगाली भाषा शिकण्यासाठी थेट शांतिनिकेतनात जाऊन राहिले आणि जणू तिथलेच झाले. तिथल्या संगीतकार, शिल्पकार, कवी, गायक, लोकगायक, विद्यार्थी या सगळ्यांच्यात मिसळून गेले. पुलंचं वैशिष्ट्य असं, की एखाद्या नवीन लेखकाची किंवा कवीची साहित्यकृती आवडली, की ते स्वत:च्या प्रसिद्धीचा, मोठेपणाचा जराही गर्व न बाळगता त्या नवोदित साहित्यिकाला भरपूर प्रोत्साहन देत. शिवाय त्या नवोदिताचे आपल्या स्नेह्यांमध्ये भरपूर कौतुकही करीत. पुलंसारख्या मोठ्या, सुप्रसिद्ध साहित्यिकाच्या प्रोत्साहनाने त्यांना किती बळ येत असेल याची आपण कल्पना करू शकतो. साहित्यच नाही, तर अभिनय, नाट्यदिग्दर्शन, गायन, जिथे म्हणून त्यांना प्रतिभेची ठिणगी दिसत असे, तिथे तिथे त्या ठिणगीवर हळुवार फुंकर घालून ती फुलवण्याचं काम पुलं एका उपजत प्रेरणेने करत असत. ’ जीवन त्यांना कळले हो’ या पुस्तकातले नारायण सुर्वे, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता यांच्यासारख्यांचे लेख वाचून पुलंनी केलेलं हे काम किती महत्त्वाचं होतं याची आपल्याला जाणीव होते.

’ जीवन त्यांना कळले हो’ हे परचुरे प्रकाशनाचं पुस्तक म्हणजे विविध कारणांनी आणि विविध कालखंडांमध्ये पुलंच्या सान्निध्यात आलेल्या व्यक्तींनी पुलंबद्दल लिहिलेल्या लेखनाचं संकलन आहे. जवळजवळ सगळेच लेख पूर्वप्रकाशितच आहेत. मी पुस्तक विकत घेताना जरा साशंक मनानेच घेतलं होतं. कारण अशा प्रकारच्या लिखाणामध्ये एक प्रकारचा तोचतोचपणा आलेला असण्याचा धोका असतो. पण या पुस्तकात मात्र तसं अजिबात झालेलं नाही. याचं कारण म्हणजे पुलंच्या व्यक्तिमत्त्वातली समृद्धी! विजया राजाध्यक्ष, शांता शेळके, माणिक वर्मा, वसंतराव देशपांडे, ग. प्र. प्रधान, नारायण सुर्वे, गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, दाजी भाटवडेकर, निळू फुले, मधु मंगेश कर्णिक, विजया मेहता, करुणा देव, भक्ती बर्वे-इनामदार, अरुणा ढेरे, जयवंत दळवी अशी आपापल्या क्षेत्रात रथी-महारथी असलेली माणसं पु. ल. देशपांडे या एका व्यक्तीविषयी भरभरून लिहिताना या पुस्तकात आपल्याला दिसतात. प्रत्येकाचा पुलंकडे पाहण्याचा भाव वेगवेगळा आहे, त्यात अगदी भक्तिभावापासून ते आदरयुक्त मैत्री, निखळ मैत्री, जिव्हाळा, कौतुक, प्रेम अशा सगळ्या प्रकारच्या भावना आहेत. या सगळ्यातून समोर येतं ते पुलंचं ’माणूस’ म्हणून असलेलं झळाळतं रूप! पुलंची स्वत:ची अशी राजकीय मतं होतीच, पण त्याविरुद्ध मतं असलेल्यांशीही ते सहृदयतेनेच वागले. राजकीयच असं नाही, तर कुठल्याही क्षेत्रातली मतभिन्नता त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यातल्या संबंधांच्या, मैत्रीच्या आड कधीच येऊ दिली नाही. आणि म्हणूनच त्यांचा विनोद हा कायम निर्मळ आणि निर्विषच राहिला. बॅ. नाथ पै यांच्या १९५२ सालच्या निवडणुकीतल्या बेळगावच्या प्रचारसभांमध्ये स्वत: पुलंनी भाषणं केली होती. पण त्याच निवडणुकीत, दुसर्या एका सभेत स्वत: नाथ पैंनी भाषण करत असताना, भाषणाच्या भरात ’ आज या जगात माणूस कुठे आहे?’ असा सवाल केल्यावर गर्दीत मित्रांसह मागे बसलेले पुलं हळूच ’ ते सगळे भुजंगरावांच्या सभेला गेले आहेत. इथे आपलीच मंडळी आहेत. तुम्ही बोला’ असा टारगटपणा करू शकत होते. कारण असा विनोद करण्यामागची त्यांची प्रेरणा ही कुणाचा अपमान करण्याची नसून एकंदर आयुष्यात आनंद शोधण्याची होती. तो आनंद मोकळेपणाने इतरांना वाटतच ते जगले.

