२०२० चे दिवाळी अंक

Submitted by भरत. on 1 December, 2020 - 00:14

यंदा बर्‍याच कमी संख्येने दिवाळी अंक प्रकाशित झाले आहेत.

पुस्तकांच्या नेहमीच्या दुकानात किंवा स्टेशनजवळच्या पदपथ विक्रेत्याकडे जाता न आल्याने यंदा एकही दिवाळी अंक विकत घेतलेला नाही.
मुं म ग्रं सं लाही २० नोव्हेंबरलाच जाता आलं आणि पहिल्याच दिवशी मौजेचा अंक मिळाला. त्याबद्दल अधिक प्रतिसादांत.

आपण वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल इथे लिहूया. ऑनलाइन तसंच ऑडियो दिवाळी अंकांचीही नोंद घेऊ.
अनेक दिवाळी अंकांत मायबोलीकरांचे लेखन असते. त्याबद्दलही लिहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावेळी एकही अंक खरेदी केला नाही.:-(
धनंजय आवडता होता. पण आताशा नाही घेत.
नमिता देवीदयालचं नाव वाचुन आनंद झाला.

ऑनलाइन अंकात मी ऐसी अक्षरेचा दिवाळी अंक वाचला. त्यात मला कल्चर , गोवा आणि बाधा हे लेख आवडले. झेंगत कथाही चांगली जमलीये पण अदूबाल यांच्याकडून अजून अपेक्षा होत्या. कोल्हापूर मधील साथ निवारण हा लेखही माहितीपूर्ण आहे

यावर्षी लायब्ररीमधे दिवाळी अंक नाहीत.ऑनलाईन मेनका,माहेर मागवला.मेनका पाहून निराश झाले अर्धाअधिक अंक जाहिरातींने भरला होता.माहेर, पूण्याला पाठवल्याने त्याची काय स्थिती आहे माहीत नाही. मौज्,ऋतुरंग ऑनलाईन नव्हते.

ह्या वेळचा धनंजय छान आहे. जत्रा जाहीरातीने भरलेला आहे. वर्‍हाडी बोली भाषेतला 'चिरांगन' मला ठक सरांनी पाठवला आहे. अजून वाचला नाही, पण छान वाटतोय.

जर एखादा अंक पैसे भरून फक्त ऑनलाईनच वाचायचा असेल तर त्याची माहिती कुठे मिळते ?
मला छापील अंक मागवायचे नाहीत >>>

'अनुभव' ऑनलाईन आहे का? >>>

कुमार, अंजली,
अनुभव दिवाळी अंकाची पीडीएफ विकत घेण्याची लिंक :
https://www.instamojo.com/anubhavmasik/anubhav-diwali-2020/

मिवापु धाग्यावरून रिपोस्ट :

यंदाच्या पुण्यभूषण दिवाळी अंकात शाम भुतकरांचा जक्कलवरचा लेख आहे. अभिनव कॉलेजमध्ये भुतकर आणि जक्कल मित्र होते. मात्र जक्कलच्या इतर उद्योगांबद्दल भुतकरांना फारशी माहिती नव्हती. हत्याकांडानंतर आधीच्या एक-एक घटनांची संगती कशी लागली ते त्यांनी लिहिलं आहे. तो लेख वाचूनही असंच अनामिक दडपण येतं.

केकी मूस यांच्यावरचा लेख अतिशय वाचनीय आणि फारच सुंदर >> हा यंदाचा लेख नाही वाचला पण फार पूर्वी केकी मूस यांच्यावर असाच सुरेख लेख कोणत्यातरी अंकात (दिवाळी अंकातच असं नाही) वाचल्याचं आठवतंय.>>>> मागे कधीतरी निशिकांत भालेराव यांनी लेख लिहिला होता. कुठे आणि कधी हे आठवत नाही. मागच्या वर्षी त्याने तो लेख किंवा त्या संदर्भातले लिखाण फेसबूक वर परत एकदा शेअर केलं होतं.

केकी मूस यांच्यावरचा लेख अतिशय वाचनीय आणि फारच सुंदर >> हा यंदाचा लेख नाही वाचला पण फार पूर्वी केकी मूस यांच्यावर असाच सुरेख लेख कोणत्यातरी अंकात (दिवाळी अंकातच असं नाही) वाचल्याचं आठवतंय.>>>> हो वाचला आहे तो लेख.दिवाळी अंकातच होता..

