अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

Submitted by ललिता-प्रीति on 9 November, 2020 - 05:12
Unpacked : Refugee Baggage

उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं?
आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते.
आता आणखी एक कल्पना करून बघा- एक सताड उघडी सूटकेस. आत दिसतंय बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त झालेलं एक घर. घराचा दर्शनी भाग पुरता विस्कटलेला. भिंती मोडून पडलेल्या, आतल्या सळ्या अस्ताव्यस्त बाहेर आलेल्या. खोल्यांमधल्या वस्तू कालपर्यंत अगदी व्यवस्थित, नीटनेटक्या असाव्यात; आता त्या स्फोटामुळे धुरकट झालेल्या, अवकळा आलेल्या. अगदी आता-आतापर्यंत त्या खोल्यांमध्ये माणसांचा वावर असावा; पण आता ते घर उजाड, भकास, सुनसान झालंय. हिंसेचं असं उघडंवाघडं रूप पाहून ती सूटकेस पटकन बंद करून टाकाविशी वाटते. पण ते शक्य नाहीये. आणि ही एकच सूटकेस नाही, अशा ओळीने नऊ सूटकेसेस विध्वंस घेऊन समोर उभ्या ठाकल्या आहेत...

हे आहे ‘अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज’, एक मल्टिमीडिया इन्स्टॉलेशन. त्याचे कर्ते आहेत मोहमद हाफेझ, एक कॉर्पोरेट आर्किटेक्ट आणि अहमद बद्र, एक इराकी निर्वासित तरुण जो आता अमेरिकेतला लेखक, कवि, सामाजिक कार्यकर्ता आहे.

mohammad-ahmad.jpg

मोहमद हाफेझ मूळचा सिरियातल्या दमास्कसचा. २००३ साली तो अमेरिकेत शिक्षणासाठी म्हणून आला. ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकी सरकारने १६ वर्षांवरच्या स्थलांतरित पुरुषांसाठी काही कडक नियम केले होते. त्या नियमांतर्गत मोहमदला अमेरिकेचा ‘सिंगल एन्ट्री विजा’ मिळाला होता. त्यामुळे त्याला सुटीसाठीही आपल्या घरी जाता येणार नव्हतं. त्याने आर्किटेक्चरचं शिक्षण तर पूर्ण केलं; पण सलग आठ वर्षं तो मायदेशी जाऊ शकला नाही, अगदी आपल्या आई-वडिलांनाही भेटू शकला नाही.
घरच्या आठवणीने मोहमद खूप तळमळायचा. त्याच मनःस्थितीत एकदा त्याने काही टाकाऊ वस्तू गोळा केल्या- लाकूड, प्लास्टिक, प्लास्टरचे-थर्मोकॉलचे तुकडे, वगैरे. वरवर पाहता हा कचराच. पण आर्किटेक्चरल मॉडेलिंगसाठी अशा वस्तू वापरण्याची त्याला सवय होती. तो त्या वस्तू पुढ्यात घेऊन बसला. त्याच्या डोक्यात एक चक्र सुरू झालं. पुढचे सलग आठ-नऊ तास काम करून त्याने दमास्कसच्या जुन्या भागातल्या एका इमारतीची हुबेहूब लहानशी प्रतिकृती तयार केली. दमास्कसचा कोपरा न् कोपरा त्याला परिचित होता. त्याच्या आत भिनलेलं ते शहर पूर्णपणे त्या प्रतिकृतीत उतरलं होतं. त्या प्रतिकृतीचं काम हातावेगळं झालं आणि त्याला एक साक्षात्कार झाला- आपण आपल्या देशात जाऊ शकत नसलो तरी इथे अमेरिकेत आपल्या आठवणीतला देश अशा प्रकारे साकारू शकतो.
त्यानंतर त्याने सिरियातल्या घरांच्या अशा आणखी प्रतिकृती तयार करायला सुरूवात केली. त्यासाठी विविध कल्पना, फॉर्म्स वापरले. अनेको टाकाऊ वस्तूही वापरल्या. दिवसा त्याच्या कामाचा भाग म्हणून तो उंचच उंच इमारतींची डिझाइन्स तयार करायचा आणि रात्री हाताच्या तळव्यावर मावतील अशी सिरियन घरांची मिनिएचर्स साकारायचा. पुढची सात-आठ वर्षं तो हे करत राहिला. मात्र या प्रतिकृती त्याने स्वतःपुरत्याच ठेवल्या. कारण त्याकडे तो स्वतःच्या मनोवस्थेचा निचरा म्हणून पाहत होता.