या पुस्तकातले सगळेच लेख सरस आहेत. पण त्यातही २ लेखांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. पहिला आहे कृ. द. दीक्षित यांचा ’ पुलं : मेहनती व कल्पक ’ प्रोड्युसर’ हा लेख. दीक्षित स्वत: आकाशवाणीत कार्यरत होते. त्यामुळे त्यांना आकाशवाणीतल्या पुलंना जवळून पहायला मिळालं होतं. आकाशवाणी या माध्यमाची बलस्थानं, व्याप्ती आणि सीमा जाणणारे, स्वत: प्रतिभावंत साहित्यिक असलेले पु. ल. देशपांडे हे मुंबई आणि दिल्ली आकाशवाणीवरचे एक गाजलेले निर्माते होते. त्यांच्या मुंबईच्या कारकीर्दीत मंगेश पाडगांवकर, पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरी आमोणकर अशा दिग्गजांचा सहभाग असलेली, स्वत: पुलंचं संगीतदिग्दर्शन असलेली ’ बिल्हण’ ही एक संस्मरणीय संगीतिका निर्माण केली गेली. (’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ आणि ’ माझे जीवनगाणे’ ही प्रसिद्ध गाणी याच संगीतिकेतली.). पुढे ते चीफ प्रोड्यूसर म्हणून दिल्लीला गेले. तिथेही त्यांनी नाव कमावलं. झोकून देऊन, निर्दोष कार्यक्रम तयार करण्यासाठी अविरत झटणं हे पुलंचं वैशिष्ट्य! त्यामुळे एकाहून एक सरस कार्यक्रम त्यांनी दिले. (’ गेले तेथे मिळले हो’ या स्वत:च्या स्वभावाला अनुसरून दिल्लीच्या सांस्कृतिक वर्तुळातही ते लोकप्रिय झाले. इतके, की नंतर एकदा पुण्याच्या सावरकर प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पुलं अध्यक्षस्थानी होते आणि अटलबिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करत होते, तेव्हा वाजपेयीजींनी अशी खंत व्यक्त केली की पुलं दिल्ली सोडून इकडे आले त्यामुळे दिल्लीचं सांस्कृतिक वर्तुळ थोडं रिकामं रिकामं वाटू लागलंय.) जेव्हा भारतात टेलिव्हिजनचं आगमन होणार होतं, तेव्हा त्याचं तंत्र शिकून घेण्यासाठी पुलंना बीबीसीमध्ये पाठवलं गेलं (आणि त्यामुळे आपल्याला ’ अपूर्वाई’ हे श्रेष्ठ प्रवासवर्णन वाचायला मिळालं). ही त्यांच्या आकाशवाणीवरच्या उत्कॄष्ट कामाची एक पावतीच होती. दूरदर्शनवरचे पहिले निर्माते म्हणजे पु. ल. देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ही एक वेगळीच बाजू कृ.द. दीक्षितांच्या या लेखामुळे समोर येते.

