व्हिसल ब्लोअर-३

Submitted by मोहिनी१२३ on 11 November, 2020 - 09:32

भाग १- https://www.maayboli.com/node/77210
भाग २-https://www.maayboli.com/node/77219

खरं तर नेहाला कशी, कुठुन सुरूवात करावी कळत नव्हतं. तिने काही गोष्टी मात्र पक्कया ठरवल्या होत्या.

या प्रकाराबद्गल लंचग्रुप मध्ये अजिबात बोलायचे नाही ही नं.१ . तिची लंचगॅंग एकदम भारी होती, जीवाला जीव देणारी होती. पण बहुतेक सगळ्या वयाने खुप लहान आणि कॅान्ट्रॅक्टवर होत्या. त्यामुळे आपल्या कंपनीतील इतका अंतर्गत संवेदनाशील विषय त्यांच्यापुढे काढू नये असं तिला वाटत होतं.

तसेच अमित व आनंद यांच्याशीही सध्दया काही बोलू नये असं तिला वाटत होतं. म्हणजे त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायचं तिच्यात धाडस नव्हतं. तिला हा प्रकारच खुप लाजिरवाणा वाटत होता.

आणि मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय असल्यामुळे उगाचच हाराकिरी करायला जायचं नाही ही तिसरी गोष्ट.

सुरवातीला नेहाने अगदी बालिशपणा केला. ती चक्क एका कागदावर “तू जे मुलांबरोबर वागतीयसं ते अगदी चुकीचे आहे. ते कृपया ताबडतोब थांबव” अशी विनंतीवजा धमकी इंग्रजी मध्ये लिहून कल्पनाच्या डेस्क वर कोणी आसपास नसताना ठेवून आली. त्या मजल्यावर एकच सेंट्रलाईज्ड प्रिंटर असल्याने तिने जर प्रिंटआउट काढली असती तर ती सहज पकडली गेली असती. त्यामुळे तिने लिहीण्याचा मार्ग निवडला. अपॅांइटमेंट लेटरवर दिड वर्षापुर्वी सही केल्यानंतर तिने हाताने काही लिहील्याचे तिला आठवत नव्हते. त्यामुळे ती निर्धास्त होती.त्या दिवशी तिने उभे राहून कल्पनाच्या क्युबिकल मध्ये बघण्याचा मोह टाळला.

दुसर्या दिवशी नेहा जागेवर बसतीय तर काहीतरी ठोकाठोकीचा आवाज तिला आला. कल्पनाच्या क्युबिकल जवळ आणि तिचा लॅपटॅाप येणार नाही असं सीसीटीव्ही बसवण्याचे काम चालू होते. त्या कंपनीत फ्लोअर बाहेर म्हणजे लिफ्ट, कॅंटिन,जिम सगळीकडे सीसीटीव्ही होते. फ्लोअरवर सीसीटीव्ही बसवण्याची ही पहिलीच वेळ.हे का चाललयं हे न कळण्याइतकी नेहा दुधखुळी नव्हती. मात्र कल्पनाचा प्रभाव खुप वरपर्यंत आहे आणि या पुढची पावलं अतिशय सावधानतेने उचलायला पाहिजेत ही खुणगाठ तिने मनाशी बांधली.

तिने ‘एकला चलो रे’ ची कास सोडून तिच्या मॅनेजरला म्हणजे आदितीला विश्वासात घ्यायचे ठरवले. आदितीने नेहाला बोलणं पुरं करू न देताच झटकन विषय बदलला आणि क्लायंट व्हिजिटचं जास्तीचं काम तिच्या गळ्यात मारलं.

आता मात्र नेहा गोंधळली. लॅपटॅापसमोर सुन्न होउन ती बसलेली असताना इनबॅाक्स मध्ये एक नोटिफिकेशन आलं. कंप्लायन्स आणि एथिक्सचं वार्षिक ॲानलाईन प्रशिक्षण पुर्ण करायचं. इतर वेळी नेहाला कोणतीही प्रशिक्षणं पुर्ण करायला मनापासून आवडायचं. आत्ता मात्र तिने नाराजीनेच ते ट्रेनिंग करायला घेतले. तिने मेल उघडला आणि तिचे डोळे चमकले.

