7 डिसेंबर 2010 रोजी पुणे-निजामुद्दीन वातानुकूलित दुरंतोनं प्रवास केला होता. जेमतेम सव्वा वर्षच होत होतं ती गाडी सुरू होऊन. त्या प्रवासाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या प्रवासातील आठवणींना पुन्हा एकदा दिलेला हा उजाळा.
डिसेंबर २०१०मध्ये अचानक दिल्लीला जावे लागले. पुण्याहून दिल्लीला जाताना जेमतेम महिनाभर आधी आरक्षण मिळविणे हे एक दिव्यच असते. त्यामुळे पटकन आठ दिवसांच्या रजेसाठी अर्ज दिला आणि तो मंजूरही झाला. आता आरक्षण मिळविण्याची कसरत करायची होती. माझे पहिले प्राधान्य व्दितीय श्रेणीला असते. पण नेहमीच्या सुपरफास्ट गाड्या फूल होत्या. म्हणून पुणे निझामुद्दीन वातानुकुलित दुरंतोचा पर्याय निवडला. त्यातही एसी-३ ला वेटींग सुरू झाले होते. पण त्यावेळी या गाडीला इकॉनॉमी श्रेणी होती. म्हणजे गरीब रथचे पाच डबे होते. त्यात २००च्या जवळपास जागा शिल्लक होत्या. म्हणून नाईलाजाने त्या श्रेणीचे तिकीट आरक्षित केले. कारण नेहमीच्या एसी-३ पेक्षा यात १४ बर्थ जास्त असल्याने अडचणच असेल अशी माझी समजूत होती. ती खरी ठरली. मला जी-१मध्ये २२ क्रमांकाचा बर्थ मिळाला. बर्थ क्रमांकाच्या पुढे एसएल लिहिल्यामुळे भलताच खूष झालो होतो. कारण साईड लोअर बर्थ होता तो. पुढे प्रत्यक्ष गाडीत चढेपर्यंत मी सारखा हिशोब करत होतो की, २२ क्रमांक साईड लोअर कसा काय.
अखेर प्रवासाला निघण्याचा दिवस आला. मी पुणे जंक्शनवर पोहचलो, तेव्हा गाडी लागतच होती. तेवढ्यात एक आजोबा येऊन विचारून गेले की, या गाडीत तिकिटाच्या पैशातच जेवण, चहा नक्की मिळणार आहे ना. प्रवासभाडे केवळ १४०५ रुपये असल्याने त्यांना शंका आली होती. गाडी लागल्यावर माझ्या डब्यात साईड लोअर बाजू पाहत गेलो. पण माझा क्रमांक कुठेच नाही. म्हणून परत उलट्या बाजूने बघत आलो. नंतर साईड लोअर नाही, पण दुसऱ्या बाजूचा लोअर बर्थ मिळाला. जागेवर जाऊन बसलो तर बेडशीट, ब्लँकेट आणि उशी ठेवलेली होतीच. वातानुकुलित डब्यातून, इतक्या वेगवान गाडीतून, राजधानी दर्जाच्या गाडीतून, माझ्या आवडत्या मार्गावरून आणि इतकेच नव्हे तर आपण सूचविलेल्या मार्गावरून धावणाऱ्या गाडीतून माझा पहिलाच प्रवास होता. म्हणूनच खूप एक्साईटमेंट होती.