दुसरा लेख म्हणजे सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा! पुलंच्या पंच्याहत्तरीनिमित्त लिहिलेला हा लेख हा आत्मीयतेने, काहीसा भावुकतेने ओतप्रोत भरलेला आहे. पुलंच्या साठीनिमित्त त्यांनी पुलंचं निवडक साहित्य असलेला ’ पुलं : एक साठवण’ हा ग्रंथ संपादित केला होता. असा ग्रंथ तयार करणं ही पूर्णपणे जयवंत दळवींचीच कल्पना होती. कोणतं साहित्य घ्यावं, हे मात्र त्यांनी साठ-सत्तर लेखक-कवी मित्रांना पत्रं पाठवून विचारलं होतं. हे पुस्तक खपणार नाही, अशी मॅजेस्टिक प्रकाशनाच्या केशवराव कोठावळ्यांची खात्री होती. ते फक्त हजार प्रतींची आवृत्ती काढणार होते. जयवंत दळवींच्या आग्रहाखातर त्यांनी पाच हजार प्रतींची आवृत्ती काढली आणि ही सगळीच्या सगळी आवृत्ती, छापून बाहेर येण्यापूर्वी, प्रकाशनपूर्व नोंदणी जाहीर झाल्यापासून चार दिवसांत संपली!! अगदी खुद्द जयवंत दळवींना त्यांच्या मित्रांसाठी चार-पाच प्रती हव्या होत्या, त्या मिळू शकल्या नाहीत. अशी अफाट लोकप्रियता वाट्यास आलेला लेखक विरळा! पुलंहून वयाने ज्येष्ठ आणि स्वत: अतिशय लोकप्रिय साहित्यिक असलेले जयवंत दळवी म्हणतात की ’ अशा सभ्य, सुसंस्कृत आणि तेवढ्याच दानशूर साहित्यिकाच्या साठीला ’ पु.लं. : एक साठवण’ यासारखा ग्रंथ मला संपादित करता आला, हे मी माझं भाग्य समजतो’. जयवंत दळवींचं हे वाक्य, किंवा ’ नाशिकला आम्ही तीर्थक्षेत्र म्हणतो, कारण तिथे कुसुमाग्रज राहतात’ हे पुलंचं वाक्य, असं काही वाचलं की वाटतं, हे संस्कृतीचं खरं सौंदर्य!

पुलं आणि सुनीताबाईंनी पुलं फाऊंडेशनच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या देणग्या विविध सामाजिक कार्यांसाठी दिल्या. बहुतांशी वेळा त्या चालू असलेल्या कार्यासाठी त्यांनी दिल्या. पण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या बाबतीत मात्र थोडा वेगळा घटनाक्रम झाला. डॉ. अनिल अवचटांचा व्यसनग्रस्तांवरचा एक लेख वाचून पुलं-सुनीताबाईंनी अनिल आणि सुनंदा अवचटांना घरी बोलावून सांगितलं की या व्यसनग्रस्तांसाठी तुम्ही काहीतरी करा. आत्ता आम्ही एक लाख रुपये द्यायचे ठरवलेत. पण आम्ही पैसे कमी पडू देणार नाही. यातून अवचट पती-पत्नींना व्यसनमुक्ती केंद्राची कल्पना सुचली. केंद्र उभं राहिलं, अधिकृत संस्था उभी राहीपर्यंत मुक्तांगणच्या कर्मचार्यांच्या पगाराचे चेक्स पुलं आणि सुनीताबाईंच्या सहीने निघत होते. ही देणगी देताना पुलं म्हणाले होते, की एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला तरी माझ्या देणगीचं सार्थक झालं असं मी समजेन. ’ मुक्तांगणची गोष्ट’ हे अनिल अवचटांचं पुस्तक वाचलं की जाणवतं, हे काम उभं राहणं किती महत्त्वाचं होतं ते. मुक्तांगणमुळे कितीतरी घरांमधले विझलेले दिवे पुन्हा प्रज्वलित झाले. आयुकातली विज्ञान वाटिका, आनंदवनातलं मुक्तांगण, इतर अनेक सामाजिक संस्था, चळवळी, अपंग-मूक-बधिरांसाठीच्या संस्था अशा विविध कार्यांना पुलं-सुनीताबाईंनी भरभरून देणग्या दिल्या. आपल्या पुस्तकांचे हक्क प्रकाशकांना विकून तो पैसाही त्यांनी सामाजिक संस्थांना दान केला. त्यांचं हे सामाजिक भान सतत जागं होतं.

