२०२० चे दिवाळी अंक

Submitted by भरत. on 1 December, 2020 - 00:14

यंदा बर्‍याच कमी संख्येने दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.

पुस्तकांच्या नेहमीच्या दुकानात किंवा स्टेशनजवळच्या पदपथ विक्रेत्याकडे जाता न आल्याने यंदा एकही दिवाळी अंक विकत घेतलेला नाही.
मुं म ग्रं सं लाही २० नोव्हेंबरलाच जाता आलं आणि पहिल्याच दिवशी मौजेचा अंक मिळाला. त्याबद्दल अधिक प्रतिसादांत.

आपण वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे लिहूया. ऑनलाइन तसंच ऑडियो दिवाळी अंकांचीही नोंद घेऊ.
अनेक दिवाळी अंकांत मायबोलीकरांचे लेखन असते. त्याबद्दलही लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यभूषण मधला श्याम भूतकारांचा जोशी अभ्यंकर हत्याकांदावरचा लेख अंगावर काटा आणणारा आहे.. मला तो लेख वाचल्यावर काही सुचत नव्हतं.
मी वाचलेले काही दिवाळी अंक
१ पुण्यभूषण - जाहिरातींचा मारा अगदी चितळे, पु ना गाडगीळ, पेशवाई, वैशाली हॉटेल झाडून सगळ्यांच्या जाहिराती आहेत. तरीही काही लेख नक्कीच वाचनीय आहेत.
२. ग्राहकहीत - मला मी वाचलेल्या सगळ्या दिवाळी अंकात हाच आवडला कारण ह्यात बऱ्याच नावाजलेल्या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण आहेत. त्यात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा धनंजय केळकर, दिलीप प्रभावळकर, शंकर महादेवन अजूनही बरेच आहेत.
Dr. उषा कुकडे ह्यांचा एकदा बायपास सर्जरी आणि दोनदा कॅन्सर शी दिलेला लढा प्रेरणादायी आहे.
३. मिळून साऱ्याजणी - थोडा वाचला नाही आवडला.
सगळे दिवाळी अंक कोथरूड मध्ये डी पी रोड वर असणाऱ्या टपरीवजा दुकानातून घेतले.
नंतर बुकगंगा वर बघितले तर तिकडेही होते.
पण बुकगंगा ची डिलेव्हरी ह्या बद्दल न बोललेलं बरं.
पुण्यातल्या पुण्यात ते ८ दिवस लावतात.
दिवाळी अंकाबद्दलची मतं ही माझी वयक्तिक आहेत.

लोकसत्तेतले - हायपेशिया -अंजली चिपलकट्टी, वुहानमधले ते दिवस - अश्विनी पाटील आणि डॉ वाल्देमार हाफकिन हे लेख वाचले.

हायपेशिया लेखाच्या समारोपातील वाक्ये आजही समर्पक आहेत.
वुहानमधले दिवस या लेखात टाइमलाइन हवी होती. त्यांना भारतातल्या आणि दूतावासातल्या लोकांकडून चांगली मदत आणि आधार मिळाला हे नोंदवण्यासारखे आहे.

हाफकिन संस्था मुंबईत असूनही त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती.

या वर्षी आम्ही आमच्या सोसायटीचा दिवाळी अंक केलाय. लेखन, संपादन, मुखपृष्ठ, सजावट, तांत्रिक बाजू सगळं काही सोसायटीच्या रहिवाश्यांनीच केलंय. अंकावर तुमचा सगळ्यांचा अभिप्राय आवडेल!

अंक पीडीएफ स्वरूपात वाचण्यासाठी लिंक:
https://drive.google.com/file/d/1FHAdGiPVHaA4sPAOCjUKzS241nWM1qYr/view

अंक ब्लॉग स्वरूपात वाचण्यासाठी लिंकः
https://samrajyaeank.blogspot.com/2020/11/blog-post_31.html

लोकमत दिवाळी अंकातला मयुरेश भडसावळे यांचा 'लिट्टी चोखा' हा लेख प्रचंड आवडला.
दिल्ली -एनसीआर भागातल्या बदलत्या खाद्यसंस्कृतीचा (पंजाबी ते बिहारी) संदर्भ घेऊन त्या अनुषंगाने बिहारी गरीब लोक, त्यांनी केलेली स्थलांतरं, त्या स्थलांतरांची कारणं याचा मागोवा त्यांनी घेतला आहे. अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.

पहिल्यांदाच लोकमंगल मैत्र दिवाळी अंक वाचतोय. एकही जाहिरात नाही. सगळा खर्च लोकमंगलचे आमदार सुभाष देशमुख करतात. ओळखीचे आणि आवडलेले लेखक दिसताहेत.

अनुवादित कथांमध्ये माझ्या मराठीच्या प्रा. मृणालिनी जोग़ळेकर यांनी केलेला सत्यजित राय यांच्या कथेचा अनुवाद आहे.

लोकमंगल मैत्र बद्दल प्रथमदर्शनी बनलेलं मत पुढे टिकलं नाही.
अनुक्रमणिकेत मृणालिनी जोगळेकर आणि कथेखाली दुसरंच नाव (आडनाव).