सकाळी ठीक ११.१० वाजता आमची २२६३ (तेव्हाचा क्रमांक) दुरंतो एक्सप्रेस सुटली. पुण्याहून बडोद्यापर्यंत या गाडीचे नेतृत्व एलएचबी राजधानीप्रमाणे रंगविलेल्या वलसाडच्या डब्ल्यूसीएएम-२पी कडे होते. माझा डबा शेवटून दुसरा होता. माझ्या बाजूच्या अन्य बर्थवर व्हिएतनामी व्यक्ती होत्या. त्यांची रात्रीपर्यंत अखंड बडबड चालू होती. अर्थातच ती कोणालाच समजत नव्हती. गाडी हळुहळू वेग पकडत होती आणि सर्व प्रवाशांना पाण्याची बाटली दिली जाऊ लागली. ११.४० मिनिटांनी तळेगाव ओलांडत असतानाच ब्रेड-स्टिक, बटर आणि लोणावळ्याजवळ गरमागरम टोमॅटो सूप (मीठ, मिरीच्या सॅशेसह) आले. माझ्या समोरच्या बर्थवर एक तरुण बसला होता. पुण्याहून गाडी सुटल्यापासून बडोद्यापर्यंत त्याचे फोनवर बोलणे सुरू होते. त्याने आधी पुरवलेली पाण्याची बाटली ठेऊन घेतली, पण सूप वगैरे आल्यावर त्याने अटेंडंटला सांगितले की, मला हे नको आहे. त्याला वाटले की, याचे पैसे द्यावे लागणार आहेत. पण शेजारच्या प्रवाशांनी त्याची शंका दूर केल्यावर काही क्षण बंद असलेला फोन पुन्हा सुरू झाला. त्याला कोणाला तरी तो या गाडीतील फ्री देण्यात येणाऱ्या पाणी आणि अन्य गोष्टींबाबत सांगायचे होते. त्याच्या एकंदर संवादावरून वाटत होते की, तो हे सर्व त्याच्या मैत्रिणीला सांगत आहे.
बारा पाचला लोणावळ्यात गाडी पोहचली. येथून मुंबई विभाग आणि घाट सुरू होत असल्याने गाडी अर्धा मिनिट थांबून कॉशन ऑर्डर घेतल्यावर गाडी पुढे निघाली. मी विरुद्ध बाजूला असल्याने दुसरी लाईन मला दिसत नव्हती. दरम्यान कर्जतही गेले आणि जेवण आले. पोळी-भाजी-आमटी-भात, सॅलड, लोणचे आणि दही असा मेनू. जेवण चांगले होते. दीड वाजता कल्याण ओलांडले. त्याचवेळी कर्जत/मनमाडच्या दिशेने एक कंटेनरची मालगाडी निघून गेली. डोंबिवलीनंतर एक मोठे रिंगण पार करत गाडी पुन्हा डोंबिवलीच्या वरच्या बाजूला आली. तेथे पूल ओलांडून कोपरही क्रॉस केले. थोड्याच वेळात वसई रोडहून आलेली बीटीपीएन (टँकर) मालगाडी धडधडत दिव्याकडे निघून गेली. थोड्याच वेळात भिवंडी रोड आले. तेथे दोन मालगाड्या डिटेन केलेल्या दिसल्या. कामण रोडलाही एक बीएलसी (कंटेनर) गाडी दिव्याच्या दिशेने क्रॉस झाली. मुंबई, जेएनपीटी बंदरांना उत्तर भारताशी जोडणारा हा मार्ग असल्यामुळे आता मालगाड्यांची वर्दळ वाढली होती.
दुपारी २.२० ला आमची दुरंतो वसई रोड जंक्शनवर दाखल झाली आणि इथून पुढे माझा सर्वांत आवडता मार्ग सुरू होणार होता. इथून बडोद्यापर्यंत ॲटोमॅटीक सिग्नलिंग यंत्रणा आहे. वसई रोडला चालक आणि गार्ड बदलले गेले. ही गाडी राजधानी दर्जाची असल्यामुळे तिचे चालक आणि गार्ड उच्च प्रशिक्षित आणि मोठा अनुभवी असलेले असतात. इथून पुढे विभागही बदलत असल्याने पुन्हा कॉशन ऑर्डर घेणेही आवश्यक असते. वसई रोडवर या घडामोडी सुरू असताना २२ डब्यांची वांद्रे (ट)हून जोधपूर जं.ला जाणारी २४८० सूर्यनगरी माझ्या शेजारच्या मार्गावरून पुढे गेली. त्यानंतर दहा मिनिटांनी - १४.