या दिवाळीत पाडव्याच्या दिवशी पुण्याला बालगंधर्व रंगमंदिरात पुलोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला हजर राहण्याची संधी मिळाली. साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णिक यांची भाषणं ऐकता आली. मधु मंगेश कर्णिक यांनी भाषणात पुलंच्या या जागृत सामाजिक भानावर भर दिला. ते म्हणाले, की पुलंच्या लेखनातला विनोद हा हास्यनिर्मितीसाठी तर होताच, परंतु त्या विनोदामागे एक सामाजिक भाष्य असे. पुलंनी लेखनातून उभी केलेली माणसे ही त्यांच्या सगळ्या सामाजिक संदर्भांसकट उभी केलेली होती. लेखन प्रचारकी थाटाचे होऊ न देता सामाजिक वास्तव मांडणे पुलंनी साध्य केलेले होते. आर. के. लक्ष्मणांसारखा कुशल व्यंगचित्रकार ज्याप्रमाणे काही रेषांमधून मार्मिक भाष्य करून जातो, त्याचप्रमाणे पुलंसारखा कुशल लेखक शब्दबंबाळ न होता एखाददुसर्याच वाक्यातून नेमके, मर्मग्राही सामाजिक भाष्य करतो. मग तो ’ द्राक्ष संस्कॄती आणि रुद्राक्ष संस्कॄती’ यासारखा शाब्दिक विनोद असेल, किंवा मौन या विषयावर एक तास बोलणारी आचार्य बाबा बर्व्यांसारखी व्यक्तिरेखा असेल. हा नुसता विनोद नसतो, त्या विनोदामागे बरेच संदर्भ असतात आणि म्हणून तो विनोदही गांभीर्याने घेण्यासारखा असतो.

मधु मंगेश कर्णिकांनी पुलं-सुनीताबाईंची एक सुंदर आठवणही सांगितली. मधु मंगेशांच्या गावी करूळला ’ वनराई’ उभारण्यासाठी पुलं-सुनीताबाईंनी पहिली देणगी पाठवली. देणगीदारांच्या नावे एकेक झाड लावण्याची मधु मंगेश कर्णिकांची कल्पना होती. त्यांनी विचारलं, की तुमच्या दोघांच्या नावाने कुठली झाडं लावू? त्यावर पुलं म्हणाले, तुम्ही आंब्याफणसाची झाडं तर लावालच, पण आमच्यासाठी एक बकुळीचं झाड लावा आणि एक सुरंगीचं झाड लावा.

बकुळ आणि सुरंगी...कोमेजल्यावरही दीर्घकाळ सुगंध देणारी, फुलं वेचलेल्या हातांना, फुलं माळलेल्या केसांनाही मंद सुगंध बहाल करणारी अशी ही फुलं. आजूबाजूचा परिसर आपल्या मोहक सुगंधाने भरून टाकणारे हे पुष्पवृक्ष! काही आश्चर्य नाही वाटलं पुलं-सुनीताबाईंची ही आवड ऐकून!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब्बार पटेलांनी एक 'पुलं वृत्तांत' नावाचा व्हिडीयो बनवला होता त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने. तो एकदाच दूरदर्शनवर लागला होता, पुढे कुठे पाहायला मिळाला नाही. नाही म्हणायला, त्यातला एक छोटा भाग नक्षत्रांचे देणे कार्यक्रमात होता.

हा लेख वाचल्यानंतर 'एक आनंदयात्रा कवितेची' या कार्यक्रमाच्या सीडी/ कॅसेटबद्दल अनेकांनी मला विचारणा केली होती. यूट्यूबवर शिशिर साठे यांच्या चॅनलवर या कार्यक्रमाचे दोन मोठे भाग अपलोड झालेले दिसले.
रसिकांनी लाभ घ्यावा! Happy
भाग १
https://youtu.be/Q--abGuZ58Y
भाग२
https://youtu.be/LSvN6l7_svQ

मस्त लेख आहे वावे.

श्रोतेहो! हा पण पुलंच्या वेग वेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणांचा संग्रह आहे. थोडा एक शून्य मी च्या वाटेने जाणारा.

शंतनू, छानच! Happy
श्रद्धा, झम्पू दामले, धन्यवाद!

वाह वावे , हा लेख वाचायचा राहिला , छान लिहिले आहे तुम्ही. अवांतर - माझ्या मामाने स्वतः "वाऱ्यावरची वरात" त्यांच्या ऑफिस मध्ये आयोजित केले होते काय लकी ना डायरेक्ट पुलं बघायला ऐकायला मिळाले Happy

टवणे सरान्ची स्वारी इकडे फिरकलेली दिसत नाही. त्यान्च्या अन्गाचा तिळ पापड झाला असता हे सर्व वाचून Wink

आदित्य सिंग, योगेश, धन्यवाद! Happy
वाऱ्यावरची वरात माझ्याकडे सीडी स्वरूपात आहे मूळ पुलंची. भन्नाट आहे. चित्र मात्र अस्पष्ट आहे. पण ते सहन करूनही भन्नाट आहे.

