२०२० चे दिवाळी अंक

Submitted by भरत. on 1 December, 2020 - 00:14

यंदा बर्‍याच कमी संख्येने दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.

पुस्तकांच्या नेहमीच्या दुकानात किंवा स्टेशनजवळच्या पदपथ विक्रेत्याकडे जाता न आल्याने यंदा एकही दिवाळी अंक विकत घेतलेला नाही.
मुं म ग्रं सं लाही २० नोव्हेंबरलाच जाता आलं आणि पहिल्याच दिवशी मौजेचा अंक मिळाला. त्याबद्दल अधिक प्रतिसादांत.

आपण वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे लिहूया. ऑनलाइन तसंच ऑडियो दिवाळी अंकांचीही नोंद घेऊ.
अनेक दिवाळी अंकांत मायबोलीकरांचे लेखन असते. त्याबद्दलही लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिलिंद बोकील यांचा एक दर्शन अफगाणिस्तानचे हा लेख मला आवडला. वर्तमान, इतिहास, समाज, विचारसरणी या सगळ्यांना स्पर्श करणारं त्यांचं लिखाण मला आवडू लागलं आहे हे लक्षात आलं.

पश्चिमेतील स्वरपहाट - नमिता देवी दयाल यांच्या द सिक्स्थ स्ट्रिंग ऑफ विलायत खाँ या पुस्तकाच्या अंबरीश मिश्र यांनी केलेल्या अनुवादाचा अंश.

लेखाचा पूर्वार्ध पाश्चात्य जगाला भारतीय संगीताची ओळख कशी होत गेली ते सांगतो. उत्तरार्ध विलायत खां यांचे (मी ) कधी नाव न ऐकलेले बंधू इमरत खाँ यांच्याबद्दल आहे. संगीतात खूप रस नसलेल्यांनाही इंटरेस्टिंग वाटेल अशी त्यांची जीवनकहाणी आहे.
अंबरिश मिश्र यांचा अनुवाद अनुवाद वाटत नाही, इतकी सुंदर भाषा आहे.

हरी नरके यांनी रंगवलेलं अत्यंत करुण शेवट झालेलं आपल्या भावाचं व्यक्तिचित्रं रेखीव उतरलं आहे.
अनिल अवचटांनी सुमित्रा भावेंच्या त्यांच्या वैयक्तिक ओळखी आणि आयुष्यासोबतच त्यांच्या कामाबद्दलही लिहिलं आहे.
सहचर हा वीणा देव यांनी विजय देव यांच्याबद्दल लिहिलेला लेख मला सर्वाधिक आवडला.

न वाचलेल्यांत - एक दीर्घकथा आणि तीन कथा.
वास्तवाचा भास - एट अँड द हाफ या चित्रपटाबद्दल - नंदू मुलमुले ; मनाली ते मनाली व्हाया रारंग ढांग - राणी दुर्वे ; सर्वलक्षणलक्षण्य- (श्रीकृष्णाबद्दल;)- अश्विन पुंडलिक ; माटु मकेना किमाव - श्रीरंग भागवत आणि कमळगंध - रश्मी कशेळकर यांचे ललितलेख. ; आईबाबांची स्मृतिचित्रे.

अंक परत करण्यापूर्वी आदिवासी भागातील विकास -काय झालं, काय राहिलं हा परिसंवाद वाचेन.

कविता अजून चक्क वाचल्या नाहीएत.

आम्ही यावर्षी 'अक्षरधारा' मधून कुरियरने दिवाळी अंक मागवलेत. मौज, लोकसत्ता, आपले छंद, अक्षरधारा असे चार अंक मागवलेत. महाराष्ट्र मंडळ लायब्ररीतून साप्ताहिक सकाळ आणि महाअनुभव हे दोन दिवाळी अंक आणलेत. अजून फारसे वाचून झाले नाहीत. वाचले की इथे लिहिते.

ह्या वर्षी एकच अंक साधना युवा चा वाचनात आला. तो ही ऑनलाईन असल्यामुळे.
त्यातील 'नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका' ही सुरज येंगडे यांची प्रेरणादायी मुलाखत आवडली. मुखपृष्ठावर ही सुरज यांचेच प्रचि आहे. तसेच कविता राऊत यांचा सावरपाडा ते रिओ ऑलिम्पिक हा लेखही.

ह्या धाग्यावर वाचनमात्र असणार आहे.

वाह, भरत उत्तम काम केले. मी एकही दिवाळी अंक यावेळी वाचलेला नाही. आता विकत घेउन ठेवेन व बरोबर घेउन येईन परतताना.

आजच नमिता देवी दयाल यांनी लिहिलेली काही पुस्तके वाचण्याच्या यादीत टाकली आणि तुमच्या प्रतिसादात त्यांचा उल्लेख दिसला.

@हर्पेन, सुरज येंगडे यांचे कास्ट मॅटर्स हे पुस्तक 'मस्ट रिड' आहे.

दिवाळी अंक कुठे ऑनलाईन विकत मिळत असल्यास कृपया इथे सांगा. यावर्षी एकही दिवाळी अंक वाचलेला नाही.