२०१० मध्ये ‘अरब स्प्रिंग’ची सुरूवात झाली. पुढल्या वर्षभरात सिरियामध्ये यादवी युद्ध भडकलं. तिथल्या विध्वंसाच्या बातम्या, फोटो, व्हिडिओ प्रसारमाध्यमांमध्ये यायला लागले. ते पाहून मोहमद हादरून गेला. इथे तो दमास्कसचा वैभवशाली स्थापत्यवारसा जिवंत ठेवू पाहत होता, आणि तिकडे प्रत्यक्षातल्या त्या वैभवाची बाँबहल्ल्यांमध्ये वाताहत होत होती. ते पाहून तो परत एकदा खचला. त्याच्या मिनिएचर कलाकारीला ब्रेक लागले.
मोहमदची पुढची दोन वर्षं परत तशीच तळमळत गेली. मायदेशातल्या त्याच्या बहुतेक नातेवाइकांनी, मित्र-सुहृदांनी देश सोडला होता, अन्यत्र आसरा शोधला होता. नव्या जागी, नव्या देशात ते स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत होते. त्यातलाच एक त्याचा मेहुणा. हा मेहुणा दमास्कसमधला एक यशस्वी आर्किटेक्ट होता. यादवी युद्धामुळे त्याच्यावर अवघ्या तीन-चार वर्षांत स्वीडनमध्ये निर्वासित म्हणून राहण्याची वेळ ओढवली होती. २०१४ साली मोहमदला आपल्या मेहुण्याचा ठावठिकाणा समजला; त्याचा ‘निर्वासितपणा’ समजला. ‘निर्वासित’ या शब्दापाशी मोहमदचं विचारचक्र वारंवार अडकायला लागलं. स्वतःच्या परिने त्या शब्दामागचा गर्भितार्थ शोधण्याची निकड निर्माण झाली. त्यातून तो परत मिनिएचर मॉडेल्स करण्याकडे वळला. मात्र आता त्यामागचा त्याचा विचार थोडा बदलला होता.
निर्वासितांबद्दल अन्य लोकांचा दृष्टीकोन जरा तिरकस आणि असहिष्णू असतो. निर्वासितांकडे गमावण्यासारखं काहीही उरलेलं नसतं, म्हणून ते इतरांच्या नोकर्‍या आणि संपत्ती लाटायला येतात, असाच सर्वसाधारण मानस असतो. मोहमदला हे डाचत होतं. निर्वासितांवर नेमकी कोणती परिस्थिती ओढवलेली असते ज्यामुळे ते आपलं, आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांचं आयुष्य पणाला लावतात, हे त्याला इतरांना सांगायचं होतं. जगण्याची फारशी शाश्वती नसताना परक्या प्रदेशात मैलोगणती प्रवास करण्यामागे निर्वासितांची कोणती अगतिकता असते ते जगापुढे यायला हवं असं त्याला वाटत होतं. आपल्या कलेतूनच तो यावर बोलू शकणार होता. तोच मार्ग त्याने अनुसरला.
मोहमद म्हणतो- ही मांडणीशिल्पं म्हणजे ‘रेफ्युजी’ शब्दाला मानवी रूप देण्याचा एक प्रयत्न आहे. त्याचा हा प्रयत्न आपल्यावर कसा परिणाम करतो पाहा.

सिरियातल्या हॉम्स शहरातल्या एका कुटुंबाला एका सकाळी बाँबहल्ल्यांमुळे अचानक घर सोडून पळावं लागलं. त्यांना वाटलं होतं चार-सहा दिवसांत सगळं निवळेल आणि आपण आपल्या घरी परतू. आज सहा वर्षं झाली, ते कुटुंब परत येऊ शकलेलं नाही. ही कथा भेदक शब्दांत सांगता आली असती; मांडणीशिल्प म्हणून सांगायची तरी एक उद्ध्वस्त घर दाखवून शेजारी चार ओळी लिहिता आल्या असत्या; पण मोहमदने त्या घरातला एक क्षण गोठवला आहे.