वावे , हो माझ्याकडे पण आहे. पारायणं झाली आहेत Happy पुलंना तोड नाहीये. एकटे असून ५-६ जण उभे करतात. साक्षीचा धंदा

माझाच लेख वरती काढत आहे. पण इथे बऱ्याच जणांनी विचारणा केलेला बोरकरांच्या कवितावाचनाचा संपूर्ण कार्यक्रम 'एक आनंदयात्रा कवितेची' आता अलूरकर म्युझिक हाऊसच्याच यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
जरूर ऐका आणि आनंद घ्या Happy
ही लिंक दिल्याबद्दल शंतनू यांचे आभार!

भाग १ https://youtu.be/W4d_G1rwM0Y
भाग २ https://youtu.be/lyVY027FpKk

काय सुंदर लेख आहे! बरेच दिवस बॅकलॉग मधे होता जरा निवांत वाचू म्हणून! यातील काही गोष्टींबद्दल माहिती नाही. आता शोधायला हवी.

मी ते कवितावाचन वगैरे फारसे ऐकलेले नाही. यात त्या लिन्क्स आहेत त्यावरून पाहतो आता. आमच्या घरी पुलंच्या कथाकथनाच्या कॅसेट्स होत्याच पण हार्मोनियमचीही एक होती. मला समजत नसे पण वडलांना आवडायची ऐकायला.

एखाद्या ओळीतही त्यांच्या गळ्याचा गोडवा जाणवून जायचा. >>> हे एकदम बरोब्बर. तो गाता गळा अगदी असा मी असामी मधल्या "राजहंसाचे चालणे..." वगैरे म्हणताना किंवा बिगरी ते मॅट्रिक मधे "रथचक्र उद्धरू दे..." म्हणताना लगेच जाणवतो.

बाकी त्या मी वाचलेले पुस्तक बाफ वर नुकतीच लिहीलेली एक प्रतिक्रिया इथेही कॉपी करतो.

गेल्या काही वर्षांत एक जाणवते - ते म्हणजे पुलं वाचणार्‍यांपेक्षा ऐकणारे व बघणारे जास्त झालेत. त्यांच्या कथाकथनाच्या सीडीज, आता उपलब्ध असलेल्या क्लिप्स, तसेच त्यांची काही आता व्हायरल होत असलेली विनोदी भाषणे/मुलाखती व फेबु/व्हॉअ‍ॅ वर फिरत असलेल्या किरकोळ शाब्दिक कोट्या - हेच "मटेरियल" जास्त सहज उपलब्ध आहे लोकांकरता. पुस्तके आहेतच पण ती आवर्जून घेउन वाचणार्‍यांपेक्षा मोबाईल मधून हे सहज मिळणारे पुलं हेच ते पुलं अशी समजून बहुतेकांची होत असावी. त्यातून मग "काय भारी कोटी आहे" पासून ते "काय इतक्या फालतू कोट्या! अगदी ओव्हररेटेड लेखक आहे" अशा प्रतिक्रिया बघायला मिळतात.

पण खरे पुलं हे या सर्वापेक्षा बरेच काही आहेत. खरे म्हणजे मला त्यांच्या शाब्दिक कोट्या हा त्यांचा फार भारी विनोद वाटत नाही. "एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणे याला वीट येणे का म्हणतात हे मला तेव्हा कळाले" टाइप कॉमेण्ट्सना पब्लिक इतके का हसते याचे मला आश्चर्य वाटते. म्हणजे बोलण्याच्या ओघात अशा कोट्या करणे हे धमाल आहे (माणिक वर्मांबद्दल काहीतरी विचारल्यावर "नका हो त्यांच्या वर्मावर बोट ठेवू", किंवा लग्नाआधी आणि नंतर एकच आडनाव असलेल्या मुलीने "घराण्याचे नाव राखले" ई). पण पुलंचा खरा विनोद हा त्याच्यापेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचा आहे. त्यांच्या समकालीन सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय घटना जितक्या माहीत असतील, व एकूणच संगीत, नाटके, चित्रपट, क्रिकेट, राजकारण पासून ते संतांचे अभंग, कहाण्या, धार्मिक कथा यांचे संदर्भ जितके जास्त माहीत असतील तितके त्यांचे विनोद जास्त चांगले समजतात असा माझा अनुभव आहे. त्यामुळेच पुन्हा काही वर्षांनंतर तेच पुस्तक वाचले तरी काही वाक्ये नव्याने कळतात.