अनुभव दिवाळी अंकाची पीडीएफ विकत घेण्याची लिंक :>>>> थँक्यू ललिता. पण हे फक्त भारतातूनच विकत घेता येईल असं वाटतंय.

पण हे फक्त भारतातूनच विकत घेता येईल असं वाटतंय. >>> ओह! असं होतंय का? मी विचारून घेते. आणि इथे सांगते.

ललिता प्रीती -
अनुभव दिवाळी अंकाची पीडीएफ विकत घेण्याची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद
अक्षरधारा चा दिवाळी अंक त्यांच्या वेबसाईट वरसुद्धा (विक्रीसाठी) उपलब्ध नाहीये.
Amazon (भारत) वर बरेच अंक उपलब्ध आहेत विक्रीला.

अक्षर

वर्तमाना तील ठळक घडामोडींशी संबंधित लेख हे अक्षरचे नेहमीचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

या अंकात "कोरोनाच्या छायेत जगताना" ही लेखमाला आहे.
पार्थ एम एन यांनी स्थलांतरित मजूरांसंबंधी लिहिताना प्रत्यक्ष रिपोर्ताजच्या जोडीला सरकारी निमसरकारी आकडेवारी मांडली आहे. या लेखाचं शीर्षक 'शहरांचे शिल्पकार' असं आहे. हवामान बदल, त्याचे शेतीवर होणारे परिणाम असे अनेक कंगोरे तपासले आहेत. समारो पाच्या परिच्छेदातली काही वाक्ये - शहरी मध्यमवर्गीय आणि स्थलांतरित मजूर यांच्यातला सामाजिक करार नव्याने तपासून पाहावा लागेल. ते या अव स्थेला कसे आणि का पोचले हे जाणून घ्यावे लागेल. आणि मगच ते दुरुस्त करण्याचे मार्ग शोधावे लागतील.

राजेंद्र जाधव यांच्या शेती वरच्या लेखाने हा प्रश्न किती कॉम्प्लेक्स आहे, एकच उपाय सगळीकडे लागू पडणं शक्य नाही ( नव्या कायद्यांना पंजाब ह रयाणातच विरोध अधिक का ) हे कळतं. याशिवाय श्रुती गणपत्ये यांचा देहविक्रय करणार्‍या स्त्रियांवरील , साधना तिपन्नाकजे यांचा गतिमंद मुलांबद्दलचा आणि डॉ सुजाता लाड कोरडे यांचा कौटुंबिक हिंसाचारावरचा , हे लेख वाचले.

या मालिकेत मुकुंद टाकसाळे यांचाही लेख आहे.

रोहिणी मोहन यांचा आसाममधील एन आर सी ची अंमलबजावणी, डिटेन्शन सेंटर्स यांच्याबद्दलचा लेख वाचला. सुट्या सुट्या वाचलेल्या बातम्यांचा एक नीट रचलेला कोलाज.

जतिन देसाई यांनी १९७१ मध्ये तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानात झालेल्या नर संहाराचं वृत्तांकन करणार्‍या अँथनी मस्करान्हेस या पत्रकाराच्या कामगिरीबद्दल लिहिलं आहे.
यातून दोन इंटरेस्टिंग गोष्टी - पंडित रविशंकर यांनी बंगाली लोकांच्या मदतीसाठी जॉर्ज हॅरिसनच्या जोडीने मॅडिसन स्क्वेअरला दोन कॉन्सर्ट्स केले.
१६ डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करल्यावर याह्याखान यांनी राजीनामा दिला. पण त्याआधी पश्चिम पाकिस्तानात तुरुंगात असलेल्या शेख मुजीबूर रहमान यांच्या नावे देहदंडाचं बिनतारखेचं वॉरंट नवे अध्यक्ष भुत्तोंना दिलं. रहमान यांचा त तुरुंगातच काही कैद्यांकरवी खून करायचा कटही रचला गेला. हे कळताच भुत्तोंनी शेख मुजीबना तुरुंग अधीक्षकाच्या घरी हलवलं आणि काही दिवसांनी लंडनला पाठवलं. यावेळी ते स्वतः विमानतळावर हजर होते.

सतीश तांबेंची कथा वाचली. काय चाललंय काही कळत नाही तरीही पकड घेणारे अशी सुरुवात आणि कथाविस्तार, त्यातून हळू हळू होणारे सूत्रसूचन आणि रूढार्थाने शेवट नसलेला शेवट हा त्यांच्या मी वाचलेल्या कथांचा पॅटर्न. ही कथाही आवडली.