अंबरीश मिश्र यांचं "शुभ्र काही जीवघेणे" हे पुस्तक आवडलेलं म्हणून विकत घेऊन संग्रही ठेवलेलं. कोणालातरी वाचायला दिलं ते परत आलंच नाही. असो.

Bookganga दिवाळी अंक विकतात.अक्षरधाराचा उल्लेख झाला आहेच.
वावे यांनी लिहीपर्यंत दिवाळी अंक अॉनलाईन विकत घेता येतात हे डोक्यातच आलं नव्हतं.
https://www.bookganga.com/eBooks/Books/Index?BookSearchTags=Diwali%20Ank...

श्रीरंग भागवत म्हणजे शेफच्या नोकरीत प्रदेशांत आलल्या अनुभवांचे कथन.
मौजेतला लेखही अद्भुत म्हणावा असाच आहे.
भाषा क्वचित इंग्रजीत विचार करून मराठी लिहिल्यासारखी आहे.
या आणि बहुतेक अवचटांच्या लेखात व्यग्र या अर्थी व्यस्त हा शब्द वापरलाय.
मौजेत असं झालंय म्हटल्यावर शब्दकोश काढून मराठीत तोही अर्थ नाही ना हे तपासायला हवं.

भरत, चांगलं झालंत धागा काढलात ते. ऑनलाईन बघतो मौज. (mauj ank असा सर्च केला तर अंक सापडतोय. मौज किंवा दिवाळी इ. सर्च ने येत नाही.) स्टोरीटेल छान आहे की!
बाकी ऑनलाईन कोणाला काही सापडलं तर ते लिहाच. यावर्षी भारतातून पाठवायला सांगणार नाहीये.

मी आमच्या पेपरवाल्याला सांगून हे सर्व अंक विकत घेतले : महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, कालनिर्णय, सकाळ, नवल , धनंजय , माहेर, मेनका, दीपावली , अक्षर , चंद्रकांत मागवले. पण दिवाळीच्या दिवसात दोन तीन फेर्‍या मारून ठराविक विक्रेत्याकडून स्वतः अंक विकत घेण्याची मजा नाही आली यंदा.

साधना बाबांकडे नियमीतपणे येतं त्यामुळे तो दिवाळी अंकही आला. शिवाय बहिणीनं ग्रंथालीच्या स्कीममधून मौज,अंतर्नाद, पद्मगंधा,ऋतुरंग,शब्द रुची पाठवले. आता आईबाबांना वर्षभर पुरतील हे वाचायला. मी जमेल तसे वाचेन.

स्पंदनचा दिवाळी अंक. यात मायबोलीकर कविता नवरेनं एक कथा आणि एक कविताही लिहीलेली आहे. हा ऑनलाईन आणि फ्री अंक आहे.

https://drive.google.com/file/d/1uQ-JAgtehZN4fglqBOGIGO59nHZ7mp7Z/view?f...

केकी मूस यांच्यावरचा लेख अतिशय वाचनीय आणि फारच सुंदर >> हा यंदाचा लेख नाही वाचला पण फार पूर्वी केकी मूस यांच्यावर असाच सुरेख लेख कोणत्यातरी अंकात (दिवाळी अंकातच असं नाही) वाचल्याचं आठवतंय.

नवल चा आला आहे का अंक? घेउ न येइन आता.

मला सांगलीत आवाज व ग्रह संकेत हे दोन मिळाले. बरे आहेत.

चांगला धागा.
जर एखादा अंक पैसे भरून फक्त ऑनलाईनच वाचायचा असेल तर त्याची माहिती कुठे मिळते ?
मला छापील अंक मागवायचे नाहीत

'अनुभव' बऱ्यापैकी वाचून झाला.
निरंजन घाटे यांचा आयझॅक ॲसिमॉव्ह या विज्ञानकथालेखकावरचा लेख फारच मस्त आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकरांचा 'मन पर-कामरंगी रंगले' हा पोर्नोग्राफीच्या व्यसनावरचा लेखही त्यांच्या नेहमीच्या शैलीतला, खासच.
अनिल खैरे यांचा 'मगरींच्या गोतावळ्यात' हाही लेख छान!
गेल्या वर्षी झालेल्या एका जहाजाच्या आणि त्यावरच्या खलाशांच्या अपहरणावरचा अनिल परांजपे यांचा लेख रोचक आणि थरारक. या अपहृत खलाशांमध्ये पुण्याच्या संग्राम केळकरचा समावेश होता. त्याचं कुटुंब परांजपे यांच्या ओळखीचं आहे, त्यामुळे त्यांनी लिहिलेली माहिती फर्स्ट हँड आहे.
'संघातले दिवस' हा रवींद्र कुलकर्णींंचा लेख विस्कळीत वाटला.
राजेश्वरी देशपांडे यांचा 'ऑर्वेलच्या भयस्वप्नातील लोकशाही' हा लेख आता वाचायला घेतला आहे.

वावे, धन्यवाद.
कोणाला अंतर्नादचा सशुल्क दुवा माहिती असेल तर सांगा.

Pages