कोठेतरी सगुणा या मुलीचा उल्लेख करून कंसात "पुढे दुधाची वाटी आणणारी सगुणा ती हीच" हे लिहीणे, किंवा चिमा हे नाव वापरल्यावर पुढे ती एकटीच राहिल्यावर "एकटीच चिमा काय कामाची" लिहीणे, कोणा बाबाच्या संदर्भात त्यांच्याकडे कसलातरी दृष्टिक्षेप "टाकुनिया बाबा गेला" लिहीणे, कोणत्यातरी क्षेत्रातील एक्स्पर्टने यांचा एक प्रश्न विचारल्यावर "हे म्हणजे तल्यारखानने मला ही एलबीडब्ल्यूची भानगड काय आहे विचारण्यासारखे झाले" ही कॉमेण्ट - ते ते संदर्भ, त्या व्यक्ती माहीत असतील तर जास्त अ‍ॅप्रिशिएट होतात.

तसेच कधीकधी सहजपणे लिहीलेली व त्यामुळेच अनेकदा आधी वाचताना निसटलेली वाक्ये नंतर भेटतात - "त्या काळात आम्ही मॅट्रिकला बसत होतो" सारखी. किंवा गजा खोतच्या मुलाच्या संगीत शिक्षकांचे आकस्मिक निधन झाले हे कळाल्यावर त्या आकस्मिक निधनाचे कारण माझ्यासमोर उभे होते वगैरे.

याशिवाय आवर्जून विनोदी म्हणून न लिहीलेले लेख, प्रस्तावना, भाषणे ही सुद्धा वाचण्यासारखी/ऐकण्यासारखी आहेत. त्यातही एखादा चपखल व सहजपणे आलेला विनोद धमाल असतो. लोकांची तारीफ करताना त्यांचा उमदा स्वभाव दिसतो. (तेव्हाच्या) नव्या गोष्टींबद्दल बहुतांश वेळा एकदम उमद्या पद्धतीने त्या बघून, स्वीकारून लोकांना त्यांची ओळख करून देण्याचे काम त्यांनी अनेकदा केले आहे. अशा लेखांमधे, भाषणांमधे हट्टीपणाने विनोद करण्यापेक्षा दिलखुलासपणा, खुशखुशीतपणे वर्णन करण्याची त्यांची शैली जास्त दिसून येते.

पण हे पुलं समजायला पुस्तके आवर्जून वाचायला हवीत (बाय द वे, त्या कथाकथनांपेक्षाही त्या मूळच्या पुस्तकातील लेखांत जास्त मटेरियल आहे), त्यांच्या विविध पुस्तकांतील प्रस्तावना, विविध भाषणे - जी आवर्जून विनोदी म्हणून केलेली नाहीत ती पण शोधायला हवीत. ती रूढ अर्थाने "अप्रकाशित" नाहीत पण इतक्या सहज उपलब्ध नाहीत.

गणगोत, गुण गाईन आवडी मधे हे पुलं दिसतात, व अगदी नंतर प्रकाशित झालेली मित्रहो, श्रोतेहो सारखी पुस्तके यात त्यातील काही लेख आहेत.

पुलंची दोन भाषणे युट्यूबवर उपलब्ध आहेत. एक पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहाच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले.
दुसरे संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या कौतुक सोहळ्याच्या वेळी केलेले. दोन्ही ऐकण्यासारखी आहेत.

धन्यवाद फारएण्ड. तुम्ही हा लेख वाचून प्रतिसाद देण्याची मी वाट पहात होते! Happy कवितावाचन नक्की ऐका.
शां.मा., पुलंचं नरहर कुरुंदकरांवरचं भाषणही उत्कृष्ट आहे. कुमार सरांच्या एक शून्य मी या लेखाच्या खाली मी लिंक दिली होती मागे.

वावे - थँक्स Happy हो त्या लिन्क्स बघायच्या आहेतच. शांमा - तुम्ही दिलेल्या माहितीबद्दलही आभार. तीही ऐकलेली नाहीत अजून.