सगळे साहित्य वाचता आलेले नाही. सुशांतसिंग आत्महत्येच्या संदर्भाने मानसयांच्यावरचा लेख , ऋषी कपूर आणि इर्फान खान यांच्यावरचा अमोल उद्गीरकर यांचा लेख . रत्नाकर मतकरींवर सुप्रिया मतकरींचा लेख , वरुण ग्रोव्हरचा लेख .

अंकात मायबोलीकर मुग्धमानसी यांची कथा आहे.

सकाळ साप्ताहिक दिवाळी अंकात मंगला गोडबोले यांचा 'थेंबे थेंबे..' नावाचा लेख आहे. लॉकडाऊन काळात पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील विविध गावांमधल्या बचत गटाच्या महिलांनी करून दाखवलेल्या प्रचंड कामावरचा हा लेख अतिशय आवडला. लॉकडाऊनच्या सुरुवातीला अनेक अडचणी उभ्या राहिल्या असताना गावागावांमध्ये पिकणारी भाजी सुसूत्र नियोजन करून पुण्याच्या ग्राहकांपर्यंत पोचवणं, गावांमध्ये असलेल्या गरोदर स्त्रिया, वृद्ध, मधुमेह-रक्तदाबासारख्या आजारांचे रुग्ण यांच्यापर्यंत त्यांना लागणारी औषधं पोचवणं, करोनाबद्दलची योग्य ती माहिती लोकांना देणं अशी अनेक महत्त्वाची कामं या अल्पशिक्षित महिलांनी ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने पार पाडली. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला, गावातली, कुटुंबातली पत वाढली.

डॉ. अपर्णा महाजन यांचं श्रीलंकेचं प्रवासवर्णन आवडलं.
गौतम पंगू यांची 'पूर' ही कथाही छान! त्यांच्या कथा याआधीही वाचल्या आहेत, त्याही आवडल्या होत्याच.

https://www.mazamarathichabol.org/

हा आमचा दिवाळी अंक. कथाविभागासाठी मी मदत केली आहे. माझीही कथा आहे. नक्की वाचा. गेल्या चार वर्षांतले अंकही याठिकाणी वाचायला मिळतील.

वावे, गौतमचीही कथा आहे या अंकात.

आज लायब्ररीतून 'माहेर' आणि 'लोकमत' हे दोन दिवाळी अंक मिळाले.

माहेरमध्ये अनेक मायबोलीकरांचे लेखन आहे. दीपक ठाकरे, शिवकन्या शशी, चिन्मय दामले, आदित्य कर्नाटकी, केतन दंडारे ही ओळखीची नावं दिसली.
कथांमध्ये संदीप सरवटे यांची 'अपघात' ही कथा चांगलीच जमली आहे. हॅक्ड ही डॉ. केदार आठवले यांची कथा सुरुवातीला भारी वाटली, पण शेवट काही आवडला नाही.. 'संचित चिंता' ही दीपक ठाकरे यांची कथा पूर्णपणे समजली नाही. 'मुक्त' ही नीता गोडबोले यांची कथा वाचून मायबोलीवरच्या 'रुबिक क्यूब आणि कृष्ण' या दाद यांच्या कथेची आठवण झाली. शिवकन्या शशी यांच्या कविता मस्तच!

चिन्मय दामले यांचा 'बोटलर वेंकटसामीचे खीडपप्पूस' हा लेख वाचला. तंजावरच्या सरफोजीराजांच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या पाककृतींंच्या हस्तलिखितांची माहिती भारीच!

बाकी लेख अजून वाचून झाले नाहीत. पण एकंदर अंक आवडला!

लोकमत अंकात नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी आणि ईस्थर डफ्लो यांची मुलाखत आहे, झाकिर हुसेन यांची मुलाखत आहे. अजून त्यातलं काहीच वाचून झालं नाही.

@मोहना, वरची लिंक पाहते. धन्यवाद Happy

एक महत्त्वाचा उल्लेख राहिला आहे

हा अंक
आपल्या माबोकर
किल्ली
सिद्धी
अर्चना
यांनी निर्मित केलेला आहे .
त्याचं पुरेपूर श्रेय त्यांना आणि खूप अभिनंदन .
पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा आपण त्यांना देऊ या .

तसेच

या अंकात एकच नव्हे तर - आपल्या अनेक - अनेक माबोकरांचे लेखन आहे ... !

भरत,

आभार अन क्षमस्व .