३५ ला आमची दुरंतो सुटली आणि प्रवाशांनी लगेच आपापले बर्थ आडवे करून दुपारची झोप घेतली. काही वेळातच वसईची खाडी ओलांडली आणि वैतरणा नदीही ओलांडली. हा राजधानीचा म्हणजेच गृप बीचा मार्ग असल्याने आमच्या गाडीनेही आता चांगलाच वेग धरायला सुरुवात केली होती. ती आता ताशी १२० कि.मी.च्या वेगाने धावू लागली होती. पुणे-वसई मार्गावर इतका वेग नसतो. पुढे शेजारील अप मार्गावरून अनेक गाड्या वसई रोडच्या दिशेने जात होत्याच. साधारण तासाभराने घोलवड ओलांडले. हे महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक. सव्वाचारला वलसाड ओलांडले, त्यावेळी एका फलाटावर वलसाड-वांद्रे (ट) पॅसेंजर निघायची तयारी करत होती. साडेचारला सायंकाळचा चहा आला. झोपलेल्या साऱ्या प्रवाशांना अटेंडंटने उठवले. चहाबरोबर नाश्ताही आला. त्यात फृट ज्यूस, २ चॉकलेटस्, लाडू, सामोसा, सँडविच, सॉस यांचा समावेश होता. चहा/कॉफीचे वेगळे कीट होते. हे देत असतानाच अटेंडंटने सर्वांना चहा/कॉफीच्या कपात साखर, मिल्क पावडर आदींची तयारी करून ठेवण्यास सांगितले आणि थोड्या वेळानेच त्यात मिसळण्यासाठी गरम पाणी दिले गेले. दुरंतो वेगात पळत असताना या सर्वांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच होती. १६.२३ला डुंगरी स्थानक वेगाने ओलांडल्यावर लगेचच विरुध्द दिशेने बीओएक्सएन (कोळशाच्या वाहतुकीचे) वाघिणींची मालगाडी वसईकडे गेली. पाठोपाठ आणखी एक मालगाडी (कंटेनर) गेली.
१७.०५. गाडीचा वेग किंचित कमी झाला. कारण सुरत आले होते. येथे गाडी थांबत नाही, पण या स्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने वेग थोडा कमी करावा लागतो. त्याचवेळी कंटेनरची मालगाडी विरुध्द दिशेने सुरत ओलांडत होती. त्याचवेळी तापी नदीचे विस्तृत पात्रही ओलांडले. भारतीय व्दीपकल्पातील पश्चिमवाहिनी नद्यांपैकी ही एक महत्त्वाची नदी. पुढे १७.३३ वाजता पानोली स्थानकाजवळ ९०५४ वाराणसी सुरत एक्सप्रेस क्रॉस झाली. त्या आधी दोन मालगाड्या क्रॉस झाल्या होत्याच. भारतीय रेल्वेच्या यंत्रणेवरील सर्वांत जास्त वर्दळ असलेला हा एक मार्ग आहे. १७.५०ला भडोच जं. क्रॉस केले आणि त्याच्याजवळच भारतीय व्दीपकल्पातील पश्चिमवाहिनी नद्यांमधील सर्वांत मोठी आणि महत्त्वाची नदी आहे. येथे या नदीचे पात्र इतके विस्तृत आहे की, ती खाडीच वाटावी. आता सूर्यास्त झाल्यामुळे अंधार पडू लागला होता. सायंकाळी १८.३५ वाजता बडोद्यात गाडी पोहचली. दुरंतोच्या प्रवासातील हा पहिला सर्वांत मोठा थांबा आहे. अलीकडेपर्यंत येथे या गाडीचे इंजिन बदलले जात असे, वलसाडच्या डब्ल्यूसीएएम-२पीची जागा गाझियाबादचे डब्ल्यूएपी-७ घेत असे. येथे चालक आणि गार्डही बदलले जातात आणि पुन्हा नव्याने कॉशन ऑर्डर दिल्या जातात. एकीकडे हे होत असतानाच रात्रीचे जेवण गाडीत चढविले जाते. या सर्व घडामोडी पूर्ण झाल्यावर आमची दुरंतो १८.५०ला बडोद्यातून निघाली. थोड्याच वेळात रात्रीच्या जेवणाआधीचा अल्पोपहार आला, ब्रेड-स्टिक, बटर, सूप (मीठ, मिरीच्या सॅशेसह). आता बाहेर अंधार असल्याने, वातानुकुलित गाडीमुळे खिडक्या बंद असल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हते.