त्यामुळे पटतील त्या मुद्द्यांना पाठिंबा आणि न पटणार्या गोष्टींना विरोध ही आपली भूमिका ते ठामपणे निभावू शकले >>> हे फार अचूक निरीक्षण आहे. ज्या विनोबांच्या भूदान चळवळीबद्दल एक सुरेख लेख त्यांनी गुण गाईन आवडी मधे लिहीलेला आहे त्याच विनोबांच्या आणीबाणीला दिलेल्या समर्थनाची भरपूर खिल्ली त्यांनी "खिल्ली" मधे उडवली आहे. ते लेख स्वतंत्रपणे वाचताना, विशेषतः सध्याच्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट काळात, काहींना पुलं विनोबांचे भक्त वाटतील तर काहींना ते विरोधक. पण दोन्ही लेख त्या त्या वेळेस चपखल होते. एकाच वेळेस नेहरूंबद्दल आदर पण ७०च्या दशकात काँग्रेसमधे जे शिरले होते त्यावर प्रचंड टीका - यात अनेकांना विरोधाभास दिसेल. पण प्रत्यक्षात तसे नाही. त्याचप्रमाणे त्यांनी सनातनीपणावर, जातिभेदावर टीका केली. पण तितक्याच सहजतेने "सकाळचा चहा गार मिळाला तरी इंदिराजी त्यात संघाचा व जनसंघाचा हात आहे असे म्हणतात" हे ही लिहीले. कारण त्यांचा विरोध, त्यांची मते स्पेसिफिक मुद्द्यांवर, घटनांवर अवलंबून होती. व्यक्तींवर नाही. लोकांना उपाशी ठेवून देवळात दूध वगैरे वापरण्यावर त्यांनी टीका केली आहे, पण तशीच टीका "ग ग गणपतीचा" हे पुस्तकातून काढून टाकण्यावरही केली आहे.

पुलं स्वतः नास्तिक होते, समाजवादाकडे झुकणारे होते याचे अनेकांना आश्चर्य वाटते. मला समजले तेव्हा मलाही वाटले होते. कारण नास्तिकता मिरवणार्‍यांमधे धार्मिक व सांस्कृतिक गोष्टींबद्दल एक कमालीची उदासीनता असते. ती पुलंच्या लेखनात जराही दिसत नाही. उलट या दोन्हीमधे ते आवडीने सामील होत असेच दिसते. किंबहुना जेथे मोठा जनसमुदाय एकत्र येउन काही आनंददायी करतो ते त्यांना आवडत असे. जत्रेला, उत्सवाला जाणारे असतात त्यांना अनेकदा त्या गर्दीच्या दिवशी देवाच्या/देवीच्या चेहर्‍यावर वेगळे तेज दिसते असे वाटत असते. चतु:शृंगीच्या जत्रेत असे कोणीतरी म्हंटलेले व पटलेले आठवते. दगडूशेठचा गणपती गणपतीच्या दिवसांत मध्यरात्री गर्दी, आजूबाजूचे आवाज, ती सजावट वगैरे मधे एरव्हीपेक्षा वेगळा जाणवतो. आता कदाचित ते भवतालच्या उत्सवी वातावरणाचेच प्रतिबिंब असेल, पण पुलं नास्तिक असूनही आषाढीला पंढरपूरच्या विठोबा च्या चेहर्‍यावर ते दिसले. कारण ते अशा गोष्टींमधे पूर्णपणे सामील होत.

गांधींना जे मानतात त्यांना गांधी का थोर होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण पुलंच्या सुरूवातीच्या वाचकवर्गात, विशेषतः ७०-८० च्या दशकातील वाचकवर्गात गांधींना न मानणारे बरेच होते. अजूनही आहेत. हा वाचकवर्ग गांधींबद्दल लिहीलेली पुस्तके आवर्जून वाचण्याची शक्यता नसतेच. पण पुलंसारख्यांनी अशांपुढे गांधींची थोरवी जर मांडली तर ती जास्त सहजपणे पोहोचते. पुलंच्या "एका गांधी टोपीचा प्रवास" ने अनेकांच्या बाबतीत तेच केले असावे. किमान त्यातील पूर्वार्ध. "एक शून्य मी" अजून वाचलेले नाही. वरती लेखांत उल्लेख केलेला "गांधीयुग व गांधीयुगांत" हा लेखही वाचायला हवा.

कर्‍हा नदीची लिंक आहे ती. या नदीत सापडला तर घ्या तो लेख. मला असा लेख अस्तित्वात असल्याचे ठाऊक नाही.

Pages