coffee-cup-1.jpg

अयमान आणि घीना ही तिथे राहणारी दोन भावंडं. अयमानला आठवतंय, त्या दिवशी घाईघाईने निघताना त्याच्या आईने हातातला कॉफीचा कप खोलीतल्या एका टेबलवर तसाच ठेवून दिला होता. परत आल्यावर तो कप उचलायचा असं त्याने ठरवलं होतं. मोहमद ते टेबल, तो कप आपल्याला जसाच्या तसा दाखवतो.
इतकंच नाही, तर घर अर्धवट उद्ध्वस्त झाल्यामुळे घराच्या आतल्या भागातली ती खोली अचानक रस्त्यावर आलेली दिसते; कारण त्या खोलीची चौथी भिंतच नाहीशी झालेली आहे. घराच्या पुढल्या भागातल्या खोल्यांचे आता केवळ ढिगारे उरले असणार, आसपासची समस्त घरं अशीच सर्व तर्‍हेने मोडून पडलेली असणार, हे जाणवतं. मोहमदने केलेलं इन्स्टॉलेशन पाहताना ती घरं नकळत डोळ्यांसमोर उभी राहतात. हे सगळं होतं, केवळ त्या शिल्पामधल्या सूक्ष्म तपशीलांमुळे.

मोहमदच्या स्टुडिओचे फोटोही इंटरनेटवर सापडतात. स्टुडिओत अगणित वस्तू जमवलेल्या दिसतात. त्याच्या मांडणीशिल्पांचे फोटो पाहून मग स्टुडिओचे फोटो न्याहाळायला सुरूवात केली तर अनेक वस्तू ओळखीच्याही वाटायला लागतात. कचरा म्हणून गणल्या जाऊ शकणार्‍या त्या वस्तूंचा खुबीने वापर केलेला हळूहळू समजायला लागतो.

MOHAMAD-HAFEZ-STUDIO-2.jpg

मोहमदच्या या कलाकृती पाहताना आपण द्विधा मनःस्थितीत सापडतो. एक, म्हणजे इन्स्टॉलेशन्समधून त्या-त्या लोकांच्या कहाण्या आपल्यावर येऊन आदळतात. त्याचवेळी मिनिएचर्समधल्या सूक्ष्म तपशीलांनी आश्चर्यचकित व्हायला होतं. यातून कर्त्यांना निर्वासितांच्या कहाण्या सांगायच्या आहेत, की आपली सूक्ष्मतम कला, आपली कल्पनाशक्ती लोकांना दाखवायची आहे, असा प्रश्न पडू शकतो.
एकापुढे एक दिसणारी ही मांडणीशिल्पं लोकांनी जाऊन पाहणं अपेक्षित असतं, त्यामागच्या कहाण्या जाणून घेणं अपेक्षित असतं. म्हणजे हे तर एक कलाप्रदर्शनच झालं. पण याला प्रदर्शन म्हणावं का, असाही प्रश्न पडतो. म्हटलं तर यात मिनिएचर्समधलं नेत्रसुख देणारं सगळं काही आहे; पण ते पाहणार्‍याचे डोळे चमकणार नाहीत. यातली मिनिएचर्स अगदी म्हणजे अगदी हुबेहूब आहेत; पण त्याने कुणालाच आश्चर्याने तोंडात बोटं घालाविशी वाटणार नाहीत. कारण ही मिनिएचर्स मनाला त्रास देतात, मेंदूला झिणझिण्या आणतात, बघणार्‍याचं काळीज त्याने थिजून जातं...
आणि मग मोहमदच्या नजरेतलं थिजलेपण, वेदनाही जाणवते. आपल्या देशापासून दुरावल्याची वेदना, आपला देश उद्ध्वस्त होत असताना पाहण्यामागची वेदना, ‘निर्वासित’ या लेबलचं ओझं वाहण्यामागची वेदना. त्या वेदनेशी तादात्म्य पावल्याशिवाय ही शिल्पं बघता येत नाहीत. त्यातले तपशील इतक्या तपशीलांत का आहेत हे त्यानंतरच खर्‍या अर्थाने समजतं. ते तपशील साकारतानाचे मोहमदचे हात दिसायला लागतात. त्याने त्यांत जीव ओतलाय हे समजतं. त्यामागची त्याची तळमळ हळूहळू उमगायला लागते.

या कहाण्यांमधली सिरिया, अफगाणिस्तान, काँगो, इराक इथून आलेली माणसं मोहमदला त्याच्या अमेरिकी शहरात, न्यू हॅवन इथेच भेटली. मोहमद आणि अहमद यांनी या कुटुंबियांसोबत दीर्घ संवाद साधले. त्यांना बोलतं केलं. त्यांनी सांगितलेल्या कहाण्यांनुसार मोहमदने मॉडेल्स तयार करायला सुरूवात केली. अहमदने त्या कहाण्या शब्दबद्ध केल्या. बघताबघता या प्रोजेक्टबद्दल अनेकांना समजलं. मग त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या, भावंडांच्या, घरातल्या इतर मोठ्यांच्या सूटकेसेस मोहमदकडे आणून दिल्या. एकेका सूटकेसमध्ये एकेक शिल्प साकारत गेलं.