पुण्यापासून बडोद्यापर्यंत सतत फोनवर बोलणाऱ्या त्या तरुणाला पलीकडून विचारणा झाली. अमूकएक सीरियल आज पाहिलीस काॽ पाहतो हं असे म्हणत त्याने आता फोन बंद केला आणि लॅपटॉप काढून त्यावर तो ती सीरियल पाहू लागला. दरम्यान १९.४५ वाजता गोधरा जं. गेले. त्यानंतर काही वेळातच ९०३८ गोरखपूर वांद्रे (ट) अवध एक्सप्रेस गोधऱ्याच्या दिशेने गेली. रात्री सव्वाआठच्या सुमारास रात्रीचे जेवण आले. दुपारच्या जेवणातील दह्याऐवजी आता आईसक्रीम आले होते. बाकी मेनू तोच. जेवण आटपल्यावर सारे जण झोपी गेले. पण त्याआधीच अटेंडंट टीप मागायला येऊन गेला. मला एसीतून प्रवासाची सवय नसल्याने मीही आता चांगलाच गारठू लागलो होतो. पुढे २२.१०ला रतलामला पाच मिनिटांचा टेक्निकल हॉल्ट घेऊन, चालक, गार्ड बदलून, कॉशन ऑर्डर घेऊन आमची दुरंतो दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली. रतलाम स्थानकातच एका मालगाडीचे काही डबे घसरले होते. ते पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू असल्याचे दिसले. मात्र ही घटना यार्डात घटली असल्याने इतर वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नव्हता.
पुढे मजल-दरमजल करत वाटेत येणाऱ्या काही रेल्वेगाड्यांना ओलांडत आमची दुरंतो मध्यरात्री ठीक एक वाजता कोट्याला पोहचली. वेळेच्या आधीच दहा मिनिटे आल्याने ती पुढे अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली. येथे पुन्हा चालक आणि गार्ड बदलले गेले. आमची दुरंतो प्लॅटफॉर्म क्र.१ वर उभी होती, तर पलीकडच्या लाईनवर एक बीओएक्सएन (कोळशाची) मालगाडी उभी होती. मध्यरात्री एक वाजता आणि कडाक्याच्या थंडीत प्लॅटफार्मवर होणारी तुरळक हालचाल मला दिसत होती. ठीक दीड वाजता आमची दुरंतो आणि शेजारची मालगाडी विरुद्ध दिशांनी एकाचवेळी सुटल्या. त्याआधी कोट्यात २९६३ ह. निजामुद्दीन उदयपूर सिटी मेवाड एक्सप्रेस आली होती. पहाटे २.३५ला सवाई माधोपूर जं., ४.००वाजता बयाणा जं., साडेचारनंतर भरतपूर जं. क्रॉस करत पाचला गाडी मथुऱ्यात आली. इथून पुढे गृप ए मार्ग सुरू होत असल्यामुळे दुरंतोचा वेग ताशी १३० कि.मी.पर्यंत गेला. या मार्गावरून ताशी १६० कि.मी. वेगाने गाडी जाऊ शकते. पण पुणे-निजामुद्दीन दुरंतोला अजून राजधानीचे जुने डबेच जोडले जात असल्यामुळे त्याच्या वेगावर मर्यादा आहेत. दिल्ली जवळ येऊ लागल्याने पावणेसहाच्या आसपास पँट्री सेवकांची लगबग सुरू होती. सगळ्यांना उठवत त्यांनी चहाचे कीट आणि बिस्किटे दिली आणि थोड्या वेळाने गरम पाणीही दिले. काही वेळातच ठीक साडेसहा वाजता आमची दुरंतो ह. निजामुद्दीनला पोहचली.
डिसेंबर असल्यामुळे बाहेर प्रचंड थंडी होती. दिल्लीच्या थंडीचा तो पहिलाच अनुभव होता. एवढ्या थंडीची सवयच नव्हती. त्यामुळे पुन्हा चहा घेण्याशिवाय पर्याय नव्हता. चहा घेऊन बाहेर पडत असतानाच दक्षिण आशियातील सर्वांत वेगवान गाडी अशी ओळख असलेली नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेस धडाडत गेली. तोही एक अविस्मरणीय अनुभव होता. एकूण प्रवासच एक्साईटिंग होता.
मस्त लेख आहे.
मस्त लेख आहे.
अगदी भन्नाट प्रवास वर्णन..
अगदी भन्नाट प्रवास वर्णन.. नेहमीप्रमाणेच इत्यंभुत तपशीलांसहीत लिखाण..! क्या बात है.. एकदा नक्की जाईन या ट्रेन ने..!
@पराग , तुमची आवड विशेष आहे.
@पराग , तुमची आवड विशेष आहे. बऱ्याच ट्रेनस आहेत तुमच्या डायरीत.