-----------------------------------

स्पंदनचा दिवाळी अंक. यात मायबोलीकर कविता नवरेनं एक कथा आणि एक कविताही लिहीलेली आहे. हा ऑनलाईन आणि फ्री अंक आहे.

https://drive.google.com/file/d/1uQ-JAgtehZN4fglqBOGIGO59nHZ7mp7Z/view?f...

Submitted by मामी on 1 December, 2020 - 12:54

माहेर दिवाळी अंकातला केतन दंडारे यांचा 'विज्ञानाची खिडकी' हा लेख विचारांची एक नवीनच खिडकी उघडणारा आहे. लोकशाहीवादी विज्ञानशिक्षण आणि लोकशाहीसाठी विज्ञानशिक्षण या दोन पैलूंचा ऊहापोह, प्रत्येकाला कुठलातरी दृष्टिकोन असण्याची, एकाच वेळी मर्यादा आणि अपरिहार्यता, त्याचे होणारे परिणाम, त्यांची जाणीव ठेवल्यास होणारे फायदे, असं सुरुवातीला जरा क्लिष्ट वाटणारं, पण रोचक असलेलं विवेचन आहे.
मधुकर धर्मापुरीकर यांचा 'माझ्या कथांच्या नायिका' हा लेखही आवडला. त्यांचे कथासंग्रह वगैरे मी वाचलेले नसले, तरी पूर्वी अंतर्नाद मासिकात त्यांच्या आलेल्या कथा वाचल्या आहेत, त्या खूप आवडायच्या.
आदूबाळ यांनी अनुवादित केलेला एका चिनी कादंबरीचा भाग (उन्माद आणि आवाज) अंगावर काटा आणणारा.
डॉ. नंदू मुलमुले यांची कडू आणि गोड ही कथा मस्तच.

लोकसत्ता
यात अनुवादित लेखन जास्त आहे.
प्रताप भानू मेहतांचा - धर्म, राष्ट्रवाद आनि हिंसा . मेहतांचे इंग्रजी लेखही वाचणार्‍याला चट्कन समजत नाहीत. परिभाषिक शब्द, सारांश लेखनात वापरावी तशी अर्थसंपूर्ण वाक्ये. त्याचा शब्दशः अनुवाद करायला नको होता. उलट विस्तार करून लिहायला हवे होते. मेहता जे म्हणताहेत तसलं मी वाचत आलो असल्याने पहिल्या दोन परिच्छेदांतलं अडखळणं सोडलं तर पुढे लेख वाचताना त्रास झाला नाही.
अभिनव चंद्रचूड यांचा हेबियस कॉर्पस दाव्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या हाताळणीवरचा लेख खूपच त्रोटक आहे. आणि त्यात कसलंही मत नाही.
साहिर लुधियानवींच्या लेखातून देवेंद्र सत्यार्थींबद्दल कळले. हे नाव आधी ऐकले नव्हते.
गिरीश कुबेरांच्या तेलावरच्या आगामी पुस्तकातल्या लेखाला पास.
आशुतोष् जावडेकरांचा कधी गीत, कधी नाद हा लेख आवडला. जुनी गाणी खरंच जास्त लक्षात राहतात का? राहत असतील तर का? यावर त्यांनी फेसबुक पोल घेतला होता. त्यातल्या प्रतिक्रिया + स्वतःची मते असं लेखाचं स्वरूप आहे. नवी गाणी ही गीतांपेक्षा नादांचे संकलन अधिक असते आणि जुने ते सगळेच सोने नसते असा सारांश सांगता येईल.
अभिनेत्री सुहास जोशी यांनी स्मृतीचित्रे या चित्रपटाच्या आणि एकपात्री प्रयोगाच्या आठवणी जागवल्या आहेत.

श्याम् मनोहरांच्या प्रत्येक कथा , कादंबरीत खून किंवा किमान आकस्मिक , अनैसर्गिक मृत्यू असतोच का?

अर्धाच अंक वाचता आला.
उरलेल्यात - लेखक म्हणून आपल्या जडणघडणीविषयी दासू वैद्य , सदानंद देशमुख , नवनाथ गोरे यांनी लिहिलं आहे.

अक्षरमाधली मुग्धमानसी यांची कथा शंभर या शब्दाच्या वापरामुळे क्लिशेड वाटत होती. पण तिने पुढे वेगळेच वळण घेतले. मला कळली असे वाटते आहे आणि आवडली.

Pages