त्या मेलप्रमाणे “व्हिस्टल ब्लोअर पॅालिसी २०१० सुधारित मार्गदर्शक तत्वे “ सर्व कर्मचार्यांनी नीट वाचून ती मनात रूजवणं, त्याचं इन स्पिरिट पालन करणं अपेक्षित होतं.

नेहाने ती तत्वे डोळ्यात तेल घालून वाचायला सुरूवात केली.
सुधारित तत्वांप्रमाणे कोणी कोणावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करत असेल, कोणत्याही प्रकारचं लैंगिक शोषण करत असेल तर अगदी नवीन रुजू झालेल्या ज्युनिअर पातळीच्या कर्मचार्याला सुध्दा अन्याय करणारा कितीही वरच्या पदावर असो, अगदी सीईओ असला तरी त्याची तक्रार करता येईल.पुर्वी तक्रारकर्ता आणि आरोपी यामधली पदभिन्नता ३ पातळींपेक्षा चालायची नाही. तसेच तक्रारकर्त्याने कंपनी जॅाईन करून किमान ६ महिने झाले पाहिजेत अशी अट होती.

ही तक्रार निनावी किंवा स्वत:ची ओळख देऊन कोणत्याही प्रकारे करता येत होती. ही तक्रार करण्याचा तक्रारकर्त्याला कोणताही त्रास होणार नाही ही ग्वाही त्यात दिली होती.तक्रार निनावी दाखल झाली तरी ती तितक्याच गांभिर्याने बघितली जाईल आणि ठराविक मुदतीत सोडवली जाईल असा विश्वास त्यात दिला होता.

परत एकदा नेहाला तिच्या तक्रारीची दखल घेतली जाईल अशी आशा वाटू लागली. तिने कल्पनाबद्दल जास्तीत जास्त महिती देऊन त्यांनी दिलेल्या टेंम्पलेट प्रमाणे निनावी तक्रार दाखल केली.

https://www.maayboli.com/node/77249

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
उत्सुकता वाढलीयं पुढच्या भागाची....

धन्यवाद रूपाली.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे हुरूप ही वाढतो आणि नवीन कल्पनाही सुचतात.

कथा छान सुरू आहे. नेहाला यश मिळो.

हे प्रकार कॉर्पोरेटमध्ये पाहिलेले आहेत. मेल बॉस हाताखालील दुसऱ्या मेल एम्प्लॉयीच्या अंगचटीला सर्वांसमोर जाणे आणि त्यानेही ते आनंदाने सहन किंवा एन्जॉय करणे बघितले आहे. त्याला मिळणारी इनक्रिमेंट्स बघून इतरांचे जळणे पण बघितले आहे. एका डिपार्टमेंटमध्ये एक बॉस, दोन तीन पुरुष एम्प्लॉयी व बाकी 6-7 स्त्रिया असा सेटअप आणि त्यातल्या बॉसचे एकाशी असे सेटिंग. स्त्रिया गंमतीत म्हणायच्या की इनक्रिमेंट्स मिळायला काही स्त्रिया हा मार्ग पकडतात पण आम्हाला तीही सोय नाही. अर्थात त्या गंमतीत बोलायच्या, प्रत्यक्षात असे काहीही त्यांनी केले नसते.

पण बॉसची ऑफिसात काय पोझिशन आहे त्यावर तक्रारीला डस्ट बिन दिसणार की नाही हे ठरते असे बघितलंय.

धन्यवाद चिन्मयी, जेम्स बॅांड, साधना, स्वाती,मृणाली, नानबा.
साधना-तुमचा अनुभवही धक्कादायक.

पण बॉसची ऑफिसात काय पोझिशन आहे त्यावर तक्रारीला डस्ट बिन दिसणार की नाही हे ठरते असे बघितलंय.
-हो ,असंही होऊ शकतं

Happy to say our company is very very sensitive and sensible about this.-खरचं चांगली गोष्ट आहे.

धन्यवाद वर्णिता, प्रवीण. पुढचा भाग रविवारी टाकेन.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.