कोळशाच्या / वाफेच्या एंजिन -गाड्या उर्फ आगिनगाड्यांचा प्रवास आहे का लिहिलेला?
'सिग्नल पडणे' किंवा ते मोठे वेताचे वेटोळे 'लॉक' पास करणे वगैरे गंमत मालगुडी डेजमध्ये आहे. ते अनुभवले आहे. नंतर ओटमाटिक सिग्नल आले आणि मजा गेली.
std, वाफेच्या इंजिनाच्या
std, वाफेच्या इंजिनाच्या नोंदी डायरीत नाहीत. अगदी मोजकेच प्रवास त्या इंजिनांच्या गाडीने केले आहेत. कारण नंतर डिझेल इंजिनाचं युग आलं होतं. पण वाफेच्या इंजिनांच्या प्रवासाच्या आठवणी आहेत.
सिग्नल पडणे' किंवा ते मोठे वेताचे वेटोळे 'लॉक (टोकन) हा प्रकार मात्र 2003-4 पर्यंत अनुभवत होतो.
मग आता दार्जिलिंगला जाऊन या.
मग आता दार्जिलिंगला जाऊन या. तिथे अजून ती छोटी गाडी कोळशाच्या इंजिनावर चालवतात. 2017 ला आम्ही गेलो होतो तेव्हा बसलो त्या गाडीत.
लेख प्रचंड आवडला, बारीकसारीक
लेख प्रचंड आवडला, बारीकसारीक तपशील वाचायला खूपच मजा आली.
गंमत म्हणजे माझ्याही दुरंतोच्या पहिल्या (आणि एकमेव) प्रवासास १० वर्षे झाली, ४/५ डिसेंबर २०१० ला बंगलोर - कोलकाता प्रवास करण्याचा योग आला होता. विशेषतः ओरिसातल्या चिलीका सरोवराच्या बाजूने जाताना मंत्रमुग्ध व्हायला झालं होतं त्याची आठवण झाली. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात पाहताना एक वेगळीच मजा आली होती.
या लेखाच्या निमित्ताने त्या प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या. थॅंक यू!
झोप घेतलीच नाही की काय?
झोप घेतलीच नाही की काय? नोंदी फारच सविस्तर आहेत म्हणून विचारले.
ते मोठे वेताचे वेटोळे 'लॉक
ते मोठे वेताचे वेटोळे 'लॉक (टोकन) हा प्रकार मात्र 2003-4 पर्यंत अनुभवत होतो. >>> कोल्हापूर लाइन वर घोरावाडी वगैरे स्टेशन्स वर ते वापरत असे वाचले आहे. नक्की कधीपर्यंत वापरत होते माहीत नाही.
ते वेटोळे एका काठीने मोटरमन
ते वेटोळे एका काठीने मोटरमन उचलतो गाडीचा स्पीड कमी न करता आणि त्याच्याकडचे मागच्या स्टेशनवरचे लॉक खाली टाकतो. पण हे पाहण्यासाठी गाडीत असलो तर पुढच्या पहिल्या दुसऱ्या डब्याच्या दारात उभे राहावे लागायचे.
१२२६३ पुणे-ह.निझामुद्दिन एसी
१२२६३ पुणे-ह.निझामुद्दिन एसी दुरोंतो ने सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचा योग या महिन्याच्या उत्तरार्धात येतोय. त्यामुळे लेखाची आठवण येऊन मी पुन्हा उत्सुकतेने पूर्ण लेख वाचला. गेल्या महिन्यात तिकिट बुक करताना कोरोना निर्बंधामुळे रेल्वेची खानपान सेवा खंडित करण्यात आली होती परंतु गेल्या आठवड्यापासुन पुन्हा ती सुरु करण्यात आल्याबरोबर खानपान सेवेचा लाभ घेण्यासाठी वाढीव पैसे भरण्याबद्दल आय.आर.सी.टी.सी. कडुन एस.एम.एस. आला आहे. इथली चर्चा वाचुन रेल्वेच्या खानपानसेवेचा लाभ घ्यावासा वाटतोय.
DJ धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.
DJ धन्यवाद प्रतिक्रियेसाठी. आणि प्रवासासाठी शुभेच्छाही.
धन्यवाद पराग
धन्यवाद पराग
Pages