माहेर दिवाळी अंकात जाहिरातीच जाहिराती. त्यामुळे हा संपूर्ण वाचता येईल म्हणून सुरुवातीपासून सलग वाचूया म्हटले . पहिल्या दोनही कथांनी निराशा केली. खरं तर नीट विचार करता केली नाही, असंच म्हणायला हवं.

आपलाच frozen embryo वापरून नवरा मेल्यानंतर मूल जन्माला घालायचा निर्णय घेणार्‍या अमेरिकेत राहणार्‍या बाईचं गाडं शेवटी लोक काय म्हणतील, पुढे दुसरं लग्न करायचं असेल तर तेव्हा काय? इथेच येऊन फिरतं.

मग फक्त मायबोलीकरांचंच लेखन वाचलं. चिन्मय दामलेंच्या लेखनातले तपशील नवल वाटायला लावणारे आहेत.
आदित्य कर्नाटकींच्या लेखातल्या गणिती संकल्पना, सूत्र गणिताचे विद्यार्थी नसलेल्यांना समजतील का? मी बारावीपर्यंत गणित शिकलो. कॅल्क्युलस शिकलोय हे आठवतंय. पण ते काय, ते आठवत नाही. शिवाय तेव्हा भर संकल्पना समजण्यापेक्षा सोडवायचं कसं यावरच असायचा
बहुतेक.
दीपक ठाकरेंची कथा आवडली.
माहेरमधल्या बहुतेक जाहिराती पुण्यातल्या उत्पादक / विक्रेत्यांच्या असतात. त्यांची उत्पादने पुण्याबाहेर सहज उपलब्ध असतात का?

वांङ्मयीन सामग्रीच्या निकषावर पद्मगंधा हा आतापर्यंत वाचलेल्या अंकांत सगळ्यात उजवा वाटतो आहे. संपादकीयात म्हटल्याप्रमाणे हा अंक संग्राह्य आहे. जी एं वरचा हेमंत खडकेंचा लेख मेजवानी आहे.
तब्बल २८८ पानं , फक्त पुस्तकांच्या - प्रकाशन संस्थांच्या जाहिराती. बहुतेक सगळा मजकूर सलग. माहेर मध्ये 'पुढील मजकूर पान अमुकतमुकवर' ने वैताग आणला. वृत्तपत्रांत महत्त्वाच्या जास्तीत जास्त बातम्यांना पहिलं पान मिळावं म्हणून असं करणं समजू शकतं. पण दिवाळी अंकांत असं का करतात? बर्‍याच दिवाळी अंकांत हा प्रकार असतो.

व रचा प्रतिसाद लिहिल्यानंतर वाचलेलं पद्मगंधाम धलं साहित्य अगदी सुमार वाटलं.
मॉर्निग वॉकबद्दलच्या प्रदीप प्रदीप चंपानेरकरांच्या लेखात लिहिलेल्या सगळ्या गोष्टी मलाही मॉर्निंग वॉकदरम्यान दिसतात. त्यात छापून आणण्यासारखं काय आहे, असं वाटलं. शेवटी एक सोशल फोडणी दिली आहे

शिक्षकांबद्दलच्या फुटकळ आठवणींचा एक लेख आहे.
बब्रूवान रुद्रकंठावर यांची कथा , नक्की काय चाललंय ते कळेना म्हणून अर्ध्यात सोडली.

शेतीविषयक नवीन कायद्यांसंदर्भातला मुकुंदराज यांचा लेख - अधिक माहितीसाठी माझे अमुक तमुक पुस्तक वाचा. अशी वाक्य जागोजागी स सांडली आहेत.
बुलेट पॉइंट्स लिहिल्यासारखे परिच्छेद.
शेती व्यवसायातील त्रुटीमध्ये बाजारव्यवस्थेतील शोषण महत्त्वाचे आहे, अशी सुरुवात असलेल्या परिच्छेदात शोषण कसं होतं ते नाही.
मी या लेखातून तत्त्वप्रणालीचा आढावा घेणार आहे.
जागतिकीकरणा चे तत्त्व वाईट होते असे नसून ज्या पद्धतीने ते राबवले ती पद्धत वाईट होती.
कोणतेही क्रांतिकारी तत्त्वज्ञान नव्या तेजीला कारणीभूत ठरते.
बाजारपेठेचा अदृश्य हात सगळे ठरवतो आणि त्यातून सगळ्यांचे भले होते.
असली चमकदार विधाने लेखात आहेत.

तबलीगी जमात वरचा लेख वाचताना संघाशी काही साम्यस्थळे जाणवली.

प्रतिभा आणि कलानिर्मिती याबद्दलच्या लेख मालेतील काही लेख चाळले. यात वेगवेगळ्या कलाप्रकारांना स्थान दिले आहे, फक्त साहित्य हा कलाप्रकार घेतला नाही. हे विशेष.

शब्दालयने "सातपाटील कुलवृत्तांत विशेषांक " काढला आहे. रंगनाथ पठारेंच्या कादंबरीबद्दलचे लेख.
ही कादंबरी गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली. मायबोलीवर तीबद्दल कोणी लिहिल्याचं आठवत नाही.

Pages