ही इन्स्टॉलेशन्स घेऊन दोघं अमेरिकेत ठिकठिकाणी फिरले आहेत. प्रत्येक सूटकेसच्या शेजारी त्या-त्या कुटुंबाचा त्या उचकटलेल्या घरापासूनचा प्रवास शब्दांत मांडलेला असतो. हेडफोन्सद्वारे ती कहाणी त्यांच्याच आवाजात ऐकण्याची सोयही असते. ऐकणारी व्यक्ती आणि कोणे एके काळी त्या मोडलेल्या घरात राहणारी व्यक्ती यांचा एकमेकांशी थेट संवाद सुरू होतो. मोहमद आणि अहमद त्यातून अलगद बाजूला झालेले असतात. त्यांच्या वेबसाईटवरचे इन्स्टॉलेशन्सचे फोटो आणि ऑडिओ ऐकतानाही हाच अनुभव येतो.

installations-1.jpg

मोहमदने मांडलेल्या कहाण्यांपैकी एक कहाणी त्याची स्वतःची आहे आणि एक अहमदचीही आहे. अहमदचं कुटुंब मूळचं बगदादचं. २००६ साली एका रात्री त्यांच्या घरावर बाँबहल्ला झाला. सुदैवाने तो, त्याचे आई-वडील, धाकटी बहीण त्यातून वाचले. आधी त्यांनी सिरियात स्थलांतर केलं. तिथे त्यांना दोन वर्षं राहावं लागलं. त्यानंतर त्यांना निर्वासित म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे प्रवेश मिळाला. गेली ११ वर्षं अहमदचं कुटुंब अमेरिकेत राहतं आहे. त्याचं, त्याच्या बहिणीचं शिक्षण तिथेच झालं आहे. त्याच्या आई-वडिलांना तिथे चांगलं काम मिळालं आहे.

यातल्या सगळ्याच कहाण्या अशा संघर्षातून यशापर्यंतच्या आहेत. फरिश्तेह मूळची इराणी, अफगाणिस्तानात लहानाची मोठी झाली. बाविसाव्या वर्षी तिने तेहरानमध्ये अफगाणी मुलांसाठी एक प्राथमिक शाळा सुरू केली. दोन सत्रांत तिथे ३०० मुलं शिकायची. स्वतःच्या ठावठिकाणांचे कोणतेही पुरावे नसणारी ती मुलं, त्यांना इराणी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी याच एका शाळेचा आसरा होता. एका खोल तळघरात, कामचलाऊ दिव्याच्या उजेडात त्या मुलांचं शिक्षण चालायचं. या शाळेची सरकारकडून अनेकदा कडक तपासणी झाली; अनेकदा फरिश्तेहला शाळा बंद पाडण्यास भाग पाडलं गेलं. एकीकडे ती संयुक्त राष्ट्र संघटनेसाठीही काम करायची. त्या कामादरम्यानच कधीतरी तिने निर्वासित म्हणून पुनर्वसनासाठी अर्ज केला आणि २०११ साली ती अमेरिकेत आली. सध्या ती न्यू हॅवन विद्यापीठात फारसीची प्रोफेसर म्हणून काम करते. अमेरिकेत आल्यावर माझा दुसरा जन्म झाला, असं ती म्हणते. फरिश्तेहच्या कहाणीसाठी मोहमदने वापरलेली सूटकेस तिच्या आईचीच होती.

fereshteh.jpg

माहर हा इराकी तरूण. त्याच्या वडिलांनी त्याला सोळाव्या वर्षी एक कॅमेरा घेऊन दिला. त्याने बगदादच्या रस्त्यांवरची विदीर्ण करणारी दृश्यं कॅमेरात टिपायला सुरूवात केली. मात्र थोड्याच दिवसांत इराकी सैनिकांनी त्याचा कॅमेरा जप्त केला. माहर अहमदला सांगतो, आमच्या देशात बंदुका बाळगण्याची परवानगी होती, मात्र कॅमेराला मनाई होती. वयाच्या १८व्या वर्षी माहर अमेरिकी सैन्यासाठी दुभाषा म्हणून काम करायला लागला. त्यासाठी तो ‘गूगल ट्रान्सलेट’ची मदत घ्यायचा. हे काम त्याने वर्षभर केलं. ते त्याने बंद केलं नाही तर त्याच्या कुटुंबियांना जीवे मारलं जाईल अशी त्यांना धमकी देण्यात आली. तीनच दिवसांत त्याच्या वडिलांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. त्यानंतर त्या कुटुंबाने जॉर्डनमध्ये आसरा घेतला आणि तिथून २०१४ साली ते अमेरिकेत आले. ‘येल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे माहरच्या जीवनकथेवर एक नाटक बसवण्यात आलं. अमेरिकेत अनेक ठिकाणी हजारोंनी ते नाटक पाहिलं. ‘गूगल’चे अध्यक्ष सुंदर पिचाई यांच्यापर्यंत त्याची कहाणी पोहोचली. २०१७ साली त्याला गूगल कंपनीत नोकरी मिळाली.

