गुप्तहेर बबन बोंडेज दिवाळी - अ लाडू टू किल

Submitted by सखा on 13 November, 2020 - 01:49

मित्रांनो ऐन दिवाळीतील या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घ्या. सर जॉनी इंग्लिश, सर ऑस्टिन पॉवर्स आणि माननीय जेम्स बाँड यांना दिवाळीच्या फराळाला आपला लाडका भारतीय गुप्तहेर बबन बोंडे यांनी अर्थातच अत्यंत गुप्तपणे बोलावलेलं नसेल तरच नवल होतं. बबनची माजी गर्लफ्रेंड प्रियांका मस्का, जीने जणू काही भारतात वीर पुरूष नाहीतच अशा अविर्भावात एका बुटक्या अमेरिकन माणसाशी लग्न केले हे तर तुम्हाला माहितीच आहे. असो. तिने आपल्या बबनशी जरी लग्न नाही केलं तरी ती आजही बबनला दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवते याचं कारण म्हणजे तिच्यावर असलेले संस्कार. मुख्य म्हणजे ती स्वतःच्या हातांनी करून पाठवते.
जगातले चार महत्वाचे गुप्तहेर एका ठिकाणी आहेत म्हटल्यावर त्यांच्या गुप्त शत्रू ने घातपाती हल्ला न केला तरच नवल असे तुमच्या मनात आले असणारच नाही का? मग तुम्हाला गुड न्यूज देतो. अगदी तसेच झाले. गुड न्यूज, त्यांच्यावर हल्ला झाला ही अर्थातच नाही हो. गुड न्यूज ही की , असा हल्ला होणार हा तुमचा अंदाज, अगदी खरा निघाला!
झाले काय की फराळाला सुरुवात करणार इतक्यात अचानक चार भयंकर अतिरेकी तिथे प्रकट झाले. त्यांच्या हातातल्या ऑटोमॅटिक मशीनगन्सने, जागतिक दर्जाच्या या चारही गुप्तहेरांचा क्षणात खात्मा झाला असता. मात्र गुप्तहेरांच्या ट्रेनिंग मध्ये जसे शिकवले असते तसे, हातात असलेल्या गोष्टीला वेपन मध्ये कन्व्हर्ट करा तद्वत ऑस्टिन पॉवर्स जेम्स बॉण्ड आणि जॉन इंग्लिश यांनी प्रत्येकी प्रियांकाने स्वतःच्या हाताने तयार केलेला रव्याचा लाडू, चकली आणि करंजी, पापणी लवायच्या आत, तीन अतिरेक्यांना फेकून मारून त्यांना तिथेच तात्काळ बेशुद्ध केले. आता तुम्ही म्हणाल चौथा अतिरेकी, त्याचे काय झालं? आपला बबन काय फक्त चिवडा खात बसला?? नाही मित्रानो बबनने मात्र आपल्या पिस्तूल मध्ये काडतूस नसल्याने चिवड्यातला शेंगदाणा विद्युत वेगाने पिस्तूलात भरला आणि शेवटच्या आणि सर्वात भयंकर अतिरेक्याला निव्वळ शेंगदाण्याने टिपले. आता बोला!
सगळी सारवासारव झाल्यानंतर सगळी मंडळी पुन्हा एकदा फराळाला बसली तेव्हा बबन म्हणाला थॅंक गॉड लाडू करंजी आणि चकली अंमळ टणक होती.
जॉनी इंग्लिश आणि सर जेम्स बॉण्ड यांनी आपला आज उपास असल्याने फक्त आपण पाणी पिऊ असे फराळा कडे बघत सांगितले.
सर ऑस्टिन पॉवर यावर हातातल्या गोल परंतु लोखंडा पेक्षा टणक लाडू कडे बघत मिश्किलपणे म्हणाले O behave baby!
अर्थातच मला ताबडतोब बबनचा फोन आला आणि फराळाची व्यवस्था तत्काळ करण्याचे काम मला करावं लागलं. बऱ्यापैकी टेस्टी आणि माऊ लाडु खाताना सर ऑस्टिन पॉवर्स मला म्हणाले तुम्ही काय करता? मी अभिमानाने म्हणालो की आज-काल पुस्तके फारसे कोणी वाचत नसले तरी मी बबनचा बालमित्र आणि चरित्र लेखक आहे. यावर अर्थातच सर ऑस्टिन पॉवर पुन्हा एकदा म्हणाले, O behave!
दिवाळीला अनेक विनोदी कार्यक्रम होतात मागच्या वर्षी घडलेला हा एक विनोदी कार्यक्रम मला आठवण आल्याशिवाय राहिला नाही. एव्हढेच.
दिवाळीच्या शुभेच्छा! ❤️
20201113_121346.jpg
#baban_bonde #jamesbond #austinpowers #JohnyEnglish

Group content visibility: 
Public - accessible to all site users