Maher-Iraq.jpg

या यशस्वी कहाण्या वाचून-ऐकून आपल्याला हायसं वाटतं. पण मोहमदची विदीर्ण करणारी मिनिएचर्स ती भावना फार काळ टिकू देत नाहीत. माहरच्या घराच्या शिल्पामध्ये कोपर्‍यात धुळीने माखलेली एक तीनचाकी सायकल दिसते. (सर्वात पहिला फोटो पहा.) त्या घरातलं कुणीतरी लहान मूल ती सायकल चालवत असतानाचं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर तरळून जातं. मग स्फोटात मोडतोड झालेलं मागचं कपाट दिसतं. त्या हल्ल्यात त्या लहानग्याचं काय झालं असेल, हा विचार छळायला लागतो. अर्धवट ढासळलेल्या भिंती ‘आ’ वासून उभ्या असतातच. त्यातून बाहेर आलेल्या सळ्या आणखी बाहेर निघून आपल्याला जखडून टाकतील की काय असं वाटायला लागतं.

पण ‘अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज’च्या वेबसाइटवर प्रत्येक इन्स्टॉलेशनसोबत त्या-त्या व्यक्तीचा एक-एक फोटोही पाहायला मिळतो. प्रसन्न चेहर्‍याचा माहर, समाधानी फरिश्तेह, गोड हसणारी घीना आपल्याला आश्वस्त करतात. एक आशावाद जागवतात. निर्वासितांचं माणूसपण अशाच लोकांमुळे अजून तग धरून आहे; सर्व प्रकारच्या विपरित परिस्थितीशी ते झगडतं आहे.

coffee-cup-2-ghena.jpg

निर्वासितांच्या जागतिक समस्येला मोहमदच्या मिनिएचर्सनी कवेत घेतलं आहे. मिनिएचर्समध्ये काहीतरी बांधून ठेवणारं असतं खरं. काहीतरी सुंदर, अद्भुत. लहानशा जागेत, चिमुकल्या आकारात व्यापक अनुभव देणारं. कधी ते प्रत्ययकारी वाटतं; कधी ते निःशब्द करतं, मनाला भिडतं, भेदून जातं; ते वर्मी घाव घालणारंही असू शकतं...
मोहमदची मांडणीशिल्पं आपल्याला सुंदर अद्भुतापासून वर्मी घाव घालण्यापर्यंतचा हा प्रवास घडवतात.

----------

अनुभव मासिकाच्या फेब्रुवारी-२०२० अंकात ’निर्वासितांच्या वेदनेचा उद्गार’ या शीर्षकाने प्रकाशित झालेला लेख.
फोटो इंटरनेटवरून घेतलेले आहेत.

https://www.unpackedrefugee.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह
बघताना सुन्न व्हायला होत असेल.

कधी ते प्रत्ययकारी वाटतं; कधी ते निःशब्द करतं, मनाला भिडतं, भेदून जातं.>>>>>>>>>>
असंच वाटलं लेख वाचताना आणि पाहताना.

बापरे! निर्वासितांच्या कहाण्या लोकांपर्यंत पोचवण्याची वेगळीच वाट! फार वाईट वाटतं या देशांमधल्या सर्वसामान्य माणसांचं.

हर्पेन +१
या कहाण्या ऐकल्या/वाचल्या की फार त्रास होतो पण ही परिस्थिती जगापुढे आली पाहिजे असेही वाटत राहते.

काय बोलू...
खुप दुक्खी कहण्या आहेत ह्या निर्वासितांच्या. आम्ही जर्मनीतही खुप निर्वासित बघतो आहोत. जर्मन लोकांनी त्यांना खुप चांगले सामावुन घेतले आहे.